"देवा ....कंटाळलो या रक्तदाबाला ... करतो आता आत्महत्या...!!"

इन्द्र्राज पवार's picture
इन्द्र्राज पवार in जनातलं, मनातलं
19 May 2010 - 1:57 pm

शीर्षकातील वाक्य.... हे आहे दोन दिवसापूर्वीच दुनळी बंदूक आपल्या नरड्याला लाऊन घेऊन उजव्या पायाच्या अंगठ्याने चाप ओढून स्वत:च्या जीवाची अखेर करून घेतलेल्या श्री. रामचंद्र गिरी या फौजदाराच्या चिठ्ठीतील एक वाक्य !

वय वर्षे ५४... "गोसावी" अशा भटक्या (अनुसूचित) जमातीमधील व्यक्ती.... पहिलवानासारखी देहयष्टी... प्रथम पोलीस म्हणून कोल्हापूर परिक्षेत्रात भरती आणि दहा वर्षाच्या कालावधीतच एक अत्यंत कार्यक्षम आणि कामातील तडफ पाहून वरिष्ठांच्या मर्जीत बसलेले पोलीस अशी ख्याती... शहर, तालुका आणि ग्रामीण भागात सर्वत्रच आपल्या हसर्‍या चेहर्‍याने वावरून भोवतालच्या लोकांची मने जिंकण्याची किमया साधलेली.... खात्याच्या परीक्षा एका मागोमाग देऊन.... प्रथम नाईक, नंतर हवालदार आणि २००४ मध्ये फौजदार अशा वरच्या पदावर बढत्या मिळत गेल्या. दरम्यान करूळ घाट (गगनबावडा) येथील सदैव अपघातग्रस्त भागात काम करी असताना "पोलीस" खात्यापलीकडेही जाऊन एक "माणूस" या नात्याने केलेले कार्य शासन दरबारी नोंद झाले... एकदा तर मुंबईहून गोव्याला चाललेल्या एका कारचालकाची रात्रीच्यावेळी गगनबावडा येथे आडबाजूच्या चहाच्या टपरीत विसरलेली बॅग त्यातील कागद्पत्रांच्या आधारे त्याचा मुंबईतील पत्ता, फोन क्रमांक शोधून काढून, त्यांच्या तेथील नातेवाईकांना बॅगेसंबंधी माहिती देऊन ती बॅग, त्यातील कागदपत्रे अन महत्वाचे म्हणजे त्यातील एक लाख साठ हजार जसेच्या तसे परत केल्याची नोंद त्यावेळी वर्तमानपत्रांनी घेतली आणि २००८ साली या अन अशाच प्रामाणिक सेवेबद्दल त्यांना २६ जानेवारी रोजी जिल्हा पालकमंत्र्यांच्या हस्ते "पोलीस पदक"ने सार्थ गौरविण्यात आले. पत्नी, मुलगा इंजिनिअर, मुलगी वाणिज्य पदवीधर, .... असे सुखी चौकोनी कुटुंब.

माझ्या ग्रुपची आणि श्री. गिरी यांची ओळख म्हणजे कोल्हापुरच्या रंकाळा तलाव परिसरात "पोहोण्यासाठी" प्रसिद्ध असलेली "खणेश्वर जलविहार" जागा. येथील मंडळाचे ते सक्रीय सदस्य, आणि पोहोणार्‍यामध्ये त्यांनी आपली ओळख "त्यांच्यातील एक" अशी केली होती... इतकेच काय त्यांना पहाटेच्या पोहोण्याच्या वेळी "फौजदार" म्हणून कुणी हाक मारलेले आवडत नसे. ते म्हणत "इथ आपण स्वीमिंगला येतो आणि तीच आपली खरी ओळख...". माझा ग्रुप पट्टीचे पोहणारे अशा विशेषणाने ओळखला जातो म्हणून त्यांनी आपल्या मुलाला आमच्यात सामील केले होते. हनुमान जयंती, रंकाळा केंदाळ मुक्त मोहीम, "रस्सा मंडळ" या खास कोल्हापुरी नावाने प्रसिद्ध असलेल्या सहभोजनाच्या रात्रीत इतरांच्या समवेत घेतलेला सहभाग, परिसर स्वच्छता आदी उपक्रमातून त्यांचा लक्षणीय सहभाग.

....आणि अशा अत्यंत कार्यरत माणसाला "रक्तदाबा" ने गाठले. कामातील वेळेचा अनियमितपणा, जागरण, वेगवेगळ्या ठिकाणाचे खाणे, "पोलीस मुख्यालय ड्युटी" चा सदैव ताणतणाव..... आणि त्यामुळे नियमित औषधाकडे नकळत दुर्लक्ष... यामुळे बी. पी. आटोक्यात येत नव्हता. बढती मिळूनदेखील चित्त थार्‍यावर राहत नव्हते. अधेमध्ये त्यांच्या मुलाच्या निमित्ताने कधी घरी गेलो तर ते घरी असले तर हसतमुखाने स्वागत होई.... पण दोन चार मिनिटाच्या पुढे आता बोलणे होत नव्हते. अर्थात आम्ही कधीही त्यांच्यासमोर त्यांच्या वाढत्या रक्तदाबाचे परिणाए या विषयावर बोलणे काढत नसू... कारण काढून काय फायदा? आम्ही त्यांना काय आणि कसला सल्ला देणार? हल्लीहल्ली तर त्यांनी भीतीपोटी पोहणेही बंद केले होते व जमले तर सकाळी रंकाळा पदपथावर फिरायला तेवढे यायचे. जिल्हाभर ओळखी असल्याने तसेच जनसंपर्कही चांगला असल्याने रक्तदाबावर वेगवेगळी (अगदी जडीबुटीपासून...ते नामवंत डॉक्टर्स) औषधे आणून देणार्‍यांचीही संख्या काय कमी नव्हती.

