ते लोक होते वेगळे, घाईत जे गेले पुढे..

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
27 Jun 2010 - 2:42 pm

हा लेख इतरत्र पूर्वप्रकाशित. काल हा लेख मिपावर लिहावयास गेलो परंतु कामकाजानिमित्त मिपा बंद होते, त्यामुळे अन्य संस्थळावर लिहिला होता. आज मिपा सुरू झालेले पाहिले म्हणून इथेही डकवत आहे..
--तात्या.

माझे किती क्षण राहिले.. (येथे ऐका, येथे अनुभवा!)

दूर कुठेतरी आमिरखासाहेब मारवा आळवताहेत.. दूर कुठेतरी सुरेश भट मारवा उलगडून सांगताहेत..!

'माझे किती क्षण राहिले.. ' हा सुरेश भटांचा मारवा केवळ शब्दातीत आहे, अप्रतिम आहे!

ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे
मी मात्र थांबून पाहतो मागे कितीजण राहिले.!

स्वरांचं बॅलन्सिंग, स्वरांचं बेअरिंग जबरदस्त! अचूक स्वर लागले आहेत, नेमके लागले आहेत..! भटसाहेबांचा हा मारवा ऐकताना त्यांनी गाण्याची कुठे रीतसर तालीम घेतली आहे की काय, असं वाटतं अशी विलक्षण एकतानता, एकाग्रता..! सारं राज्य शब्दांचं, सारा अंमल सुरालयीचा!

भटसाहेबांचा कोमल रिषभ अंगावर येतो!

होता न साधा एवढा जो शब्द मी तुजला दिला
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले..

मारव्याच्या सुरावटीकरताच केवळ हे शब्द जन्माला आले.. आणि म्हणूनच भटसाहेबांनी हे शब्द मारव्यात गुंफले.. हे विलक्षण अद्वैत आहे.. शब्दांचं आणि मारव्याच्या सुरांचं!

गझल-गायकी म्हणजे काय ते इथे कळतं.. हो, गायकीच ही.. हे फुटकळ गझल वाचन नव्हे.. आज मराठी गझलांच्या वाचनाचे/सादरीकरणाचे अनेक कार्यक्रम होतात.. या सगळ्या नवख्यांनी शिकावं की गझल कशी वाचावी, कशी मांडावी.! पण त्या करता जाण असावी लागते स्वरांची. स्वर जगावे लागतात, अनुभवावे लागतात! त्याशिवाय मुशायरा-गायकीची पेशकारी येत नाही!

Suresh Bhat

ह्या गझल गायकीला ताल नाही की ठेका नाही, परंतु लय कशी घट्ट पकडली आहे ते पाहा.. एक अदृश्य लय!

लय- शब्दसुरांचा श्वासोश्वास!

उदाहरणार्थ -

एकाच शब्दाला उभे, आयुष्य तारण राहिले!

'उभे' शब्दानंतरचा लयदार पॉज.. "ष्य' अक्षरावरचा लयदार आधात.. आणि 'ष्य' - 'तारण' वरचा धम'गरेसा चा मारव्यातला भन्नाट अवरोह..! याला म्हणतात गाणं, याला म्हणतात लय, याला म्हणतात गायकी!

हे केवळ गझल-गायन वा वाचन नव्हे, हा तर मारव्याचा भन्नाट जमलेला विलंबित ख्याल! भटांचा हा मारवा अन् त्याची गायकी भिनते सिस्टिममध्ये!

काळवंडलेलं आकाश.. तीन सांजा झालेल्या.. भयाण तीन सांजा आणि अंगावर सरसरून येणारी कातरवेळ..!

हा मारवा नाही, हे स्वगत आहे.. भटसाहेबांचं स्वगत!

'मागे कितीजण राहिले हा हिशेब मागतो आहे हा मारवा! पण हिशेब द्या किंवा नका देऊ.. दुनियेला फाट्यावर मारतो हा मारवा आणि म्हणतो..

