अनस्टॉपेबल - नक्की बघा!

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
28 Nov 2010 - 1:31 am

'ब्रेक के बाद' ची ब्याद संपल्यावर आम्ही तडक अलकाला साडेनऊचा 'अनस्टॉपेबल'चा शो बघायला गेलो. साडेसहाचा 'ब्रेक के बाद' साधारण सव्वानऊपर्यंत संपून पंधरा मिनिटात अलकाला पोहोचून 'अनस्टॉपेबल' कसा गाठणार या विवंचनेत आम्ही 'ब्रेक के बाद' बघण्याआधी होतो; पण 'ब्रेक के बाद' चा जीव फारच छोटा निघाला. आठ वाजून वीस मिनिटांनी 'ब्रेक के बाद' सुदैवाने गतप्राण झाला आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. जेमतेम शंभर मिनिटांच्या 'ब्रेक के बाद'ने आमचा अक्षरशः अंत पाहिला होता. एका छोट्या डासाने मलेरिया गिफ्ट करावा तसा 'ब्रेक के बाद' आम्हाला कंटाळेरिया देऊन गेला होता. बराच वेळ हातात होता. मग आरामशीर पेट्रोल भरून, भुर्जी-पाव, मिल्कशेकचा आस्वाद घेऊन आम्ही नऊ वाजून पंधरा मिनिटांनी अलकाला पोहोचलो. बाल्कनीचे तिकिट फक्त पंचेचाळीस रुपयांना असल्याने अलकाला तोबा गर्दी होती. कसेबसे तिकिट मिळाल्यावर आम्ही स्थानापन्न झालो.

'अनस्टॉपेबल'ने पहिल्या मिनिटातच मूळ विषयाला हात घातला. एक नवशिका ट्रेन कंडक्टर एका लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडीला घेऊन आपला पहिला प्रवास करणार असतो. इंजिन ड्रायव्हर (डेंझेल वॉशिंग्टन) ला भेटून तो प्रवासाचा बेत सांगतो आणि थोड्याच वेळात ते दोघे प्रवास सुरु करतात. त्याआधी एक इंजिन ड्रायव्हर एका जबरदस्त वजनदार ट्रेनला रिकाम्या ट्रॅकवर नेण्याच्या प्रयत्नात ट्रेनमधून उतरतो आणि त्यातच ती ट्रेन वेग पकडून धावायला लागते. नंतरचा थरार म्हणजे 'अनस्टॉपेबल'. ती ट्रेन थांबते का, तिला कोण ताब्यात घेतं, कसं घेतं, किती माणसे मरतात, पुढे काय काय आणि कसं कसं घडतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मोठ्या पडद्यावरच पाहणे श्रेयस्कर!

पेनसिल्वेनिया राज्यातले अवाढव्य यार्डस, रुळांचे जाळे, लाखो टन वजनाच्या ट्रेन्स, ट्रेन्सचे चुकलेले, बदलेले ट्रॅक्स आणि सगळे सुरळीत करण्यासाठी चाललेली ट्रेन कंपनीची धडपड हे सगळे चित्रण अगदी श्वास रोखून धरायला लावणारे आहे. ट्रेन कंपनीला दिसणारा शंभर मिलियन डॉलर्सचा तोटा, गडगडणारे शेअर्स इत्यादी व्यावसायिक दृष्टीकोनातून ट्रेन कंपनीच्या मालकाने घेतलेला अमानवी निर्णय, त्याला आव्हान देणारा इंजिन ड्रायव्हर, सगळ्यांची होणारी घालमेल हे सगळे पैलू इतक्या सुंदर पद्धतीने दाखविण्यात आलेले आहेत की या तांत्रिक कौशल्यावर आधारलेल्या चित्रपटाचा मानवी भावनांच्या तेजाने झळाळणारा चेहरा अगदी ठळकपणे समोर येतो.

अठ्ठावीस वर्षे अनुभव असलेला आणि सक्तीच्या निवृत्तीची ऑर्डर मिळालेला इंजिन ड्रायव्हर आणि नवशिका ट्रेन कंडक्टर यांच्यातला सुरुवातीचा वाद, गैरसमज, त्यांचा एकमेकांच्या आयुष्यातली हृदयाचा ठाव घेणारी कहाणी ऐकण्याचा प्रयत्न आणि संकटकाळी एकमेकांसाठी जीव देण्याची तयारी करायला लावणारे त्यांच्यातले बाप-मुलासारखे निखळ नाते इत्यादी सगळे कंगोरे दिग्दर्शकाने कुठेही मेलोड्रॅमेटीक न होता खुबीने चितारले आहेत.