पण या सार्‍या त्रासाला अखेर कंटाळून श्री. रामचंद्र गिरी यांनी आपल्या जीवनाचा अघोर रीतीने शेवट करून घेतला.

"रक्तदाब....!!!!" इतका भयावह रोग आहे हा? आम्ही याच्या परिणामाबद्दल ऐकतो, वाचतो, पाहतो देखील.... पण आटोक्यात आणण्यासाठी नेमकी उपाय योजना कुणाकडेच कशी काय नाही? एक म्हणतो... "अमुक एक खा... तमुक एक खाऊ नका..." दुसरा म्हणतो, "हे पथ्य पाळ, ते पदार्थ त्याज्य माना...." तिसरा सुचवितो, "टेन्शन कमी करा..." म्हणजे नेमके काय करा? ब्लड प्रेशर आणि टेन्शन या दोघात बरेच सख्य असावे असे दिसते कारण या क्षेत्रातील "स्पेशालीस्ट" डॉक्टरदेखील "तुम्ही टेन्शनलेस राहा, म्हणजे बी. पी. कंट्रोल मध्ये राहतो...!" अरे पण कंट्रोलअगोदर तो वाढूच नये यावर मीठ अजिबात न घालता केलेल्या अमुकतमुक भाजीपाल्याव्यतिरिक्त दुसरे काय उपाय असतील तर ते सांगा ना? वाढते वजन हा एक बी.पी.चा मोठा मित्र मानला जातो. वजन वाढत चालले की बी.पी.राव यांनी आपल्या आयुष्यात बैठक मारलीच असे म्हणतात....(नक्की माहित नाही... पण बर्‍याच ठिकाणी असे वाचले आहे.).

पोलीस खात्यातील अवेळेच्या "ड्युटीज" हा एक फार मोठा, या आत्महत्ये प्रकारानंतर, चर्चेचा विषय झाला. कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलीस दलातील "पोलीस, नाईक आणि हवालदार" पदावर कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांची नुकतीच शासन नियुक्त डॉक्टर पॅनेलने सलग एक आठवडा "फुल चेक अप" पद्धतीने जी तपासणी केली तिचा काहीसा धक्कादायक अहवाल काल प्रसिद्ध करण्यात आला... तो त्रोटक स्वरूपात खालील प्रमाणे :

१. कोल्हापूर पोलिस दलातील 123 जणांना मधुमेह, 71 जणांना उच्च रक्तदाब, 113 जणांना हृदयाचा त्रास, 122 जणांना डोळ्यांचे विकार आणि 62 जणांना मूत्राशयाचे विकार जडल्याचे पोलिसांच्या आरोग्य तपासणीतूनच स्पष्ट झाले आहे. वजन, उंची व पोटाचा घेर याच्या तुलनेनुसार शरीराची जी ठेवण आवश्‍यक असते तशी ठेवण 622 पोलिसांची नसल्याचेही या तपासणीतून निष्पन्न झाले आहे. ड्युटीची अनियमित वेळ, अनियमित जेवण, कामाचा ताण आणि नित्य व्यायामाचा अभाव हीच कारणे या विकारामागे आहेत.

२. लोटस मेडिकल फाऊंडेशनने केलेल्या या अधिकृत शासकीय योजनेनुसारच्या तपासणीत 1562 पोलिसांची तपासणी करण्यात आली. बॉडी मास इंडेक्‍स म्हणजे वजन, उंची व पोटाचा घेर याची आवश्‍यक सरासरी घेण्यात आली. या अधिकृत सरासरीत केवळ 1.66 टक्के पोलिस पात्र ठरले, तर 622 पोलिसांची शरीररचना आदर्श रचनेपेक्षा जास्त आढळून आली. त्यात बहुतेकांचा पोटाचा घेर वाढलेला होता व त्यामुळेच शरीरात आरोग्याच्या तक्रारी सुरू झाल्या होत्या.....

("१.६६ टक्के पोलीस चाचणीत फीट ठरले" हा आकडा निश्चितच काळजीची परिस्थिती आहे हेच दर्शवितो.)

३. कामावर हजार असलेल्या पैकी 123 जणांना मधुमेह, 71 जणांना उच्च रक्तदाब, 48 जणांना अतिरिक्त चरबी (कोलॅस्टरॉल), 113 जणांना हृदयविकार, 112 जणांना डोळ्यांचे विकार आढळून आले आणि 39 जणांना तर मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, डोळ्यांचे विकार अशा सर्व आजारांनी घेरल्याचे स्पष्ट झाले.

