काळीज विदीर्ण करणारी ती बातमी ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. अंगातील त्राण निघून गेल्यासारखं झालं. गात्रं शिथील झाली. हाडांचा भुगा होऊन त्यांची पावडर हवेत धुक्यासारखी उडायला लागल्याचा भास झाला. धरणीमाता दुभंगून आपल्याला उदरात घेईल तर बरं, असं वाटायला लागलं.
तशीच भयाण परिस्थिती निर्माण झाली होती...
...
दबंग`मधील `मुन्नी बदनाम हुई` या गाण्यावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी कुण्या नतद्रष्टानं न्यायालयात धाव घेतली होती...
देशहितकारक, संस्कृतीरक्षक, समाजोपयोगी कार्य कुणी करायला घेतलं, की त्यात खोडा घालणारे उपटसुंभ रिकामटेकडे अनेक असतात. अरबाज खाननं केवढ्या उदात्त हेतूनं त्याच्या `दबंग`मध्ये हे गाणं टाकलं!स्त्रीला कवडीमोल समजणा-या, तिच्या भावनांना, विचारांना काडीचीही किंमत न देणा-या आपल्या समाजाच्या तोंडात मारणारं हे गाणं. `मुन्नी बदनाम हुई..डार्लिंग तेरे लिये...` किती अर्थवाही शब्द. किती अप्रतिम चाल...आपल्यासाठी अतिप्रिय असलेल्या आपल्या प्रियकराला उद्देशून, समाजाची पर्वा न करता, सर्व बंधनं झुगारून आपल्या प्रेमभावना मुक्तपणे व्यक्त करणारी ही रूपगर्विता...सगळ्या जगाला ओरडून सांगतेय, `मुन्नी बदनाम हुई...डार्लिंग तेरे लिये...` कुणी ऐकेल, तिला विरोध करेल, याची तिला अजिबात पर्वा नाही. आपल्या पवित्र, उदात्त प्रेमासाठी कोणत्याही त्यागाची तिची तयारी आहे. भले समाजानं नावं ठेवली तरी चालतील! तिचं प्रेम अढळ आहे. तिची निष्ठा अविचल आहे. तिचा निर्धार दबंग...सॉरी..अभंग आहे.
भारतीय संस्कृतीचं मोल आणि सार किती सार्थपणे मांडलंय मोजक्या शब्दांतून...किती समर्पक उपमा! किती नेमक्या भावना! काय उत्स्फूर्त नृत्य!!
गाण्यातल्या नेमक्या भावना, विचार आपल्या अंगप्रत्यंगातून समर्थपणे प्रेक्षकांपर्यंत पोचविण्यासाठी भारतीय सौंदर्याचं मूर्तिमंत प्रतीक असलेली तशीच समर्थ अभिनेत्री, नृत्यांगनाही हवी. अरबाज खाननं हे शिवधनुष्य पेलण्यासाठी आपल्या सहधर्मचारिणीलाच साकडं घातलं. तिनंही पतीची आज्ञा शिरसावंद्य मानून ही कामगिरी लीलया पार पाडलेय. प्रेक्षकांच्या हृदयांचा आणि स्वतःच्या हाडांचा चक्काचूर होईल, याची पर्वाही न करता तिनं गाण्यातल्या भावना, विचार नेमकेपणानं प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी किती विद्युल्लतेच्या वेगानं कंबर लचकवलेय पाहा...
प्रत्यक्ष जीवनात नणंद-भावजयीचं पवित्र नातं कसं असावं, याचं किती यथार्थ दर्शन सलमान-मलायकाच्या नृत्यातून घडतं...वहिनी असावी तर अशी असं प्रत्येकाला वाटलं नाही, तर ज्याचं नाव ते.
