... पोरांनी पार धुडगुस घातला होता. येणार येणार म्हणून आम्ही पोरं ज्या मोठया विकांताची वाट पाहत होतो, तो विकांत एकदाचा आला होता. मी, चिंटू, अम्या, रव्या, जग्या आणि सम्या अशी सहा टाळकी केव्हाच ब्यागा भरून तयार होती. एंटरप्राईजमध्ये जीएमसी युकॉन बुक करुन झाली होती. गाडी कसली म्हणा, एक अजस्त्र धुडच होतं ते. अंगात नुसती सुरसुरी भरली होती. साहजिकच होतं म्हणा. कारण आम्ही सारे लाँग विकेंडला डिझ्नेलँडला जाणार होतो.
यथावकाश ती शुक्रवारची संध्याकाळ आली. आणि आमचा लॉस एंजेलिसच्या दिशेने प्रवास सुरु झाला. सम्या व्हीलवर बसला होता. आधीच सम्याला वेगाचं भयानक वेड त्यात हातात युकॉनचं व्हील. मग काय विचारता. सम्या अक्षरशः पेटला होता. युकॉन वार्याच्या वेगाने धावत होती. सॅन फ्रान्सिस्कोतून बाहेर पडलो. सॅन लियांड्रो, डब्लिन गेलं. बघता बघता लिव्हरमोअरही मागे टाकलं. फाय एटी ईस्ट नावाचा आमचा पायाखालचा स्टेट हायवे संपून आता आय फाय नावाचा फारशी वळणे नसणारा, अगदी नाकासमोर चालणारा हायवे सुरु झाला होता. सम्याला अजूनच जोर आला होता. आम्हा सार्यांना कधी एकदा लॉस एंजेलिसला पोहचतोय असं झालं होतं.
पण चिंटु मात्र या सार्यापासून अलिप्त होता. एखादया म्हसळा श्रीवर्धनच्या कोळी आजोबांनी कोकण रेल्वेच्या ट्रॅकवर धावणार्या मस्त्यगंधा एक्स्प्रेसमध्ये कुठेतरी कोपर्यात दरवाजाच्या पाठीमागे पायाचं मुटकुळं करुन बसावं असा चेहरा करुन तो कोपर्यातल्या सीटवर बसला होता. तसा तो आमच्याबरोबर यायलाच तयार नव्हता. कशीबशी समजूत घालून आम्ही त्याला तयार केलं होतं. म्हटलं चिंटया हे बघ. पोरगी काय एक गेली दुसरी येईल. मात्र कंपनी पुन्हा पुन्हा अमेरिकेला पाठवेलच असं नाही. आणि समजा पुन्हा पाठवलंच तर कॅलिफोर्नियालाच पाठवेल कशावरुन? उदया तिकडे टेक्सास बिक्सासला पाठवलं तर? म्हणून म्हणतो, या भंगी अवस्थेतून बाहेर पड. आणि मस्त एंजॉय कर. हो नाही करता करता चिंटु आमच्याबरोबर लॉस एंजेलिसला डिझ्नेलँडला यायला तयार झाला.
आम्ही बाकीची पाच टाळकी "ये गो ये, ये मैना, पिंजरा बनाया सोनेका" च्या सुरावटींवर बेभान झालेलो असताना चिंटु मात्र त्याच्या "मन उदास उदास, मन खिन्न्न खिन्न" मोडमधून बाहेर पडायला तयार नव्हता. इथे मी खिन्न हा शब्द टंकताना कितीही न एकाला एक जोडले तरी ते चिंटुची तेव्हाची खिन्न अवस्था व्यक्त करु शकणार नाहीत इतका चिंटु खिन्न झाला होता. पोरीच्या भानगडीमध्ये खिन्न झालेले खुप दोस्त लोक आपण आतापर्यंत पाहिलेले आहेत. परंतू चिंटुचं "प्रकरण" जरा वेगळंच होतं.
