आपली वैशालीतली भेट

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
13 Sep 2010 - 11:27 pm

त्यादिवशी रवीवारी संध्याकाळी आपण भेटायचं ठरलं, फर्ग्युसन समोरच्या वैशालीत. तू अमेरीकेहून नुकताच परतला होतास. बघण्याचा कर्यक्रम मोठ्या माणसांबरोबर एकदा झाला होता. आता आपली दोघांची भेट.
त्या रात्री अधीरतेनी, चिंतेनी माझा डोळ्याला डोळा लागला कसा तो नाही. सकाळी उठल्यानंतरदेखील कोणता पोशाख घालायचा, त्यावर कोणते डूल घालायचे हे ठरवण्यातच वेळ गेला.
तू जरी अमेरीकेत रुळलेला असलास तरी मी पहील्या भेटीत स्लीव्हलेस घालणं तुला कितपत रुचेल याबाबत मी साशंकच होते त्यामुळे ते रद्दबातल झालं. माझ्याकडे सुंदर शुभ्र पांढरा पोशाख होता पण अतिशुचितेचा काकूबाई रंग म्हणून त्यावर काट मारली गेली. गुलाबी फार coquettish न जाणो अधीरतेचं गुपीत फोडायचा नकोच. गडद जांभळा माझ्यावर अतिशय खुलतो पण तुला अमेरीकेत राहून राहून पेस्टल रंग आवडत असतील आणि न जाणो जांभळा भडक वाटेल म्हणून मी जांभळ्याच्या वाटेला गेले नाही. शेवटी पिस्ता रंग निवडला. ना भडक ना अतिसौम्य. नंतर खोलीचं दार लावून वेगवेगळे डूल, कानातल्या रिंगा यांची रंगीत तालीम झाली. एवढं होऊन, जेवण होइतो दुपार टळून गेली होती. "Butterflies in stomach" म्हणजे काय ते मला पहील्यांदा कळत होतं. परत बोलायचं काय त्याची तयारी शून्य सगळा भर दिखाव्यावरच याबद्दल मन कोसत होतं ते वेगळच. पण मी तिकडे दुर्लक्ष केलं.
संध्याकाळी मस्त आंघोळ करून, तो पिस्ता पंजाबी चढवला, काजळ-कुंकू केलं, कानातले घालून, मॅचींग चपला, पर्स वगैरे जय्यत तयारी करून बाहेर पाहीलं तो पावसाची लक्षणं. आभाळ अगदी आत्ता कोसळेल का मग इतकं दाटून आलेलं. मला काळजी वाटू लागली ती माझ्या साज-शृंगाराची.
रीक्षा केली तोपर्यंत वार्‍यानी जोर धरला होता.आतापावेतो तड तड पाऊसही सुरू झाला होता. नेमकी रीक्षाला ताडपत्री नव्हती मग काय व्हायचं तेच झालं.पाऊस आत येऊ लागला. ओढणी अंगाला चिकटली, डोळ्यात धूळ जाऊ लागली, केस विस्कटले. डोळे चोळल्याने का़जळ फिसकटलं.
शेवटी रीक्षा १० किमी अंतर पार करून कशीबशी वैशालीच्या दारात पोचली. तू आधीच हजर होतास. नीटसं आठवत नाही पण पावसात भीजल्याच्या सहानुभूतीपर काहीसं बोललास. पण हे नक्की आठवतय की भीजलेली मी छान दिसतेय अशा प्रकारचं विनोदाच्या अंगानी जाणारं बोललास : ) .... मी थोडी रिलॅक्स झाले.
जुजबी, इकडचं, तिकडचं बोलणं झाल्यावर मुख्य बोलणं सुरू झालं.आपल्या आवडी-निवडी, अपेक्षा, मित्र-मैत्रिणी, बालपण वगैरे. जसजसे तुझे विचार कळत गेले तसतसे त्यामागची प्रगल्भता, चिंतन, दूरदृष्टी जाणवत होती. मला तू "शॅलो/ सुपरफिशिअल" अजीबात वाटला नाहीस. मी अ‍ॅट इझ झाले. एव्हाना संकोचाचा पडदा बराचसा गळून पडला होता. माझं काजळ फिसकटलय की रेखीव आहे याची चिंता तर केव्हाच डोक्यातून गेली होती. तुझे विचार ऐकण्यात, तुला प्रतिसाद, उत्तरं देण्यात मी तन्मय होऊन गेले.अबोल मला, तू बोलकं केलस्.मला तुझ्याइतकं मुद्देसूद, आखीव-रेखीव बोलता येत नसेल पण मी प्रयत्न तर नि:संकोच करू लागले. आपण खूप बोललो. तू वादपटू देखील होतास. तुझा मुद्दा तू कौशल्यानी मांडत होतास, माझे विचार प्रश्न विचारून काढून घेत होतास. खरं तर मी मनसोक्त एन्जॉय केली ती भेट.
पण आता अंधार पडू लागला होता एव्हाना. निघायची वेळ जवळ आली होती. माझं मन समाधानानी काठोकाठ भरलं होतं. आता एक मी मनाशीच ठरवलं होतं - आपल्या दुसर्‍या भेटीत मी बिनदिक्कीत साधीसुधी येणार होते मात्र हो मी त्यावेळी भरभरून बोलणार होते, मी विषय निवडणार होते. तुला पूर्ण engaged ठेवणार होते माझ्या संभाषण्-कौशल्याने. कारण मला विश्वास मिळाला होता - तू बाह्यांगाला भुलणार्‍यातला नाहीस.
मला तुझ्याकडून शिकण्यासारखं खूप काही होतं. मला तू खूप आवडला होतास.
मला निघाल्यावर रीक्षात बसल्यावर कविता आठवत राहीली -
"देणार्‍याने देत जावे
घेणार्‍याने घेत जावे
घेणार्‍याने एके दिवशी
देणार्‍याचे हात घावे"
तसं तुझ्या गप्पा ऐकता ऐकता, मी देखील माझ्याही नकळत गप्पीष्ट व्हायची, बोलकी, बोलघेवडी व्हायची स्वप्न बघत होते.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