चित्रपट संगीताची ओळख बदलून टाकणा-या, गीतलेखन-नृत्यशैलीला नवी दिशा दाखवणा-या, भारतीय संस्कृतीची महती नेमक्या शब्दांत पटवून देणा-या या गाण्यावर बंदी घालण्याची मागणी करणं, त्यासाठी निर्मात्यांना कोर्टात खेचणं, याला करंटेपणा म्हणावं नाहीतर काय..
...
दुःखालाही सुखाची सोनेरी किनार असते म्हणतात. `मुन्नी बदनाम हुई`वर बंदी येण्याच्या नैराश्यजनक, विदारक बातमीच्या सोबत एक आशेचा किरण आहेच....त्यातल्या हिंदुस्थान एवढ्याच शब्दाला याचिकाकर्त्याचा आक्षेप आहे. त्यामुळे देशाचा अवमान होत असल्याचा त्याचा दावा आहे. चला...म्हणजे तेवढा शब्द काढला, तर गाणं या भीषण संकटातून सहीसलामत सुटण्याची चिन्हं आहेत. देव पावला!
प्रतिक्रिया
31 Aug 2010 - 8:24 am | राजेश घासकडवी
गाणं मस्त आहे. हिंदी सिनेमातल्या गाण्यांतून संस्कृतीसंवर्धनाच्या अपेक्षा बाळगण्याबाबत छद्मलेखन करण्याविषयी काय बोलावं? अहो, हिंदी सिनेमा हेच संस्कृतीचं अविभाज्य अंग आहे हे कोणाला कधी कळणार?
31 Aug 2010 - 10:24 am | विश्वनाथ मेहेंदळे
गुर्जी, तुम्ही हे उपरोधाने लिहिले नाही असे गृहीत धरून -> दुसऱ्या वाक्याशी सहमत आहे.
बाकी, सलमान आणि मलायिका हे दीर-भावजय आहेत हा इथे गैरलागू मुद्दा. ते अभिनेते आहेत (म्हणजे तसा प्रयत्न करतात). प्रणयप्रसंग नाही ना दाखवला, मग काय बिघडले ?
31 Aug 2010 - 10:30 am | राजेश घासकडवी
म्हणजे नक्की काय? मूळ लेख उपरोधाने लिहिला आहे का? तो तसा लिहिला नसल्यास भारतीय संस्कृती म्हणजे काय याविषयी गहन प्रश्न उपस्थित करतो. ते प्रश्न हाताळण्याचा प्रयत्न आहे इतकंच.
जरी दीर भावजय असतील तरी त्यांच्यात प्रणय प्रसंग चित्रित करण्यात काय हरकत आहे ते कळलं नाही. एक चादर मैलीसी या चित्रपटात भारतीय परंपरांचंच वर्णन आहे, नाही का?
31 Aug 2010 - 11:57 am | मृत्युन्जय
ते अभिनेतेच असतील तर प्रणयप्रसंग देखील दाखवला तर काय फरक पडतो?
31 Aug 2010 - 1:36 pm | विश्वनाथ मेहेंदळे
मला नाही पडत :-)
31 Aug 2010 - 10:10 am | विजुभाऊ
मुन्नी बदनाम हुवी....
या पुढची ओळ आहे
मै झंडु बाम हुवी डारलिंग तेरे लिये
31 Aug 2010 - 10:17 am | आपला अभिजित
मुन्नी बदनाम हुवी....
या पुढची ओळ आहे
मै झंडु बाम हुवी डारलिंग तेरे लिये
तुमचं काही म्हणणं अर्धवट राहिलंय का?
31 Aug 2010 - 10:28 am | मस्त कलंदर
छान लिहिलेय.
अगली और पगली मधल्या मैं टल्ली हो गई या गाण्याचेही असेच काहीसे छान रसग्रहण कुणीतरी केले होते.
31 Aug 2010 - 2:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मै टल्ली हो गयी याच नावाने आजानुकर्णाने लिहिलं होतं. हे पहा.
