(मी 'छंदाग्रही' असल्यामुळे र्हस्व-दीर्घाची थोडी मोकळिक घेतली आहे. कृपया सहन करणे.)
चंद्र तो झाकोळलेला रात्र नव्हती संपली
चांदण्यांची तेज-वर्षा या नभी आरंभली
वेचताना तेज-गारा त्या तिला, मी पाहिले
हे बघू की ते बघू हे प्रश्न मागे राहिले
घेत ती होती तशी आस्वाद थंडीचा तिथे
वाटले मजला कधी अंधार ऐसा ना फिटे
पाहता मुखडा तिचा अन् केस ते ही मोकळे
नाक होते लालबुंद परि जाहले सर्दीमुळे
मी म्हणालो, 'हाय थंडी केवढी आहे पहा'
ती म्हणाली, 'तेच ना, सर्दी मला झाली पहा'
मी म्हणे, 'परि आज खूपच गारठा आहे भला,
गारठ्यातच होय सर्दी-ताप-पडसे-खोकला
गारठ्यातच आपुल्या शरिरा जपाया ते हवे,
अमृतांजन एक असते नेहमी माझ्या सवे'
'दे मला दे अमृतांजन, चोळुनी घेते जरा'
मागता ऐसे तिने मी मन्मनी म्हणलो, "मरा!"
नाटकी भावात मी आणून हसणे कोरडे,
'नाहि ते माझ्याकडे' म्हणलो असे तिचिया पुढे
'काय कैसा शिष्ठ आहे!' भाव ऐसा आणुनी
'बाय्, मी जाते दुकानी, पाहते 'ते' आणुनी'
पाठम्होर्या त्या तिला पाहून, मज मी टोकले,
अमृतांजन मम तिला तेव्हाच का नाही दिले?
होत खच्ची मी म्हणे ऐसेच होते व्हायचे,
हो न परि इन्फेक्शनाला कारणी पडसे तिचे
शक्यता "स्वाईन-फ्लू" ची मी अशी मग टाळली
"वाचलो!" ऐशा खुशीतच झोप मजला लागली
प्रतिक्रिया
19 Nov 2009 - 12:48 pm | सुनील
र्हस्व-दीर्घाची थोडी मोकळिक घेतली आहे. कृपया सहन करणे
मीपावर तसेहि र्हस्वदिर्घाला फाट्यावर मारले जाते. तेव्हा तुम्हि कल्जि करु नये.
कविता वाचुन झाल्यावर प्रतिसाद देण्यासाठि जागा राखुन ठेवत आहे.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
20 Nov 2009 - 11:26 am | पुष्कर
सुनील, तूमचे आभार. तूमच्या प्रतीसादात एक र्हस्व-दिर्घाचि चुक आहे. कविता मधला वी दिर्घ पाहीजे.
20 Nov 2009 - 3:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हीहिही ... मस्त प्रतिसाद!
कविताही आवडलीच, शरदिनीताई म्हणतात त्याप्रमाणे, विषयवैविध्यामुळे मजा आली.
अदिती
2 Jan 2010 - 3:54 pm | पुष्कर
धन्यवाद
20 Nov 2009 - 2:48 pm | शरदिनी
कवितेचे शीर्षक मोठे वैशिष्ट्यपूर्ण वाटले.
आपले अभिनंदन...
निसर्गाच्या कंटाळवाण्या त्याच त्याच कविता न केल्याबद्दल धन्यवाद...
21 Nov 2009 - 4:26 pm | पुष्कर
म्हणजे एकूणच निसर्गकवितांचा कंटाळा आलेला दिसतोय!! हा हा हा.. बरं झालं सांगितलंत, नाही तर मी पुढची कविता निसर्गावर लिहिणार होतो.
3 Jan 2010 - 7:46 am | सुबक ठेंगणी
हा हा हा...
कविता वाचताना एकदम उत्तरायण सिनेमातल्या "धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना" चं विडंबन आहे की काय असं वाटलं.