प्रकाशनातील मनोविकार

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं
19 May 2010 - 3:54 pm

प्रकाशनातील मनोविकार
दै. सकाळ १७ मे २०१० मुक्तपीठ मधील एका लेखकरावांचा प्रकाशनाविषयी अनुभव वाचला.लेखन प्रकाशन किती सोपे किती अवघड ही मनिषची पोस्टही वाचली. या निमित्त आम्हाला आमचा ही ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातुन सुसंवाद या पुस्तकाचा अनुभव सांगावासा वाटतो. मी ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी...प्रश्नोत्तरातुन सुसंवाद या पुस्तकाची १००० प्रतींची प्रथम आवृत्ती २००१ मधे स्वत:च आत्मविश्वासाने काढली. पुस्तक फलज्योतिष चिकित्सेवरील होते.जेष्ठ फलज्योतिष चिकित्सक श्री माधव रिसबुड यांच्या हस्ते प्रकाशित केले. प्रकाशन समारंभ केला. त्यानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे डॊ. नरेंद्र दाभोलकर व ज्योतिषी नंदकिशोर जकातदार यांचा जाहीर वादसंवाद ठेवला.या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची दै.सकाळ ने दि २४/५/२००१ रोजी दखल घेतली. आता प्रश्न पुस्तक विक्रीचा आला. रसिक साहित्य मधे ४० टक्के कमिशननी विक्रिस ठेवले. तसेच बहुतेक प्रती अंनिस च्या शिबिरातच ठोक खपल्या. कारण पुस्तक चिकित्सेचे असल्याने व अंनिसत कार्यकर्ता असल्याने ते सहज शक्य झाले. आवृत्ती संपली.पुस्तक निर्मितीचे पैसे केव्हाच वसुल झाले होते. पुस्तक अनेक दिग्गजांना सदिच्छा भेट दिले होते. डॊ जयंत नारळीकरांनाही दिले होते. त्यांनी पुस्तकाची दखल घेतली. पुढे काही भर व सुधारणा करुन द्वितीय आवृत्ती सन २००३ मधे काढली. १३ एप्रिल २००३ मधे लोकसत्ता मधे डॊ जयंत नारळीकरांनी लक्षणीय पुस्तक सदरात त्याचे परिक्षण लिहिले. दिग्गजांनी लिहिलेल्या पुस्तकपरिक्षणाचा खपावर होणारा परिणाम हा चमत्कारासारखा असतो याची अनुभुती या निमित्तानी मिळाली.बाहेरगावातील पुस्तक विक्रेत्यांचे फोन आले. माझ्याकडे वितरण व्यवस्था नसल्याने मी नकार दिला. पण त्यांनी घरी येउन पुस्तक गोळा केले व रोख पैसे दिले.निम्मी आवृत्ती तर इथेच खपली. याही वेळी ४० टक्के कमिशननी रसिक साहित्य व साधना मिडिया सेंटर मधे पुस्तक विक्रिला ठेवले होतेच. एखाद दुसरा अपवाद वगळता पैसे वेळच्या वेळी सहज मिळत होते. पुस्तकाला रोखीने ६०% कमिशननी बाजारात मागणी होती. व्यावहारिक हिशोबाने मला ते किफायतशीर होते. मी ठोक विक्री करुन मोकळा झालो. या वेळी पुस्तक निर्मितीत काही प्रतीत बाइंडिंग चा दोष निर्माण झाला होता. परफेक्ट बाइंडिंग मधे चिकट द्रव्याचा गुणवत्ता चांगली नव्हती. बडोद्याहुन पुस्तक आवडल्याचा परंतु बाईंडिंग खराब प्रत मिळाल्याचे एका वाचकाचे पत्र मिळाले. ताबडतोब दिलगिरी व्यक्त करुन दुसरी प्रत स्वखर्चाने पाठवली. वाचकाला आवडल्याचा आनंद हा खर्चापेक्षा कितीतरी अधिक होता.
पुस्तकाची किंमत ही निर्मीती खर्चाच्या किमान ४ ते ५ पट ठेवावी लागते हा हिशोब मला माहित होता. अनेक जेष्ठांकडुन मला तो शिकायला मिळाला होता.मी प्रकाशक शोधत बसण्याऐवजी स्वत:च ते प्रकाशित करायचे ठरविले ते या मुळेच. प्रकाशक म्हणुन बायकोनेच ते स्वत:च्या ’संज्ञा सर्विसेस” या प्रोप्रायटरी फर्म द्वारा प्रकाशित केले. मुद्रक व प्रकाशकाने शासनाला पाठवण्याच्या प्रती मुंबई दिल्ली कलकत्ता व मद्रास अशा शासकीय ग्रंथालयाच्या ठिकाणी प्रत्येक आवृत्तीची स्व खर्चाने पाठवायच्या असतात. ते बंधनकारक आहे. प्रकाशन विश्व या डायरीचा या कामी उपयोग झाला. प्रकाशन वर्तुळात नारळीकरांना कस काय ’म्यानेज’ केल अशी विचारणा झाली. एकतर विषय फलज्योतिष त्यावर परिक्षण नारळीकरांचे अशा प्राथमिक माहितीवर काहींच्या भुवया उंचावायच्या. हरिभाउ लिमयेंच्या वास्तुशास्त्र पुस्तकाला एक प्रास्ताविक पर चार शब्द नारळीकरांनी लिहिले होते. त्यानिमित्त झालेल्या वादंगात महाराष्ट्र टाईम्स मधे नारळीकरांनी दिलगीरी व्यक्त केली होती. तेव्हापासुन ते ’अशा’ विषयावर जाहीर लिहित नसत. फक्त आपली भुमिका मांडत. अशा पार्श्वभुमीवर पुस्तकाचे सकारात्मक परिक्षण लिहिणे ही बाब मोठीच होती.
त्यानंतर २००५ मधे माझ्या जाहीर कार्यक्रमात प्रा मिलिंद जोशी यांनी एका व्यासपीठावर मुलाखत घेतली. त्यावेळी कार्यक्रमाला मनोविकास प्रकाशनचे श्री अरविंद पाटकर आले होते. त्यावेळी परिचय झाला.प्रतिथयश पुरोगामी प्रकाशक अशी त्यांची समाजात प्रतिमा आहे. मी तिसरी आवृत्ती काढण्याच्या तयारीत होतो. "आम्ही काढली तर चालेल का?" अशी विचारणा त्यांनी केली.व्यावसायिक प्रकाशकाने तिसरी आवृत्ती काढल्यावर आपल्याला त्यात अजिबात लक्ष घालण्याची गरज नाही असा विचार करुन मी 'हो' म्हणुन टाकले.त्यांनी करार, १० टक्के मानधन वगैरे गोष्टी तोंडी सांगितल्या.परंतु पुढे करारही झाला नाही व मानधनही अद्यापपर्यंत मिळाले नाही. त्यांनी आवृत्ती काढली. मला प्रतीही दिल्या. पण त्यावर 'प्रथम आवृत्ती' लिहिले होते. या बद्दल विचारले तर, "हो हो ती मनोविकासची पहिली अशा अर्थाने आहे". सार्वजनिक कार्यक्रमात ते अधुन मधुन भेटत असत. 'या कि एकदा' मी सुद्धा 'एकदा तुमच्याकडे यायचय' अस म्हणत पाच वर्षे गेली.मधल्या काळात मी पोलिस बिनतारी विभागातुन स्वेच्छानिवृत्ती घेतली. मला पहायच होत कि प्रकाशक स्वत:हुन मानधन देतायत का? माझी थांबायची तयारी होत म्हणुन मी पाच वर्षे थांबलो. मानधन हे प्रकाशकाने लेखकाला मानाचे प्रतिक म्हणून स्वत:हुन देण्याचे धन आहे. करार हा कायदेशीर तांत्रिक बाब आहे. मानधन या शब्दात धना पेक्षा मान ही बाब अधिक महत्वाची.लेखकाने आपल्या मानधनाविषयी प्रकाशकाकडे तगादा लावावा लागणे ही बाब अपमानास्पद आहे. पाटकरांनी स्वत:हुन मानधनाचा विषय कधी काढला नाही. लेखकच तो विषय काढत नाही म्हटल्यावर आपण स्वत:हुन कशाला काढा. शेवटी मी इमेल द्वारे प्रकाशकांना आवृत्तीचा पारदर्शी पणा, मानधन, वस्तुस्थिती या बद्दल विचारणा केली. त्याचे उत्तर नाही. एका सार्वजनिक कार्यक्रमात मेल मिळाली एवढाच उल्लेख केला. मी त्यांना फेब्रुवारी २०१० मधे भेटायला गेलो. सध्या प्रकाशन व्यवसाय माझा मुलगा आशिष सांभाळतो मी फक्त मार्गदर्शन करतो. तुमची १००० ची आवृत्ती संपली आहे. पुस्तक अपेक्षेसारख चालल नाही अशी पुस्ती जोडली. देउ तुमच १० टक्के मानधन. कधी त्या बद्दल भाष्य नाही. आता ही बाब मला अपमानास्पद वाटायला लागली. मी त्यांना तसे स्पष्टपणे पत्राद्वारे कळवले. त्यावर त्यांचा भावना दुखावल्याचा फोन आला. मी त्यांना भावना दुखावल्या बद्दल क्षमस्व पण माझ्या विचारांवर मी ठाम आहे असे सांगितले.नंतर आशिष पाटकर यांचा फोन आला कि २००७ मधे आवृत्ती संपली असुन मार्च अखेर आमचे हिशोब झाले कि एप्रिल मे मध्ये वगैरे पैसे देउ. थोडक्यात या तीन महिन्याचा कालावधीत तुमचे मानधन आम्ही देणार नाही असा त्याचा अर्थ.मानधनाची हक्काची मागणी करणार्‍या लोकांना हाडतुड केल जात असे ऐकून होतोच.
पुस्तक म्हणजे 'माल'. तो खपणारा 'माल' आहे का हा विचार करुन प्रकाशक त्या मालाची निर्मिती करतो. वाचक म्हणजे 'गिर्‍हाईक' लेखक म्हणजे कच्चा माल पुरवणारा 'पुरवठादार' या तत्वावर ही 'साहित्य सेवा' चालते. १०० रुपयांच पुस्तकात २० रुपये तांत्रिक निर्मिती मुल्य असते. उरलेल्या ८० रुपयात वितरण कमिशन, मानधन, जाहिरात, कार्यालयीन खर्च, नफा वगैरे बाबी समाविष्ट असतात. जेव्हा संस्थात्मक गिर्‍हाईक म्हणजे ग्रंथालय असतात त्यावेळी व्यवहार ’ठोक’ होतो. शासकीय ग्रंथ खरेदी हा तर पुन्हा वेगळाच प्रांत इथे सगळे एमआर पी च्या खरेदीवर २० टक्क्यांपर्यंत सुट घेउन अगदी नियमात बसवुन खरेदी.सुमार पुस्तकांच्या किंमती सुद्धा अवाढव्य का असतात याचे रहस्य वाचकांना माहित हवे.
ज्या लेखकांशी प्रकाशकाने करार केलेले असतात ते सुद्धा पाळले जातात कि नाही यात साशंकताच. किती आवृत्त्या काढल्या, एका आवृत्तीत किती प्रती प्रत्यक्ष छापल्या हे प्रकाशकालाच ठावे! मराठी पुस्तके खपत नाही ही ओरड हिशोबाला कामी येते. अक्षरधारा हे ग्रंथप्रदर्शन चालवणारे रमेश राठिवडेकर म्हणतात कि मराठी पुस्तक खपत नाही हे खरे नाही. आपण वाचकांपर्यंत पोचण्यास कमी पडतो.त्यांच्या ग्रंथप्रदर्शनात मराठी पुस्तकांचा खप भरपुर होतो.
प्रकाशन व्यवसायात अनेक अपप्रवृत्ती शिरल्यात. कुठल्याही व्यवसायात त्या शिरतात. गंमत म्हणजे प्रथितयश व्यावसायिकांकडे सत व असत प्रवृत्तींच व्यावहारिक मिश्रण असत.काळ वेळ पाहुन ती अस्त्रे ते बाहेर काढीत असतात. मराठी वाचकाला भावनिक आवाहने करुन आपली प्रतिमा उंचावत ठेवायची व साहित्य सेवा करीत असल्याचा आव आणायचा. वाचक व लेखक दोघांनाही लुटुन अशा प्रकाशन संस्था मोठ्या होतात. भाबड्या लेखक, वाचकांना हाताशी धरुन नवे नवे पुस्तकमाफिया प्रकाशन व वितरण व्यवसायात तयार होत आहेत. पुस्तकातील आशय संपन्नेतेपेक्षा पुस्तकाचे मार्केटिंग पुस्तकाला यशस्वी करते. बौद्धीक संपदा कायदा अजुन भारतात बाल्या वस्थेत आहे. पायरसी,कॊपीराईट या बाबतीत लेखक वाचकात जागरुकता नाही. कोर्टात बौद्धिक संपदा कायद्याच्या केसेस प्रलंबित असतात.कोर्टाच्या वाट्याला जाणे म्हणजे वेळ पैसा व श्रम यांचा अपव्यय हे गणित पक्के रुजलेले आहे.ते खोटेही नाही.
जोपर्यंत जातक आणि ज्योतिषी आहेत तो पर्यंत ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातुन सुसंवाद चालूच रहाणार आहे. पुस्तक रुपाने त्याचे भवितव्य काय हे भाकित मात्र जागरुक व सुजाण वाचकच ठरवणार आहेत.