४. डॉ. निरंजन शहा, डॉ. एम. आर. पाटील व डॉ. शर्मिला गायकवाड यांनी ही तपासणी केली होती. त्यांच्या मते पोलिसांच्या या सर्व आजाराचे कारण कामाचा ताण, अनियमित जेवण व पुरेशा विश्रांतीचा अभाव हे आहे. डॉ. शहा म्हणाले, 'तपासणीसाठी जे निकष वापरले गेले त्यात पोलिसांचे वय, वजन, उंची याचा विचार केला गेला. अवेळी जेवण, कामाचा ताण केवळ या दोन कारणांमुळे पोलिसांना मधुमेह व रक्तदाबाने ग्रासले गेले आहे. त्यांच्या कामाची रचनाच अशी आहे की, प्रसंगी हे आजार बाजूला ठेवून ड्यूटी करणेच भाग आहे. त्यामुळे वेळेवर औषध व इतर पथ्यपाणी पाळणेही अनेक पोलिसांना आवश्‍यक आहे.''

5. ते म्हणाले, 'रक्तदाब, मधुमेह या आजाराने आपण ग्रासलो आहोत हे अनेक पोलिसांना तपासणी करेपर्यंत माहीतही नव्हते. किरकोळ त्रास झाला की हे पोलिस औषधाच्या दुकानातून किरकोळ एखादे औषध घेऊन दिवस काढत होते. या पोलिसांना आधी विश्रांतीचा सल्ला दिला पण त्यांना ते रजा, सुट्ट्याच्या अडचणीमुळे शक्‍य झाले नाही. अर्थातच त्यांचा विकार कमी झाला नाही.'' रक्तदाब, मधुमेह असताना बारा ते चोवीस तास बंदोबस्त या शिवाय कामाचा ताण व हे करत असताना योग्य आहार व औषधाचा अभाव हे शरीराला अतिशय घातक अशीच परिस्थिती असल्याचे डॉक्‍टर शहा यांनी सांगितले.

६. आरोग्य तपासणीसाठी आलेल्या दहा पोलिसांची तपासणी करतानाच त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याची वेळ आली होती; मात्र ते त्याही स्थितीत ड्युटीवर होते.

७. जिल्ह्यातील पोलिस रात्रपाळी व फुकटच्या नको त्या समारंभाच्या, निदर्शनाच्या, मोर्चाच्या बंदोबस्ताला अक्षरशः वैतागले आहेत. कोणीही उठतो मोर्चा काढण्याचा इशारा देतो. इशारा दिला की 100 पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्ताला दिला जातो. मोर्चात मात्र 20 ते 30 जणांचा सहभाग असतो. फोटो काढून झाले की मोर्चा संपतो पण अशा मोर्चात पोलिसांचा दिवस वाया जातो. पुन्हा रात्रपाळीच्या बंदोबस्ताला त्यातल्याच पोलिसांना नेमले जाते. जरा कुठे खुट्ट झाले की सुट्टी, रजा रद्द केली जाते. अशा परिस्थितीत आरोग्य कसे राखायचे हा पोलिसांच्या मनात खदखदणारा प्रश्‍न आहे.

तर असे आहे हे सगळे.... रक्तदाब आणि मधुमेह पिडीत पोलीस दल !! आपल्या शहरातील, गावातील, भागातील पोलीस दलातील कर्मचार्‍यांची प्रक्रतीविषयीची अशीच तक्रार असल्याचे आपणास आढळले काय ?

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

नील_गंधार's picture

19 May 2010 - 2:15 pm | नील_गंधार

अतिशय चांगला विषय.
लेखकाने मांडलेले मुद्दे अतिशय विचार करण्याजोगे आहेत.
जर समाजरक्षकच आरोग्यदृष्ट्या सक्षम नसेल तर त्याकडून व्यवस्थित काम कसे होईल?
ह्याच प्रकारे इतरही लोकांचीहि वैद्यकिय तपासणी करायला पाहिजे.
जसे एस टी चे ड्रायव्हर व कंडक्टर. हि लोक देखील कामाच्या अनियमित वेळांमुळे ह्या व्याधींच्या शिकार होत असावीत.

नील.

इन्द्र्राज पवार's picture

19 May 2010 - 4:34 pm | इन्द्र्राज पवार

"....जसे एस टी चे ड्रायव्हर व कंडक्टर...."

कोल्हापुरातील रोटरी आणि तत्सम उपक्रमात सहभागी असणार्‍या काही डॉक्टर्स मंडळींनी याबाबत स्थानिक डेपो मॅनेजरशी संपर्क साधला होता. त्यांनी या टीमच्या लीडर्सना कामगार नेत्याकडे पाठविले.... आता त्या नेत्याला यात आपल्या सभासदांना येनकेन प्रकारे "ड्युटीसाठी अपात्र" ठेवण्याचा हा डाव आहे असे वाटले. मग पुढे काय झाले असेल याची तुम्हाला कल्पना आली असेलच.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

सहज's picture

19 May 2010 - 2:57 pm | सहज

कोणी आत्महत्या करते, कोणी वरिष्ठांना, सहकार्‍यांना गोळ्या घालुन मारते. आजकाल ह्या बातम्या जास्त येउ लागल्या आहेत.

