हा खरे म्हणजे त्या दशकातील सर्वात सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. मलाही लहानपणी जेव्हा पाहिला तेव्हा खूप आवडला होता. गाणी चांगली आहेत, धर्मेन्द्राचे काम मस्त आहे. टिपिकल मनमोहन देसाई फॉर्म्युला आहे.
त्यामुळे यातील अचाट आणि अतर्क्यपणा मी वेगळ्या नजरेने बघतो. तेव्हा हे सगळे केवढे आवडायचे याची आता गंमत वाटते. सगळ्या चित्रपटाबद्दल लिहायचे झाले तर एक ग्रंथ होईल. तेव्हा थोडक्यात जमते का बघू :)
ही कथा कोणत्या काळात आणि कोणत्या प्रदेशात घडते माहीत नाही. एक मोठे राज्य असते. जीवन त्यात कोण असतो माहीत नाही पण त्याची बहिण मात्र राजकन्या असते. इंद्राणी मुखर्जी ती राजकन्या म्हणजे केवढा जुना काळ असणार! जीवनला राजगुरू असे सांगतो की तुझा 'बडा भांजा' तुला मारणार आहे. त्यामुळे तो आपल्या बहिणीला मारण्याची योजना आखतो. एकदा ती शिकारीला गेलेली असते. तर तिला पाण्याजवळ एक वाघ दिसतो. ती एक बाण मारते. तो बाण त्याला जेमतेम डार्ट बोर्ड वरचे डार्ट जेवढे चिकटतात तेवढाच लागतो. पण तो लगेच आडवा होतो. आणि दोन मिनीटात पायच काय पण शेपूट सुद्धा हवेत तरंगेल एवढा ताठ होउन जातो. ही तेथे जाईपर्यंत तिच्यावर हल्ला होतो. पण प्राण तिला वाचवतो. प्राण हा एक शिकारी असतो, त्याच्याकडे एक बाझ (ससाणा?) असतो, त्याने त्याला खबर दिलेली असते राजकन्या धोक्यात असल्याची. तो नक्की कोणता पक्षी आहे हे माहीत नसल्याने आपण त्याला 'शेरू' म्हणू, ते त्याचे नाव असते.
आता राजकन्या त्याच्याबरोबर त्याच्या घरी येते. हा आधीच तिच्या प्रेमात पडलेला असतो आणि तिचा एक पुतळा बनवत असतो. मग तुला काय इनाम पाहिजे विचारल्यावर आणि 'जो मांगो वोह देंगे' वगैरे झाल्यावर तो त्या पुतळ्यावरचे कापड काढून तिला दाखवतो. तो पुतळा म्हणे तिचा असतो. वास्तविक तो 'शेरू' सोडून कोणाचाही म्हणून खपला असता. राजकन्येला लगेच लक्षात येते की हा तिलाच मागणी घालतो आहे. मग ते तेथेच लग्न करायचे ठरवतात.
त्यानंतर चित्रपटाला हीरो देण्यासाठी आवश्यक असणारी गोष्ट ते करत असताना एक वाघ तेथे येउन खिडकीची काच फोडून जातो. बहुधा वॉर्निंग द्यायला आला होता. प्राण तिला सांगतो की ही शेरनी आहे आणि त्या (मारलेल्या) वाघाचा बदला घ्यायला आलेली होती. ती पुन्हा येइल म्हणून आधीच तिला मारायला तो अंगावर एक तपकिरी शाल घेउन बाहेर पडतो. तेवढ्यात ती वाघीण एका वाटेत आलेल्या आदिवासीला मारून जाते. ते पाहून प्राण आपली शाल त्याच्या अंगावर टाकतो. मग तो आणि वाघीण यांची जोरदार लढाई होते. त्यात त्या वाघिणीचे इतके हाल केलेत की तेव्हापासून मनमोहन देसाईचा पिक्चर म्हंटला की वाघ दोन्ही हात जोडून उभे राहतात (आठवा 'मर्द' मधला तो नम्र वाघ). मग थोड्या झटापटीनंतर प्राण व वाघीण दोघे कड्यावरून खाली पडतात.
इकडे प्राण ला शोधायला ई.मु. बाहेर पडते आणि शाल घातलेला तो माणूस पाहून तिला वाटते की प्राणच मेला. हातातील तलवारीने जरा शाल इकडेतिकडे करून खात्री करणे वगैरे काही नाही. डायरेक्ट निष्कर्ष! आणि ती एखाद्या दगडाच्या पुतळ्यासारखी निर्वीकार होते. स्वयंवराला तिला तशी पाहून आलेले राजे निघून जातात. फक्त प्रदीप कुमार उरतो. त्याला 'पत्थर जैसी' वधू अगदी अनुरूप वाटेल यात आश्चर्य काय!
