आई गं! काय ती जळजळ!

खादाड अमिता's picture
खादाड अमिता in जनातलं, मनातलं
6 Jun 2011 - 9:52 am

जळ-जळणे, आम्लपित्त, घश्याशी येणे, अ‍ॅसीडीटी मुळे पोटात/छातीत दुखणे- काही वर्षांपूर्वी ही लक्षणं फक्त पन्नाशीच्या पुढच्या व्यक्तींमध्ये आढळून येत होती. पण गेल्या काही वर्षात दिवसंदिवस तरुण वयोगटात पण अ‍ॅसीडीटी चा विकार वाढत चाललाय. असं अचानक कसं झालं? हे अचानक झालेलं नसून बऱ्याच वर्षांपासूनच्या खाण्या पिण्याच्या सवयी पूर्णपणे बदलून टाकल्यामुळे झालंय. शाळेत असे पर्यंत रोज दिवस भरात ६ वेळा खाणारी मुलं, कॉलेजला गेल्यावर फक्त चहा/कॉफी, पफ/पॅटीस व इतर जंक फूड आणि वरचेवर बाहेरचं अन्न खायला लागली. स्लिम फिगर च्या नादात तरुण मुलींनी 'ताटभर जेवण म्हणजे विष' असल्यासारखे त्याचा बहिष्कार केला. रात्री अपरात्री जागरण करून अभ्यास करणे आणि दिवसभरात व्यवस्थित न जेवता रात्री उशिरा इन्स्टन्ट नूडल्स खाऊन आणि भरपूर चहा/कॉफी पिऊन जागत राहणे आणि हे कमी असल्या सारखे - दारू/सिगरेट/ तंबाखू/गुटखा ह्याचे सेवन करणे- ह्या सगळ्यामुळे वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत व्यवस्थित चालत असलेले पचनक्रियेचे समीकरण कोलमडले. म्हणून ज्याला विचारावं त्याला अ‍ॅसीडीटी चा त्रास व्हायला लागला.

नियमित आहार असताना जे पाचक रस रोज ठराविक प्रमाणात, ठराविक वेळी पोटात/आतड्यात सोडले जात होते- ते अनियमित जीवनशैली मुळे, जास्त प्रमाणात शरीरात तयार होऊन पोटात साठायला लागतात. हे पाचक रस आम्ल असून, त्यांचं प्रमाण खूप वाढलं की जळजळ, घश्याशी येणे, अ‍ॅसीडीटी चा त्रास होतो. दीर्घकाळ असाच अनुभव राहिला की मग अ‍ॅसीडीटी आणि अ‍ॅन्टॅसीड च्या जाळ्यात व्यक्ती अडकतात. अ‍ॅन्टॅसीड घेऊन शरीराची जास्त प्रमाणात आम्ल रस तयार करण्याची प्रक्रिया थांबत नसून - फक्त जळ जळीचा अनुभव कमी होतो. महिनोंमहिने अश्यारितीने अ‍ॅसीडीटी कडे दुर्लक्ष केले की मग त्याचे स्वरूप बदलून- पोटात खूप दुखणे, छातीत जळजळ व पेप्टिक अल्सर सारखे गंभीर विकार होतात.

जळजळ झाली की 'मला काहीही खायला नको' असे म्हणून रिकाम्या पोटी राहायल की जळजळ अधिक वाढते. पोटात जाणारं अन्न जर फायबर-रीच असेल तर ते पोटातल्या अतिरिक्त पाचक रसांना शोषून घेऊन शरीराबाहेर काढून टाकतं. ह्या शिवाय त्या अन्नाच्या पचनासाठी पण पाचक रस वापरले जातात. ह्या विपरीत, जर काहीच खाल्लं नाही तर ते आम्ल रस आतड्याच्या पेशींना नुकसान करतात. अ‍ॅसीडीटी वर सगळ्यात चांगला उपाय म्हणजे कमीतकमी ६ वेळा, नियमित वेळी, घरचं सात्विक अन्न खाणे. मसालेदार, तिखट आणि आंबट पदार्थ न खाणे; शिवाय रात्री झोपताना आणि दिवसा दोनदा अर्धा कप गार दूध प्यायल्याने पण आराम मिळतो (स्त्रोत: सिप्पीज डाएट, १९८३). तर तुम्हाला जर खरंच अ‍ॅसीडीटी पासून सुटका हवी असेल तर निम्न कारणं शक्यतो टाळावीत:

- वेळी अवेळी खाणे, जेवल्यावर लगेच झोपणे
- ४ तासांहून अधिक वेळ (दिवसा) पोट रिकामे राहणे.
- अनियमित झोप किंवा सारख्या बदलत्या शिफ्ट मधे काम करणे
- तीन हून अधिक कप चहा/कॉफी पिणे
- आठवड्यातून एकाहून अधिक वेळा बाहेरचे मसालेदार, तिखट, तेलकट, अजिनो मोटो घातलेले (देसी चायनीज) पदार्थ खाणे खास करून रात्रीच्या जेवणाला
- खूप तिखट पदार्थ खाणे
- सिगरेट/ तंबाखू/ गुटखा/ दारू चे सेवन करणे
- वारंवार सोडा/ सोफ्ट ड्रिंक पिणे
- कामाचे किंवा इतर मानसिक ताण असणे
- सारखे उपास करणे
- क्रॅश डाएट करणे
- आहारात खूप कमी प्रमाणात फायबर/चोथा असणे

काही इन्फेक्शन किंवा औषधांच्या साईड इफेक्ट मुळे पण अ‍ॅसीडीटी होऊ शकते. तरी, तात्पर्य हे की अ‍ॅसीडीटी वर कायम स्वरूपी उपाय म्हणजे नियमित आहार, व्यायाम आणि आरोग्यपूर्ण जीवनशैली - हाच असू शकतो.

औषधोपचारजीवनमानमाहिती

प्रतिक्रिया

गवि's picture

6 Jun 2011 - 10:16 am | गवि

छान आवडले.

कळते पण वळत नाही.. :)

५० फक्त's picture

7 Jun 2011 - 6:46 am | ५० फक्त

एक विनोद आठवला, आमच्या गाववाल्याचा आहे.

आकाशवाणीला आप कि फर्माईश कार्यक्रमात एक फोन येतो.

फोन करणारा - ' ओ ते अ‍ॅसिडिटीचं गाणं लावा ओ जरा''

निवेदक - '' अ‍ॅसिडिटीचं, म्हणजे कुठलं ओ, असलं गाणं नाही जाहिरात असेल एखादी''

फोन करणारा - नाही ओ गाणंच आहे अ‍ॅसिडिटीचं, सुरेश वाडकरचं आहे की ओ'

निवेदक - ' नाही ओ सुरेशजी नाहीत असली जाहिरातीची गाणी म्हणत '

फोन करणारा - ' ओ,जाहीरातीचं नाही ओ, गाणंच आहे ते, हं........... हां तिच्यायला आठवलं बघा

सिनेमें जलन आंखोमे. तुफान सा क्यों है..... सिनेमें जलन म्हणजे अ‍ॅसिडिटीच ना ओ.

अॅसिडिटीच्या या 50 फ़क्तच्या गाण्यावरुन एक पाईल्सचे गाणे डोक्यात आले.

चैन एक पल नही,और कोई हल नही.

(सैय्योनी मरहम वापरा..)

छानच लेख.. आवडेश

६ वेळा कसं काय आणि काय काय खाणार बुवा पण?
ते बी सांगा कि :)

गोगोल's picture

7 Jun 2011 - 9:47 am | गोगोल

मनापासून आवडला.
काही लोकांना लहानपणी सहा सहा वेळा खायला मिळायचं ऐकून मत्सर वाटून राह्यला.
असो .. आता मोठेपणीतरी सुधारायचे म्हणतोय पण गवि म्हणतात तसे "कळत पण वळत नाही". विविध टेन्शन्स आणि वेळेच्या मिस मॅनेजमेंट मध्ये सर्व प्रथम दुर्लक्ष केली जाणारी बाब म्हणजे जेवणच.
दात आहेत पण चणे नाहीत .. चणे आहेत पण ...

गोगोल's picture

7 Jun 2011 - 9:50 am | गोगोल

मनापासून आवडला.
काही लोकांना लहानपणी सहा सहा वेळा खायला मिळायचं ऐकून मत्सर वाटून राह्यला.
असो .. आता मोठेपणीतरी सुधारायचे म्हणतोय पण गवि म्हणतात तसे "कळत पण वळत नाही". विविध टेन्शन्स आणि वेळेच्या मिस मॅनेजमेंट मध्ये सर्व प्रथम दुर्लक्ष केली जाणारी बाब म्हणजे जेवणच.
दात आहेत पण चणे नाहीत .. चणे आहेत पण ...

आंबोळी's picture

8 Jun 2011 - 9:49 pm | आंबोळी

काही लोकांना लहानपणी सहा सहा वेळा खायला मिळायचं ऐकून मत्सर वाटून राह्यला
;)

अवांतरःतुमच्या प्रतिक्रीया वाचुन नेहमी मला सर्केश्वर किंवा भडकमकरांची आठवण येते..

स्मिता.'s picture

8 Jun 2011 - 8:20 pm | स्मिता.

अमिता, छान लेख आहे. हे सगळं माहिती असतं पण आचरणात मात्र आणलं जात नाही.
तरी आज-काल तुझे लेख वाचून योग्य आहार घेण्याचा प्रयत्न करते. पण सवयी जातील तर त्यांना सवयी कसं म्हणणार?