सोमवारीच मला चिंटुचं काहीतरी बिनसलं आहे हे जाणवलं होतं. तसा चिंटु आधी रिलायन्स इंडिया कॉलींग फक्त आई कशी आहेस्, बाबा कसे आहात एव्हढंच विचारण्यासाठी वापरायचा. मागच्या रविवारी मात्र बराच वेळ बोलत होता. आई बाबा नक्कीच नव्हते फोनवर. चेहरा बर्यापैकी सिरीयस होता. पोरीची भानगड होती. प्रश्नच नव्हता. परंतू चिंटु ताकास तुर लागू देत नव्हता. अगदी पार खनपटीस बसल्यावर कसाबसा "यार... एका मैत्रिणीचा प्रॉब्लेम झाला आहे" एव्हढंच पुटपुटला. चिंटुला बोलतं कसं करायचं हे सम्याला आणि रव्याला चांगलंच माहिती होतं. पोरांनी कसाबसा सोमवार जाऊ दिला. मंगळवारी ऑफीसमध्ये पाटया टाकल्या आणि जे निघालो ते थेट मार्केट प्लेसमध्ये. चिंटुला कसलाच थांगपत्ता लागू न देता. बडवायजरच्या सहा बाटल्यांचे दोन क्रेट मिरवणूक काढावी अशा थाटात आम्ही घरी आणले. बडवायजरचे दोन ग्लास घशाखाली उतरल्यावर चिंटु पोपटासारखा बोलू लागला...
चिंटु आणि श्रेयाची जुनी ओळख. श्रेया त्याच्या शाळेत, जूनियर कॉलेजला होती. त्याच्याच गल्लीत तिचं घर होतं. त्याच्या छोट्या बहीणीसोबत ती त्याच्या घरी वगैरेही येत असे. जूनियर कॉलेजला असताना ती त्याला कधी आवडायला लागली हे त्याचं त्यालाच कळलं नाही. पण शब्द ओठावर कधी आले नाहीत. तिच्या बद्दलच्या नाजूक भावनांना त्याने मनातच ठेवलं तेव्हा. जूनियर कॉलेज संपलं. चिंटु इंजिनीयरींगला गेला तर श्रेया बीएस्सीला. कॉलेजमध्ये रूळल्यावर त्याला पुन्हा श्रेयाची ओढ वाटू लागली. शेवटी त्याने एकदा मनाशी निश्चय करून, उसनं अवसान आणून श्रेयाला एकटंच गाठून आपल्या भावना तिच्यासमोर व्यक्त केल्या. आणि पुढच्याच क्षणाला त्याचे डोळे पाण्याने डबडबले. श्रेयाचं दुसर्या एका मुलावर प्रेम होतं. त्या मुलाचंही तिच्यावर प्रेम होतं...
पण त्याने स्वत:ला सावरलं. जणू स्वत:चीच समजूत घातली. पण त्याचं जगण मात्र काहीसं निरस झालं. चहूकडे बाकीचे पक्षी आनंदाने उंच उंच भरार्या मारत असताना कुठेतरी एखादा पारव्याने दूर अशा पडीक घरावर बसून आपले रिकामेपण अनुभवणं किंवा आजुबाजूला सुग्रास जेवणाचा घमघमाट पसरलेला असताना कुणा एका व्यथिताची त्या अन्नावरुन वासना उडणं अशीच काहीशी अवस्था चिंटुची झाली होती.