अगं 'वैशाली'बद्दल असं लिहून कसं चालेल?
तिथं गेलं कि मला एस. पी. डी. पी. आठवतं......दुसरं काही नाही.;)

शुचि's picture

14 Sep 2010 - 12:05 am | शुचि

SPDP? म्हणजे? :)

वैशालीत जाउन SPDP खाणार्‍या रेवतीकाकूंचा निषेध!!!!!!!

लेख मस्तच!!

शुचि's picture

14 Sep 2010 - 12:51 am | शुचि

हा हा
http://vikramkarve.sulekha.com/blog/post/2007/09/a-pune-story-spdp.htm

SPDP = शेव- पोटॅटो- दही- पुरी

अगं रेवती मी फर्ग्युसन मधे होते तेव्हा गणिताच्या प्रोफेसरांबरोबर फक्त कॉफी घ्यायचो आम्ही. आणि क्वचित इडली-वडा सांबार.

मला नाही बाई माहीत हे SPDP प्रकरण. :-\

टिउ's picture

14 Sep 2010 - 12:59 am | टिउ

मला नाही बाई माहीत हे SPDP प्रकरण

तुम्ही पुण्याच्याच फर्ग्युसन मध्ये होता की इतर कुठल्या फर्ग्युसन मध्ये?

असो...प्रकटन आवडलं!

अहो पण आमच्या वेळी ते नाव रूढ झालेलं नव्हतं आणि माझं बरच वय झालय ;) शिवाय आय अ‍ॅम नॉट इन टच विथ पुणे :(
आता काय सांगू अजून?

