'तो'

आनंद घारे's picture
आनंद घारे in जनातलं, मनातलं
12 May 2010 - 8:41 am

दादरला झालेल्या मराठी ब्लॉगर्सच्या मेळाव्याला हजर राहून मी वाशीला घरी परतत होतो. शिवाजी पार्कहूनच निघणारी बस पकडली आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवलेल्या राखीव जागेवर स्थानापन्न झालो. शेजारी माझ्याच वयाचे एक गृहस्थ येऊन बसले. बेस्टच्या बसमध्ये शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाबरोबर बोलायची पध्दत नाही. एकाद्या सीटवर आजूबाजूला बसलेल्या दोन व्यक्तींचे बोलणे ऐकू आलेच तर त्या बहुधा आपापल्या सेलफोनवरून निरनिराळ्या लोकांशी बोलत आहेत असे दिसते. माझे तिकीट काढून झाल्यावर मी सुध्दा आपला मोबाईल काढला आणि त्यावरची बटने दाबायला सुरुवात केली. त्या वेळी माझ्या आप्तांपैकी कोणीतरी पुण्याहून वाशीला आणि वाशीहून ठाण्याला जाणार होते. तसे पाहता त्यांना माझ्या अनुमतीची किंवा मदतीची गरज नव्हती, त्यांचे ते बघायला समर्थ होते. पण संपर्काची सोय उपलब्ध असल्यामुळे त्यांची विचारपूस करणे हे माझे कर्तव्य असल्याचे मीच ठरवले होते. "इस रूटकी सभी लाइने व्यस्त हैं।, ये नंबर मौजूद नही है।, आप कतारमें हैं।" वगैरे निरर्थक वाक्ये ऐकत चार पाच प्रयत्न केले आणि ज्यांच्याशी संवाद साधला गेला त्यांना "निघालात कां? पोचलात कां?" वगैरे विचारून त्यांच्या 'मूव्हमेंट्स ट्रॅक' केल्या. (हा नेमका आशय मराठीत सांगणे मला तरी जमत नाही.)