अर्थव्यवहारविचारप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

सहज's picture

19 May 2010 - 4:04 pm | सहज

पुस्तक लेखकांना योग्य तो बोध या लेखातून होइल.

शिवाय लेखक होण्यापेक्षा प्रकाशक होणे जास्त फायद्याचे गणित दिसते आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 May 2010 - 4:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>लेखक होण्यापेक्षा प्रकाशक होणे जास्त फायद्याचे गणित दिसते आहे.
अगदी सहमत आहे. घाटपांडे साहेबांचा अनुभव बोलकाच आहे. प्रकाशक खूप फायद्यात असतात. एक उदा. पाहा. आमच्या विद्यापीठातील संलग्नित महाविद्यालयातील ज्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे अशा अधिव्याख्यात्याच्या ’प्रबंधाचे’ पूस्तकात रुपांतर करण्यासाठी विद्यापीठ २० हजारापर्यंत अनुदान देते. अशा प्राध्यापकांच्या पाठीमागे प्रकाशक लागतात. संबंधीत अधिव्याख्यात्याला प्रकाशकाकडून पुस्तकाच्या दहा प्रती मिळतात, बाकी काही विचारायचे नाही. सर्व अनुदान प्रकाशकाला देऊन टाकायचे. अधिव्याख्यात्याला पुस्तक निघाल्याचा आनंद मिळतो. प्रकाशकाला वाटलं की पुस्तक चांगले खपेल तर त्या पुस्तकाच्या कमीत कमी पाच आणि जास्तीत कितीही प्रती प्रत्येक महाविद्यालयात जावून खपवायच्या, हे तर कंपलसरीच. पुढे त्या पुस्तकाच्या कितीही प्रती काढायच्या आणि ते परस्पर विकायचे त्याचा सर्व निव्वळ नफा प्रकाशकाचाच. लेखकाचा काही संबंध नाही. आणि पुस्तक खपणार नसेलच तर पाच पंन्नास प्रती काढल्या की विषय संपला. सांगा कोण नफ्यात आहे ? तर काय होताय का प्रकाशक ? :)

-दिलीप बिरुटे

भडकमकर मास्तर's picture

19 May 2010 - 4:21 pm | भडकमकर मास्तर

फ़ार सुंदर लेख...
अनेक नवीन गोष्टी समजल्या...
धन्यवाद काका...

_____________________________
श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम?

भोचक's picture

19 May 2010 - 4:36 pm | भोचक

माझ्या मित्राने सिंहस्थावर लिहिलेल्या ललित लेखनाचे पुस्तक काढले. नाशकातल्या एका प्रसिद्ध प्रकाशनसंस्थेने ते प्रकाशित केले, पण त्यासाठी मित्राकडून दहा की पंधरा हजार रूपये घेतले. प्रकाशन संस्थेच्या नावावरच ते प्रकाशित झाले. प्रकाशक मंडळी तद्दन व्यावसायिक आहेत. हे मात्र खरे.

बायदवे ते पुस्तक येथे वाचायला मिळेल.

(भोचक)
जाणे अज मी अजर

मनिष's picture

19 May 2010 - 4:47 pm | मनिष

अगदी ह्याच बाबी समजावून घ्यायच्या होत्या जेंव्हा मी ती चर्चा सुरू केली.

गंमत म्हणजे प्रथितयश व्यावसायिकांकडे सत व असत प्रवृत्तींच व्यावहारिक मिश्रण असत.काळ वेळ पाहुन ती अस्त्रे ते बाहेर काढीत असतात. मराठी वाचकाला भावनिक आवाहने करुन आपली प्रतिमा उंचावत ठेवायची व साहित्य सेवा करीत असल्याचा आव आणायचा. वाचक व लेखक दोघांनाही लुटुन अशा प्रकाशन संस्था मोठ्या होतात. भाबड्या लेखक, वाचकांना हाताशी धरुन नवे नवे पुस्तकमाफिया प्रकाशन व वितरण व्यवसायात तयार होत आहेत. पुस्तकातील आशय संपन्नेतेपेक्षा पुस्तकाचे मार्केटिंग पुस्तकाला यशस्वी करते.

हे असेच असावे असा कयास होता, तुमच्या अनुभवाने त्याला बळकटी आली.

१०० रुपयांच पुस्तकात २० रुपये तांत्रिक निर्मिती मुल्य असते. उरलेल्या ८० रुपयात वितरण कमिशन, मानधन, जाहिरात, कार्यालयीन खर्च, नफा वगैरे बाबी समाविष्ट असतात.

