'एरीक क्लॅपटन'

प्रास's picture
प्रास in जनातलं, मनातलं
12 Mar 2011 - 1:21 pm

साधारण साठच्या दशकात, काऊण्टर कल्चर, हिप्पी कल्चरच्या गदारोळात संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज रत्ने हाती गवसली. त्यातलं महत्त्वाचं नाव , म्हणजे 'एरीक क्लॅपटन'. अत्युच्च प्रतीचा गीतकार, संगीतकार आणि गायक. जगातल्या सर्वात उत्तम गिटारवादकांपैकी एक. काळाचा प्रभाव म्हणा वा ग्रहदशा, याचं जीवन अत्यंत वादळी आहे आणि हे वादळ त्याच्या गीतांमध्ये, संगीतामध्ये संपूर्णपणे दिसून येतं.

३० मार्च १९४५ रोजी रीप्ली, सरे, इंग्लंड मध्ये जन्मलेल्या एरिकचं जीवन जरा निराळच आहे. त्याचे वडील क्युबेक-कॅनडाचे सैनिक होते आणि त्याचा जन्म व्हायच्या आधीच ते कॅनडात परतले होते. तो जन्मला तेव्हा त्याची आई पॅट्रीशिया फक्त सोळा वर्षाची होती. पुढे अनेक वर्ष एरीक आपल्या आईला आपली मोठी बहिण आणि आपल्या आजीला आपली आई मानायचा. पुढे त्याची आई लग्न करून कॅनडातच गेली आणि एरीक आपल्या आजीकडेच मोठा झाला.

वयाच्या १३व्या वर्षी एरीकला पहिली गिटार भेट मिळाली. आधी त्याला हे वाद्य नीट जमेना पण दोनेक वर्षांनी त्याने स्वत:ला कसोशीने गिटार वादक बनवले. तासन्तास ब्लूज धर्तीच्या गिटार वादनाचा तो अभ्यास करायचा. त्याने या ध्यासापायी आपलं कला शाखेचं शिक्षणही अर्धवट सोडून दिलं. पण परिणामी एरीकचं गिटार वादन इतकं सुधारलं की वयाच्या १६ व्या वर्षीच संगीतक्षेत्राने त्याच्या वादनाची दखल घेण्यास सुरुवात केली.

यार्ड बर्ड, क्रीम, ब्लाईन्ड फेथ, डेलनी अ‍ॅण्ड बोनी अ‍ॅण्ड फ्रेंड्स आणि डेरेक अ‍ॅण्ड द डॉमिनोज अशा म्युझिक ग्रूप्स मध्ये एरीकची गिटार धुमाकूळ घालू लागली. अशा प्रकारे आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीला अनेक प्रतिथयश गायकांना, त्यांच्या ग्रूप्सना आपल्या गिटारने साथ करणारा एरीक आपल्या प्रभावशाली वादनाने खूप प्रसिद्धीला आला. पण प्रसिद्धी बरोबरच त्याला मिळाली अमली पदार्थांची सवय. कोकेन आणि दारूने त्याला पार जखडून टाकलं. असं असूनही त्याला अशा आयुष्यातून तारलं केवळ त्याच्या संगीताने!

एक वेळ अशीही आली की जॉर्ज हॅरीसनच्या प्रसिद्ध 'बांगलादेश कॉन्सर्ट'च्या वेळी अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे एरीक रंगमंचावरच बेशुद्ध झाला पण तिथे लगेच त्याला शुद्धीवर आणले गेल्यावर त्याने पुन्हा आपले वादन सुरू करून कार्यक्रम पूर्णत्वाला नेला. त्या 'बांगलादेश' कॉन्सर्ट मधलं एरीकच्या इलेक्ट्रीक गिटारच्या वादनाने नटलेलं जॉर्जचं एक अप्रतिम गाणं ऐका.