मग लग्नानंतर ती त्याला सर्व सांगते. येथे आपण नीट लक्ष दिले नाही तर "जब आपकी शादी हुई तब आप होशो-हवास मे नही थी" सारखे gems निसटतात. तेवढ्यात तिला चक्कर येते त्यामुळे ती गरोदर आहे हे निष्पन्न होते. तिचा मुलगा आपल्या राज्याचा वारस होईल हे प्रदीप कुमार तिला सांगतो. नंतर जीवन तेथे येतो. त्याची बायकोही गरोदर असते.
दोघी एकाच वेळेला मुलांना जन्म देतात. आता खरी मजा चालू होते. बाळ क्र. १ म्हणजे जीवन च्या बायकोचे. त्याला तो पाळण्यात ठेवतो तोच ई.मु. ला ही बाळ झाल्याचे त्याला कळते. तिची दाई त्याला शेजारी पाळण्यात ठेवण्याच्या ऐवजी सहज पळवून नेता येण्यासारख्या एका ठिकाणी ठेवते व ई.मु. ला जुळे होत असल्याचे कळल्याने आत जाते. तेथे जीवन येतो व बाळ क्र. २ ला राजवाड्यावरून खाली टाकून देतो. पण 'शेरू' त्याला वरच्यावर कॅच करतो. वास्तविक त्याने झेलला नसता तरी त्या बाळाला घाबरायचे काहीच कारण नव्हते कारण त्याला शक्यतो दुसर्या धर्माच्या एखाद्या माणसाने आपोआप झेलला असताच- एका स्लिप च्या हातातून उडालेला चेंडू कधीकधी दुसर्या स्लिप मधला फिल्डर पकडतो तसा. मग बाळ क्र. ३ त्याच जागी आणून ठेवले जाते. ते जीवन पळवतो आणि आपले बाळ (क्र. १) तेथे आणून ठेवतो. पण हे न आवडल्याने त्याची बायको रात्री परत अदलाबदल करते. दरम्यान बाळ क्र. २ ला 'शेरू' एका लोहाराच्या घरी आणून ठेवतो.
येथे बाळ क्र. १, २ आणि ३ हे नंबर दिले कारण नाहीतर आपल्यालाच काय खुद्द रणजीत, धर्मेन्द्र आणि जीतेन्द्र ला सुद्धा मोठे झाल्यावर आपण यातले नक्की कोणते बाळ होतो हे आठवणार नाही.
'शेरू' त्या लोहाराच्या घरी आणतो कारण तेथे प्राण बेशुद्ध अवस्थेत पडलेला असतो. लोहार व त्याच्या बायकोला कळते की नऊ महिने प्राणची सेवा केल्यामुळे त्यांना हे बाळ मिळाले. त्यामुळे ते त्याचा सांभाळ करायचे ठरवतात. तेवढ्यात प्राण शुद्धीवर येतो. आणि आश्चर्य म्हणजे ती आधी त्या आदिवासीच्या अंगावर टाकलेली शाल - ज्यामुळे तो मेला हे ई.मु. समजली- ती येथे परत त्याच्या अंगावर असते!
मग त्या लोहाराचा मुलगा दगड फोडताना दाखवला आहे. त्याच्या अंगात चकचकीत चामड्याचा काळ्या रंगाचा आणि लोखंडी खिळे लावलेला ड्रेस असतो - आगीजवळ घालण्यास अगदी योग्य! तो मुलगा एका घावात तो दगड फोडतो आणि एकदम मोठा होतो. त्याचा तो ड्रेस ही त्याच्याबरोबर मोठा होतो. हा धरम. तिकडे डबल अदलाबदल झाल्याने जीतेन्द्र व्हायचा चान्स हुकलेला रणजीत जीवन चा मुलगा आणि जितेन्द्र राजपुत्र.