८०% इतर खर्च???? लेखकाला सर्वाधिक फायदा मिळावा असे वाटते, कारण पुस्तक हे प्रामुख्याने त्याचे काम. हे खर्च कमी नाही करता येणार का? ४०-५०% विक्रेत्यांचे मार्जिन खूप जास्त आहे. निदान वाचक म्हणून २०% डिस्काऊंट तरी मागूया! :)

भडकमकर मास्तर's picture

19 May 2010 - 6:18 pm | भडकमकर मास्तर

१०० रुपयांच पुस्तकात २० रुपये तांत्रिक निर्मिती मुल्य असते. उरलेल्या ८० रुपयात वितरण कमिशन, मानधन, जाहिरात, कार्यालयीन खर्च, नफा वगैरे बाबी समाविष्ट असतात.

मग स्वत:च छापणं परवडणार ना... साधारण पन्नास प्रती
स्वत:च टाईप करून प्रिन्टा मारून बाईन्ड करावे....
खर्चाच्या पाचपट किंमत लिहावी त्यावर आणि वीस टक्क्यांत डायरेक्ट आपल्याच शहरातल्या काही हुश्शार विक्रेत्यांना विकावे......

निदान तोट्याचा व्यवहार तरी होणार नाही...

अशी एक चिवित्र युक्ती सुचत आहे....

अशाने निदान पुस्तकावर आपले नाव छापले गेल्याचा आनंद तरी होईल...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 May 2010 - 4:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख आवडला....!

-दिलीप बिरुटे

दिनेश५७'s picture

19 May 2010 - 6:35 pm | दिनेश५७

प्रकाशराव,
अनुभव शेअर करून इतरांना शहाणे केल्याबद्दल धन्यवाद. मी हे वाचत गेलो, तेव्हा नावे बदलून तुम्ही माझाच अनुभव लिहिलाय असं मला वाटलं. आमच्या मुंबई-ठाण्यातला एकजण 'साहित्यसेवे'च्या ध्यासानं प्रकाशन व्यवसायात उतरला, अशा समजुतीने मला त्याच्याबद्दल प्रचंड आदर वाटत होता. त्याच्या 'स्ट्रगल'च्या काळात, जमेल तेव्हढी मदत करावी म्हणून मी तसे केलेही. पुढेही अनेकदा त्याने हक्काने `सहकार्य' घेतले. आमचे खूप चांगले संबंध तयार झाले. संपर्कही वाढला. अगदी एकमेकांचे `परम मित्र' झालो. काही काळानंतर, वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या माझ्या एका लेखावरून अशाच विषयावर पुस्तक प्रसिद्ध करायची कल्पना त्यने सुचविली, आणि आम्ही कामाला लागलो. प्रकाशक माझा परम मित्र असल्याने, करार वगैरे करायचे मनातही आले नाही. आणि, प्रत्येक साप्ताहिक सुट्टीत प्रवास, भेटीगाठी करून मी पुस्तक लिहिले... मीच प्रयत्न करून एका साहित्यप्रेमी राजकीय नेत्यास त्याच्या हस्ते प्रकाशन करण्याची गळ घातली, आणि माझ्या पुस्तकासोबत आणखीही त्याच्या काही पुस्तकांचे प्रकाशन आम्च्या परम मित्राने करून घेतले. पत्रकारितेतील व्यक्तिगत संबंधांमुळे, त्या प्रकाशन कार्यक्रमाला चांगली प्रसिद्धीही मिळाली. पुस्तक आवडल्याची पावतीही असंख्य वाचकांकडून मिळत गेली... त्याचे समाधान खुप मोठे होते.
प्रकाशनाला एक वर्ष उलटत असताना, सहज मीच आमच्या प्रकाशक मित्राकडे सहज म्हणून पुस्तक `व्यवहारा'विषयी चौकशी केली. तोवर, मानधन या विशयावर प्रकाशकाने चकार शब्दही काढला नव्हता. माझ्या चौकशीमुळे त्याने नाईलाजाने मला एकूणच प्रकाशन आणि पुस्तकाचा निर्मिती, विक्री खर्च,, प्रक्रिया यावर माहिती दिली.
तोवर याबद्दल मिळालेली माहिती आणि आमच्या परम मित्राने दिलेली माहिती यात एव्हढी तफावत होती, की प्रकाशन व्यवसाय म्हणजे लष्कराच्या भाकर्‍या अशी माझी समजूत झाली, आणि मी मानधनाचा विचारच सोडून दिला. उलट त्या प्रकाशकाच्या नि:स्वार्थी साहित्यसेवेबद्दल माझा आदर द्विगुणित झाला.
नंतर कधीकधी या व्यवसायतल्या जाणकारांशी सहज होणार्‍या गप्पांमुळे, पुन्हा मी आमच्या प्रकाशकाजवळ आडूनाआडून विषय काडला, पण मानधनाची रक्कम मिळेल, असे त्यावरून जाणवले नाहीच, उलट आपणच चूक केली असं मला वाटत राहिलं. परदेशांत तर, प्रकाशकालाच पैसे देऊन पुस्तकं छापून घेतात वगैरे ऐकलं होतं... (आपल्याकडे लेखनावर उदरनिर्वाह करणारे लोक कसे जगत असतील, असा विचार मनात आल्यावर तर मानधनधनाची अपेक्षा च मनातून काढून टाकली- (प्रकाशक खुश)).
पण नंतर मला वेड्यात काढणारेही काहीजण भेटले.
शेवटी, निगरगट्टपणाने पुस्तकाच्या १०० प्रती मागून घेतल्या.
... निदान, कुणाकुणाला वेगवेगळ्या निमित्ताने कधीकधी द्याव्या लागणार्‍या भेटींसाठी तरी एक चांगली वस्तू झाली....!

विंजिनेर's picture

19 May 2010 - 6:47 pm | विंजिनेर

मला एक कळत नाही की सर्व मराठी वाचक आणि प्रसिद्धीच्छुक लेखकू - प्रकाशन हा व्यवसाय नसून साहित्य-सेवा वगैरे सारखा परोपकारी कार्यक्रम आहे असा दुधखुळा आव का आणत आहेत?
व्यवसाय म्हटला की त्यात त्या त्या व्यवसायाच्या बर्‍या वाईट गोष्टी येणारच ना? त्या कुणाला चुकल्या आहेत?
बरं, ह्या व्यवसायात पडलेला प्रकाशक प्रत्येक नवीन पुस्तकाला "साहित्य अकादमी पुरस्कारविजेते पुस्तक आले रे..." असं डोक्यावर घेऊन नाचायला लागला तर मग एकूणच पुस्तकांच्या दर्ज्याच्या नावाने आनंदच असेल. सांगायचा मुद्दा असा की प्रकाशकाची एखाद्या येउ घातलेल्या पुस्तकात भावनिक गुंतवणूक नसणार हे साहजिक असताना ती अपेक्षा आपण त्याच्याकडून का ठेवावी?

मला अनुभव नाही पण ऐकीव गोष्टींवरून असे जाणवते की इंग्रजी प्रकाशन व्यवसायात फारशी वेगळी परिस्थिती नसावी. वानगी दाखल उदाहरण म्हणजे हॅरी पॉटर सारख्या लेखिकेला अब्जाधीश करणार्‍या पुस्तकाचा पहिला मसुदा ६ प्रकाशकांनी साभार परत पाठविला होता.

(बूर्झ्वा) विंजिनेर

सहज's picture

19 May 2010 - 6:59 pm | सहज

>असा दुधखुळा आव का आणत आहेत?

असा दुधखुळा आव मला तरी वर दिसला नाही. प्रकाशकाने समाजसेवा करावी असे कोणाचेच मत नसेल की त्याची भावनिक गुंतवणुक दिसावी अशी अपेक्षा. पण ८०% ते पूर्णता पैसे बुडवणे, एकंदर करार / कागदपत्रे नसणे, पैसे बुडवणे या बाबी स्पष्ट दिसल्या. शिवाय तो काही एकमेव अनुभव नव्हता अजुन एका धाग्यातुन प्रकाशकांबद्दल इतरांचे मतही तसेच दिसले. त्याबद्दल बोलायला बंदी नसावी.

आणि हो, हे प्रकाशक नेमके मराठी निघाले, अमराठी असते तर त्यांच्या नावाने मस्त खडे फोडता आले असते ती संधी गेल्याने थोडा जळफळाट झाला आहे नाही असे नाही :P

(भावी प्रकाशक) सहज

वाचक's picture

19 May 2010 - 7:25 pm | वाचक

जर हा व्यवसाय आहे, आणि तो 'सचोटीने' व्हावा अशी अपेक्षा केली तर चुकले कुठे ?

शिवाय 'आर्थिक बाबतीत' - हा 'व्यवसाय आहे आणि आम्ही फायद्यासाठी ह्यात आहोत' असे ओरडायचे आणि इतर बाबतीत 'वाचकांना भावनिक आवाहन' करुन ईमोशनल ब्लॅकमेल करायचे हा उफराटा व्यवहार झाला.

'ग्राहक हक्क संघटनेने' ह्यात लक्ष घातले पाहीजे.

विंजिनेर's picture

19 May 2010 - 8:17 pm | विंजिनेर

शिवाय 'आर्थिक बाबतीत' - हा 'व्यवसाय आहे आणि आम्ही फायद्यासाठी ह्यात आहोत' असे ओरडायचे आणि इतर बाबतीत 'वाचकांना भावनिक आवाहन' करुन ईमोशनल ब्लॅकमेल करायचे हा उफराटा व्यवहार झाला.

