तंदुरुस्त की नादुरुस्त ? : भाग ४

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
18 Mar 2018 - 5:54 am

(आरोग्यरक्षण आणि चाळणी चाचण्या)

भाग ४ : (वयोगट १९-४९) : संसारामधी ऐस आपुला......

या भागात दोन उपविभाग पडतील – वय १९-२९ आणि ३०-४९. यांमध्ये सुचविलेली प्रत्येक चाचणी सर्वांसाठी करण्याची गरज नसते. गरजेनुसार अधिक जोखीम असलेल्या लोकांमध्ये संबंधित चाचणी केली जाते. प्रथम या दोन्ही उपविभागांना समान असणाऱ्या चाचण्यांची माहिती घेऊ.
खालील ४ आजारांसाठी चाचण्यांची शिफारस केली जाते. त्यापैकी पहिल्या २ अर्थातच स्त्रियांसाठी आहेत:

१. स्तनांचा कर्करोग
२. गर्भाशयाच्या cervix चा कर्करोग
३. उच्च कोलेस्टेरॉल पातळी आणि
४. HIV संसर्ग

स्तनांच्या कर्करोगाच्या चाचण्या:

१. स्त्रियांनी त्यांच्या विशीत असताना स्वतःच त्यांच्या स्तनांची तपासणी घरी नियमित करावी. त्यामध्ये पुढील गोष्टींकडे लक्ष द्यावे – तेथील त्वचेवर खळ व सुरकुती पडणे, फुगवटा येणे, एखादा भाग लाल होणे इ. काही संकेतस्थळांवर हा विषय सचित्र समजावून सांगितलेला आहे.
२. दर ३ वर्षांतून एकदा अशीच तपासणी योग्य त्या डॉक्टरकडून करून घ्यावी.

३. चाळीशीच्या पुढे वर्षातून एकदा mammography ही क्ष-किरणतंत्र चाचणी करावी. आता ही सर्वांसाठी का फक्त जोखीम असणाऱ्यांसाठी यावर तसे एकमत नाही.

४. आता या रोगाची अधिक जोखीम असणाऱ्या स्त्रिया अशा आहेत:
अ) आई किंवा बहिणींना स्तनांचा किंवा अंडाशयाचा कर्करोग असणे आणि त्यांच्यात संबंधित जनुकीय बिघाड असणे.
आ) लठ्ठपणा
इ) स्वतःची मासिक पाळी वयाच्या १३ व्या वर्षाआधी सुरु होणे
ई) स्तन दाट (dense) असणे
उ) अतिरिक्त मद्यपान
ऊ) १० ते ३० या वयात छातीची क्ष-किरण तपासणी बऱ्याचदा होणे.
ऋ) नेहमी रात्रपाळीत काम करणाऱ्या स्त्रिया

५. आता वरीलपैकी कोणताही मुद्दा लागू असल्यास डॉ च्या सल्ल्याने जनुकीय चाचण्यांची शिफारस केली जाते. ती चाचणी रक्त वा थुंकीवर करता येते. त्यात BRCA1 or BRCA2 या जनुकांमध्ये बिघाड (mutation) आहे की नाही ते पाहतात.

Cervix च्या कर्करोगाच्या चाचण्या:
या रोगाची वाढ खूप हळू असते. येथे चाळणी चाचण्यांचे महत्व खूप आहे. त्यामुळे कर्करोगाच्या पूर्वस्थितीतच त्याचे निदान शक्य होते. अशा स्थितीत त्यावर प्रभावी उपचार करता येतात. चाचणीच्या शिफारशी अशा आहेत:

१. २१-२९ या वयांत Pap Smear चाचणी दर ३ वर्षांतून एकदा करावी. यासाठी Cervix च्या भागात विशिष्ट ब्रशच्या सहाय्याने हलकेच स्त्राव घेतला जातो आणि मग त्यातील पेशींचे प्रयोगशाळेत निरीक्षण करतात.

