II स्वरभास्कर पं भीमसेन जोशी प्रसन्न II
राम राम मिपाकरहो,
देवगंधर्व भास्करबुवा बखले. जयपूर, आग्रा, ग्वाहेर गायकीवर हुकुमत. गाण्यातला साक्षात भास्करच..त्यांची देस रागातली बंदिश.. 'पिया कर धर देखो.. '
सौ शैला दातार. एक गुणी गायिका. योगायोग असा की शैलाताई या भास्करबुवांच्या नातसून.. शैलाताईंनी नमुन्यादाखल गायलेली देस रागातली बंदिश येथे ऐकता येईल.. भास्करबुवांनी छान एकतालात बांधलेली ही बंदिश अगदी प्रसन्न आहे..मुळात देस हा रागच प्रसन्न. त्यात भास्करबुवांची प्रतिभा त्यामुळे बंदिश सुंदरच झाली आहे हे वेगळं सांगायला नको...
या बंदिशीचा भास्करबुवांनी विद्याहरण नाटकाकरता (चूभूद्याघ्या) उपयोग केला आणि पद जन्माला आलं..
'मधुकर वन वन फिरत...'
मध्यंतरीची काळात हा तात्या एका माणसाच्या प्रेमात पडला, त्याचं नांव गोविंदराव पटवर्धन. मग जिथे गोविंदरावांचं वादन असेल तिथे जा, जिथून कुठून त्यांच्या वादनाचं नाटकातलं, खाजगी कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण असेल ते मिळव, गोंविंदरावांना घरी बोलावून घरी असलेल्या पेटीवर त्यांच्याकडून कधी विनंती करून तर कधी हक्काने 'नाथ हा माझा..' सारखी पदं वाजवून घे हे उद्योग सुरू झाले. अखंड शोधाशोध करून, कधी कुणाच्या विनवण्या करून तर कधी कुणाच्या हातापायापडून गोविंदराव, भीमण्णा, वसंतराव, कुमारजी या मंडळींच्या दुर्मिळ ध्वनिमुद्रणाने तात्याचा खजिना समृद्ध झाला. त्याच खजिन्यातलं आमच्या गोविंदरावांनी वाजवलेलं 'मधुकर वन वन..' इथे ऐका..
गाण्यातल्या व्हरायटी म्हणजे काय, जागा म्हणजे काय, पेटी गाते कशी, बोलते कशी, शब्द ऐकू येतात ते कसे, हे समजेल!
आणि आता..
भास्करवांनी बांधलेलं हे पद मराठी संगीत रंगभूमीवर प्रथम कुणी गायलं बरं?
मराठी संगीत रंगभूमीचे सम्राट नारायण श्रीपाद राजहंस, अर्थात नारायणराव बालगंधर्व यांनी! भास्करबुवांच्या देस मधल्या इतक्या सुंदर बंदिशीचं सोनं केलं ते त्यांच्याच या बावनकशी शिष्याने, स्वरलयीच्या दुनीयेतल्या एका राजहंसाने! आता नारायणराव बालगंधर्वांबद्दल मज पामराने काही लिहावं अशी माझी पात्रता नाही.. साक्षात मन्सूरअण्णा, भीमण्णा, कुमारजी, भाईकाका यांसारख्या दिग्गजांना नारायणराव बालगंधर्वांवर काय अन् किती बोलावं हे जिथे काही वेळेला उमगेनासं होतं तिथे माझी काय कथा?
एकच सांगेन की या राजहंसाने लडिवाळ स्वरालयीची, गळ्याला कुठेही अटकाव नसलेल्या, कुणालाही हेवा वाटावा अश्या निकोप आकाराच्या तानांची मुक्त उधळण केली आणि त्यात मराठी रसिक तृप्त झाला, मराठी संगीत रंगभूमी धन्य झाली.. भूप, यमन, देस, भीमपलास, बिहाग यांसारखी माणिक-मोती-पाचू आणि रत्न नारायणरावांनी अक्षरश: घराघरात पोहोचवली, मुक्तकंठे वाटली!
