एका तेलियाने

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जनातलं, मनातलं
29 Aug 2010 - 11:49 pm

आंतरराष्ट्रीय राजकारण हे जितकं रोचक तितकंच क्लिष्ट. तिथे एकाच वेळी प्रत्येक जण आपला पट मांडतो, आपली चाल खेळतो आणि त्याच वेळी प्रत्येक जण इतरांच्या पटावरचे प्यादे असतो. अश्या ह्या बहुआयामी राजकारणात जसजसं जग जवळ येऊ लागलं तसतशी अधिक क्लिष्टता व प्रसंगी अधिक रोचकता येऊ लागली. त्याच बरोबर हा पट शांत डोक्याने मांडून व इतरांच्या पटांवरील आपली परिस्थिती लक्षात घेऊन ज्यांनी हा खेळ खेळला ते त्या त्या मार्गाने पुढे गेले व इतर अनेक जण त्या खेळात वाईट प्रकारे भरडले गेले.
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जर कोणत्या एका गोष्टीभोवती आंतरराष्ट्रीय राजकारण फिरलं हा प्रश्न विचाराल तर "तेल" हे उत्तर कोणीही देईल. पण केवळ हे उत्तर माहित असण आणि तो खेळ समजून घेणं आणि दुसर्‍याला समजावणं हे अधिक कठीण. आणि ज्यांनी हा तेलाचा खेळ खेळला त्या "तेलियां" बद्दल काय बोलावे? अश्याच एका तेलियाबद्द्ल "शेख अहमद झाकी यामानी" यांच्याबद्दल श्री. गिरिष कुबेर यांनी लिहिलेले दमदार व रोचक पुस्तक म्हणज "एका तेलियाने". या पुस्तकात लेखक आपल्याला केवळ यामानी यांच्याबरोबरच इतर अनेक तेलियांची ओळख तर करून देतातच व त्याचबरोबर वाचक करतो ती आंतरराष्ट्रीय राजकारणाची एक अत्यंत रोचक, डोळे दिपवणारी आणि तरीही अस्वस्थ करणारी सफर!

यामानी हा सौदी अरेबियाचे माजी तेलमंत्री. आखातातील सौदी अरेबियासारख्या तेलावर तरंगणार्‍या देशाचे तेलमंत्री व तेही पुरी २५ वर्षे पदभार सांभाळणारा हा तेलिया वाचकाला गुंग करून ठेवतो. सौदी अरेबियाच्या जन्मापासून सूरू होणारी ही कथा अरबांच्या मागासलेपणापासूनही सुरू होते. वाळवंटातील टोळ्यांचे तेलामुळे अचानक होणार्‍या मिळकतीने दिवस बदलतात. अर्थातच पश्चिमी जग ही ताक्द ओळखून तिथे आपले बस्तान बसवते व अरबांच्या तोंडाला पाने पुसून केवळ काहि पैसे व सुंदर बायकांच्या बदल्यात खोर्‍याने तेल ओढत असते. अश्यावेळी यामानींच्या रुपाने सौदी अरेबियाला तेलमंत्री मिळतो व एकुणच अरबस्थानाच्या नशीबाने राजे फैजल त्यावेळी सत्तेवर असतात.

पुढे ओपेक, ओआपेकचे राजकारण. गडाफी, इराणी शहा वगैरे तेलिये, ओपेकच्या एकजुटीने पाश्चिमात्यांचे घटते वर्चस्व, त्याच दरम्यान उफाळु लागलेला इस्त्रायल वाद, इजिप्तच्या खेळ्या, अमेरिका, ब्रिटन च्या चाली, रशियाची प्रत्युत्तरे, फ्रेंच, जर्मन, नेदरलंड, अल्जेरिया, इराक, कुवेत, इराण, इस्त्रायल, येमेन, जॉर्डन, जपान अश्या बहुविध खेळाडुंनी व त्याच वेळी प्याद्यांनी, रचलेले व्युह व ते राजे फैजल यांच्या मदतीने भेदणारे यामानी वाचाकाला पुस्तक संपेपर्यंत खिळवून ठेवतात.

