नेमेंचि त्यानंतर पावसाळा

धनंजय's picture
धनंजय in जे न देखे रवी...
11 May 2011 - 11:00 pm

नेमेंचि त्यानंतर पावसाळा
- - -
नेमेंचि त्यानंतर पावसाळा
येईल, त्यालाहि बघावयाला
असणार नाही परि मी जगाचा.

वर्षानुवर्षीं वणवा उन्हाचा
धग्-धग् धगीचा जळतां उन्हाळा,
आकांत तान्हेल चराचराचा.

विश्वास विश्वास जगावयाचा
(नाही जरी मीहि भिजावयाला)
देईल नेमें मग पावसाळा
- - -

करुणशांतरसकविता

प्रतिक्रिया

राजेश घासकडवी's picture

12 May 2011 - 5:14 am | राजेश घासकडवी

जन पळभर म्हणतील हाय हाय (मायनस सारांशात्मक संदेश) किंवा ये जिंदगी के मेले दुनिया में कम न होंगे, अफसोस हम न होंगे (मायनस बटबटीतपणा) ची आठवण करून देणारी कविता. विश्वास विश्वास ही द्विरुक्ती आवडली.

कवितेत मधल्या ओळीने आरशासारखं काम केल्यासारखं वाटतं. पहिली व शेवटची ओळ व एकंदरीतच पहिलं व शेवटचं कडवं एकमेकांची प्रतिबिंब वाटतात. हे योजित आहे की नाही माहीत नाही.

llपुण्याचे पेशवेll's picture

12 May 2011 - 11:24 am | llपुण्याचे पेशवेll

छान कविता आवडली.

दत्ता काळे's picture

12 May 2011 - 12:48 pm | दत्ता काळे

कविता आवडली.
'आकांत तान्हेल....' हि शब्दरचना आवडली. त्याचबरोबर ' धग्-धग्' ह्या शब्दांमुळे उष्णतेची तीव्रता नेमकेपणानी मांडली गेली आहे. शेवटच्या कडव्यातल्या ' विश्वास' ह्या एका शब्दाच्या दुरुक्तीमधून दोन वेगळे अर्थ निघत असल्याने कडवे अधिक रंजक झाले आहे.

विसुनाना's picture

13 May 2011 - 1:13 pm | विसुनाना

काही ओळींबाबत चर्चा करावी असे वाटले.

(नाही जरी मीहि भिजावयाला)

ही ओळ -
'(नसेन जरी मी भिजावयाला)'
अशी का नाही?

नेमेंचि त्यानंतर पावसाळा
येईल, त्यालाहि बघावयाला

या ओळी -
'येईल त्यानंतर पावसाळा
नेमेंचि त्याला बघावयाला'
अशा का नसाव्यात?
कदाचित 'नेमेंचि येतो मग पावसाळा' या प्रसिद्ध शब्दसमूहाचे/काव्यपंक्तीचे आकर्षण हे कारण असू शकेल.

कवीने उत्तर द्यावे ही अपेक्षा.

शिवाय घासकडवींनी उल्लेखलेले 'विश्वास२' आणि प्रतिबिंबही जाणवले.

धनंजय's picture

13 May 2011 - 8:44 pm | धनंजय

प्रतिसादकर्त्यांचे आभार मानतो.

वरील कवितेत आदल्या कवितांमधून काही उद्धरणे (किंवा पडसाद) आहेत. ही अंधुक तरी जाणवावी अशी कविता रचताना अपेक्षा होती. उद्धरणांचा/पडसादांचा दुहेरी परिणाम व्हावा अशी इच्छा असते. (१) आदल्या स्रोताशी साम्य जाणवावे, आणि (२) त्याच आदल्या स्रोताशी ही साम्ये असताना देखील विलक्षण फरकही जाणवावा.

ढळढळीत उद्धरण हे "नेमेंचि येतो मग पावसाळा । (हें सृष्टिचें कौतुक जाण बाळा ॥)" या काव्यपंक्तींमधून आहे. उद्धरण आहे, याबाबत काहीएक शंका असू नये - शब्द नेमके तेच नसले तरी - हे या ठिकाणी महत्त्वाचे आहे. विसुनानांना हे जाणवले, ते योग्यच आहे.

दुसरे अस्पष्ट उद्धरण मर्ढेकरांच्या "शिशिरर्तुच्या पुनरागमे" कवितेच्या बांधणीचे आहे. (१) त्या कवितेसारखी ही कविता देखील ऋतुचित्र सांगते, त्याहून अधिक की (२) दोन्ही कवितांमध्ये पहिला काही ओळींचे उलट्या क्रमाने स्पष्ट प्रतिबिंब शेवटल्या ओळींमध्ये आहे.

