First Things First

पारुबाई's picture
पारुबाई in जनातलं, मनातलं
8 Aug 2010 - 3:27 am

आपण सगळेच जण आपल्या रोजच्या रुटीन मध्ये वेळेचे नियोजन (Time Management) करत असतो. त्या विषयावरची वेगवेगळी पुस्तके वाचत असतो, टिप्स मिळवत असतो. अश्याच एका प्रयत्नामध्ये काही वर्षांपूर्वी माझ्या वाचनात एक उल्लेखनीय पुस्तक आले.ते पुस्तक आहे Stephen Covey चे First Things First. तुम्ही वाचले आहे का हे पुस्तक ? ज्यांनी अजून वाचलेले नाही त्यांनी आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे.

या पुस्तकामध्ये एक छान गोष्ट मांडली आहे, ती म्हणजे आयुष्य अर्थपूर्ण आणि परिपूर्ण बनवण्यासाठी वेळेचे गणित कसे मांडायचे या विषयीचे मार्गदर्शन.आयुष्यात Time management सगळ्यांनाच करावे लागते.पण आयुष्य सुंदर करण्याकरता, आयुष्याला अर्थ देण्याकरता फक्त तेवढेच करून भागत नाही, तर प्रथम आपल्या विचारांची दिशा बदलावी लागते. आणि हेच लेखकाने या पुस्तकात सांगितले आहे.

वेळेचे नियोजन या विषयावर आत्ता पर्यंत अगणित पुस्तके लिहिली गेली आहेत. कमी वेळात जास्त कामे कशी करावी ,वेळेची आखणी कशी करावी,अशी अनेक वेळेशी निगडीत असलेली तंत्रे शोधली गेली.उदा. यादी बनवा, किंवा प्राधान्य ठरवा किंवा कामे दुसर्यावर सोपवा,ए बी सी अनालिसिस करा,८०-२० चा नियम लावा असे उपाय एका पाठोपाठ विकसित झाले.पण हे सगळे उपाय होते कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम कसे करायचे ह्या प्रश्नाशी निगडीत. लेखकाच्या मते ही सगळी कालबाह्य तंत्रे झाली. ह्याचा उपयोग नाही असे नाही. पण आयुष्य अर्थ पूर्ण बनवण्य करता आयुष्याचे सुकाणू कोणत्या दिशेला जात आहे हे ओळखणे जास्त महत्वाचे आहे असे लेखकाला वाटते..

लेखक म्हणतो आपण कितीही वेळेचे उत्तम नियोजन केले तरी आपल्याला आपल्या आवडत्या गोष्टी करायला वेळ बाजूला काढता येत नाही. त्यामुळे किती तरी मनातल्या गोष्टी मनातच राहून जातात. वाटते, काय अर्थ आहे या आयुष्याला? अश्या वेळेस काय करावे? पुस्तकाची सुरुवातच लेखकाने अशी केली आहे कि सांगा तुमच्या मनात अशा कोणत्या गोष्टी आहेत कि ज्या केल्याने तुम्हाला तुमचे आयुष्य सार्थकी लागले असे वाटणार आहे? या वर्गात बसणाऱ्या फक्त ३-४ महत्वाच्या गोष्टी लिहून काढा.प्रथम ठरवा तुम्हाला आयुष्यात काय करायचे आहे. मग लेखक विचारतो की या ३-४ गोष्टीना तुम्ही पुरेसा वेळ देत आहात का, याचा विचार करा. किंवा असा विचार करा कि तुमच्या साठीशांतीला तुमच्याबद्दल लोकांनी काय म्हणावे असे तुम्हाला वाटते? या प्रश्नामधून आपल्याला अनेक प्रश्नाची उत्तरे सापडतात. या प्रश्नामध्ये उभ्या आयुष्याचे गमक दडलेले आहे. या ३-४ गोष्टी म्हणजेच First Things आणि या First Things ना आयुष्यात प्राधान्य द्यायचे ह्याबद्दल लेखकाने मार्ग सांगितले आहेत.