२. या रोगाची अधिक जोखीम असणाऱ्या स्त्रिया अशा:
अ) HPV या विषाणूंचा संसर्ग होणे. हा संसर्ग लैंगिक संबंधातून होतो.
आ) लैंगिक संबंध लवकरच्या वयात चालू करणाऱ्या स्त्रिया
इ) अनेक जोडीदारांशी लैंगिक संबंध ठेवणाऱ्या
ई) एड्स-बाधित आणि
उ) धूम्रपान करणाऱ्या.

अशा स्त्रियांसाठी Pap चाचणी दरवर्षी सुचवण्यात येते.

३. जेव्हा Pap चाचणीचे निष्कर्ष ‘नॉर्मल’ पेक्षा वेगळे असतात तेव्हा HPV DNA test ही पुढची चाचणी करण्यात येते. या विषाणूच्या अनेक प्रजाती असून त्यातील काहींमुळे हा कर्करोग होतो.

• उच्च कोलेस्टेरॉल पातळी आणि HIV संसर्ग याबद्दलच्या चाचण्यांचे विवेचन या लेखमालेच्या तिसऱ्या भागात आलेले आहे. आता रक्तातील एकूण सर्व मेद-पदार्थांचा अंदाज घ्यावा. त्या चाचणीला Lipid Profile म्हणतात. त्यात एकूण कोलेस्टेरॉल व त्याचे LDL-c, व HDL-c हे दोन प्रकार आणि TG यांचा समावेश असतो.
या विषयाचे अधिक विवेचन माझ्या ‘कोलेस्टेरॉल’ वरील लेखात (https://www.misalpav.com/node/41421) वाचता येईल.

• ३०-४९ या वयोगटासाठी लठ्ठपणाच्या चाचणीची शिफारस केलेली आहे. बऱ्याच लोकांचे बाबतीत तारुण्यात वजन योग्य असते पण चाळीशीच्या आसपास ते अतिरीक्त होऊ लागते. अशांनी आता नियमित वजन करून स्वतःच्या BMI वर लक्ष ठेवणे हितावह असते. याचबरोबर वर्षातून एकदा रक्तदाब बघणे हेही फायद्याचे असते.
लठ्ठपणा, उच्च कोलेस्टेरॉल, मधुमेह, उच्चरक्तदाब आणि करोनरी हृदयविकार हे सर्व एकत्र नांदणारे आजार आहेत याची दखल घेतली पाहिजे.

• चाळीशी ओलांडलेल्या स्त्रिया जर अनिश्चित(non-specific) स्वरूपाच्या तक्रारी घेऊन डॉक्टरकडे वारंवार जात असतील तर त्यांची थायरॉइडची TSH चाचणी करणे हितावह असते.
** ** **

पुढील वयोगटाकडे जाण्यापूर्वी मला दोन मूलभूत चाळणी चाचण्यांबद्द्ल लिहावे वाटते. या दोन्ही तशा ‘वयोगट-विरहीत’ आहेत. जेव्हा आपल्याला एखाद्या कारणास्तव शारीरिक तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र सादर करायचे असते तेव्हा या कराव्या लागतात. त्या अशा आहेत:

१. Hemogram: यामध्ये रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी, लाल व पांढऱ्या पेशींची संख्या आणि संबंधित माहिती मिळते.

२. लघवीची सामान्य (Routine) तपासणी: यात लघवीत ग्लुकोज, प्रथिन, स्फटिकासारखे पदार्थ आणि जंतूसंसर्ग दर्शवणारे दोष आहेत का ते पहिले जाते.

शारीरिक तपासणी बरोबर या दोन्हीचे रिपोर्ट्स व्यवस्थित असतील तर ‘साधारणपणे व्यक्ती तंदुरुस्त आहे’ असा शेरा देता येतो. पण त्यात काही दोष निघाल्यास पुढील चाचण्या करण्याची दिशा मिळते.

या चाचण्यांची गरज प्रामुख्याने खालील प्रसंगी असते:
१. एखाद्याला संस्थेत नोकरीत रुजू करून घेण्यापूर्वी
२. खेळाडू आणि गिर्यारोहक जेव्हा मोठ्या स्पर्धा/ मोहिमांवर निघतात तेव्हा
३. काही ‘जीवन विमापत्र’ (policy) इ. काढताना आणि
४. कोणत्याही शस्त्रक्रियेपूर्वी.

