इतक्यातच विकीवरच्या माहितीत भर घालून त्याचा लेख केला, तो येथे देत आहे.
अधिक माहिती इतर सदस्य देतीलच त्यानुसार विकीवरचा लेखातही भर घालता येईल.
----
जगदीश खेबूडकर (जन्म १० मे इ.स. १९३२ - मृत्यू ७९व्या वर्षी, ३ मे २०११ रोजी) हे मराठी ज्येष्ठ गीतकार होते. जगदीश खेबूडकर यांना नाना असेही संबोधले जात असे. त्यांचा जन्म कोल्हापूर - राधानगरी रस्त्यावरील खेबवडे, (की हळदी?) या गावी झाला. वडिलांच्या शिक्षकाच्या नोकरीमुळे सतत बदली होत असल्यामुळे प्राथमिक शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले. वयाच्या १६ व्या वर्षी, मानवते तू विधवा झालीस.. हे खेबूडकरांचे पहिले दीर्घकाव्य लिहिले गेले असे मानले जाते. महात्मा गांधींच्या वधानंतर जेव्हा त्यांचे घर जाळले गेले. त्या घराच्या राखेचा ढिगारा पाहून हे काव्य त्यांना सुचले. त्यानंतरच त्यांचा कवी आणि गीतकार म्हणून प्रवास सुरू झाला. लोकसंगीत, पोवाडा, अभंग, ओवी अशा विविध काव्य प्रकारांमध्ये त्यांनी रचना केल्या. जगदीश खेबूडकर हे पेशाने शिक्षक होते.
त्यांनी आपल्या कारकीर्दीत तीन हजार पाचशे कविता आणि अडीच हजारांपेक्षा अधिक गीते लिहिली. सुधीर फडके, पं. भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, प्रभाकर कारेकर यांच्यापासून ते अलीकडच्या सोनू निगमपर्यंत सर्वच नामांकित गायकांनी त्यांची गीते गायली आहेत. भा. रा. तांबे, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, बा. सी. मढेर्कर या थोर कवींचा प्रभाव आपल्यावर असल्याचे खेबूडकर मानत असत. जेव्हा त्यांच्या शेवटच्या काळात त्यांना आधार रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते त्यावेळी उपचार घेतानाही त्यांचे गीत-लेखनाचे कार्य सुरूच होते.
कार्य
त्यांचे पहिले गीत इ.स. १९५६ रोजी आकाशवाणीवर प्रसारित झाले. इ.स. १९६० मध्ये त्यांचे पहिले चित्रगीत आणि पहिली (लावणी) ' मला हो म्हणत्यात लवंगी मिरची' प्रदर्शित झाली. ’रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटाची गीते लिहिण्याची ही संधी त्यांना वसंत पवार, संगीतकार यांनी दिली होती. ‘साधी माणसं’, ‘आम्ही जातो आमच्या गावा’,‘कुंकवाचा करंडा’ आदी चित्रपटांसाठीची त्यांची गीते अतिशय गाजली. त्यांनी सुमारे ३२५ मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिली. २५ पटकथा, संवाद , ५० लघुकथा, पाच नाटके, चार दूरदर्शन मालिका , चार टेलिफिल्म , पाच मालिका गीते इतकी साहित्य संपदा त्यांनी निर्माण केली आहे. त्यांची सांगीतिक कारकीर्द पाच दशकांइतकी मोठी होती. ग.दि.माडगुळकरांनंतर इतका मोठा गीतकार झालेला नव्हता. त्यांच्या कारकीर्दीत भालजीं पेंढारकर ते यशवंत भालकर असे विविध ३६ दिग्दर्शक, वसंत पवार ते शशांक पोवार असे ४४ संगीतकार आणि सुधीर फडके ते अजित कडकडे अशा ३४ गायकांसमवेत खेबूडकर यांनी काम केले आहे.
संस्था
१९७४ मध्ये त्यांनी स्वरमंडळ ही पहिली नाट्यसंस्था स्थापन केली. स्वरमंडळसंस्थेमार्फत रामदर्शन हा रामायणावरील वेगळा प्रयोग त्यांनी सादर केला होता. त्यानंतर १९८० मध्ये रंगतरंग व १९८२ मध्ये रसिक कला केंद्राची स्थापना केली. रंगतरंग संस्थेद्वारे गावरान मेवा हा कार्यक्रम त्यांनी बसविला होता. त्याचे सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त कार्यक्रम झाले. १९८६ मध्ये नाट्यकलेच्या सेवेसाठी "नाट्यछंद' आणि १९८६ मध्ये अभंग थिएटर्सची स्थापना केली.
पुरस्कार
जगदीश खेबूडकर यांना ६० हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
- राज्य शासनाच्यावतीने ११ वेळा सन्मानित (त्यातला एक: सवाल माझा ऐका १९६४ साठी)
- गदिमा पुरस्कार
- कोल्हापूर भूषण पुरस्कार
- फाय-फौंडेशन पुरस्कार
- साहित्य सम्राट पुरस्कार
- रसरंग फाळके पुरस्कार
- व्ही.शांताराम स्मृति जीवनगौरव पुरस्कार
- शिवाजी सावंत पुरस्कार
- बालगंधर्व स्मारक समितीचा बालगंधर्व पुरस्कार
- जीवनगौरव पुरस्कार
- शाहू पुरस्कार
- करवीर भूषण
- दूरदर्शन जीवनगौरव
- कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार
खेबूडकरांची गाजलेली गीते
- आकाशी झेप घे रे पाखरा,
- आज प्रीतिला पंख हे लाभले रे,
- एकतारी संगे एकरूप झालो,
- ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे
- कधी तू हसावी, कधी तू रुसावी
- कशी नशिबानं थट्टा आज मांडली,
- कसं काय पाटील बरं हाय का?,
- कल्पनेचा कुंचला हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा
- कुण्या गावाचं आलं पाखरू,
- चंद्र आहे साक्षिला,
- छबीदार छबी मी तोर्यात उभी,
- तुझे रूप राणी कुणासारखे गं?
