ध्यास विठ्ठलाचा -

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
11 Jul 2011 - 7:59 am

ध्यास मनी घेता दिसली पंढरीची वाट
विठ्ठलाचे नाम घेता सरला पहा घाट |

तुळशीमाळ हाती घेऊ मुखी ठेऊ नाम
जीवनात राहू देऊ सदोदित राम |

संसारात नित्य कष्ट आपुल्या जिवाला
नाम घेणे ठरते इष्ट घोर ना जिवाला |

करू यातना अर्पण चंद्रभागेपोटी
नाम नेईल तारून सुखाच्याच भेटी |

दु:ख हानी दूर पळते येऊनिया वीट
शांती समाधान मिळते मंदिरी अवीट |

डोळ्यामध्ये घेऊ आता रूप साठवून
विठ्ठलाला शरण माथा चरणी टेकवून |

जीवनाला अर्थ गाता ग्यानबाची ओवी
राम राम घेऊ जाता तुकोबाच्या गावी |

शांतरसकविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

11 Jul 2011 - 11:49 am | मिसळलेला काव्यप्रेमी

आवडली!!

धन्या's picture

11 Jul 2011 - 11:21 pm | धन्या

भक्ताची आर्तता छान व्यक्त झाली आहे...

पण चार बोल प्रत्यक्ष अनुभवाचे...
आताच काही तासांपूर्वी पंढरपुराहून आलो. फक्त दोनच दिवस होतो पंढरपुरात. पण कधी एकदा ईथून बाहेर पडतोय असं झालं होतं... सर्वत्र कमालीची अस्वछता, दुर्गंधीचं साम्राज्य. ज्या चंद्रभागेत स्नान करुन पापे धुवून टाकायची त्याच चंद्रभागेच्या वाळवंटाची अवस्था एखाद्या गावाच्या हागणदारीपेक्षाही वाईट झाली आहे...

एक कळत नाही, जे वारकरी पंधरा वीस दिवस वारीसोबत मैलोनमैल पायी चालत येतात त्यांना चार दिवस प्रातर्विधीसाठी एखादा मैल दूर जाता येत नाही? ज्या चंद्रभागेत पापे धुण्यासाठी डुबक्या मारायच्या, जिच्या काठावर मारे "तल्लीन" होऊन किर्तने करायची त्याच चंद्रभागेच्या वाळवंटात... शी....

हीच अवस्था प्रदक्षिणा मार्गाची.
जेमतेम पाच सहा मिनिटांचा हा मंदीर प्रदक्षिणा मार्ग. पण या पाच सहा मिनिटांच्या प्रदक्षिणेत आपल्या पायाखाली तुटक्या चपला, कंगवे, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या किंवा नाडया असलेल्या चडड्या यातलं काहीही येऊ शकतं.

कुणी यासाठी पंढरपूर नगर परिषद प्रशासनाला जबाबदार धरेल. ते काय करतात किंवा करत नाहीत यापेक्षा आता वारकर्‍यांनी स्वतःमध्ये डोकावून पाहायची गरज आहे. जेमतेम सव्वा लाखाची लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये अचानक सहा सात लाख लोक जमा झाल्यावर सोयीसुविधांवर ताण पडणारच. पण स्वयंशिस्त म्हणून काही असतं की नाही...

कदाचित हा प्रश्न प्रबोधनाने सुटू शकेल. किर्तनकारांनी, प्रवचनकारांनी "चौर्‍याएंशीच्या फेर्‍यातून सुटका" कशी करून घ्यायची याबरोबरच जर चार गोष्टी स्वच्छतेबद्दल सांगितल्या तर फरक पडू शकेल. असं जर झालं तर पंढरपूर खर्‍या अर्थाने भुवैकुंठ होईल...

फक्त गरज आहे ती गाडगेबाबांसारख्या किर्तनकाराची. आजचे फ्लेक्सवर झळकणारे, हरीनाम सप्ताहाच्या निमंत्रण पत्रिकेत ठळक अक्षरात नाव छापले जाणारे ह. भ. प. याबाबतीत तरी काही कामाचे नाहीत.

- धनाजीराव वाकडे

विदेश's picture

13 Jul 2011 - 8:32 am | विदेश

धनाजीराव !
त्यासाठी मंत्रीमंडळातली सर्व मंडळी आपल्या लव्याजम्यासह ५/१० किमी अंतरावरून पायी चालत आली आणि आपल्या 'पवित्र' चंद्रभागेत सचैल स्नान करून गेली तरी खूप फरक पडेल; पंढरीच्या सहनशील नागरिक आणि वारीच्या वारक-यांच्या जीवनात ! अन्यथा एसीत बसून येऊन आणि पायाला धूळ न लागू देता दर्शन घेत, विठूरायाला साकडे घालण्यात आणि चंद्रभागेचे गुणगान गाणा-या पुढा-यांकडून सुधारणा-अपेक्षा बाळगणे म्हणजे पालथ्या घड्यावर....!