माझा लहानपणाचा काळ मि ज्या घरात काढला तिथे पाठिमागे एक छानस अंगण होतं. उन्हाळ्याच्या वा दिवाळीच्या सुट्टीमधे माझा बराचसा वेळ ह्या अंगणात खेळण्यातच जायचा. एक आंब्याच झाड, एक पेरूचं, एक स्वस्तिकाचं अशी झाडे होती, आता ती फार मोठी वाटत नाहीत पण त्यावेळेला ती मोठीच झाडे होती माझ्याच उंचीच्या हिशेबात, थंडीत तिथे चुल मांडुन आंघोळीचं पाणीही तापवायचो आम्ही, पण त्या चुलीबद्दल फारस आठवत नाहिये आता. माझ्या मनात ह्या अंगणाला स्थान आहे ते एका निराळ्याच गोष्टी साठी. माझा स्वभाव लहानपणी जरा बुजरा, अबोल होता, मला कसलातरी न्युनगंड असावा बहुतेक त्याकाळी, कारण मला ९वी-१०वीत जाइपर्यंत फार जवळच्या मित्र-मैत्रिणी नव्हत्या. आमच्या गल्लीत मुले दुपारी एकत्र जमुन क्रिकेट वगैरे खेळायची पण मला फारसं यायचच नाही, म्हणुन मी जायचो नाही तिकडे.
काय असेल ते असो मला अश्या कित्येक दुपारी एकट्यानेच, स्वतःशीच रमवलेल्या आठवतात ते ह्या अंगणात. आमच्या अंगणात वेगवेगळ्या दिवसात असंख्य प्रकारचे किडे असायचे. मी इतक्या एकाग्रतेनं त्यांचं निरीक्षण करण्यात रमुन जायचा, की मला घरातुन हाक मारलेलही कळायच नाही कित्येकदा, त्यात दुपारी ११ ते ४-४:३० हा वेळ म्हणजे खुप मस्त असायचा, जेवण, झाकपाक होउन शक्यतो सगळी मंडळी निवांत असायची, कुण्णाकुण्णाला माझी आठवण यायची नाही, उलट यावेळेत दंगा न केल्याबद्दल कृतज्ञताच वाटत असेल कदाचीत. आणि मग मी त्या माझ्या बालमती गुंग करणार्या छोट्या जगात हरवुन जायचो.
सर्वात जास्त आठवतात ती 'सुरवंट'. हिवाळ्यात पेरुच्या झाडावर सुरवंट फार, कधी कधी आंब्यावर पण असतात. बोट- अर्ध बोट आकाराची काळी, करड्या, भुर्या रंगाची सुरवंट हा एक मजेशीर प्रकार असतो. त्यांची चाल लयदार, एखाद्या अळीसारखी, पण त्याच्या अंगावरच्या दाट केसांमुळे ती गतीमान लय बघत रहावीशी वाटते. चौथी पाचवीत असताना ही सुरवंट आम्ही पाळायचो पण, म्हणजे पुर्वी जुन्या त्या 'होम' की काहीतरी नावाच्या मोठ्या काडेपेट्या यायच्या, त्याच्यामधे पेरुची, आघाड्याची वा झेंडुची पानं भरुन त्यात सुरवंट पकडुन ठेवायचो, सतत पाने घालत रहायला लागायचं, काही दिवसानी सुरवंट स्वत:भोवती कोष तयार करुन घेतं, मग ती काडेपेटी त्या कोषासकट बाहेर ठेवायची एखाद्या दगडावर, आणि त्यातुन फुलपाखरु बाहेर यायची वाट बघायची. कधीच दिसलं नाही माझ्या डोळ्यासमोर फुलपाखरू बाहेर येताना, मग खुप हिरमुसला व्हायचो मी, पण नेहेमी मोकळे कोष मात्र दिसायचे. सुरवंट घरात आणलं की खुप शिव्या खाव्या लागायच्या पण कसतरी लपवुन मी ती काडेपेटी आणायचोच घरात. ह्यात कष्ट काहीच पडायचे नाहीत अस नाहीये बरका. सुरवंट जराजरी लागले हाताला वा कुठेही त्वचेला कि प्रचंड खाजायचं, जरा बारकाइनं पाहिलं तर कोवळ्या त्वचेत रुतून बसलेले केसही दिसतात, खुप आग होते. ह्यावर उपाय असायचाच, जिथे सुरवंट लागलय त्या त्वचेवर जाड घोंगड्याने घासल्यावर ते केस निघुन जायचे आणि आग कमी व्हायची, आणखी एक हमखास उपाय म्हणजे झेंडुची पाने कुस्करुन लावणे, थंड वाटायचे एकदम.