मग धर्मेन्द्रला झीनत च्या सैनिकांनी बंदी बनवलेले असताना जितेन्द्रने बंजारा लोकांबरोबर गाणे म्हणून नाचणे, नंतर त्या पिंजर्याभोवती धूर करून धरम ला त्यातून काढून वरती झीनत च्या शेजारी बसलेल्या सुजीत कुमार ला त्यात बांधणे वगैरे चमत्कार घडतात. यांचे घोडे वेव्हलेन्थ वरून आपापल्या मालकाची शिटी ओळखून कोठूनही धावत येतात. धर्मेन्द्र राजकन्या झीनत ला तर जीतेन्द्र बंजार्यांच्या कबिल्यातील नीतू सिंग ला पटवतो. झीनत तर आखडू राजकन्याच असते, पण नीतू सिंग सुद्धा फारशी 'सेन्सिटिव' नसावी. कारण आंघोळ करताना आपल्या पाठीवर नेहमीच्या मैत्रिणी ऐवजी जीतेन्द्र हात फिरवतोय हे तिला कळत नाही. मग या सगळ्यांनी नाकारलेले मंगेतर, झीनत चा भाऊ देव कुमार, जीवन, रणजीत वगैरे फौज एकत्र होते व त्यांच्या उद्योगांमुळे धरम व जीतेन्द्र यांच्यात वितुष्ट येते. शेवटी दोघांची मारामारी चाललेली असताना ते भाऊ आहेत हे लक्षात येते.
मग क्लायमॅक्स चालू होतो. इतका वेळ सर्व जमिनीवर चाललेले असताना शेवटचे युद्ध मात्र तीन जहाजांवर होते. एक हीरोंच्या साईडचे, एक जीवन वगैरेंचे आणि एक सुजीत कुमार आणि कं चे. पण हे फक्त एक मिनीट टिकते. कारण नंतर दर मिनीटाला कोणीतरी दातात तलवार धरून पाण्यात उडी मारून दुसर्या जहाजावर जात असतो. नंतर इतका गोंधळ होतो की मला वाटले यांनी दोन मिनीटे ब्रेक घेउन कोण कोणत्या जहाजावर आहे याची खात्री करून मग युद्ध चालू करावे.
शेवटी ई.मु. किनार्यावर येते, तिच्या मागोमाग जीवन चाकू घेउन येतो, तो तिला मारणार एवढ्यात 'शेरू' मधे येतो आणि तो चाकू जीवन च्या हातातून उडून खडकावर वरती पाते उभे राहील असा सोयीस्कर पडतो. मग उपस्थित कोणाच्या तरी एका फाईट ने जीवन त्यावर पडतो आणि 'चक्कू खरबुजे पे या खरबुजा चक्कू पे...' उक्तीनुसार मरतो.
मात्र या चित्रपटाने बर्याच गोष्टी सिद्ध होतात. राजे महाराजे बग्गीची चाके निखळवण्यासाठी पान्हे वापरत असत. मला कॉस्च्युम मधले फारसे कळत नाही पण इतरत्र वाचलेल्या माहितीनुसार वेगवेगळ्या देशातील आणि वेगवेगळ्या काळातील कपडे भारतातील राजे, राण्या वगैरे एकाच काळी वापरत होते हे यातून सिद्ध होते. प्राण ई.मु. ला सुरक्षित आणून सोडतो आणि मग सूर्यास्ताकडे घोड्यावरून जातो हे पाहून rides into sunset हे इंग्रजी वचन सुद्धा आपल्याकडूनच आले हे उघड होते. जगात सात आश्चर्ये आहेत हे त्यावेळी सर्वांना माहीत होते हे एकवेळ समजू शकते, पण गालिब चे शेर ही आपल्याकडे आधीपासूनच माहीत होते हे 'इश्क़ और खुशबू छुपाये नही छुपते..' या ओळींतून सिद्ध होते.
यातील काही फोटो व इतर वर्णन तुम्हाला या साईटवर मिळेल
प्रतिक्रिया
30 Sep 2010 - 10:27 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
आजचा दिवस चांगलाच जाणार!
अवांतरः या पिच्चरची सुरूवात मी बघितली आहे. I know what are you talking about! :-D
30 Sep 2010 - 8:51 pm | संदीप चित्रे
>> त्याच्या अंगात चकचकीत चामड्याचा काळ्या रंगाचा आणि लोखंडी खिळे लावलेला ड्रेस असतो - आगीजवळ घालण्यास अगदी योग्य!
नेहमीसारखी फार एन्ड ष्टाईल फटकेबाजी !
आता पुन्हा एकदा 'धरम वीर' बघणेकोच होना !
30 Sep 2010 - 10:41 am | अमित.कुलकर्णी
>लोखंडी खिळे लावलेला ड्रेस असतो - आगीजवळ घालण्यास अगदी योग्य!
