"च्यामारी ह्या म्हातार्याच्या, हातात घावुदे एकदा... नरडंच आवळतू साल्याचं", हणम्या स्टेशनमास्तरच्या केबीन मधुन बाहेर येता येता करवादला. त्याची धुसफूस ऐकुन तिथेच बसलेल्या दोघा-तिघांनी दात विचकले. नान्याच्या पाठीत धपाटा घालुन तो तिथेच एका दगडावर बसला, बाजुला तोंडातील तंबाकुची पींक टाकुन, तो परत चालु झाला. नान्याच्या पाठीच धीरडं झालेले बघुन बघ्यांची चांगलीच करमणुक झाली. हणम्या जाम तापला होता, तापणार नाय तर काय हो? एकतर जवान गडी, चार महिन्यांपलिकडेतर हळद लागली, आठ्वड्याला दोन रोज ह्याची मुंबई ड्युटी, म्हनजे हा आपला चार रोज तिकडंच की! आजच्याला सूटी घेतो म्हटल तर मास्तरने इस्पेश्यल ड्युटीला आवंतन धाडलं, मंग कुणाचबी टकुरं फिरणारचकी!! त्यात आज हणम्याची म्हातारा-म्हातारी पावन्याकडे वस्तीला म्हनुन्श्यान गेल्यी व्ह्ती, समदं कसं बायजवार जुळुन आलं व्ह्त, पन पोळी म्हुनश्यान वाईच मोठा घास घ्यावा आनि पहिल्या घासाला मीठाचा खडा लागावा, अगदी तसं झालं होतं बघा हणम्याचं. पन त्ये स्टेशनमास्तर बी काय करनार म्हना, शिरपुरला जानारी सांच्याची बस निम्म्या वाट्येवर बरेक्फेल होऊन गेली, काश्या त्या गाडीचा डायव्हर, आठाच्या नंतर अप्पाच्या सायकलीवर ड्ब्बलशीट आला आनि बातमी दिऊन घरी गेला. रातच्या टाईमाला शिरपुरला जाण्यापरीस राजीनामा द्येतो म्हनला. घ्या, आत्ता हो काय करा, २०-२५ मान्सं अर्ध्यावाटेवर जंगलात हुभी असणार, आनि नसली तरी सकाळसाठी गाडी धाडणं, त्याला भागंच व्हत, नायतर त्याची नोकरी फटक्यासरशी ग्येली असती. कोनीच तैयार नाई म्हटल्यावर त्याने हणम्याला बोलावनं धाडलं, दादा-बाबा करुनश्यान त्येला राजी करु म्हनला तर हणम्या ऐकेना, मग म्हातार्याने कम्प्लेटीची धमकी दिली आणि भाबडा हणम्या तैयार झाला. हणम्या तसा यक ल्मबर डेसरींगबाज, पन्नास रुपड्यांच्या पैजेखातर अवसेच्या रातीला मसणवाटीत दोन तास बसुन आलं होतं बेणं. पन मनाचा येकदम सरल, छक्के-पंजे पटदिशी ध्यानात येत नसंत त्याच्या! नान्या, त्याचा जीवाभावाचा मैतर, दोघंबी जवातवा संगट असायचं.. आताबी हणम्या तैयार झाला म्हटल्यावर नान्याबी संगट निघाला, येळप्रसंगाला एकास दोघं असावं म्हनुन.
वेश्यीवरच्या म्हसुबाला श्रीफल वाढवुन, दोघं रस्त्याला लागलं. शिरपुर म्हंजे वाड्याच्या खालच्या अंगाला, जंगलाच्या मध्यभागी असलेली पाच-पन्नास घरांची वस्ती. रस्ता तसा काही नव्हताच, गावकर्यांनी खपुन श्रमदानातुन रस्ता तयार केला होता, आताच्या पावसात त्याची बर्यापैकी वाट लागली होती. ह्या शिरपुरला जाणारी शेवटची एस्.टी. वाड्यावरुन दुपारी चारला सुटायची, अवघे वीस-पंचवीस किलोमीटरचे अंतर पन जायला दोन तास लागायचे. ह्यीच एस टी सकाळी 6 वाजता वाड्याला परत फिरायची. ही एस टी चालु होऊन आता २ वर्षे होऊन गेली, पन हा प्रसंग पहिल्यांदाच आला होता. तंबाखुचे बारवर बार भरत दोघे चालले होते. नान्या मुलखाचा गप्पिष्ट पण ह्या रस्त्याचा भयाणपणाने त्याला पार गपगार करुन टाकला.
