धाडधाड जिना उतरुन जुई जेवणाच्या टेबलजवळ आली. नेहमीप्रमाणे खर्रsssss आवाज करत खुर्ची ओढून घेऊन बसली.समोरच्या प्लेटमधला शिरा खाणार तेवढ्यात आई म्हणाली,"सागरचा फोन आला होता."
जुईला ठसका लागता लागता राहिला.
"काय म्हणत होता?"
"तू काल त्यांच्या घरी जाणार होतीस का? का आली नाहीस म्हणून विचारत होता."
"हं... नाही जमलं. अनुच्या घरी गेलो होतो सगळ्या. उशीर झाला."
"अगं मग एक फोन करायचास त्याला. वाट बघत होता म्हणे.."
"हं..... अजुन काही म्हणाला का?"
"नाही. पण तुला फोन करायला सांगितलंय त्याने."
"ठीक आहे करेन नंतर. निघु मी?"
आईच्या उत्तराची वाटही न बघता जुई पळाली.. तिला तो विषयच नको होता... सागर...समीर... नावंही कोणी काढू नयेत आपल्यासमोर...असंच वाटत होतं. अगदी सागरच्याच शब्दांत सांगायचं तर 'वीट वीट विटकर..." झाली होती तिची..
पार्किंगमध्ये गाडी लावून ती वळली तर समोर सागर...
"अहो पेशवीण बाई.. जरा या पामराकडेही लक्ष द्या.."
"हाय, तू? आत्ता इथे?"
"काय करणार? यावं लागलं...सम्या कुठेय?"
"मी काय त्याला कडेवर घेऊन फिरते काय? मला काय माहित?"
"अगं हो हो, काय झालंय एवढं..? कालही आली नाहीस, आजही मूडमध्ये दिसत नाहीस.."
"मला उशीर होतोय...EME चं लेक्चर आहे माझं"
तिच्याकडे चकित होऊन पाहणार्या सागरला तिकडेच सोडून ती क्लासकडे वळली.
त्याला टाळलं खरं,पण तरीही विचार येतच राहिले मनात...
आत्ता या वेळेला हा इथे कसा? आणि समीर बद्दल हा मला का विचारतोय? याला सगळं कळलं की काय? हा समीर पण ना.....? लगेच पचकायची काय गरज होती? जिथे बोलायला हवे होते तिथे शूंभासारखे गप्प राहणार हे साहेब...
"जुई...ए जुई... अगं काय झालं? कुठे आहेस तू?" अनु तिला हलवत म्हणाली.
"अं... काही नाही. अगं जरा डोकं दुखतंय... मी LR मध्ये जाउन बसते."
LR मध्ये पंख्याच्या खाली बसल्यावर जरा डोकं शांत झालं...
कॉलेजच्या पहिल्या वर्षी नाट्यस्पर्धेच्या निमित्ताने तिची-सागरची ओळख झाली. तिला हा मस्तमौला सागर खूप आवडला... दोन वर्षांनी सिनिअर असला तरी एकदम मस्त मैत्री झाली दोघांची...
त्यांच्या पहिल्या भेटीनंतर जवळजवळ दोन महिन्यांनी तिला सागरनी विचारलं " अहो पाटलीणबाई, तुम्ही कोणत्या तुकडीत आहात?"
कोणाची खेचायची असली की सागर शुद्ध मराठीत आणि पूर्ण आदरानं बोलत असे.
"आम्ही ? आम्ही 'क' तुकडीत आहोत."
"क? क.. म्हणजे आमच्या सम्याच्याच वर्गात की!"
"सम्या?????"
"हो, अग, सम्या...म्हणजे समीर जोशी. माझा धाकटा भाऊ आहे तो."
"तो? तो खडु..." जुई बोलता बोलता थांबली.
"हो , तोच ... तोच खड्डुस.. समीर जोशी. अस्मादिकांच्या मातापित्यांचे द्वितीय अपत्य आहेत ते, अस्मादिकांचे धाकटे बंधू."
जुईच्या डोळ्यांसमोर समीर उभा राहिला... उंच, गोरापान, बारीक्...वर्गात पहिल्या बाकावर बसणारा, सगळे सबमिशन वेळेत पूर्ण करणारा.....अगदी आदर्श विद्यार्थी मटेरिअल....