सध्या बऱ्याच संस्थांमध्ये नोकरीत रुजू करून घेण्यापूर्वी वरील चाचण्यांव्यतिरिक्त ग्लुकोज-पातळीचाही आग्रह धरला जातो. ************************************
(क्रमशः)

जीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

18 Mar 2018 - 8:10 am | कुमार१
डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Mar 2018 - 11:10 am | डॉ सुहास म्हात्रे

सर्वसामान्यांना समजेल अश्या सरळ सोप्या भाषेत उपयोगी माहितीने भरलेली मालिका ! वाचनखूण ठेवल्यास ही मालिका ठेवल्यास आरोग्यासंबंधी महत्वाचा निर्णय घेण्यासाठीचा संदर्भ म्हणून खूप फायदेशीर होईल.

कुमार१'s picture

18 Mar 2018 - 12:33 pm | कुमार१

जर लेखांत काही उणीव राहत असेल तर तुम्ही जरूर भर घाला ही वि.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Mar 2018 - 9:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

किचकट विषयांवर ऊत्तम, विचारपूर्वक आणि आभ्यासूपणे लिहित आहात. त्यामुळे, त्यात भर घालण्याची संधी, कधीमधी आलीच तर, फार कमी असणार आहे. असेच लिखाण चालू ठेवा.

कुमार१'s picture

19 Mar 2018 - 10:41 am | कुमार१

प्रोत्साहनाबद्दल आभारी आहे !

नेहमीप्रमाणेच अप्रतिम लेखमाला. इतके दिवस वाचनमात्र होते, तुमच्या लेखांनी मिपा संन्यास सोडायला लावला.

एक शंका बरेच दिवस मनात होती, सध्या मासिकपाळी मध्ये पॅड किंवा कापडाऐवजी मेन्स्ट्रुल सिलिकॉन कप (menstrual cup) वापरण्यावर बराच जोर दिला जात आहे. याचे फायदे खूप आहेत, आणि मी तोटे शोधायचा प्रयत्न केला पण काहीच सापडले नाही. या कपचा आणि सर्विक्स कॅन्सरचा (किंवा इतरही मूत्रविकारांचा) काही संबंध असू शकतो का?

अनेक आभार!

कुमार१'s picture

19 Mar 2018 - 12:15 pm | कुमार१

मिपा संन्यास सोडायला लावला. >>>> छान, स्वागत आहे !
'त्या' कप बद्दल मला माहित नाही. बघूया प्रयत्न करून.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Mar 2018 - 1:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

इथली माहिती तुम्हाला उपयोगी पडू शकेल. या लेखाची संदर्भसूची पाहता माहिती विश्वासू आहे असे दिसते. (मी संदर्भ मुळातून वाचले नाहीत.)

कोमल's picture

19 Mar 2018 - 3:03 pm | कोमल

धन्यवाद एक्काकाका.
खरं तर इंटरनेटवर उपलब्ध असलेली बरीच माहिती वाचून, पाहून झाली आहे. आणि त्यात सगळीकडे हा पर्याय सगळ्यात सुरक्षित असल्याचाच उल्लेख आहे.
मध्यंतरी असं ऐकलं होतं की चेपुवर कुठल्याश्या "वैद्यां"नी लिहीले होतं की हे घातक आहे वगैरे.
मी प्रत्यक्ष तो लेख वाचला नव्ह्ता, त्यामुळे तिथला मुद्दा काय हे कळाले नव्हते.

बाकी या मुद्द्याचा स्वतंत्र धागाच होऊ शकतो म्हणा..

कुमार१'s picture

19 Mar 2018 - 3:51 pm | कुमार१

एक्काकाका.>>>> हा उल्लेख म्हणजे जुन्या आठवणींना उजाळा म्हणायचे ☺

अनिंद्य's picture

19 Mar 2018 - 12:05 pm | अनिंद्य

सरळ सोपी मांडणी आवडली.

ह्या भागात महिलागणांच्या चाचण्यांवर जास्त भर असल्याने आता या वयोगटातील पुरुषांबद्दल येणाऱ्या लेखाची प्रतीक्षा.

पु भा प्र.