एसपीडीपी माहीत नाही ह्यावरुन ती खेतान फॅन का कुठल्याशा फॅनची जाहिरात होती ना ती आठवली त्यात एक माणूस ओरडत सुटतो "अरे इसको पीएम्पीओ मालूम नहीं!!" आणि मग सगळे त्याच्यावर हसत सुटतात. ;)

(एसपीडीपी माहीत असलेला)चतुरंग

Nile's picture

14 Sep 2010 - 2:57 am | Nile

पीएसपीओ फॅन्स ची जाहीरात होती ती.

टिउ's picture

14 Sep 2010 - 1:19 am | टिउ

१९९४ मध्ये लिहिलेला हा लेख वाचुन असं वाटतं की SPDP हे नाव त्यावेळी तरी बर्‍यापैकी रुढ होतं. आता तुमची वेळ त्यापेक्षाही आधीची असेल तर मग माहीत नाही! ;)

असो...फारच छिद्रान्वेशीपणा झाला! ;)

शुचि's picture

14 Sep 2010 - 1:30 am | शुचि

हा हा .... १ वर्षं पुढे गेलात. मी १९९३ ला पास आऊट झाले. मला फर्ग्युसन म्हटलं की आमचे एम प्रकाश सर आठवतात. विलक्षण हुषार , अतिशय सुंदर लेक्चर देणारे, विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करायचं कसब. माझे एकमेव लाडके सर. आचार्य सर आठवतात. या सरांच्या वक्तृत्व नैपुण्यामुळे , कळकळीमुळे पुढे आय आय टी ला आमच्या बॅचमधील २ जणांना अ‍ॅडमिशन मिळू शकली.
फर्ग्युसन = उत्तम प्राध्यापक हे माझ्यापुरता असलेलं समीकरण.
बाकी वैशाली = एक कप कॉफी + गणिताच्या गप्पा, सिद्धांत + टीन एज ओलांडलेलं असतानाही अजूनही असलेलं पेनफुल अवघडलेपणा हे माझ्यापुरता असलेलं समीकरण.
असो.

पुष्करिणी's picture

14 Sep 2010 - 1:24 am | पुष्करिणी

छान झालाय लेख ; (क्रमशः आहे असं उगीचच वाटतय )
पुढच्या पुणेभेटीत SPDP नक्की ना आता?

इन्द्र्राज पवार's picture

14 Sep 2010 - 12:05 am | इन्द्र्राज पवार

"Butterflies in stomach...."

~~ कथेतील नायिकेची ही अवस्था शब्दांचे जितके नाजूक तरंग उमटविते त्याच अनुषंगाने तिची भेटीसाठी असणारी (हवीहवीशी वाटणारी) तगमगदेखील रेखीवतेने वाचकाला दर्शविते. फिसकटलेल्या (मला 'विस्कटलेल्या' संबोधनापेक्षा दशेचे हे रूप फारच आवडले....नोटेबल रीअली !) काजळाची चिंता न बाळगणारी नायिका खरे तर बालकविंची

"कुणि नाही ग कुणि नाही | आम्हांला पाहत बाई
शांति दाटली चोहिकडे | या ग आता पुढे पुढे
लाजत लाजत हळूच हसत....खेळ गडे खेळू काही | कोणीही पाहत नाही..."

ही कविता म्हणणारी मनोरमाच आहे जणू.....जिला केवळ 'तोच' दिसतो.

भावुकता भावली असेच म्हणेन मी.

इन्द्रा

(का कोण जाणे....ही छोटेखानी कथा वाचत असताना 'चित्रलेखा' तील....
"सखी रे मेरा मन उलझे, तन डोले....
मन उलझे तन डोले, अब चैन पडे तबही जब उनसे नयन बोले..."

हे लताचे सुमधुर गाणे आठवत होते. ऐकलय तुम्ही?)

शुचि's picture

14 Sep 2010 - 12:27 am | शुचि

सुरेखच. ते गाणं आज ऐकेन :)

खरय!!