त्याच्या आयुष्यातील वादळी घटनाही त्याच्या व्यसनाला पूरक ठरल्या. जॉर्ज हॅरीसन या बीटल्सच्या गायक-संगीतकाराला साथ देता देता एरीक त्याच्या बायकोच्याच, 'पॅटी बॉइड'च्या प्रेमात पडला. हे त्याच्या वादळी जीवनातलं एक चक्रीवादळच होतं. यामुळे आधीच धुमसणारं जॉर्ज-पॅटीचं लग्न मोडलं. पॅटीच्या प्रेमात आकंठ बुडालेला एरीक तिला उद्देशून गाणी लिहू लागला जी पुढे खूप प्रसिद्ध झाली. (पुढे एरीक पॅटीशी विवाहबद्धही झाला.)

पुढे दिलेलं हे गाणंही त्यापैकीच एक.... पार्श्वभूमी सोडा, पण गीत, संगीत आणि गायन म्हणून या गाण्याला अजिबात तोड नाही..... 'एरीक' ने पार तोडलंय आपल्याला.....!!!

पॅटीसाठी एरीक ने लिहिलेलं आणखी एक गाणं......

हे तिच्याशी लग्न करण्याआधी लिहिलेलं आणि तिचंही हे एरीकने लिहिलेल्या आणि गायलेल्या गाण्यांपैकी सर्वात आवडतं गाणं आहे. एरीकाला त्याच्या मित्राने 'निजामी गंजवी'चं लैला आणि मजनू वरचं एक पुस्तक भेट दिलेलं होतं. या त्याच्या अत्यंत आवडत्या पुस्तकात एरीकाला त्याचंच प्रतिबिंब दिसलं. एका अप्राप्य लावण्यवतीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या मजनुमध्ये एरीक स्वत:चंच रूप बघू लागला. त्या धुंदीतच या जबरदस्त गाण्याचा जन्म झाला.

अर्थात आपल्यालाही हे ऐकायला आवडेल.....

एरीकने इतरही गाणी उत्तमरीत्या गायली आहेत.

'बॉब मर्ली'च्या "I shot the Sheriff" या गाण्याचं एरीकचं व्हर्जन त्याचाच नमुना आहे.....

एरीक च्या गिटार वादनाला खरंच तोड नाही यारों....!

आधी म्हंटल्याप्रमाणे एरीकचं जीवन खरंच वादळी आहे.

१९९१ साली एरीकचा मुलगा 'कॉनर' (एका इटालियन मोडेल पासून झालेला, ज्या प्रकरणामुळे एरीक आणि पॅटी बोईड यांचं लग्न मोडलं.) आपल्या आईच्या मैत्रीणीच्या घराच्या खिडकीतून अपघाताने खाली पडला. ४ वर्षांचा 'कॉनर' ५३व्या मजल्यावरून पडल्याने जागीच मृत्यू पावला. या घटनेने एरीकला खूप मोठा धक्का बसला. तो अनेक महिने अस्वस्थ राहिला. या अपघाताची दु:खद आठवण म्हणून त्याने गीताचे एक कडवे लिहिले. पुढे विल जेनिंग बरोबर त्याने यावर थोडे अधिक संस्कार करून त्याचे संपूर्ण गाणे बनवले. ते गाणे म्हणजे "Tears in Heaven".

या गाण्याला १९९२ सालची ३ ग्रॅमी अ‍ॅवॉर्ड्स मिळाली आणि बिलबोर्ड काऊन्ट-डाउन मध्ये ते २ र्‍या क्रमांकापर्यंत गेलं. हे गाणं पुढे "Rush" नावाच्या चित्रपटात वापरलं गेलं. २००४ नंतर एरीकने हे गाणं गायचं थांबवलं. त्याच्या म्हणण्यानुसार तोपर्यंत त्याची ती मानसिक जखम बर्‍यापैकी भरून आली आणि ती वेदना न जाणवता गाणं केवळ परफॉर्म करणं अयोग्य होतं.

या गाण्यात एरीक मधल्या बापाचं प्रेम आणि दु:ख असं व्यक्त होतं की आपलेही डोळे भरून येतात.....