खरे तर आपल्याला हे अनेकदा जाणवत असते कि आपण आपल्या रुटीन मध्ये, रोजच्या जबाब दार्या मध्ये किंवा अचानक उपटणार्या प्रश्नात इतके अडकून गेलेलो असतो की आपण कसे जगायचे ठरवले होते, कसे स्वताला घडवणार होतो, कसे मुलांना वाढवणार होतो, हे सगळे विचार काळाच्या ओघात मागे पडले आहेत. कधी तरी अंतर्मुख झाल्यावर जाणवते की नकळतपणे आपण ऐहिक सुखाच्या मागे धावतो आहोत, अनुभव गोळा करण्या पेक्षा वस्तू गोळा करणात धन्यता मानतो आहोत. या सगळ्यामुळे व्यक्ती म्हणून स्वताची उन्नती करायचे पार विसरून गेलेलो आहोत. मग आपण ' वेळ कोठे मिळतो ?' या सबबी खाली हे सगळे विचार झटकून टाकतो आणि परत पहिले पाढे पंचावन्न. पण यामध्ये तुम्ही आनंदी नसता, समाधानी नसता.

लेखक म्हणतो जोवर तुम्ही एक अर्थपूर्ण,परिपूर्ण जीवन जगत नाही तोवर तुम्हाला तुमच्या आयुष्याला काही अर्थ आहे असे वाटत नाही. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला फक्त अर्जंट आणि महत्वाची कामे करायची सवय असते,आणि या ज्या First Things आहेत त्या महत्वाच्या जरी असल्या तरी नेहमीच नॉन अर्जंट असतात आणि म्हणूनच त्या बाजूला पडतात. लेखक प्रथम आपल्याला ही सगळी महत्वाची,अर्जंट, नॉन अर्जंट, कमी महत्वाची कामे ओळखायला शिकवतो आणि मग First Things ला प्राधान्य द्यायला शिकवतो. रोजच्या रुटीन मध्ये ते कसे बसवायचे हे सांगतो. हे सांगत असताना लेखकाने अनेक शक्यता पण विचारात घेतल्या आहेत. जसे की माणूस म्हणजे काही यंत्र नव्हे. भावना मध्ये येतात, नाती सांभाळावी लागतात ,अनपेक्षित घटना घडतात. या सगळ्या गोष्टी आपल्या रुटीनचा पार बोर्या वाजवतात. या सर्व अडथळ्यांचा, शक्यता-अशक्यताचा विचार करत, हा कठीण वसा कसा सांभाळायचा हे लेखकाने सांगितले आहे.

हा वसा काही सोपा नाही. रोजच्या रोज नियमाप्रमाणे वागणे शक्य नसते. त्या करता सगळ्यात आधी गरज पडते मनोनिग्रहाची. हा मनोनिग्रह कसा मिळवायचा हे पण लेखकाने फार सुरेख पद्धतीने सांगितले आहे. तसेच कधी नियम वाकवणे (किंवा वेळप्रसंगी मोडणे) योग्य असते यावर देखील मार्गदर्शन केले आहे.

पुस्तक मोठे आहे - ३०० पानांचे. आणि त्यात पानोपानी इतके काही सांगितले आहे कि ते पुस्तक एका बैठकीत बसून संपवण्यासारखे नाही. लेखकाने असंख्य प्रशन विचारून आपल्याला अन्तर मुख होण्यास प्रवृत्त केला आहे. प्रत्येक प्रकरण वाचून झाल्यावर त्यात सांगितलेल्या गोष्टींवर विचार करून, मनन चिंतन करून त्या गोष्टी आपल्या आयुष्यात कश्या समाविष्ट करता येतील किंवा आपल्या आयुष्यात कोणते बदल करायला हवे आहेत याचा आढावा घेऊन मगच पुढचे प्रकरण वाचणे गरजेचे आहे.

तर्......अश्या असंख्य मार्गदर्शक तत्वांनी भरेलेले हे पुस्तक आहे. पुस्तक जेव्हा संपते तेव्हा आपल्याला आपण स्वताला एक समृद्ध व्यक्ती म्हणून कसे घडवायचे ,कसे आयुष्य परिपूर्ण आणि अर्थपूर्ण बनवायचे हे कळलेले असते. कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचे ,कधी काम-धाम विसरून ते ते क्षण फक्त मनापासून उपभोगायचे ...अश्या अनेक आत्ता पर्यंत न सापडलेल्या कित्येक प्रश्नाची उत्तरे सापडतात आणि हे उत्तरे दुसर्या कोणी आयती दिलेली नसून तुमची तुम्हीच शोधून काढलेली असतात,आपल्या सगळ्या मर्यादांचा,शक्यतांचा विचार करून आपण आपला मार्ग ठरवलेला असतो ही या पुस्तकाची फार मोठी जमेची बाजू आहे. आणि मग हे पुस्तक आपले 'गीता-भागवत' न झाले तर च नवल.