जेव्हा एखादं वादळ भावजीवनात प्रवेश करतं तेव्हा पार्श्वभूमीला नीटनेटक, समंजस वातावरण काय कामाचं?
त्याच्याशी झालेली पहीली भेट ही अशीच विस्कटलेल्या केसानी, फिस्कटलेल्या काजळानी अन धडधडत्या ऊरानी व्हायला हवी ....

जयवी's picture

14 Sep 2010 - 5:46 pm | जयवी

क्या बात है आवडेश :)

माजगावकर's picture

14 Sep 2010 - 12:53 am | माजगावकर

मस्त लेख!

कसेबसे दिवस काढतोय इथे अन त्यात या बोलक्या आठवणी.. फर्ग्युसन रस्ता, वैशाली.. सगळं अगदी समोर आलं..

धनंजय's picture

14 Sep 2010 - 1:30 am | धनंजय

छान!

(शेवटही असाच मनमोकळा असता, कवितेचे उद्धरण नसते, तर आणखी मजा आली असती.)

सुनील's picture

14 Sep 2010 - 1:37 am | सुनील

छान लेख.

बाकी SPDP वरून मला आमच्या ICH मधील GOTU (घी ओनियन टोमॅटो उत्तप्पा) आठवला!

संध्याकाळी मस्त आंघोळ करून, तो पिस्ता पंजाबी चढवला, काजळ-कुंकू केलं, कानातले घालून, मॅचींग चपला, पर्स वगैरे जय्यत तयारी करून बाहेर पाहीलं तो पावसाची लक्षणं. आभाळ अगदी आत्ता कोसळेल का मग इतकं दाटून आलेलं. मला काळजी वाटू लागली ती माझ्या साज-शृंगाराची. >>>

क्या बात है !! धीर आणी अधिर .......काय जमवलय !!

माझा जीव खर तर शिर्षकातच घायाळ झाला ....पुणे.....फर्गसन रोड.....वैशाली आणी पांचाली....दोन ऐतिहासिक पात्रे..दोन जिवंत खानावळ्या ...व्हाट अ लाईफ .....

शुचि ...छोटेखानी लेख आवडला ........

चतुरंग's picture

14 Sep 2010 - 2:45 am | चतुरंग

वैशाली आणि रुपाली (तेच ते गर्मागरम उप्पीटं वालं! ;) )
आणि तू म्हणतोस ते पांचाली जं.म. रस्त्यावर आहे!

(एकेकाळचा खवय्या पुणेकर)चतुरंग

छोटा डॉन's picture

14 Sep 2010 - 1:51 pm | छोटा डॉन

>>आणि तू म्हणतोस ते पांचाली जं.म. रस्त्यावर आहे!

पांचाली जंगली महाराज रोडवर असो किंवा वॉल स्ट्रीटवर, ते तद्दन थर्ड क्लास हाटेल आहे आणि ते अनादीकालापर्यंत तसेच राहणार असे आमचे स्पष्ट मत आहे.
त्यानंतर पुढचा नंबर आहे तो "मॉडर्न कॅफे"चा ...

असो, शुचीचा लेख छानच !
पुढचा भागही येईल अशी अपेक्षा आहे ;)

- छोटा डॉन

पांचाली जंगली महाराज रोडवर असो किंवा वॉल स्ट्रीटवर, ते तद्दन थर्ड क्लास हाटेल आहे आणि ते अनादीकालापर्यंत तसेच राहणार असे आमचे स्पष्ट मत आहे. >>>

बोलले का पंढरीपुरी खाऊन ...मालक !! सोबतीला ती असल्यावर आम्हाला हाटेलातल्या 'पदार्थां'ला अवीट गोडी जाणवत असे ..तुम्ही राहु द्या, नका येऊ पांचालीत ...थालीपिठ वगैरैच खा घरात ..