नियमांचा अभाव/पाळण्याबाबत असलेली उदासीनता हे अनिर्बंध व्यवसायात (unregulated industries) नेहेमीच दिसतात.
प्रकाशन व्यवसायसुद्धा त्याला अपवाद असू नये. पुन्हा "मित्रत्वाच्या नात्यामुळे न केलेला करार/ मानधनाच्या गोष्टी" वगैरे गोष्टी अशा गैरसचोटीच्या व्यवहाराला प्रोत्साहनच देतात.
मग तुम्ही एकदा फसलात की इमोशनल ब्लॅकमेल वगैरे ओरडायला मोकळे.

म्हणजे लोकांना कडवट अनुभव येत असतील प्रकाशन करताना नाही असं नाही पण तुम्ही तो व्यवसायाचा भाग समजून दुर्लक्ष करता/उमेद कायम ठेवता की मनःस्ताप करून घेऊन तेथेच प्रकाशनाचा नाद सोडता हा फरक असू शकेल.

असो. ह्या निमित्त पुलंच सूर्यमंडळ - त्यातला "प्रतिथयश लेखक(म्हणजे सूर्य) - घरी आलेल्या तरूण पोरा-पोरीशी काफ्का/परिसंवाद इ. वर वगैरे चर्चा करतो पण घर खर्च भागवायला प्रकाशकाकडे बिननावी हेरकथा-अनुवाद करतो... वगैरे आठवले.

हे होतच असते आणि होतच रहाणार हे मलाही मान्य आहे. म्हणूनच ग्राहक हक्क संघटनेचा मुद्दा मांडला.

पण 'प्रकाशन व्यवसायाला' 'भावनिक' बाजू आहे हे नाकारुन चालणार नाही. 'मराठी भाषेच्या प्रेमाला', 'मराठी पुस्तक व्यवसायाला आलेल्या दीन स्थितीला', सरकारच्या मराठी संवर्धनाबाबतीतल्या धोरणाला' अशा अनेकविध बाजूंना भावनिक आवाहन करुन, अनुदान, गुंतवणूक, कमी व्याजदराचे कर्ज, शासन पुरस्कृत हक्काची पुस्तक खरेदी आणि वितरण व्यवस्था ह्या पदरात पाडून घ्यायच्या आणि वर लेखकांना फसवायचे हे बरोबर नाही असा माझा मुद्दा होता.

प्रदीप's picture

21 May 2010 - 1:07 pm | प्रदीप

पुस्तक प्रकाशन हा व्यवसाय आहे, तेव्हा तिथे भावनिक गुंते नकोत; कुठल्याही व्यवसायाप्रमाणे ह्या व्यवसायातही धंद्यातील बर्‍यावाईट गोष्टी असणारच, असा तुमचा रोख थोडाफार दिसतो, व तो मान्यही आहे. प्रकाश व दिनेश ह्या दोघांनीही लेखी करार केले नव्हते, जे काही ठरले ते केवळ तोंडी संभाषणापुरतेच होते, ही त्यांची चूक म्हणता येईल.

पण मी माझ्या ह्या प्रतिसादास 'आश्चर्य' हे शीर्षक दिले ते विंजिनेर ह्यांच्या इतर आरोपांविषयी. प्रकाश ह्यांच्या मूळ लेखातून कुठेही ते प्रसिद्धीच्छुक लेखक आहेत असे अगदी त्रयस्थ वाचकासही जाणवू नये. तीच बाब दिनेश ह्यांच्या प्रतिसादाची. आणि जे इथे व अन्य तत्सम संस्थळांवर गेली काही वर्षे नियमित येत आहेत अशा सर्वांना त्यांच्या सर्वसाधारण वावरावरून त्यांचे अत्यंत संयमित, व लो- की (low key) व्यक्तिमत्व जाणवत रहाते. तेव्हा असल्या दुर्दैवी आरोपाचे सखेदाश्चर्य वाटले.

विंजिनेर's picture

21 May 2010 - 1:58 pm | विंजिनेर

माझ्या प्रतिसादात प्रकाश घाटपांडे किंवा दिनेशराव यांच्यावर कुठलेही वैयक्तिक आरोप मी केलेले नाहीत. तसं ध्वनित होत असेल तर मात्र तो दोष कदाचित संग्दिध-प्रतिसाद लेखनाचाच म्हणावा लागेल.
जाता जाता: लेखकाने प्रसिद्धिच्छुक असले तर ह्यात वाईट काय?

श्रावण मोडक's picture

19 May 2010 - 7:25 pm | श्रावण मोडक

फटका खाल्ला आहे तर तुम्हीही! इथला तुमचा अनुभव म्हणजे तुमच्या पुस्तकाचेच अपहरण झाले आहे. हे प्रकाशक कसले, लुटारूच आहेत.

इन्द्र्राज पवार's picture

19 May 2010 - 7:40 pm | इन्द्र्राज पवार

तुमचा स्वतःच पुस्तक प्रकाशीत करण्याचा निर्णय आणि तो प्रत्यक्षात येईपर्यंतचा प्रवास खरे तर हाच एका रोखठोक अनुभवाच्या कादंबरीचा विषय आहे. तुम्हाला तर सलामच पण या प्रयत्नात न कंटाळता तुम्हास आणि तुमच्या प्रयत्नास सक्रीय सहकार्य देणारी तुमची धर्मपत्नी यांनाही या पूर्ततेचे तितकेच श्रेय देणे आवश्यक आहे. स्वं-प्रकाशनाचा तुमचा अनुभव हा व्यावसायिक प्रकाशकांकडून थपडा खाल्लेल्या लेखकरावांना थोडातरी दिलासा देणारा आहे.

मराठी प्रकाशन व्यवसाय हा निव्वळ चोर आणि रक्तपिपासू व्यक्तींनी भरलेला आहे याची जाणीव प्रत्येक नवीन लेखकाला येत होती, येत आहे, येत राहील. या प्रकाशक जमातीला माहित असते की आपल्या मराठीत लिहायची "खाज" असणारे पोत्याने आहेत (पुरुष आणि स्त्रियाही...) आणि स्वत: हे लोक आपले साहित्य प्रकाशित करू शकत नाहीत... अन् केले तर खपवायचे कसे? बाजारपेठ म्हणजे काय? विक्रेता नावाचा ठोम्ब्या कुठे असतो, तो पुस्तक विक्रीला ठेवतो म्हणजे काय करतो, छापखानावाले, बाईंडर, कागदवाले, इतकेच काय वाहतुकवाले देखील या प्रकाशकांचे गुलामच कारण या गटातील लोकांना माहित असते की "बातमीत" उल्लेख केलेला लेखक असा एखाद दुसराच असतो जो कर्ज काढून का होईना आपले पुस्तक बाजारात आणण्याचा कासावीस होईपर्यंत प्रयत्न करणार, अन्य नाही.... थोडाफार प्रयत्न करतील आणि "जाऊ दे त्येच्या मायला, मराठी साहित्य खड्ड्यात...!" म्हणतील आणि आपआपल्या पोटापाण्याच्या उद्योगाला लागतील... म्हणजेच शेवटी आपला तारणहार (किंवा "मालक") हा प्रकाशकाच.

बाकीचा चिल्लरखुर्दा सोडा.... प्रकाशकाचा असाच वाईट अनुभव खुद्द "महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व" श्री. पु. ल. देशपांडे आणि सुनिता देशपांडे यांना आला होता.... आणि प्रकाशक रा. ज. देशमुख यांना नकार देऊन स्वत: पुस्तक छापण्याचा आग्रह (कि अट्टाहास..?) धरला व दोघांनीही त्यात हात पोळून घेतले व निमुटपणे पुढच्या पुस्तकाच्यावेळी देशमुखांना शरण गेले. आता पु. ल. सारख्या "भरभक्कम" लेखकाची ही अवस्था तर बाकीच्या शेंगदाण्यांची काय कथा?

"बिढार" मध्ये श्री. भालचंद्र नेमाडे यांनीही त्यांना "कोसला" च्या वेळी आलेला अनुभव त्यांच्या टिपिकल भाषेत वर्णन केला आहे.... तीच गोष्ट किरण नगरकर यांच्या "सात सक्कं त्रेचाळीस" ची. कथा कादंबरीकाराना हे प्रकाशक निदान "आत या" असे म्हणून थोडा तर मान देतात, पण "कविता"च्या चोपडीकडे त्यांच्या दारातील कुत्रे देखील मान वर करून बघत नाही. माझा एक "क्रांतिवीर" कवी मित्र (जो आपल्या कवितेतून निव्वळ आगीचे लोळ फेकत असे....) मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे उपाशीपोटी वणवण हिंडला, आपल्या "तिसर्‍या क्रांती"ची पुस्तकरुपी पिलावळ घेऊन... पण प्रकाशक मायाचे साले एक नंबरचे हुशार ! त्यांनी सांगतले थेट : "कुठली क्रांती घेऊन बसला.... काय एमपीएससी आणि तशाच स्पर्धा परीक्षेसाठी काय लिहित असाल तर सांगा..! बास झाली मराठी भाषेला आता क्रांती... जावा !" अक्षरश: हाकलून लावले त्याला असे म्हटले तरी वावगे होणार नाही. डोंबलाचे क्रांतीची भाषा करणारे हे कवी... सगळे च्यामायला भिकार जमात आहे महाराष्ट्रातील या जातीच्या कवी लोकांची. पैशाला महाग आहेत स्वत: आणि प्रकाशकाच्या दारात उभे राहून थेट टाटा, बिर्ला अंबानी यांना कवितेतून आयमाय वरून शिव्या घालतात...! कुठला प्रकाशक यांना जवळ उभा करून घेईल. आता तर ढसाळ, ढाले, दया, बागुल, हे देखील इतिहासजमा झाले.