जीवनमानतंत्रमाहितीसमीक्षा

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

8 Aug 2010 - 3:37 am | बेसनलाडू

पुस्तकाची ओळख उत्तम करून दिली आहेत पारुबाई. माझ्यासारख्यांनी हे पुस्तक वाचणे व त्यातील तत्त्वे अमलात आणणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पुस्तक नक्की वाचेन.
(कालोपव्ययकुशल)बेसनलाडू

मस्त ओळख करून दिलीत पारुबाई. फारच सुरेख. पण काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी द्यावं लागतं त्याचं काय? : (
आय ऑल्सो वॉन्ट मून अ‍ॅन्ड स्टार्स.

पुस्तकाची छान ओळख करुन दिली आहे... :)

मुक्तसुनीत's picture

8 Aug 2010 - 6:12 am | मुक्तसुनीत

पुस्तकओळख आवडली. कॉलेजात असताना कोव्ही यांचे "सेव्हन हॅबिट्स.." वाचलेले आहे. "फर्स्ट थिंग्ज .... हे पुस्तक वाचलेले नाही.

पुस्तकाच्या ओळखीवरून पुस्तक वेळेच्या नियोजनापेक्षा होकायंत्राच्या म्हणा किंवा सुकाणुच्या म्हणा, महत्त्वाला अधोरेखित करणारे वाटले. हा प्रश्न सोपा नव्हे. एखादे बिघडलेले यंत्र कसे दुरुस्त करावे, किंवा ते यंत्र अत्यंत कार्यक्षम पद्धतीने कसे वापरावे याबद्दल बोलणे (मर्यादित अर्थाने) सोपे आहे. परंतु "आपले खरे यंत्र कुठले" "आपल्याला ते घेऊन कुठे पोचायचे आहे" हे प्रश्न एका सेल्फ-हेल्प पुस्तकाच्या कक्षेत बसतील असे सकृद्दर्शनी वाटत नाही.

असो. कोव्ही यांची दृष्टी चटपटीत अशा प्रश्नांची चटपटीत उत्तरे देण्यापेक्षा जास्त खोलवर , अर्थपूर्ण आयुष्याची मीमांसा करणारी आहे हे मला "सेव्हन हॅबिट्स" मधून जाणवले आहेच. हेही पुस्तक जमेल तसे वाचेन.

स्वाती दिनेश's picture

8 Aug 2010 - 11:47 am | स्वाती दिनेश

पुस्तकाची ओळख आवडली, मुसुंप्रमाणेच मलाही सेव्हन हॅबिट्स च लगेच आठवले. सेव्हन हॅबिट्स अर्थातच एक अप्रतिम पुस्तक आहेच.
फर्स्ट थिंग्ज हे पुस्तक मी वाचलेले नाही परंतु तुम्ही करुन दिलेल्या ओळखीनंतर नक्की वाचावेसे वाटते आहे,
स्वाती

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Aug 2010 - 6:14 pm | बिपिन कार्यकर्ते

सहसा अशी पुस्तके वाचत नाही पण तीन सॉलिड रेकमेंडेशन (पारूबाई, मुसु आणि स्वातीताई) असल्यामुळे वाचेन. ओळख उत्तम हो पारूबाई!!!

मुक्तसुनीत's picture

8 Aug 2010 - 6:21 pm | मुक्तसुनीत

हे प्रश्न एका सेल्फ-हेल्प पुस्तकाच्या कक्षेत बसतील असे सकृद्दर्शनी वाटत नाही
रेकमेंडेशन बरोबर हेही वाक्य नमूद व्हावे :-)

शिल्पा ब's picture

8 Aug 2010 - 6:17 am | शिल्पा ब

छान ओळख करून दिलीत...नक्की वाचेन.
वेळेचं नियोजन कठीण खरं पण थोड्याप्रमाणात (तरी ) शक्य व्हायला हरकत नाही...प्रयत्न करून पहायचा.

रेवती's picture

8 Aug 2010 - 6:44 am | रेवती

पारूबाई, तुमचे लेखन आवडले.
(या आधीचेही आवडले होते.
त्याचा पुढचा भाग कृपया लिहावा.)
या पुस्तकाची ओळख छान करून दिली आहेत.
सध्या वेळ आहे.....आणते आणि वाचते.
धन्यवाद!