उंच उंच आनंद पक्षी
खुजे रिते रिकामपण
अन्न भरली सृष्टी
बंद तोंड एकटे एकटे
चिंटुने अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं. आयटी क्षेत्रातल्या एका नामांकित कंपनीत तो संगणक अभियंता म्हणून रुजू झाला. आणि बघता बघता कंपनीने त्याला अमेरिकेत प्रोजेक्ट्वर पाठवलं. हे सगळं होत असताना तो श्रेयाला विसरला नव्हता. मित्रांकडून जशी जमेल तशी तिची माहिती तो काढत राहिला. पुढे पुढे त्याला हेही कळलं की श्रेया आणि तिचा बॉयफ्रेंड लग्न करणार आहेत. पण त्याला त्याचं वाईट न वाटता उलट आनंदच झाला. कारण वयाबरोबरच तो विचारांनी परिपक्व झाला होता. ती कुठेही राहावी, सुखी राहावी एव्हढीच त्याची इच्छा होती.
... आणि त्या रविवारी अचानक त्याला एका मित्राकडून कळलं की श्रेयाचा तिच्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाला आहे. श्रेयाचा बॉयफ्रेंड त्याच्याच कंपनीतल्या एका मुलीसोबत लग्न करत आहे. आणि श्रेयाने या गोष्टीचा धसका घेतला आहे. ती या सगळ्याने खूप डिप्रेस झाली असून तिला तिच्या घरच्यांनी दवाखान्यात ठेवलं आहे.
"खूप साधी आहे रे ती. नाही सहन होणार तिला हा धक्का..."
चिंटु अश्रुभरल्या डोळ्यांनी सारं सांगत होता. आमची बडवायजर केव्हाच उतरली होती...
पण आम्ही लगेच सावरलो. चिंटुलाही सावरणं गरजेचं होतं. चिंटुबरोबर आम्हीही हळवं होऊन चालणार नव्हतं. आम्ही वरवर त्याची खिल्ली उडवत होतो. त्याला ते सारं विसरवण्याचा प्रयत्न करत होतो. पुढचाच विकेंड लोंग विकेंड होता. आमचा एलेचा प्लान आधीपासुनच तयार होता. चिंटु मात्र मध्येच हे नविन प्रकरण झाल्यामुळे आम्हाला टांग दयायला पाहत होता. पण आम्ही त्याची कशी बशी समजूत घालून त्याला आमच्याबरोबर आणला होता.
... दिवस उजाडता उजाडता तांबडं फुटायच्या आधी आम्ही एलेत शिरलो. मॅकडी मध्ये सकाळी सकाळी पोटपुजा करुन आम्ही डिझ्नेलँडच्या वाटेला लागलो. ती जादूई दुनिया पाहून आम्ही हरखून गेलो. चिंटु मात्र अजूनही हरवलेलाच होता.
मन उदास उदास
मन खिन्न्न खिन्न
भरली ताटावांनी वने
भरल्या छंदवनात मलूल मलूल
अशीच काहीशी अवस्था चिंटुची त्या जादूई नगरीत झाली होती.
त्या जादूई नगरीचा आनंद घेत आम्ही शेवटी सोरीनपाशी आलो. आभासी वास्तव (व्हर्च्युअल रीअॅलिटी) नामक तंत्रज्ञानावर आधारीत ही कॅलिफोर्नियाची आभासी सफर. चिंटु सोडून आम्ही सार्यांनी फटाफट तिकिटे काढली. चिंटु मात्र आमच्या सोबत यायला तयार होईना. शेवटी त्याला तिथेच सोडलं आणि आम्ही आत गेलो. समोर एक भला मोठा पाढराशुभ्र वर्तुळाकार पडदा. थियेटरमध्ये असते तशीच शेवटाला उंच उंच होत जाणारी परंतू वरच्या बार्सना खुर्च्या लटकवलेली आसन व्यवस्था. आम्ही सारे बसलो. पट्टे बांधून घ्या, खुर्चीसमोर लटकणारा चश्मा डोळ्यावर चढवा अशा सुचना मिळाल्या. थोडयाच वेळात गुडूप अंधार झाला आणि आमची आकाशातून कॅलिफोर्नियाची आभासी परंतू खरी खुरी भासणारी सफर सुरु झाली. सुरुवातीलाच गोल्डन गेट. आमच्या तथाकथित हवाई जहाजाने गिरकी घेतली. एकदम खाली आलो. गोल्डन गेटच्या बाजूने जाणार्या अवाढव्य जहाजांना आपले पाय आता टेकणार या भितीने गारठून गेलो. ईतक्यात आमचं हवाई जहाज पुन्हा एकदा उंच उडालं. यशोमती उदयान, लेक टाहो वगैरे करत आमची कॅलिफोर्नियाची सफर चालू राहिली...