सगळे प्रकाशक या समस्त लेखक जमातीच्या बापाचे बारसे जेवले आहेत. त्यामुळे "सकाळ" च्या लेखातील व्यक्तीस आलेला कटू अनुभव हा काय नवा नाही..... त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे त्यांनी जिद्द न सोडता पदरमोड होऊन का होईना शेवटी ते पुस्तक प्रकाशित केले... त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजेच. तसेच तुमचेतर एवढ्यासाठी की, तुम्हीही तीच जिद्द दाखविली आणि इतकेच नव्हे तर आर्थिक बाबतीतही ती यशस्वी करून दाखविली.

आता मनोविकास प्रकाशनचे श्री. पाटकर यांचा तुम्हाला आलेला अनुभवदेखील खिन्न करणारा आहे. डॉ. जयंत नारळीकर, डॉ.नरेन्द्र दाभोळकर अशा दिग्गजांनी लेखी आणि जाहीर स्वरूपात सार्थ गौरविलेल्या "श्री. प्रकाश घाटपांडे" यांच्याशी अशा पध्द्तीचा अपमानस्पद आर्थिक व्यवहार (तो अद्यापी अपुरा आहे....) हे लोक करण्यास कचरत नाहीत तिथे बाकीच्या "गण्या, गंप्या, गोंद्या" ची काय गाथा !!!
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

विकास's picture

19 May 2010 - 8:18 pm | विकास

प्रकाशकाचे मला व्यक्तिगत अनुभव नाहीत पण प्रकाशराव अथवा दिनेश५७ च्या अनुभवाचे दुर्दैवाने आश्चर्य वाटले नाही. वर विजिनेर यांनी लिहीलेल्या प्रकाशन हा व्यवसाय आहे, या मुद्याशी सहमत. त्यामुळे काही अंशी आपण आपले पुस्तक छापणे हा "धंदा" जरी समजले नाही तरी प्रकाशकाशी "व्यवहार" म्हणून समजून करावे असे वाटते.

या संबंधात इंग्रजी प्रकाशकांबद्दलचा मुद्दा आला आहे. हॅरी पॉटरची पहीली प्रत माझ्या माहीतीप्रमाणे १२ का १३ वेळेस नाकारली गेली होती. पण तो वेगळा मुद्दा झाला कारण त्यात कुणा प्रकाशकाने तीला फसवले नाही. जालावर जरा शोधले असता खालील माहीती मिळाली:

A Simple Model of Book Costs and an Example

The very simple break-up is -

1. Author – Creation. 8-15% Royalties.
2. Publisher – Being the Curator, Polishing, Manufacturing, Marketing. 45-55% (includes Author’s Royalties). Note that Printing accounts for just 10% of the book price.
3. Distributor – 10%.
4. Retailers – 40%.
5. Consumers. Just the paying part :)

बाकी अमेरिकेत विद्यापिठ शिक्षणाच्या पुस्तकाचा प्रचंड "मोठा धंदा" बघितला आहे. जे पुस्तक एखादा प्रकाशक (उ.दा. मॅक्ग्रॉहील्स) जर आशिया विक्रीसाठी $१५-३० ला देऊ शकतो, तेच पुस्तक अमेरिकेत मात्र $१०० च्या आसपास मिळते आणि येथील विद्यार्थ्यांचे हाल होतात.

त्याही पुढे ते जर पुस्तक नंतर परत विकायची वेळ आली तर प्रत्येकाची आयएसबीएन कोड प्रमाणे किंमत ठरवून विद्यापिठातील पुस्तकांची दुकाने पैसे देतात. त्यात प्रत कुठल्या वर्षाची याला महत्व, किती हातळले आहे याला नाही. जे खूपच कमी असतात. नंतर तेच पुस्तक परत मूळ किंमतीच्या ७०-८०% ला विकायला... मी येथे शिकत असताना एक अर्थशास्त्राचा विद्यार्थी पुस्तक विकण्याच्या रांगेत उभा होता. $७० वगैरेचे पुस्तकाचा आयएसबीएन कोड संगणकात घालून काउंटरवरील व्यक्तीने किंमत सांगितली $२ ! (कारण ते २ वर्षे जुने पुस्तक होते). तो मुलगा असला संतापला की त्याने त्याच्या समोर ते पुस्तक बाजूच्या कचर्‍याच्या डब्यात टाकले....

जालामुळे आता अनेक मार्ग उपलब्ध झाल्याने जुन्या पुस्तकांना काहीतरी भाव मिळत असेल...

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

अक्षय पुर्णपात्रे's picture

19 May 2010 - 8:43 pm | अक्षय पुर्णपात्रे

अनुभव बोलका आहे. मराठी पुस्तकांच्या प्रकाशन व्यवसायाची स्थिती फारशी चांगली दिसत नाही. पुस्तकविश्व.कॉम संकेतस्थळाच्या प्रवर्तकांनी भविष्यात एखादी सचोटीने चालणार्‍या प्रकाशनसंस्था स्थापनेबाबत विचार करावा.

वाचनालय संस्कृती जिंदाबाद...
उगाच भावनेच्या भरात कुणा व्यावसियाकाचे खिसे का भरा?

चित्रा's picture

19 May 2010 - 11:45 pm | चित्रा

अनुभव सांगितल्याबद्दल धन्यवाद. माझ्याही ओळखीतील एका ज्येष्ठ स्त्रीने पाककलेचे पुस्तक लिहीले, प्रसिद्ध झाले, आणि त्यानंतर प्रकाशन संस्थेने नंतरच्या आवृत्तीच्या प्रती किती काढल्या आहेत हेही सांगितले नाही. शेवटी काही प्रती लेखिकेने मागून घेतल्या.

परिकथेतील राजकुमार's picture

20 May 2010 - 4:30 pm | परिकथेतील राजकुमार

(आज सकाळी घाटपांडे काकांचा हा लेख एका वृत्तपत्राशी संबंधित मित्राला वाचायला मिळाला, त्याचे मिपावर खाते नसल्याने त्याने ह्या लेखावर एक प्रतिक्रीया लिहुन मला इ-मेल केली. घाटपांडे काकांच्या परवानगीने ती प्रतिक्रीया येथे देत आहे. काही अडचणींमुळे प्रतिसादकर्त्याचे नाव येथे देता येत नाहीये, तरी आपण सर्व सांभाळुन व समजुन घ्याल हि अपेक्षा)

बऱ्याचदा होतं काय, आपण काहीतरी लिहितो, चांगलं लिहितो, असा शोध अनेकांना लागतो. मग ते लिहित सुटतात आणि लिहिलेलं वर्तमानपत्रांच्या कार्यालयात नेऊन देतात. लेख दिल्या क्षणापासून त्यांचा पाठपुरावा सुरू होतो. असे लेख देणाऱ्यांतील काही मंडळी वयानं बरीच मोठी असतात. शेवटी हो-नाही करता करता त्यांचा एखादा लेख एखाद्या स्थानिक पुरवणीत बरीच काटछाट आणि पुनर्लेखन करून प्रसिद्ध होतो. तो झाला, की ही मंडळी त्याक्षणीच लेखक होतात. हे मी अनुभवांती सांगतोय. माझ्याकडे अशी व्हिजिटिंग कार्डस् आहेत... लेखक ः लोकसत्ता, सकाळ, प्रभात. पत्रलेखक ः लोकसत्ता, सकाळ, प्रभात, केसरी... वगैरे वगैरे...
आपण लेखक झालो, म्हणजे आपण अधिक लेख छापून आले पाहिजेत, असा यांचा आग्रह असतो. मग ते प्रतिथयश असल्याचा आणि आपले लेखन हे जागतिक दर्जाचे आहे. ते लोकांपर्यंत पोचलेच पाहिजे, असा त्यांचाही ग्रह होतो. मग सुरू होतात धमक्या... अक्षरशः धमक्या... सुरवात ही अशी होते...
नमस्कार... ओळखलंत का ?
??? बोला... काय काम होतं?
तुमच्यासाठी लेख लिहिला होता
विषय काय आहे ?
सध्या हे जे काही चाललंय ना, त्याच्याबद्दल
म्हणजे ? मला नाही समजलं
आहो, असं काय करता. आपली संस्कृती, आजच्या पिढीचं वागणं, याविषयी आहे.
नाही घेता येणार. एखाद्या विषयावर अभ्यासपूर्ण लेख आहे का तुमच्याकडे? (हळूहळू संताप येऊ लागतो)
आत्ता तर नाही, पण तुम्ही सुचवा विषय.
बरं... तुमच्या आवडीचा किंवा अभ्यासाचा विषय कोणता ?
तसं नाही सांगता यायचं. पण तुम्ही सांगा. मी कोणत्याही विषयावर लिहू शकतो...
(इथं मी ब्लँक... माझ्या हातातले कागद परत करतो आणि काम सुरू करतो. लेखकराव उभेच.)
मग कधी छापताय ?
काय ?
लेख हो... बरेचजण मागे होते. पण मीच म्हटलं, पहिला मान तुमचा.
नाही घेता येणार...
नाहीच म्हणता ?
नाही हो. शक्य नाही.
तुमचे साहेब कोण आहेत ?
ते समोरचं केबीन साहेबांचं. आहेत आत्ता. भेटताय?
नाही हो... तुम्ही रागावलात. मी सहज विचारलं.
मी नाही रागावलो. भेटायचं असेल, तर आत्ताच भेटा. नंतर ते बाहेर जाणार आहेत.

