आमच्याकडे बाप्पाचं आगमन फक्तं दिड दिवसांसाठीच असतं. लहान असताना बाप्पाची मुर्ती आणायला जाताना जो आनंद होत असे, तो अजूनही कायम आहे. आम्ही राहतो (म्हणजे मुळ गावी) तिथे सगळ्यांकडे बाप्पाचं आगमन आणि पुजा गणेशचतुर्थीच्या दुपारपर्यंतच होउनही जात असे. पण आमच्याकडे मात्र बाप्पाची पुजा संध्याकाळी असल्याने शेजार्यांकडची तयारी, पुजा बघून आम्हा भावंडांनाही कधी एकदा संध्याकाळ होते असे वाटायचे. आम्ही दोघे भाऊ आणि बाबा सकाळीच बाप्पांची मुर्ती घेऊन येत असू. पण त्याही आधी सकाळी उठल्यावर घरात सगळीकडे बाप्पाच्या पाऊलांच्या खूणा चुन्याने काढत असू. ह्या पाऊलखूणा म्हणजे चुन्याने काढलेला एक ठिपका व त्या भोवती दोन वर्तुळं (अगदी 'टारगेट' स्टोअरच्या लोगो सारखे)! मला ह्या पाऊलखूणा बघून नेहमीच वाटत आलंय की आपले बाप्पा आहेत गोलगप्पू , म्हणून काय लगेच त्याच्या पाऊलखूणा एवढ्या गोल-गोल काढायच्या?
घरी बाप्पाच्या पुजेची तयारी अगदी साधी असे. मखर वगेरे काही नाही. चौरंग त्यावर रांगोळी, दिवे, आणी समया अशी साधी मांडणी. शेजारी पाटावर दुकानातील वहीखाते, तराजु, आणि एक पैश्यांचा डबासुधा पुजेसाठी ठेवल्या जाई. आई एक दिवस आधीच बाप्पाच्या फरळासाठी साटोर्या, शिरलाडू, आणि अजून काही-बाही करत असे. चतुर्थीच्या दिवशी सकाळपासून दुर्वा, फुले, बाप्पासाठी हार या सगळ्यांची तयारी होत असे. बाजारातून कळलावीचे फुलही आणत असू. ह्या फुलाचं महत्व काय ते कुणास ठाऊक, पण हे कळलावीचे फुल चतुर्थीच्या रात्री ज्या माणसाच्या दोन बायका आहेत त्याच्या आंगणात टाकले की दोन्ही बायकांमधे भांडण होते म्हणे! संध्याकाळी दिवेलागण झाली की आम्ही बाप्पाची पुजा करत असू. मोदक हादडत असू!
दिड दिवस म्हणून बाप्पाची दुसर्या दिवशी संध्याकाळी निरोप द्यायची वेळ यायची. शेजार्यांकडच्या सारखा आपल्याकडेही बाप्पा सगळे दहा दिवस रहावा असं खूप वाटायचं. पण घरच्या बाप्पाला निरोप दिला तरी शेजार्यांकडे तर आहे ना म्हणून बरंही वाटायचं!
असो, इथे आल्यापासून ह्या सणाला, त्याच्या आनंदाला बराच मुकलो होतो. पण मागची २-३ वर्षे बाप्पाच्या स्वागताकरता मित्राकडे जात आलोय. यंदा त्याच्याकडे जाणं शक्य नसल्याने हुरहूर आहे. पण घरीच थोडक्यात बाप्पाची पुजा करायचा बेत आहे. मागच्या वर्षी बाप्पासाठी केलेली आरास, पुजा खालच्या फोटोंमधे दिसेलंच. पण त्या आधी तुम्हा सगळ्यांना बाप्पाच्या आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा!
बोला... गणपती बाप्पा... मोरया! मंगलमुर्ती... मोरया!!
-अनामिक
प्रतिक्रिया
11 Sep 2010 - 5:42 am | गणपा
_/|\_
चला इतका वेळ जागत बसल्याच सार्थक झाल.
बाप्पाच दर्शन झाल. :)
गणपती बाप्पा... मोरया! मंगलमुर्ती... मोरया!!
11 Sep 2010 - 6:15 am | शुचि
काय अद्भुत आभा आहे त्या मूर्तीवर, मखरावर , अगदी घरगुती ट्च त्यामुळे डोळ्याचं पारणं फिटलं. धन्यवाद.
11 Sep 2010 - 7:14 am | सूड
गणपती बाप्पा... मोरया!
11 Sep 2010 - 7:28 am | मराठमोळा
वाह काय मस्त फोटु आलेत बाप्पाचे, (शेवटच्या दोन फोटुंनी जीव घेतला ;) )
बोला गणपती बाप्पा, मोरया!
11 Sep 2010 - 9:33 am | मदनबाण
बोला गणपती बाप्पा, मोरया !!! :)
11 Sep 2010 - 12:13 pm | दाद
मिसळपावच्या सर्व सभासदांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा....
बोला गणपती बाप्पा, मोरया!
11 Sep 2010 - 12:58 pm | अनामिका
अनामिक!
घरच्या गणेशोत्सवाला यावर्षी उपस्थित राहू शकत नसल्याची टोचणी आपल्या या गणेशाच्या प्रसन्न चित्रांनी अंमळ कमी झाली .
गणेशाच्या आगमनाने विघ्ने होती दूर!
बाप्पाच्या आशिर्वादाने जुळोत सर्वांचे सुर!
सर्व मिपाकरांना गणेश चतुर्थीच्या मनःपुर्वक शुभेच्छा!
अनामिका!
11 Sep 2010 - 2:30 pm | आशिष सुर्वे
गणपती बाप्पा मोरया!
कोकणातल्या घरच्या गणेशोत्सवात यंदा जाऊ न शकल्याची हुरहूर लागून राहिली आहे..
देवा, मला क्षमा कर.. पुढल्या वर्षी तुझी सेवा करण्याचे भाग्य लागू दे रे देवा..
गणपती बाप्पा मोरया!