'लिहावे नेटके' - भाषा, संस्कृती, अनुभूती यांचा समृध्द ठेवा

चिंतातुर जंतू's picture
चिंतातुर जंतू in काथ्याकूट
5 Sep 2010 - 5:54 pm
गाभा: 

भाषिक संस्कार/व्यवहार आणि त्यांचा एकंदर संस्कृती, अनुभूती वगैरेंवर होणारा दूरगामी परिणाम यांविषयीची ही चर्चा वाचून नुकत्याच हाती आलेल्या 'लिहावे नेटके' या पुस्तकसंचाची आठवण झाली. ज्याला एका भाषेमध्ये विविध प्रकारची अभिव्यक्ती समजते आणि करता येते त्याला या क्रिया इतर भाषांमध्येही करायला जमतात. शिवाय विविध ज्ञानशाखांमधली आपली जाण विस्तारायची असेल आणि त्या विषयांमध्ये नीट व्यक्त व्हायचं असेल, तर भाषा हेच प्रमुख साधन असतं. त्यामुळे भाषेवर किमान प्रभुत्व असणं आवश्यक असतं. पण आताच्या शिक्षणपध्दतीत हे पुरेसं होताना दिसत नाही. त्यामुळे कोणत्याच भाषेत लिहिताना नेमकेपणा, नेटकेपणा नसलेल्या पिढ्या आपल्यासमोर मोठ्या होत आहेत. यावर उपाय म्हणून माधुरी पुरंदरे यांनी मराठी शिकणार्‍या आणि शिकवणार्‍यांसाठी 'लिहावे नेटके' ही पुस्तकं निर्माण केलेली आहेत. पाचव्या-सहाव्या इयत्तेपासून वापरता येतील असे भाषेचे पाठ आणि स्वाध्याय असं या पुस्तकांचं स्वरूप थोडक्यात सांगता येईल. मराठी शिकणार्‍या परभाषिकांनाही ती मदत करतील. अगदी मराठी मातृभाषा असणार्‍या, पण चार वाक्यं लिहायला सायास पडणार्‍या कुणालाही ही पुस्तकं म्हणजे वरदानच वाटावीत.

मुलांसाठी स्वाध्याय-पाठ असं म्हटल्यावर जे नीरस, कंटाळवाणं चित्र डोळ्यांसमोर उभं राहिलं असेल, तशी मात्र ही पुस्तकं अजिबात नाहीत. पुस्तक वापरताना मुलांना मजा यावी म्हणून सर्वत्र दृश्यघटकांचा सढळ वापर केलेला आहे. सरावासाठी वापरलेल्या वेगवेगळ्या वाक्यांच्या आणि उतार्‍यांच्या अनुषंगानं चित्रं, छायाचित्रं यांची सर्वत्र रेलचेल आहे. उदा: लिहिताना होणार्‍या चुका दाखवताना 'मातृ-कृपा' शब्द चुकीच्या पध्दतीनं लिहिलेल्या खर्‍या पाटीचं छायाचित्र दिसतं. ज्यांनी यापूर्वी माधुरी पुरंदर्‍यांची 'वाचू आनंदे', 'आमची शाळा', 'राधाचं घर' वगैरे पुस्तकं पाहिली असतील त्यांना याचा अंदाज येऊ शकेल. संपूर्ण रंगीत असलेला 'लिहावे नेटके' हा पुस्तकसंच सुरेख चित्रं आणि सजावट यांनी पानोपानी भरलेला आहे. चित्रं स्वतः माधुरी पुरंदरे यांनीच काढलेली आहेत. बरीचशी छायाचित्रं संदेश भंडारे या ('तमाशा', 'वारी' अशा कामांसाठी गाजलेल्या) गुणी छायाचित्रकाराची आहेत. भाषेच्या स्वाध्यायपाठांमध्ये छायाचित्रं? आणि संपूर्ण रंगीत, देखणी वगैरे पुस्तकं? हे (नसते थेर) कशासाठी? असा (खास मराठी) प्रश्न पडला असेल तर तो या पुस्तकांच्या जवळजवळ क्रांतिकारक म्हणता येईल अशा स्वरुपाशी संबंधित आहे.

