मिसळपाववरच्या लोकांसाठी याआधीही मी कवितेसारखे काही तरी लिहीणे नवीन नाही! त्यातलाच हा एक प्रकार आहे तो समजून घ्यावा.
ही कविता (किंवा जे काही आहे ते) लिहीण्यामागे माझी जरा मजबुरी आहे. दातात पेरूची बी अडकल्याप्रमाणे झाले आहे, त्यामुळे ती काढल्याशिवाय पुढे जाता येत नाही! हे लेखन आधारित आहे - मेरी पॉपिन्स म्हणून लहान मुलांसाठी लिहीलेल्या काही पुस्तकांची मालिका आहे (लेखक पी. एल. ट्रॅव्हर्स - पामेला ट्रॅव्हर्स -http://en.wikipedia.org/wiki/P._L._Travers ). मध्यंतरी त्यातले एक पान उघडून वाचले तर एका गाईची गोष्ट मिळाली. त्यावरून मी भाषांतर केले पण नंतर लक्षात आले की त्या भरात मी कॉपीराईट्स वगैरे सगळे विसरून गेले होते, त्यामुळे ते भाषांतर इथे देण्याचा प्रश्नच आला नाही. मग वाटले की कल्पना केंद्रस्थानी ठेवून कविता किंवा त्यासारखे काही लिहीली/लिहीले तर मी तिला आधारित म्हणू शकते. म्हणून हा प्रयत्न केला आहे. मी एरवी कविता करत नाही, आणि यमके/छंद/वृत्त यांच्याशी माझा काही संबंध नाही. पण कोणी सुधारणा सुचवल्या तर आवडतील. हा पहिला भाग आहे. (एकावेळी वाचणार्यांवर एवढेच अत्याचार बास!)
नाचरी गाय - (भाग १)
एक होती तांबू गाय
वासरांसंगे कुरणात र्हाय
सकाळपासून रात्रीपर्यंत
कुरणात कोवळी कणसे खाय,
कुरण तिचे झोकदार
हिरवेगार आणि मऊ फार
उंच कोवळ्या गवताची
पाती असत चवदार
तांबू गाय सालस बाई
नाकासमोर सरळ पाही
कोणाशी भांडण तंटा
करायची गरज तिला नाही
रोज उठावे, चरत सुटावे
वासरांनाही ते शिकवावे
रवंथ करीत शांत मग
कुठेतरी स्वस्थ बसावे
जगणे होते सरळ फार
हळुवार आणि समजुतदार
कुरणामधल्या दिवसारात्रीत
फरक नव्हता असा फार
पण एका रात्री गंमत झाली
तांबूची शांती दूर पळाली
गार वार्याची झुळूक अचानक
एक शिरशिरी उठवून गेली
थरारले नाजूक तिचे मग
मऊ तुकतुकीत तांबुस अंग
दगडाने उठविले जणू ते
शांत तळ्यावरती तरंग
चटकन होई तांबू उभी अन
झटकन झाडी सगळे अंग
शेपूट, डोके, पाय, पोट मग
शांतविण्याचा निष्फळ यत्न
केसांवरली वीज तरी ती
अंग झटकुनही गेली नाही
पायांमधली वीज आणि ती
तांबूला फरफटवत नेई
पाय नाचती नाच असा मग
तांबूने जो कधी शिकला नाही
(शहाण्या गरत्या गाईंनी कधी
नाचण्याची अशी रीतही नाही!)
नजर टाकूनि इकडे तिकडे
लाजूनि शरमुनि अर्धमेली अशी
वार्यावर उडते शेपूट आपुले
तांबू पाही विस्मित होऊनी
चकित झाली गाई-गुरे मग
आणि वासरे तांबूची ती
प्रयत्न केला थांबविण्याचा तरी
सफल परंतु ती ना झाली
असेच गेले दिवस बहु अन
अशाच गेल्या रात्री अनेक
थांबेना फडफडते शेपूट
आणि नाचरे पाऊल एक
(क्रमशः (!))
प्रतिक्रिया
31 Mar 2010 - 12:53 am | शुचि
अ-प्र-ति-म!!!!! :)
केवढी गोड!!!!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर
बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे
31 Mar 2010 - 1:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लगे रहो.
शाळेत तांबू गाय की असेच काही तरी गाईवर कविता होती.
त्याची धुसर-धुसर आठवण झाली.
-दिलीप बिरुटे
[धुसर]
31 Mar 2010 - 1:38 am | प्रभो
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
31 Mar 2010 - 2:01 am | धनंजय
मस्त .
उगाचच रॉबर्ट फ्रॉस्टची ही कविता आठवली -
अ काऊ इन अॅपल टाइम
31 Mar 2010 - 3:17 am | रेवती
कविता आवडली.
मुलं लहान असताना त्यांना आपल्याजवळ बसवून म्हणायच्या ज्या कविता असतात तशीच वाटते.
भाग दुसरा लवकर येउदे!
तांबूचे नाचणे बंद होऊदे!
नाचायची तिला गरजच काय?
तांबू आपली शांत गाय! ;)
(हलके घेणे)
रेवती
31 Mar 2010 - 9:23 am | प्रमोद देव
आवडली कविता.
चित्राताई,तुम्ही मनावर घ्या,नक्कीच एकापेक्षा एक चांगल्या कविता लिहू शकाल.
1 Apr 2010 - 5:33 am | चित्रा
प्रतिसादांबद्दल आभार.
अजून एक म्हणजे -
वृत्त नियम पाळून कविता करायला थांबले तर बहुतेक पुढचा जन्म घ्यावा लागेल.
त्यामुळे जशी सुचली तशी लिहीली - पण सुधारणा सुचवल्या तर हव्या आहेत.
1 Apr 2010 - 1:00 pm | डावखुरा
पहीले पाच कडवे बड्बड्गीतं म्हणुन उत्तम पण एकुण्च कविता सुरेख जम्लिय....
बड्बड्गीतं हा उल्लेख करण्यामागे चेष्टा करने हा उद्देश नाही मुळी.....
"राजे!"
1 Apr 2010 - 3:05 pm | अरुंधती
छान झाली आहे कविता....
<<प्रयत्न केला थांबविण्याचा तरी
सफल परंतु ती ना झाली>>
ह्यातील ''थांबविण्याचा'' ऐवजी फक्त ''थांबविण्या'' वापरलेत तर गेयता वाढेल असे वाटते.
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/