राम राम मंडळी
आज २७ फेब्रुवारी.
वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन. हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष म्हणूनही साजरे होत आहे. त्यांचा जन्मदिवस आपण मराठी दिन म्हणुन साजरा करतो. या निमित्ताने अनेक दिग्गज कवी, लेखक आपल्या साहित्यकृती रसिकांसमोर सादर करतील. अनेक मान्यवर आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेने त्या सर्व कलाकृतींचा आस्वाद घेतील.
ह्या सर्व सरस्वती पूजनामधे माझे हे एक साधेसे फुल. सादर करत आहे कुसुमाग्रजांच्या काही कवितांबद्दल माझे विचार आणि मुळातल्या त्या कविता. त्यात बुद्धीनिष्ट निरुपण नसेल की रसास्वादाच्या सर्व पदरांना स्पर्श नसेल. शब्दांचे सामर्थ्य पूर्ण तर्हेने वापरले नसेल की अर्थांच्या सर्व छटा उलगडल्या नसतील. पण सरस्वतीची पूजा करायला मोठमोठे हारतुरेच हवेत असे नाही.
कुसुमाग्रजांच्याच शब्दांत माझा हा लेख म्हणजे
समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा,
कोठून फुलापरि वा मकरन्द मिळावा?
जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा,
तव आंतर अग्नी क्षणभर तरि फुलवावा !
****
जीवनात आजुबाजुला चालत असलेल्या घटनांमधुन काही तरी सुत्र घेत कवी त्याला दिसलेले वास्तव मांडतो. कित्येकदा समोर होत असलेल्या गोष्टी आपल्याला दिसत असतात पण समजत नाहीत पण तेच वास्तव शब्दांचे रुप घेत समोर येते तेव्हा त्यातले दाहक आणि विदारक वास्तव अस्वस्थ करत जाते. शेतकर्यांचे प्रश्न गहन आहेत. शेतकर्यांवर कर्जाचा भार आहे. शेती करणे कठिण आहे हे कित्येक युगांपासुन आपण ऐकले आहे. त्यामुळे होणार्या आत्महत्या हा दर दोन चार आठवड्यांनंतर होणार्या चर्चासत्रांचा विषयच असतो. कित्येक शेतकर्यांच्या जमिनी, घरं जप्त झाली आहेत होत आहेत. पण यापलीकडे सुद्धा शेतकर्याची काही मानसिक कुचंबणा, अवहेलना होत असेल असे आपल्याला समजत नाही मात्र ते समजते एका साध्या सरळ कवितेतुन जिचा शेवट काळजाचा एक ठोका चुकवून जातो आणि एक विषादपूर्ण कडवट भाव मनात येतो जो ह्या व्यवस्थेविरुद्ध असो की आपल्या स्वतःच्या दुर्बलतेबद्दल असो.
लिलाव
उभा दारी कर लावुनी कपाळा
दीन शेतकरी दावुनी उमाळा,
दूत दाराशी पुकारी लिलाव,
शब्द कसले ते-घणाचेच घाव !
पोसलेले प्राशून रक्त दाणे
उडुनि जाती क्षणी पाखरांप्रमाणे
निघत मागुनि वाजले आणि थाळि,
गाडग्यांची ये अखेरीस पाळी !
वस्तुवस्तूवर घालुनिया धाड
करित घटकेतच झोपडे उजाड
स्तब्ध बाजूला बसे घरधनीण
लाल डोळ्यातिल आटले उधाण
भुके अर्भक अन् कवळुनी उरास
पदर टाकुनि त्या घेइ पाजण्यास
ऊर उघडे ते तिचे न्याहळोनी
थोर थैलीतिल वाजवीत नाणी
"आणि ही रे !" पुसतसे सावकार,
उडे हास्याचा चहुकडे विखार
***
सामाजिक जीवनातील विषमता आणि अन्याय यांच्यामुळे अस्वस्थ होणारा कवी जातीभेद, धर्मामधील वेडगळ कल्पना यांच्यामुळेही अस्वस्थ होतो. पण ही अस्वस्थता कूठेही तिडिक अथवा तुच्छतेची पुटे चढवत न येता हलक्या फुलक्या शब्दांत येते. वरवर पहाता काही तरी सांगत आहे अशा अर्थाच्या शैलीत नटलेली कविता पूर्णहोते तेव्हा एक वेगळेच वास्तव समोर घेऊन येते. भेदाभेदातुन प्रत्यक्ष परमेश्वराला न सोडणारी मंडळी कसा व्यवहार करतात हे या कवितेत पहा
गाभारा
दर्शनाला आलात? या..
