इजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – २

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in भटकंती
5 Jun 2018 - 10:04 pm



मुंबईहून आपल्या निर्धारित वेळेपेक्षा २० मिनिटे उशिरा विमानाने उड्डाण करूनही कैरोला मात्र अचूक वेळेवर म्हणजे तिथल्या स्थानिक वेळेनुसार सकाळी ६:०५ ला पोहोचवले. फ्लाईट ड्युरेशन सहा तास पंचेचाळीस मिनिटांची होती. प्रवास छान झाला, ईजिप्त एअर ची सेवा समाधानकारक होती. खाद्यपदार्थ दर्जेदार होते. लिकर सर्व्ह केली जात नव्हती पण एअर होस्टेस आणि फ्लाईट पर्सर ज्युसेस आणि शीत पेयांचा सातत्याने रतीब घालत होते. इन फ्लाईट एन्टरटेनमेन्ट रटाळ होती पण अधून मधून स्क्रीन वर जी.पी.एस. द्वारे नकाशावर दाखवला जाणारा विमानाचा मार्ग, त्याचा वेग, खाली असलेला देश व त्यातील शहरे, एकूण प्रवासाचे अंतर, मुंबई पासून पार केलेले अंतर, कैरो पर्यंतचे उर्वरित अंतर, पोहोचण्यासाठी लागणारा अंदाजे वेळ, बाहेरील तापमान ह्या गोष्टी बघणे जास्त मनोरंजक होते.

माझ्या शेजारच्या सीटवर अरुण कुमार नावाचा लुधियाणाचा तरुण बसला होता. त्याच्याशी गप्पा मारताना समजले कि तो कंपनीच्या कामानिमित्त तीन आठवड्यांसाठी ईजिप्त, जॉर्डन आणि दुबईच्या दौऱ्यावर चालला होता. कैरोला पोहोचेपर्यंत आमची दोघांची छान मैत्री झाली होती. विमानातून बाहेर पडून बस मध्ये बसे पर्यंत चांगलीच थंडी जाणवली होती. इमिग्रेशन व सामान ताब्यात घेऊन बाहेर पडेपर्यंत सव्वा सात वाजले. अरुण कुमारला रिसीव्ह करण्यासाठी त्याच्या कंपनीतील सहकाऱ्याचा एक इरफान नावाचा मित्र (जो मुळचा आझमगढ, उत्तरप्रदेशचा असून कैरोमधील अल अजहर युनिवर्सिटीत इस्लामिक लिटरेचर मध्ये पी.एच.डी. करत आहे) आला होता. त्यानेच मग टॅक्सीवाल्याशी अरेबिक मध्ये घासाघीस करून १८० पाउंडस मध्ये सौदा पक्का केला. योगायोगाने आमची दोघांची हॉटेल्स जवळ जवळच होती. आधी मला माझ्या हॉटेलवर सोडून, संध्याकाळी पुन्हा भेटायचे आश्वासन घेऊन ते दोघे त्याच टॅक्सीने पुढे निघून गेले.

एअरपोर्ट ते हॉटेल हे २२ किलोमीटर्स चे अंतर पार करण्यास सकाळी लवकरची वेळ असूनही शहरातील ट्राफिक मुळे टॅक्सीला ४० मिनिटांचा वेळ लागला. २५ जानेवारी ते ११ फेब्रुवारी २०११ ह्या कालावधीत तत्कालीन अध्यक्ष होस्नी मुबारक ह्यांची हुकुमशाही पद्धतीची भ्रष्ट राजवट मोडीत काढून लोकनियुक्त सरकार प्रस्थापित करण्यात यशस्वी झालेल्या क्रांतीमुळे (अरब स्प्रिंग) ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेल्या तेहरीर चौकात, ईजिप्शियन अँटीक्विटी म्युझीयमच्या अगदी समोरच, जवळपास शंभर वर्षांपूर्वी बांधलेल्या व प्रत्येक मजल्याची उंची सुमारे १५ फुट असलेल्या एका सहा मजली टोलेजंग इमारतीतला तिसरा व चौथा मजला ‘माय हॉटेल - कैरो’ नावाच्या माझ्या हॉटेलने व्यापला होता. ह्या हॉटेलचं स्वरूप हॉटेल + होस्टेल असं होतं. हॉटेलच्या रूम्स एन्सुट तर होस्टेलच्या रूम्स शेअरिंग बेसिस वर होत्या.

वास्तविक माझ्या चेक-ईन ची वेळ दुपारी बाराची होती पण सकाळी सव्वा आठलाच मी रिसेप्शन मध्ये पोचलो होतो. आदल्या दिवशी हॉटेलला अर्ली चेक-ईन साठी विनंतीवजा ईमेल पाठवली होती, त्याला आलेल्या उत्तरात ‘रूम उपलब्ध असेल तर नक्की अर्ली चेक-ईन करून देण्यात येईल’ असे म्हंटले होते. त्याप्रमाणे सकाळी तिथे हजर असलेल्या मेहमूद नावाच्या मॅनेजरने (जो त्या हॉटेलच्या तीन भागीदारांपैकी एक असल्याचे मला नंतर समजले) पहाटे एक रूम रिकामी झाल्याची खात्री करून घेतली आणि आपल्या सहाय्यकास रूम रेडी करण्याच्या सूचना देऊन तोपर्यंत मला कॉमन रुममध्ये बसण्यास सांगून, स्वतः एका ट्रे मध्ये आमच्या दोघांसाठी वाफाळत्या चहाचे मोठे मग्स, शुगर क्युब्स आणि बिस्किट्स घेऊन आला.

