त्या दगडी देवळाच्या मुख्य दरवाजावर
कोरलेल्या अर्धवर्तुळात ती घंटा
पितळेची ,कदाचित पंचधातूची
पुरुषभर उंचीची
घनघोर आवाजाची
खालूनच नदी वाहतेय गोदावरी
आखीव रेखीव काठ
शिसवी रंगाच्या कभिन्न दगडांनी बांधलेला किनारां
पावसाळ्यात त्यावरून वाहणारे झुळझुळ पाणी
पायावरून वेलांटत नागमोडी पसरत सरकणारे
पाय भिजवीत महादेवाच्या दर्शनाला गेल्याची बारीकशी आठवण
मंदिरात घुसताना घंटेचे दर्शन
घाबरून जायचो तिच्या आकाराने
बेलाचे पान वाहताना डोळे मिटून घ्यायचो
तेव्हा घंटाच यायची डोळ्यासमोर
घंटा तशी बर्याच उंचीवर
महापुरात देखील पाणी नाही लागत तिच्या पायाला
जेव्हा लागेल तेव्हा सगळे गाव जाईल वाहून
घंटा आता आतां कोणीच वाजवत नाही
वाजवल्याचे कधी ऐकलेपण नाही
तिच्या बद्दल एक भीतीयुक्त दरारा
पुराच्या पाण्यानेच कधीतरी वाजली होती घंटा
तेव्हा जगबुडी आल्याचा वास पसरला होता सर्वत्र
तेव्हा नाग बसला होता वेटोळे घालून त्या घंटीतल्या लोलकाला
तेव्हां शिव शंभोने गावाला धरले होते डोक्यावर
परवाच सहज गेलो
लहानपणची आठवण शोधायला
त्या अर्धवर्तुळात घंटी पार केविलवाणी दिसत होती
केविलवाण्या अवस्थेत कशीबशी सावरून उभी होती
शिवशंभो पण कोठेतरी हरवलेला वाटला
माश्यासारखी थारोळलेली गर्दी
सर्वत्र भकास केविलवाणी
घंटापण तिरपी करून बांधून ठेवलेली
कधीपण पडू शकते
कडकडीत उन्हात मी गलितगात्र
केविलवाणा ....!!
माझी उंची वाढली होती
माझ्या लहानपणची मोठी घंटा
आता छोटी झाली होती ..... ..!!
प्रतिक्रिया
12 Apr 2011 - 4:26 pm | पियुशा
झक्कास :) +१
12 Apr 2011 - 4:27 pm | गणेशा
नेहमी प्रमाणेच उत्तम रचना..
घंटेच्या रुपाने ही मागील आणि आत्ताचे अस्तित्व छान सांगितले आहे...
मला तर तुमच्या कवितेतुन नाशिक या शहराची स्थीतीच जास्त भासली..
अवांतर : तुमच्या मागील बर्याच कविता ह्या संपन्नतेच्या , निसर्गावर- गोष्टींवर असतात आनि सध्याचे अस्तित्व हे एक प्रकारे निर्जीव-लादलेले भासते त्यातुन..
आनंद हा स्थीतीवर नाही तर मनावर अवलंबुन असतो असे माझे मत आहे... मन हळुच मागच्या काळात जावुन फिरुन येणे एक तजेलदारपणाचे लक्षण आहे.. पण त्याने आल्यावर सध्य परिस्थीशी बंड पुकारला तर मात्र अवघड होते खुप....
12 Apr 2011 - 6:19 pm | प्रकाश१११
गणेशा -अगदी खरे आहे. आजकाल फार क्वचित जातो नाशिकला . अगदी लहानपणी नाशिकला होतो आणि नि त्या नदीलाच लागून कोठ आहे त्या कोठावर भाड्याच्या घरात राहत होतो
तेव्हा ही नारो शंकराची घंटा नेहमीच माझा आकर्षणाची गोष्ट होती. परंतु त्या देवळात कधी गेल्याचे स्मरत मात्र नाही .मी नेह्नी लांबून बघायचो . अगदी नदी काठी आहे ते देऊळ .कधी गेलास तर जरूर बघ .माझी जरूर आठवण येईल . तर ही घंटा कोठेतरी मनात होती . आणि लहानपणीच्या ह्या तेव्हा भव्य वाटणार्या वस्तू आपण मोठे झालो की खूप छोट्या दिसतात .
अगदी ४-५ वर्षाचा होतो तेव्हा श्रीगोन्द्याला होतो .तेव्हा गावाबाहेर मोठा बंगला तेथे रहात होतो त्याच्या पुढचे आवार खूप मोठे वाटत होते. पर्वा सहज तेथे गेलो बंगला कुणालाच
माहित नव्हता. रिक्षावाला म्हणाला एक रेस्ट हाउस आहे .ते बघितले तर तोच आमच्या बालपणाचा बंगला होता. त्याचे आवार माझ्या कल्पनेत जेवढे होते त्यापेक्षा खूप छोटे निघाले
हे सर्व डोक्यात होते त्यातून ह्या कवितेचा जन्म
12 Apr 2011 - 6:24 pm | अविनाशकुलकर्णी
मस्त
12 Apr 2011 - 8:21 pm | निनाव
अतिशय सुंदर रचना...तुमचे काव्य 'टाईम मशीन' पेक्षा कमी नाही प्रकाश दा!