http://www.misalpav.com/node/16226 - भावड्याची खुषखबर तसेच बुलककार्ट देखील
भावड्याने अशी धमाल सुरुवातीलाच उडवल्यानंतर आमच्या त्याच्याकडून अपेक्षा चांगल्याच वाढल्या. आणि भाउमहाराजांनीही पुरेपुर अपेक्षापूर्तीचं दान आमच्या पदरात भरभरून टाकलं.
एकदा हिंदी गृहपाठासाठी निबंध लिहायचा होता. भावड्याने आयत्या वेळी कुणाचातरी निबंध उतरून काढला.
सरांकडे तो निबंध तपासण्यासाठी गेला. सरांनी निबंध तपासला. त्याच्यातल्या चुका शोधून समासात त्या लाल अक्षरात लिहिल्या.आणि सर जेव्हा अखेराकडे आले तेव्हा तो निबंध अपूर्णच होता. बहुधा भावड्याचं वेळेचं गणित बरोबर जुळलं नसावं. अपूर्ण निबंध पाहून सरांनी शेवटी भावड्याला लाल अक्षरात निबंधाची 'पूर्तता करो' अशी आज्ञा दिली.भावड्याकडे वही परत आल्यावर नेहमीच्या खाक्याप्रमाणे त्याने सरांनी शोधलेल्या चुका, शिरस्त्याप्रमाणे प्रत्येकी पाच वेळा अशा लिहून काढल्या. आणि शेवटची 'पूर्तता करो' ही आज्ञादेखील
पूर्तता करो
पूर्तता करो
पूर्तता करो
पूर्तता करो
पूर्तता करो
अशी चक्क पाच वेळा लिहून सरांकडे उलटी फिरवून त्यांनाच गृहपाठ पूर्ण करण्याचा आदेश दिला.
हिंदीतच एक पं. नेहरूंविषयी एक धडा होत.त्यात काही मुलं दिल्लीतल्या रस्त्याकडेच्या एका झाडाची जांभळं खात असतात. तर चाचाजींची गाडी जाताना पाहून ती सगळी मुलं जाभळं खाण्याचं विसरून जातात असं काहीसं एका धड्यात होतं. चाचणी परीक्षेत त्यावर 'बच्चे जामुन खाना क्यो भूल गये'? असा प्रश्न विचारला होता. भावड्याने 'बच्चे जामुन खाना भूल गये कारण बच्चोंको जामुन खाने का कटाळा(पक्षी कंटाळा) आला था' असे उत्तर देउन सरांच्या तोंडाला फेस आणला.
भावड्याची अशी मजा बर्याच वेळा चालत असे.
मराठीत वाक्प्रचारांचा अर्थ लिहायचा असे. एकदा भावड्याला अर्थ लिहिण्यासाठी वाक्प्रचार आला. 'माया पातळ होणे'. -भावड्याचं उत्तर होतं. 'कोड्याश्यात(कोड्यास-कोरड्यास,कालवण) पाणी जास्ती घालणे म्हण्जे ते समद्यांना पुरातं'. ( अर्थात -पुरेसं होतं )
इतिहासात 'महादजी शिंदे यांचे दरबारात वजन का वाढले' असं विचारलं होतं. आम्ही आमच्या अल्पमतीनुसार 'युद्ध जिंकल्याने महादजी शिंदे यांचे दरबारात वजन वाढले' असं उत्तर लिहिलं. सर्वज्ञ भाउमहाराजांचं उत्तर होतं . --भाकरी ज्यादा खाल्यानी महादजी शिंदे यांचे दरबारात वजन वाढले.
एकदा 'कुळकर्णी गावाला का गेले'? याचं उत्तर भावड्याला पेपरात काही केल्या सुचेना. शेवटी स्वतःचा वेटो वापरून भावड्याने उत्तरादाखल 'कुळकर्णी गावाला गेले' असं लिहिलं. आणी पेपर सेटरची खाशी जिरवली.
सगळ्यात कहर झाला मराठीच्या सत्र परीक्षेत. तिथं आकलन नावाचा प्रकार असे. आठ दहा ओळींचा परिच्छेद देऊन त्यावर प्रश्न विचारले जात. शेजारधर्माविषयीचा एक उतारा प्रश्नपत्रिकेत होता. एकमेकांबरोबर प्रेमाने, आदराने रहावे. त्यायोगे समाजातील साहचर्य, सद्भाव वाढीला लागतो. शेवटी सारेच जण आनंदाने, गुणागोविंद्याने राहतात. हे आकलन परीक्षार्थींना व्हावे अशी प्रश्नकर्त्यांची अपेक्षा. भाउराया ह्या तकलादू आकलनाच्या कधीच पार गेलेला. त्याचं आकलन काही वेगळंच. वयाच्या पहिल्या दशकातच भावड्याला वैश्विक आकलन झालेलं. त्यामुळं रुढ आणि मूढ उत्तरं भावड्याकडून कशी बरी यावीत?