मग हे साहेब साहेबांना भेटतात. तिथूनही नकार मिळाला, की जमेल त्याला भेटत सुटतात. काहीवेळा इतका पिच्छा पुरवतात, की त्यांची कटकट कमी करण्यासाठी अगदी छोट्याशा पुरवणीत किंवा चक्क वाचकाचे पत्र म्हणून तो लेख (?) प्रसिद्ध होतो...

पुढेपुढे हे लेखकराव फारच चेकाळतात. त्यांना आता त्यांच्या नावावर पुस्तक हवं असतं. पहिली पायरी म्हणून आमच्याकडे येतात. लेख पुस्तकात छापण्यास हरकत नाही, असं पत्र घेऊन जातात. प्रकाशकांचे पत्ते आम्हालाच विचारतात. मग सुरू होतात प्रकाशकाकडच्या चकरा... त्यांचं लेखन काय आहे, हे त्यांनाही पक्कं माहिती असतं, पण आता लेखक असल्याचं फिलींग आलेलं असतं. त्यावर ही माणसं चकरा मारतात. प्रकाशक उभं करत नाहीत. मग पुन्हा तक्रार घेऊन आमच्याकडे... सबब तीच, आजकाल लोकांना मराठीची सेवा करायला नको आहे. मराठी लेखकांना कोणी विचारत नाही इ.इ.इ.

शेवटी त्यांना प्रकाशक सापडतो. तो प्रकाशक पैसे घेऊन पुस्तक छापून देणाराच असतो. (असे प्रकाशक आहेतच. शेवटी सगळीकडे सगळी माणसं दिसतात) तोही बराच टोलवतो आणि अखेरीस पुस्तक छापून होते. ते झालं रे झालं, की त्या पुस्तकाची एक प्रत घेऊन पुन्हा आमच्यापाशी... आता परीक्षण तेवढं लवकर छापा...

ते पुस्तक परीक्षण करण्याच्या खरंच लायकीचं नसतं. ज्या पुस्तकाला धुतलं जाईल, अशी परीक्षणं आम्ही शक्यतो टाळतो. कारण एकच, जागा वाचवणं. आधीच जागा कमी. त्यात अशा पुस्तकांपेक्षा चांगली पुस्तकं छापावी, असा आमचा दृष्टिकोन. पण साहेब खनपटीला बसतात. रोजच्या रोज फोन सुरू होतात. आमचा मोबाईल मिळवतात आणि अक्षरशः कोणत्याही वेळेला फोन करून पिडू लागतात. तरीही आम्ही दाद देत नाही म्हटल्यावर साहेबांना धरतात. त्यांनाही असाच त्रास सुरू होतो... बरं एक पालुपद भारी असतं, आहो सगळे लेख तुमच्याच पेपरात छापून आलेत. मग दुसरी दैनिकंही परीक्षण छापणार नाहीत. तुम्हीही नाही म्हणालात, तर आम्ही कुठे जायचं. आमच्यावर अन्याय होतोय हो. आणि मी तुमचा लेखक आहे....
शेवटी वैतागून आणि ही पीडा दूर करण्यासाठी कुठेतरी खोपच्यात छोटंसं परीक्षण येतं. त्यात फारसं काहीच नसतं. यांनी यांनी पुस्तक लिहिलं आहे. इतक्या कथा आहेत. पानं इतकी वगैरे वगैरे...

साधारण अनेक लेखकांचा हा प्रवास असतो. आणि त्यामुळेच त्यांना त्रास होत असतो. कवींच्या बाबतीत तर काही बोलायलाच नको...

मोठे किंवा नावाजलेले प्रकाशक हा या विश्वातला मोठा भाग. ते फसवत नाहीत का ? शंभर टक्के नाही म्हणता येणार नाही. पण अशावेळी आपण सजग राहायला नको का? समोरचा व्यवसाय करतोय आणि व्यावसायिक दृष्टिकोनातूनच बोलतोय म्हटल्यावर आपण निष्काम साहित्यसेवा वगैरे शब्दांच्या गुंतावळ्यात कशाला पडायचं ?
माझंच उदाहरण सांगतो. मी माझ्या प्रत्येक पुस्तकावेळी करार केला आहे आणि फायनल स्क्रीप्ट हाती देण्याआधी पूर्ण रकमेचा चेक घेतला आहे. आपण व्यावहारिक राहिलो, तर फसवणूक होत नाही.
प्रकाशकांनाही पुस्तकावर केलेला खर्च वसूल करायचा असतो. मग जे पुस्तक वाचलं जाणार नाही, विकत घेतलं जाणार नाही, असं त्याला वाटतं, ते तो कशाला छापेल ? ५००-१००० ची आवृत्ती काढायची तर किमान ५०-६० हजार खर्च येतो. बरं, एका पुस्तक दुकानात ५० पुस्तकं विकली जातात का ? नाही. पुस्तक विक्रेते ५-१० कॉपी घेतात. त्याही क्रेडिटवर. पुस्तक उत्तम चालणारे असेल, तर तिथं प्रकाशक म्हणतो ती अट असते. आणि अशी पुस्तकं वर्षातून किती असतात ? आता विचार करा, प्रकाशकाला, त्यानं बाजारात आणलेल्या १,००० प्रतींचे पैसे कधी, कसे आणि किती मिळत असतील ते. पाच प्रतींच्या पैशांसाठी कुठल्या कुठल्या गावांमध्ये फेऱ्या माराव्या लागत असतील. बरं कंटाळून पाच प्रतींचा नादही सोडता येत नाही...
म्हणजेच एकदा गुंतवलेले ५० ते ६० हजार रुपये परत आणि फायद्यासह मिळवणं यासाठी मोठा कालखंड जातो. आणि प्रकाशन व्यवसाय हा असाच चालतो. त्याला पर्याय नाही. त्यामुळे अशा विनाखपाऊ पुस्तकांकडे प्रकाशक पाहातच नाही.

विक्रेत्यांचं म्हणाल, तर मिळणाऱ्या कमिशनवर त्यांचा व्यवसाय चालतो. त्यांनी त्यांचं कमिशन कमी करावं किंवा वाचकांना सूट द्यावी, हे म्हणणं सोपं आहे, पण विक्रेत्यांसाठी अवघड आहे. शोरूम, कर्मचारी, पुस्तकाची खरेदी इत्यादी साऱ्या गोष्टी त्यांनी कशा मॅनेज कराव्यात ? त्यांना प्रकाशकांकडून सूट मिळते आणि क्रेडिटही. पण म्हणून ते आपल्या दहा रुपयांतील आठ रुपये वाचकाला देऊ शकत नाहीत.

सध्याचा पुस्तक व्यवसाय हा असा आहे. लेखक, प्रकाशक आणि विक्रेता यापैकी कोणीही साहित्यसेवेचा आव आणत असले, तरी ते तसं नाही. हा व्यवहार आहे. यात वाचकही आलाच. त्याला मोजलेल्या रुपयांचा आनंद हवा असतो. तो ज्या पुस्तकातून मिळतो ते पुस्तक खपतं. (इथं आनंद या शब्दाचा अर्थ व्यापकतेनं घ्या. एखाद्याला संशोधनात्मक पुस्तकाच्या वाचनातून आनंद मिळेल, एखाद्याला समीक्षेच्या, कोणाला कवितेच्या तर कोणाला कथेच्या...)

व्यवहाराचं भान जो सोडतो, तो आपटतो. अर्थात हा जगाचा नियम आहे. त्यामुळे हा व्यवसाय वाईट, चुकीचा असा समज करून घेऊ नये. समाजात जेवढ्या प्रवृत्ती, अपप्रवृत्ती आहेत, त्याच प्रमाणात या व्यवसायातही आहेत. फसवणूक इथेही होतेच. म्हणूनच आपण व्यवहार पाळायचा. आणि आपण लेखक असू, तर स्वतःची समीक्षा स्वतःच परखडपणे करायची... ते केलं, की बहुतेकांचा प्रवास तिथंच खुंटेल !!!