पुस्तकांच्या मुखपॄष्ठापासूनच त्यांचं वेगळेपण जाणवू लागतं. निरनिराळ्या पध्दतीचं लिखाण दाखवणारी छायाचित्रं त्यावर दिसतात. त्यात मातीत अक्षरं गिरवणारी लहान मुलं दिसतात, वस्तूंचे भाव लिहिलेला फलक दिसतो, संगणकावर टंकलेली अक्षरं दिसतात आणि ब्रेलमध्ये टोचलेला मजकूरही दिसतो. मोबाईलवरचा एस्.एम्.एस., भांड्यांवर नावं लिहिणं, हातांवर गोंदवून घेणं अशा लिखाणाच्या वेगवेगळ्या प्रकारांचं मुखपृष्ठावर दर्शन होतं. त्यावरून पुस्तकाच्या आवाक्याचा अंदाज येतो. पहिलं पान उलगडताच शब्दकोशातल्या 'भाषे'च्या व्याख्या दिसतात आणि विविध विशेषणं वापरून केलेलं भाषेचं (खरंतर भाषाविश्वाचंच) वर्णन दिसतं. मासल्यादाखल हे पाहा - लडिवाळ भाषा, चावट भाषा, क्लिष्ट भाषा, टपोरी भाषा, निर्वाणीची भाषा, गुद्द्यांची भाषा. भाषेच्या सर्वव्यापीपणाचं आणि विविधतेचं दर्शन यातून होतं.

भाषेच्या वेगवेगळ्या अंगांना अनुसरून पुस्तकातल्या धड्यांची रचना केलेली आहे. यामध्ये कालानुरुप भाषेच्या स्वरुपामध्ये झालेल्या बदलांची दखल घेतलेली दिसते. उदा: वर्णमालेच्या प्रकरणात जुन्या बाराखडीऐवजी 'अॅ', 'ऑ'सकटची 'चौदा'खडी वापरलेली आहे. निव्वळ घोकण्यापेक्षा समजून-उमजून शिकण्यावर सर्वत्र भर आहे. उदा: वर्णमाला लक्षात का ठेवायची? तर शब्दकोश, नावांची यादी, संदर्भसूची अशा अनेक ठिकाणी शब्द अकारविल्हे लावलेले असतात; वर्णमाला पाठ नसली तर त्यात हवी ती गोष्ट सापडणार नाही, हे इथं सांगितलं जातं.

मुलांच्या शब्दसंग्रहात आपोआप वाढ होईल अशीही योजना यात आहे. उदा. 'क्रियापदापासून बनलेली नामं' याविषयीच्या मजकुरात बोलणे, लिहिणे यांपासून बनलेल्या परिचित नामांशिवाय बोलवा, लिखाई, लिहिणावळ, लिखावट असे अनवट शब्दही आहेत. कांडप, गाळप, सांगावा अशा शब्दांचा इथे परिचय होतो आणि देयक, आवक-जावक अशा सरकारी शब्दांचाही परिचय होतो. मुलांच्या सहज आकलनासाठी कालानुरुप रुळलेले इंग्रजी शब्द स्वाध्यायांमध्ये वापरलेले आहेत. जसे - सॉस, मोबाईल, इंटरनेट. याबरोबरच नवीन घडलेल्या मराठी शब्दांची ओळख मुलांना होईल अशा पध्दतीनं तेही वापरलेले आहेत. उदा: ‘संकेतस्थळ’.