जबरदस्त, दणदणीत आणि एकदम 'हेवी' ब्लूज म्युझिक ऐकायची आवड असेल तर 'एरीक क्लॅपटन'च्या "Have you ever loved a woman" या गाण्याला पर्याय नाही. 'बिली माईल्स'ने लिहिलेलं हे गाणं आधी ब्लूज गायक 'फ्रेडी किंग'ने म्हंटल होतं पण तेव्हा फार गाजलं नाही. पण जेव्हा एरीकच्या गिटार आणि आवाजाचा स्पर्श त्या गाण्याला झाला तेव्हा सर्वोत्तम ब्लूज गाण्यापैकी ते एक मानलं जाऊ लागलं.

"Old Love" हे गाणं एरीक ने त्याची पत्नी 'पॅटी बोइड' बरोबर काडीमोड केल्यानंतर लिहिलेलं आहे. दोघांच एकमेकांवर प्रेम होतं पण ते टिकू शकलं नाही. ते वेगळे झाले आणि या विवाह-च्छेदनाने प्रेरित होऊन 'एरीक'ने हे गाणं लिहीलं. आपल्या एके काळच्या प्रिय पत्नी बरोबर होत असलेल्या वा झालेल्या घटस्फोटाच्या अनुभवातून जाणार्‍या पुरुषाची मानसिकता या गाण्यात दिसून येते.

२००८ साली 'पटी' 'गार्डियन' वृत्तपत्रातील मुलाखतीत म्हणाली, "हे गाणं माझ्यासाठी खूपच वेदनादायक आणि दु:खद होतं, एक तर ते आमच्या घटस्फोटाच्या संदर्भातलं त्याचं ('एरीक'चं) म्हणण होतं जे म्हंटल तर आमची खाजगी बाब होती, मलाही त्या घटनेने (घटस्फोटाच्या) दु:ख झालेलं आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे मी 'एरीक'ला या बाबतीत गाण्याच्या मार्गाने कधीच प्रत्युत्तर देऊ शकणार नव्हते......"

एरीक पाश्चात्य संगीत क्षेत्रात अगदी लेजंडपदाला पोहोचलेला आहे. आज म्हंटल तर वादळ ब-यापैकी माणसाळलंय. अनेक संगीतकारांच्या ट्रीब्युट कॉन्सर्ट्सना तो आपल्या उपस्थितीने आणि सहभागाने चार चाँद लावतो. त्याची संगीत सेवाही अजून सुरूच आहे. जॉर्ज हॅरीसनच्या मृत्युनंतर दोन वर्षांनी झालेल्या "कॉन्सर्ट फॉर जॉर्ज" मध्ये एरीकने त्याचे "While My Guitar Gently Weeps" हे गाणे सादर केले (ही कॉन्सर्ट एका वेगळ्या लेखाचा विषय होईल) हा त्याचाच भन्नाट पुरावा!

माझ्या या अत्यंत आवडत्या कलाकाराची, 'एरीक क्लॅपटन'ची त्याच्या या महिना अखेरीला येणा-या वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या मित्रांना ओळख करून देण्याचा माझा हा छोटासा शाब्दिक प्रयत्न!

संगीतप्रकटनआस्वाद

प्रतिक्रिया

संजय अभ्यंकर's picture

12 Mar 2011 - 6:55 pm | संजय अभ्यंकर

एरिक क्लॅप्टन एक वादळ.
गिटार वरची त्याची मास्तरी वादातीत आहे.

बाबुराव's picture

12 Mar 2011 - 6:56 pm | बाबुराव

लय भारी वळख करुन दिली.
एरिक आवडला.

बाबुराव :)

लेख आवडला, सर्व गाणी शांतपणे पुन्हा ऐकायची आहेत, म्हणून शनिवारी लेख टाकल्याबद्दल धन्यवाद!

(उत्तम कलाकारांच्या कलाकृतीं जितक्या सुखदायक असतात तितकंच त्यांचं वैयक्तिक आयुष्यही दु:खदायक, गुंतागुंतीचं का असावं हा नेहेमी पडणारा प्रश्न आहे..गुलजार, किशोरकुमार ही चटकन आठवणारी उदाहरणं.....कदाचित, ते तसं सरळसोट नसतं, बरेचदा विरोधाभासपूर्ण आणि वेदनापूर्ण असतं, याचा कलानिर्मितीशी सरळ संबंध असावा!)