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

प्रकाश घाटपांडे's picture

20 May 2010 - 4:59 pm | प्रकाश घाटपांडे

परदेशात लेखक व प्रकाशक यात एक एजन्सी असते. लेखकाचा माल किती व कसा खपेल याचा अंदाज त्यांना असतो.
संस्थात्मक पातळीवरील ग्राहक म्ह़णजे ग्रंथालय हा माल घेणारा खरा ग्राहक असतो. काही लोक दिवाणखान्याची शोभा वाढवण्यासाठी देखील पुस्तके घेतात. घेतात म्हणजे वाचतातच असे नव्हे. कधी कधि एखाद्या संदर्भासाठी आख्खे पुस्तक विकत घ्यावे लागते. काही लोक विकत घेउनच पुस्तके वाचतात. ग्रंथालयांच आणी त्यांच जमत नाही.
साहित्य हा देखील व्यवहार आहे. त्याचे भान सर्वांनाच हवे. असे अनेक लेखक आहेत कि व्यवहाराकडे न पहाता लेखन करतात. आपल पुस्तक लोकांपर्यंत पोहोचत आहे यातच आनंद मानतात. असे लेखक प्रकाशकांना फार आवडतात.
मार्केटिंग या प्रकारात गुणवत्ता कमी असली तरी माल खपवण्याचे कौशल्य आहे. पुस्तकेही त्याला अपवाद नाहीत.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

विंजिनेर's picture

20 May 2010 - 5:37 pm | विंजिनेर

दुसरी बाजू देखील ऐकायला मिळाली!
बाकी परदेशातला लिटररी एजंट ही जमात आपल्याकडे दिसत नाही हे खरंय. पण अशी जमात इथे वसवायला काय करता येईल?

सुचेल तसं's picture

20 May 2010 - 6:20 pm | सुचेल तसं

अतिशय सुंदर प्रतिक्रिया!!!!

श्रावण मोडक's picture

20 May 2010 - 9:10 pm | श्रावण मोडक

उत्तम प्रतिक्रिया. पण...
घाटपांडे यांच्या लेखापुरते आधी बोलू. घाटपांडे यांच्या पुस्तकाची आवृत्ती पहिली की तिसरी? मनोविकासची तिसरी असेल तर तसा खुलासा छापील आवृत्तीत केला? आवृत्तीच्या हजार प्रती संपल्या? प्रकाशकांनी दिलेल्या माहितीनुसार संपल्या. त्यानंतर आजतागायत रॉयल्टीचा (करार न केलेला, पण घाटपांडे यांच्या म्हणण्यानुसार शब्द दिलेला) व्यवहार पूर्ण का झालेला नाही? या प्रश्नांच्या अनुषंगाने प्रकाशन व्यवसायाची स्थिती मांडता येतेच. ती काय आहे?
५००-१०० प्रतींसाठी ५०-६० हजार रुपये खर्च? प्रतींची संख्या एकदा निश्चित करूया. या खर्चात काय-काय आहे? त्याचाही तपशील येऊ द्यावा. डीटीपीला किती, पानांची संख्या काय, मुद्रित शोधनाला किती, किती कागद लागतो, मुखपृष्ठावर किती, बाईंडिंगला किती? काय दराने हे व्यवहार होतात हेही पाहू. या यादीत एक गॅप मी मुद्दाम ठेवली आहे. तीही तपासायची आहे.
पुस्तकाचा विक्रेता हा मुद्दा भारीच. वर्षानुवर्षे प्रकाशकांकडून ऐकतोय तो. तिथे असणारी उधारी, तिथं द्यावे लागणारे कमिशन वगैरे मुद्दे आहेतच. प्रश्नच नाही. घाटपांडे यांनी अन्यत्र एके ठिकाणी यावरचे एक उत्तर रमेश राठिवडेकर यांच्या हवाल्याने दिले आहे. राठीवडेकर म्हणतात की पुस्तकं खपतात, पण आपणच वाचकापर्यंत पोचत नाही. हे वास्तव आहे. पुस्तकांची खरेदी ही पुण्या-मुंबईच्या बाहेर अगदी अलीकडेपर्यंत एक पर्वणी होती हे वास्तव नाही? ही पर्वणी का ठरली? मराठीतील पाच-दहा मोठ्या प्रकाशकांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील मोजक्या जिल्हा केंद्रात एकेक पुस्तकदालन का नाही काढता आलं? त्या-त्या गावात पुस्तक ही ओव्हर द काऊंटर खरेदीची सोय का नाही करता आली? महाराष्ट्रातील अ वर्गाच्या जवळपास प्रत्येक नगरपालिकेचे एक शॉपिंग कॉम्प्लेक्स त्या-त्या गावात मध्यवर्ती ठिकाणी आहे. मराठीचं रडं गातच त्या-त्या ठिकाणी एक गाळा प्रकाशकांना संयुक्तपणे घेऊन एक दालन उभं करता आलं नसतं? कुठलं शोरूम, कर्मचारी वगैरेच्या गोष्टी चालल्या आहेत? पुणे-मुंबईपुरत्या? सरकारी पुस्तकविक्रीचं काय करूया? तिथं तर बल्कने होतेच ना विक्री?
अर्थकारण - पुस्तकाचा खर्च हजाराच्या आवृत्तीतच बाहेर काढायचा की दोन हजाराच्या, तीन हजाराच्या?
मला या प्रश्नांच्या अनुषंगानं हा व्यवहार समजून घ्यायचा आहे.
परा, कृपया पहा.
गेलाबाजार, या पत्रकारमित्रांनी लेखकरावांचा अनुभव जो सर्वसामान्य अनुभव सांगितला आहे तो तसाच असणार. त्याच्याशी मीही सहमत, कारण तसा अनुभव मीही घेतला आहेच. घाटपांडे यांचा लेख त्या प्रकाशनांविषयी नाही. घाटपांडे यांचे पुस्तकही त्याच मालिकेतील आहे, असे या पत्रकारांना म्हणायचे असेल तर खुश्शाल तसे म्हणावे. मग ही प्रतिक्रिया आणि त्यात दडलेला प्रकाशनव्यवसाय समजून घेता येईल आणि म्हणूनच तो डिस्काऊंटही करता येईल.
व्यवहाराच्या मुद्यावर मात्र पत्रकार मित्रांचं म्हणणं अगदी योग्य. लेखकानंही चोख व्यवहारी रहावं. करार करावाच. पुढं कोर्टातही जावं. प्रश्नच नाही.
पण प्रकाशकांनी व्यावसायीक दर्जानं काम करावं अशी एक समांतर अपेक्षा गैर ठरू नये.

विकास's picture

20 May 2010 - 9:31 pm | विकास

घाटपांडे यांचा लेख त्या प्रकाशनांविषयी नाही.
...

व्यवहाराच्या मुद्यावर मात्र पत्रकार मित्रांचं म्हणणं अगदी योग्य. लेखकानंही चोख व्यवहारी रहावं.

या दोन्ही मुद्यांशी सहमत. "पत्रकार मित्राची" प्रतिक्रीया वाचताना असेच म्हणावेसे वाटत होते, जरी त्यातील म्हणण्याशी सहमत आहे तरी ते या चर्चेतील मूळ मुद्याशी थोडे अवांतर वाटले.

(बाकी, प्रकाश, प्रकाशक, प्रकाशकाका वगैरे एकत्र वाचताना माझा अंमळ वैचारीक गोंधळ उडू लागला आहे. :) )

- लेखक पहीली ते बारावी विविध विषयांवर निबंध ;)

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

श्रावण मोडक's picture

20 May 2010 - 10:40 pm | श्रावण मोडक

माझ्या लेखनात चूक झाली आहे. दुसऱ्याच परिच्छेदात 'मनोविकासची तिसरी आवृत्ती' असा उल्लेख झाला आहे, तेथे 'मनोविकासची पहिली आवृत्ती' असे वाचावे.

प्रकाश घाटपांडे's picture

21 May 2010 - 8:20 am | प्रकाश घाटपांडे

पुस्तकाची तिसरी आवृत्ती. १००० प्रतींची एक आवृत्ती अशा हिशोबाने. पुस्तकाची तिसरी आवृत्ती ही मनोविकासने छापली पण मनोविकास प्रकाशनाची ती पहिली आवृत्ती अशा अर्थाने पहिली आवृत्ती असे त्यांनी छापले. पुस्तकाची कितवी आवृत्ती असा उल्लेख त्यात हवा होता. मनोविकास चे पुस्तक वाचताना नवीन वाचकाला ही पुस्तकाचीच प्रथम आवृत्ती आहे असे वाटणार. दुसर्‍या आवृत्तीच्या निमित्ताने हे लिहिलेले स्वगत काढुन टाकले त्यांनी. मुखपृष्ठ बदलले. नारळीकरांचे परिक्षण मार्केटिंग साठी वापरले नाही.
खर तर ही आवृत्ती म्हणजे दुसर्‍या आवृत्तीची रिप्रिंट होती असे म्हटले तर वावगे ठरु नये. काही प्रकाशक ५०० ची आवृत्ती काढतात व दुसर्‍या ५०० ला दुसरी आवृत्ती म्हणतात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

या विधानाशी असहमत.

प्रकाश घाटपांडे's picture

21 May 2010 - 7:59 am | प्रकाश घाटपांडे

मार्केटिंग या प्रकारात गुणवत्ता, स्पर्धा, ग्राहकांना उपलब्धता, किंमत अशा अनेक बाबींचा समावेश आहे. आमची कोठेही शाखा नाही असा अध्याहृत गुणवत्त्तेचा माज आता करता येत नाही. तुझी गुणवत्ता तुझ्यापाशी असा मार्केटिंग चा सूर. तुलनात्मक दृष्ट्या कमी गुणवत्तेचे प्रॉडक्ट मार्केटिंगच्या कौशल्या मुळे यशस्वी ठरतात.आमची सर्वत्र शाखा आहे असा सूर यशस्वी. मार्केटिंग विषयावरील तज्ञ याची अधिक माहिती देउ शकतील असे वाटते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

बिपिन कार्यकर्ते's picture

20 May 2010 - 8:03 pm | बिपिन कार्यकर्ते

अतिशय उद्बोधक धागा.