एकतर ह्या पुस्तकात उल्लेख असलेले बरेच जण नेहमीचे ऐकलेले-वाचलेले आहेत. तेलसंकट, इराण-इराक युद्धे, शीतयुद्धे, इस्त्रायल प्रश्न वगैरे तर अनेकांनी अनुभवलेली आहेत. त्यामुळे त्यातील संदर्भ, प्रसंग, व्यक्ती, शहरे यांचे उल्लेख वाचकाची त्या राजकारणाची सहज नाळ बांधतात. एक उदा. देतो. अमेरिका तेलबंदी आल्यावर ओपेकप्रमाणे तेल खरेदीदारांची संघटना बांधण्यासाठी परिषद घेणार होती. तसे काहि झाले असते तर तो तेल उत्पादक देशांना झटका असता. अश्यावेळी यामानी यांची मुत्सद्देगिरी सगळ्यांना आठवत असेलच. आता हा परिच्छेद बघा तो वाचून अनेकांनी ही बातमी वाचल्याचं आठवेल

" सा सार्‍या पार्श्वभूमीवर यामानी जेव्हा पॅरीसला उतरले तेव्हा फ्रान्सचे अध्यक्ष जॉर्जेस पापेंदू यांच्या स्वागतासाठी विमानतळावर जातीने हजर होते. हा प्रकार आता वारंवार घडणार होता. ह्या दौर्‍यात एका साध्या मंत्र्याच्या स्वागताला राष्ट्रप्रमुखांनी जाणं साजेसं होणार होतं. सारी माध्यमं हे तेलमंत्री काय बोलतात त्याकडे डोळे लाऊन होती. फ्रान्सने आपली आधीचीच भुमिका मांडली. इस्त्रायलने १९६७च्या युद्धापासून व्यापलेला अरब देश व पॅलेस्टाईन भुभाग परत करावा अशी स्वच्छ भुमिका घेतली. याला प्रतिसाद म्हणून यामानींनी लगेच घोषणा केली फ्रान्सला तेलकपातीतून वगळायची. दुसर्‍या दिवशी फ्रान्सच काय जगातील सार्‍या वृत्तपत्रांनी यामानींची बातमी छायाचित्रासकट छापली"
"पुढच मुक्काम होता लंडन. या देशाची भुमिकाही स्वछ होती. कधी नव्हे ते अमेरिकाच्या कच्छपी असलेल्या इंग्लंडनं आता महासत्तेची कास सोडली व इस्त्रायलचा निषेध केला. त्यामुळे इंग्लंडचं काय करायचं ते यामानींना माहित होतं. ते लंडनला उतरले तेव्हा इंग्लंड मध्ययुगीन मागास भागासारखं वाटत होतं. वीज नाही , बँका कोलमडलेल्या, कोळसा संपामुळे रेल्वे बंद आणि नाताळचा सण. यामानींनी इंग्लंडला पूर्वी होता तितका तेल पुरवठा सूरू करण्याचं घोषित केलं व पुन्हा यालाही प्रसिद्धी मिळाली"

हे सारं वाचकाला लख्ख आठवतं, पुढे बेल्जियम, जर्मनी इतकंच काय राजनैतिक संकेत झुगारून तेलमंत्र्यांच्या भेटीला आलेले जपानचे सम्राट काय सगळं वाचक आठवतो आणि पुढे झालेल्या अमेरिकेच्या पचक्याची आठवण होऊन वाचक मनात हसतो आणि उत्कंठेने पुढचे पान उलटतो.

ज्या यामानींना नुसता ताप जरी आला तरी वॉल स्ट्रीट गडगडायचा त्यांची कार्यपद्धती, व्युहरचना आणि मुख्य मणजे देशाभिमान व देशप्रेम बघितलं की त्यांना सलाम ठोकावासा वाटतो. आणि ही राजकारणाची व्याप्ती व त्याचे गरीब देशांवरचे भयावह परिणाम बघितल्यावर त्याकाळी तुलनेने गरीब असलेल्या भारताने ना खेळिया होऊन ना प्यादे बनून म्हणजेच बरेचसे अलिप्त राहून किती बरं केलं असंही वाटून जातं.

थोडक्यात काय तर आंतरराष्ट्रीय राजकारणाची रंजक शैलीत मजा घ्यायची असेल तर हे पुस्तक वाचणे मस्ट आहे. अगदी मिळवून वाचावे असे!

पुस्तकः एका तेलियाने
लेखक: गिरीश कुबेर
प्रकाशकः राजहंस प्रकाशन
आवृत्ती: पहिली
पाने:२४७
किंमतः २०० रुपये

अर्थकारणराजकारणशिफारसआस्वाद

प्रतिक्रिया

इंटरनेटस्नेही's picture

30 Aug 2010 - 3:06 am | इंटरनेटस्नेही

अतिशय अभ्यासपुर्ण.

मुक्तसुनीत's picture

30 Aug 2010 - 3:15 am | मुक्तसुनीत

पुस्तक परिचय आवडला.