मितान's picture

14 Sep 2010 - 1:47 am | मितान

मस्त लेख ! पण आज हे अचानक आठवण्यामागे काही विशेष ? हा आपला सहज प्रश्न, भोचकपणा नाही!
या आठवणीच्या तरल पावसामागे एक व्याकुळ सुगंध जाणवतो आहे.
मी पण पुष्करिणीशी सहमत. क्रमशः असावे हे लेखन. हो ना ?

या आठवणीच्या तरल पावसामागे एक व्याकुळ सुगंध जाणवतो आहे. >>>

:)
ओ माताय, बस करा की !! का उगाच व्हिस्कीत रम ओतताय ? ईथे आधीच व्याकुळ सुंगधाने श्वास दमटतोय ..तुम्ही मारा अजुन हातोडे ...=))

भडकमकर मास्तर's picture

14 Sep 2010 - 2:00 am | भडकमकर मास्तर

लेख आवडला...
जसजसे तुझे विचार कळत गेले तसतसे त्यामागची प्रगल्भता, चिंतन, दूरदृष्टी जाणवत होती. मला तू "शॅलो/ सुपरफिशिअल" अजीबात वाटला नाहीस. -- तुझे विचार ऐकण्यात, तुला प्रतिसाद, उत्तरं देण्यात मी तन्मय होऊन गेले.अबोल मला, तू बोलकं केलस्.मला तुझ्याइतकं मुद्देसूद, आखीव-रेखीव बोलता येत नसेल पण मी प्रयत्न तर नि:संकोच करू लागले. आपण खूप बोललो. तू वादपटू देखील होतास. तुझा मुद्दा तू कौशल्यानी मांडत होतास, माझे विचार प्रश्न विचारून काढून घेत होतास. >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

हे संवाद बनवले असते तर अजून मजा आली असती...

शुचि's picture

14 Sep 2010 - 2:23 am | शुचि

@मितान
माझी एक मैत्रिण साइकिअ‍ॅट्रीस्ट आहे. तिनी मला सांगीतलं होतं - लिखाणातून , लेखकाच्या/लेखिकेच्या प्रेमात पडणं खूप सोपं असतं कारण A person bears his/her soul through writing most easily, uninhibitedly.

तू म्हणतेस ते बरोबर आहे ..... मनात मोगर्‍याचा सुगंध दाटलाय त्याचीच ही दरवळ आहे.

मला मनकवड्या लोकांची भीती वाटते त्यांच्यापासून काही लपून रहात नाही :) ..... तू त्यातलीच गं बाई!!!

@पुष्करीणी आणि मितान
नाही हा लेख क्रमशः नाही.

मला मनकवड्या लोकांची भीती वाटते त्यांच्यापासून काही लपून रहात नाही ..... तू त्यातलीच गं बाई!!!

अगदी! मितान मनकवडी असणार हे तिच्या संवेदनशील लेखनमुळेच समजतं.

रेवती लाखातलं बोललीस. आता तुला अहो जाहो थांबवते. ;) :P
मी नेहमी विचार करते मितान कर्क की मीन? दोन्ही भावनाप्रधान राशी. मितानबद्दल मी नेहमी विचार करते तिचं भाषासौंदर्य आणि हळूवार पाकळ्या पाकळ्यानी उलगडणारी काव्यमयता पाहून.

चित्रा's picture

14 Sep 2010 - 2:58 am | चित्रा

लेख आवडला.

संदीप चित्रे's picture

14 Sep 2010 - 5:23 am | संदीप चित्रे

'वैशाली', एसपीडीपी, कॉफी आणि एकंदर नजारा हे सारं काळजाच्या कोपर्‍यात अलगद अडकलेलं आहे :)
कोण जाणे... तू ह्या लेखातल्या अनुभवातून जात असताना आम्ही काही मित्र-मैत्रिणी आसपासच्या एखाद्या टेबलावर 'पडीक' गप्पा छाटत बसलेले असूही :)

हा हा .... असेल रे बाबा असेल :)
पण मी माझ्या नवर्‍याला भेटले ते वैशालीतच. फरक इतकाच तो इंग्लंडवरून आला होता. बाकी सगळं गोष्टीतलंच अगदी १० किमी अंतर वगैरे सगळं.
नंतर मी त्याला माझं कॉलेज दाखवलं वगैरे वगैरे. तो बडबड्या मी मुखदुर्बळ सगळं असच.

jaypal's picture

14 Sep 2010 - 12:36 pm | jaypal

लेख आवडला छोटासा पण गुंगवुण टाकणारा. मला पण कुठे तरी आतुन हाळव्या गंधाचा दरवळ येतोय.

