नाचरी गाय - २ (आधारित)

चित्रा's picture
चित्रा in जे न देखे रवी...
1 Apr 2010 - 9:44 am

आधीची कविता आणि पूर्वपीठिका/संदर्भ इथे http://www.misalpav.com/node/11707
(पामेला ट्रॅव्हर्सच्या मेरी पॉपिन्समधील एका कथेवर आधारित)
हा भाग जरा लांबला, पण मूळ कथेतील वर्णनाचा विस्तार पाहता हे ठीक वाटले.
माझ्या संगणकावर घातलेले तक्ते दिसत नाहीत, म्हणून वाचायला अजून सोपी करता आली नाही.

(असेच गेले दिवस बहु अन
अशाच गेल्या रात्री अनेक
थांबेना फडफडते शेपूट
आणि नाचरे पाऊल एक) ..(येथून पुढे सुरू .... )

----------
घसा सुका, अन पोट रिकामे
पाय परंतु थांबती ना
मऊ मऊ गवताला तुडवीत
पळती आणि नाचती सदा

सल्ले मिळती वडिलांचे मग
असे करा अन तसे करा
करून झाले प्रयत्न सगळे
थांबता येई न पहा

कोणी म्हणाले जा दरबारी
राजा सुचविल युक्ती खाशी
वेळ आपुला असा न दवडी
उनाड, केवळ फुकट कधी

तांबुलाही पटले सारे,
कठिण नव्हते काही ते
स्वस्थ बसुनि गवत चघळण्या
उताविळ ती झाली असे
----

राजवाड्याकडे निघाली
उधळित माती सगळीकडे
नाजूक सुंदर पायांवरती
धुळीने उठली नक्षी कुठे

तशीच शिरली दरबारी अन
घेऊ लागली गिरक्या छान
राजा जेथे बनवीत होता
नवे कायदे लहानसहान

कपाळावरती आठी चढली
भुवया झाल्या वक्र तिथे
दरडावून तो राजा बोले
"काय? कोण तू ?इथे कुठे?"

तांबू बोले हळू तोंडातच
"तांबू मी, एक गाय असे"
"दिसते आहे आम्हाला ते!"
तांबू बापडी गप्प बसे

"गडबडगुंडा थांबव आधी!
करवादून राजा बोले -
"स्वस्थ होऊनी शांत जराशी
काय चालले? सांग कशी!"

"तेच जमेना कधीपासूनी"
तांबूला मग कंठ फुटे
" म्हणून आले दरबारी मी
सुचवा ना आपण काही?"

राजा आणि दरबारीही
चकितच झाले कथा ऐकुनि
विस्फारून डोळे बघू लागले
तांबुला ते निरखुनी निरखुनी

निरखून बघता असेच तेव्हा
राजाला एक नवल दिसे
तांबूच्या नाजूक पायी त्या
एक चांदणी लपून बसे

"हीच चोरटी, तुझी चांदणी!
नृत्याचे कारण ही असे"
"पायावरती वसे तुझ्या ती
गालावरती तीळ जसे"

"यत्न करूया हिला काढण्या"
दरबारीही होती पुढे
"हीच चेटकी, छळवादी ती
शांततेला लावी पिसे"

थरारले तांबूचे अंग
तिची चांदणी बघताना
स्पर्श तिला मग पुन्हा आठवला
वार्‍याच्या त्या झुळुकीचा

"विलग करावे, का न करावे,
अशा कोवळ्या चांदणीला?"
पडला हा जो प्रश्न तिला तरी
ओठांवरूनी परतवला
---

चांदणीला पकडून त्यांनी
ओढून धरले खूप जरी
काही केल्या मुळीच ती पण
पायावरून हलली नाही

"हट्टी! ढिम्म! हलणारी नाही
किती ओढले हिला तरी
ती आकाशी पण गेल्याविन
तुला शांतता मिळे कशी?"