शिशिरर्तुच्या पुनरागमे
एकेक पान गळावया
का लागता मज येतसे
...
तुज आसवे, जरी लागले
एकेक पान गळावया
शिशिरर्तुच्या पुनरागमे

मर्ढेकरांच्या या कवितेत ५ कडवी आहेत, वर उद्धरण कडवे १ आणि ५ मधील पहिल्या/शेवटल्या ओळींचे आहे. कडवे २ आणि ४ मध्ये देखील प्रतिबिंब आहे. पण त्याचा क्रम थोडा मागेपुढे आहे. पाण्यात प्रतिबिंबाचा थोडा भाग अगदी जशास-तसा असतो, काही भाग ओळखू यावा असा, पण मात्र लहरींनी विस्कळित असतो.

(माझ्या) वरील कवितेत जुनी उद्धरणे आहेत, आणि ती वाचकाने जमल्यास मनात आणावीत, हा हेतू सांगण्याकरिता अनुस्वारांबाबत शुद्धलेखनाचे जुने नियम पाळलेले आहेत.

त्या दोन्ही उद्धरणांशी काही थोडे साम्य असले, तरी माझ्या वरील कवितेच्या आशयात आणि ती चौकट तो वेगळाच आशय सांगणार्‍या वापरात विलक्षण फरक आहे, हेसुद्धा जाणवले तर हवेच आहे. (उदाहरणार्थ "हे सृष्टिचे कौतुक जाण बाळा", या बोधाचा लवलेशही माझ्या कवितेत नाही. तरी "नेमे" "ये" "नंतर/मग" हे उद्धृत शब्द माझ्या कवितेसाठी चपखल आहेत. मर्ढेकरांच्या कवितेतील विवक्षित आशयाला "प्रतिबिंब" रचनेने रसपोषण मिळते. इथे वेगळ्याच आशयाला तशाच प्रतिबिंब रचनेने पोषण मिळते.)
अर्थात, उद्धरणे माहीत नसली, तरी एक तरी आस्वाद्य अर्थ मनात आला पाहिजे, अशी कवीची स्वतःच्या रचनेकडून अपेक्षा आहे. मात्र प्रतिबिंब पूर्वानुभवाशिवायही जाणवले तर हवे आहे.

राजेश घासकडवी यांना जाणवलेले पडसादही योग्यच आहे. बटबटीतपणा किंवा सारांशात्मक शेवट टाळण्यासाठी एकच "उपाय" आहे. (खरे तर हा बिघडलेल्या कवितेसाठी "उपाय" नाही, कवितेची जनयित्री भावना आहे.) ती बाब म्हणजे प्रामाणिकपणा. ही कविता कवी स्वतः स्वतःला सांगतो आहे, आणि आपल्याच भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे विचारमंथनाला दिशा आहे, कुठेतरी या विचारमंथनाच्या लकेरीला न्यासाच्या स्वरावर समाधानकारकपणे अलगद उतरवताही येते. मात्र कुठल्याही प्रामाणिक विचारमंथनासारखा बोधवाक्य-सारांंश असा येथेही काही नाही. वाचकाच्या प्रामाणिक स्वानुभवांमध्ये पडसाद सापडला पाहिजे. तर कवीकडून नाविन्याचा अंश आणि रसिकाकडून पडसादाचा अंश मिळून दोघे एक आशय तयार करू - तोच कवितेतील संदेश बनतो, तेच कम्युनिकेशन होय.