अनिंद्य

अनिंद्य's picture

19 Mar 2018 - 12:05 pm | अनिंद्य

एक प्रश्न :- मोनोपॉझ संबंधित कटकटींसाठी काही ठराविक चाचण्या असतात का?

कुमार१'s picture

19 Mar 2018 - 12:20 pm | कुमार१

मेनोपॉज >>≥> सहसा चाचण्या नाहीत. काही वेळेस मेनोपॉज ची खात्री करण्यासाठी विशिष्ट हॉर्मोनस मोजतात.

निशाचर's picture

20 Mar 2018 - 6:29 am | निशाचर

लेखमालेतील हा भागही माहितीपूर्ण झाला आहे. वरच्या काही प्रतिसादांत म्हटल्याप्रमाणे साध्यासोप्या भाषेत वैद्यकीय माहिती देण्यासाठी आभार! एक सूचना करावीशी वाटते. लेखाच्या शीर्षकात लेख कोणत्या वयोगटाशी तसेच स्त्रिया अथवा पुरुषांशी संबंधित आहे हे लिहिल्यास संदर्भासाठी उपयोग होईल.

या वयोगटातील स्त्रियांच्या आरोग्याबाबत अनेकदा अनास्था किंवा माहितीचा अभाव दिसून येतो. त्यामुळे अश्या लेखांची आवश्यकता वाटते. मी स्वतः शिकलेली, इंटरनेट वापरणारी वगैरे असूनही Pap Smear बद्दल माहिती नव्हती. काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात राहत असताना पॅप टेस्ट करायला सुरूवात झाली. तिथे स्त्रिया नागरिक असोत वा नसोत, आरोग्यविमा असो वा नसो सरकारी खर्चाने दर दोन वर्षांनी ही चाचणी होत असे. दोन वर्षं होत आली की आठवण करून देणारं पत्र घरी येत असे.

आता काही शंका.
१. नेहमी रात्रपाळीत काम करणाऱ्या स्त्रियांना स्तनांच्या कर्करोगाचा जास्त धोका का असतो?
२. स्तनपानामुळे स्तनांच्या कर्करोगाची शक्यता किती कमी होऊ शकते?
३. २१ ते २९ हा वयोगट Pap Smear साठी खूप लहान वाटतो. इथे टंकनचूक झाली आहे का? माझ्या माहितीप्रमाणे Cervix काढले नसेल तर अगदी पन्नाशीतही ही चाचणी करतात.
४. Pap Smear मध्ये चाचणीसाठी स्त्राव घेतात की Cervix च्या पेशी? अर्थात हा प्रश्न तपशीलाचा आहे, त्यामुळे महत्त्वाचा नाही.

सुबोध खरे's picture

26 Mar 2018 - 6:59 pm | सुबोध खरे

@निशाचर
Finally, an international, collaborative study of almost 37,000 breast cancer cases published in the Annals of Oncology in October found a 20 percent reduction in risk of developing hormone-receptor negative breast cancer for women who breastfed
Research has pointed to a few theories, though none have been proven. One is that women who breastfeed have fewer menstrual cycles throughout their lives, and therefore less exposure to estrogen, which has been shown to fuel some types of breast cancers. Another theory: Breastfeeding makes breast cells more resistant to mutations that can cause cancer.

Additionally, there are lifestyle factors that often come into play: Breastfeeding (and pregnant) women tend to give up smoking and drinking, eat healthier foods, and in general take care of themselves better. These behaviors are known to reduce your breast cancer risk.

breastfeeding reduces the risk of breast cancer primarily through two mechanisms: the differentiation of breast tissue and reduction in the lifetime number of ovulatory cycles. In this context, one of the primary components of human milk that is postulated to affect cancer risk is alpha-lactalbumin. Tumour cell death can be induced by HAMLET (a human milk complex of alpha-lactalbumin and oleic acid). HAMLET induces apoptosis only in tumour cells, while normal differentiated cells are resistant to its effects. Therefore, HAMLET may provide safe and effective protection against the development of breast cancer. Mothers should be encouraged to breastfeed their babies because the complex components of human milk secretion make it an ideal food source for babies and clinical evidence has shown that there is a lower risk of breast cancer in women who breastfed their babies.
https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/23317179

सुबोध खरे's picture

26 Mar 2018 - 7:04 pm | सुबोध खरे

कर्करोग स्तनांचा
http://www.misalpav.com/node/23924
हा एक लेख मी लिहिला होता. यात तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील असे वाटते.