शो संपला. एक अनोखा आनंद घेऊन आम्ही पाचजण बाहेर आलो. काही मिनिंटांपूर्वी आम्ही जो आभासी रोमांचकारी अनुभव घेतला होता, त्याचा आनंद आमच्या चेहर्यावर ओसंडून वाहत होता.समोर पाहतो तर चिंटु. तिथेच बसला होता शो संपेपर्यंत. चेहर्यावर असे भाव की जसा काही तापलेला लोखंडाचा तुकडा घणाचे घाव सोसतोय.
कट्टा सगळा आप्तजनांचा
ह्सते चेहरे सर्वत्र
बसलोय हा असा मनी घेउन घाव तप्त तप्त
मी आणि सम्याने मुकाटयाने चिंटुचे दोन बाजूंनी दंड पकडले आणि त्याला घेऊन पोटपुजेची सोय करण्यासाठी चालू लागलो.
प्रतिक्रिया
5 Aug 2011 - 2:16 am | पंगा
(विडंबन, की कल्पनाविस्तार?)
(जे काही आहे, ते बरे आहे.)
5 Aug 2011 - 4:33 am | धन्या
तुम्ही मुळचे पुणेकर काय? दोन एकाक्षरी आणि चार दोनाक्षरी अशा अतिशय छोटया सहा शब्दांमध्ये तुच्छता अगदी ठासून भरली आहे.
आम्हाला नाही बुवा छान छान लिहिता येत. पुढच्या वेळी अधिक चांगले लिहिण्याचा प्रयत्न करु :)
5 Aug 2011 - 4:58 am | पंगा
इस में कोई शक?
(तूर्तास एवढेच.)
5 Aug 2011 - 8:03 am | ५० फक्त
या पुढच्या कट्ट्याला सदेह येउन सिद्ध करा बरं हे पंडितजी.
6 Aug 2011 - 10:57 am | धन्या
५० फक्त, सारे पंडीत पुण्याचेच असतात असा समज दिसतोय तुमचा :)
(पंडीत)
धनाजीपंत वाकडे
5 Aug 2011 - 2:54 am | इंटरनेटस्नेही
ह्म्म्म.. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे..
-
(एक्स चिंटू) इंट्या.
5 Aug 2011 - 4:35 am | धन्या
चला... एका तरी चिंटुला ही त्याचीच गोष्ट वाटली. :)
5 Aug 2011 - 8:08 am | ५० फक्त
ओ धनाजी राव, तो फक्त बडवायजर बद्दल बोल्तोय, बडवायजर असलेल्या सगळ्या गोष्टी त्याला त्याच्याच वाटतात.
5 Aug 2011 - 9:43 am | धन्या
हाहाहा... अशी भानगड आहे होय...
5 Aug 2011 - 11:35 am | स्पा
का बडवायझर च नाव काढून जळवता?
परवडत नाय हो हल्ली खिशाला :(
त्यापेक्षा खोपडी बरी :P
5 Aug 2011 - 1:30 pm | धन्या
काही जळवत वगैरे नाही रे...
तुला स्प्राईट किंवा मिरींडा पिणार्यांची कंपनी चालत असेल तर भेटूयात एकदा.
फीर मैं, मेरा यार और बडवायजर !!!
6 Aug 2011 - 1:25 am | इंटरनेटस्नेही
योग्य निरीक्षण नोंदवले आपण ५० फक्त!