याशिवाय जाताजाता मुलांचा अनेक गोष्टींशी परिचय होईल अशी रीत पुस्तकाची व्याप्ती आणि उपयुक्तता अधिकच वाढवते. उदा: शब्द अकारविल्हे लावण्याच्या स्वाध्यायामध्ये पुस्तकं नेताना घसरून पडलेल्या मुलाचा प्रसंग आहे. घसरलेल्या मुलाच्या हातातली इतस्ततः विखुरलेली पुस्तकं एका चित्रात दाखवली आहेत. तर स्वाध्याय सोडवण्यासाठी उभी करून नीट ठेवलेल्या पुस्तकांचं चित्र आहे. त्यावरच दिलेल्या जागेत पुस्तकांची नावं लिहायची आहेत. विखुरलेल्या पुस्तकांत 'झेंडूची फुले', 'ऋतुचक्र', 'व्यक्ती आणि वल्ली', 'तराळ-अंतराळ' अशी सगळी खर्‍या पुस्तकांची नावं आहेत. स्वाध्याय सोडवताना या शब्दांशी आणि पुस्तकांशी मुलांची आपोआपच तोंडओळख होते.

‘वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र’ या संस्थेचा पुस्तकनिर्मितीत सहभाग आहे. पुस्तकांचा वापर ग्रामीण, शहरी आणि अगदी परदेशस्थ मराठी मंडळींनाही करता यावा याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे. त्यात वाडा संस्कृती दिसते तसंच मॅक्डोनाल्ड, शॉपिंग मॉलही दिसतात. यात पैठणीचा पारंपरिक माग दिसतो तशा सरपण डोक्यावर वाहून नेणार्‍या कष्टकरी बायका, पाण्याचे हंडे डोक्यावर ठेवून पाणी भरायला चाललेल्या बायकाही भेटतात. आजच्या तरुणाईच्या सवयीचे 'सही', 'डेंजर' असे शब्द इथे येतात; तसेच चैत्रगौरीचं हळदीकुंकू, दिवेलागण, अंगण सारवणे, पु.लं., बिनाका गीतमाला अशा जुन्या गोष्टीही येतात. मुलं पुस्तकं वापरत असताना एक व्यापक मराठी संस्कृतीविश्व त्यांना त्यामुळे खुलं होईल. अपरिचित गोष्टींविषयी मुलांच्या शंकांना वाव देऊन आणि न्याय देऊन त्यांचं विश्व समृध्द करण्याची थोडी जबाबदारी मात्र शिक्षक-पालकांना त्यासाठी उचलावी लागेल.

पुस्तकांत निव्वळ व्याकरण नाही तर भाषेच्या स्वरुपांचं आणि वापरांचं वैविध्यही उलगडून दाखवलेलं आहे. उदाहरणार्थः वृत्तपत्रात मथळे लिहायची भाषा वेगळी असते आणि वृत्तांकनाचा मजकूर लिहायची भाषा वेगळी असते. गोष्टीतल्या वर्णनाची भाषा त्याहून वेगळी असते आणि दोन व्यक्तींमधला संवाद लिहिताना वेगळी भाषा वापरावी लागते. लेखी-बोली अशा अनेक प्रकारच्या भाषांमधला फरक मुलांना जाणवून देणारे पाठ आणि सरावासाठीचे स्वाध्याय पुस्तकात आहेत. इतकंच काय, पोलिसांच्या नोंदीची भाषा आणि तरुणाईची ‘व्रात्य’भाषा असे भाषेचे अनेक नमुने यात पाहायला मिळतात.

भाषेच्या वापरात आजकाल अतिशय विसविशीतपणा आलेला आहे. त्यामुळे होणार्‍या अनेक गफलती आता आपल्या इतक्या अंगवळणी पडलेल्या आहेत, की नक्की बरोबर काय आणि चूक काय हेच अनेकदा कळेनासं होतं. अशा गफलती आणि त्या होण्यामागची कारणं जाणून घेऊन त्या अनुषंगानंही पाठांची रचना केलेली आहे.