पहिला प्रश्न होता.
-प्रेम कुणावर करावे?
आमचं उत्तर- प्रेम शेजार्यांवर,आजूबाजूच्या लोकांवर करावे.
भावड्याचं उत्तर- प्रेम शेजार्याच्या मुलीवर करावे.
दुसरा प्रश्न होता.
-एकमेकांवर प्रेम केल्याने काय होते?
आमचं उत्तर- एकमेकांवर प्रेम केल्याने समाजातील सद्भाव तसेच साहचर्य वाढते.
भावड्याचं उत्तर- एकमेकांवर प्रेम केल्याने पोरं होतात.
सरांनी जेव्हा हे वर्गात वाचून दाखवलं तेव्हा उडालेला हाहाःकार मी अजूनही विसरलेलो नाही .
प्रतिक्रिया
1 Feb 2011 - 5:59 pm | विनायक बेलापुरे
भावड्या
1 Feb 2011 - 6:24 pm | धमाल मुलगा
ह्या भावड्याचं डोकं म्हनायचं का इंटेलचा प्रोसेसर? आँ? :D
1 Feb 2011 - 8:28 pm | आदिजोशी
आम्हाला कळलं हा भावड्या कोण ते :)
1 Feb 2011 - 8:29 pm | धमाल मुलगा
अं???
1 Feb 2011 - 6:29 pm | शुचि
मस्त
1 Feb 2011 - 6:35 pm | नरेशकुमार
अल्टी,
प्रत्येकात एक भावड्या असतो बरंका !
1 Feb 2011 - 6:41 pm | आमोद शिंदे
विनोद पानचट असले तरी रंगवुन सांगायची पद्धत चांगली आहे.
1 Feb 2011 - 6:46 pm | गणेशा
छान लिहिले आहे ... आवडले ..
असे खुप सारे प्रकार आठवुन मजा आली.
मस्त होते ते दिवस ...
---
सगळ्यात मजा जेंव्हा मामाच्या गावाला ( लोणी भापकर) ला गेलो तेंव्हा मुंबई सोडुन एक जन मामाकडेच शिकायला आला होता.
तेंव्हा वर्गात शब्द सांगा असला प्रकार पेपर मध्ये चालायचा
तर मुंबईच्या पिंट्याने असे लिहिले होते की (इयत्ता ३ री)
प्रश्न : कोंबडा - कोंबडी
बैल - ?
पिंट्याचे उत्तर होते बैलीन
---
वस्तीवरची मुले भरपुर चिडवत होती त्याला ..
---------------------
सातवेत असताना मैत्र नावाचा मराठी पुस्तकात धडा होता ( बहुतेक २२ वा असेन तो)
तेथे संपुर्ण पाणावर ज च्या जागेवर झ करुन आम्ही वर्षभर आठवण काढुन काढुन हात असु तो प्रकार खरेच जबर्र्या होता.
कोणाला तो प्रकार कींवा तो धडा आठवत असेन तर नक्कीच सांगेन .. हसुन हसुन पुरेवाट नुसती
1 Feb 2011 - 6:51 pm | कच्ची कैरी
हा लेख वाचुन मला माझ्या भावाच्या बालपणाची आठवण झाली तोही असेच काहीतरी पांचट उत्तरे देत असे तसेच पांचट प्रश्नही विचारत असे.एकदा त्याने माझ्या वडीलांना प्रश्न विचारला होता -अण्णा प्रेम कसं करतात हो?त्याचे अजुन बरेच किस्से आहेत ते सांगण्यासाठी मला मोठ्ठाच लेख लिहावा लागेल.
1 Feb 2011 - 6:55 pm | गणेशा
लिहाना मग ... वाचायला उत्सुक आहोत ...
1 Feb 2011 - 6:55 pm | गणेशा
लिहाना मग ... वाचायला उत्सुक आहोत ...