-
(बडवायझर फेम), इंट्या.
6 Aug 2011 - 9:58 am | प्यारे१
इन्ट्याच्या संदर्भात बडवायझर 'वेगळ्या' पद्धतीने लिहितात का?
धनाजीराव वाकडे यांनी अतिशय छान पद्धतीने चिंटुच्या मनस्थितीचे वर्णन केले आहे.
5 Aug 2011 - 11:31 am | चिंटु
म्हणतोस स्वतःला.
चिंटु काय तु समजलास स्वतःला.
चिंटु नसेल आत्मज्ञानी पण
आपण्च नसु एकच एक आहे त्याच्या ध्यानी.
6 Aug 2011 - 1:32 am | इंटरनेटस्नेही
ती फक्त एक मस्करी होती, कृपया मनावर घेऊ नका!
-
इंटु.
5 Aug 2011 - 6:42 am | मर्द मराठा
'पंगा' ला पडलेला प्रश्न मलाही पडला आहे.. हे नक्की काय आहे.. आताच मी चिंटूच्या कवितेवर व्याकरणाची सुधारणा सुचवली.. आणि नंतर हे प्रवासवर्णन/ विंडबनवजा प्रेमकथा (??) वाचली.
तुम्ही बडवायजर पुरतेच मित्र की त्याला काही मदत वगैरे करायचा विचार करताय..
5 Aug 2011 - 10:07 am | धन्या
चिंटुरावांचे एकांत हे विरहकाव्य वाचून अंमळ हळवा झालो. डोळे ओलावले. आणि ही विंडबनवजा प्रेमकथा लेखनीतून पाझरली.
5 Aug 2011 - 11:30 am | चिंटु
काय मी सांगु....
लिहितं कोण चूक
कुणाला ठावे
मनीचे भाव विसरण्या
बस एक प्याले पुरावे?
असो.
ते प्रेमभंग वगैरे प्रत्यक्षात काही झालेलं नाही.
होण्या प्रेमभंग मुळात आमचे तसे जमलेच नाही.
असो. पण मूळ मनस्थिती अगदि म्हणजे अगदि अचूक पकडलित. अगदि मनातलं लिहिलत.
मी काही "घेत" नाही. पण दोस्तजाते.मैफलच "चढवुन" जाते.
पिण्या विसरलो मी
ना प्यायलो कधीही
उतरली जराशी तेव्हा कळाले...
ना प्यायलोच मी कधीही!!!
5 Aug 2011 - 1:42 pm | धन्या
आमचीही स्टोरी खरी नाही. असेच इकडचे तिकडचे तुकडे जुळवून लिहिलेली गोष्ट आहे.
हे वयंच असं असतं की तुमचं आमचं सेम असतं :)
5 Aug 2011 - 6:22 pm | मर्द मराठा
अरे छान जुळलेल्या प्रवासवर्णनाची का वाट लावली मग... ते तरी पुर्ण करा .. की ती ही तुमच्या कल्पनेतली भरारी आहे?
5 Aug 2011 - 7:03 pm | धन्या
कवीला किंवा लेखकाला त्याने हे असंच का किंवा तसंच का लिहिलं असं विचारायचं नसतं. मग भले ते विडंबन का असेना. तो जे काही लिहितो (किंवा पाडतो) ते त्या त्या क्षणांची त्याच्या मनातील उर्मी असते :D
तुम्ही तर चक्क वाट लावली वगैरे शब्द वापरताय... शीव शीव शीव... काय जमाना आला आहे...
जाता जाता, तुमचे आणि चिंटुरावांचे काही लागेबांधे आहेत काय ? ;)
5 Aug 2011 - 8:56 pm | मन१
मर्द मराठ्याला प्रवास वर्णन म्हणुन आवडलेलं दिसतय तुमचं
5 Aug 2011 - 9:03 pm | धन्या
मनोबा, वाक्य पुर्ण करा की. उगाच तसल्या भानगडीत कशाला अडकवताय ;)
5 Aug 2011 - 10:15 pm | मर्द मराठा
शुद्ध मराठीत लिहिलेय ..<<छान जुळलेल्या प्रवासवर्णनाची>> ते दुर्लक्षित करून 'वाकड्यात' कशापायी शिरताय??