अशा सर्व मराठीविषयक मुद्द्यांच्या व्यतिरिक्त जाणवणारा पुस्तकांचा एक विशेष गुणधर्म म्हणजे त्यांतून मुलांना खुलं केलेलं मराठीपलीकडचं समृध्द अनुभवविश्व. अमिताभ बच्चन, राज कपूरपासून एम. एस. सुब्बलक्ष्मी, अकिरा कुरोसावा अशा अनेकांचा जाताजाता परिचय होईल अशी सरावपाठांची आणि स्वाध्यायांची मांडणी आहे. एस्किमोचं इग्लू, आफ्रिकन पोषाख, सरड्याप्रमाणे रंग बदलणारे मासे अशा जगभरातल्या अनेक गोष्टींचा खजिनाच इथे मांडलेला आहे. हे सर्व भाषेच्या अभ्यासात बेमालूम मिसळलेलं आहे. अपरिचित संस्कृती, निसर्गसृष्टी यांतलं वैविध्य हे अशा रीतीनं आपोआप मुलांच्या समोर येतं; त्यामुळे सरावपाठही सुरस आणि रोचक होतात.

भाषेच्या माध्यमातून नकळत संस्कारही होतील याची काळजी घेतलेली दिसते. उदा: भूकंपाबद्दलच्या उतार्‍यात बायकांची जिद्द दिसते आणि बरोबर कष्टकरी बायकांची छायाचित्रं दिसतात. भूतकाळाविषयी सांगताना ग्रीक ऑलिंपिक क्रीडास्पर्धांपासून कोट-टोपी-धोतरातल्या पुण्यातल्या क्रिकेट संघाच्या फोटोपर्यंत अनेक गोष्टी दाखवत, त्यांच्याविषयी सांगत, जाताजाता हेही सांगितलेलं आहे की आज आपण आणि आपलं जग कशामुळे असं आहे हे कळण्यासाठी भूतकाळाकडे जावं लागतं.

पुस्तकाची मांडणीही मुलांना आवडेल आणि पटकन समजेल अशी आहे. उदा: एखादा स्वाध्याय जर थोडा कठीण असेल तर तिथे एक चिमणी दाखवलेली आहे, तर त्याहून अधिक कठीण स्वाध्यायापाशी एक बेडूक उभा असतो. पुष्कळसे स्वाध्यायसुध्दा कोडी, खेळ अशा प्रकारचे आहेत. उदा. प्रश्न-उत्तरं बनवण्याचा स्वाध्याय म्हणजे भोंडल्याची खिरापत ओळखण्याचा खेळ आहे. यामुळे अभ्यास करायला लागत असूनही तो अजिबातच कंटाळवाणा होत नाही.

पुस्तक रंजक होण्याचं आणखी एक कारण म्हणजे अनेक ठिकाणी दिसणारा मिश्किलपणा. उदा. आज्ञार्थी रचना सांगताना ‘हमखास यशस्वी’ कवितेची पाककृती दिली आहे. तिची मजा कळायला ती मुळातूनच वाचायला हवी. विशेषणांच्या प्रकरणात 'असडीक' तांदूळ यांसारख्या अनवट विशेषणांची ओळख होतेच, पण त्यासाठी वापरलेल्या उतार्‍यातल्या व्यक्तीला हा शब्द माहीत नसल्यामुळे तिनं त्याऐवजी वापरलेली 'कव्हर न काढलेला' तांदूळ ही रचना वाचून गंमतही वाटते.

स्वाध्याय सोडवण्यासाठी, इतर टिपणं वगैरे नोंदवण्यासाठी भरपूर मोकळ्या जागा सोडलेल्या आहेत. ‘नोंदी शक्यतो पेन्सिलनंच कर; म्हणजे नंतर त्या खोडून टाकता येतील आणि मित्रमैत्रिणींना किंवा भावंडांना देखील तुझं पुस्तक वापरता येईल’, अशी प्रेमळ सूचनासुध्दा आहे.

लहान मुलांच्या देखण्या पुस्तकांसाठी प्रसिध्द असलेल्या 'ज्योत्स्ना प्रकाशन' या संस्थेनं ही पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. प्रत्यक्ष सरावपाठांचे दोन भाग आणि एक उत्तरपुस्तिका असा हा संच आहे. पानांवर पुरेशी मोकळी जागा सोडण्यासाठी आणि मोठ्या अक्षरांचा मजकूर मावण्यासाठी पुस्तकांचा आकार नेहमीपेक्षा किंचित मोठा आहे. तरीही पुस्तकसंचाची ४०० रुपये ही किंमत अगदीच वाजवी वाटते. त्यासाठी 'सर रतन टाटा ट्रस्ट'चं आर्थिक पाठबळ प्रकल्पाला लाभलेलं आहे.

