संतांच्या कविता ..२
प्रथम थोडे अवांतर. भोज राजाच्या दरबारात कालिदासासारखी रत्ने होती तसेच बरेच विद्वानही होते. काही एकपाठी, काही द्विपाठी,काही त्रिपाठी . म्हणजे पहिल्याने एकदा वाचले-ऐकले की पाठ व्हावयाचे, दुसर्याला दोन वेळात तर तिसर्याला तीनदा ऐकून. भोज राजाने एकदा गंमत करावयाचे ठरवले.त्याने दवंडी पिटवली की "कोणी कवी नवीन कविता करेल तर त्याला एक लाख रुपये बक्षिस मिळेल".कवींना वाटले झालोच आपण लक्षाधीश. दरबारात ही रांग. मजा अशी की कोणत्याही कवीने नवीन कविता म्हटली की एकपाठी ती लगेच म्हणून दाखवावयाचा. दोनदा ऐकून झाली की द्विपाठी उठावयाचा.तो म्हणावयाचा. झाले. राजा म्हणावयाचा " ही कसली नवी कविता? एव्हड्या सगळ्यांना माहित असलेल्री?" कवी हिरमुसला होवून निघून जायचा. सगळ्यांची हीच गत.
एकदा एक म्हातारा कालिदासाकडे आला. काकुळतीने म्हणाला ," थोडी अडचण आहे, मदत करा". कालिदास म्हणाला "मी पैसे देत नाही पण एक कविता देतो.उद्या दरबारांत म्हणून दाखव. राजा पैसे देईल." सकाळी दरबारात येऊन त्याने कविता सुरु केली
" राजा, तुझ्या वडीलांनी माझ्याकडून दहा लाख रुपये उसने घेतले होते व याला तुझ्या दरबारातील लोक साक्षी आहेत." कविता संपली. एकपाठी, द्विपाठी सगळे गप्प. साक्ष कोण देणार? राजाने हसत हसत पैसे दिले.
आता तुम्ही म्हणाल " या गोष्टीचा आणि संतांच्या कविता यांचा काय संबंध?" संबंध आहे. माझे ठाम मत आहे की तुम्ही लोक भोजाच्या दरबारात एकपाठी, द्विपाठी वगैरे होता. कशावरून? ज्ञानेश्वर महाराजांची पुढील रचना एकदा किंवा दोनदा वाचा आणि बघा तुम्हाला ती पाठ झाली आहे की नाही? हां, व्यनि पाठवावयाची गरज नाही, माझी तुमच्याबद्दल खात्री आहे.
काट्याच्या अणीवर वसली तीन गावें दोन ओसाड एक वसेचिना !
वसेचिना तिथे आले तीन कुंभार दोन थोटे एक घडेचिना !
घडेचिना त्याने घडली तीन मडकी दोन कच्ची एक भाजेचिना !
भाजेचिना त्यांत रांधले तीन मुगे दोन हिरवे एक शिजेचिना !
शिजेचिना तेथे आले तीन पाहुणे दोन रुसले एक जेवेचिना !
जेवेचिना त्याला दिल्या तीन म्हशी दोन वांझ्या एक फ़ळेचिना !
फ़ळेचिना तीला झाले तीन टोणगे दोन मेले एक जगेचिना !
जगेचिना त्याचे आले तीन रुपये दोन खोटे एक चालेचिना !
चालेचिना तिथे आले तीन पारखी दोन आंधळे एका दिसेचिना !
दिसेचिना त्याला मारल्या तीन बुक्क्या दोन हुकल्या एक लागेचिना !
ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव सद गुरुवाचून कळेचिना!
सद्गुरु मिळेपर्यंत ज्ञानबाची "मेख" हाती लागणे अवघडच म्हणा पण तरीही पद [कीं वात्रटिका?] वाचतांना मजा वाटते ना?
कर्नाटकचा पुरंदरदास हा संत कवी काही काळ पंढरपूरास रहात होता. त्याने लिहलेल्या एका कवितेचा अनुवाद आमचे मित्र श्री. प्रभाकर नानावटी यांनी दिला आहे. तोही येथे बघा.