- तुम्हावर केली मी मर्जी बहाल
- धागा जुळला, जीव भुलला,
- धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना
- दिसला गं बाई दिसला,
- देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा
- मला लागली कुणाची उचकी
- मला हे दत्तगुरू दिसले,
- मला हो म्हनत्यात लवंगी मिरची,
- मी आज फूल झाले,
- मोरया..मोरया..
- रुणझुणत्या पाखरा,
- विठू माउली तू माउली जगाची
- सख्या रे घायाळ मी हरिणी,
- सत्यम शिवम सुंदरा,
- सत्य शिवाहूनी सुंदर हे,
- सावधान होई वेडय़ा
- सोळावं वरीस धोक्याचं गं
- स्वप्नात रंगले मी.
- हवास मज तू हवास तू,
अजून अनेक रमणीय गीते आणि आठवणी येथे याच्यात असे वाटते...
प्रतिक्रिया
4 May 2011 - 1:06 pm | यशोधरा
निनाद, माहितीपूर्ण लेख आहे.
4 May 2011 - 1:38 pm | डावखुरा
निनाद मस्त काम केलंस...
मी पण प्रभाकर पण्शीकरांच्या लेखामध्ये विकीवर भर घातली होती..
4 May 2011 - 5:57 pm | प्रचेतस
निनाद, उत्तम संकलन, माहितीपूर्ण लेख.
त्याबरोबरच खेबूडकरांसारख्या महान शब्दप्रभूला श्रद्धांजली.
4 May 2011 - 6:03 pm | गणेशा
जगदीश खेबुडकरांना भावपुर्ण श्रद्धांजली ....
"पिंजरा" या चित्रपट म्हणजे त्यांचा मास्टरपीस असे म्हणले जाते.
कालच स्टार माझा वर त्यांचे यातील गाण्यांबद्दलचे आणि संगितकार राम कदम यांच्याबद्दल्चे मत पुन्हा ऐकले...
तुम्हावर केली मी मर्जी बहाल.. नका सोडुन जाऊ रंग महाल ... मस्तच एकदम ...
शब्दांची एक नवी दुनिया जगाला देवुन नाना अमर झाले
4 May 2011 - 8:16 pm | नितिन थत्ते
लेख आवडला.
जगदीश खेबुडकर यांच्या गीतांनी मराठी चित्रपटगीतांचे विश्व खूपच समृद्ध केले आहे.
5 May 2011 - 6:36 am | सहज
असेच म्हणतो.
4 May 2011 - 8:32 pm | ramjya
भावपुर्ण श्रद्धांजली ...
4 May 2011 - 10:01 pm | ५० फक्त
आदरपुर्ण श्रद्धांजली.
4 May 2011 - 10:12 pm | मस्त कलंदर
शाळेत असताना वसंत व्याख्यानमालेत त्यांचे भाषण ऐकण्याचा योग आला होता. माझ्यासाठी तर आतापर्यंत रेडिओवरून फक्त नांव माहित असलेली व्यक्ती प्रत्यक्षात कशी दिसते कशी बोलते हेच कौतुक होतं. तेव्हा त्यांनी पहिली कविता त्यांच्याकडून कशी लिहिली गेली हे ऐकताना अक्षरशः अंगावर रोमांच उभे राहिले होते. अर्थात आता शब्दशः आठवत नसले तरी, "घर जळत होतं. ठिणग्या उडत होत्या. त्या ठिणग्यांनी मनात अंगार फुलवला आणि त्या अंगाराची कागदावर कविता फुलून आली " असं काहीसं ते वर्णन होतं.
गाण्यांच्या जन्मकथा, कधी गाण्यावरून चाल तर कधी चालीवरून गाणं कसं तयार होई, राम कदमांसोबत केलेल्या आणि गाजलेल्या लावण्या हे सगळं त्यांच्या तोंडून ऐकणं म्हणजे बहार होती.
ते नेहमी टाय लावत. त्याबद्दल सांगताना ते म्हणाले होते की त्यांना त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्व भारदस्त वाटत नसे. त्यामुळे बरेच प्रयोग करून ते शेवटी टाय लावल्यावर आपण त्यातल्या त्यात बरे दिसतो या निष्कर्षाप्रत आले होते.
त्यांच्या निधनाच्या बातमीने वाईट वाटले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो!!!
5 May 2011 - 5:55 am | विकास
लेख आवडला.
सकाळमधली जानेवारीतील त्यांचे वक्तव्य आत्ताच वाचले... त्यातील एक भाग खाली देत आहे:
5 May 2011 - 6:32 am | पाषाणभेद
संग्राह्य लेख.
त्यांनी लिहीलेल्या गीतांमुळे मराठी कायम त्यांची ॠणी राहील.
अलौकिक प्रतिभाशक्तीचे दैवी देणगी असलेले गीतकार म्हणून त्यांची ओळख होती.
नानांना भावपुर्ण आदरांजली.
5 May 2011 - 7:01 am | स्पंदना
निनाद मनापासुन आभार! फार छान , सुसंदब्ध माहिती.
5 May 2011 - 11:15 am | विसोबा खेचर
मोठा माणूस..!
विनम्र आदरांजली..!
तात्या.
5 May 2011 - 11:40 am | स्वाती दिनेश
माहितीचे संकलन उत्तम ! धन्यवाद.
स्वाती