मी आपल्या 'सांगाती'ला त्याच्या म्यानात ठाणबंद करून ठेवले तेवढ्यात शेजारून शब्द ऐकू आले, "काँग्रॅच्युलेशन्स!" आता शेजार्‍याचा भ्रमणध्वनी सुरू झाला असावा असे आधी मला वाटले. पण "हॅलो, कोण बोलतंय्? पाटील आहेत कां? मी आप्पा!" असले कोणतेही इंजिन नसतांना ही संवादाची गाडी कशी सुरू झाली अशा विचाराने चमकून बाजूला पाहिले. तिथे बसलेला 'तो' माझ्याकडेच पहात होता. माझ्या डोक्यावर एकादा मुकुट, गळ्यात फुलांचा (नोटांचा असेल तर फारच छान) हार किंवा छातीवर एकादे बिरुदाचे पदक वगैरे अचानक येऊन पडलेले नाही याची खात्री करून घेतली. माझे हे अभिनंदन कशाबद्दल याचा पत्ता कांही लागत नव्हता. तेवढ्यात 'तो'च पुढे म्हणाला. "इस उमरमेंभी आपके सभी दाँत साबूत हैं ने।"
मी मनात विचार केला, मला 'इस उमरमें' म्हणणारा हा कोण? योगायोगाने त्याच दिवशी मी एक किस्सा वाचला होता. साठीला आलेल्या एका माणसाला कोणी तरी विचारले, "वृध्द कुणाला म्हणायचे?" त्याने आपल्या बापाचा सल्ला घेतला. ऐंशीच्या घरातल्या त्याच्या पिताश्रींनी सांगितले, "हे बघ, माझ्याहून पंधरा वीस वर्षांनी मोठा असेल तो म्हातारा असे समज."
म्हणजे वृध्दावस्था ही समजण्याची गोष्ट आहे तर! आणि माझ्याच वयाचा हा माणूस माझी उमर काढतोय्! तो उमरखय्याम कदाचित स्वतःला तरणाबांड समजत असावा. पण असे असेल तर तो या ज्येष्ठ नागरिकांच्या आसनावर कां बसला आहे? त्याला उठून उभे रहायला सांगावे म्हंटले तर आजूबाजूला कोणी वयस्क माणूस उभा नव्हता. असा प्रवासी येईपर्यंत वाट पहायचे ठरवले.
'तो' पुढे बोलत होता, "अभी आप फोनपर वात करते थे ने, तभी मैने देखा।" मी बोलण्यासाठी उचकटलेला माझा जबडा इतक्या जवळून कोणी पहात असेल या विचारानेच मला इतका मोठा धक्का बसला की आ वासण्यासाठी तो पुन्हा उघडला गेला. पटकन मी त्याचे रूपांतर बत्तीशीमध्ये करून घेतले. ('ही' 'ही' करतांना समोरचे दहा बाराच दांत दिसत असले तरी त्यालाही मराठीत 'बत्तीशी' असेच म्हणतात.) मी सांगितले, "अहो, हे समोरचे दिसणारे दांत तेवढे आता जागेवर आहेत. चांवून खायचे मागचे दांत म्हणजे दाढा गायब झाल्या आहेत. काल परवापर्यंत त्यासुध्दा होत्या, पण फुटाणे आणि शेंगदाणे खातांना त्यांचेच तुकडे पडायला लागले म्हणून मी आता ते खाणे सोडून दिले आहे."
"अरेरे ...."
मी लगेच म्हंटले, "अहो, तोंडात दातही आहेत आणि घरात चणेसुध्दा आहेत हे सुख मी निदान पन्नासपंचावन्न वर्षे तरी उपभोगले आहे. त्या काळात मी चण्यांना भिजवून, भाजून, तळून किंवा शिजवून अगदी पोट भरेपर्यंत (किंवा बिघडेपर्यंत) त्यांचा मनसोक्त आस्वाद घेतला आहे. त्याबद्दल माझी कोणतीही इच्छा अतृप्त राहिलेली नाही. आतासुध्दा मी शिजवलेल्या चण्यांना बोटांनी आणि इतर प्रकारांना यंत्राने चिरडून नाना प्रकारांनी पोटात घालतो आहेच."
पूर्वी एकदा मी 'पावाचे पाचशे पंचावन्न पौष्टिक पदार्थ' या नांवाचा लेख 'मिसळपाव'वर लिहिला होता. आता 'चण्याचे चारशे चव्वेचाळीस चविष्ट पदार्थ' त्याला सांगावे असा विचार मनात आला. पण 'तो' गुज्जूभाई असल्याचे त्याच्या अॅक्सेंटवरून एव्हाना माझ्या लक्षात आले होते आणि जन्मापासून सकाळ संध्याकाळ फाफडा, गांठिया आदि फरसाणात रममाण होणार्‍या 'त्या'ला चण्याच्या गुणांबद्दल मी बापडा काय सांगणार? त्याच्या आकारमानावरून 'तो' खाण्यापिण्याची चांगली आवड असणारा दिसत होता, पण त्यालासुध्दा या वेळी खाद्यसंस्कृती या विषयावर वायफळ बोलाचे चर्वितचर्वण नको असावे.
त्याने एकदम थेट विषयाला हात घातला, "आप अभीभी वर्किंग हैं?"