इथे ऐका नारायणरावांचं 'मधुकर वन वन..' आणि आपणही तृप्त व्हा, धन्य व्हा!
आपला,
(समृद्ध आणि श्रीमंत) तात्या अभ्यंकर.
प्रतिक्रिया
11 Feb 2010 - 6:49 pm | क्रान्ति
सुरेल दुव्यांनी मन तृप्त झालं. :)
क्रान्ति
अग्निसखा
12 Feb 2010 - 7:58 am | मदनबाण
सहमत... :)
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
12 Feb 2010 - 7:04 pm | मनीषा
सुरेल दुव्यांनी मन तृप्त झालं.
12 Feb 2010 - 6:02 am | शुचि
फारच गोड. आम्ही कानसेन नसू पण मिपा मुळे होऊ
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
12 Feb 2010 - 8:05 am | विसोबा खेचर
क्रान्ति, मदनशेठ आणि शुचि,
लेखातील दुवे रसिकतेने ऐकून प्रतिसाद दिल्याबद्दल आभार..
आपला,
(गाण्याबजावण्यातला) तात्या.
12 Feb 2010 - 8:50 am | प्रमोद देव
शैला दातारांना ऐकतांना नेहमीच माणिकताईंचा(वर्मा) भास होतो. खूपच छान बंदिश.
गोविंदरावांबद्दल मी बापडा काय बोलणार? त्यांच्या बोटात विलक्षण जादू होती..ते बोटाने गायचे असे म्हटल्यास अतिशयोक्ति होऊ नये.
बालगंधर्व म्हणजे तर संपूर्ण महाराष्ट्रातील संगीत रसिकांचे आराध्य दैवतच आहे. आचार्य अत्रे ह्यांच्या भाषेत म्हणायचे झाल्यास "असा आवाज,अशी सहजसुंदर गायकी पुढच्या दहा हजार वर्षात होणे नाही."
**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
12 Feb 2010 - 8:29 pm | विसोबा खेचर
शैला दातारांना माणिकताईंची खूप काळ तालीम लाभली.. त्यामुळे त्यांच्या गायकीवर माणिकताईंचा प्रभाव आहेच.
माणिकताई! अतिशय गुणी गायिका. देवकाका, एकदा केव्हातरी त्यांच्यावर अगदी पान भरून लिहायचं आहे हो..
बघुया!
तात्या.
12 Feb 2010 - 9:06 pm | बिपिन कार्यकर्ते
लेख आवडला. दुवे पण सुंदर... जपून ठेवावेत असे.
(भेसूर) बिपिन कार्यकर्ते
12 Feb 2010 - 9:39 pm | चतुरंग
दुवे भन्नाटच आहेत!
गोविंदानं काय वाजवली आहे रे पेटी तात्या!!
अंगावर काटा आला, गंधर्वतानांच्या लडींवर लडी सोडल्या आहेत रे.
'गुंजारवाला' ह्या शब्दातल्या 'गुं' वरचा नाद आणि मिंड एखाद्या तंतुवाद्याच्या बरोबरीनं आणली आहे, वा कमाल आहे!
'भ्रमर' हा शब्द पेटीतून वाजू शकतो? अशक्य वाटतं!
दोनच कडव्यांचं छोटंसं गाणं आहे हे. रसिकांनी हे वाचत वाचत पेटी ऐका. शब्दन शब्द उमटलेला ऐकू येतो! कोण म्हणतो देव नाहीये!!
(नतमस्तक)चतुरंग
12 Feb 2010 - 10:46 pm | विसोबा खेचर
गोविंदा वाजवत नसे, गात असे..!
:)
12 Feb 2010 - 11:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तात्या, गाण्याबजावण्यातलं काही कळत नाही. पण, तुमच्या गोविंदरावांनी वाजवलेली पेटी आवडली.
बाकी बंदिश, भूप, यमन, देस, भीमपलास, बिहाग, समजून घ्यायला बराच काळ जावे लागेल असे वाटते. :(
-दिलीप बिरुटे
[संगीतातला 'ढ' विद्यार्थी ]
13 Feb 2010 - 1:41 am | स्वाती२
तात्या, दुव्यांबद्दल धन्यवाद.