>त्याचा तो ड्रेस ही त्याच्याबरोबर मोठा होतो.
:))
नेहमीप्रमाणेच धमाल!!
(चित्रपटात प्राणसाहेब असले की मनोरंजनाची खात्रीच असते. "डॉन"मधे त्यांना तिजोरी लुटायची ऑफर दिल्यावरचे "कोई चान्स नहीं" हे बाणेदार उत्तर किंवा "दरवाजा खुला ही रखना संत्री" हे तुरुंगाच्या संत्र्याला उद्देशून बोललेले वाक्य)
30 Sep 2010 - 11:19 am | राजेश घासकडवी
एकापेक्षा एक जबरदस्त. पण धरमवीरमध्ये जी पैसा वसूल व्हॅल्यू आहे ती फार थोड्या पिक्चरमध्ये आहे...
1 Oct 2010 - 3:30 pm | प्रदीप
हा पिक्चर मी लागला होता तेव्हा सलग तीन वेळा पाहिला. झीनत अमान ('एक बार जो कह दिया, कह दिया' असे मग्रूरीने सांगणारी राजकन्या), स्कर्टसारखे काहीतरी घालून 'ओ मेरी मेहबूबा' म्हणत झीनतच्या 'डोलीमागे' जाणारा धर्मेंद्र , त्या गाण्याचे भन्नाट चित्रीकरण, सुंदर संगीत, प्राणचा सहज अभिनय अगदी डोके घरी ठेऊन पहावयास जावे असा सुंदर चित्रपट. अगदी पैसा वस्सूल्ल.
धर्मेंद्रला विनोदी भूमिकांचे सुंदर अंग होते (धरमवीर, शोले, चुपके चुपके)
30 Sep 2010 - 11:21 am | यशोधरा
सह्ही लिहिलं आहेस फारेंड! =))
30 Sep 2010 - 11:22 am | अस्मी
ह ह पु वा
अफलातून :)
30 Sep 2010 - 11:35 am | नगरीनिरंजन
बैलाचा डोळा ( बुल्स आय) भेदणारे परीक्षण!
>>त्याला 'पत्थर जैसी' वधू अगदी अनुरूप वाटेल यात आश्चर्य काय!
>> त्याचा तो ड्रेसही त्याच्याबरोबर मोठा होतो
>>जब आपकी शादी हुई तब आप होशो-हवास मे नही थी
>>नाहीतर आपल्यालाच काय खुद्द रणजीत, धर्मेन्द्र आणि जीतेन्द्र ला सुद्धा मोठे झाल्यावर आपण यातले नक्की कोणते बाळ होतो हे आठवणार नाही.
एक से एक हास्य फटाके! जियो!
लहानपणी हा पिक्चर भलताच आवडला होता मला. पैसा वसूल व्हॅल्यूबाबत घासकडवींशी सहमत. खर्या अर्थाने करमणूकप्रधान चित्रपट!
30 Sep 2010 - 11:35 am | वेताळ
मस्तच...... हा पिक्चर मी अजुन ही बघितला नाही.
30 Sep 2010 - 11:51 am | नेत्रेश
पण मग यातला धरमवीर कोण?
30 Sep 2010 - 11:53 am | मस्त कलंदर
नांव पाहताच पहिल्यांदा हाच लेख उघडला. काय एकसे बढकर फट़के मारलेत!! अदितीने आणि मधुमतीने वरती त्यातले बरेच लिहिलेही आहेत.
अवांतरः नक्की कोणता पिक्चर ते आता आठवत नाही, पण बहुधा धरम-वीरच असावा. त्यात कुणाच्यातरी खुनाचा बदला घेतल्याशिवाय धर्मेंद्र मेलेल्याच्या 'खून से सना हुआ' ड्रेस बदलणार नसतो. त्याने असे म्हणताच मी पट्कन ईईईईईईईईईईई म्हणून घेतले होते आणि बाकी ऑडिअन्सला दोनेक क्षणानंतर त्यातली गंमत कळाली. नंतर त्याला बदला घ्यायला चांगली १५-२० मिनिटे प(क्षी: चित्रपटातला अंदाजे महिनाभर) लागली. आणि तेवढा वेळ तो तेच कपडे अंगावर वागवत होता. :)
30 Sep 2010 - 12:03 pm | Pain
येथे बाळ क्र. १, २ आणि ३ हे नंबर दिले कारण नाहीतर आपल्यालाच काय खुद्द रणजीत, धर्मेन्द्र आणि जीतेन्द्र ला सुद्धा मोठे झाल्यावर आपण यातले नक्की कोणते बाळ होतो हे आठवणार नाही.