उगाचच 'जीएमसी युकॉन', 'वेगवान गाडी चालवणे' वगैरे रसभरीत वर्णनाने सुरूवात करता आणि प्रेमकथेला हात घालता .. नंतर पून्हा 'सोअरींग' चे वर्णन करता... आणि शेवटी लिखाण चक्क अर्धवट सोडून देता... म्हणून याला 'वाट लावली' हा सभ्य शब्द वापरलाय..
जसे कवीला आणि लेखकाला विचारायचे नसते तसे वाचणार्याला आणि अभिप्राय देणार्यालाही 'तुम्ही असे काय लिहिलेय, हेच शब्द का वापरलेत' असे विचारायचे नसते..
<<जाता जाता, तुमचे आणि चिंटुरावांचे काही लागेबांधे आहेत काय ?>> हा पुन्हा 'वाकडेपणा'..
काय हो, तुमचे हे खरे नाव आहे की... त्या 'डॅम इट' वाल्या मराठी शिणेमातल्या खलनायकाच्या नावाची उचलेगिरी केलीय?
6 Aug 2011 - 12:13 am | धन्या
मी सहज लिहिलेला हलका फुलका प्रतिसाद तुम्ही खुपच जड घेतला राव. आणि तेव्हढयावरच न थांबता अगदी सात्विक संतापाने माझ्या प्रतिसादाला उत्तर दिलंत.
बेक्कार हसतोय राव तुमचा प्रतिसाद वाचून. मालक मोठे व्हा...
अहो मी फक्त एव्हढंच म्हटलं की लेखकाला आणि कवीला कधी विचारायचं नसतं की असंच का लिहिलं, तसं का नाही लिहिलं म्हणून. तुम्हाला यात वाकडे काय दिसले? की चान्स पे डान्स करत उगाचच आमच्या नावावर कोटी करताय? :)
तुमच्या प्रतिसादाचा एकंदरीत रागरंग पाहता तुम्ही सभ्य शब्द वापरून माझ्यावर उपकार केलेत असंच मला वाटतंय. धन्यवाद ;)
मालक, वरचे प्रतिसाद पुन्हा वाचा. मी तुमच्या प्रतिसादाला कुठेही प्रतिप्रश्न केलेला नाही. माझी प्रतिक्रियेतील सारी वाक्ये फक्त माझे मत मांडणारी आहेत, प्रश्नार्थक नाहीत :D
छे हो वाकडेपणा कसला त्यात. तुम्ही उगाचच पुन्हा एकदा माझ्या नावावर कोटी करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. लागेबांधे हा शब्द मी डु आयडीच्या संदर्भात वापरला होता. तुम्ही काही वेगळा अर्थ काढला असेल तर पुन्हा एकदा म्हणेन, मोठे व्हा :)
उचलेगिरी शब्द वाचून अंमळ हळवा झालो. डोळे ओलावले... असो. नांव खरे आहे की खोटे याने काय फरक पडतो? शेक्सपियर म्हणून गेला आहे ना की नामध्येयेन किं फलम?
(वाकडयात शिरणारा)
धनाजीराव वाकडे
6 Aug 2011 - 3:22 am | मर्द मराठा
तुमच्या लेखनावरून आणि साद्-प्रतिसादावरून आपण काय वल्ली आहात ते कळले.. शिवाय 'वैयक्तिक माहीती' मधे जायचीही तसदी घेतली आणि आपल्या उचलेगिरीचा अद्वितीय साक्षात्कार झाला.. असो..