दुसर्या दिवशी लॅबमधून बाहेर पडता पडता तिला समीर दिसला.तिने पुढे होऊन त्याला हाक मारली
तसे आजपर्यंत ते कधी एकमेकांशी बोलले नव्हते. तशी वेळच आली नव्हती.
"हाय, मी जुई. तू... तू सागरचा भाऊ ना?"
"हो. तो मोठा भाऊ माझा."
का कुणास ठाऊक जुईला मागुन 'ह्म्म्म्म्म्म्म' ऐकु आले. तिने मागे वळून पाहिले तर समीरचे मित्र हसू दाबत उभे होते. तिला जरा रागच आला.समीरनेही ऐकले असावे पण तिकडे दुर्लक्ष करुन तो म्हणाला," तू अभिनय छान करतेस."
"तू पाहिलेस आमचे नाटक?"
"अरे,पाहिले म्हणजे....त्याचे बॅकग्राऊंड म्युझिक मीच दिले आहे."
"काय? पण ते तर सागरनी...?" तिचा प्रश्न अर्धवटच राहिला कारण समोरुन सागर येताना दिसला तिला...
"भेटले का दोन ओंडके? बघ सम्या, मी म्हटलं नव्हतं, जुई आज नक्की तुझ्याशी बोलायला येईल म्हणून?"
"म्हणजे...?"
"म्हण्जे म्हण्जे वाघाचे पंजे. चल तुमचे भेटणे सेलिब्रेट करु या"
हळू हळू तिच्या लक्षात आले की तिला वाटला होता तेवढा समीर खडुस नव्हता. वयाच्या मानाने शांत होता बराच आणि मुख्य म्हणजे सागरच्या सोबत असला की त्याचे ते शांत राहणे अगदी जाणवून जायचे..दोघां भावांत खूप फरक होता.
सागर म्हणजे उत्साहाचा धबधबाच होता, पाठीवर थाप मारल्याखेरीज त्याचे बोलणे पूर्ण होत नसे. दुसर्यांना 'ढोला/ढोली' संबोधणारा सागर स्वतःही मस्त गोलमटोल होता. आणि स्वतःच त्यावर तो कोट्याही करत असे.
त्याच्या उलट समीर... कोणतीही गोष्ट पूर्ण विचार करुन करणार, बोलणार..सदैव दुसर्यांना मदत करायला तयार....
नंतरच्या दीड वर्षांत तिची त्या दोघांशी अगदी घट्ट मैत्री होऊन गेली.सागर पास आउट होऊन त्याला नोकरी लागली तरीही त्यांच्या मैत्रीत कुठे खंड पडला नाही.बरेचदा सागर कॉलेजवर येत असे, मग तिघेही तिच्या किंवा त्यांच्या घरी एकत्रच जात आणि धुमाकुळ घालत.या दरम्यानच जुईला समीरचे अनेक गुण दिसुन आले. नाटकाच्या तालमीच्या दरम्यान चाललेल्या वादात सहभागी न होता नंतर शेवटी आपलं मत मांडणं, ते दुसर्यांना पटवून देणं,कोणत्याही प्रसंगात गडबड न करता शांतपणे मार्ग काढणं..
आणि तिला जाणवलं... ती चक्क चक्क त्याच्या प्रेमात पडली होती... त्याचं ते अर्धवट ओठ उलगडुन हसणं,ती किंवा सागर रागावला असता नीट समजावून सांगणं, न बोलता सगळ्यांची काळजी घेणं...तिला फार भावून गेले होते..हो, ती समीरच्या प्रेमात पडली होती....आणि तिला वाटत होतं, नव्हे, तिची खात्रीच होती की त्यालाही ती आवडत होती, पण स्वभावानुसार तो काहीच बोलत नव्हता... तिने त्याला आडुन आडुन सुचवायचा प्रयत्न केला, त्याच्या मनात काय आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला, पण तो काहीच बोलत नव्हता ...
शेवटी हे सगळे असह्य होऊन तिने काल त्याला स्पष्टपणे विचारले होते.....आणि तो... तो काहीही न बोलता निघून गेला होता.... काहीही न बोलता....