मी उत्तर दिले, "नाही. मी रिटायर झालो आहे. पण निष्क्रिय नाही. जोंवर हांतपाय चालत आहेत, तोंवर ते चालवत राहिले म्हणजे ठीक असतात. त्यामुळे मी काम करतो, पण ते पोट भरण्यासाठी नव्हे."
आता मी कसले डोंबलाचे 'वर्क' करतो ते सांगणे तसे कठीणच होते, पण त्यालासुध्दा त्यात रस नव्हता.
'तो' सांगत राहिला, ( यापुढील संभाषणाचा मराठीत अनुवाद करून दिला आहे.) "मला मात्र अजूनही रोज बारा बारा कल्लाक काम करावे लागते बघा. मला दोन मुले आहेत, पण ती कमावत तर नाहीतच, उलट माझ्याकडून दर महिन्याला पांच पांच हजार रुपये घेतात, पॉकेटमनी म्हणून."
"अजून ती लहान आहेत का?"
"नाही हो, एक चाळिशीला आला आहे आणि दुसरा पस्तीशीच्या वर आहे. ते म्हणतात जोंपर्यंत मी कमावतो आहे तोंपर्यंत त्यांना कमावायची काय गरज आहे?"
मला नीटसा बोध होत नव्हता. ही मध्यमवयापर्यंत पोचलेली त्याची मुले, खरे तर बाप्पे, खरेच इतके कुचकामाचे असतील? आणि या महागाईच्या जमान्यात याने दिलेल्या महिन्याला पांच हजार रुपयात त्यांचे कसे भागत असेल?
'तो' पुढे सांगतच राहिला, "अहो, घरात 'अनुशासन' म्हणून नाही."
वेगवेगळ्या स्तरावरल्या लोकांना माझाच खांदा भिजवायला कां आवडतो हे मला न सुटलेले कोडे आहे. 'तो' एकादा लहान मुलगा असता तर मी त्याच्या पाठीवरून हांत फिरवून त्याला उगी उगी म्हणून नक्कीच शांत केले असते, युवक असला तर त्याचा प्रॉब्लेम समजून घेऊन योग्य दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला असता, कदाचित दोन परखड बोलही सांगितले असते, पण या माणसाचे काय करायचे ते मलाच कळेना. त्याची समजूत घालावी, त्याला धीर द्यावा, त्याच्या मुलांचीही जी कांही बाजू असेलच ती समजून घ्यायचा प्रयत्न करावा, त्याच्या सांगण्याची री ओढत त्याच्या त्या अज्ञात मुलांना दोष द्यावा की त्यांच्या अनुशासनहीन होण्यासाठी 'त्या'लाच जबाबदार धरावे?
मी थोडेसे अडखळत म्हंटले, "तुमची केस जरा वेगळीच दिसते आहे. अहो आपली मुले लहानाची मोठी होत असतांना त्यांच्याबरोबरची त्यांची मित्रमंडळी, शेजारची आणि नात्यातली मुलेसुध्दा प्रगती करत असतात. आपण केलेल्या उपदेशापेक्षा सुध्दा एकमेकांचे पाहूनच मुले स्वतःहून जास्त हिरीरीने पुढे यायला धडपडत असतात, असे सर्वसाधारणपणे दिसते."
'तो' लगेच म्हणाला, "माझी मुले तशी चांगली आहेत हो, पण त्यांच्या बायड्यांनी त्यांना बिघडवले बघा, एकदम आळशी बनवले."
आता तर हद्द झाली होती. मुलांनी कमावण्याची सुरुवात करण्यापूर्वीच याने त्यांची लग्ने सुध्दा लावून दिली? की तो पराक्रम त्यांनी स्वतःच केला होता? असेल तर कशाच्या बळावर? त्यांना कुचकामी बनवण्यात त्यांच्या बायड्यांचा कसला हेतू असू शकेल? प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री उभी असते असे म्हणतात. कधी कधी तर त्या हांत धुवून मागे पडलेल्या दिसतात, इथे स्त्रिया आपल्या पुरुषांच्या पुढ्यात उभ्या राहून त्यांना अडवत होत्या कां? दिवसाला बारा बारा तास कष्टवून 'त्या'चा देह झिजल्यासारखा दिसत नव्हता की काळजीने काळवंडल्याची कोणतीही खूण त्याच्या चेहर्‍यावर दिसत नव्हती. पण मला असे गोंधळात टाकून त्याला काय मिळणार होते? असली रडगाणी ऐकून लगेच मी कांही उदार होऊन मदतीचा हांत पुढे करणार नव्हतो आणि ते त्यालाही ठाऊक असावे. खरे सांगायचे तर 'तो' माझ्याकडून कोणत्याही प्रतिक्रियेची अपेक्षाच करत नव्हता. त्याचे बहुतेक बोलणे स्वगत वाटावे असे चालले होते. मलाही त्याच्या समस्यांच्या जंजालात स्वतःला गुरफटून घ्यावेसे वाटत नव्हते. पण तरीही हे सगळे कुतूहलजनक वाटत होतेच.