तांत्रिक दृष्ट्या 'अनस्टॉपेबल' खूपच सरस आहे. वेगवान ट्रेन्सचे प्रसंग, रुळावरून जीवघेण्या वेगाने धावणार्‍या ट्रेन्स आणि कार्स, रुळांमध्ये अडकलेला ट्रक, ट्रेनच्या जबरदस्त धडकेने होणारा त्या ट्रकचा चुराडा, धावणार्‍या ट्रेन्सचा मागोवा घेणारा हेलिकॉप्टर्सचा ताफा इत्यादी प्रसंग तर अगदी आपल्या डोळ्यासमोर घडत आहेत इतक्या ताकदीने उभे केले आहेत.

वेग, जडत्व, त्वरण, बल, घर्षण, बँकींग, वेगाचे वळणाच्या कोनाशी असलेले नाते इत्यादी भौतिकशास्त्रातले नियम अभ्यासून आणि त्यानुसार काहीतरी वेगळे डोके लढवून साधलेला निशाणा ही 'अनस्टॉपेबल'ची शास्त्रीय बाजू अतिशय समर्पक रीतीने रंगवण्यात दिग्दर्शक कमालीचा यशस्वी झालेला आहे.

अभिनयाच्या बाबतीत डेंझेल बाजी मारतो. नवशिका ट्रेन कंडक्टर (क्रिस पायन) ठीक-ठाक. ट्रेन कंपनीचा धूर्त अधिकारी मस्तच. यार्ड मास्टरची भूमिका करणारी अभिनेत्री आणि इतर स्टाफ हृदयाचा ठोका चुकवायला लावणारी घालमेल दाखविण्यात कमालीचे यशस्वी ठरले आहेत.

पटकथा अत्यंत वेगवान आणि खिळवून ठेवणारी असून दिग्दर्शनदेखील तितकेच ताकदीचे आहे. चित्रपट एक सेकंददेखील कंटाळवाणा किंवा संथ होत नाही हेच चित्रपटाचे यश आहे. जेमतेम ९५-१०० मिनिटात इतकी अ‍ॅक्शन ठासून भरणे आणि ती प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होणे हे चांगल्या चित्रपटाचे मुख्य लक्षण आहे.

'अनस्टॉपेबल' प्रेक्षकांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करतो. चित्रपट बघण्याचा आनंद लुटायचा असेल तर रात्रीचा खेळ बघा आणि दुसर्‍या दिवशी सुटी असेल असे बघा.

'अनस्टॉपेबल' बघा, आवडेल तुम्हाला. नक्कीच!

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

सद्दाम हुसैन's picture

28 Nov 2010 - 1:59 am | सद्दाम हुसैन

२००३ पासुन मी ह्या सिनेमाची वाट पहात आहे. बर्‍याच संघर्षानंतर हा चित्रपट रिलिज होऊ शकला आहे. उत्तम सिनेमा. हा पण उद्याच पाहाणार

आत्मशून्य's picture

28 Nov 2010 - 12:29 pm | आत्मशून्य

तूम्हाला बहूतेक Wesley Snipes चा अनस्टॉपेबल तर नाही ना बघायचा ? कारण हा Denzel Washington चा आहे.

रेवती's picture

28 Nov 2010 - 6:20 am | रेवती

अरे वा!!
शेवटी उशिराने का होइना हाती करमणूक लागली म्हणायची.
वेळ मिळताच पाहण्याच्या यादीत हे नाव टाकले आहे.

मदनबाण's picture

28 Nov 2010 - 8:18 am | मदनबाण

पहायलाच हवा...

बबलु's picture

28 Nov 2010 - 3:52 pm | बबलु

छान परिक्षण.

असाच "Runaway Train" नावचा अप्रतिम चित्रपट नक्की पहा. १९८५ मध्ये आला होता.
अप्रतिम म्हणजे एकदम अप्रतिम आहे तो. मी मागच्याच महिन्यात पाहिला.

A must See.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Nov 2010 - 11:55 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

दोन्ही चित्रपटांचं परीक्षण आवडलं आणि सुरूवातीचे काही पंचेसही! शक्य असल्यास मोठ्या पडद्यावरच हा चित्रपट पहाते.

धमाल मुलगा's picture

29 Nov 2010 - 1:29 pm | धमाल मुलगा

ह्या विकांताला दोस्त मंडळी गोळा करुन 'चलो अलका' मोर्चा काढलाच पाहिजे आता :)

धन्यवाद समीरसूर.

छान परिक्षण . नक्की बघणार हा सिनेमा. धन्यवाद.