म्हणुनच सकाळपासून जुईचं डोकं फिरलं होतं, असंख्य प्रश्नांनी फेर धरला होता डोक्यात्....असा काय हा समीर? काय वाटतं ते तरी सांगावं ना... हो तर हो ..नाही तर नाही....हे असं लटकावून का ठेवतात? शुंभ....माठ....आज कॉलेजला पण नाही आला.... कुठे गेलाय कुणास ठाऊक.... जरा सणकीच आहे...पण म्हणून दुसर्याच्या मनाचा काही विचार आहे की नाही...?
चिडचिड होत होती तिची....
कॉलेज संपवून बाहेर पडताना तिला समीर-सागर भेटले.... समीर काही झालं नसल्यासारखंच बोलत होता तिच्याशी... तिला मात्र अज्जिबात बोलायचे नव्हते...त्या दोघांशीही...
पण सागरला टाळणे अशक्य होते, २-३ दिवसांनी त्यांच्या भेटी परत सुरु झाल्या... नेहमीप्रमाणे कँटीन मध्ये दंगा सुरु झाला, घरी आल्यावर फोनाफोनी सुरु झाली.... सगळे पुर्वीप्रमाणेच... नाही सगळे नाही....तिचे समीरशी वागणे बदलले होते, ती मुद्दाम तुटक वागायची त्याच्याशी....तो मात्र पुर्वीप्रमाणेच हसतखेळत होता...
तिने हळूहळू सागरला जास्त महत्व द्यायला सुरुवात केली,घरी जाताना सागरच्याच गाडीवरुन जाण्याचा हट्ट करणे,कँटीनमध्ये तो मागवेल तेच आपणही मागवणे,सिनेमा बघायला गेल्यावर त्याच्याच शेजारी बसणे वगैरे वगैरे.
असं केल्यावर समीरची रिऍक्शन काय होते तेही ती मुद्दाम बघायची. आधी आधी तो निर्विकार राहत असे, पण हळुहळू तो दुखावला जाऊ लागला... त्याच्या नजरेत ती बोच तिला दिसली की तिला एक प्रकारचा आनंद मिळू लागला... मग ती मुद्दाम तसेच वागत राहिली.
एक दिवस असेच कँटीनमध्ये सागरसोबत ती बसली होती, दोघांचेही खिदळणे चालू होते. इतक्यात समीर तिथे आला.... तो आला तशी ती घाईघाईनी उठली... आणि चक्क त्याच्याकडे दुर्लक्ष करुन निघाली...
आता मात्र समीरला हे सहन झाले नाही... तोही तरातरा तिच्या मागे आला.
तिच्या दंडाला धरुन खस्स करुन ओढले आणि जवळजवळ ओरडलाच....
"का? का करतेयस तू असं?"
"काय? मी काय केलं?
"हे असं का वागतेयस तू? मला असं दुखवून काय मिळतं तुला?"
"मी ? मी दुखावतेय तुला? आणि तू? तू काय केलंस? माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देणंही गरजेचं वाटलं नाही तुला....उत्तर देणं तर दूरच... तो असाच धुडकावुन लावलास तू....आणि.."
"अगं बाई, प्रत्येक गोष्ट बोलूनच दाखवायला हवी का? चुकलो मी 'त्या' दिवशी नाही बोललो मी काही... माझा इगो आड आला.... सगळे म्हणायचे मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणुन्...पण मी नाकारतच आलो नेहमी. दादा, सगळे मित्र.... सगळे चिडवायचे... अगदी तू मी बोलायच्या आधीपासून ....त्यांना गप्प करत आलो मी नेहमी... त्या दिवशीही तुला तसेच उडवुन लावले मी... मान्य करायला तयारच नव्हतो मी.... पण हळुहळु जाणवलं जाणता अजाणता मी खरंच गुंतलो होतो तुझ्यात्...तुझं मला बघुन न बघितल्यासारखे करणं, माझा अनुल्लेख करणं....नाही सहन होतं आता.. थांबव हा खेळ्...माझ्यासाठी नाही तर निदान दादासाठी तरी... तुझ्या या खेळात.. तोही गुंतत चालला आहे..."