एकंदरीत त्याचे आदरातिथ्य पाहून मी थोडा भाराऊनच गेलो होतो पण त्या भल्यामोठ्या मग मध्ये २ टी बॅग्ज डीप केलेल्या बिना दुधाच्या कोऱ्या चहा बरोबर ती चॉकलेट क्रीम बिस्किट्स खायची कशी ह्या मला पडलेल्या प्रश्नाने लगेचच भानावर पण आलो. ह्या आधी गवती चहा किंवा मसाला घातलेला कोरा चहा प्यायला होता पण टी बॅग्ज डीप करून बनवलेला बिना दुधाचा चहा पिण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. शेवटी एक एक वाढवत ४ ते ५ शुगर क्युब्स घालून तो गरमागरम चहा प्यायल्यावर त्या थंडगार वातावरणात मला चांगलीच तरतरी आली. फोन वाय-फाय ला कनेक्ट करून व्हॉट्सॲप वर मी कैरोला सुखरूप पोचल्याची बातमी घरच्यांना दिली.

चहा पानाचा कार्यक्रम चालू असताना मेहमूदशी माझ्या इजिप्त सहली च्या कार्यक्रमा बद्दल चर्चा झाली. या दरम्यान बेल बॉयने माझे सामान रूममध्ये नेऊन ठेवले होते. २५, २६ २७ आणि २८ फेब्रुवारीला संध्याकाळी ७ पर्यंत असे सलग चार संपूर्ण दिवस आणि परतीच्या प्रवासाच्या वेळी ११ मार्च ची रात्र आणि १२ मार्च चा अर्धा दिवस एवढे माझे कैरो मध्ये वास्तव्य होते. पोहोचल्याच्या दिवशी म्हणजेच २५ फेब्रुवारीला पूर्व नियोजित कार्यक्रम काहीच नव्हता, दुसऱ्या दिवशी २६ फेब्रुवारीला गिझा पिरॅमिडस, मेम्फिस व सक्कारा साठी संपूर्ण दिवसाची प्रायव्हेट टूर मी व्हायेटर डॉट कॉम वरून आधीच बुक केलेली होती. ह्या माहितीच्या आधारे माझा कैरो व अलेक्झांड्रीया भटकंतीचा कार्यक्रम कसा असावा ह्या बद्दल काही उपयुक्त सूचना त्याने दिल्या.

रात्रीच्या प्रवासातलं जागरण आणि चांगलाच जाणवत असलेल्या जेट लॅग मुळे आज संध्याकाळ पर्यंत मी रूममध्ये आराम करावा आणि नंतर जवळपासच्या साईट सिईंग ला जावे ही सूचना तर मला फारच आवडली व त्याबरहुकूम मी फ्रेश होऊन आराम करण्यासाठी त्याचा निरोप घेऊन रूम मध्ये जायला निघणार तेवढ्यात नाईट शिफ्टला आलेल्या मेहमूदला रिलीव्ह करण्यासाठी येणाऱ्या, अहमद नावाच्या त्याच्या दुसऱ्या पार्टनरचं आगमन झालं. मग त्याच्याशी ओळख करून देण्यात आली, पुन्हा एकदा तो कोरा चहा आला. त्या पाठोपाठ ब्रेड, बटर, जाम, चीज, योगर्ट, उकडलेली अंडी आणि केळी असा तिघांसाठी नाश्ता आला. खानपान झाल्यावर अहमदचा निरोप घेऊन मेहमूद घरी जाण्यासाठी आणि मी माझ्या रुममध्ये जाण्यासाठी निघालो तेव्हा सकाळचे दहा वाजले होते. सव्वा आठ ते दहा हा पावणेदोन तासांचा वेळ कुठलाही परकेपणा न जाणवता कसा गेला समजलेच नाही.

तसं बघितलं तर रूम काही फार मोठी वगैरे नव्हती पण पांढऱ्या शुभ्र भिंती आणि बिछाना, पंधरा फुट उंचीवरच छत, त्यावरून लोंबकळत खाली येणारे दिवे, आठ फुट उंचीचा मुख्य दरवाजा, तेवढ्याच उंचीचे व तीन-तीन फुट रुंदीचे अखंड काचेचे बाल्कनीचे दरवाजे, त्यावरचे सुंदर दुहेरी मखमली पडदे, कोरीव काम केलेले नक्षीदार लाकडी रायटिंग टेबल, खुर्ची, डबलबेड, साईड टेबल आणि वॉर्डरोब ह्या सगळ्यामुळे तिला एक छान भव्य असा फील होता. हवेत चांगलाच गारवा असल्याने ए.सी. चालू करण्याची गरजच नव्हती.

अंघोळ वगैरे उरकून थोडावेळ व्हॉट्सॲप आणि फेसबुक वर टाईमपास करता करता निद्रादेवीच्या स्वाधीन झालो. चार वाजताचा अलार्म लावून ठेवला होता पण साडेतीनलाच जाग आली. अगदी ताजं-तवानं वाटत नसलं तरी जेट लॅग कमी झाल्यासारखं वाटत होतं. अरुणकुमार ची एक बॅग दिल्ली ते मुबई प्रवासात अदलाबदल झाल्याने त्यानी त्याची म्हणून आणलेली दुसऱ्याच कोणाची तरी बॅग ईजिप्त एअर च्या कार्यालयात जमा करण्यासाठी तो परत एअरपोर्टला जात असून तिथे किती वेळ लागेल ह्याचा काहीच अंदाज नसल्याने सकाळी ठरल्याप्रमाणे आज संध्याकाळी भेटणे शक्य होणार नसल्याचे कळवणारा मेसेज दुपारी तिन वाजता व्हॉट्सॲपवर आला होता. आता परत झोपण्यात काही अर्थ नव्ह्ता म्हणून मग तयार होऊन बाहेर रिसेप्शन मध्ये आलो. तिथे असलेल्या ‘मे’ नावाच्या रिसेप्शनीस्ट मुली कडून अहमद कॉमन रूम मध्ये असल्याचं समजलं, मग मोर्चा तिकडे वळवला.