माझ्या आवडत्या गायकाची ओळख करुन देणारा लेख आणि काही सुरेख गाणी उपलब्ध करुन दिल्याबद्दल अनेक धन्यवाद.
जिम क्रोस (Jim Croce) बद्दलही लिहाल का?

शिल्पा ब's picture

13 Mar 2011 - 12:01 am | शिल्पा ब

उत्तम ओळख.

ग्रेट यार..या गिटार लेजंडला नुसतंच ऐकत होतो. लेखातून खूप नवीन कळलं..

ईगल्सचीही गिटार अशीच..

येऊदेत अजून ओळखी..

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

13 Mar 2011 - 12:19 pm | निनाद मुक्काम प...

लेख आवडला .
माझ्या सासऱ्याचा अल्बर्ट चा आवडता गायक .

त्या काळात जो काही दंगा केला त्या पिढीने राव
अशीच माहिती देत रहा.
पु ले शु

प्रास's picture

13 Mar 2011 - 4:29 pm | प्रास

प्रतिसादाबद्दल धन्यवाद मित्रांनो!

यामुळे माझा लिखाणाचा हुरुप टिकून राहिल....

किशोरअहिरे's picture

14 Mar 2011 - 10:21 am | किशोरअहिरे

टियर्स ईन हेव्ह्न वन ऑफ फेव्हराईट आहे..
ऊत्तम पोस्ट..
"While My Guitar Gently Weeps" बेस्ट ऑफ ऑल.. आणी परफेक्ट कॉम्बो ऑक क्रोमेटीक आणी ब्लुज

रंगोजी's picture

14 Mar 2011 - 4:32 pm | रंगोजी

इतक्या सुंदर पोस्टसाठी धन्यवाद!!
कॉलेजात असताना 'फ्रेंड्स' बघता बघता सहाव्या सीझनच्या शेवटातले 'वंडरफुल टुनाईट' गाणे/ट्यून जाम आवडले होते. शोधल्यावर कळले की कुणा 'एरिक क्लॅप्टन'चे आहे. एकातून दुसरे अशी त्याची गाणी ऐकता ऐकता वेड लावले या माणसाने.

मुलूखावेगळी's picture

14 Mar 2011 - 4:40 pm | मुलूखावेगळी

प्रासा,
सगळी गाणी ऐकली श्रवणीय.छान आवडली
अशाच ओळखी करुन दे

परिकथेतील राजकुमार's picture

14 Mar 2011 - 5:30 pm | परिकथेतील राजकुमार

प्रास सुंदर ओळख :)

हा लेख देखील आवडला हे.वे.सा.न.ल.

निवांत पोपट's picture

14 Mar 2011 - 6:17 pm | निवांत पोपट

ह्या प्रतिभाशाली कलाकाराचे गिटारवरचे प्रभुत्व वादातीत आहे. त्याचे Wonderful tonight सुंदरच आहे.Lyala च्या ऑफ़िशियल व्हर्जनपेक्षा त्याने प्लग इन व्हर्जन मध्ये वाजवलेले सुरवातीचे गिटार तर अप्रतिम! त्याचे change the world हे गाणे तुम्ही विसरला काय? त्याच्या मुलाच्या मृत्यूच्या संबंधित गाणे My father's eyes हे असावे बहुतेक.

प्रास's picture

14 Mar 2011 - 10:52 pm | प्रास

कलाकारांची प्रत्येक कलाकृती नमूद करणे काही वेळेला कठीण होते. शेवटी एरीक सारख्याची कारकिर्द अर्ध्या शतकाहून अधिक आहे. अशा वेळी काही गाण्यांचे उल्लेख राहून जाणं शक्य आहे. पण तुम्ही निर्देशीत केलेली गाणीही छानच आहेत. त्यांच्या नाम आणि दुवा निर्देशनाबद्दल आभारी आहे.

मला स्वतःला 'लैला' गाण्यामधलं इलेक्ट्रीक गिटार व्हर्जन अकोस्टिकपेक्षा जास्त आवडतं कारण ते या गाण्याच्या पार्श्वभूमीला जास्त शोभून दिसतं, पण शेवटी हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे आणि मला तुमच्या मताबद्दल आदरही आहे.

प्रतिसादाबद्दल आभारी आहे.