झोंबी

जयवी's picture
जयवी in जनातलं, मनातलं
23 May 2010 - 2:42 pm

आनंद यादव ह्या नावाला “नटरंग” सिनेमामुळे आता वलय प्राप्त झालंय. त्यामुळे “पुस्तक-मित्र” च्या लायब्ररीत त्यांचं “झोंबी” पुस्तक दिसल्याबरोबर लक्ष वेधल्या गेलं.

पुस्तक उघडल्याबरोबर “झोंबी” ह्या पुस्तकाला मिळालेले पानभर पुरस्कार दिसतात त्यामुळे पुस्तक वाचायची उत्सुकता अजूनच वाढते. त्यात पुढे पु.ल.देशपांड्यांची प्रस्तावना…….मग काय विचारायलाच नको. त्यांनी त्या प्रस्तावनेला नाव पण इतकं सुरेख दिलंय….! “झोंबी- एक बाल्य हरवलेलं बालकांड” ! ह्या नावामुळे नक्कीच काहीतरी जगावेगळं असेल ह्याची कल्पना येते. कारण बाल्याला “बालकांड” संबोधलंय म्हणजे बराच भोग, हाल अपेष्टा, गरीबी असणार असं वाटतं.

प्रस्तावनेत पु.ल. म्हणतात की हे आनंद यादवांचं आत्मकथन आहे. जर असं असेल तर आनंद यादव ह्यांना साष्टांग दंडवतच घालायला हवा. कारण ह्या कथनात इतक्या भयंकर परिस्थितीतलं बालपण दाखवलंय ना………की आपण कल्पनाही करु शकत नाही. अतिशय हट्टी आणि कामचुकार वडील, आपल्या अकरा मुलांचा जीवाच्या आकांताने सांभाळ करुन संसार सावरणारी आई आणि भीषण दारिद्र्य ह्याचं इतकं विदारक शब्दचित्र लेखकाने चितारलंय. सगळं स्वत: भोगलं असल्यामुळे त्यातला निखार अंगावर येतो.

शिक्षणाची, शाळेची, कलेची मनापासून आवड असते आनंद (आंद्या) ला. खरं तर त्यांच्या जातीत अशी काही आवड ठेवणं हाच जणू काही गुन्हा ….अशी परिस्थिती होती. अतिशय हलाखीच्या दिवसातही त्याच्या मनातली शिक्षणाची ओढ काही कमी होत नाही. ज्या प्रकारची कामं करुन तो शाळेत धडपडत जातो…….त्याला तोड नाही. वेळप्रसंगी चोरी सुद्धा ! बरोबरीच्या मुलाची शिकवणी, नकलांचे कार्यक्रम, रोजंदारी …….हे सगळं करुन तो शिकतो. वडीलांचा जबरदस्त विरोध असतो त्याच्या शिक्षणाला. कारण मुलगा शाळेत गेला तर शेतातली सगळी कामं त्यांच्यावर पडणार. शिवाय शाळेसाठी पैसे नाहीत. त्यामुळे त्यांना समजावणं हे सगळ्यात कठीण काम असतं त्याच्यापुढे. त्यासाठी तो वडीलांचा बेदम मार खातो. शेवटपर्यंत म्हणजे तो अगदी घर सोडून जाईपर्यत त्याच्या वडीलांना त्याची शिक्षणाची तळमळ कळत नाही.

घरात अकरा भावंडं……….अगदी एका पाठोपाठ झालेली त्यामुळे रोगट, अशक्त. घरात दोन्ही वेळेच्या जेवणाची भ्रांत ! शेतकाम करुन शाळेत गेल्यामुळे कायम मळलेले कपडे, आंघोळीला, कपडे धुवायला साबण सुद्धा नाही. वह्या , पुस्तकं घ्यायला पण पैसे नाहीत. फी भरायला पैसे नाही. शेतातल्या कामामुळे शाळेत यायला उशीर ह्या सगळ्या कारणांमूळे त्याला शाळेत खूप शरमिंदं वाटायचं. भरीस भर म्हणजे वडीलांचा शिक्षणाला विरोध ! तरीही अगदी हट्टाने त्यांनी एकेक वर्ष शिक्षण घेतलं. काही वेळेला शिक्षकांनी त्याची परिस्थिती समजून त्याला मदत केली तर काही वेळेला त्याला मुद्दाम त्रासही दिला. जात्याच हुशार असल्यामुळे शाळा बुडाली तरी पाठांतराचे त्यानेच वेगवेगळे प्रकार शोधून काढले. कामाच्या रगाड्यातही त्याने कविता, शब्दार्थ, प्रश्नोत्तरं चालूच ठेवले. इतकं सगळं सांभाळूनही त्याने कायम पहिला, दुसरा नंबर ठेवला शाळेमधे. त्याच्या शिक्षणाच्या वेडाला जरी त्याच्या वडीलांनी कधी दाद दिली नसली तरी शेवटी त्यांनाही हार मानावीच लागली. मोठ्या कष्टाने त्याला एस.एस.सी ची परिक्षा देण्याची परवानगी त्यांनी दिली आणि आनंदने त्याचं सोनं केलं.