कुमार१'s picture

20 Mar 2018 - 8:09 am | कुमार१

निशाचर, आभार!
लेखाच्या शीर्षकात लेख कोणत्या वयोगटाशी तसेच स्त्रिया अथवा पुरुषांशी संबंधित आहे हे लिहिल्यास संदर्भासाठी उपयोग होईल. >>>>
कुठल्याच लेखात स्त्री / पुरुष अशी विभागणी नाही. या लेखात २ स्त्री चाचण्या विस्ताराने आल्या आहेत एवढेच.

१. नेहमी रात्रपाळीत काम करणाऱ्या स्त्रियांना स्तनांच्या कर्करोगाचा जास्त धोका का असतो?>>>>>>
कारण त्यांच्या हॉर्मोनसचा नैसर्गिक ताल ( rhythm) बिघडतो. म्हणून हवाई सुंदरींना जोखीम खूप जास्त.

२. स्तनपानामुळे स्तनांच्या कर्करोगाची शक्यता किती कमी होऊ शकते?>>>>
बऱ्यापैकी, टक्केवारी माहीत नाही.

३. २१ ते २९ हा वयोगट Pap Smear साठी खूप लहान वाटतो. इथे टंकनचूक झाली आहे का? माझ्या माहितीप्रमाणे Cervix काढले नसेल तर अगदी पन्नाशीतही ही चाचणी करतात.>>>>
चूक अजिबात नाही!! चाळणी चाचणी ही कर्करोग होण्याच्या वयाच्या १०-१५ वर्षे आधी करतात ,तरच खरा उपयोग!

४. Pap Smear मध्ये चाचणीसाठी स्त्राव घेतात की Cervix च्या पेशी?>>>>>
घेताना स्त्रावच घ्यावा लागतो. पेशी या सूक्ष्म दर्शका खाली दिसतात.
(हे उत्तर वाचल्याची पोच दयावी ही वि)

निशाचर's picture

20 Mar 2018 - 8:22 am | निशाचर

प्रश्नांना त्वरीत उत्तरे दिल्याबद्दल धन्यवाद!
पुढील भागाच्या प्रतिक्षेत

दीर्घकाळ रात्रपाळीत काम आणि स्तनांचा कर्करोग यांचा संबंध आपण जाणतो. यापुढील काही संशोधन असे आहे. जर रात्रपाळीत निळ्या प्रकाशाशी (blue light spectrum) खूप संबंध आला तर प्रोस्टेट व स्तनांचा कर्करोग व्हायची शक्यता वाढू शकते का , यावर बरेच संशोधन चालू आहे.

अशा प्रकाशाने हॉर्मोन्स चा नैसर्गिक ताल बिघडतो. अलीकडे LED दिव्यांचा वापर वाढतो आहे. त्यातून आशा प्रकारचा प्रकाश बाहेर पडतो.

कुमार१'s picture

20 Mar 2018 - 1:36 pm | कुमार१

या विषयावरचे अधिक विवेचन मालेच्या पुढच्या भागात येईलच.
एकूणच हा संवेदनशील विषय आहे.

कुमार१'s picture

23 Mar 2018 - 1:51 pm | कुमार१

भाग ५ इथे आहे:
http://www.misalpav.com/node/42280

अनिंद्य's picture

26 Mar 2018 - 2:18 pm | अनिंद्य

@ कुमार१,

हा प्रश्न ह्या भागात विचारावा की ५व्या भागात असा उपप्रश्न मनात होता. :-) आता इथेच विचारतो

चाळीशीच्या पुढे आणि पन्नाशीच्या अलीकडे असलेल्या माझ्यासारख्या पुरुषांना खालीलपेक्षा वेगळ्या काही चाळणी चाचण्या करायचा सल्ला तुम्ही द्याल का ?

- रक्तातील कोलेस्ट्रॉल
- मधुमेहासाठी चाचणी / HBA1C
- रुटीन युरीन
- दातांचे स्वास्थ्य तपासणारी चाचणी
- डोळ्याचा नंबर इ.