बिपिन कार्यकर्ते

स्वाती२'s picture

20 May 2010 - 9:44 pm | स्वाती२

लेख आणि प्रतिसाद, दोन्ही वाचनिय!

अक्षय पुर्णपात्रे's picture

20 May 2010 - 11:07 pm | अक्षय पुर्णपात्रे

प्रकाशनाचा व्यवसाय अजब आहे. माझेच शोधनिबंध जर मला ओपनसोर्स (हवे त्याला विनामूल्य उपलब्ध) करायचे असतील तर काही जर्नल्स माझ्याकडूनच पैसे मागतात. असे पैसे न दिल्यास निबंध हवा त्याला विनामूल्य मिळू शकणार नाही, ही अट करारातच असते. त्याआधी निबंध पाठवतांना काही जर्नल्समध्ये अव्वाच्यासव्वा फी आकारली जाते ती निराळीच. एखाद्या अभ्यासकास सब्स्क्रिप्शन नसतांना माझा निबंध हवा असल्यास कमीत कमी २५ डॉलर्स द्यावे लागतात. या जर्नल्सनाच निबंध पाठवावे लागतात कारण ही जर्नल्स साधारणत: त्या त्या विषयातील प्रथम श्रेणीची मानली जातात. काही ठिकाणी मात्र अभ्यासकांनी एकत्र येऊन ओपनसोर्स जर्नल्स सुरू केलेली आहेत, जी हळूहळू नावारुपास येत आहेत.

विकास's picture

20 May 2010 - 11:34 pm | विकास

चांगला मुद्दा आहे. या संदर्भात Directory of Open Access Journals मध्ये मोठी यादी आहे. मी माझ्या क्षेत्रातील जर्नल्स यामधून पाहीली (चाळली) होती आणि कल्पना चांगली वाटली होती. अर्थात ह्यात बरेच (शास्त्रीय) निबंधतयार होण्यास वेळ लागू शकतो असे वाटले होते. त्याचे एक कारण म्हणजे peer reviewed शोधनिबंधांना असलेले महत्व...

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

परिकथेतील राजकुमार's picture

21 May 2010 - 11:30 am | परिकथेतील राजकुमार

हा राजकुमार, त्याच्या माध्यमातून प्रतिक्रिया देण्यासाठी परवानगी देणारे या साईटचे मालक, मुद्रक आणि प्रकाशक व मित्रहो...
इथं लिटररी एजंटचा विषय निघाला, म्हणून पुन्हा थोडं बोलतो.
परदेशातील पुस्तक व्यवहार आणि आपला पुस्तक व्यवहार यात आर्थिकदृष्ट्या मोठा फरक आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे वाचकसंख्या. इंग्लिश पुस्तकांचा पहिला रन किमान दहा हजारांचा असतो. इंग्लिशच कशाला, आपल्याकडे हिंदी पुस्तकांचाही पहिला रन १० हजारांचा असतो. (हे मी चांगल्या पुस्तकांबद्दल बोलतोय) मराठीतील उत्तम पुस्तकाचा पहिला रन एक हजाराचाच असतो. मराठीतील सध्या उत्तम चाललेलं पुस्तक म्हणजे ऋजुता दिवेकरचं लूट युवर वेट हे. त्याच्या अनेक आवृत्त्या झाल्या आहेत. प्रकाशक खूश आहे. आणि लवकरच त्याची पंचवीस हजारावी कॉपी बाजारात येणार आहे किंवा आली असेल.
असंच इंग्लिश किंवा हिंदीत तुफान चाललेलं पुस्तक असेल, तर त्याच्या कॉपीज लाखात असतात. मध्यंतरी चेतन भगतनं एक पुस्तक साईन केलं. अॅडव्हान्स म्हणून एक कोटी रुपये घेतले, अशी बातमी होती. कारण काय, वाचकसंख्या. पुस्तकांचा रन...
त्यामुळेच मराठीमध्ये लेखकाला, अगदी खपाऊ लेखकालाही चांगलं मानधन मिळू शकत नाही. एखाद्या लेखकानं फक्त पुस्तक लेखनावरच पोट भरायचं ठरवलं तर त्याला ते शक्य नाही. आपल्याकडे पानाचा भाव ४० ते १०० रुपयांपर्यंत आहे. (लेखक आणि पुस्तकानुसार). अनुवादाला ४० ते ६० रुपये देतात. साधारण २०० पानांचा अनुवाद करण्यासाठी किमान २ महिने लागतात. ६० रुपयांनी मानधन मिळालं, तरी दोन महिन्यांचे १२,००० रुपये होतात.
परदेशात लिटररी एजंट नावाची एक संस्था आहे. आपण काही लिहू इच्छित असू तर त्याचं सिनॉप्सिस किंवा लिहिलेलं असेल, तर आधी ते या मंडळींकडे द्यायचं असतं. पुस्तक किंवा सिनॉप्सिस वाचून ही मंडळी अक्षरशः घाम फोडणारी परीक्षा घेतात. त्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतात. सगळ्या शंका दूर कराव्या लागतात. त्यानंतर ही मंडळी त्यांच्या पातळीवर पुस्तकाचा अभ्यास करतात. त्यांना ते पटलं, तर ते प्रकाशकांशी बोलतात.
ही सारी प्रक्रिया अतिशय किचकट आणि वेळखाऊ असते. पण त्यातून लेखन पास झालं, तर प्रकाशक त्या लेखकाला धनवान बनवतो. स्क्रिप्ट तयार असेल, तर ते स्वीकारतो. नसेल, तर त्याला लिहिण्यासाठी वेळ देतो. (दोन महिन्यांतच झालं पाहिजे, असा तगादा नसतो. लेखन ही एक प्रक्रिया आहे. तिला वेळ द्यायलाच हवा, हे सूत्र) या कालावधीत त्याला आर्थिक विवंचना भासू नयेत. दर्जेदार आणि आरामदायी जीवन जगता यावं यासाठी तेवढा पैसा दिला जातो.
त्यामुळेच तिकडचे लेखक उत्तम आयुष्य जगू शकतात.
प्रकाशकांना हे का परवडतं ?
परदेशात ग्रंथालयं हा उत्तम खरेदीदार आहे. तिथे ग्रंथालयांची संख्याही भरपूर आहे आणि प्रकाशित झालेलं पुस्तक आपल्याकडे हवंच, असा आग्रह असतो. पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर प्रकाशकाच्या खर्चानं शासकीय ग्रंथालयांना १० पुस्तकं वगैरे प्रकार नसतात. सारा रोखीचा व्यवहार. ग्रंथालयांसाठी खास हार्ड बाऊंड कॉपीज काढल्या जातात. कागद, पुठ्ठा वगैरे उत्तम प्रतीचा असतो. विविध लोकांकडून होणारी हाताळणी लक्षात घेऊन ही बांधणी असते. त्याची किंमत भरपूर असते. त्यामुळे बहुतेकदा ग्रंथालयांच्या कॉपीजमध्येच प्रकाशकाचा गुंतवलेला पैसा बऱ्यापैकी सुटतो आणि वाचकामध्ये होणारी विक्री हा नफाच असतो.
आपली लोकसंख्या मजबूत असली, तरी पुस्तक विकत घेऊन वाचणाऱ्यांची संख्या आणि ग्रंथालयं हा भाग दुबळा आहे. आपल्याकडे ग्रंथालयातील पुस्तकांच्या संख्येवर अनुदान असतं. त्यामुळे कमीत कमी पैशांत जास्तीत जास्त पुस्तकं घेण्याकडे कल असतो. आपली व्यवस्था क्वालिटी पाहात नाही, क्वांटिटी पाहते. त्यामुळे बजेट ५ हजारांचं असेल, तर तेवढ्यात बक्कळ पुस्तकं घेतली जातात.
सध्या आपल्याकडे पुस्तक विक्रीचा भाव पानाला रुपया असा आहे.

(श्रामो, विकासराव इ., खरेतर ह्या विषयातले माझे ज्ञान शुन्य आहे. मित्रानी हा धागा वाचुन पाठवलेली प्रतिक्रीया मी फक्त पका काकांच्या परवानगीने डकवली होती. त्या प्रतिक्रीयेवरील तुमचे मत माझ्या मित्राने जरुर वाचले असेल. त्यावर त्यानी काही प्रतिक्रीया दिल्यास ती इथे आणुन नक्की डकवीन. मित्राला देखील लवकरात लवकर सदस्य होण्याचा आग्रह केला आहेच.)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

विनायक पाचलग's picture

21 May 2010 - 11:49 am | विनायक पाचलग

उत्तम अनुभव कथन..
प्रकाशन विश्वातील बर्‍या वाईट प्रवृत्तींवर बोलणारा झपाटलेपण ते जाणतेपण या पुस्तकातला पंकज कुरुलकरांचा लेखही नक्कीच वाचण्याजोगा आहे .

विनायक पाचलग
वाँट टु टॉक