कॉमन रूम हा मस्त प्रकार होता. एक १५ x १५ फुटाचा हॉल ज्यात २ सोफे आणि टी-पॉय, एका कोपऱ्यात मोठा एल.ई.डी. टीव्ही. हॉलला लागून उजव्या बाजूला आणखीन एक खोली, जिच्यात एक एल टाईप सोफा आणि मोठ्ठं डाइनिंग टेबल, आणि हॉलच्या समोरच्या बाजूला बाल्कनी, रूम्स मध्ये धुम्रपान करण्यास मनाई आहे त्यामुळे ह्या बाल्कनीचा उपयोग स्मोकिंग झोन म्हणून केला जायचा. इजिप्तला अमेरिका आणि युरोप मधून येणाऱ्या बॅकपॅकर्सचे प्रमाण मोठे असले तरी आता जगभरातून एकट्याने येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. अशा एकेकट्याने आलेल्या लोकांसाठी हि कॉमन रूम म्हणजे गप्पांची मैफिल जमवून आपापले अनुभव व माहिती शेअर करण्यासाठी फार छान जागा होती. नवीन लोकांशी ओळखी होतात, त्यातल्या काहीजणांशी निखळ मैत्री होते.

असो, तर अहमदला भेटायला गेलो तर तो तिथे एका चीनी दांपत्याला काहीतरी समजवायच्या प्रयत्नात पार मेटाकुटीला आलेला दिसला. ते दोघे काय म्हणत होते ह्याला समजत नव्हतं आणि हा काय म्हणतोय हे त्या दोघांना समजत नव्हतं. एकतर ईजिप्त मध्ये संवादासाठी चालणाऱ्या मुख्य भाषा दोन, पहिली अरेबिक आणि दुसरी इंग्लिश. तिसरी त्याखालोखाल (खूप अल्प प्रमाणात व तीही पर्यटन व्यवसायात असलेल्या लोकांशी बोलतानाच) वापरली जाणारी म्हणजे स्पॅनिश. त्या दाम्पत्याला ह्यापैकी कुठलीच भाषा येत नव्हती, आणि अहमदला चीनी येत नव्हती. शेवटी खाणा खुणांनी त्यांना थोडावेळ थांबा असे सांगून त्यानी त्याची सुटका करून घेतली, व माझ्याकडे आला.

मी त्याला सकाळी मेहमुदने सांगितल्या प्रमाणे लोकल साईट सिईंगला जात असून त्या आधी मला इजिप्शियन सिम कार्ड घ्यायचे असल्याचे सांगितले. मग त्याने मला जवळच असलेल्या व्होडाफोन स्टोर चा पत्ता सांगितला व कसे जायचे ह्याबद्दल मार्गदर्शन केले. नाईल नदीचा किनारा अगदी पाच मिनिटांच्या चालत जाण्याच्या अंतरावर असून तेहरीर चौक तर खालीच असल्याने ते परत येताना करावे आणि अल अजहर पार्क व खान अल खलीली बझार ह्या ठिकाणी जाण्यासाठी स्थानिक टॅक्सीने न जाता उबर बुक करायचा सल्ला दिला. तसेच अल अजहर पार्क हे ७० एकर क्षेत्रावर पसरलेले असून वरच्यावर पाहण्यासाठी कमीत कमी ३ तास आणि संपूर्ण बघण्यासाठी अख्खा दिवस लागत असल्याची माहितीही दिली. हे ऐकल्यावर माझा तिथे जाण्याचा उत्साह मावळला व कॅब मध्ये बसूनच जेवढा काही पार्कचा नजारा बघता येईल तेवढा बघून तसंच पुढे खान अल खलीली बझारात फेरफटका मारून मग नाईल किनारी जाऊन शेवटी तेहरीर चौकात भटकून परत हॉटेलवर येण्याचा कार्यक्रम ठरला. वाय-फाय वरच उबरचं ॲप इन्स्टॉल करून मग खाली उतरलो.