पण या देवालयात, सध्या देव नाही
गाभारा आहे, चांदीचे मखर आहे.
सोन्याच्या सम्या आहेत, हिर्यांची झालर आहे.
त्यांचही दर्शन घ्यायला हरकत नाही.
वाजवा ती घंटा, आणि असे इकडे या
पाहीलात ना तो रिकामा गाभारा?
नाही..तस नाही, एकदा होता तो तिथे
काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा,
दरवाजे बंद करुन, बरोबर बाराला जेवायचा
दोन तास वामकुक्षी घ्यायचा
सार काही ठीक चालले होते.
रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग
पडत होते पायाशी..
दक्षिण दरवाज्याजवळ, मोटारीचे भोंगे वाजत होते
मंत्र जागर गाजत होते
रेशीम साड्या, टेरीनचे सुट समोर दुमडत होते.
बॅंकेतले हिशेब हरीणाच्या गतीने बागडत होते.
सारे काही घडत होते.. हवे तसे
पण एके दिवशी.. आमचे दुर्दैव
उत्तर दरवाज्याजवळ अडवलेला
कोणी एक भणंग महारोगी
तारस्वरात ओरडला “बाप्पाजी बाहेर या”
आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय
गाभारा रिकामा
पोलीसात वर्दी, आम्ही दिलीच आहे..
परत? कदाचित येइलही तो
पण महारोग्याच्या वस्तीत, तो राहिला असेल तर त्याला पुन्हा..
प्रवेश द्यावा की नाही, याचा विचार करावा लागेल,
आमच्या ट्रस्टींना,
पत्रव्यवहार चालु आहे.. दुसर्या मुर्तीसाठी
पण तुर्त गाभार्याचे दर्शन घ्या.
तसे म्हटले तर, गाभार्याचे महत्व अंतिम असत,
कारण गाभारा सलामत तर देव पचास.
***
असा केवळ गाभार्यात असणारा परमेश्वर कवीला नको. मात्र तो कुठेतरी असावा असा कवीला विश्वास आहे. कवीने आजवर अनेक ठिकाणी त्याचा शोध घेतला आहे. खोल दर्यांमधुन, उंच डोंगरातुन, नील रंग ल्यायलेल्या आभाळात, मिट्ट काळोख असलेल्या गुहेत, जिथे शक्य असेल तिथे शोध घेतला आहे. अखेरीस एका निवांत रात्री जेव्हा रातकीडे सुद्धा गुणगुणणे बंद करुन झोपी गेले, रात्रीने आपली मायेची चादर समग्र विश्वावर अलगद अंथरली तेव्हा अस्वस्थ असलेले कवी मन धुसर आकाशातील चमचम करणार्या नक्षत्रांशी गुज करु लागते.
मी एक रात्रि त्या नक्षत्रांना पुसले
मी एक रात्रि त्या नक्षत्रांना पुसले
“परमेश्वर नाही घोकत मन मम बसले
परि तुम्ही चिरंतन विश्वातील प्रवासी
का चरण केधवा तुम्हास त्याचे दिसले?
तो आहे किंवा नाही कुणा न लागे ठाव
प्रज्ञेची पडते जिथे पांगळी धाव
गवसे न किनारा, फिरे जरी दर्यात
शतशतकांमधुनी शिडे उभारून नाव!”
स्मित करून म्हणाल्या मला चांदण्या काही
“तो मुक्त प्रवासी फिरत सदोदित राही
उठतात तमावर त्याची पाऊलचिन्हे-
त्यांनाच पुससि तू, आहे की तो नाही!”