काट्याच्या टोकावर दोन तळे बांधली
दोन रिकामी, व एक भरले नाही ||
न भरलेल्या तळ्याला तीन गवंडी आले
दोघे लंगडे, व एकाला पाय नाही ||
पाय नसलेल्या गवंड्याला तीन म्हैस दिले
दोन दूध न देणारे, व एकाला वासरू नव्हते ||
वासरू नसलेल्या म्हशीला तीन सोन्याचे नाणे मिळाले
दोन खोटे, व एक चालत नाही ||
न चालणाऱ्या नाण्यासाठी तिघे आले
त्यात दोन आंधळे, व एकाला दिसत नव्हते ||
न दिसणाऱ्याला तीन गावांचे दान मिळाले
दोन गावं पडकी, व एका गावात शेतकरीच नव्हता ||
शेतकरी नसलेल्या गावी तीन कुंभार आले
दोघांचे हात कापलेले व एकाला हातच नाही ||
हात नसलेल्या कुंभारानी तीन मडकी भाजली
दोन फुटके व एकाला तळच नव्हते ||
बिनतळाच्या मडक्यात तीन तांदळाचे दाणे टाकले
दोन अर्धवट शिजले व एक शिजलाच नाही ||
न शिजलेल्या शितासाठी तीन नातेवाइक आले
दोघे खायला तयार नव्हते व एकाला भूक नव्हती ||
या सगळ्यांचा अर्थ फक्त पुरंदर विठलच जाणे
इतर कुणालाही ते कळणार नाही ||
डिस्क्लेमर; आपण पंडित आहा हा माझा एक अंदाज, चु,भु.दे.घे.
भोजाच्या दरबारांत आपण पंडित होता असे म्हटले असले तरी येथे पुनर्जन्माबद्दल वाद घालू नये. विश्वास नसेल तर आपण पंडित नाही असे समजून सोडून द्यावे.
ही कविता ज्ञानेश्वरमहाराजांची नसण्याची शक्यता आहे ; (रुपयाचा उल्लेख) पण ती गाथेत सापडते, आपण फक्त आस्वाद घेण्यापुरते पहा.
शरद
प्रतिक्रिया
12 Sep 2010 - 11:27 am | श्रावण मोडक
पोतडी अशीच अधूनमधून उघडत चला. :)
12 Sep 2010 - 7:15 pm | बिपिन कार्यकर्ते
+१
12 Sep 2010 - 2:29 pm | Nile
या प्रकारची कुठलीतरी कविता वाचल्याचे ऐकल्याचे वाटते आहे पण आठवत नाही. रचना आवडली, ओळखीबद्दल धन्यवाद.
12 Sep 2010 - 3:22 pm | मितान
अरे वा !
लहानपणी ही कविता अनेकदा म्हटली आहे. आज त्याचे विश्लेषण वाचून आनंद झाला :)
धन्यवाद !
12 Sep 2010 - 3:35 pm | सुनील
ज्ञानेश्वर १३ व्या शतकातील तर (कर्नाटक संगीताचा आद्य जनक मानला गेलेला) पुरंदरदास १५ व्या शतकातील. एकनाथ १६ व्या शतकातील.
ज्ञानेश्वरांनी अशा "क्रिप्टिक" रचना फारशा केल्या नसाव्यात (निदान केल्याचे ऐकले/वाचले नाही) परंतु एकनाथांनी मात्र भरपूर केलेल्या आढळतील.
सदर काव्य हे मूळ पुरंदरदासाने कन्नडमध्ये रचले आणि एकनाथांनी मराठीत आणले, असे घडले असण्याची शक्यता किती?
12 Sep 2010 - 10:05 pm | पाषाणभेद
वा छान माहिती दिलीत.
12 Sep 2010 - 10:34 pm | विलासराव
मस्त.
12 Sep 2010 - 11:23 pm | धनंजय
आवडते भारूड. पुन्हा स्मरणात आणून दिल्याबाबत धन्यवाद.
वृत्त साधण्यासाठी "काट्याच्या अणिवर वसले तीन गांव" असे अधिक बरोबर वाटते, नाही का?
13 Sep 2010 - 8:28 am | गंगाधर मुटे
शरदाच्या बाफावर लिहिले तीन प्रतिसाद
दोन उडाले, एक दिसेचिना.
छान विवेचन.
13 Sep 2010 - 11:18 am | ज्ञानोबाचे पैजार
http://www.marathifm.com/Nisarga%20Raja-09/Katyachya%20Aanivar.htm
मस्त गाणे आहे.