तब्येतीची काळजी ज्याने त्याने आपली घेतलीच पाहीजे. बरेचदा रुग्णानेच आरोग्याची हेळसांड केली असते.

पोलीस आरोग्य, मनस्वास्थ अहवाल, उपाययोजना नक्कीच उहापोह झाला असेल पण प्रत्यक्ष परिणाम काय झाला आहे ह्याचा पुरावा कुठे मिळणार?

इन्द्र्राज पवार's picture

20 May 2010 - 4:01 pm | इन्द्र्राज पवार

"....तब्येतीची काळजी ज्याने त्याने आपली घेतलीच पाहीजे....

हे व्यवसाय धंद्यात जे आहेत त्यांना एकवेळ शक्य आहे कारण आपले वेळापत्रक ते स्वत: आखू शकतात...बँक, विमा, आय.टी. आदी ठिकाणी नोकरी करणार्‍यांनादेखील शक्य आहे.... पण पोलिस नोकरीच्या ठिकाणी हे केवळ अशक्य आहे अशीच भावना येथे काम करणार्‍यांच्यात झाली आहे.

१८ तास "पुतळा ड्युटी" हा प्रकार तुम्ही कधी ऐकला आहे? काय करत असतील हे पोलिस "शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर" आदींच्या पुतळ्याभोवती मांडी घालुन? आणि अशा स्थितीत काय आणि कशी तब्येतीची काळजी घ्यायची?
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

सहज's picture

20 May 2010 - 4:20 pm | सहज

म्हणुनच बहुदा ते मोर्चावर लाठीमार करायचा झाला की तावडीत सापडणार्‍यांना जीव तोडून बडवताना दिसतात. :D

१८ तास पुतळा ड्युटी - यावर एक चर्चा होउ देच.

भडकमकर मास्तर's picture

19 May 2010 - 4:29 pm | भडकमकर मास्तर

चांगला लेख..
विचार करायला लावणारा..
सहजराव म्हणतात त्याप्रमाणे प्रत्यक्ष बदल कसा दिसणार? असेच म्हणतो
_____________________________
श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम?

अरुंधती's picture

19 May 2010 - 5:46 pm | अरुंधती

सर्व पोलिसांना शारीरिक तंदुरुस्ती फार आवश्यक आहे, कारण त्याच जोरावर ते त्यांचा तणावपूर्ण जॉब, अनियमित वेळा, कटकटी यांना सामोरे जाऊ शकतात. तसेच मानसिक तंदुरुस्तीसाठीही त्यांनी नियमित योगसाधना, मैदानी खेळ यांत भाग घेतला पाहिजे. परंतु ज्या खात्यात मनुष्यबळ कमी आहे, रिकामी पदे भरलीच गेली नाहीत अशा खात्यात पोलिसांना कायमच तणाव, नैराश्य, आजार यांना सामोरे जावे लागते. भरपूर दबावाखाली काम करावे लागते.
पोलिसदलातील रिकाम्या जागा आधी भरल्या पाहिजेत, म्हणजे अतिरिक्त कामाच्या बोज्यातून काही अंशी तरी सध्याच्या पोलिसांची सुटका होईल. शारीरिक तंदुरुस्तीचे मूल्यमापनही नियमित रूपात व्हायला पाहिजे व त्यात आढळणार्‍या कमतरतांना भरून काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न झाला पाहिजे. अन्यथा अजून अनेक पोलिस असेच वेगवेगळ्या आजारांचे बळी पडत राहतील.

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

इन्द्र्राज पवार's picture

19 May 2010 - 6:12 pm | इन्द्र्राज पवार

अरुंधतीताई... माझा या ना त्या निमित्ताने पोलिस खात्यात काम करणार्‍या लोकांशी (वर्दी...आणि कार्यालयीनसुद्धा) त्यामुळे मला यांच्या जीवनशैलीची बर्‍यापैकी ओळख आहे, जाण आहे. तीवरुन मी पक्के विधान करू शकतो की, या लोकांना (अगदी क्रमांक १ ते शेवट...) जेवण झाल्यावर हात धुवायलादेखील वेळ नसतो.... आजचे जेवण स्टेशनमध्ये घेतले पण उद्याचे तिथेच होईल याचा शून्य भरवसा.... मग अशा लोकांना कुठला वेळ आहे नियमित योगसाधना करायला? हां... काही अगदी वरिष्ठ पदावर (आणि युपीएससी माध्यमातून आलेले मूठभर...) काम करणारे सोडले तर "योगा" करणे राहू दे, ९०% कर्मचारी "अहो पवार, हे म्हणजे काय वो ?" असेच मला विचारतील.

