ती...

भानस's picture
भानस in जनातलं, मनातलं
1 Jun 2010 - 9:20 pm

लोकल, म्हणजे विविधतेचा मुक्त खजिना. मी, सदैव माणसांमध्ये रमणारी. ठराविक गाड्या, त्यामुळे अनेक तऱ्हांनी ओळखी. ब्रिजवरून धावता धावता दृष्टीस पडणारी नेमकी माणसे. डब्यात तर...... नुसते डोळ्यातून दिसणारे प्रश्न, आपुलकी..... आलीस का? ह्म्म... काही हात उंचावून दखल घेणार्‍या. मैत्रिणींच्या मैत्रिणी.... अग आज शालीनि दिसत नाहीये. न विचारताच माहिती पुरवणार्‍या. काही न बोलणार्‍या पण जागा देणार्‍या. एखादे दिवशी, माझ्या सुंदर साडीवर, ती कशी खुलतेय तुझ्या अंगावर.... लांबूनही मस्त गं अशा खुणा करणाऱ्या सख्या. ओळखही नसताना दोन सीटच्या मध्ये उभे असताना लांब शेपटा हातात घेऊन, " किती सुंदर आहेत गं केस तुझे, टिप्स दे ना. " असे अगदी सहजपणे विचारणाऱ्या. आवर्जून दोन शब्द तरी बोलणारच अश्याही सख्या..... ह्या हरस्वभावाच्या सख्यांनी मला भुरळ घातली. त्यांच्या मूडनुसार बरे-वाईट अनुभव दिले.

ह्यातच एकदा तीही मला सापडली. ठाण्याला नेहमीप्रमाणे फास्टवरून स्लोवर पळवले, बरं अनॉन्समेंट तरी लवकर करावी. पण छे! तसे केले तर रेल्वेच्या कुळाला बट्टा लागेल ना. सगळे जीव घेऊन पळत होते, माझीही भर त्यात. स्लोपवरून उतरून वळले आणि गाडी हालली. मागचा लेडीज फर्स्ट उतरले की अगदी समोरच असतो पण माझी चलबिचल झाली. पकडू.... का नको. स्पीड जरा जास्तच वाटला. तेवढ्यात तिने हात पुढे केला आणि मला कळायच्या आत मी तो धरून गाडीत चढलेही होते. " काय घाबरली होतीस ना? नशीब माझा हात धरलास नाही तर गेलीच होती तुझी गाडी. " असे म्हणत ती मस्त हसली. काही माणसे संसर्गजन्य रोगासारखी असतात. हसली, बोलली, कधी कधी तर नुसते त्यांनी पाहिले तरी आपल्यात उतरत जातात. तशीच तीही होती. मुलुंड येईतो आम्ही दोन-चार वाक्यांची लेन-देन केली, मग तिला टाटा करून मी आत वळले.

तीही ठाण्याचीच असल्याने मधून मधून सकाळची भेट व्हायची. ओळख थोडी वाढली. कोणाच्याही खाजगी आयुष्यात स्वतःहून डोकावण्याचा माझा स्वभाव नाही. मला कुतूहल जरूर असते, परंतु त्यांच्या कलाने. कित्येक ओळखी वीसपंचवीस वर्षांच्या तरीही फक्त नावाचाच परिचय. ही ही त्यातलीच. गळ्यात मंगळसूत्र होते म्हणून लग्न झालेले आहे असे वाटे. अर्थात ते केवळ आधारासाठी घातलेलेही असू शकते. हसतमुख. एकदा अचानक तिने मला विचारले, " ए सुख म्हणजे काय गं? आहेस का ' तू ' सुखी? " इतका अनपेक्षित प्रश्न..... मी गडबडलेच. " काय गं, आज काय सकाळी सकाळी माझी खेचायचा विचार आहे का? " जोरात हसून म्हणाली, " विचार कर..... तुझ्या तोंडून हो नाही आले. का? दिवसभर विचार कर... उत्तर मिळालेच तर दे स्वतःला. तुझ्या डोळ्यात मला दिसेल उद्या ..... " गेलीही उतरून, मला प्रश्नार्थक करून.

आता सुख म्हणजे नेमके काय हे मला कधीही समजलेले नाही. मला तर छोट्याश्या गोष्टींमध्येही प्रचंड सुख दिसते. कदाचित म्हणूनच नवरा नेहमी बोंबलतो, " अग मिलियन डॉलरची लॉटरी लागल्यासारखा आनंद झाल्यासारखी वागतेस, मग देव म्हणतो अरे आहेच की हिच्याकडे, आणि जातो पुढे निघून. " आता बोला. मी दिवसभर परीक्षेतल्या कठीण प्रश्नासारखी उत्तर शोधत राहिले. शेवटी विचार केला तिलाच विचारूया, तू सांग, सुखी आहेस का ते?"