तिथल्या तुतूच्या झाडावर गोल रंगीबेरंगी चकचकीत किडे दिसायचे, त्यावेळेला आम्हाला बीट्ल नाव माहीती नव्हतं आम्ही टॅक्सीकिडे म्हणायचो त्याला.
गवळण कीडा कधीमधीच दिसायचा, मात्र पानगळीच्या दिवसात काडीकीडा मात्र नेहेमी बघितलाय. वाळलेल्या पानात तो कीडा पायाखाली येउ नयी म्हणुन वाकुन चालायचो, शोधत शोधत.
पावसाच्या दिवसात तर ते सगळे नवं जग बघताना भानच रहायचं नाही, असंख्य प्रकारचे बेडुक ओरडायचे. एखादा बेडुक उडी मारुन कुठे जातोय त्याचा नजरेने पाठलाग करायचा, मग एखादा दुसराच बेडुक दिसायचा क्षणभर, आणि पहिला हरवुन जायचा. पावसाळ्यात आमच्या घराच्या मागच्या दाराला आम्ही एक लाकडी फळी बसवायचो आडवी, बेडुक येउ नयेत म्हणुन, पण तरी एखादा घरात शिरलाच तर त्याला झाडु घेउन बाहेर हाकलायची मोठ्ठी जबाबदारी माझ्यावरच. आत्तासुधा हे लीहीत असताना त्यांचा तो खर्जातला गलका माझ्या कानात तस्साच आहे. ते डराव डराव चं समुहगीत ऐकून आता किती वर्ष झाली कुणास ठाउक.
ह्याच दिवसात यायच्या त्या गोगलगायी. चालताना पायाखाली एखादीजरी गोगलगाय आली तरी प्रचंड किळस यायची, त्यात दोन प्रकार आठवतात, एक शंखाची गोगलगाय आणि एक बिनशंखाची. शंखाची गोगलगाय खुप शांत, कागदावर घेउन आम्ही बाहेर सोडुन यायचो, कध्धीच त्रास नाही द्यायचो, पण बिनशंखाची गोगलगाय खुप किळसवाणी, बोटभर लांब, दोन्ही टोकाला निमुळती, आपल्याच स्त्रावाची बारीक रेघ बनवत त्यावरुन सरकत येणारी ती वस्तु बघितली कि आम्ही डोळे मिटुन, एका जाड पुठ्ठ्यावर घेउन ती लांब बाहेर फेकायचो.
पहिल्या पावसाच्या आधी आठवडाभर अचानक एका संध्याकाळी 'चाचड' दिसायला लागायचे, म्हणजे इकडे पंखाच्या मुंग्या म्हणतात ते. अचानक यायचे कुठुनतरी खुप संख्येने, हे दिसायला लागले की आम्ही ओळखायचो की आठवड्याभरात पहिला पाउस नक्की. संध्याकाळी सगळे दिवे बंद करुन बसावं लागायचं. बरोबर प्रकाशाकडे आकर्षीत होतात हे कीडे. कधीकधी एक कागद तेलात बुडवुन ट्युबला दोर्याने बांधुन ठेवायचो चाचड येउ नयेत म्ह्यणुन. कमी यायचे त्यामुळे, पण यायचेच. रस्त्यावरच्या दिव्यांभोवती तर हजारोंच्या संख्येने असायचे.
आमचं घर कडीपाटाचं, त्यामुळे पाली पण असायच्या भरपुर, सारख्या चुकचुकायच्या संध्याकाळच्या वेळेला, रात्री अंधुक प्रकाशाची डोळ्याला सवय झाल्यावर एखाद्या पालीची किडे पकडण्यासाठीची शांत तपश्चर्या बघताबघताच झोप लागायची.
मुंगळे जमात खुप मजेशीर, सारखे आपले गडबडीत, तुरुतुरु कुठल्यातरी मोहीमेवर, चावल्यावर खुप झणझणायचं. पण ह्याचे निरिक्षण घरापेक्षा अंगणात करायला मजा यायची. समोर आलेल्या काट्याकुट्यातुन, दगडातुन मार्ग काढुन स्वारी धावतेय पुढे. यांच दिशेच भान खुप आश्चर्यकारक असतं, तुम्ही बोटाने कीतीही लांब उडवा, दोनतीन मीनिटात पुन्हा आहे त्या ठिकाणी येउन प्रवास चालु.