फार विचित्र वेळापत्रक आहे यांचे.... या राजकारण्यांनी (अगदी राज्यपातळीपासून ते गल्लीबोळात फोफावलेल्या फाळकूट दादापर्यंत...सर्वांनी) यांचा अगदी गार्बेज कॅन केला आहे.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

अरुंधती's picture

19 May 2010 - 6:34 pm | अरुंधती

आज त्यांनी स्वतःसाठी रोज थोडातरी वेळ काढला नाही तर उद्या त्यांच्यापाशीच वेळ उरणार नाही हे तुमच्या लेखातील आकडेवारीच सांगते. रोज किमान १५ मिनिटे ते अर्धा तास ते स्वतःसाठी देऊ शकतील? दारू, सिगरेट, तंबाखू इत्यादी शरीराची हानी करणार्‍या सवयींपासून दूर राहू शकतील? पोलिसांनाही तणावमुक्तीची सध्या सर्वात जास्त गरज आहे. अन्यथा तणावात राहून काम केल्यावर त्याचा कामाच्या दर्जावर व प्रकृतीवर असाच परिणाम होत रहाणार. पोलिसांनी सरकारकडे ह्यासाठी उपाययोजना करण्यासाठी बघणे सोडून स्वतःच शारीरिक तंदुरुस्तीबाबत तरी आत्मनिर्भर व्हायला हवे. त्यांचे त्या विषयीचे जर अज्ञान असेल तर ते दूर करण्याचा प्रयत्न आरोग्यविषयक स्वयंसेवी संस्थांमार्फत करता येऊ शकतो. मुळात पोलिसांच्या मनात आपल्या ज्ञानाच्या कक्षा अधिक रुंदावायची इच्छाशक्ती पाहिजे, तरच हे साध्य होईल.
लोकांमध्ये पोलिसांबद्दलची प्रतिमा मुळात मलीन, भ्रष्टाचारी, आळशी, कामचुकार, दिरंगाई करणारे अशी आहे. ती जर बदलायची असेल तर त्यासाठी पोलिसदलाला व प्रत्येक पोलिसालाच सक्षम व्हावे लागेल. अन्यथा स्टोरी मागल्या पानावरून पुढे चालू राहील.

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

इन्द्र्राज पवार's picture

19 May 2010 - 11:00 pm | इन्द्र्राज पवार

"....मुळात पोलिसांच्या मनात आपल्या ज्ञानाच्या कक्षा अधिक रुंदावायची इच्छाशक्ती पाहिजे, तरच हे साध्य होईल...."

आपली या विषयाबाबतची आस्था मी आपल्या लिखाणाच्या धारेवरून सहज समजू शकतो. या बाबतीत माझा अभ्यास असे सांगतो की, आपल्या राज्यातील पोलिस दलातील (इथे पोलिस म्हणजे ज्यांना आपण "कॉन्स्टेबल" किंवा मराठीत "हवालदार" असे म्हणतो... तो वर्ग) कर्मचारी हा ७ वी ते १० इतपतच शिकलेला असतो.... आज अशा हवालदारांची संख्या आहे : १,४८,९१२
यापैकी "एक" टक्क्यापेक्षाही कमी लोकांना पुढील प्रमोशनची ओढ असते, कारण तेवढेच फक्त आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढावी म्हणून प्रयत्न करीत असतात. बाकीचे "ड्युटी"च्या रगाड्याखाली चेपले जातात.

"जागरण" हाच यांचा सर्वात मोठा शत्रू आहे.... अधिक वरीष्ठांच्या दारात अक्षरशः "कुत्र्या"च्या मोलाने काम करणे, त्यांच्या हलकटपणाच्या सीमा ओलांडलेल्या शिव्या खाणे हेच यांचे काम. आपण फक्त "ट्रॅफिक" पोलिसांचा रुबाब पाह्तो; पण वर दिलेल्या आकडेवारीत त्या विभागात केवळ पंचवीस हजार आहेत, बाकीचे अन्य घाण पुसायला.

तुम्हाला "पुतळा ड्युटी" हा प्रकार माहित आहे? अंगावर काटा येईल तुमच्या जर का मी त्याबद्दल काही लिहित गेलो तर....!!

"...लोकांमध्ये पोलिसांबद्दलची प्रतिमा मुळात मलीन, भ्रष्टाचारी, आळशी, कामचुकार, दिरंगाई करणारे अशी आहे...."

नक्कीच आहे... आणि त्यात ते खाते स्वत:च तितकेच जबाबदार आहे. पण हा विषय आपण नंतर केव्हा तरी चर्चेला घेऊ.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

प्रसन्न केसकर's picture

19 May 2010 - 11:34 pm | प्रसन्न केसकर

काही बाबींमधे सहमत तर काहीत असहमत.

आपल्या राज्यातील पोलिस दलातील (इथे पोलिस म्हणजे ज्यांना आपण "कॉन्स्टेबल" किंवा मराठीत "हवालदार" असे म्हणतो... तो वर्ग) कर्मचारी हा ७ वी ते १० इतपतच शिकलेला असतो.... आज अशा हवालदारांची संख्या आहे : १,४८,९१२

हे ग्रामीण भाग/ छोटी शहरे इथले वास्तव आहे पण मुंबई, पुणे, नागपुर, औरंगाबाद अश्या शहरात चित्र वेगळे आहे. तिथे जवळपास १०० टक्के कॉन्टेबल आणि ८० टक्के हवालदार, सउनि पदवीधर आहेत.