दोन दिवसांनीच भेटली मला, पण संध्याकाळी. जोराची सर आली म्हणून टिपटॉपचा आडोसा व छान छान ढोकळा वगैरे चे वास घेत मी उभी होते. तर बाजूलाच ही. मला बघून डोळे मिचकावत मिष्किलपणे म्हणाली, " काय, सापडले का सुख? " अर्धवट भिजलेल्या आम्ही दोघी, धुवांधार कोसळणारा पाऊस, पेट्रोलमिश्रीत मातीचा गंध त्यातच हा अन्नाचा सुगंध...... तिचे ह्या पावसाच्या थेंबांसारखे माझ्यात झिरपणारे हसू.... सटकन, शब्द गेले तोंडातून, " हे काय, मूर्तिमंत सुखच उभे आहे माझ्यासमोर. " " आयला, तू तर माझीही आई निघालीस. चल मस्त कॉफी पिऊ. " असे म्हणत मला ओढतच निघाली.

ए के जोशीच्या कॉर्नरच्या उडप्याकडे बसून नखशिखान्त भिजलेल्या आम्ही दोघी समाधी लावल्यासारख्या तल्लीन होऊन पाऊस पाहत कॉफी प्यायलो. एरवी फारच उडती गाणी वाजवणाऱ्या उडप्यालाही आज, " लपक झपक तू आरे बदरवा...." लावायचा मोह झालेला.......

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

मेघवेडा's picture

1 Jun 2010 - 9:31 pm | मेघवेडा

व्वा! सुंदर..!! उस्फूर्तपणे लिहिल्यासारखं वाटलं.. अगदी फ्रेश!! मस्तच!! खरंच भावलं मनाला!!

-- मेघवेडा.

मदनबाण's picture

1 Jun 2010 - 9:38 pm | मदनबाण

छान लेख...
हल्लीच असाच एक रेल्वेच्या डब्यांशी (रेल्वे प्रवास) संबधीत असलेला लेख वाचला, त्याची आठवण आली.

मदनबाण.....

Laughing at our mistakes can lengthen our own life. Laughing at someone else’s can shorten it.
Cullen Hightower

प्रभो's picture

1 Jun 2010 - 9:40 pm | प्रभो

आवडला.

दत्ता काळे's picture

1 Jun 2010 - 9:53 pm | दत्ता काळे

लेख आवडला.

श्रावण मोडक's picture

1 Jun 2010 - 10:19 pm | श्रावण मोडक

आवडला लेख. त्या उत्तराला, त्याच्या प्रेरणेलाही दाद!

फटू's picture

2 Jun 2010 - 12:24 am | फटू

अग मिलियन डॉलरची लॉटरी लागल्यासारखा आनंद झाल्यासारखी वागतेस, मग देव म्हणतो अरे आहेच की हिच्याकडे, आणि जातो पुढे निघून.

हे एकदम भारी आहे :)

फटू

शुचि's picture

2 Jun 2010 - 1:24 am | शुचि

सकारात्मक विचारांचा, चाकोरीबद्ध जीवनावर लिहीलेला लेख आवडून गेला.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

अनामिक's picture

2 Jun 2010 - 2:06 am | अनामिक

सुंदर लेखन... आवडलं!

-अनामिक

डॉ.श्रीराम दिवटे's picture

2 Jun 2010 - 6:40 am | डॉ.श्रीराम दिवटे

मस्तच!
काही सुखी व्यक्ति भेटल या तर आपणही सुखमय होऊन जातो.
लेखन आवडलं.

सहज's picture

2 Jun 2010 - 7:22 am | सहज

मिथुन - क्या बात क्या बात क्याऽऽ बात!
रेमो सर - नाउ दॅट्स व्हॉट आय कॉल ललिल लेखन!

कसं एकदम ऋषिकेश मुखर्जीच्या सिनेमातले मध्यमवर्गीय वातावरण, अगदी विद्या बिद्या सिन्हा... :-)

एखादे समर्पक चित्र असते तर हा लेख एक वेगळ्याच उंचीवर गेला असता. असो बरे-वाईट दोन्ही अनुभव येउ द्या.

ज्ञानेश...'s picture

2 Jun 2010 - 11:24 am | ज्ञानेश...

हेच म्हणतो.

प्रभो's picture

2 Jun 2010 - 7:56 am | प्रभो

सुंदर लेख!!

मस्त कलंदर's picture

2 Jun 2010 - 10:07 am | मस्त कलंदर

छान लेख.. आवडला!!! :)

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

निखिल देशपांडे's picture

2 Jun 2010 - 10:52 am | निखिल देशपांडे

लेख आवडला..

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

प्रमोद्_पुणे's picture

2 Jun 2010 - 11:14 am | प्रमोद्_पुणे

छान लेख..

स्वाती दिनेश's picture

2 Jun 2010 - 6:02 pm | स्वाती दिनेश

लेख आवडला,
स्वाती

मी-सौरभ's picture

2 Jun 2010 - 7:32 pm | मी-सौरभ

-----
सौरभ :)

स्पंदना's picture

3 Jun 2010 - 9:55 am | स्पंदना

सुन्दर!!

अगदी डोळ्यासमोर आल सार..

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

भानस's picture

3 Jun 2010 - 7:10 pm | भानस

खूप खूप आभार. :)

मिसंदीप's picture

3 Jun 2010 - 8:33 pm | मिसंदीप

अगदी तु डोळ्यासमोर उभी राहिलीस..
वा!!

अरुंधती's picture

3 Jun 2010 - 8:45 pm | अरुंधती

मस्त! सीन अगदी डोळ्यांसमोर उभा केलास! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/