आयटीतल्या नवरा बायकोंचं एकमेकाशी पटेनासं झालं
काउन्सिलिंगला कपल शेवटी आमच्यापाशीच आलं
(मी विचारलं, हं सांग रे लग्न कसं ठरलं? तो म्हणाला..)
माझं सर्फींग चाललं होतं, ही विंडोत उभी दिसली
सहज पिंग केलं तशी सांगतो काय गोड हसली
आयडिया केली, आयडी शोधला, चॅटींगला इन्व्हाईट केलं
डेटाफाईल डाउनलोड केली, सांगा काय वाईट केलं?
फेसबुक, ऑर्कुट, हायफाय भेटी, मेसेज, मेल रोजच्या रोज
कॉन्फिग्रेशन जुळतंय वाटलं, मॅरेजसाठी केलं प्रपोज
(नंतर आमचं लग्न झालं... आता कळून चुकलंय...)
सुंदर आहे देखणी आहे पण नको तितकी बडबड आहे
हार्डवेअर तसं चांगलं, पण सॉफ्टवेअरमध्ये गडबड आहे
किचनमध्ये हिचं मन जरा सुद्धा रमत नाही
आयटीतल्या या मुलीला साधी भातआमटी जमत नाही
हट्टी, आळशी, हेकेखोर साध्या गोष्टीत करते प्रॉब्लेम
व्हायरस तेव्हा गावलाच नाही, कुणाला आता करायचं ब्लेम
(मग तिनं तिची बाजू मांडली)
हिरमुसलेली चिडून म्हणाली, याची माझी नोकरी निराळी
मी दिवसा कामाला जाते, याची नेहमीच रात्रपाळी
मी ही कमावते, याला म्हटलं, घरकामात कशाला मरु
स्वयंपाकपाणी, धुणीभांड्यांचं सरळ आउटसोर्सिंग करु
कामाचा इतका ताण, प्रोजेक्ट म्हणजे नसतो खेळ
हा मिसकॉल देतो तेव्हा, मला बघायलाही नसतो वेळ
महिनोन्-महिने भेट नाही, संसार पार घसरलेला
सुखाचं क्रेडिटकार्ड हातात, पासवर्ड मात्र विसरलेला
(संसार मोडू द्यायचाच नव्हता, मी समजूत काढत म्हणालो...)
सोसणं आणि सॅक्रिफाईज हाच संसाराचा असतो अर्थ
मॅरेजीस आर अरेंज्ड इन हेवन बट सफर्ड ऑन अर्थ
केल्या चुका विसरुन जा, फक्त धरा धीर थोडा
असा त्रागा नका करु, डायव्होर्सचा तर विचार सोडा
नोकर्या बदलतील, काळ बदलेल, भेगा काय सहज सांधाल
घरात पाळणा हलल्यावर, कायम कायम सुखानं नांदाल
प्रोग्राम त्याचा*, कंट्रोल त्याचा, बदलायचं आपल्यात बळ नसते
आयुष्याच्या कीबोर्डावर "कंट्रोल झेड"ची कळ नसते
*परमेश्वर. अर्थात System Administrator
-अविनाश ओगले
प्रतिक्रिया
3 Aug 2010 - 3:03 pm | शेखर
खुसखुशीत...
3 Aug 2010 - 3:06 pm | परिकथेतील राजकुमार
=)) =))
ह्यावरुन
Even god hates marriages! He makes them in Heaven and send the couple to Earth! हे आठवले.
3 Aug 2010 - 3:06 pm | नगरीनिरंजन
छान जमलीये!
3 Aug 2010 - 3:08 pm | ऋषिकेश
मी बर्याच दिवसांनी कविता वाचली तुमची.. धमाल शब्दातली करूण कविता
अजून येऊ द्या!
3 Aug 2010 - 3:08 pm | केशवसुमार
ओगलेशेठ,
बरेच दिवसांनी आगमन केलेत..
सुंदर आणि समयोचीत कविता..
(वाचक)केशवसुमार
3 Aug 2010 - 4:41 pm | मेघवेडा
असेच म्हणतो. काका, छान कविता!
3 Aug 2010 - 5:02 pm | गणपा
असेच म्हणतो. छान कविता!
4 Aug 2010 - 11:10 pm | धनंजय
आयडीचे नाव न बघता शीर्षक वाचून भीतभीत कविता उघडली.
शब्दकौशल्य लक्षात येताच चमकून आयडी तपासला. बर्याच दिवसांनी आले अविनाश ओगले, समयोचित लिहिते झाले - सहमत.
5 Aug 2010 - 6:20 am | सहज
हेच म्हणतो.
3 Aug 2010 - 4:24 pm | चिरोटा
एक्दम सही!!
मस्त जमली आहे कविता.
3 Aug 2010 - 4:38 pm | प्रकाश घाटपांडे
हॅ काय वायझेड कविता!
अशी प्रतिक्रिया येतीये का पहायला आलो होतो
3 Aug 2010 - 5:01 pm | भाऊ पाटील
चांगली कविता!
मस्त जमली आहे.
3 Aug 2010 - 5:54 pm | बहुगुणी
एकही शब्द आधिक-उणा नाही इतकी नेमकी उतरली आहे कविता, आणि या क्षणाला मिपावर 'प्रासंगिक' वाटली तरी आय-टी/ नॉन आय-टी हा वाद वगळला तर सार्वकालीन विषय आहे. इ मेल मधून फॉरवर्ड करावी इतकी आवडली.
4 Aug 2010 - 5:01 pm | युयुत्सु
+१
3 Aug 2010 - 5:57 pm | अवलिया
मस्त
3 Aug 2010 - 7:49 pm | शुचि
अ-प्र-ति-म
3 Aug 2010 - 8:51 pm | मिसळभोक्ता
कविता आवडली. मुख्य म्हणजे, समयोचित आहे !
अवांतरः
कंट्रोल-झेड : सस्पेंड प्रोग्राम
कंट्रोल-सी : किल प्रोग्राम
कंट्रोल-डी : एण्ड-ऑफ्-ईन्पुट
आयटीतल्या "रात्रपाळी" मुळे कण्ट्रोल-डी होते, आणि त्याची परिणिती कण्ट्रोल-झेड मध्ये लवकरच झाली नाही, तर कण्ट्रोल-सीची शक्यता असते.
4 Aug 2010 - 8:23 am | नगरीनिरंजन
'Undo' साठी वापरलंय कवितेत.
तुम्ही Unix वाले दिसताय. :-)
4 Aug 2010 - 4:35 am | स्वाती२
छान!
4 Aug 2010 - 5:11 pm | चतुरंग
अतिशय मार्मिक आणि समयोचित!
वाचायची राहून गेली होती ओगलेशेठ! :)
चतुरंग
6 Aug 2010 - 8:17 pm | विकास
असेच म्हणतो! आत्ता वाचली. फारच छान आहे.
4 Aug 2010 - 5:57 pm | मराठमोळा
एक नंबर कविता. जहबहर्या..
येऊ देत अजुन. :)
4 Aug 2010 - 6:58 pm | सुभाष् अक्कावार
तुमची ही कविता ई टिव्ही वरील हास्यरंग मध्ये ऐकली होती. छान आहे आवडली.
5 Aug 2010 - 8:12 am | मदनबाण
प्रोग्राम त्याचा*, कंट्रोल त्याचा, बदलायचं आपल्यात बळ नसते
आयुष्याच्या कीबोर्डावर "कंट्रोल झेड"ची कळ नसते
झकास !!! :)