सक्षमीकरण हे शिक्षणाने होतेच पण त्यासाठी अनुकुल परिस्थिती देखील लागते. महाराष्ट्राच्या पोलिस दलात ती नाही. याला राजकारणी तर जबाबदार आहेतच पण त्याहुनही जबाबदार आहेत वरिष्ठ, अतिवरिष्ठ नोकरशहा. त्यांनी भ्रष्टाचारालाच यंत्रणा बनवण्यात त्यांचा बराच मोठा हात आहे. बदली, नियुक्तीकरता होणारी पैशांची देवाणघेवाण, आपापसातली गटबाजी अश्या अनेक गोष्टीत ते गुंतलेले आहेत. त्यांच्या राजकारणात अनेकदा पोलिस कर्मचारी बळी जातात. रस्त्यावर उभे रहाणारा ट्रॅफिक पोलिस जेव्हा १०० रुपये घेतो तेव्हा त्याला त्यातले अगदी थोडे पैसे मिळतात. उरलेले पैसे वरिष्ठांमधेच वाटले जातात. हे राजकारण्यांना चांगले माहिती असते आणि नेते याचा फायदा घेऊन पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करणे, बदली आणि नियुक्ती करतापैसे घेणे करतात.

पोलिसांवर सेवेअंतर्गत अन्याय झाला तर त्यांना कॅट, मॅट, न्यायालये इत्यादी ठिकाणी दाद मागता येते. तेथे हजारो प्रकरणे दरवर्षी जातात पण त्यातली बहुसंख्य वरिष्ठ अधिकार्‍यांची असतात. उपनिरिक्षक, सहाय्यक उपनिरिक्षक, हवालदार, नाईक, शिपाई या पदावरच्या लोकांची तिथे डाळ शिजणे अवघड असते. तीच बाब खात्याअंतर्गत चौकशीबाबतही लागु होते. अश्या परिस्थितीत कसले आलेय सक्षमीकरण?

इन्द्र्राज पवार's picture

20 May 2010 - 9:30 am | इन्द्र्राज पवार

"....मुंबई, पुणे, नागपुर, औरंगाबाद अश्या शहरात चित्र वेगळे आहे. तिथे जवळपास १०० टक्के कॉन्टेबल आणि ८० टक्के हवालदार, सउनि पदवीधर आहेत...."

माझ्याकडील आकडेवारी ही थेट गृहखात्याशी संबंधीत विभागाकडील आणि रितसर परवानगी घेऊन तयार केलेली आहे. तुम्ही म्हणता तशी "पदवीधर" संकल्पना (वास्तव असले तरी....) "पोलिस आणि कॉन्स्टेबल" तत्सम पदाना लागू होत नाही, म्हणून वरिष्ठांच्या दृष्टीने ते अद्दापही "शिपाई"च राहिले आहेत. परवाच आपल्या या संस्थळावर एका धाग्याच्या चर्चेत असे दिसून आले की, मुंबईच्या दिवाणी न्यायालयात "हमाल" पदासाठी दिलेल्या जाहिरातीला ६६१ पदवीधर आणि ७३ पदव्युत्तर युवकांनी अर्ज केले.... आणि भरतीसाठी अट होती ५ वी पास. काय करणार आता? पुढे जर तुम्ही किंवा मी "हमाल" संदर्भात जर एखाद्या धाग्यावर चर्चा करु लागलो तर हमालांची प्रतवारी कोणत्या निकषावर लावणार?

बिलिव्ह मी.... पोलिस खात्यातील वरिष्ठांना असे "अती" शिकलेले पोलिस अजिबात नको असतात. (हा सर्व्हे मी स्वतः केलेला आहे.)
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

अरुंधती's picture

20 May 2010 - 6:35 pm | अरुंधती

मग अशा अवघड परिस्थितीत, अशा तणावाच्या वातावरणात पोलिसांसमोर हेच प्रश्न, समस्या पुन्हापुन्हा येत राहणार! अवघड काम, त्यामुळे तब्येतीची होणारी हेळसांड व त्यातून उद्भवणार्‍या समस्या अशाच चालू राहणार, नव्हे वाढतच जाणार!
पोलिसांनाच ठरवावे लागेल की समस्येचा एक भाग बनून जगायचे की त्यावर उपाय शोधायचे! इतरांकडून मदतीची अपेक्षा व्यर्थ आहे. त्यांनाच अग्रक्रम ठरवावे लागतील. कारण जोवर पोलिसच स्वतःची स्वतःला मदत करत नाहीत तोवर अन्य कोणीही त्यांना मदत करू शकणार नाही!