>>>तो बडबड्या मी मुखदुर्बळ ..........आय्या कित्ती लक्क्की आहे तुझा नवरा, हेवा वाटतो ग त्याचा
( नाही तर आमच नशिब. लग्ना नंतर मी नशिबावर देखिल हसायला शिकलो ;-))

ऋषिकेश's picture

14 Sep 2010 - 9:56 am | ऋषिकेश

फारच छान प्रकटन.. सुरेख उतरलंय
और भी आने दो!

गणेशा's picture

14 Sep 2010 - 1:53 pm | गणेशा

आणि खरेच ती सर्व द्रुष्य दोळ्यासमोर येतायेत.
आम्ची बारी लवकरच लागणार आहे.
त्यामुळे आन्खिनच मजा आली वाचुन.
हॉटेल बदलेल कारण .. गोविंद गार्डन ला भेटेन जवळ पडेल मस्त आहे. .

तुमचा हा लेख १९९३ चा आहे . तर त्या नंतरची काही लेख दिल्यास ही छान वाटेल.

चावटमेला's picture

14 Sep 2010 - 5:45 pm | चावटमेला

लेख आवडला, छान आहे
(वैशालीच्या मसाला डोशाचा फ्यान) चावटमेला

विजुभाऊ's picture

14 Sep 2010 - 5:50 pm | विजुभाऊ

माझ्या बायकोला मी जेंव्हा दाखवण्याच्या कार्यक्रमानन्तर भेटलो तेंव्हा मला धाकधूक होती की मला तिचा एक्झॅक्ट चेहेरा आठवतच नव्हता.
नशीब. ती सोसायटीच्या गेटवरच थांबली होती. आनि तिनेच मला ओळखले. नाहीतर पंचाईत होती

धमाल मुलगा's picture

14 Sep 2010 - 6:20 pm | धमाल मुलगा

सह्हीच!

मस्तच लिहिलंय शुचिकाकू ( :P )
एकदम मनाच्या गाभार्‍यातून उमटलेल्यासारखा वाटतोय शब्दनशब्द :)

श्रावण मोडक's picture

15 Sep 2010 - 12:14 am | श्रावण मोडक

काकू? शुचिला? ;)

का नाही? आँ?
प्रभो मला आज्जी म्हणतो त्यावेळेस कुण्णी कसला म्हणून आक्षेप घेत नाही.....शुचीतै ला काकू म्हटलेलंही चालायला हवं.
सहमत व्हा मोडकसाहेब नाहितर कौल काढावा लागेल मला.;)

मी-सौरभ's picture

15 Sep 2010 - 12:39 am | मी-सौरभ

यावर तुमच मत जाणून घ्यायला आवडेल..
बाकी लेख झकास

हॅहॅहॅहॅ...चुकीचे निरिक्षण आहे....
मी तुला आज्जी म्हटल्यावर श्रामोंची ही प्रतिक्रिया होती... ;)

रेवती's picture

15 Sep 2010 - 5:48 am | रेवती

इतके काही लग्गेच पुरावे द्यायला नकोत.
विसरायला होतं या वयात कधीकधी!;)

गोगोल's picture

15 Sep 2010 - 6:53 am | गोगोल

कस डोळ्यासमोर उभ राहील.

सहज's picture

15 Sep 2010 - 7:15 am | सहज

याचा पुढचा भागही येउ दे.

लेख आवडला.