ओसाड माझे घर मुळी नाही बघायासारखे
हे आसवांचे तेवढे तोरण अद्याप राहिले..!

गेंद्याच्या फुलांचं तोरण काय, कुणीही बांधतो हो.. पण आसवांचं तोरण केवळ भटसाहेबच बांधू शकतात, त्यांच्या मारव्याचे सूर हीच त्या तोरणाची पानं-फुलं!

आकाशातले सारे ग्रह उच्चीचे होतात आणि सुरेश भटांसारखा एक अवलिया गझल लिहून जातो, मारवा गाऊन जातो..!

-- तात्या अभ्यंकर.

संगीतआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

27 Jun 2010 - 3:38 pm | अवलिया

छान ! सुरेखच !!

--अवलिया

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Jun 2010 - 3:42 pm | बिपिन कार्यकर्ते

अद्भुत आहे हे सगळं तात्या... शब्द, आवाज, लय ... सगळंच... तू उलगडलंय पण छानच.

बिपिन कार्यकर्ते

सहज's picture

27 Jun 2010 - 4:43 pm | सहज

आवाज मस्त आहे.

धन्यु!

सुनील's picture

27 Jun 2010 - 5:10 pm | सुनील

फारा वर्षांपूर्वी (जेव्हा भारतात फक्त आणि फक्त दूरदर्शनच होते), सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी भटसाहेबांच्या घेतलेल्या मुलाखतीचा कार्यक्रम झाला होता. ह्या कार्यक्रमात भटसाहेबांनी काही गझला मांडल्या होत्या. आज इतकी वर्षे होऊनही त्या कार्यक्रमाची आठवण ताजी आहे!

गझल गावी ती भटसाहेबांनीच!

जाता जाता = गेयतेच्या दृष्टीकोनातून पाहता, "जो शब्द मी तुला दिला" च्या ऐवजी "जो शब्द मी तुजला दिला", हे अधिक योग्य वाटते. मला वाटते. त्या कार्यक्रमातदेखिल भटसाहेबांनी "तुजला"असाच शब्द प्रयोग केला होता.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ऋषिकेश's picture

27 Jun 2010 - 5:20 pm | ऋषिकेश

इतकं सोदाहरण बर्‍याच दिवसांनी लिहिलंत
छान वाटली गझल ऐकायला.. येऊ देत अजून

ऋषिकेश
------------------
कोणीही जाहिरातीसाठी संपर्क न साधल्याने मीच माझ्या काहि आवडत्या ब्लॉग्सची जाहिरात करत आहे.
या आठवड्याचा ब्लॉग: मराठी साहित्य, लेखकः नंदन

स्वाती दिनेश's picture

27 Jun 2010 - 5:25 pm | स्वाती दिनेश

रसग्रहण आवडले,
स्वाती

स्वाती दिनेश's picture

27 Jun 2010 - 5:26 pm | स्वाती दिनेश

रसग्रहण आवडले,
स्वाती

भटसाहेबांनी गाण्याचं रीतसर शिक्षण घेतलेलं होतं असं मी वाचलं आहे.
सुरांचा, लयीचा अंदाज त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य भाग होत्या त्यामुळेच त्यांच्या गजला ह्या एक अंगभूत लय घेऊनच येत.
गदिमांच्या कवितेत जसे शब्द चपखल असत, एकही इकडचा तिकडे करता येत नसे तसेच भटांच्या गजलेचे आहे. अचूक शब्द, एकही फिरवता येत नाही!

लेखातले काही खटकलेले - एवढ्या सुंदर रसग्रहणाच्या लेखात 'दुनियेला फाट्यावर मारतो हा मारवा ..' सारखे वाक्य दाताखाली कचकन खडा यावा तसे वाटते.
---------------------------------
वरती सुनील म्हणतात त्याप्रमाणे 'तुजला' असाच शब्द आहे.
संपूर्ण गजल अशी आहे -
---------------------------------
आता जगायाचे किती क्षण राहिले?

आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले?
माझ्या धुळीचे शेवटी येथे किती कण राहिले?