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

स्पंदना's picture

19 May 2010 - 8:10 pm | स्पंदना

पोलिस दलात काम करणारे माझे मामा तीन तीन दिवस घरी यायचे नाहीत. मुम्बई पोलीसान कडुन हेच वाक्य मी कायम ऐकत आले. मी ज्यान्च्या घरात भाडेकरु म्हणुन रहायचे, ते पिता, पुत्र दोघेही पोलीस होते. त्यान्ची हालत तर विचारु नका. आपण रस्त्यावर उभे राहुन खुशाल पोलीसान्ना शिव्या देतो, पण या लोकान्ना खरोखरच कुटुम्ब सहवास अतिशय कमी मिळतो.
माझे मामा पोलीस निरिक्षक होते, पण कधी तरी दुपारी त्यान्चा घरी येतोय म्हणुन फोन आला की मामी धावपळ करुन काही तरी चान्गल चुन्गल बनवायला बघायच्या. त्यन्च्या तोन्डी "हे ना! घरचे पाहुणे" नका पाहु त्यान्ची वाट कधीच वेळ नसतो त्यान्ना" आत्ता खुप विचार करायला लावते.

"....जसे एस टी चे ड्रायव्हर व कंडक्टर...."

एकदा कोल्हापुर् हुन बाहेर गावी जात असताना सर्वात समोरच्या सिट वर जागा मिळाली. सहज गप्पा सुरु झाल्या. माझ्या तोन्डुन अगदी सहज एक वाक्य गेल, म्हन्टल रिटायर्ड झालात की परत तुम्हाला प्रवास करावासा वाटत नसेल नाही. क्षण भर माझ्या कडे त्या पन्नाशीच्या ग्रुहस्ताने रोखुन बघीतले. २५ वी शीच्या या पोरीला काही सान्गाव की नको या विचारात ते थबकले, अन त्या नन्तर " सवय होते शरीराला कायम प्रवासाची.प्रवास थाम्बला की माणुस पण थाम्बला. मी तरी आज पर्यन्त दोन वर्षाच्या वर पेन्शन खाल्लेला ड्राईव्हर बघीतला नाही. अस अगदी गम्भीर पणे ते बोलुन गेले. काटा आला मला त्यान्च्या त्या नजरे कडे बघुन,

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

इन्द्र्राज पवार's picture

19 May 2010 - 9:18 pm | इन्द्र्राज पवार

".... मी तरी आज पर्यन्त दोन वर्षाच्या वर पेन्शन खाल्लेला ड्राईव्हर बघीतला नाही..."

बाप रे !! झरदिशी अंगावर काटा आला हे वाक्य वाचून... मी इथे बसून वाचत असताना असे म्हणतो.... मग तुमची तर काय अवस्था झाली असेल हे वाक्य प्रत्यक्ष त्या इसमाच्या तोंडी आले तेव्हा ??

तुम्ही खरं तर अशा प्रसंगावर एक स्वतंत्र धागा करावा असे सुचवितो.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

http://misalpav.com/node/8454 इथं पुर्वी या विषयावर लिहिलं होतंच पण पुनरुक्तीचा धोका लक्षात घेऊनही परत लिहिण्याचा मोह आवरेना.

सहज म्हणतात तसा पोलिसांचे आरोग्य, त्यांच्यावरचा तणाव या बाबींचा उहापोह शासकीय तसेच सेवाभावी संस्थांच्या पातळीवर गेली दोन दशके तरी नक्कीच सुरु आहे. अनेक योजना बनवल्या जातात पण त्यातल्या फार थोड्यांची अंमलबजावणी होते अन झाली तरी त्यांचा फायदा कनिष्ठ कर्मचार्‍यांना होणे शक्य होत नाही.

पोलिसांना दिवसाला बारा तास ड्युटी असते पण बहुतेकदा ते १६-१८ तास काम करतात आणि बहुतेकदा आठवड्याच्या सुट्ट्या, रजा बंद असतातच. कामातला बराचसा वेळ बंदोबस्तात जातो. बंदोबस्त आणि तपासासाठी खात्याअंतर्गत समांतर यंत्रणा बनवण्याबाबत बरेच बोलले लिहिले गेले आहे पण कुणीच कधीच काही केलेले नाही.

पोलिसभरती मधे खेळाडुना प्राधान्य दिले जाते पण भरतीनंतर कामाच्या रामरगाड्यात त्यांचे खेळ सुटतात ते कायमचे. पोलिसांसाठी आर्ट ऑफ लिव्हिंग, योगा, प्राणायाम वगैरेचे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात पण कामाच्या रगाड्यात तिथे जायला वेळ मिळण्याची मारामार असते.

पोलिसांच्या आजारीपणाची रामकहाणी अजुनच वेगळी असते. पुर्वी संजिवनी निधी नावाचा निधी असे, आजारपणाच्या खर्चासाठी. त्यासाठी पोलिसांच्याच पगारातुन दरमहा पैसे कापले जात आणि कुणी आजारी पडला की मदत मिळे. पण ती मदत देखील नंतर पगारातुन पैसे कापुन परत वसुल करुन घेतली जाई. बहुतेक मोठ्या शहरांमधे पोलिस हॉस्पीटल आहेत पण त्याचे स्वरुप हॉस्पीटलपेक्षाही दवाखान्यासारखेच असते. आजारपणाची रजा मंजुर करुन घेण्यासाठी सरकारी दवाखान्याचेच सर्टीफिकेट आवश्यक असल्याने बहुतेकदा पोलिस कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय सरकारी दवाखान्यातच उपचार घेतात. खाजगी डॉक्टरांची फी परवडण्याचाही भाग असतोच.