एवढ्यात त्याचा उतरण्याचा बसस्टॉप आला. तो शांतपणे उठला, मागच्या लेडीजसीटवर बसलेल्या आपल्या बायडीला सोबत घेऊन उतरून गेला. मी त्याचाच विचार करत राहिलो. 'तो' बोलत होता ते खरे असेल की टाइम पास करण्याचा त्याचा हा एक आगळा मार्ग असेल?

मौजमजाअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

12 May 2010 - 11:13 am | कानडाऊ योगेशु

घारेसर,लेख एकदम खुसखुशीत झाला आहे.
गंगाधर गाडगीळांच्या शैलीची आठवण झाली.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

प्रमोद देव's picture

12 May 2010 - 11:22 am | प्रमोद देव

आनंदराव, तुमच्या नेहमीच्या प्रसन्न शैलीतला हा अजून एक ताजातवाना 'नमुना' आवडला.

निरन्जन वहालेकर's picture

12 May 2010 - 11:40 am | निरन्जन वहालेकर

ह्याला ही " जीवन असेच नाव " ! !
कुणी व्यापारी असावा ! ! साधी घटना पण लेख शेवट येईपर्यंत उत्कंठा वाढवणारा ! सुंदर लिहिला. आवडला !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 May 2010 - 11:47 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

शेवट अगदीच 'गैरफिल्मी' ... पण म्हणूनच लेख पुन्हा एकदा वाचावासा वाटला.

अदिती

नीधप's picture

12 May 2010 - 12:10 pm | नीधप

घारे काका लेख छान!
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

स्वाती२'s picture

12 May 2010 - 4:36 pm | स्वाती२

लेख आवडला.

अनिल हटेला's picture

12 May 2010 - 8:17 pm | अनिल हटेला

:)

बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D

अरुंधती's picture

12 May 2010 - 8:22 pm | अरुंधती

जाता जाता घडलेला सहज प्रसंग, बातचीत चांगली खुलवून सांगितली आहे!

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

शुचि's picture

12 May 2010 - 9:24 pm | शुचि

लेख आवडला. बिचारा मन मोकळं करत होता :(

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 May 2010 - 12:13 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

घारे साहेब, लेखन एकदम खुसखुशीत झालंय...!
हेच लेखन पुन्हा दोनदा तरी वाचेन. :)

-दिलीप बिरुटे
[हसरा]

सुबक ठेंगणी's picture

13 May 2010 - 6:45 am | सुबक ठेंगणी

खुसखुशीत शैली आणि अनुभवाची, त्यातल्या पात्रांची 'रियालिटी' आवडली.

वेगवेगळ्या स्तरावरल्या लोकांना माझाच खांदा भिजवायला कां आवडतो हे मला न सुटलेले कोडे आहे.

:)
शुचि म्हणते तसं कधीकधी समोरच्याकडून फक्त श्रवणभक्तीचीच अपेक्षा असते.

आनंद घारे's picture

13 May 2010 - 6:14 pm | आनंद घारे

प्रतिसाद देणार्‍या सर्व मित्रांचे आणि 'त्या' अनामिकाचेही आभार.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

आनंद,
बर्‍याच दिवसांनी तुझं लिखाण वाचलं. फक्कड लेख लिहिला आहेस. मला असं हलकं-फुलकं लिहायला आवडेल, पण जमत नाहीं!
अवांतरः आपल्याला लोक 'काका' म्हणायला लागले कीं समजावं.....
<<ऐंशीच्या घरातल्या त्याच्या पिताश्रींनी सांगितले, "हे बघ, माझ्याहून पंधरा वीस वर्षांनी मोठा असेल तो म्हातारा असे समज.">>

सुधीर काळे, पुन्हा विठोबाच्या पंढरीत (वॉशिंग्टन डी. सी.) परत !
------------------------
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण तिसरे: http://tinyurl.com/2br29tx
आधीच्या प्रकरणांचे दुवे 'सकाळ'ने लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.

आनंद घारे's picture

14 May 2010 - 9:05 am | आनंद घारे

एका कॉलेजकुमाराने चक्क आजोबा म्हंटले. मी पटकन मागे वळून पाहिले. लोक काहीही म्हणोत, आपण आपल्याला हवे असेल तसेच समजायचे. प्रतिक्रियेबद्दल थँक्स.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

प्राजु's picture

14 May 2010 - 12:14 am | प्राजु

काका.. एकदम छान लेख.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/