सुनील's picture

30 Aug 2010 - 6:20 am | सुनील

उत्तम परिचय.

सहज's picture

30 Aug 2010 - 7:13 am | सहज

'सुचेल तसं' या मिपासदस्यांनी देखील ह्या पुस्तकाची छान ओळख करुन दिल्याचे आठवले.

यामानी यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय राजकारणातील असे सामान्यांना फारसे माहीत नसलेले मुत्सद्दी व त्यांनी जागतीक राजकारणावर उठवलेला ठसा यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Aug 2010 - 8:07 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

याच परिक्षणामुळे 'एका तेलियाने' आणि 'हा तेल नावाचा इतिहास आहे' ही दोन्ही पुस्तके विकत घेऊन वाचली. आणि 'एका तेलियाने' अक्षरशः गोष्टीचं पुस्तक वाटावं असं सात-आठ वेळा वाचलं असेल. यामानींचं कर्तृत्व वादातीत.

आणि पुस्तकपरिचय आवडला.

ऋषिकेश's picture

30 Aug 2010 - 10:27 am | ऋषिकेश

मलाही हे पुस्तक इतकं आवडलं की ग्रंथालयातून आणून वाचलं आणि आता ते विकत घेणार आहे.. मग माझेही बर्‍याचदा वाचणे होईल हे नक्की! बाकी सहजरावांनी दिलेला दुवा माहित नव्हता.. मागे पुस्तकविश्ववर कोणीतरी (बहुदा निदे) ह्या पुस्तकाची शिफारस केली होती.. वाचायच्या यादीत होतंच..

परिकथेतील राजकुमार's picture

30 Aug 2010 - 12:02 pm | परिकथेतील राजकुमार

हेच बोल्तो.
पुस्तक कमीतकमी ५/६ वेळा वाचुन झाले आहे. प्रत्येक वेळी वाचताना तेवढेच माहितीपुर्ण आणि आनंददायी वाटले. गंमंत म्हणजे रोजच्या बदलत्या जागतीक राजकारणाच्या पार्श्वभुमीवर दरवेळी हे पुस्तक वाचताना, नवनवे संदर्भ लागत जातात आणि अजुन मजा येते.

चतुरंग's picture

31 Aug 2010 - 6:36 am | चतुरंग

त्या आधीच्या धाग्यावर मी मोठा प्रतिसाद दिला होता. पुस्तक छानच आहे. आता पुन्हा वाचायला घेईल!

चतुरंग इब्न सौद

अर्धवट's picture

30 Aug 2010 - 7:54 am | अर्धवट

खुप छान पुस्तक आहे हे..

कुबेरांचंच 'हा तेल नावाचा इतीहास आहे' यावर पण लिहा की काहितरी

ऋषिकेश's picture

30 Aug 2010 - 10:29 am | ऋषिकेश

प्रतिक्रीयेसाठी आभार!. "हा तेल नावाचा इतिहास आहे" मी अजून वाचलेलं नाहि.. ग्रंथालयात बुक केलं आहे बघु कधी मिळते.. तुम्हाला ते पुस्तक आवडले असल्यास तुम्ही लिहा त्या पुस्तकाबद्दल... वाचायला आवडेल

पारुबाई's picture

30 Aug 2010 - 9:09 am | पारुबाई

मी पण हे पुस्तक वाचले आहे.
खूपच चान्गले लिहिलेले पुस्तक आहे.

तुम्ही छान ओळख करुन दिली आहे.

डॉ.श्रीराम दिवटे's picture

30 Aug 2010 - 9:20 am | डॉ.श्रीराम दिवटे

छान पुस्तक शिफारस

हे पुस्तक जबरदस्त आहे अमेरीकेचे सर्व कारनामे यात उघड केले आहेत

इन्द्र्राज पवार's picture

30 Aug 2010 - 10:36 am | इन्द्र्राज पवार

इथे वारंवार (सध्यातरी...) कोसळत असलेल्या 'कौलां'च्या सरीत पुस्तकावरील लेख हा एक सुखद (म्हणून स्वागतार्ह) धक्का आहे.

श्री.ऋषिकेश यांनी करून दिलेला या महत्वाच्या पुस्तकाचा (जो भारतीय राज्यव्यवस्था आणि आर्थिक व्यवस्थेशीही निगडीत आहे) परिचय निव्वळ सुंदर नाही तर वाचकांत पुस्तक तात्काळ मिळवावे आणि वाचावे याची उर्मी जागृत होईल. माझ्याकडे 'एका तेलियाने', 'हा तेल नावाचा इतिहास आहे' ही दोन्ही तसेच सौ.उज्ज्वला दळवी यांचे 'सोन्याच्या धुराचे ठसके' ही तिन्ही पुस्तके आहेत ज्यातून आखाती देशातील परिस्थितीचा लख्ख अनुभव येतो.

तेलावर आणि पेट्रो डॉलर्सवर कोणत्या स्तरावरची राजकीय शक्ती प्राप्त करता येते ते राजे फैझल यानी आताच्या काळात नव्हे तर १९७३ सालीच अमेरिकेसारख्या बलाढ्य ताकदीला दाखवून दिले होते. 'इस्त्रायली संघर्ष टाळण्यासाठी आपण काहीतरी करायला हवे. आत्ताची आपली "जैसे थे" ची भूमिका सौदीला अजिबात मान्य नाही. यानंतरही आपल्याकडून काही हालचाल झाली नाही, तर सौदीला आपल्यातलं सहकार्य संपुष्टात आणावं लागेल. मग होणार्‍या संघर्षात तेल हे आमचं अस्त्र असेल, याची जाणीव असू द्या.' असा जबरदस्त खलिता प्रे.रिचर्ड निक्सन सारख्यांना पाठविण्याची हिम्मत राजे फैझल यांनी दाखविली होती. (हे संपूर्ण प्रकरण 'एका तेलियाने' याच पुस्तकात सविस्तरपणे लेखकाने चितारले आहेच). या तुलनेत नेमस्त राजकारणाचा ढिसाळ पाया असलेल्या आपल्या भारताकडून कधी असा सज्जड खलिता पाक वा चीनला जाईल याची सुतराम शक्यता नाही.

असो. या निमित्ताने श्री.ऋषिकेश यांचे या परिचयपर लेखाबद्दल अभिनंदन.

इन्द्र

चिंतामणी's picture

30 Aug 2010 - 11:23 am | चिंतामणी

पुस्तक परीचय छान आहे. "एका तेलीयाने" हे नाव ऐकुन वाचायला मागीतले असते की नाही हे सांगता येत नाही.
आता मात्र वेळ मिळाला की नक्कीच वाचीन.

स्वाती दिनेश's picture

30 Aug 2010 - 11:39 am | स्वाती दिनेश

छान ओळख ऋ,
पुढच्या भारतवारीतल्या पुस्तकयादीत नोंद केली आहे.:)
स्वाती

विकास's picture

31 Aug 2010 - 9:25 am | विकास

असेच म्हणतो. विशलीस्टमधे टाकले आहे.

नंदन's picture

31 Aug 2010 - 10:21 am | नंदन

असेच म्हणतो, पुस्तकपरिचय आवडला.

विलासराव's picture

30 Aug 2010 - 12:51 pm | विलासराव

छान परिचय करुन दिलात त्याबद्दल धन्यवाद.
वाचतोच आता हे पुस्तक.

दाद's picture

30 Aug 2010 - 2:55 pm | दाद

परिचयाला दाद!

अवलिया's picture

30 Aug 2010 - 4:56 pm | अवलिया

चांगला परिचय.

निखिल देशपांडे's picture

30 Aug 2010 - 8:17 pm | निखिल देशपांडे

पुस्तक संग्रही आहेच :-)
ॠ परिचय उत्तम झाला आहे हे सांगायला नकोच.
लवकरच सविस्तर प्रतिसाद देतोच

ऋषिकेश's picture

31 Aug 2010 - 12:24 am | ऋषिकेश

सर्व वाचकांचे व प्रतिसादकांचे प्रोत्साहनपर प्रतिक्रियांबद्दल अनेक आभार!
ज्यांनी वाचलं नसेल त्यांनी पुस्तक वाचल्यावर नक्की सांगा कसं वाटलं ते.

राजेश घासकडवी's picture

31 Aug 2010 - 3:41 am | राजेश घासकडवी

अत्यंत प्रभावी भाषेत लिहिलेला परिचय आवडला. अजून तुम्हाला आवडलेल्या पुस्तकांबाबत लिहीत जा.

विलासराव's picture

23 Sep 2010 - 10:16 pm | विलासराव

धन्यवाद ऋषिकेश.
खरोखर नाव वाचुन मि हे पुस्तक कधीही वाचले नसते.
पण तुमच्याकडुन प्रथमच हे नाव ऐकले आनी येथील प्रतिसाद वाचुन तर लगेच ग्रंथालयातून आणून वाचलं आणि आता ते विकत घेणार आहे.
खरोखर इतके अप्रतिम पुस्तक आहे कि परत परत वाचाव असं वाटतय.