उदंड जाहली कविता (१)
छे., छे, मला मिपावरील धों धों वहाणार्या कवितासरितेबद्दल टिपणी करावयाची नाही. त्या सरितेतल्या अंतर्गत भोवर्यांची अद्यापि ओळख झाली नाही म्हणून तीला "गंगौघ" म्हणावयासही माझी हरकत नाही. आजचा विषय तसा बराच जुना आहे. "महाराष्ट्र सारस्वत" पहिल्यांदी वाचावयास घेतले तेव्हा एक मजेदार नोंद दृष्टीस पडली. कै.भावे अतिशय कविताप्रिय, पण त्यांना समत्कालीन काव्याबद्दल अजिबात आवड नव्हती, थोडी अप्रियताच होती. त्याचे कारण त्यांनी असे दिले की, "आजचे कवी फार कमी लिहतात. मोजकेच लिहले तर कोणीही बर्यापैकी काव्य लिहील. पूर्वी कवी कसे भरपूर लिहित. त्यांचे काव्य म्हणजे पितांबर तर आजच्यांचे काव्य म्हणजे अरुंद लंगोटी." तुलना मजेदार आहेच पण खरेच तसे आहे का ? म्हटले, चला, बघू तरी नक्की काय आहे.
आता नव्या व जुन्या कवींच्या काव्याची तुलना कशी करणार ? येथे तुलना संख्येची (Quantity) आहे; गुणाची (Quality) नाही. कोणीही ९००० ओव्यांची ज्ञानेश्वरी व तीन ओळींचा हायकु यांना एक कविता म्हणणार नाही. तेव्हा ओवी, श्लोक, आर्या यांना एकांक (unit) धरू. पूर्वी यांना "ग्रंथ" म्हणावयाची पद्धत होती. तेव्हा ५ कडव्यांची कविता बरोबर ५ व ज्ञानेश्वरी बरोबर ९०००. ठीक.प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या. या पुढील सर्व आकडे अंदाजाने घ्यावयाचे. गणित समजून चालावयाचे नाही. काही कविता ४ कडव्यांच्या असतील तर काही ७. सरासरीने ५ धरा. सुरवात आजच्या कवींपासून करू. एका काव्यसंग्रहात ६०-७० कविता, प्रत्येक कविता बरोबर ५ एकांक, एक संग्रह बरोबर ३००-३५०. आपण ४०० धरून चालू. संग्रहात न आलेल्या २५% धरा व ५०० एकांक प्रत्येक संग्रहाला द्या. माझी माहिती नंतर बघू. तुमचे अंदाज प्रथम. सर्व काव्यप्रेमींना माझी आग्रहाची विनंती आहे की आपण पुढील दोन प्रश्नांची उत्तरे द्यावित.
(१) या शतकातील (इ.स.१९०० नंतरचे) बहुप्रसव कवी कोण व त्यांचे एकांक किती ?
(२) भारतातले सर्वात मोठे काव्य कोणते व त्याचा एकांक किती ?
दुसराभाग ४ दिवसांनी.
शरद
प्रतिक्रिया
2 Aug 2010 - 10:51 am | नितिन थत्ते
रोचक चर्चा विषय आहे. :)
2 Aug 2010 - 12:41 pm | अवलिया
आपल्या बुद्धि आणि क्षमतेच्या बाहेरचा विषय.
2 Aug 2010 - 3:33 pm | निखिलेश
ते सर्व आपणच करावे. उगाच आम्हास ''कामी आणू'' नये..
2 Aug 2010 - 6:01 pm | लिखाळ
रोचक.. पुढे वाचण्यास उत्सुक आहे. जाणकार काय म्हणतात पाहूया.
2 Aug 2010 - 6:16 pm | परिकथेतील राजकुमार
पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे...
दुसराभाग ४ दिवसांनी.