बाहेर पडून उजवीकडे वळल्यावर मुख्य रस्ता ओलांडल्यावर समोरच व्होडाफोन स्टोर होतं. तिथे जाऊन कुठल्याही कागदपत्रांशिवाय ५० पाउंडस चे सिम कार्ड आणि त्यावर १०० पाउंडस चा ३ जीबी डेटा आणि १० पाउंडस चा पंचवीस मिनिटे कॉलिंग साठीचा रिचार्ज अशी १६० पाउंडस ची खरेदी झाली. आपल्या भारतात मोबाईल डेटा खूपच स्वत असल्याची जाणीव झाली. तिथून निघालो तेव्हा पावणे पाच झाले होते, दुपारचे जेवण झाले नसल्यामुळे फार अशी नाही पण भूक लागली होती. मॅक डोनाल्डस चा बोर्ड लांबूनच दिसत होता मग आधी थोडीशी पोटपूजा करून तिथूनच उबर बुक करून पुढे जाण्याचा विचार पक्का झाला व अंमलातही आणला. नवीन सिम कार्ड चे उद्घाटन कॅब बुक करून झाले. ड्रायव्हर आफ्रिकन वंशाचा होता, अल अजहर पार्क पर्यंतचा प्रवास तसा जेमतेम चार किलोमीटरचा होता पण ज्या गोष्टीसाठी कैरो कुप्रसिद्ध आहे त्या ट्राफिक मुळे तेवढे अंतर कापायला अर्ध्यातासाहून जास्ती वेळ लागला. केवळ पर्यटकच नाही तर स्थानिक लोकही मोठ्या प्रमाणावर ह्या ठिकाणी सहकुटुंब येत असल्यामुळे गर्दी खूप होती.

सरकारी आकडेवारीनुसार कैरोची अधिकृत लोकसंख्या २ कोटिंच्या जवळपास असली तरी स्थानिकांच्या मते ती तीन कोटींपेक्षा अधिक आहे. खरं खोटं देवच जाणे. रस्त्यावरच्या माणसांच्या आणि वाहनांच्या गर्दीत कॅब मधेच थांबवून खाली उतरून प्रवेशद्वारा जवळ जाऊन पार्कची बाहेरुन टेहाळणी करणे अशक्य होते, म्हणून मी ड्रायव्हरला परत उलटे फिरून खान अल खलीली बझारच्या दिशेनी जाण्यास सांगितले. अर्थात येताना रस्त्याच्या उजव्या बाजूला आणि जाताना डाव्याबाजूला जेवढा भाग दिसला होता त्यावरून पार्कच्या भव्यतेचा अंदाज आला होता.

खान अल खलीली बझारच्या जवळ कॅब सोडून चालत निघालो. कुठून आलोय आणि कुठे चाललोय ह्याचा अजिबात थांगपत्ता न लागु देणाऱ्या असंख्य छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये दुतर्फा एकाला एक चिकटून दाटीवाटीने असलेली छोटी मोठी दुकाने बघून मुंबईचा चोर बाजारच आठवला. नव्या, जुन्या, लाकडी, काचेच्या, धातूच्या वस्तू, भांडी, अँटीक्स, कपडे, गालिचे, मसाल्याचे पदार्थ सोव्हेनिअर्स, अशा नानाविध वस्तू तेथे विक्रीसाठी होत्या. प्रत्येक दुकानदार त्याच्याकडे असलेल्या खास वस्तू बघण्यासाठी हाका मारत होता. एकतर माझा तो ट्रिपचा पहिलाच दिवस असल्याने मला कोणतीही खरेदी करून पुढच्या प्रवासात हमाली करण्यासाठी माझे सामान वाढवायचे नव्हते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे प्रत्येक वस्तूसाठी मग ती १० पाउंड ची असो कि १००० पाउंडस ची असो प्रचंड घासाघीस करावी लागते हि कल्पना मेहमूद आणि अहमद दोघांनी दिलेली होती आणि त्या कलेत मी अगदीच कच्चा लिंबू असल्याने काहीही विकत न घेता उगाच इकडून तिकडे अर्धा-पाउण तास भटकंती केली. त्या सगळ्या दुकानांमध्ये शिशा (हुक्का पार्लर) आणि कॉफी शॉप्सचीही रेलचेल होती. त्यापैकीच एका कॉफी शॉप मध्ये शिरून अफलातून म्हणता येईल अशी टर्किश कॉफी प्यायली आणि मुख्य रस्त्यावर येऊन पुन्हा उबर बुक केली आणि परतीच्या प्रवासाला लागलो.

जाताना अल अजहर पार्क पर्यंत जाऊन परत आल्यामुळे (आणि ट्राफिक लागल्यामुळे) कॅबचं बिल ४८ पाउंडस झालं होतं तर येताना ३० पाउंडस झालं. माझ्या हॉटेल पासून जवळच नाईलला समांतर असलेल्या प्रचंड रहदारीच्या हमरस्त्यावर कॅब सोडून प्रशस्त फुटपाथ वरून माझी पदयात्रा सुरु झाली. संध्याकाळी साडेसातचा सुमार होता, नदीच्या दोन्ही किनाऱ्यावरच्या उंच उंच निवासी ईमारती, व्यापारी संकुले, हॉटेल्स, ग्लोसाईन्स व स्ट्रीट लाईटस मुळे आसमंत रंगीबेरंगी प्रकाशाने उजळून निघाला होता. थंड वाऱ्याच्या झुळूकांमुळे वातावरणही आल्हाददायक होते. फुटपाथच्या कडेला अनेक ठिकाणी किनाऱ्यावर उतरण्यासाठी पायऱ्या होत्या. त्या उतरून खाली गेलं कि तिथे बसण्यासाठी बेंचेस होते. चहा, कॉफी, ज्यूस, मक्याची कणसे विकणाऱ्यांचे स्टॉल्स होते. स्थानिक तरुण-तरुणींचे ग्रुप्स, प्रेमी युगुले, जेष्ठ नागरिक, पर्यटकांच्या गर्दीने तो पार्क सारखे स्वरूप दिलेला नाईलचा किनारा फुलून गेला होता. एक रिकामा बेंच बघून त्यावर निवांत बसलो. नदीमध्ये फेऱ्या मारणाऱ्या रोषणाई केलेल्या यॉटस, छोट्या बोटी, पलीकडच्या किनाऱ्यावर दिसणारा कैरो टॉवर, डाव्या व उजव्या बाजूस नदी पार करण्यासाठी बांधलेल्या पुलांवरून जाणारी वाहने बघण्यात मजा येत होती. मधेच एखादे पर्यटक जोडपे त्यांच्या फोन किंवा कॅमेराने त्यांचा फोटो काढण्याची विनंती करत होते, ह्या सगळ्या मध्ये छान वेळ जात होता. शेवटी फेरीवाले फारच त्रास द्यायला लागल्यावर नाईलाजाने तिथून उठलो, आणि तेहरीर चौकाच्या दिशेनी निघालो.