आवडला परिचय.

पुस्तक वाचले आहे. पुन्हा एकदा वाचीन म्हणतो संधी मिळाल्यावर

अरुंधती's picture

8 Aug 2010 - 12:58 pm | अरुंधती

पुस्तक परिचय आवडला! :)

बबलु's picture

8 Aug 2010 - 2:01 pm | बबलु

बर्‍याच आधी वाचलंय ते पुस्तक.
पुन्हा वाचायला हवं.

पुष्करिणी's picture

8 Aug 2010 - 2:37 pm | पुष्करिणी

पुस्तक परिचय छान लिहिलाय.
वाचलय हे पुस्तक, संग्रही आहे. परत उजळणीची अत्यंत गरज आहे :)

योगी९००'s picture

8 Aug 2010 - 2:43 pm | योगी९००

बर्‍याच दिवसांनी मि.पा.वर काही वाचनीय असा धागा सुरू केल्याबद्दल अभिनंदन..

लेख आवडला..

स्वाती२'s picture

8 Aug 2010 - 4:32 pm | स्वाती२

पुस्तक परिचय आवडला.

चतुरंग's picture

8 Aug 2010 - 7:20 pm | चतुरंग

रोजच्या जगण्यातल्या प्रश्नांची सांगड आयुष्यातल्या मोठ्या प्रश्नांशी घालणे किंबहुना आयुष्यात नेमके मोठे प्रश्न कुठले हे शोधायला पुरेशी उसंत मिळावी ह्याकरता वेळेचे नियोजन हे अत्यंत आवश्यक ठरते.
वरती मुक्तसुनीत यांनी म्हटल्याप्रमाणे "खरे यंत्र कुठले" "नेमके जायचे कुठे आहे" ह्या प्रश्नांची उत्तरे जरी हे किंवा अशी पुस्तके देत नसले तरी तो विचार करण्यापर्यंत पोचायचे असेल तर हे नियोजन ही पहिली पायरी आहे असे वाटते.

खाली दिलेल्या चौकोनावर विचार करताना आपले आपल्यालाच प्रश्न पडत जातात. त्याची प्रामाणिक उत्तरे स्वतःलाच देणे हे आवश्यक ठरते.

स्वतः धावणे आणि आपल्या मुलामुलींनाही धावायला लावणे ह्यातून आपण स्वतःपासूनच लांब लांब पळत असतो का हा विचार करण्याजोगा आहे ('इयत्ता सहावीमध्ये आयायटी परीक्षा तयारी' ही चर्चा या निमित्ताने आठवली.)

(वाळूचेघड्याळ)चतुरंग

राजेश घासकडवी's picture

9 Aug 2010 - 2:58 am | राजेश घासकडवी

पारुबाई,

अतिशय चांगली ओळख.

मुसु व चतुरंग यांनीच मांडलेले मुद्दे परत मांडत नाही. जगाने मांडून ठेवलेली, रेडीमेड ध्येयं गाठण्याऐवजी आपलं काय ध्येय आहे, व त्यासाठी आपण काय करतोय हा विचार करणं अर्थातच महत्त्वाचं.

मात्र माझा या सर्व 'नियोजन' वादी पुस्तकांना आक्षेप हा असतो की कितीही सुकाणू, दिशा वगैरे केलं तरी ती नाव कशी वल्हवावी, त्यासाठी कुठची मेहेनत घ्यावी, वेळेचा हिशोब कसा ठेवावा याचीच ती पुस्तकं असतात. मग ती छोटी छोटी ध्येयंच होतात.

इंजिनियर व्हायचं असेल तर अमुक पुस्तकं अमुक इतक्या वेळा वाचून असे प्रश्न सोडवा हे व्यवस्थेचं उत्तर आहे. त्यापेक्षा थ्री इडियट्सचा संदेश अधिक आवडतो. ज्ञानाच्या प्रत्येक कणावर प्रेम करा, आपोआप तुम्हाला व्हायचं ते व्हालच हे व्यवस्थेबाहेरचं उत्तर त्यात आहे.

ध्येयापेक्षा मार्गाच्या प्रत्येक चढउतारावर लक्ष द्या असं काही लिहिलेलं असेल तर मला वाचायला आवडेल.