मुंबईत पोलिस कर्मचार्‍यांच्या मनोरंजनासाठी एक क्लब होता पुर्वी. नंतर असे कानावर आले की तो क्लब बंद केला अन तिथे अतिवरिष्ठ अधिकार्‍यांसाठी काही अतिरिक्त सुविधा सुरु केल्या.

स्वाती२'s picture

20 May 2010 - 7:32 pm | स्वाती२

चांगला लेख आणि चर्चा. पण या सगळ्यावर उपाय काय?

बिपिन कार्यकर्ते's picture

20 May 2010 - 7:46 pm | बिपिन कार्यकर्ते

फौजदारांबद्दल वाचून वाईट वाटले. इतक्या जिंदादिल माणसाला पण आत्महत्या करावीशी वाटली हे भयानकच आहे.

बाकी धाग्यात आणि प्रतिसादात मांडलेले वास्तव नवीन नसले तरी जळजळीत आहेच. काटा येतोच अंगावर. मला व्यक्तिशः पोलिसांबद्दल राग नाही सहानुभूति वाटते.

बिपिन कार्यकर्ते

इन्द्र्राज पवार's picture

20 May 2010 - 10:13 pm | इन्द्र्राज पवार

"....मला व्यक्तिशः पोलिसांबद्दल राग नाही सहानुभूति वाटते....."

हे तुम्ही लाख मोलाचे बोलला आहात बिपिन जी. दीडदमडीचीही किंमत नसलेले हिंदी/मराठी सिनेमे आणि दळभद्री टीव्ही मालिका पाहुन आपण एखाद्या व्यवसायाची/नोकरीतील अवस्थेची, सत्याचा अपलाप करणारी, प्रतिमा मनी ठसवितो... अन् प्रत्यक्ष जीवनात ते समोर आले की त्याच नजरेने त्यांना चितारतो. अर्थात या गटात सर्वच धुतल्या तांदळासारखे आहेत असे मी कधीच विधान करणार नाही, नव्हे, करूच शकत नाही. पण तसे पाहीले तर अन्य सार्वजनीक क्षेत्रातदेखील बजबजपुरी माजलेली आहे, आणि तो एक वेगळाच विषय आहे. आपला हा धागा "ड्युटीचे स्वरूप" इतकाच आहे.

पोलिस नाम हा एक बदनाम बुक्का आहे हे खरे आहे, पण अन्य नोकरी क्षेत्रात काम करणारे हे साईबाबाच्या धुनीतील धूप आहेत असे कुणी मानू नये... इतकेच.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

विकास's picture

21 May 2010 - 12:07 am | विकास

वरील घटना खूपच दुर्दैवी आहे. कुणाच्याही बाबतीत असे होवू नये असेच वाटते. पोलीसातील भ्रष्टाचार, कधीकधी माजुरडेपणा, पांडू हवालदार पासून ते अब तक पचपन सारख्या चित्रपटात चित्रित केलेली प्रतिमा - एक ना अनेक गोष्टींमुळे पोलीस म्हणले की फार काही चांगले वाटत नाही...

नाण्याची दुसरी बाजू कधीच समजत नाही कारण सरकारी असल्याने त्यांना कुठवर बोलावे यावर मर्यादा असतात असे वाटते. बाबूगिरीच्या माजुरडेपणा बद्दल आणि राजकारण्यांच्या नोकरासारख्या अमर्याद वापराबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या आहेत.

बाबूगिरी हा तर एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. त्यावर परत कधीतरी अधिक, पण एकच वाटते की त्यांना असलेले सुरक्षाकवच (job security) ही निघून गेली पाहीजे. कदाचीत नवीन काही प्रश्न निर्माण होतील पण याचा दूरगामी फायदाच होईल...

८०च्या दशकात, नक्की कधी ते आठवत नाही, पण एकदा अति झाले असे वाटून महाराष्ट्र पोलीसांनी यावर आवाज उठवला होता. इतका की ते रस्त्यावर शस्त्रे घेऊन उतरले. मला वाटते, तेंव्हा शिवाजीराव पाटील नीलंगेकर मुख्यमंत्री होते. बर्‍याच पोलीसांना निलंबीत केले गेले (अर्थातच त्यातील "पॉवर" नसलेल्यांना). तेंव्हा शरद पवारांनी पोलीसांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केल्याचे आठवते... पण स्वतः सत्तेत आल्यावर काय केले कोण जाणे.

वर अरुंधतींनी म्हणले आहे, "पोलिसांनाच ठरवावे लागेल की समस्येचा एक भाग बनून जगायचे की त्यावर उपाय शोधायचे!" आज वास्तव असे आहे की हाच प्रश्न सामान्य नागरीकाच्या बाबतीतही आहे असे वाटते. जेंव्हा वरीष्ठांच्या दडपणात स्वत:चे काम राहील का, राहीले तर कुठे आणि कसे रहाणार असे प्राथमिक प्रश्न पडलेले असतात, तेंव्हा एक आजचा दिवस कसा निघतो ही विवंचना सोडल्यास बाकी काही सुचणे शक्यच नाही असे वाटते.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)