नाईल नदी किनारा-कैरो.

नाईल नदी किनारा-कैरो १

नाईल नदी किनारा-कैरो २

नाईल नदी किनारा-कैरो ३

अठराव्या शतकात ईस्माईलिया चौक (Ismailia Square) नावाने ओळखला जाणाऱ्या ह्या चौकाला १९१९ मध्ये ब्रिटीश राजवटीविरोधात झालेल्या क्रांतीनंतर १९२२ साली अंशिक स्वातंत्र्य मिळाल्यावर स्थानिकांकडून तेहरीर चौक (अरबी भाषेतील तेहरीर शब्दाचा अर्थ ‘मुक्ती’ असा आहे.) म्हणून संबोधण्यात येऊ लागले असले तरी त्याचे अधिकृत नामांतरण १९५२ साली पुन्हा झालेल्या क्रांतीनंतर करण्यात आले. २०११ च्या क्रांती मुळे परत एकदा जगभराच्या माध्यमांतून चर्चेचा विषय झालेला, कैरो शहराच्या विविध भागांना जोडणाऱ्या महत्वाच्या रस्त्यांचे केंद्रबिंदू असलेला भला मोठा असा हा तेहरीर चौक (Tahrir Square) तत्कालीन राजवटिंनी आंदोलन दडपण्यासाठी केलेल्या अमानुष उपाययोजनांमध्ये अनेकांना हौतात्म्य प्राप्त झाल्यामुळे Martyr Square (हुतात्मा चौक) म्हणूनही ओळखला जातो. ह्या चौकात मध्यभागी ध्वजस्तंभ असून खूप मोठे ट्राफिक आयलंड (वाहतूक बेट) आहे. चहूबाजूंनी ईजिप्शियन अँटीक्विटी म्युझीयम, राष्ट्र-नायक ओमर मकरम यांचा पुतळा, ओमर मकरम मशीद, सदात मेट्रो स्टेशन, अरब लीग चे मुख्यालय, मोगामा हे सरकारी कार्यालयांचे संकुल, नाईल हॉटेल, इव्हान्जेलीकल चर्च, अमेरिकन युनिव्हर्सिटी, पंच तारांकित हॉटेल्स अशा अनेक महत्वाच्या वास्तू आहेत. ईजिप्त मध्ये झालेल्या अनेक आंदोलने, निदर्शने व मोर्चे ह्यांचे ते माहेरघरच आहे असं म्हंटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. अशा ह्या ऐतिहासिक परिसरात १०-१५ मिनिटे फिरून नऊ वाजता मी शेजारीच असलेल्या माझ्या हॉटेलवर परत आलो.

तेहरीर चौक-कैरो.
(तेहरीर चौक)

तेहरीर चौक १-कैरो.

रूमवर जायच्या आधी कॉमन रूम मध्ये डोकावलो तर तिथे अहमद आणि एक युरोपियन तरुण बोलत बसले होते. मग अहमदने माझ्या साईट सीईंग बद्दल चौकशी करून ‘रुई’ नावाच्या त्या पोर्तुगीज तरुणाशी माझी ओळख करून दिली. अर्ध्याहून अधिक जग फिरलेला, तीन वर्षांचा आर्मी मधला बॉंड कम्प्लीट केलेला हा रुई म्हणजे एक वल्लीच होता. त्याच्या १५ दिवसांच्या ईजिप्त भेटीचा आज शेवटचा दिवस होता, मध्यरात्रीच्या फ्लाईटने तो मायदेशी परतणार होता. ह्या हॉटेल मध्ये फक्त ब्रेकफास्ट आणि चहा, कॉफी, शीत पेये मिळत असून जेवण एकतर बाहेरून करून यावे लागते किंवा पार्सल मागवावे लागते ह्याची कल्पना मला आधीच देण्यात आलेली होती. मी आत्ता परत येताना भूक नसल्याने जेवून आलो नव्हतो त्यामुळे काय पार्सल मागवता येईल ह्याची अहमद कडे विचारणा केली असता त्याने रिसेप्शन काउंटर वरून २०-२५ रेस्टॉरंटस ची मेनूकार्ड असलेली फाईल आणून माझ्या हातात दिली. त्यातली अर्ध्याच्या वर अरेबिक भाषेतली होती. KFC, Dominos आणि McDonalds पैकी आत्तातरी काही खाण्याची माझी इच्छा नव्हती, म्हणून सँडविच चे प्रकार बघत असता फलाफेल सँडविच हे नाव दिसले. ह्या प्रकाराबद्दल आधी केलेल्या संशोधनात बरच चांगलं काहीतरी वाचलेले आठवले, म्हणून तेच २ मागवायचे नक्की केले आणि तसे अहमदला सांगितले, रुई नी पण त्याच्या साठी १ फलाफेल सँडविच आणि १ फ्राईड पोटॅटो सँडविच मागवायला सांगितले, आज मेहमूद रात्री उशिराने येणार असल्याने अहमदला तो येईपर्यंत थांबायचे होते, मग घरी पोचून जेवायला उशीर होणार असल्याने त्याच्यासाठी पण १ फलाफेल सँडविच अशी आमची एकत्रित ऑर्डर तयार झाली आणि अहमद त्यासाठी फोन करणार तेवढ्यात संध्याकाळी ७ च्या सुमारास चेक इन केलेली ‘जिल’ नावाची अमेरिकन तरुणी तिथे हजर झाली. तिची पण काही पार्सल ची ऑर्डर आहे का असे विचारल्यावर तिने काय मागावताय हे विचारून तिच्यासाठी २ फलाफेल सँडविच सांगितली. त्याप्रमाणे अहमदनी ऑर्डर दिली आणि अर्ध्यातासाने डिलेव्हरी मिळेल अशी घोषणा केली. जिल ३ दिवसांपूर्वी ईजिप्त मध्ये दाखल झाली होती, पण ती आधीच्या २ रात्री अलेक्झांड्रीया मध्ये वास्तव्य करून आज संध्याकाळी कैरोला आली होती. त्यानंतर रुई चे ईजिप्त आणि बाकीच्या देशांमधले किस्से ऐकायला खूप मजा आली, पार्सल येऊन १५ -२० मिनिटे झाली होती पण कोणालाच रूम मध्ये जायची इच्छा होत नव्हती एवढ्या छान गप्पा रंगल्या होत्या.
कॉमन रूम

