युगलगीतः तू माझी हो काठी, मी तुझी काठी

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
16 Oct 2010 - 7:29 pm

युगलगीतः तू माझी हो काठी, मी तुझी काठी

आजोबा, आजी (दोघे):
तू माझी होशील काठी, मी तुझी काठी
एकमेकां आधार होवू सरत्या आयुष्यासाठी ||धृ||

आजोबा:
हलते हे जड डोके, डुगडुगते मान
कवळी कुठे चालली, नाही कसले भान

आजी:
केसांच्या बटा झाल्या, त्यांची नाही वेणी
स्वार्थी जगात फिकीर करावी कुणी?
चिंता नको, आता जगायचे एकमेकांसाठी

आजोबा, आजी (दोघे):
तू माझी होशील काठी मी तुझी काठी ||१||

आजोबा:
किती खस्ता खाल्या अन किती कष्ट केले
उमेदीच्या वेळी कामाला झोकून दिले

आजी:
जुने दिवस आणतात माझ्या डोळा पाणी
आपलेच दाम खोटे, उगा फसवते का कुणी?
अहो, शरीर थकल्यावर आशा मनाची ठरते मोठी

आजोबा, आजी (दोघे):
तू माझी होशील काठी मी तुझी काठी ||२||

आजोबा:
किती काळजी करावी किती वहाव्या चिंता
म्हातारपणी शरीराचे भोग आले आता

आजी:
तेच सांगणे, तेच बोलणे का उगा करता
साठी आली असता शरीरासवे का वागता
चिंता सोडून शरण जावूया जगजेठी

आजोबा, आजी (दोघे):
तू माझी होशील काठी मी तुझी काठी ||३||

आजोबा, आजी (दोघे):
तू माझी होशील काठी, मी तुझी काठी
एकमेकां आधार होवू सरत्या आयुष्यासाठी ||धृ||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१६/१०/२०१०

करुणशांतरसकविताजीवनमान

प्रतिक्रिया

तर्री's picture

16 Oct 2010 - 11:01 pm | तर्री

पाशाणभेद,
ह्या विषयावर ह्याप्रकारचे काव्य मराठी मध्ये मी तरी वाचलेले नाही . आजोबा आजी चे युगुल गीत ! सही .
आवडले.

अथांग's picture

17 Oct 2010 - 1:33 am | अथांग

सहमत !