1 Feb 2011 - 7:00 pm | नरेशकुमार
लिव्हा, लिव्हा, लिव्हा, लिव्हा, लिव्हा, लिव्हा, लिव्हा, लिव्हा, लिव्हा, लिव्हा, लिव्हा, लिव्हा,
2 Feb 2011 - 1:16 pm | मनराव
लिहा लिहा.......वाचायला तयारच अहोत.....
1 Feb 2011 - 10:36 pm | रेवती
मस्त, मनोरंजन झाले.
ह ह पु वा.
माझ्या बाबांचा स्वत:चा किस्सा आहे.
आत्या बाबांपेक्षा वयाने बरीच मोठी असल्याने ती बाबांचा अभ्यास घेत असे.
इतिहासाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न होता.
औरंगजेबाने शिवाजीमहाराजांना कसे वागवले? विस्ताराने उत्तर लिहा, गुण १५.
बाबांना उत्तर लिहिण्यासाठी शब्द आठवेनात म्हणून त्यांनी
वा ई ट.
एवढेच लिहिले.
घरी आल्यावर आत्याने चांगली हजेरी घेतली.
"अरे निदान औरंगजेबाने शिवाजीमहाराजांना वाईट वागवले." असे पूर्ण वाक्य तरी लिहायचेस रे. ती अजिजीनं म्हणत होती.
2 Feb 2011 - 12:58 pm | टारझन
=)) = )) =)) =)) =))
भावड्या आणि रेवतीचे बाबा =)) __/\__
2 Feb 2011 - 5:05 pm | नरेशकुमार
चुकिचे उत्तर दिले नव्हते. त्यात काय एवढे हसायचे.
2 Feb 2011 - 12:56 pm | चिरोटा
भूगोलाच्या पेपरात प्रश्न होता .गाळलेले शब्द भरा.
चीनची भिंत --- पासून बनवली आहे. एकाने बांबुपासुन लिहिले होते.
2 Feb 2011 - 1:18 pm | मनराव
:O, त्याला पोकळ बांबू चे फटके मिळाले असतील....... :D
2 Feb 2011 - 1:20 pm | मनराव
भावड्याची पुढची प्रगती वाचण्यास उत्सुक्त...........
2 Feb 2011 - 1:31 pm | डावखुरा
भीडस्त तुम्ही मास्तर आहेत का हो?
बाकी लेख जम्याच येकदम...
2 Feb 2011 - 2:53 pm | विकाल
आमच सन्ज्या पन असलच बेन..
रात्री झाडाखाली का झोपु नये..? शास्त्रीय कारणे द्या.
सन्ज्या:" रातच्याला आपन घोरतू...तवा त्वान्ड कवा कवा उघड रात...झाडावर कावळ असत्यात...ती कवाबी हागू शकत्यात...म्हणताना....!"
वर्ग तर वेडा झालाच...सन्ज्याची पण लाल केली शिन्दे गुर्जीनी...!
2 Feb 2011 - 3:43 pm | स्वैर परी
ह ह पु वा! ऑफिसातले लोक वाकुन वाकुन पाहत आहेत, इतक्या फिदीफिदी कोण हसतय ते!
भावड्या एकदम जबरी!
3 Feb 2011 - 4:08 pm | धमाल मुलगा
आँ?
तुम्ही काय डेस्काखाली बसुन हसताय काय? :D
2 Feb 2011 - 4:37 pm | वपाडाव
खुर्चीतून पडायची वेळ आलेली माझ्यावर....
अप्रतिम आहे हा भावड्या
2 Feb 2011 - 8:50 pm | स्मिता.
पूर्वसूचना: हा किस्सा माझ्या शाळेत न शिकलेल्यांना विनोदी वाटेलच असे नाही.
तिसरीच्या एका पेपरात प्रश्न आला की क्रांतिकारी संघटनेच्या अध्यक्षांचं नाव काय. माझ्या भावाच्या वर्गातल्या एका पोराने 'बच्चुभाई लाठी' असेच उत्तर लिहिले होते... त्या शाळेच्या मॅनेजमेंटच्या अध्यक्षांचं नाव होतं बच्चुभाई लाठी!!
3 Feb 2011 - 1:51 pm | वपाडाव
पश्चिम सूचना : आपल्या विनोदावर आम्हाला खूप हसू आलेलं आहे...
अवांतर : कदाचित आपल्याला माहित नसेल पण त्याच इसमाने एखाद्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केलेली असेल....
आणी ज्याने उत्तर लिहिलंय तो त्या संघटनेचा सदस्य असेल...