हणम्याने गाडी पार रेमटवली, आणि काश्याने सांगितलेल्या ठिकाणी म्हणजे फाट्यावरुन अर्ध्या फर्लांगावर असलेल्या पीरबाबापासुन धा मिनिटावर असलेल्या पारापाशी अर्ध्या-पाऊण तासात आणली. बंद पडलेली एस. टी. तिथेच बाजुला ऊभी केलेली होती. साधारण नऊचा सुमार.. डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही असा अंधार.. चार दिवसांपुर्वीच अमावस्या होऊन गेल्याने चंद्राचा फारसा प्रकाश नव्हता, तसेही त्या घनदाट जंगलात सुर्याची किरणे उतरायला दुपारचे बारा वाजायचे, तिथे चंद्र काय दिवे लावणार? लांबवर पीरबाबाशी कुणीतरी दीवा पेटवला होता, त्याची ज्योत थोडा दिलासा देत होती. जंगल अगदी शांत होते. उंच वाढलेल्या वृक्षात मधुनच घुमणार्या वार्याचा घुं घुं आवाज शहारे आणत होता. त्या वार्याने होणारी झाडांच्या पानांची सळसळ भल्याभल्यांच्या काळजाचे ठोके चुकविण्यास समर्थ होती. वेड्या-वाकड्या वाढलेल्या झाडांचे आकार अंधारात भयावह वाटत होते. पारावरचा प्रचंड वड आणि त्याच्या लोंबकळणार्या पारंब्या एखादे कापलेले मुंडके उभे करुन, जटा पसराव्या तसे भयानक वाटत होते. मधुनच टीटवी, वाघळ, घुबड कोणी ना कोणी के़काटत होतेच, त्यांना साथ द्यायला रातकिड्यांची कीरकीर चालुच होती. पाराजवळ गाडीतुन खाली उतरण्याची हिम्मत नान्यामध्ये नव्ह्ती, कर्तव्य म्हणुन हणम्या खाली ऊतरला.
त्याने आजुबाजुला आवाज दिले. खरेतर हा मुर्खपणाच होता, भर जंगलात एवढा वेळ गाडीची वाट बघत कोणी थांबले असल्याची शक्यता अजिबात नव्हती. दहा मिनिटे हाका मारुन कोणाचा पत्ता नव्हता. वैतागलेला हणम्या गाडीत शिरला, तोंडाने परत परत मास्तरच्या खानदानाचा उध्दार चाललाच होता. गाडीला स्टार्टर मारणार, तेवढ्यात पाराच्या खालच्या अंगानी हाकाटी आली, "वाईस थांब की मुडदया! तुझी माय व्याली व्हय रं, इतक्या बिगीनं चाल्लास तं?", भडकलेला हणम्या शिव्या देतच खाली उतरला, त्याने पाहीले, पाराच्या खालच्या अंगानी कंदील घेऊन एक म्हातारा काठी टेकत येत होता, त्याच्या मागे म्हातारी, एक बाप्या, त्याची बाईल आणि बाईच्या कडेवर तान्हुला होता. हणम्या जरा वरमला, आपण निघुन गेलो असतो तर रातभर ह्यांना जंगलातच काढावी लागली असती, हा विचार त्याला अपराधी करुन गेला असावा. पण ह्या वेळेला ही पाच जणं पाराच्या मागे काय करत होती, हा विचार त्याच्या मनाला शिवलाही नाही. ते सगळे झटक्यात पारापाशी आली, म्हातारा-म्हातारी जरा दम खायला पारावर विसावली. म्हातारा बोलला, “रानच्या वाट्येने गावाकडं निगालु, पन म्हातारीचं तंगड मुरगाळलं आनि वाटतच थांबलो झालं. गाडीचा आवाज आयकुन, वर यायला लागलो त तु निघाला, म्हुन आवाज दिला.” थोड्या ऊशीराने सगळे गाडीत जाऊन बसले. म्हातारा बोलतच होता, "द्येवासारखं भेटलांस राजा, नायतर रातच्याला आमी कुठं जाणार व्हतो?" हणम्याने न बोलताच मान हलविली आणि गाडीला स्टार्टर मारला. म्हातार्याची टकळी चालु असल्याने सोबतीचा आधार वाटु लागला. रस्ता वार्याच्या वेगाने पळु लागला. म्हातारा हणम्याच्या जरा मागे,जवळपास गिअरबॉक्सच्या मागच्या अंगाला बसला होता. जरा डोळे तिरके केले तर म्हातारा डोळ्याच्या कोपर्यात येत होता. त्याच्या आठवणीप्रमाणे नान्या दुसर्या सीटवर ऊताणा पडला होता, तो बाप्या, बाई आणि पोरगा त्याच्या मागे दोन सीट बसले होते, आनि म्हातारी..च्यामारी ही म्हातारी कूठे र्हायली? उत्सुकतेपोटी त्याने समोरच्या आरशात बघितले...