एकंदरीत, मराठीविषयी अभिमान आणि आस्था असणार्‍या कुणीही संग्रही ठेवावीत अशीच ही पुस्तकं आहेत. मराठीच्या नावानं गळे काढणार्‍या किंवा आपल्या राजकारणासाठी तिला वापरणार्‍या कुणाहीपेक्षा या पुस्तकांमुळे मराठीचा अधिक लाभ झाला आहे आणि मराठीची मान अधिक उंचावली गेली आहे.

पुस्तकांविषयी लेखिकेचं मनोगत इथे वाचता येईल.

शुभदा चौकर यांनी 'लोकसत्ता'त लिहिलेला पुस्तक-परिचय इथे वाचता येईल.

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

5 Sep 2010 - 6:16 pm | मुक्तसुनीत

उत्तम परिचय.
"वाचू आनंदे"चे काही भाग माझ्याकडे आहेत. आता हेही घेईन असे म्हणतो.
- जंतूरावांच्या लेखनाच्या प्रतीक्षेत असलेला.

मी_ओंकार's picture

6 Sep 2010 - 12:38 am | मी_ओंकार

- जंतूरावांच्या लेखनाच्या प्रतीक्षेत असलेला

सहज's picture

6 Sep 2010 - 4:39 am | सहज

पुस्तकाची यादीमधे नोंद करुन ठेवली आहे.

'क्रिएटिव्ह रायटींग' विषयावर धागाप्रवर्तक स्व:ता एक छान पुस्तक लिहू शकतील असे वाटते खरे.

दत्ता काळे's picture

5 Sep 2010 - 7:23 pm | दत्ता काळे

वाचू आनंदे चे काही निवडक भाग आणि राधाचं घर ही पुस्तके माझ्याकडे आहेत.

तसेच लहान आणि कुमारवयातील मुलांसाठी 'वंचित विकास' ह्या समाजसेवी संस्थेचे श्री.विलास चाफेकर ह्यांनी सुरु केलेले 'रानवारा'नावाचे पाक्षिक आणि ज्ञानप्रबोधिनीचे 'छात्र प्रबोधन' नावाचे मासिक ही दोन्ही पुस्तके खूप वाचण्यासारखी आहेत.

सुनील's picture

5 Sep 2010 - 7:33 pm | सुनील

छान, विस्तृत परिचय आवडला.

भाषा शिकणे आणि शिकवणे ही सोपी गोष्ट नाही. मराठी काय मातृभाषाच म्हणून दुर्लक्षच करण्याकडे ओढ असते. प्रमाणभाषा आणि प्रमाणलेखन (मी शुद्ध हा शब्द मुद्दामहून टाळला आहे) ह्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. क्वचित हेटाळणीच केली जाते.

नेमकेपणाच्या अभावामुळेच, "गतीरोधक पुढे आहे", अश्या सरकारी पाट्या हमरत्यावर लागतात आणि लोकं त्या वर्षानुवर्षे चालवून घेतात!

पुस्तक संचाची विस्तृत, व्यापक, सर्वंकष, अनेक बाजूंनी ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
हे खरं आहे की भाषा ही सातत्यानी वापरली नाही तर आपल्यापुरता तरी ती मृत होते. मला १० वर्षांपूर्वी मराठी जितकं सफाईदार बोलता यायचं तितकं आता येत नाही. खूप वाईट वाटतं. याहूनही वाईट वाटतं ते या गोष्टीचं की स्वतःला मराठीतून व्यक्त करणं आता कठीण वाटतं.
भारतात येईन तेव्हा ही पुस्तकं विकत घेईन.
आपलं सर्व लिखाण मला आवडतं.