परवाच चुकून हे गाणं बघण्याचा दुर्धर प्रसंग ओढवला, सलमानचे लटके झटके पाहून त्याला अर्ध्या सेकंदातच चेहेरा न पहाता ओळखला, तेव्हा स्वतःवरच किती वाईट वेळ आलेली आहे याची जाणीव झाली.
बाकी ही असली गाणी मला कधीमधी आवडतात. "मै सिनेमा हॉल हुई डार्लिंग तेरे लिये" वगैरे ओळींकडे दुर्लक्ष करायचं आणि सरळ हातपाय झाडत असल्या गाण्यांचा लुफ्त लुटायचा!
31 Aug 2010 - 1:55 pm | Nile
ते संस्कृती रक्षण फिक्षण आपल्याला काय माहित नाही. पहिल्यांदा गाणं ऐकलं तर डोकं दुखु लागलं. मुळात ते डार्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्लिंग कळालंच नव्हतं. पण एक दोनदा ऐकल्यावर (एकावे लागल्यावर) ते 'मे झंडु बाम हुई, डार्र्र्र्र्र्र्र्र्लिंग तेरे लिए' ऐकुन डोके दुखी जरा कमी झाली आणि मग असाच झंडु बाम माझ्या डोक्यावर लावायला मिळालं तर काय बहार येईल या विचारात आम्ही गढुन गेल्याने गाण्यातील पुढील शब्द ऐकुच आले नाहीत...
पी एस: सलमानला नाचताना पाहुन पुन्हा डोकेदुखी वाढल्याने व्हिडोची लिंक दिल्याबद्दल अभिजित यांचा निषेध. ;-)
31 Aug 2010 - 2:02 pm | परिकथेतील राजकुमार
आपल्याला तर बॉ असली गाणी आन व्हिडो लै म्हंजे लैच आवडतात.
उदा:- तिन पत्ती मधिल गाणे.
1 Sep 2010 - 3:49 am | बेसनलाडू
नुकत्याच तीन वर्षाचा झालेल्या पुतण्याच्या तोंडून "मैं झन्डूबाम हुई, डार्..लिंग तेरे लिये" हे ऐकले, तेव्हा असे काही गाणे आहे, हे पहिल्यांदा कळले. मग गाणे 'ऐकले', त्यानंतर 'बघितले' (ऐकल्यावर आवडले म्हणून :))
'बघितल्यानंतर'सुद्धा आवडले, कारण सलमान खानने नृत्याच्या नावाखाली जो काही गणेश विसर्जनाला करायचा तो नाच केलाय, तेव्हढाच अस्मादिकांस येतो. त्यामुळे गाणे, शब्द व चाल, मलायका, सलमान सगळेच फारच जवळचे वाटू लागले.
(नर्तक)बेसनलाडू
बाकी एरव्ही ऐकल्या जाणार्या सर्वानुमते चांगल्या,दर्जेदार गाण्यांचे रुटीन मोडीत काढायला मुन्नीसारखे - आय मिन या गाण्यासारखे - तोंडी लावणे हवेच!
(खवय्या)बेसनलाडू
1 Sep 2010 - 3:08 pm | आपला अभिजित
हे गाणं, त्यातला रावडी डान्स आपल्याला भयंकर आवडला. पण केवळ टवाळी उडवण्याच्या उद्देशानं (सवय!) हा हलकाफुलका लेख लिहिला. तो एवढ्या गांभीर्यानं घेण्याची गरज नव्हती. त्यातला उपरोध वाचकांना कळला नसेल, तर हे माझ्या (तथाकथित) लेखनशैलीचं अपयश म्हणायला हवं.
असो.
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
1 Sep 2010 - 3:51 pm | बिपिन कार्यकर्ते
हे एक अतिशय महान गाणे आहे. त्यातला सल्मानचा आणि त्याच्या वहिनीचा डंस तर केवळ एक लंबर्स. लै भन्नाट!!!
2 Sep 2010 - 10:27 am | विसोबा खेचर
मस्त रे.. :)
आपला,
(गानप्रेमी) तात्या.