काश्या अप्पाच्या सायकलीवर डब्बलशीट गेला, तो काही लवकर येत नाही हे लोकांनी ओळखले. गाडीची वाट पहाण्यापरीस जंगलाच्या वाटेने तासाभरात घरी जाऊ असा विचार करुन काही लोकं निघाली. पारगाववरुन येणारी एसटी शिरपुरफाट्यावरुन जायची,तीला अजुन फाट्यावर यायला अर्धातास तरी होता. काश्यानी ती एस टी गाठली तर गाडी लवकर येईल, असा विचार करुन काही लोक थांबले. पंधरा मिनिटा आतबाहेर पारगावच्या पाटलाचा तुक्या चालत आला, आनि पारगाव एस टी गेल्याचे लोकांना कळले. ती सगळी पण जंगलातल्या वाटेने निघुन गेली. त्यांच्या बरोबर रामा कंडक्टरपण गेला.
सकाळी शिरपुरची लोकं कामधंद्यासाठी वाड्याला आली, त्यातली काही मास्तरच्या घरी जाऊन धडकली. एस. टी. खराब झाली तर सकाळी लवकर एस. टी का नाही सोडली, हा त्यांचा सवाल ऐकुन मास्तर चाट पडले. रात्रीच एस. टी. पाठविली होती, असे मास्तरने वारंवार शपथेवर सांगितले तरी लोक ऐकेनात. गर्दीचा आवाज ऐकुन शेजारी राहणारा काश्या डोळे चोळत आला आणि त्यानेपण तीच हकीकत सांगताच, शिरपुरकरांच्या पायाखालची जमीन सरकली. ताबडतोब लोकं हरवलेली एस्.टी. आणि हणम्या, नान्याला शोधायला निघाले. पारापाशी बंद पडलेली एस्.टी. तशीच उभी होती. तिच्या शेजारुन एक एस्.टी गेल्याच्या खुणा दिसत होत्या, काही लोक तिथे ऊतरुन पायीच शेध घेत निघाले. पारापासुन पाच-सहा कीलोमीटरच्या अंतरावर एके ठिकाणी डाव्या हाताला झाडे तोडुन एस्.टी. गेल्याच्या खुणा लोकांना दिसल्या. फर्लांग, दोन फर्लांग गेल्यानंतर भल्यामोठया आंब्याला धडकलेली एस्.टी. सापडली, पण तिथे हणम्या-नान्याचा पत्ता नव्ह्ता. झाडीत थोडे दुर रक्तात भिजलेला खाकी शर्टाचा तुकडा सापडला, तो कुणाचा काही कळायला मार्ग नव्हता. लोकांनी बरेच शोधले, सारे जंगल पालथे घातले तरी हणम्या-नान्याचा काहीच पत्ता लागला नाही.