हाहाहा :D
परिक्षण फार आवडले..अजून लिहा
30 Sep 2010 - 12:18 pm | सुहास..
येथे बाळ क्र. १, २ आणि ३ हे नंबर दिले कारण नाहीतर आपल्यालाच काय खुद्द रणजीत, धर्मेन्द्र आणि जीतेन्द्र ला सुद्धा मोठे झाल्यावर आपण यातले नक्की कोणते बाळ होतो हे आठवणार नाही. >>>
हा हा हा
खरय !!खरय !!
पण धरम आणी झिनतची जोडी मस्त दिसते पिख्चरमदी..
नितु सिंग पेक्षा मातीतली ढेकळं बरी असेच म्हनावे लागेल.जितेद्रंही काही मोठा तीर मारत नाही (धरमवीर ची फायटिंग चालु असताना हातात दांडपट्टा,आपण, ओलाणीवर जसे घुतलेले कपडे टाकतो,त्या स्टायलीत धरलेला पाहुन लई जाम हसलो.)
प्राण तर काय प्रत्येक पिक्चरात एंन्टरटेन करत असतो(या चित्रपटात हातात समुराई,खांद्यावर शेरु,अंगात व्ही-शेप शालवजा शर्ट आणी ञतिक-धुम हेयर कट ..कै च्या कै केलाय प्राणला .)
प्रदीपकुमार नावाच्या अभिनेत्याईतका(अभिनेता म्हणाव की नाही हाही एक प्रश्न आहे.) मख्ख चेहरा मी भुतलावर बघीतला नाही.
सुजीतकुमार ? तो कबिल्यातला नेता ? आणी होउ घातलेला नेता ? काय एक-एक पात्रे घेतलीत.
हा चित्रपटाची एक बाजु म्हणजे संगीत ..
त्यातल्या त्यात धरमच गाण ओ मेरी महेबुबा, तुझे जाना है तो जा ...मस्त वाटत एकायला...
डोकं बाजुला ठेवुन बघीतला तर दोन-अडीज तासाची मस्त करमणुक आहे पिक्चर..
30 Sep 2010 - 12:47 pm | विजुभाऊ
कारण आंघोळ करताना आपल्या पाठीवर नेहमीच्या मैत्रिणी ऐवजी जीतेन्द्र हात फिरवतोय हे तिला कळत नाही
मला नेहमी एक आश्चर्य वाटते की आपणा सर्वसामान्याना आजही सहजरीत्या उपलब्ध नसणारी टब बाथची अंघोळ बंजार्यांच्या टेन्ट्स मध्ये कशी काय उपलब्ध होऊ शकते.
30 Sep 2010 - 2:08 pm | मेघवेडा
आयायायायगं!
नेहमीप्रमाणे चौफेर फटकेबाजी! जोरदार!! मला तो वाघाचा परिच्छेद सर्वात जास्त आवडला! लै लै भारी!
30 Sep 2010 - 3:46 pm | योगी९००
फारएन्ड,
तुम्ही लिहीलेले परिक्षण हातात घेऊन चित्रपट पहायला हवा असे वाटले.. माझे आयूष्य वाढेल..किंवा हास्याच्या अतिरेकाने heart attack येईल असे वाटते.
बाय दे वे आ़ज गाडी मनमोहन देसाई यांच्यावर घसरलेली दिसते..खुप मजा येईल त्यांचे जर इतर विचित्रपट असेच परिक्षले तर.. (गं. ज.स, तुफान, अ.अ.अॅ, कुली)..बाकी सुभाष घईंना अर्धवटच मारलेत..अजून त्यांचे बरेच चित्रपट बाकी होते.. (रामलखन, खलनायक, ताल,त्रिमूर्ती)
30 Sep 2010 - 7:17 pm | विजुभाऊ
गं ज स गंगा जमुना सरस्वती यावर जर काही लिहायचे झाले तर अगोदर तो जयाप्रदा बर्फाच्या नदीत पडलेली असते. अमिताभ तीला वाचवतो. त्या प्रसंगामागचे लॉजीक कोणी उलगडून सांगेल का?
....अज्ञानी विजुभाऊ
30 Sep 2010 - 3:47 pm | स्वाती२
नेहमीप्रमाणेच लै भारी!