****
कवीचा परमेश्वरावर राग नाही. कवीला त्याचा शोध घ्यायचा आहे. पण तो परमेश्वर देवळातच आहे यावर त्याचा विश्वास नाही. केवळ शब्दांच्या निरर्थक चर्चा करुन आणि अवास्तव कपोलकल्पित स्वर्गभुमीचे चित्र रंगवून तो मिळणार नाही याची कवीला खात्री आहे. कवीला असे वाटते की परमेश्वराची प्राप्ती कदाचित कवितेमधुन होईल. आणि म्हणूनच कवी म्हणतो
अन्यथा
तत्त्वज्ञान त्याचे विवेचन करील
पण कविता त्याचा शोध लावते
कारण
तो आणि आपण
यांच्यातील संबंध
नाही मीमांसेचा,
तो आहे फक्त
काव्याचा
आणि म्हणूनच
बेबलच्या सनातन मनोर्यामधे
जेव्हा नेति – अस्तीचे वादंग
मीमांसक माजवीत असतात,
तेव्हा -
केवळ कवीसाठी
तो करतो स्वत:चा सारांश
इंद्रियसुंदर स्वरुपात
सृष्टीतून उतरतो खाली,
रहस्यदुर्गाच्या उग्र सावल्यांतून
पहारे चुकवीत बाहेर निसटणार्या
कलंदर राजपुत्रासारखा,
आणि
कवीच्या संवादी हातात घालून
रागदरीतील महत्तम स्वरासारखा
भ्रमण करतो
अस्तित्वाच्या सर्व हद्दीपर्यंत
- अन्यथा
तुकारामांचा अभंग
संभवलाच नसता
***
गुलामाला गुलामगिरीची जाणीव करुन दिली की तो बंड करतो. पण सगळीच बंडे यशस्वी होतात असे नाही. प्रत्येक बंडाला गुलामगिरीच्या बेड्या तोडता येतातच असे नाही. बंदीवासातुन सर्वांनाच मुक्त होता येते असे नाही.
बंदी
तोरणाच्या रमणीय चौकटीला
धरुनि राघू पंजरी ठेविलेला
पडे पुढती फळ रत्न-पुंज लाल
आर्त डोळे पण धुंडतात नील !
तोच नीलातुनि कुणी जातभाई
पिंजर्याशी झापून हळू येई
भाव डोळ्यातुन दाटले भरारा
आणि कैदी विसरून जाय कारा !
चोच लावुनि चोचीस क्षण बसावे
नयन नयनाला क्षणभरी मिळावे
भावनिर्भर कुजबूज करुनि काही
अन्तरींची ते दाविती व्यथाही
मालकाची चाहूल तोच लागे
जातभाई उडुनिया जात वेगे
आणि बंदी-खग क्षुब्ध होत भारी
मारि धडका धडधडा बंद दारी !
शान्त झाला अन् शेवटी शिणोनी
जाय भरुनी पण पिंजरा पिसांनी !
***
भकास पसरलेला माळ. कुठेतरी तुरळक हिरवळ असली तर असली नाहीतर दगड धोंडे, एखाद दुसर्या जुन्या पुराण्या घराचे नाहीतर देवळाचे अवशेष, पिवळसर मातकट रंगाचं मलुल गवत मधुन डोकावतं असतं. कुठेतरी वाकडी तिकडी अनेक वर्षांच्या वहिवाटीने तयार झालेली पाउलवाट. एकंदर सर्वत्र भयाण निर्जीवता व्यापून राहिलेली. उगाच एखादी टिटवी आक्रोश करते नाहीतर घार हळुच रेंगाळते...
शब्दांचे अर्थ मनात जातात. विचारांमधे आवर्त सुरु होतात. कवीला काय म्हणायचे आहे ते ज्या शब्दांत मांडले आहे ते कळते. अगदी व्यवस्थित कळते. पण हळुच एक विचार मनात येतो हे माळाचे मनोगत एखाद्या दिर्घायुष्य लाभलेल्या पण जीवनेच्छा संपून गेलेल्या मनुष्याला सुद्धा लागु होते. मनातल्या मनात कवीला आपण दाद देतो. तोच विचार मनात येतो अरे हे तर मला माझ्या कधी काळी असलेल्या निराश अवस्थेत सुद्धा असेच वाटले होते. मन मग कवीला दाद देत जाते. शब्दांचा अर्थ होतो तो लागू पडतो. त्या अर्थाचे अनेक पदर उलगडले जातात तेही तितकेच समर्पक लागू होतात.
माळाचे मनोगत
कोठे हो जीवन ? जीव हो आर्त
आग ही असह्य बाहेर आत
कोठे ना सहानुभूति
कोठे ना स्नेह ना प्रीति
कोठेहि संगत सोबत नसे
एकान्त काळिज पिंजत बसे.