कादंबरी संपली तरी एक हुरहुर तशीच राहते मनात. पुढे काय झालं असेल ह्या आंद्याचं…………त्याच्या घराचं……बहिण भावंडांचं ?? आज आनंद यादव एक मोठं नाव आहे. ते नाव मिळवण्यासाठी त्यांना पुढे कोणत्या दिव्यातून जावं लागलं असेल ?? असे बरेच प्रश्न मनात तयार होतात. ती उत्तरं पुढच्या काही कादंबर्‍यातून वाचायला मिळावी असं वाटतं ह्यातच लेखकाचं यश आहे.

आनंद यादवांना एक कडक सॅल्यूट !!

वाङ्मयसमीक्षा

प्रतिक्रिया

डॉ.श्रीराम दिवटे's picture

23 May 2010 - 2:55 pm | डॉ.श्रीराम दिवटे

झोंबी बद्द्ल लिहावं तितकं कमी पडेल. आनंद यादवांना माझाही एक कडक सॅल्यूट !!
झोंबी त्यांचं आत्मकथनच आहे. त्यामुळेच ते इतकं भावस्पर्शी झालेलं आहे.

वाचक's picture

23 May 2010 - 5:31 pm | वाचक

'झोंबी' नंतर 'नांगरणी' आणि 'घरभिंती' असे अजून दोन भाग आहेत त्यांच्या आत्मचरित्राचे. मला वाटत, शाळेत 'झोंबी' मधला एक प्रसंग धडा म्हणून पण होता.
'घरभिंती' मधे त्यांनी आपल्या पत्नीचे आपल्या आईबरोबर कसे खटके उडायचे ते पण विस्ताराने लिहिले आहे :)

मुक्तसुनीत's picture

23 May 2010 - 6:52 pm | मुक्तसुनीत

'झोंबी' नंतर 'नांगरणी' आणि 'घरभिंती' असे अजून दोन भाग आहेत त्यांच्या आत्मचरित्राचे.
यानंतर "काचवेल" नावाचा चौथा भाग आला.

जयवी, लिखाण आवडले. तुम्ही पहिल्या परिच्छेदात ज्याचे वर्णन केले ती लायब्ररी कुठे आहे ? ऑनलाईन वगैरे आहे काय ?

ह्रुषिकेश's picture

24 May 2010 - 5:53 pm | ह्रुषिकेश

'झोंबी' ,'नांगरणी' आणि 'घरभिंती' हे तिन्ही पुस्तके माझी अतिशय आवडती आहेत.. मी कित्येक पारायणे केली आहेत त्यांची..
@वाचक: 'घरभिंती' मधे पत्नीचे आईबरोबर खटके उडतात अस कुठेच वर्णन नाही... त्यात त्याच्या आईचा तर्‍हेवाईकपणा दाखवला आहे.. त्याचे वडिल आता म्हातारे झालेले असतात आणि आई वडिलान्च्या आधिच्या अत्याचाराचे उट्टे काढत असते.. आधी आपल्या बापई पणाचा माज दाखवणारा बाप आता काळानुरुप दुर्बल आणि हतबल झालेला असतो.. त्यामुळे लेखकाला नकळत त्यान्च्याबद्द्ल soft corner वाटु लागतो.. त्यातुन आता लेखक आणि आई मधे खटके उडू लागतात.. काळजाला भिडणारे वर्णन आहे..
तिन्ही पुस्तके खरोखर वाचनीय..

टुकुल's picture

23 May 2010 - 5:43 pm | टुकुल

मस्त पुस्तक परिचय, कालच जावुन काही पुस्तके खरेदी करुन आलो, हाच लेख जर काल आला असता तर नक्की घेतले असते. पुढल्या वेळी नक्की.

--टुकुल

Pain's picture

24 May 2010 - 7:02 am | Pain

बापरे! ही तर खरीखुरी भयकथा...

विंजिनेर's picture

24 May 2010 - 6:43 pm | विंजिनेर

झोंबीचे(आणि रारंग ढांग) शिक्षक आणि वर्गमित्रांबरोबर केलेले अभिवाचन शालेय जीवनाच्या रम्य आठवणींचा एक भाग झाले आहे.

मदनबाण's picture

24 May 2010 - 10:40 pm | मदनबाण

पुस्तक परिचय आवडला...

मदनबाण.....

Hi IQ doesn't guarantee Happiness & Success in Life.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 May 2010 - 9:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुस्तक परिचय आवडला...

-दिलीप बिरुटे

स्वाती दिनेश's picture

26 May 2010 - 6:13 pm | स्वाती दिनेश

सुरेख परिचय,
परत एकदा वाचावेसे वाटत आहे.
झोंबी बद्दल लिहावं तितकं कमीच.. हे तर खरेच..
स्वाती

भानस's picture

26 May 2010 - 11:37 pm | भानस

ही चारही पुस्तके मनाला भिडणारीच. कितीही वेळा वाचले तरिही तितक्याच ताकदीने मनाला स्पर्श करते. जयु, परिचय छानच. आता पुन्हा वाचायला हवे.