बुल्ला की जाणा मै कौण....

कवितानागेश's picture
कवितानागेश in जे न देखे रवी...
1 Jul 2011 - 12:57 pm

एक भावानुवाद:
बुल्लेह शा चे हे एक काव्य. राबी शेरगिलनी गायले आहे.
अशा प्रकारच्या रचनांचे शब्दश: भाषांतर विचित्र वाटते, म्हणून थोडासा मुक्त भावानुवाद करण्याची सूट मी आपली आपणच घेऊन टाकली!

ना आस्तिक वा पांथिक, ना पवित्र वा पतित मी,
ना कुणी संत, ना कुणी राजा, आहे मी,
बुल्ला, काय माहीत, कोण मी?
ग्रंथात अन भांगेतही सापडत नाही मी,
दारूच्या धुन्दीतही जाणवत नाही मी,
बुल्ला, काय माहीत, कोण मी?
ना सुखदु:खाच्या सोहळ्यात, ना पूजेत रमतो मी,
हवा, पाणी, आग अन जमीन, यातही नाही मी,
बुल्ला, काय माहीत, कोण मी?
ना देशाविदेशात, ना भाषा प्रांतात वसतो मी
या इथल्या ठिकाणीही रहात नाही मी,
बुल्ला, काय माहीत, कोण मी?
धर्माचे गूढ अन माणसाचे मूळ, जाणत नाही मी,
चालतोफिरतो, उठतोबसतो, तोही नाही मी,
बुल्ला, काय माहीत, कोण मी?
सुरुवातीपासून शेवटपर्यंत, आहे फक्त मी,
माझ्या जाणीवेतून, आहे 'ज्ञानी' फक्त मी,
बुल्ला, समोर ठाकलो आहे का मी?

शांतरसकविता

प्रतिक्रिया

सूर्यपुत्र's picture

1 Jul 2011 - 1:34 pm | सूर्यपुत्र

मुक्त भावानुवाद मस्त 'सूट'लाय. :)

-सूर्यपुत्र.

सामान्य वाचक's picture

1 Jul 2011 - 1:35 pm | सामान्य वाचक

अर्थ आणि अनुवाद, दोन्हीही.

स्वानन्द's picture

1 Jul 2011 - 1:39 pm | स्वानन्द

मस्तच!!

स्पा's picture

1 Jul 2011 - 1:39 pm | स्पा

अतिशय अतिशय अतिशय अतिशय धन्यवाद :)

इरसाल's picture

1 Jul 2011 - 3:03 pm | इरसाल

रसग्रहण आणि भावानुवाद अतिशय उत्तम केलाय.माझी अतिशय आवडती रचना आहे.

@ स्पा : आश्चर्य आहे तुम्ही पलटी मारण्यात पटाइत दिसता

@ स्पा : आश्चर्य आहे तुम्ही पलटी मारण्यात पटाइत दिसता
तुम्ही ज्या अर्थाने ते लिहील होतंत.... आणि ज्या प्रकारे.. तुम्ही त्याच स्पष्टीकरण देण टाळल होतंत, ते जगजाहीर आहेच. असो इथे उगी वाद नको.. आपण खरडीतून बोलू शकता :)

लिमाऊ ला धन्यवाद खरा अर्थ नीट उलगडून दाखवल्याबद्दल आहे... पलटी काय त्यात , असो....

विश्वनाथ मेहेंदळे's picture

4 Jul 2011 - 2:36 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>@ स्पा : आश्चर्य आहे तुम्ही पलटी मारण्यात पटाइत दिसता
स्पा आणि पलटी ?? मुंग्यांनी मेरुपर्वत तर गिळला नाही ना? वडवानलाने समुद्राला आटवून तर टाकले नाही ना? अरे मग शब्दाचा आणि मुद्द्याचा पक्का असलेला आमचा स्पा, पलटी का मारू लागला ? प्रत्यक्ष सत्ययुगातील स्पा वर कलियुगाचा प्रभाव कसा पडला? हे ऐकण्याऐवजी आमच्या कानात कुणी शिशाचा तप्त रस ओतला असता तरी चालले असते.

(हतबुद्ध) वि.मे.

पिंगू's picture

1 Jul 2011 - 1:59 pm | पिंगू

मस्त जमून आलाय अनुवाद..

- पिंगू

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Jul 2011 - 2:02 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्त!

मुलूखावेगळी's picture

1 Jul 2011 - 2:10 pm | मुलूखावेगळी

धन्स ग तुझ्यामुळे अर्थ कळाला .

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

1 Jul 2011 - 2:18 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मस्त झालय गं!!

आत्मशून्य's picture

2 Jul 2011 - 12:17 pm | आत्मशून्य

.तसही अध्यात्मात पोचलेल्यांकडून हे नेहमी म्हटलं जातचं की जगातील सर्व संतांची शिकवण एकच आहे फरक आढळतो तो फक्त विवेचनात आणि त्यांच्या अनूयायांच्या विशीष्ठच अर्थ काढण्याच्या आसक्तीमधे.... आपलं तत्वज्ञानही नाहीका आग मला जाळत नाही म्रूत्यू मला मारत नाही.. सर्व काही मीच आहे रे वगैरे म्हणत असतं .... त्याच्याशी इथं किती साम्य जाणवतय... खूप सूंदर भावानुवाद .

सूड's picture

1 Jul 2011 - 2:36 pm | सूड

छानच !! असं काही वाचनात आलं की आठवतं ते गोनीदांचं 'मृण्मयी' .

बुल्लेह शा चं आत्मषटक म्हणा की हे.... ;)

चिदानंदरुपः शिवोSहं शिवोSहं

michmadhura's picture

1 Jul 2011 - 2:47 pm | michmadhura

हे गाणं ऐकलं कि सारखं ओठावर येत राहतं, आज अर्थही कळला.
छानच !

धमाल मुलगा's picture

1 Jul 2011 - 3:10 pm | धमाल मुलगा

राब्बीचं हे गाणं जेव्हाजेव्हा ऐकतो तेव्हा लै भारी काहीतरी वाटतं राव.
बुल्लाह शाह म्हणजे गडी तिकडचा निर्गुणी भजनंवाला आहे की काय असंही एकदा वाटलं होतं :)

छान भावानुवाद!

अत्रुप्त आत्मा's picture

1 Jul 2011 - 3:17 pm | अत्रुप्त आत्मा

ध.मु.+१०१सहमत...

अनेक महाकवींना पडलेला सनातन प्रश्न...आणी त्याची अतिशय छान भावानुवादात्मक मांडणी...वाहव्वा...मन सुखावलं...धन्यवाद

नितिन थत्ते's picture

1 Jul 2011 - 3:29 pm | नितिन थत्ते

शीर्षक वाचून पडलो होतो पण मस्त भावानुवाद आहे.

मूकवाचक's picture

1 Jul 2011 - 4:34 pm | मूकवाचक

+१

मितभाषी's picture

2 Jul 2011 - 11:43 am | मितभाषी

हेच बोल्तो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Jul 2011 - 7:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त भावानूवाद.

-दिलीप बिरुटे

कवितानागेश's picture

1 Jul 2011 - 4:48 pm | कवितानागेश

याच्या शेवटच्या कडव्यावर विचार करताना सतत 'जाणे अज मी अजर, अक्षय मी अक्षर' या ओव्या आठवत होत्या.

प्राजु's picture

1 Jul 2011 - 5:40 pm | प्राजु

सुरेख !! भावनुवाद आवडला.

कवटी's picture

1 Jul 2011 - 5:45 pm | कवटी

आयच्या गावात...
टायटल वाचून पडलोच... वाटल कुठल्या 'शख्साने' लिहिलाय?

पणं भावानुवाद खुपच छान झालाय...

रामदास's picture

2 Jul 2011 - 10:50 am | रामदास

आणखी नियमितसे काही येऊ द्या.

किसन शिंदे's picture

2 Jul 2011 - 11:46 am | किसन शिंदे

मस्तच आहे भावानुवाद. :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Jul 2011 - 11:57 am | ज्ञानोबाचे पैजार

श्रोत्रस्य श्रोत्र मनसो मनो यद वाचो ह वाचं स उ प्राणस्य प्राणः|
चक्षुषद्यक्षुरतिमुच्य धीरा: प्रेत्यास्माल्लोकादमॄता भवन्ति||

परिकथेतील राजकुमार's picture

2 Jul 2011 - 12:03 pm | परिकथेतील राजकुमार

छानच लिहिले आहेस :) आणि मुख्य म्हणजे अर्थपूर्ण भावानुवाद आहे.

काही महाभागांनी ह्या गाण्याचा लावलेला अर्थ पाहून परवा खदखदून हसलो होतो.

अमोल केळकर's picture

2 Jul 2011 - 12:11 pm | अमोल केळकर

सुंदर अनुवाद :)

अमोल केळकर

प्राजक्ता पवार's picture

2 Jul 2011 - 2:19 pm | प्राजक्ता पवार

मस्तं !

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Jul 2011 - 2:49 pm | llपुण्याचे पेशवेll

हम्म. पूर्वी हे गाणं ऐकून फार हसू येत असे. :)
बाकी या बुल्लेह शाह यांची मुलतानी काफी रचना सलामत, नझाकत अली बंधू छान गात असत. असो. छान वाटायचं ऐकून.

छान भावानुवाद. अजुन काही लिहा ना.

सुरुवातीपासून शेवटपर्यंत, आहे फक्त मी,
माझ्या जाणीवेतून, आहे 'ज्ञानी' फक्त मी,


....'कोहं कोहं' या प्रश्नाला मिळालेले 'सोहम सोहम' हे उत्तर...

बुल्लेह शाहचा उल्लेख बॉबी चित्रपटातील एका गाण्याच्या सुरवातीच्या ओळीत ऐकला होता.

'बेशक मंदिर मस्जिद तोडो
बुल्लेह शाह ये कहता
पर प्यार भरा दिल कभी ना तोडो
जिस दिल में दिलबर रहता
जिस पलडे में तुले मुहब्बत
उसमें चांदी नही तोलणा
तौबा मेरी ना ढोलणा मै नही बोलणा...

पल्लवी's picture

4 Jul 2011 - 9:06 pm | पल्लवी

मला फार म्हणजे फार म्हणजे फार आवड्णारं गाणं आहे हे !
अनुवाद वाचुन बरं वाटलं फार..

( रब्बीचं 'तेरे बिन' हे गाणं पण निव्वळ सुंदर ! )

लॉरी टांगटूंगकर's picture

5 Jul 2011 - 12:31 am | लॉरी टांगटूंगकर
अर्धवटराव's picture

5 Jul 2011 - 12:58 am | अर्धवटराव

तु भावानुवाद द्यायचं म्हणतेस, पण हे शब्दशः भाषांतर वाटतय. या गाण्याचा भाव केवळ एक एक कडव्यात नाहि तर ज्या सिक्वेन्स्नी ते कडवे आलेत त्यात(ही) आहे.

( असली काहि प्रतिक्रिया दिली म्हणजे स्वतःचच स्वतःला कसलं भारि वगैरे वाटतं म्हणुन सांगु... ;) )

अर्धवटराव

कवितानागेश's picture

8 Jul 2011 - 10:49 pm | कवितानागेश

एकदम आभारी!
:)