मुंग्यांमधे लाल मुंग्यांची फार भीती वाटायची, कधी चुकुन पाय पडला तर मी खुप जोरात थयथयाट करायचो जागच्याजागी. पण काळ्या मुंग्यांच्या वाटेला मात्र कधीच गेलो नाही, का कुणास ठाउक, खुप आदर वाटायचा ह्या काळ्या मुंग्यांच्याविषयी, ह्यांना धावर्या मुंग्या का म्हणतात ते बघितल्याशिवाय लक्षात नाही यायचे तुमच्या.
माती उकरताना कधीतरी गांडुळ दीसायचं पण लगेच वळवळत मातीच्या ढिगात नाहिसं व्हायचं.
आमच्या गावाला खिंडीतल्या गणपतीला जाताना, पावसाळ्यात 'पैसा' दिसायचा, शेकडो पाय असलेला, तपकीरी लाल रंगाचा हा किडा, काडिने थोडा स्पर्ष केला तर लगेच ते शेकडो पाय पोटाशी आवळुन घेउन, अंगाचा अगदी बंद्या रूपायासारखा गोल करुन, घरंगळत जायचा. ह्याच गणपतीच्या बाहेत प्राजक्ताचा थोरला पार होता, रातराणी, चाफाही होता. ह्या पारावर रात्री आठच्या सुमाराला, खुप काजवे जमा व्हायचे, सतत हवेत उडत असायचे. त्या काळ्या कातळावरुन शांतपणे चालत जाणारा, एका लयीत लुकलुकणारा काजवा परत कधी तसा दिसला नाही.
खुप काही मिळवुन दिलय ह्या सगळ्यांनी मला, शब्दांत नाही सांगता येणार सगळं. अगदी एकटं एकटं वाटायचं तेव्हा हि सगळी मंडळी माझ्या आयुष्यात आली, आणि नकळत माझ्या बालपणाचा भागच बनुन गेली. अजुन भरुन येतय ते सगळे हरवलेले क्षण आठवुन.
आपण मोठे होतो म्हणजे नक्की काय होतो? निबरपणा म्हणजे मोठेपणा का हो?
आत्ता ह्याक्षणी मी परत त्याच ठिकाणी गेलो तर दिसतील का हे सगळे मला, का माझीच नजर बदललीये.
प्रतिक्रिया
18 Jun 2010 - 7:28 pm | अप्पा जोगळेकर
अर्धवटराव,
मस्त लिहिलं आहे. लोकप्रभा किंवा साप्ताहिक सकाळ मासिकामध्ये युवराज गुर्जर नेहमी लिहित असतात कीटकांवर. दर आठवड्याला एका कीटकाची समग्र माहिती असते. तुम्हीदेखील असं लिहिलंत तर छान होईल.
18 Jun 2010 - 7:29 pm | शुचि
मला गोगलगाईची भीती वाटत नाही. बिचारी गरीब गोगलगाय वाकप्रचार रूढ असल्याने असेल. पण पाल ईईईईईईईईई!!!! कधीही अंगावर मुद्दाम उडी घेईल असं वाटतं. सरडा आवडतो. देखणा असतो.
मी लहानपणी माशा मारून मुंग्यांना खायला द्यायचे. म्हणजे आंब्याच्या मौसमात खूप माशा येतात तेव्हा मुंग्यांची चंगळच असायची. फुलपाखरं कधी पकडली नाही. मला नाही आवडायचं त्या सुंदर कीटकाला हानी पोचवायला. शाळेत काही मुली गांडूळावर मीठ टाकायच्या. ते गांडूळ तडफडून मरायचं. : (
बाकी पक्षांची पिल्लं खूप पाडली दगड मारून का तर मला त्यांची आई व्हायचं होतं.
अर्धवट तुमच्या लेखानी खूप आठवणी चाळवल्या बघा. मस्त लेख.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
18 Jun 2010 - 8:19 pm | अनामिक
अर्धवट... भुतकाळात नेलंस की एकदम... जवळ जवळ सगळ्या आठवणी पुन्हा डोळ्यासमोरून गेल्या... खंरच ते बेडकांच डराव डराव ऐकून खूप दिवस झाले... शेंबडी गोगलगाय तर लक्षातही राहिली नव्हती... काजवे, फुलपाखरे यांच्या मागे धावताना, काजवे शर्टाच्या खिशात घालून मिरवताना जाम मजा यायची... तुझा लेख वाचून छान वाटलं...