जर एव्हढ्याच चाचण्या पुरेश्या असतील तर बहुतेक इस्पितळे २० टेस्ट, ३० टेस्ट, ४० टेस्ट अश्या भारंभार चाचण्यांचे भरगच्च 'प्याकेज' का सुचवत असावी ?

फक्त लठ्ठ फी पोटी ?

कुमार१'s picture

26 Mar 2018 - 2:44 pm | कुमार१

बहुतेक इस्पितळे २० टेस्ट, ३० टेस्ट, ४० टेस्ट अश्या भारंभार चाचण्यांचे भरगच्च 'प्याकेज' का सुचवत असावी ?
फक्त लठ्ठ फी पोटी ? >>>>>

लाखमोलाचा प्रश्न ! मुळात सर्व चाचण्या या सर्वांसाठी नाहीत हे महत्वाचे. मी लेखमालेत बऱ्याचदा हे म्हटले आहे. प्रत्येकाची “जोखीम” ठरवूनच चाचणीची निवड झाली पाहिजे. श्रमजीवी तंदुरुस्त व्यक्तीला तर यातील अनेक चाचण्यां ची गरज असणार नाही. पण चाळिशीतल्या C E O ला मोठ्या चाचणी- पॅकेजची गरज असू शकेल.
सहज म्हणून तुम्हाला पडलेला प्रश्न सरकारी रुग्णालयात जाऊन विचारा ! बघा, किती कमीतकमी चाचण्या सुचवल्या जातील !!
असो, नियमित प्रतिसादाबद्दल आभार !

अनिंद्य's picture

26 Mar 2018 - 2:57 pm | अनिंद्य

तेच तर, मला ते 2D / कलर डॉप्लर, ECG वगैरे चाचण्या अगदीच फालतू वाटतात - म्हणजे काहीच त्रास / लक्षणे / पूर्वेतिहास नसतांना - आहे ना लिहिले प्याकेज मध्ये म्हणून करून घ्या असा प्रकार असतो. :-)

सरकारी रुग्णालयांची भीती वाटते :-)

एक शंका - ह्या (कमीत कमी चाचण्या) वार्षिक कराव्यात की दोन वर्षातून एकदा पुरेश्या असतात ?

कुमार१'s picture

26 Mar 2018 - 3:12 pm | कुमार१

एक शंका - ह्या (कमीत कमी चाचण्या) वार्षिक कराव्यात की दोन वर्षातून एकदा पुरेश्या असतात ? >>>>

पुन्हा एकदा तोच मुद्दा. याचे सार्वत्रिक उत्तर नाही! व्यक्तीचा कौटुंबिक इतिहास, जीवनशैली, मागील चाचणीचे निष्कर्ष, इ. ची सांगड घालून ठरवावे लागते.

चौकटराजा's picture

26 Mar 2018 - 6:08 pm | चौकटराजा

फार पूर्वी चाळ्णी चाचणी संदर्भात " मार्कर" हा शब्द वाचल्याचे आठवते . ही माझी आठवण बरोबर आहे का ?

कुमार१'s picture

26 Mar 2018 - 6:42 pm | कुमार१

एकदम बरोबर. उदा. PSA हा प्रोस्टेट कर्करोगाचा मार्कर आहे

कुमार१'s picture

2 Apr 2018 - 2:01 pm | कुमार१

सध्या पुणे विविध भारतीवर सकाळी ७.१० ला एक सरकारी जाहिरात लागते. त्यात अशी माहिती आहे:

‘सर्व सरकारी रुग्णालयांत वय ३० चे पुढील लोकांची ग्लुकोज पातळी व रक्तदाब तपासणी मोफत.’

यातून शासन या आजारांबद्दल जनजागृती करीत आहे ही समाधानाची गोष्ट आहे.

Submitted by कुमार१ on 1 April, 2018 - 21:56

सान्वी's picture

23 Apr 2018 - 8:46 am | सान्वी

माफ करा लेख खूप उशिरा वाचत आहे. एक शंका होती. सध्या खूप उदाहरणे अशी पाहत आहे की थायराइड असल्यामुले गर्भधारणा होत नाही. तर थायराइड प्रजनन क्षमतेवर नक्की कसा प्रभाव करते?

