निसर्गरम्य ताम्हीणी
रविवारी ताम्हीणीला जायचे नक्की झाले आणि पावसाळ्यातल्या पहिल्या वहिल्या भटकंती साठी आम्ही सकाळी ७.०० ला पुणं सोडलं. आयत्या वेळेस कोणीतरी गळणं !!! या नेहमीच्या रुढीला छेद न देता सतिश, प्रिया आणि प्रशांतने टांग मारली होती. ते लोक कशी न पटणारी कारणं देत होते या एका विषयावर बोलताना आम्ही प्राजक्ताने आणलेल्या संतोष बेकरीच्या पॅटीसचा फडशा पाडला. जाताना ठरल्या ठिकाणी चहा झाला. वाटेत पु.ल.कथाकथन, संदीप खरे या फर्माईशी पु-या करण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. आमच्या कंपू मधे नव्याने आलेली आणि इतक्या वेळ गप्प असलेली सोनाली, संदीपची गाणी गुणगुणत होती. जाताना चार दोन ठिकाणी थांबून करवंदे तोडणे, मुळशी धरण न्याहाळणे, (लघू) शंकाचे निरसन इ. इ, कार्यक्रम उरकून गाडी अखेरीस ताम्हीणीला पार्क झाली. ताम्हीणी गाव मुळशी धरणाच्या फुगवट्याच्या अगदी शेवटच्या टोकाला आहे.
अत्यंत निसर्गरम्य असलेल्या या गावाच्या तीन बाजूंस डोंगररांगा आणि एका बाजूस धरणाचं पाणी आहे. गावात विंझाई देवीचे मोठे मंदीर आहे. मंदीराबाहेरील काही वीरगळ आणि सती-शिळा पाहून त्या श्रीशिवाजी महाराजांच्या थोड्या आधीच्या काळातल्या वाटतात. देवीचे दर्शन घेऊन आम्ही मोर्चा देवराईकडे वळवला.
वीज पडून जळालेला बांबू
पायवाटेवर मधेच एका वाळलेल्या बांबूच्या बेटावर वीज पडून गेल्यावर उध्वस्त झालेले अवशेष दिसले. पाजाताना वाटेत लागणारे ३-४ ओढे पार करून आम्ही दाट वनराईत दडलेल्या एका छोटेखानी खोपटवजा देवळात आलो.
डाव्या बाजूला झाडांत लपलेले कौलारू देऊळ दिसत आहे.
त्या देवळाचे छप्पर इतके बुटके आहे की तुम्हाला अक्षरशा: रांगत आत शिरावे लागते.
आत सुस्पष्ट अशी एकही मुर्ती नाही, पण तिथेच पडलेल्या खणा नारळाच्या खुणा, ते मंदीर देवीचेच आहे हे सांगत होत्या. दर्शन घेऊन बाहेर पडलो. थोडं पुढे जाताच एक मोठा ओढा आडवा आला.
मग कोणाला काही सांगावे लागले नाही. सगळी जनता त्या वाहत्या पाण्यात स्वता: सोबत इतरांनाही धुवून काढायला लागली. एक कुत्रा गावापासून आमची सोबत करून होता. तो देखिल एक ब-यापैकी उथळ जागा पाहून त्यात लोळू लागला. श्रीकांत शितल या दांपत्याने बाकी जनतेवर पाण्याने हल्ला चढविला होता. ७वीत असलेल्या हर्षदाने तर नाकात पाणी गेल्यावर भोकाडच पसरलं. सगळ्यांना सांभाळता सांभाळता माझ्या नाकी नऊ आले होते. तीन-चार तास यथेच्छ पाण्यात उच्छाद मांडून झाल्यानंतर जनतेला आपल्याला पोट नावाचा अवयव असल्याची जाणीव झाली आणि आमची पावलं गावाकडे वळाली. तिथे थोडी खादडी करून गाड्या पुण्याकडे हाकल्या. मॉन्सूनची सुरुवात धम्माल झाली आहे. भेटू लवकरचं !!
-- जातीवंत भटका
अशीच काही छायाचित्रे ....
-- जातीवंत भटका
प्रतिक्रिया
20 Jun 2011 - 5:14 pm | पियुशा
सहि आहेत फोटो :)
20 Jun 2011 - 6:33 pm | प्रास
तुमची ही पावसाळ्याच्या सुरूवातीची भ्रमंती आवडली आपल्याला! फोटोही नेहमीप्रमाणे छानच!
मात्र तो जळालेल्या बांबूचा फोटो काही नीट सुधरला नाही बघा.....
2 Jul 2011 - 11:14 am | sukhada singh
विजाइ आमचि कुलदेवि ,खुप वेळा तिथे गेलो,पण इतके सहि फोटो नाहि मिळाले.