30 Sep 2010 - 4:39 pm | सविता
30 Sep 2010 - 6:23 pm | मुक्तसुनीत
या लेखाच्या हास्यकल्लोळात मी वाहून गेलो आहे. यापुढे मी फारएंड यांना कायमचा शरण आहे.
30 Sep 2010 - 7:04 pm | बिपिन कार्यकर्ते
खल्लास!!!!!!!!!
सिनेमाला हिरो द्यायचं प्रकरण तर लै भारी!!!!!!!!!!!!
30 Sep 2010 - 7:29 pm | प्रियाली
माझे अभिनंदन करा. मी हा चित्रपट पाहिला आहे :) आणि या आठवणी जागृत केल्याबद्दल फारएन्ड यांचेही मनःपूर्वक अभिनंदन
30 Sep 2010 - 9:08 pm | शुचि
मस्तच!!!! अगाध विनोदबुद्धी!!! हसून हसून पुरेवाट झाली.
>> त्याच्या अंगात चकचकीत चामड्याचा काळ्या रंगाचा आणि लोखंडी खिळे लावलेला ड्रेस असतो - आगीजवळ घालण्यास अगदी योग्य! >>
उपरोध मस्त!!
30 Sep 2010 - 9:12 pm | प्रभो
बाजार उठवला... =)) =)) =))
30 Sep 2010 - 9:50 pm | हुप्प्या
हा सिनेमा अचाट आणि अतर्क्य जातकुळीतलाच आहे.
जाता जाता, लहानपणचा धर्मेंद्र (तोच तो तंग, लांडी विजार आणि चामड्याचा काळा, खिळेदार डगला घातलेला) हा बाळ म्हणजे बॉबी देवल आहे हे तज्ञांच्या लक्षात आलेच असेल. त्या निमित्ताने बॉबीजीनी सिनेक्षेत्रात पहिला घाव घातला.
असो. ते प्राण व इंमु चे इतक्या घिसाडघाईने थेट बिछान्यापर्यंत पोचणे जरा अजबच वाटते. इतकी राजकन्या वगैरे असणारी बाई, शिकार करताना कुणीतरी इसमाने जीव वाचवला तर त्याच्याशी लगेच संग करायला तयार! खानदान की इज्जत, मा बाप कसलाही विचार नाही. धन्य तो मनमोहन देसाई!
असो. ती (म्हणे) इंद्राणीदेवींची पुतळाबाई काय धातू वा मातीची बनलेली असते कोण जाणे. कारण प्राणसाहेब त्याला नंतर कधीतरी (बाईंच्या बेवफाईमुळे खफा होऊन) मशाल लावतात तेव्हा ती धडाधडा पेटते. असली अफाट ज्वालाग्राही माती का मेटल कुठे मिळते?
असो. लहानपणी मलाही हा सिनेमा भलताच आवडला होता. पण बाकी लोकांना कसा आवडला देव जाणे. चांगला सुपरहिट होता हा शिणेमा.
1 Oct 2010 - 12:46 pm | सहज
फारएन्ड साहेबांचे हे परिक्षण देखील सुपरहीट आहे!
1 Oct 2010 - 1:08 pm | ब्रिटिश टिंग्या
योगायोगाने काल दुपारीच सेट मॅक्सवर हा चित्रपट पहाण्याचा योग आला........भरुन पावलो :)
1 Oct 2010 - 5:33 pm | रन्गराव
चित्रपट पाहून जेव्हढी मज्जा आली नाही, त्यापेक्षा खूप जास्त हा लेख वाचून आली! :D
26 Nov 2015 - 11:28 pm | DEADPOOL
इंद्राणी मुखर्जी ती राजकन्या>>>>>वेगळीच इंद्राणी मुखर्जी आठवली.
बादवे आमचा एका लेखाचे प्रेरणास्रोत आपण!!!!
27 Nov 2015 - 10:29 am | अभिजीत अवलिया
धागा वर आणल्याबद्दल धन्यवाद. बाकी फार-एंड ह्यांनी पुन्हा चित्रपट परीक्षण चालू करावे ही विनंती. सेहवाग सारखी फटकेबाजी फक्त फार-एंडनाच जमते.
27 Nov 2015 - 11:11 am | मुक्त विहारि
वास्तविक परीक्षण.
परत एकदा "धरमवीर" बघणे आले.
14 Dec 2021 - 12:56 am | रंगीला रतन
ठ्ठो.......
लहानपणी बघितला होता हा पिक्चर पण ष्टोरी आठवत नव्हती :=) लै भारी परीक्षण.