का जिवाला आज त्याच्या लागली हुरहूर आहे?
कोण अज्ञातातुनी निर्यातले काहूर आहे?
लोक सारे दूर जाती - तो जरा दिसला कुठे की!
हे खरे का? की अताशा तोच त्याच्या दूर आहे?
दिसत आहे तो असा शुद्धीतला माणूस का रे?
बिघडले का आज कांही? - और त्याचा नूर आहे
गीत जे तो गात आहे बेसुरे आहे खरे ते
(शुद्ध नाही लागला - शुद्धीतला कणसूर आहे)
पैज लावा - कीर्त त्याची फारशी टिकणार नाही
तेवणारी ज्योत ना तो धधकता कापूर आहे
प्रतिक्रिया
13 Aug 2010 - 11:55 am | शरद
तो कुणी माझ्यातला तो
आरती प्रभूंच्या "तो कुणी माझ्यातला तो" या कवितेची आठवण झाली.तेथे "मी" व "माझ्यातला" यांच्यातला संवाद-विसंवाद सांगितला आहे. खरे तर हे द्वैत सर्वांमधील व सर्वकालीन. प्रत्येक कवी मांडणी निरनिराळी करतो. येथेही मी चा उल्लेख नाही पण "त्याच्या" म्हणजेच "आंतील माझ्या"शी कवितेचा सांधा जुळवणे फार सोपे आहे. आपल्याला लागलेली हुरहुर का लागली आहे हे जेव्हा स्वत:लाच कळत नाही तेव्हा ती पहिले कडवे सांगते त्याप्रमाणे अज्ञातातली काहूर नसते काय ? माणसे दुरावतात तेव्हा दरवेळी त्यांच्या लक्षात आलेले असते की वरून तुम्ही कितीही सौजन्याने बोलत असलात तरी आतून तुम्ही दुरावलेलेच आहात. अशावेळी स्वर शुद्ध नाही लागत नाही. जोवर मुखवटे धारण करून तुम्ही जगात वागत असता तोवर जुळवून घेणे दोनही बाजूंनी सोपे असते पण एकदा हा मुखवटा गळून पडला की "कीर्त" किती वेळ टिकणार हो ? "तेवणारी ज्योत ना तो धगधगता कापूर आहे " ही ओळ आरती प्रभूंच्या "अग्निज्वाळेच्या परी तो नग्न आहे केशरी" शी तुलना करून पहाण्यासारखी आहे. एक छान कविता.
शरद
13 Aug 2010 - 5:34 pm | मुक्तसुनीत
विसुनानांची कविता आवडली.
आरती प्रभूंच्या "तो कुणी माझ्यातला तो" या कवितेची आठवण झाली.तेथे "मी" व "माझ्यातला" यांच्यातला संवाद-विसंवाद सांगितला आहे
"कधीकधी माझ्यातच पाहातो मी ..." ही पाडगांवकरांची कवितासुद्धा याच जातीची, नाही का ?
उपरोक्त कवितांबरोबरच थोरोचे ते "डिफरंट ड्रमर"चे वाक्यसुद्धा विसुनानांच्या कवितेमुळे आठवले.
13 Aug 2010 - 12:50 pm | मिसळभोक्ता
दिसत आहे तो असा शुद्धीतला माणूस का रे?
बिघडले का आज कांही? - और त्याचा नूर आहे
क्या बात है !
13 Aug 2010 - 12:53 pm | नितिन थत्ते
आवडली
13 Aug 2010 - 1:11 pm | घाटावरचे भट
मस्त...
13 Aug 2010 - 3:34 pm | निखिल देशपांडे
आवडली
13 Aug 2010 - 4:08 pm | राजेश घासकडवी
आवडली. थोडा दीर्घ प्रतिसाद द्यायची इच्छा आहे...जरा सावकाशीने देईन.
13 Aug 2010 - 5:36 pm | श्रावण मोडक
आवडली.
13 Aug 2010 - 5:57 pm | धनंजय
आवडली. कल्पना आणि रूपके नवीन आहेत आणि चपखल आहेत.
बारीकसारीक छिद्रान्वेष -
(शुद्ध नाही लागला - शुद्धीतला कणसूर आहे)
येथे कंस घालणे मुळीच पटले नाही. (माझ्याकरिता) त्या कंसांमुळे रोखठोक भेदक टीका न राहाता ती भित्रट कुजबुजलेली भुणभुण होते आहे. मात्र कवीने फार विचार करूनच कंस घातले आहेत, याची जाणीव आहे. त्यांनी कंस का घातले या कारणाबद्दल कल्पना आहे. त्यामुळे याबाबत न-पटणे बाजूला ठेवून कवीचा निर्णय मानून घेत आहे.
13 Aug 2010 - 6:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लोक सारे दूर जाती - तो जरा दिसला कुठे की!
हे खरे का? की अताशा तोच त्याच्या दूर आहे?
वरच्या दोन ओळी खासच. विसुनाना गझल आवडली.
-दिलीप बिरुटे
13 Aug 2010 - 7:41 pm | प्रदीप
आवडली.
13 Aug 2010 - 10:08 pm | क्रेमर
छान!
14 Aug 2010 - 10:38 am | विसुनाना
प्रतिसाद देणार्या सर्वांना मनापासून धन्यवाद.
14 Aug 2010 - 10:55 am | लिखाळ
वा .. गजल आवडली.
16 Aug 2010 - 7:31 pm | राघव
सर्वच द्विपदी उत्तम ! कणसूर शब्दाचा वापर आवडला. :)
एक शंका -
तेवणारी ज्योत ना तो धधकता कापूर आहे येथे नक्की काय म्हणायचे आहे त्याबद्दल जरा गोंधळ झाला,
१. तेवणारी ज्योत नाही, तो धधकता कापूर आहे असे म्हणायचे आहे की,
२. तेवणारी ज्योत नाही, ना तो धधकता कापूर आहे असे म्हणायचे आहे??
बाकी जास्त लिहिण्याची गरजच नाही. अप्रतीम रचना. अभिनंदन!
17 Aug 2010 - 11:08 am | विसुनाना
तर धधकता कापूर आहे.
पहिला पर्याय.
16 Aug 2010 - 8:38 pm | चतुरंग
(विसूनाना, तुमच्या कडून फारच कमी लिहिले जाते अशी माझी तक्रार आहे!)
-चतुरंग
17 Aug 2010 - 2:26 pm | नंदन
गझल! सार्याच द्विपदी आवडल्या - खासकरून कणसूर आणि पहिल्या शेरातली 'पर्युत्सुकीभवति'ची भावना.