(वरील फोटो मध्ये पहिला मी, माझ्या शेजारी रुई, शेजारच्या सोफ्यावर उजवीकडे जिल, आणि तिच्या शेजारी अहमद.)



माझा दुसऱ्या दिवशी सकाळी ८ ला पिक-अप होता त्यामुळे शेवटी अनिच्छेनेच १०:३० वाजता मी तिथून उठलो, रुई ला त्याच्या प्रवासासाठी शुभेच्छा देऊन सगळ्यांचा निरोप घेऊन मी रूम मध्ये आलो. फ्रेश होऊन सँडविचेस खाल्ली आणि सकाळी ७:०० चा अलार्म लाऊन बेडवर आडवा झालो तर अरुण्कुमारचा व्हॉट्सॲप कॉल आला, ते बॅगचं प्रकरण निस्तरताना त्याचा दिवस खूप दगदगीचा गेला होता. त्यानी पण व्होडाफोनचं सिम कार्ड घेतलं होतं मग दोघांच्या नंबर्स ची देवाण घेवाण झाल्यावर उद्या त्याच्या क्लायंट व्हिजीटस आणि माझी गिझा टूर झाल्यावर संध्याकाळी भेटण्याचे ठरले आणि कॉल संपला.

फलाफेल सँडविच
(फलाफेल सँडविच)

फलाफेल सँडविच १
(फलाफेल सँडविच उघडल्यावर असे दिसत होते.)



आत्तापर्यंत फोटो, सिनेमा, व्हिडीओ मधेच पाहिलेल्या आणि उद्या याची देही याची डोळा प्रत्यक्षात बघायला मिळणार असलेल्या त्या जागतिक आश्चर्याच्या भव्यते विषयीच्या कल्पना करता करता झोपी गेलो.



क्रमश:


संजय भावे
(उर्फ ‘टर्मीनेटर’)

पुढील भाग: इजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ३

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

5 Jun 2018 - 10:12 pm | यशोधरा

वाचते आहे..

टर्मीनेटर's picture

5 Jun 2018 - 10:55 pm | टर्मीनेटर

_/\_

राघवेंद्र's picture

5 Jun 2018 - 11:45 pm | राघवेंद्र

मस्त चालू आहे ट्रीप.

फलाफल कुठे आहे ? रिकामा पिटा ब्रेड दिसत आहे ?

टर्मीनेटर's picture

6 Jun 2018 - 8:49 am | टर्मीनेटर

धन्यवाद राघवेंद्रजी. वास्तविक त्यावेळी हे फोटो मी आमच्या कुटुंबाला मी काय खातोय ह्याची असलेली उत्सुकता शमवण्यासाठी काढले होते, त्यांचा लेखा साठी वापर होईल हि कल्पनाच तेव्हा नव्हती. इथे त्यांचा वापर केवळ सूचक प्रतिमा म्हणून केला आहे. ही गोष्ट खरी आहे कि मी आतलं सलाड थोडं बाजूला करून फलाफेल दिसेल अशा पद्धतीने फोटो काढायला पाहिजे होता हे आता लक्षात येतंय. आणि हो, एक महत्वाचं, हा खाद्यप्रकार ईजिप्त मधील संपूर्ण वास्तव्य काळात माझ्या रोजच्या आहारातला अविभाज्य घटक होईल ही देखील कल्पना नव्हती.

टवाळ कार्टा's picture

6 Jun 2018 - 1:59 am | टवाळ कार्टा

जळजळ होतेय वाचून

टर्मीनेटर's picture

6 Jun 2018 - 8:51 am | टर्मीनेटर

_/\_ :-)

छान चालली आहे सफर आणि तुम्ही लिहिताय देखील खूप सुंदर.

मात्र सॅन्डविचमध्ये फलाफेल दिसत नाहीय्ये हे खरं.