ह्रदयात विझला चंद्रमा .. नयनी न उरल्या तारका ..
नाही म्हणायाला तुझे हे आपुलेपण राहिले

अजुनी कुणास्तव तेवतो हा मंद प्राणाचा दिवा?
अजुनी मला फसवायला हे कुठले निमंत्रण राहिले ?

ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे ...
मी मात्र थांबुन पाहतो मागे कितीजण राहिले ?

कवटाळुनी बसले मज दाही दिशांचे हुंदके
माझे अता दु : खासवे काही न भांडण राहिले !

होता न साधा एवढा जो शब्द मी तुजला दिला
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले!

अवघ्या विजा मी झेलल्या, सगळी उन्हे मी सोसली
रे बोल आकाशा, तुझे आता किती पण राहिले?

ओसाड माझे घर मुळी नाही बघायासारखे
हे आसवांचे तेवढे अद्याप तोरण राहिले
--------------------------------

चतुरंग

विसोबा खेचर's picture

27 Jun 2010 - 6:32 pm | विसोबा खेचर

रंगा आणि सुनील,

'तुला' चे 'तुजला' केले आहे.. धन्यवाद

तात्या.

होता न साधा एवढा जो शब्द मी तुजला दिला
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले!

ह्या ओळी मनाला भावल्या... जुन्या आठवणीना परत उजाळा मिळाला.

वेताळ

राजेश घासकडवी's picture

27 Jun 2010 - 7:30 pm | राजेश घासकडवी

एक अविस्मरणीय अनुभव - उच्च प्रतीचं काव्य, समर्थ पेशकारी, आणि तात्यांचा रसास्वाद. त्यातल्या तांत्रिक खाचाखोचा कळत नाहीत पण

विलक्षण एकतानता, एकाग्रता..!

शब्दांवरच्या अतीव आणि हळुवार प्रेमापोटीच ते होतं.

विसोबा खेचर's picture

27 Jun 2010 - 8:04 pm | विसोबा खेचर

विलक्षण एकतानता, एकाग्रता..!

शब्दांवरच्या अतीव आणि हळुवार प्रेमापोटीच ते होतं.

खरं आहे.. वास्तविक भटसाहेब मैफलीत बसले आहेत आणि गाताहेत.. श्रोत्यांकडे त्यांचं लक्ष आहे, दादही घेताहेत..

पण तरीही ऐकता/पाहताना असं वाटतं की ते ट्रान्समध्ये आहेत.. फक्त आणि फक्त शब्दस्वरात आहेत.. या गोष्टी सिस्टीममध्ये गेल्याशिवाय अशी एकतानता होत नाही.. म्हणजे म्हटलं तर अगदी पुरेपूर मैफलीत आहेत आणि म्हटलं तर फक्त शब्दस्वरात आहेत, बाकी कशातच नाहीत..!

एकतानतेचा विषय निघालाच आहे म्हणून थोडं अवांतर -

सवाईगंधर्व महोत्स्वात मागे चार तानपुरे झंकारत असतात.. समोर आट-दहा हजाराचा श्रोतृवृंद असतो.. तरीही अण्णांच्या तोडीचे स्वर त्या श्रोत्यांना घट्ट बांधून ठेवतात.. आसमंतात तेव्हा फक्त तोडी आणि तोडीच असतो.. अन्य काही नसतंच..!

आणि हे केवळ साध्य होतं अण्णांच्या एकतानतेमुळे, त्यांनी बांधलेल्या स्वरपूजेमुळे!

अवांतर २ -

कृष्णा नी बेगने यावर काही लिहायचा विचार आहे..!

वरील किंवा कृष्णा नी बेगने च्या या दुव्यावरही काही लिहायचा विचार आहे..केवळ क्लास आहे यातला यमन! :)

आपला,
(गाणं अनुभवलेला) तात्या.

विसोबा खेचर's picture

29 Jun 2010 - 1:45 pm | विसोबा खेचर

प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिकवरांचे आभार..