-अनामिक
18 Jun 2010 - 8:20 pm | शुचि
पण काजवे खिशात असताना चमकतात का???
कारण त्यांचा तो प्रणयसंदेश असतो. खिशात बिचारे घाबरून प्रणय वगैरे विसरून जात असतील.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
18 Jun 2010 - 9:21 pm | अर्धवट
चमकतात.. मी ठेउन बघितलेत..
18 Jun 2010 - 10:15 pm | विनायक प्रभू
खिशातले किडे कायम चमकतात.
19 Jun 2010 - 4:07 pm | सुधीर१३७
खिशातले ???????????????????????????????
18 Jun 2010 - 8:22 pm | सातबारा
ते लाल मखमली म्रुगाचे कीडे, हल्ली दिसतच नाहीत. आठवतात का कोणाला ?
---------------------
हे शेतकर्यांचे राज्य व्हावे.
18 Jun 2010 - 9:27 pm | Pain
मला नाही आवडायचं त्या सुंदर कीटकाला हानी पोचवायला. शाळेत काही मुली गांडूळावर मीठ टाकायच्या. ते गांडूळ तडफडून मरायचं. : (
बाकी पक्षांची पिल्लं खूप पाडली दगड मारून का तर मला त्यांची आई व्हायचं होतं.
विरोधाभास तर आहेच आणि क्रुरदेखील.
18 Jun 2010 - 10:06 pm | मदनबाण
लहानपणी चतुर पकड्यासाठी केलेले उद्योग आठवले.
एक साधा चतुर आणि एक डांग्या चतुर अशी वर्गवारी कलेली होती. डांग्या चतुर हा जरा आकाराने मोठा असायचा.
टाचणी सुद्दा पकडाचो...फार कठीण वाटे तिला पकडताना !!!
ते मातीत गोल खड्डा करणार्या किड्याचे नाव मात्र विसरलो...एखाद विवर असावं तस त्याच घर असतं...
मदनबाण.....
A truly strong person does not need the approval of others any more than a lion needs the approval of sheep.
Vernon Howard
18 Jun 2010 - 10:12 pm | शुचि
हो हो बारीक असतो. माझ्या थापाड्या मैत्रीणीनी सांगीतलं होतं हाच कीडा पुढे वाळवंटातला ऊंट बनतो :(
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
19 Jun 2010 - 12:57 am | अविनाशकुलकर्णी
कीड्यामुंग्यांची दुनीया
![](http://lh6.ggpht.com/_e1WTPhGfnMU/TBvIQx3jDHI/AAAAAAAAB0Y/H161lU5SAVw/s800/population%20dinesty.jpg)
..................................
19 Jun 2010 - 1:32 am | हर्षद आनंदी
माझ्या महाडात ही जोडगोळी फेमस! अगदी अनिल-माधुरी, शाहरुख-काजोल!! दिसली कि भल्या भल्यांची त्रेधा - तिरपिट होते. काड्मुंगी चावली की ती जागा टम्म सुजते आणि डोंगळा रक्त काढतो असे सर्वांचे अनुभव आहेत.
त्यामुळे ते दिसले की मारणे हा आवडीचा छंद!!
तसेच दिव्याची पाखरे आणि डास हे संध्याकाळचे सोबती,
"डास" म्हणुन समोरच्या पोराच्या कानाखाली जाळ काढणे ह्यातल्या आनंदाला तोड नाही. दादागिरी करणार्याला अंधारात हेरुन जाम बदडुन घेता येते.
लाल मुंग्या खातात म्हणे, डोळ्यांसाठी चांगल्या असतात.. तुमचा काय अनुभव?
बाकी किडा दिसला की पकडुन बहिणींच्या अंगावर सोडणे, झुरळ हातात नाचवुन त्रास देणे.. ह्याच्या पुरता किटकांशी संबंध!!
दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
19 Jun 2010 - 2:56 am | धनंजय
छान
19 Jun 2010 - 10:07 am | सहज
छान आहे.
कोळ्याच्या वाटेला नाही गेलात का?, कोळ्याच्या जाळ्यात लाकडाची काडी टाकुन लटकणार्या धाग्यांना कापत कापत कोळ्याच्या जवळ जात असताना, कोळी पुन्हा जाळे फेकुन दुर पळताना बघायला मजा वाटायची.
(किडेमुंग्यांसाठी क्रुरकर्मा गब्बर) सहज
19 Jun 2010 - 10:38 am | अरुण मनोहर
मोठी मुले हा खेळ जालावर खेळतांना देखील दिसतात!