तिसरे उद्धरण हे अप्रसिद्ध आणि वैयक्तिक निमित्तमात्र आहे. ते रसिकाला कळेल अशी मुळीच अपेक्षा नाही. पण हा "प्रामाणिकपणा" कुठून आला त्याबद्दल गमतीदार-अवांतर तपशील आहे. (माझ्याशी वैयक्तिक ओळख असलेल्या लोकांना कदाचित कोडे पडेल, की सरासरी व्यक्तीपेक्षा मृत्यूनंतरच्या जगाबद्दल प्रामाणिकपणे विचारमंथन हा मनुष्य कसा काय करत आहे?)
काही दिवसांपूर्वी मी गुस्ताव्ह माह्लर याची कृती "दास् लीय्द् वोन् देर् एर्द" (Das Lied von der Erde) ऐकली. ही कृती त्याने मरणासन्न असताना रचली. यातही ऋतुचक्राची उपमा वापरलेली आहे. मात्र ६ मोठाल्या स्वरबद्ध कविता आहेत. (या जुन्या चिनी कविता जर्मन भाषेत भाषांतरित करून त्यांना चाली लावलेल्या आहेत. मला चिनी भाषा किंवा जर्मन भाषा कळत नाही. त्या कवितांचे अतिशय ढोबळ असे इंग्रजी अनुवाद मी वाचले आहेत. त्यांचे साहित्यिक मूल्य यथातथाच आहे. संगीतकृतीचे आस्वादमूल्य फार मोठे आहे.)
माझ्या कवितेतील विचारमंथनावर माह्लरच्या विचारमंथनाचा प्रभाव आहे, इतपत हे उद्धरणच होय. पण कुठल्याही उत्तम कलाकृतीसारखे माह्लरच्या कलाकृतीने माझ्यामध्ये प्रामाणिक पडसाद उमटवले. आणि पडसादांतला हाच प्रामाणिकपणा वरील कविता रचताना आवश्यक होता.

- - -
आता काही तपशीलवार उत्तरे :
(सारांश उत्तरे "अर्थ वेगळा आहे म्हणून!")

(नाही जरी मीहि भिजावयाला)
ही ओळ -
'(नसेन जरी मी भिजावयाला)'
अशी का नाही?

दोन ओळींचे अर्थ वेगवेगळे आहेत. "नाही" या सामान्य-(वर्तमान)-कालक वापरात "नसेन" मधील विध्यर्थ/भविष्यापेक्षा वेगळी अर्थछटा आहे.
(मराठीत, तसे संस्कृतातही, आपण कधीकधी वर्तमानकाळ भविष्यातील नजिकच्या आणि सुनिश्चित घटनांसाठी वापरतो.)
आणि "मीहि" मधील "ही=सुद्धा" हा अर्थपूर्ण आहे.
आता "नाही"पेक्षा "नसेन"ची वेगळी वेगळी अर्थच्छटा कदाचित "एक वेगळा अर्थ" म्हणून ग्राह्य आहे. पण "ही"शब्द नसला तर अर्थाचा केवळ र्‍हासच होतो.

नेमेंचि त्यानंतर पावसाळा
येईल, त्यालाहि बघावयाला

या ओळी -
'येईल त्यानंतर पावसाळा
नेमेंचि त्याला बघावयाला'

अशा का नसाव्यात?

प्रश्न कळला नाही, कारण वाक्यार्थ तर खूपच वेगळा आहे. एका वाक्यात पावसाळ्याचे येणे नेमेंचि होते आहे, तर सुचवलेल्या पर्यायात नेमेंचि बघण्याबद्दल वाक्य आहे. दुसर्‍या अर्थाबद्दलही चांगली कविता कोणी लिहू शकेल, परंतु या वरच्या कवितेपेक्षा ती खूपच वेगळी असेल!
(अर्थात कवीने त्या पर्यायी अर्थाची कविता लिहायला हवी होती, या अर्थाची लिहायला नको होती... पर्यायी विषय मनाला अधिक भिडणारा आहे, कवीने निवडलेला विषय मनाला हवा तसा भिडत नाही... वगैरे मूल्यमापन वाचकाने करणे योग्यच आहे.)

विश्वास विश्वास...

कवितेत वेगवेगळ्या अंतरावर पडसाद होणारे अनुप्रास/यमके/द्विरुक्ती आहेत हे निरीक्षण सुयोग्य आहे. { (स्केल इन्डिपेंडन्ट त्रान्स्लेशनल सिमेट्री :-) }

विसुनाना's picture

14 May 2011 - 11:09 am | विसुनाना

सुंदर विवेचनाबद्दल आभार.
"मीहि" मधील "ही=सुद्धा" हा अर्थपूर्ण आहे. - हे नव्याने जाणवले.
बाकी वेगळ्या वाक्यार्थानेही मूळ कवितेचा परिपोषच होतो असे आपले वैयक्तिक मत.:)

धनंजय's picture

15 May 2011 - 1:52 am | धनंजय

मी कवितेचे इंग्रजी रूपांतर येणेप्रमाणे केले आहे.

Again in spring
- - -
Again, in spring the trees will green
Although their buds will be unseen
By me, for then I won't be here.

Again the wastes of winter's sere
And barren cold all life will fear
Will never end. And then they'll see:

Again the woods will wake, break free;
The buds (although unseen by me)
In spring again the trees will green.
- - -