टर्मीनेटर's picture

6 Jun 2018 - 8:54 am | टर्मीनेटर

धन्यवाद चामुंडरायजी.
सॅन्डविचमध्ये फलाफेल दिसत नसल्याबद्दलचा खुलासा वर राघवेंद्रजींना दिलेल्या प्रतिसादात केला आहे.

अरे वा! लेखन प्रकार आवडला. फोटो आवडले.

टर्मीनेटर's picture

6 Jun 2018 - 10:31 am | टर्मीनेटर

धन्यवाद कंजूसजी.

लोनली प्लॅनेट's picture

6 Jun 2018 - 10:41 am | लोनली प्लॅनेट

wow... माझं पण लहानपणीचं स्वप्न आहे इजिप्त पाहायचं, तुम्ही खूप मस्त लिहित आहात,फोटो भरपूर टाका

टर्मीनेटर's picture

6 Jun 2018 - 11:11 am | टर्मीनेटर

धन्यवाद लोनली प्लॅनेट. तुमचं ईजिप्त पाहण्याचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होवो हि सदिच्छा..._/\_

अनिंद्य's picture

6 Jun 2018 - 11:13 am | अनिंद्य

@ टर्मीनेटर,

अब चल पडे हो सफर पे. सफर मुबारक, नये दोस्त मुबारक !

एक शंका : इजिप्त एयरने उंची मद्य का दिले नाही ? रमादानचा संबंध असावा का ? नुकतेच मला कतार विमानतळावर (स्वखर्चाने मागितलेली) बियर विनम्रपणे नाकारण्यात आली, रोजा ची अवधी संपायला अवकाश होता म्हणून असावे. पुढे विमानात बसल्यावर मात्र मद्याची रेलचेल होती :-)

पु भा प्र

टर्मीनेटर's picture

6 Jun 2018 - 12:10 pm | टर्मीनेटर

शुकरान...
मी ज्या कालावधी मध्ये गेलो तेव्हा रमादान सुरु नव्हता. तरी सुद्धा अल्कोहोल विनामुल्य किंवा स्वखार्चानेही दिले जात नव्हते.

अनिंद्य's picture

6 Jun 2018 - 12:24 pm | अनिंद्य

रमादान सुरु नव्हता. तरी सुद्धा अल्कोहोल दिले जात नव्हते.

पॉईंट टु बी नोटेड अबाउट इजिप्त एयर - बाय दोज लाईक मी हू लव टु फ्लाय विथ देयर चिल्ड बियर अँड ऑकेजनली सम रेड वाईन :-)

टर्मीनेटर's picture

6 Jun 2018 - 12:51 pm | टर्मीनेटर

According to one of Egyptair cabin crew, you can carry your own alcohol and drink it on board.
पण ह्या त्याच्या सांगण्याला कुठलीही अधिकृत पुष्टी मिळाली नाहीये.

वरुण मोहिते's picture

6 Jun 2018 - 12:39 pm | वरुण मोहिते

छान चालू आहे सफर.

टर्मीनेटर's picture

6 Jun 2018 - 12:46 pm | टर्मीनेटर

धन्यवाद वरुण मोहितेजी.

मार्गी's picture

6 Jun 2018 - 1:24 pm | मार्गी

मस्त वर्णन व लेखन आहे! वाचतोय! बाय द वे तुम्ही टर्मीनेटर आहात पण कितवे? पहिले, दुसरे... का पाचवे? :) :) मी सर्वच टर्मीनेटरांचा भक्त आहे! कधी काळी जॉन कॉनर असल्याच्याही भ्रमात होतो! :) :) :) ट्रस्ट मी!

टर्मीनेटर's picture

6 Jun 2018 - 2:05 pm | टर्मीनेटर

धन्यवाद मार्गीजी.
काही नाही हो, जेव्हा मिपा साठी सदस्य नोंदणी करत होतो तेव्हा टीव्हीवर कुठल्या तरी चॅनेल वर टर्मीनेटर चालू होता... आधी अनेक वर्षे मिपाचा केवळ वाचक होतो, त्यामुळे इथल्या सदस्यनामांचे वेगळेपण आवडले होते. म्हणून मी 'टर्मीनेटर' हे सदस्यनाम घेतले. :-)

प्रचेतस's picture

6 Jun 2018 - 3:38 pm | प्रचेतस

खूप खूप मस्त.
पुभाप्र.

टर्मीनेटर's picture

6 Jun 2018 - 6:18 pm | टर्मीनेटर

धन्यवाद प्रचेतसजी.

पिलीयन रायडर's picture

6 Jun 2018 - 6:37 pm | पिलीयन रायडर

केव्हा पासून फलाफल खावं वाटतंय आणि तुम्ही फोटो टाकताय!! पुण्यात कुठे शोधू आता?? टेल टेल!

माझाही आवडता प्रकार आहे अत्यंत!

सफर मस्त चालू आहे.

मारकेश-ओपन फेस आणि विथ पिटा ब्रेड दोन्ही प्रकारे मिळतं.

टर्मीनेटर's picture

6 Jun 2018 - 7:13 pm | टर्मीनेटर

पुण्यात आहे का हे हॉटेल?

प्रचेतस's picture

6 Jun 2018 - 7:42 pm | प्रचेतस

हो, कल्याणीनगर, फर्ग्युसन कॉलेज रोड, पिंपळे गुरव, चिंचवड सगळीकडे शाखा आहेत.

पिलीयन रायडर's picture

6 Jun 2018 - 8:58 pm | पिलीयन रायडर

चिंचवड??? चिंचवड???!!!

भगवान है!!