"उडी मारूनी आकाशी मग
बघ जाते का घरास ती ?
हाच एवढा उपाय राही
जमते का, करूनि पाही"

तांबूला तशी उडी मारणे
नको वाटले, लाजली ती
तरी राजाच्या आग्रहामुळे
तांबू उडाली आकाशी

झाले तेव्हा सुरळित सारे
चांदणी गेली तिच्या घरी
आणि तांबू धपकन पडली
मऊ कोवळ्या गवतावरी
-----
वासरे मग लुचू लागली
पुन्हा आपल्या आईला
गाई-गुरांनी श्वास सोडला
एकदाचा मग सुटकेचा

"नाचण्याची कला खरी, पण,
गाईला का दिसे बरी?"
म्हणून सगळी गाई-गुरे मग
जाती आपुल्या घरोघरी
---
तांबू पण मग उदास झाली
आली आठवण चांदणीची,
तिच्या विजेच्या अंगाची, आणि
कंपित हर्षित हृदयाची

"आनंदाचे तरंग तसले
फिरूनी मनात उठतील का?
तीच चांदणी परत कधीतरी
निखळूनी खाली येईल का?"
---
कोणी म्हणे ती शोधत गेली
इथे तिथे त्या चांदणीला
पाहिलीत का तुम्ही कधी पण
तांबूला अन चांदणीला?

अद्भुतरसकविता

प्रतिक्रिया

रेवती's picture

1 Apr 2010 - 8:04 pm | रेवती

अतिषय गोड कविता!
फार आवडली.

रेवती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Apr 2010 - 8:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अतिशय गोड कविता!
फार आवडली.

-दिलीप बिरुटे

चित्रा's picture

2 Apr 2010 - 5:10 am | चित्रा

धन्यवाद,

मिपा बंद होण्याआधी कधीतरी पाच प्रतिसाद दिसले होते, मग उत्तर देईन म्हटले तर आता त्यापैकी एकच दिसतो आहे. बहुतेक काही तांत्रिकी कारणाने उडले असावेत?
प्रतिसाद देणार्‍या सर्वांची आभारी आहे.

मदनबाण's picture

9 Apr 2010 - 5:59 pm | मदनबाण

अतिशय गोड कविता... अगदी अद्भुत रसाने भरलेलीच वाटली. :)

मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

चित्रा's picture

9 Apr 2010 - 11:13 pm | चित्रा

कविता वर आलेलीच आहे तर त्या निमित्ताने ती अजून वर आणते ;)

असो.

कविता गोड आहे, असे सांगितल्याबद्दल धन्यवाद. मूळ गोष्टीतले वर्णनही अतिशय गोड आहे.

पण ही कहाणी वेगळा सूर पकडते, तो मला महत्त्वाचा वाटला होता.
धनंजय यांनी अनुवादित केलेल्या कवितेतील गाय आणि ह्या कहाणीतील गाय नेहमीच्या सरळधोपट मार्गापेक्षा काही वेगळे करू पाहतात.

शेवटी त्या निर्णय काय घेतात ते गायींच्या स्वभावावर आणि परिस्थितीवर अवलंबून असणार आहे. पण काही वेगळे निर्णय घेताना सरळधोपट मार्गाने जाणार्‍या मनाची जी उलाघाल होते, कुठेतरी वेगळ्या मार्गाचे आकर्षण, कुठेतरी कुणीतरी शिकवलेले अंगी बाणलेले शहाणपण यांच्या मध्यावर मनाची जी ओढाताण होते ती दिसावी अशी अपेक्षा होती, किती सफळ झाली माहिती नाही.

टारझन's picture

10 Apr 2010 - 2:43 am | टारझन

अरे वा ? वेगळीच आणि अद्भुत कविता !!

शुचि's picture

20 Mar 2013 - 6:25 am | शुचि

धागा वर आणते आहे.

जेपी's picture

13 Jan 2014 - 7:33 pm | जेपी

:-)