6 Aug 2011 - 10:40 am | धन्या
मला नाही वाटत तुम्ही माझं बाकीचं लेखन वाचलेलं आहे. वाचलं असतंत तर हे वाक्य लिहिलंच नसतं तुम्ही :)
खुपच विनोदी स्वभाव बुवा तुमचा. :)
आमची 'वैयक्तिक माहीती' वाचून तुम्हाला आमच्या उचलेगिरीचा काय साक्षात्कार झाला हे जरा आम्हालाही कळू दया राव... उचलेगिरी हे आम्ही पाप मानतो आणि ते पाप आमच्याकडून झाले असेल तर पापाचं प्रायश्चित्त आम्ही नक्कीच घेऊ. :)
5 Aug 2011 - 11:50 am | ५० फक्त
बाळ छोटा चिंटु, अरे जरा पद्यात प्रतिसाद दे की रे, का आपलं टेस्ट मध्ये वाईड नसतं म्हणुन उगा का आउट साईड लेग स्टंप टाकतोय.
5 Aug 2011 - 6:19 pm | मर्द मराठा
आधुनिक 'सैगल' चिंटूच्या रुपात लाभला आहे.. तेव्हा तो पद्यातच उत्तर देतोय..
5 Aug 2011 - 8:48 pm | इरसाल
सायेब तेव्हढ एक सांगा.
चिंटू जेवला का मग ? पुढे काय झाले ?
5 Aug 2011 - 9:00 pm | धन्या
चिंटुने तिकडे मॅकडोनाल्ड मध्ये (यू नो... अॅक्च्युअली वी कॉल ईट अॅज मॅकडी) डॉलर वन मेनू मध्ये मिळणारे चार चिकन बर्गर दाबले...
पुढे काय झाले ? पुढे काय होणार... फीर हमारे टीममें माया आई... और चिंटुकी श्रेयाके स्टॉपपे अटकी हुई गाडी फीर निकल पडी... :D
6 Aug 2011 - 9:47 am | सौन्दर्य
साहेब,
तुमचे 'टेक्सास' शी काही वैर बिर आहे का ?
सौन्दर्य
एक टेक्सास निवासी
6 Aug 2011 - 10:52 am | धन्या
आमच्या कंपनीच्या ज्या युनिटमध्ये आम्ही काम करतो त्या युनिटचा क्लायंट अमेरिकेचा एक "एनर्जी आणि पेट्रोकेमिकल्स" जायंट आहेत. त्यांच्या आय टी विभागाची कार्यालये सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया आणि ह्युस्टन, टेक्सास अशी दोन ठीकाणी आहेत. त्यामुळे कुणी ऑनसाईटला जाणार हे कळलं की पहिला प्रश्न "कुठे? कॅलिफोर्निया की टेक्सास? " हा असा असायचा...
थोडक्यात कॅलिफोर्निया आणि टेक्सास अशी सरळ सरळ तुलना व्हायची. अर्थातच कॅलिफोर्निया सरस ठरायची. का ते आपल्यासारख्या सुज्ञांस सांगण्याची गरज नसावी. :)
आमच्याकडे टेक्सासला ऑनसाईटला जाणे हे "सजा ए काला पानी" वर जाण्यासारखं आहे. एका डेव्हलपरवर कुणा पीएमला खुन्नस काढायची असेल तर त्याला कॅलिफोर्नियाला न पाठवता टेक्सासला पाठवले जाते...
मला वाटतं मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. :)
6 Aug 2011 - 11:52 am | परिकथेतील राजकुमार
लेखन वाचायला मजा आलीच पण खरे सांगायचे तर प्रतिसाद आणि उपप्रतिसाद वाचायला जास्त मजा आली.
अवांतर :- लेखनापेक्षा प्रतिसादांमध्ये धनाजीरावांची प्रतिभा अंमळ जास्तच खुलते असे निरिक्षण जाता जाता विनम्रपणे नोंदवतो.