जुई अवाक होऊन बघतच राहिली... समोर उभ्या समीरकडे बघताना तिला जाणवले...खरंच असलाकसला खेळ खेळलो आपण...? समीर म्हणतो त्याप्रमाणे सागर..... त्याने काही वेगळा अर्थ तर नाही ना काढला आपल्या वागण्याचा..? अरे देवा, असं काही झालं तर्.....देवा...
"अरे, पण ..पण मला वाटलं... तू सगळं सांगितलं आहेस त्याला..." जुई कसंबसं बोलली...
"कोणाला? मला...? हा ढोला काय सांगणार मला...? पण मला सगळं कळलं होतं...आधीच.... तुम्हांलाही कळायच्या आधीच्..पण वाट बघत होतो तुमच्या सांगण्याची...पण तुम्ही काही बरळायलाच तयार नाही, मग बघितलं तर काहीतरी बिनसलं तुमचं.... काही सांगायलाही तयार नाहीत दोघं...पण मीही काही सोम्यागोम्या नाही... तुमच्याहून जास्त पावसाळे पाहिलेत मी...लक्षात आलेलं माझ्या... तुमचे खेळ्...म्हणूनच काल रात्री काडी टाकली सम्याकडे.... मी गुंतलोय वगैरे.... हेहे... झाला की गडी अस्वस्थ.... कसा घाबरला आणि फाड्फाड बोलला सगळं... हेहेहे..."
आणि गडगडाटी हसत सागरने दोघांचेही हात धरले...
" चला 'दोन ओंडक्यांची भेट' सेलिब्रेट करु या..."
जुई आणि समीर ही हसतहसत त्याच्या बरोबर कँटीनमध्ये शिरले...
प्रतिक्रिया
16 Nov 2009 - 3:59 pm | सनविवि
सही!
16 Nov 2009 - 5:04 pm | पर्नल नेने मराठे
सुरेखच!!!!
चुचु
16 Nov 2009 - 9:04 pm | प्रभो
मस्त....आवडलं...
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
16 Nov 2009 - 9:26 pm | प्रशांत उदय मनोहर
आपला,
(मिपाकर) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
17 Nov 2009 - 7:08 am | हर्षद आनंदी
जड जेवणानंतरची हलकी फुलकी पान सुपारी!!
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
17 Nov 2009 - 7:18 am | मदनबाण
झक्कास्स्स्स्स... :)
मदनबाण.....
The Greatest Gift You Can Give Someone Is Your Time,Because When You Are Giving Someone Your Time,You Are Giving Them A Portion Of Your Life That You Will Never Get Back.
17 Nov 2009 - 2:44 pm | sneharani
कथा आवडली...!
17 Nov 2009 - 2:53 pm | परिकथेतील राजकुमार
येक नंबर कथा हो !
हलकी फुलकी आणी गोग्गोड [;)]
©º°¨¨°º© परानल पाने फुलझाडे ©º°¨¨°º©
आमचे राज्य
17 Nov 2009 - 3:58 pm | फ्रॅक्चर बंड्या
मस्तच...
18 Nov 2009 - 8:25 pm | मनीषा
जुईची गोष्ट आवडली .
18 Nov 2009 - 8:57 pm | किट्टु
खुपच गोड कथा... आवड्ली... O:)
20 Nov 2009 - 4:04 pm | किलबिल
धन्यवाद मंडळी.
20 Nov 2009 - 4:55 pm | सूहास (not verified)
हसत-खेळत आनी सहज सोपी भाषा ...
मस्त कथा !!
सू हा स...
21 Nov 2009 - 9:33 am | प्राजु
हलकी आणि साधी सुटसुटीत कथा..!
आवडली.
पु. ले.शु.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
21 Nov 2009 - 2:17 pm | गणपा
छान मस्त आवडली गोग्गोड गोष्ट. :)
एक शंका आली की हा सागर, 'सागर' चित्रपटातल्या कमल हसन सारखा वरवरच हसतोय की काय.
खर खोटं एक तो सागर वा ती/तो किलबीलच जाणे.
21 Nov 2009 - 4:57 pm | स्वाती२
गोड गोष्ट म्हणून ठीक आहे पण फारशी आवडली नाही. कदाचित हा वयाचाही परिणाम असावा. त्यामूळे या खेळातले धोकेच जाणवले.
सागरला नोकरीतून वेळ कसा मिळतो कट्टा-कँटिन साठी?