19 Jun 2010 - 7:28 pm | सहज
बिंगो!
19 Jun 2010 - 5:58 am | चित्रा
लहानपणी हे सर्व पाहिले असल्याच्या आठवणी जाग्या झाल्या..
अतिशय सुरेख लिहीले आहे, असेच अधिक लिहीत जावे.
19 Jun 2010 - 7:32 pm | विसोबा खेचर
सहमत...
तात्या.
19 Jun 2010 - 10:33 am | अरुण मनोहर
आठवणी जाग्या केल्यात.
"लहान मुले ही मनुष्यांमधील सर्वात कृर जमात आहे." - ईती बी.एफ्.जी. (बीग फ्रेन्डली जायंट)
लहानपणी आम्ही दोन टेण्या लाल मुंग्या उजव्या आणि डाव्या हातांच्या चिमटीत पकडायचो. बरोब्बर मागच्या भागात पकडायच्या. समोर असलेल्या दोन काटेदार नांग्या आ वासून कुठे दंश करू अशा वळवळत रहातात. मग त्या दोन टेण्यांच्या नांग्या एकमेकात भिडवून खाली सोडून द्यायचे. कोणा एकाची नांगी तुटेपर्यंत दुसरा सोडत नाही. मुले ही फाईट बघायला पेन्सील, खोडरबर वगैरे तिकीट आनंदाने देत.
आज विचार केला की कळते, मोठी माणसे, अगदी राष्ट्रे देखील हेच करत असतात. प्रश्न हा पडतो, की मुलांना मोठ्यांनी शिकवले की मोठ्यांना मुलांनी?
19 Jun 2010 - 8:13 am | डॉ.श्रीराम दिवटे
छान वर्णन..
आवडले.
*******************************************
आमच्याशी "मराठी गप्पा" मारायला जरूर या...
19 Jun 2010 - 12:13 pm | jaypal
आम्हाला अजुन ही किड्यांची आवड आहे ती इथे पहा
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
19 Jun 2010 - 12:26 pm | पाषाणभेद
>>> आपण मोठे होतो म्हणजे नक्की काय होतो? निबरपणा म्हणजे मोठेपणा का हो?
लाखमोलाचं बोललात अर्धवटराव!
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
19 Jun 2010 - 1:20 pm | बिपिन कार्यकर्ते
अतिशय छान लेख. आवडलाच. शेवटचं वाक्य वाचून हे आठवलं.
बिपिन कार्यकर्ते
19 Jun 2010 - 4:23 pm | गणपा
सु़ंदर लेख.
गावचं जुन घर आठवल एकदम.
गावाला समुद्र किनार्यावरच्या सुक्या वाळुत ५० पैशाच्या नाण्याचा व्यासाएवढा, एक उलट्या ज्वालामुखिच्या विवरच्या आकाराचा खड्डा असायचा.
त्या खड्यात खाली एक किटक दबा धरुन बसलेला असायचा. आम्ही डुक्कर म्हणायचो त्याला.
एखदी लहान मुंगी/किटक जर चुकुन त्या खड्यात पडली की खेळ खल्लास तिचा.
ते डुक्कर इतक चपळ असायचा की डोळ्याच पातं लवतेना लवते तोच आपल्या भक्षाला घेउन ते क्षणार्धात वाळुत गुडुप व्हायचं.
19 Jun 2010 - 7:40 pm | तिमा
आम्हाला लहानपणापासूनच किड्यांची आवड! रांगत्या वयात आम्ही एकदा गोगलगाय, चिक्कुची फोड म्हणून चोखली होती असे आमचे पालक सांगत असत.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
19 Jun 2010 - 9:06 pm | प्रमोद देव
अर्धवटराव..मस्तच लिहिल्या आहेत आठवणी.
मी देखिल मुंग्यांकडे तासन तास बघत बसायचो...कधी कधी त्यांची रांग मोडण्यासाठी
त्यांना फुंकर मारून इथेतिथे हटवायचो...पण त्या पुन्हा रांगेत यायच्या. एखादा पोळीचा तुकडा टाकून त्या सगळ्याजणी मिळून कशा त्याला वाहून नेतात...हे पाहण्यातही गंमत होती.
फुलपाखरे,चतुर, गांडूळ वगैरे प्रकारही हाताळले होते तेव्हा. :)
लहानपण ते लहानपण...खरंच रम्य होतं आपलं लहानपण.