टर्मीनेटर's picture

6 Jun 2018 - 9:26 pm | टर्मीनेटर

कधी आलो पुण्यात तर ह्या ठिकाणाला अवश्य भेट देणार...

टर्मीनेटर's picture

6 Jun 2018 - 7:12 pm | टर्मीनेटर

धन्यवाद पिलीयन रायडरजी.
पुण्यात कुठे मिळेल ह्याची खरच काही कल्पना नाही हो. नेट वर रेसीपी उपलब्ध आहेत, बहुतेक तुम्हाला घरीच बनवून खावी लागतील. :)

चौकटराजा's picture

6 Jun 2018 - 8:20 pm | चौकटराजा

" जसे घडले " तशी माझ्या सारखीच शैली आपली लिहिण्याची .त्यामुळे मजा आली वाचताना . ही प्रवास वर्णन शैली नसून हिला आपण " ब्लॉग" म्हणू या ! यातील वेळ, अंतरे , पैसे , सोयी, माणसे ई गोष्टी मला तेथील तपशील वार इतिहासापेक्षा आवश्यक वाटतात . पुलेशू ! धन्यवाद !

टर्मीनेटर's picture

6 Jun 2018 - 8:42 pm | टर्मीनेटर

धन्यवाद चौकटराजा. अगदी खरं आहे, पहिल्या भागावर दिलेल्या प्रतिसादांमध्ये मिपाकरांनी डिटेलिंग ची केलेली अपेक्षा पूर्ण करायचा प्रयत्न केला.

सुबोध खरे's picture

7 Jun 2018 - 7:51 pm | सुबोध खरे

यातील वेळ, अंतरे , पैसे , सोयी, माणसे ई गोष्टी मला तेथील तपशील वार इतिहासापेक्षा आवश्यक वाटतात .

असेच म्हणतो

कारण पर्यटन स्थळात काय चांगलं आहे तेथिल इतिहास काय आहे ते जालावर सहज मिळू शकतं. पण प्रत्यक्ष तुम्हाला काय अनुभव आले हे तेथे जाणाऱ्या माणसाला जास्त उपयुक्त ठरतात.

पुलेशू ! धन्यवाद !

टर्मीनेटर's picture

7 Jun 2018 - 7:57 pm | टर्मीनेटर

खरं आहे सुबोधजी. धन्यवाद.

Nitin Palkar's picture

6 Jun 2018 - 8:46 pm | Nitin Palkar

खूपच छान लिहिताय. खूप आवडलं. पुलेशु. पुभाप्र.

टर्मीनेटर's picture

6 Jun 2018 - 8:48 pm | टर्मीनेटर

धन्यवाद नितीनजी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Jun 2018 - 10:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं वर्णन आणि फोटो ! आम्हीही फिरत आहोत तुमच्याबरोबर, तेव्हा असेच तुमच्या डोळ्यातून आमच्या डोळ्यांना दिसेल असे लिहा !

पुभाप्र.

टर्मीनेटर's picture

6 Jun 2018 - 10:45 pm | टर्मीनेटर

दुहेरी धन्यवाद डॉक्टर... एक प्रतिसादासाठी आणि दुसरा: काल काही केल्या फोटो दिसतंच नव्हते. आणि मिपा च्या मदत पानावर कुठल्याही दुव्यावर क्लिक केली तरी होम पेजच उघडत होते, म्हणून गुगल वर डायरेक्ट ह्या समस्येबद्दल सर्च केला तर तुमचाच ह्या विषयीचा धागा रिझल्ट मध्ये आला, त्या प्रमाणे केल्यावर फोटो दिसायला लागले, ह्या साठी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Jun 2018 - 11:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरे वा ! त्यासाठी धन्यवादांची गरज नाही. उलट तो धागा तुम्हाला उपयोगी ठरला हे वाचून आनंद झाला !

टर्मीनेटर's picture

7 Jun 2018 - 10:45 pm | टर्मीनेटर

_/\_ :-)

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Jun 2018 - 11:13 am | बिपिन कार्यकर्ते

या हबिबी! मुमताझ!

टर्मीनेटर's picture

7 Jun 2018 - 6:32 pm | टर्मीनेटर

शुकरान हबिबी...

दुर्गविहारी's picture

7 Jun 2018 - 1:39 pm | दुर्गविहारी

मस्तच लिहीताय. मजा आली वाचून. आवडला हा भाग. पु.भा.प्र.

टर्मीनेटर's picture

7 Jun 2018 - 6:33 pm | टर्मीनेटर

धन्यवाद दुर्गविहारीजी.

रंगीला रतन's picture

8 Jun 2018 - 12:29 pm | रंगीला रतन

जबरदस्त! पुढचे भाग लवकर येउद्यात.

टर्मीनेटर's picture

19 Jun 2018 - 1:50 pm | टर्मीनेटर

धन्यवाद रंगीला रतनजी.

एक_वात्रट's picture

22 Jun 2018 - 6:03 pm | एक_वात्रट

आपली लिखाणशैली अतिशय सुंदर आहे. वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे हॉटेल्स, पहावयाच्या जागा, विमानफे-या ही सगळी माहिती नेटावर सगळीकडे मिळतेच. वाचकाला रस असतो ते प्रवास करताना जे लोक आपल्याला भेटले आणि जे अनुभव आपण घेतले ते वाचण्यातच.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

टर्मीनेटर's picture

22 Jun 2018 - 7:00 pm | टर्मीनेटर

धन्यवाद एक_वात्रट.