वाहतो नेहमी उनाड वारा
व्यापवी धुळीने प्रदेश सारा
ओततो रवि तो आग
कठोर रात्रीचा राग
कठोर कधी त्या पाऊसधारा
कापीत कापीत जातात उरा.
वाटते बुल्बुल कोयळ यावे
मंजुळ संगीत तयांनी गावे
जीवन-जाणीव सारी
विरावी घटकाभरी
येऊन कधी ते घुबड मात्र
भीषण भासवी अधिक रात्र.
वसंत येताच उल्हास वाटे
फुलेल वेल का एखादी कोठे
पाहीन फुलांच्या हारी
वेडीच आशा ही परी
येतात जातात वसंत किती
राहते भूमि ही तशीच रिती.
आहे का खरेच नंदनवन
फुलांचे रान अन् खगांचे गान
निर्मळ जलाचा झरा
सुगंधी शीतल वारा
शल्य हे अधिक वा खुपण्याला
केलेली कोणी ही कल्पना-लीला ?
कोठे ना जिवास मायेची ओढ
नाही वा मुळीहि ध्येयाची जोड
सार्थता जीविता नाही
भकास दिशा या दाही
कशास आयुष्य देवा, इतुके
शतकामागुन जाती शतके !
****
असेच विविध पदर दिसतात आधी मौन पाळून मग दिलेल्या होकारात.
मौन
शिणलेल्या झाडापाशी
कोकिळा आली
म्हणाली, गाणं गाऊ का ?
झाड बोललं नाही
कोकिळा उडून गेली.
शिणलेल्या झाडापाशी
सुग्रण आली
म्हणाली, घरटं बांधु का ?
झाड बोललं नाही
सुग्रण निघून गेली.
शिणलेल्या झाडापाशी
चंद्रकोर आली
म्हणाली, जाळीत लपु का ?
झाड बोललं नाही
चंद्रकोर मार्गस्थ झाली.
शिणलेल्या झाडापाशी
बिजली आली
म्हणाली, मिठीत येऊ का ?
झाडाचं मौन सुटलं
अंगाअंगातुन
होकारांच तुफान उठलं.
***
कुठल्यातरी डोंगराच्या एखाद्या कोपर्यातुन उगम पावत नदी हळु हळु सागराला जाऊन मिळते. तिचा प्रवास सुरवातीला उड्या मारत, कधी वेगात कधी हळू असा चालू असतो. पुढे पुढे तीचे पात्र मोठे होते. तिच्यावर अवलंबून असलेली शेती, गावं आजुबाजुला वसलेली असतात. कूठे शहरातुन तर कुठे जंगलातुन प्रवास करत असलेली नदी तिच्या दोन्ही तीरावर आपल्या जलधारांनी जीवन बहर आणत असते. अशाच नदीतीरावर कधी कधी एक हलक्या दर्जाचे गवत उगवते. स्पर्शाने रुक्ष असलेल्या ह्या गवताला मात्र एका संस्कृतीने मानाचे स्थान दिले. यज्ञकर्मात आवश्यक असलेली एक वस्तु म्हणून हे गवत ओळखले जाऊ लागले.
कवी स्वत:च्या साहित्याची तुलना त्या गवताशी करत आहे. इतर अनेक साहित्यिक, कवी असतांना माझी ही कविता तुमच्या अंतरंगातील अग्नी क्षणमात्र फुलवेल अन्यथा हीचे प्रयोजन काही नाही असेच काहीतरी कवी सुचवत आहे.
समिधाच सख्या या
दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता
वाहते जिच्यातुनि त्याची जीवन-सरिता,
खळखळे, अडथळे, सुके, कधी फेसाळे
परि अखंड शोधे वाट समुद्राकरिता !
खडकाळ प्रान्त तो ही जेथून निघाली
पथ शोधित आली रानातून अकेली,
नच रम्य राउळे, कलापूर्ण वा घाट
तीरावर तुरळक परि अंकुरती वेली !
नव पर्णाच्या या विरल माण्डवाखाली,
होईल सावली कुणा, कुणास कहाली,
तोषेल कुणी, शापील कुणी दुर्वास,
"या जळोत समिधा-भव्य हवी वृक्षाली !"
समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा,
कोठून फुलापरि वा मकरन्द मिळावा?
जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा,
तव आंतर अग्नी क्षणभर तरि फुलवावा !
****
प्रतिक्रिया
27 Feb 2011 - 8:37 am | नगरीनिरंजन
_/\_.
27 Feb 2011 - 12:59 pm | मूकवाचक
_/\_.
27 Feb 2011 - 8:42 am | शरद
सुरेख निवेदन.
शरद
27 Feb 2011 - 8:58 am | प्रीत-मोहर
मस्त ....
27 Feb 2011 - 9:34 am | ज्ञानेश...
कुसुमाग्रजांना सादर, सप्रेम अभिवादन !
"... नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा,
तुझी दूरता त्याहूनी साहवे !"
27 Feb 2011 - 11:37 am | पैसा
कुसुमाग्रजांची प्रत्येक कविता सुंदर. बरोबरचं निरुपणही आवडलं.
1 Mar 2011 - 2:48 am | बेसनलाडू
छान लिहिलंय नाना!
(वाचक)बेसनलाडू
27 Feb 2011 - 1:19 pm | सर्वसाक्षी
कुसुमग्रजांच्या विचारधारांचा उत्तम परामर्ष
27 Feb 2011 - 2:59 pm | यशोधरा
सुरेख.
27 Feb 2011 - 6:23 pm | लवंगी
तितक्याच ताकदिच निरुपण..
28 Feb 2011 - 10:10 am | sneharani
सुरेखच...! अप्रतिम!
मस्त ! शब्दसामर्थ्य आवडले.
:)
28 Feb 2011 - 10:14 am | छोटा डॉन
फारच मस्त लेख आणि त्याहुन निवडलेल्या काव्य तुकड्यांची निवड व त्याचे निरुपण फारच सुंदर.
शब्दकळांनी लेख अक्षरशः सजलेला आहे.
ह्या सुंदर लेखाबद्दल नानासाहेबांना धन्यवाद.
- छोटा डॉन
28 Feb 2011 - 10:18 am | स्पा
--/\--
धन्यवाद
28 Feb 2011 - 9:48 pm | धमाल मुलगा
काय बोलु बुवा नानबा?
आपले तर शब्दच थिटे पडले.
1 Mar 2011 - 1:03 am | पुष्करिणी
लेख फारच छान झालाय
1 Mar 2011 - 1:33 am | प्राजु
निवडलेले काव्यतुकडे आणि त्यावरचे निरूपण...
अशक्य आहात नाना!! :)
1 Mar 2011 - 3:18 am | मेघवेडा
नानासाहेब, दंडवत स्वीकारावा! सुरेख लिहिलंय! :)
1 Mar 2011 - 5:17 am | असुर
नाना, कवितांचं सिलेक्शन अप्रतिम! त्यावरचं भाष्यदेखील सुरेख आणि वैशिष्ठ्यपूर्ण!
आणि ज्या काव्यसूर्याने या कविता लिहील्यात, त्यांच्याबद्दल काहीही बोलण्याची माझी लायकीच नाही! त्यांना शीरसाष्टांग प्रणाम!
शिणलेल्या झाडापाशी
बिजली आली
म्हणाली, मिठीत येऊ का ?
झाडाचं मौन सुटलं
अंगाअंगातुन
होकारांच तुफान उठलं.
खल्लास! शहारा आला अंगावर! कसलं खतरनाक आहे हे कडवं!
--असुर
1 Mar 2011 - 8:34 am | चित्रा
छान लेख. कवितांची निवड वेगळी आहे.
1 Mar 2011 - 7:16 pm | अवलिया
सर्व वाचक आणि प्रतिसादकांचे मनापासुन आभार ! :)
1 Mar 2011 - 8:53 pm | मनीषा
सरस्वतीची पूजा करायला मोठमोठे हारतुरेच हवेत असे नाही.
अगदी खरं ...
पण तुम्ही वाहिलेलं फुल सुद्धा खूप सुंदर आहे .
आणि निवडलेल्या कविताही अप्रतिम !
1 Mar 2011 - 9:02 pm | प्राजक्ता पवार
सुरेख !
27 Feb 2014 - 11:16 am | अनुप ढेरे
मराठी भाषा दिनानिमित्त हा एक आवडलेला लेख वर काढत आहे.