साधारण तीन-चार वर्षांनंतर, एका दिवशी संध्याकाळी सातच्या सुमारास वाड्याच्या सरपंचाचा पोरगा, सोन्या त्याच्या मित्राबरोबर शिरपुरवरुन येत होता. नवी फटफटी घेऊन मित्रांच्यात गप्पा तो मारायला म्हणून शिरपूरला आला होता. ऊशीर झाला म्हणुन सुसाट सुटला होता, कसेपण लवकरात लवकर जंगल मागे टाकायचे होते. लांबुनच पारापाशी घोळका दिसल्यावर, त्यानी जरा वेग कमी केला, पारापाशी आल्यावर त्याने आवाज दिला, "काय मंडळी, सांच्यापारी पारावर काय अडचण हाय का?" घोळक्यातला एक जण जरा पूढे आला, आनि म्हणाला, "न्हाई मालक, तुमचीच वाट बघत व्हतो, जरा वाईच ईकडे या, म्हातारा पडलाय त्याला दवाखान्यात न्यायचा हाय" अंधारात चेहरा नीट ओळखु येईना, तेव्हा मागे बसलेल्या सुभान्याने बॅटरीचा लाइट त्याच्या दिशेने मारला आणि सोन्याला हजार व्हॉल्टचा धक्का बसला. त्याला बसलेला धक्का बघुन सगळा पार भेसुर हसायला लागला, हणम्याच्या तोंडातला सुळा बॅटरीच्या प्रकाशात लख्खकन चमकला... टरकलेल्या सोन्याने मागे न बघता भरधाव गाडी सोडली, वळताना त्याने आरशात पाहिले..रीकाम्या पारावर दोन कावळे काव काव करत होते,
प्रेरणा :- सुनसान रस्त्यावर रोज पहाटे पाचच्या सुमाराला बसस्टॊपवर असलेले आजी-आजोबा.
प्रतिक्रिया
9 Dec 2009 - 11:19 pm | मदनबाण
जबरा... लयं भ्या वाटलं... :SS
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
9 Dec 2009 - 11:42 pm | टारझन
केवळ स्तब्ध झालो !! अल्टि रे .. वर्णन सहि उभ केलंस जंगलातल्या रात्रीचं !!
>:) >:) >:) चेटुकवडी >:) >:) >:)
9 Dec 2009 - 11:48 pm | मी-सौरभ
:$ रातच्याला अश्या गोस्टी ....
गारच झालू.....
सौरभ :)
10 Dec 2009 - 3:17 am | टुकुल
जबरा रे..
मस्त टरकली
--टुकुल
10 Dec 2009 - 4:41 am | भानस
वातावरण निर्मिती आणि ग्रामीण बाज एकदम झ्याक जमलयं की. आता अजून कितीक जणांची भर पडतेय त्येवढच बघावं...काय :)
10 Dec 2009 - 10:55 am | sneharani
छान लिहलयं. वातावरण निर्मीती मस्त जमलीये.
10 Dec 2009 - 12:23 pm | सुमीत भातखंडे
वातावरण निर्मिती
10 Dec 2009 - 12:49 pm | भाग्यश्री कुलकर्णी
मस्त लिहीली आहे कथा.
10 Dec 2009 - 4:03 pm | मेघवेडा
टरकलीच!
मस्त लिहिलयंस .. असं वाटू लागलं मी सुद्धा आहे तिथंच त्या पाराकडे!
--
मेघवेडा.
आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O
10 Dec 2009 - 4:57 pm | स्वाती२
बाप रे! बरं झालं आत्ता सकाळी वाचली. रात्री वाचली असती तर....
11 Dec 2009 - 7:15 pm | घाशीराम कोतवाल १.२
मिपावरील भयकथा कार
१ प्रियाली ताई मी तर ह्यांना भयाली म्हणुन ओळखतो खुप घाबरवतात .
२ विशाल कुलकर्णी
न्यु कमर
३ हर्षद आनंदी
**************************************************************
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराजकी जय
11 Dec 2009 - 6:38 pm | jaypal
काही वर्षां पुर्वी टि.व्ही. वर " सत्यजित रे की कथाए" लागत असत घाबरत का होईन आवर्जुन पहात असे. रत्नाकर मतकरींच्या कथा ही वाचत आसे. आणि....
11 Dec 2009 - 8:47 pm | स्वानन्द
एक नंबर !!
सुरुवातीपासून ते अगदी शेवटच्या वाक्यापर्यंत कथेची मनावरची पकड अजिबात सैल होत नाही.
जबरी लिहिलंय!!
स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!