कुमार१'s picture

23 Apr 2018 - 11:01 am | कुमार१

स्त्रीचे जे बीजांड (ovum) असते, त्याच्या परिपक्वतेसाठी थायरॉइड हॉर्मोन ची खूप गरज असते.
थोडक्यात दर्जेदार बीजांड तयार होण्यासाठी या हॉर्मोन्स चे काम व्यवस्थित असले पाहिजे.

सान्वी's picture

23 Apr 2018 - 4:41 pm | सान्वी

मोजक्या शब्दांत शंकानिरसण केलेत, त्याबद्दल धन्यवाद

भारतात गर्भाशय-मुखाच्या कर्करोगाचा प्रादुर्भाव खूप आहे आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण चिंताजनक आहे. त्या दृष्टीने ३५-४५ वयोगटातील स्त्रियांची चाळणी चाचणी करणे महत्वाचे आहे. HPV-DNA अशी ही चाचणी असते.

हे काम सार्वजनिक पातळीवर काही संस्था करीत आहेत. त्यापैकी ‘आय शेअर’ ही एक. त्यांच्या नव्या उपक्रमात पुणे जिल्ह्यातील १०,००० महिलांची ही मोफत करण्यात येणार आहे. इच्छुकांना त्याचा लाभ घेता येईल. संबंधित लेख इथे वाचता येईल:

https://www.esakal.com/saptarang/saptarang-dr-nikhil-phadke-write-hpv-va...

कुमार१'s picture

1 Sep 2019 - 10:07 am | कुमार१

वर शेवटच्या ओळीत "ही चाचणी" असे वाचावे.

कुमार१'s picture

15 Oct 2019 - 12:27 pm | कुमार१

दरवर्षी ऑक्टोबर महिना हा 'स्तन-कर्करोग जागरूकता' महिना म्हणून पाळला जातो. या रोगाचे प्रमाण समाजात लक्षणीय आहे.
ज्या स्त्रियांचे बाबतीत त्याचा कौटुंबिक इतिहास असतो, त्यांनी संबंधित चाळणी चाचण्या करून घेणे हितावह असते.

कुमार१'s picture

23 Oct 2019 - 8:34 am | कुमार१

स्तन-कर्करोगाच्या उपचारांत क्रांतिकारक बदल घडवणारे सर्जन डॉ. बर्नार्ड फिशर यांचे नुकतेच अमेरिकेत निधन झाले. ती शस्त्रक्रिया सोपी करणे तसेच औषधांचा सुयोग्य पूरक वापर ही त्यांच्या पद्धतीची वैशिष्ट्ये आहेत.

आदरांजली !

कुमार१'s picture

12 Feb 2021 - 10:22 am | कुमार१

स्तनाच्या कर्करोगास संदर्भात सन 2020 च्या अखेरीसचा भारतातील अहवाल वाचला. त्यातील ठळक मुद्दे :

१. दर 29 पैकी एक स्त्री या रोगाची शिकार होत आहे.
२. महानगरातील कर्करोगांत हा रोग पहिल्या स्थानावर आहे.

३. 30 ते 50 या वयोगटात या रोगाची सातत्याने वाढ होते आहे.
४. या कर्करोगींपैकी निम्म्याहून जास्त स्त्रिया रोगाच्या तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात आहेत. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण लक्षणीय.

प्रतिबंधात्मक उपाय :
1. प्रत्येक तरुण स्त्रीने स्तनांची स्व-परीक्षा नियमित करणे आवश्यक. ही मासिक पाळीच्या पाच दिवसानंतर करणे योग्य ठरते.

2. गरजेनुसार इतर चाळणी चाचण्यांची माहिती वर लेखात दिलेलीच आहे.

कुमार१'s picture

12 Jan 2024 - 10:15 am | कुमार१

नवी दिल्ली : गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी करण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यानुसार ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) ही लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे.एचपीव्ही लसीकरण मोहीम तीन वर्षांत तीन टप्प्यांत राबवण्यात येईल. ती येत्या जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे.