हंपी: भाग ५ - दिवस दुसरा -विरुपाक्ष मंदिर आणि हेमकूट टेकडी

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
3 May 2018 - 3:58 pm

हंपी: भाग १ - दिवस पहिला- चंद्रशेखर आणि सरस्वती मंदिरं

हंपी: भाग २ - दिवस पहिला- राजवाडा परिसर- भाग २

हंपी: भाग ३ - दिवस पहिला - हजारराम मंदिर आणि पानसुपारी बाजार

हंपी: भाग ४ - दिवस पहिला - दारोजी अस्वल अभयारण्य

विरुपाक्ष मंदिर परिसर

a

दारोजी अस्वल अभयारण्यात जाऊन आम्ही परत कमलापूरच्या केटीडीसीला परत आलो, थोडा वेळ आराम करुन परत हंपीच्या विरुपाक्ष मंदिरास जाण्यास निघालो. दिवसा उजाड, वैराण असणारा हंपीचा परिसर रात्री निबीड अंधारात बुडून जातो, कमलापूर हंपी रस्त्यावर असलेले प्रचंड प्रस्तर रात्रीच्या आंधारात विलक्षण गूढ वाटू लागतात. वाटेत लागणार्‍या उड्डाण वीरभद्र मंदिरात मात्र काहीतरी जाग दिसत असते. हंपीतील आजही पुजल्या जाणार्‍या अत्यल्प मंदिरांपैकी उड्डाण वीरभद्र मंदिर हे एक. उड्डाण वीरभद्र मंदिर ओळखण्याची प्रमुख खूण म्हणजे मंदिर संपूर्ण पांढर्‍या रंगात रंगवलेले आहे शिवाय मंदिराच्या पुढ्यात एक दीपस्तंभ आहे. शिवाय येथे पूजा सुरु असल्याने आसमंतात प्रार्थनेचे सुर घुमत असतात. ह्या मंदिराच्या समोरच आहे ते चंडिकेश्वर मंदिर. चंडिकेश्वर मंदिरही अप्रतिम शिल्पकलेने नटलेले आहे. वेळेअभावी आम्हाला ह्या दोन्ही मंदिरांत जाता आले नाही. ह्या मंदिरांच्या नंतर रात्री आकाश उजळलेले असते ते थेट विरुपाक्ष मंदिर परिसरात. आजचे हंपी गावही ह्या मंदिराच्या बाजूलाच पसरलेले आहे. विरुपाक्ष मंदिर हे भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक, ह्यामुळे देशातील विविध प्रांतातील यात्रेकरुंची येथे सतत ये जा असते. विरुपाक्ष मंदिराच्या मुख्य गोपुराच्या प्रवेशद्वारातून आत जाताच यात्रेकरुंची गर्दी झालेली तेथे आढळून येते. मुक्कामाचे यात्रेकरु मंदिराच्या प्रांगणात, शतस्तंभी मंडपात आपली पथारी टाकून झोपायच्या तयारीत असतात, तर काहींची शतस्तंभी मंडपाच्या बाजूलाच असलेल्या भोजनशाळेत त्यांच्या स्वयंपाकाची तयारी चालू असते. अर्थात हे विरुपाक्ष मंदिरातील रात्रीचे दृश्य. मंदिर जर अतिशय निवांतपणे पाहायचे असेल तर ते रात्रीच पाहावे कारण यात्रेकरुंची गर्दी रात्री तुलनेने कमी असते आणि जी असते ती मुख्य गोपुर आणि रायगोपुर ह्यांच्या मधील प्रांगणात. अर्थात रात्री मंदिर पाहण्याचा एक तोटा म्हणजे रंगमंडप आणि कल्याणमंडपातील शिल्पं पुरेशा प्रकाशाअभावी बारकाईने पाहता येत नाहीत.
साधारण रात्री साडेसाठच्या आसपास आम्ही विरुपाक्ष मंदिरात पोहोचलो, यात्रेकरुंची थोडीशी गर्दी ओलांडून आतल्या गोपुरातून रंगमंडपात आणि गर्भगृहात गेलो, मंदिराचे पुजारी खूप सहकार्य करणारे दिसले. गर्भगृह सोडून मंदिराच्या अंतराळातील शिल्पांची छायाचित्रे त्यांच्या परवानगीने विनासायास काढता आली. विरुपाक्ष मंदिर संकुलातील मुख्य मंदिराच्या बाजूलाच पंपा आणि भुवनेश्वरी देवीचे मंदिर आहे जे चालुक्य कालीन आहे. त्यांचे स्तंभ, मंदिरातील शिल्पे ह्यावरुन त्यांचा काल सहजीच लक्षात येतो. रात्री गेल्यास हे सर्व मंदिर संकुल अगदी निवांतपणे बघता येते. विरुपाक्ष मंदिर पाहून बाहेर आलो आणि मंदिराच्या उजव्या बाजूस असणार्‍या हंपी गावात शिरलो.
हंपी गाव म्हणजे तीनचार समांतर गल्ल्या असणारं लहानसं गाव. विरुपाक्ष मंदिराच्या दोन्ही बाजूला हंपी गाव पसरलेले आहे. डाव्या बाजूस थोडेसे घरगुती निवास आहेत. शेजारीच बस स्टॅण्ड आणि किरकोळ दुकाने आहेत तर मुख्य गाव हे मंदिराच्या उजवीकडील बाजूस आहे. येथेही पर्यटकांसाठी घरगुती निवास आहेत. ज्यांच्याकडे स्वतःचे वाहन नाही किंवा जे बॅकपॅकर्स म्हणून आलेत त्यांच्यासाठी राहण्यासाठी हे निवास उत्तम आहेत. हंपीच्या ऐन गाभ्यात स्वस्त आणि साधी राहण्याची सोय. इथल्याच एका उपाहारगृहात आम्ही जेवायला गेलो ते म्हणजे मॅन्गो ट्री रेस्टॉरंट. हे रेस्टॉरंट तिथले प्रसिद्ध. जेवायला बसण्याची इथली पद्धत वेगळी, गाद्या वगैरे घातल्या आहेत त्यावर मांडी घालून बसायचे नाहीतर निवांत पसरायचं, पुढ्यात ओटे आहेत. त्यावर ताट ठेवून निवांत जेवायचं. इथे आणि हंपीमधील इतरही काही रेस्टॉरन्ट्स मध्ये इस्रायली आणि लेबानीज खाद्यपदार्थ मिळतात तेही माफक दरांत. इथे जेवून अंधारात बुडालेल्या रात्रीच्या हम्पीच्या अवशेषांतून जाणार्‍या रस्त्याने परत कमलापूरला आलो. हंपीतील पहिला दिवस संपला होता आता दुसर्‍या दिवशी सकाळी परत विरुपाक्ष मंदिरातच यायचे होते.

विरुपाक्ष मंदिराचे गोपुर

a

हंपी: भाग ५ - दिवस दुसरा -विरुपाक्ष मंदिर

सकाळी लवकरच आवरुन परत विरुपाक्ष मंदिरात आलो. सातव्या शतकातलं हे मंदिर. चालुक्यांनी बांधलेलं. त्या काळापासून हे मंदिर एक प्रमुख धर्मस्थळ आहे जे आजही कार्यरत आहे. त्याकाळी हे मंदिर लहानसे होते मात्र चालुक्यांनंतर होयसळांनीही मंदिराच्या कामात भर घातली व विजयनगरच्या राजवटीत विरुपाक्ष मंदिराला आजचे भव्यदिव्य स्वरुप प्राप्त झाले.
विजयनगरचे हे गोपुर अतिशय भव्य. ९ मजली, ते ही दुमजली अशा दगडी अधिष्ठानावर आधारलेले. वरच्या ९ मजल्यांच्या बांधकामात विटांचे बांधकाम आहे व त्यावर द्राविडी पद्धतीचा कळस आहे. गोपुराच्या प्रत्येक थरांवर देवदैवतांची शिल्पे, सुरसुंदरी आणि मैथुनशिल्पे देखील आहेत. आजच्या हंपीतील सर्वात प्रमुख वास्तुशिल्प असेल ते हे गोपुर. हे इतके उंच आहे की ते हंपी गावातून कुठूनही नजरेत भरते. ह्या गोपुराचा जीर्णोद्धार विजयनगरच्या सर्वात प्रसिद्ध सम्राटाने कृष्णदेवरायाने केला. रायाच्या कारकिर्दित विजयनगरची स्थापत्यकला कळसास पोहोचलेली होती.

विरुपाक्ष मंदिराचे गोपुर

a

गोपुरावरील विष्णू, मुरलीधर, शिव, गणेश आदी देवताशिल्पे

a

गोपुरावरील भैरव आणि त्याच्या उजवे बाजूकडील एक मैथुनशिल्प

a

प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूलाच गोपुराच्या खालच्या दगडी थरांतही काही शिल्पपट आहेत. त्यातील एक म्हणजे मार्कंडेयनुग्रह शिवमूर्ती किंवा कालारी शिव. मार्कंडेयाचे अल्पायुष्य संपल्याने त्याला नेण्यास आलेल्या यमाचे म्हणजेच साक्षात कालाचे पारिपत्य शिव करतो त्याची ही कथा

कालारी शिव

a

गोपुराच्या प्रवेशद्वारातून आत येत्याच डाव्या बाजूच्या सज्जात भैरवाची एक मूर्ती आहे. द्वारातून आपला प्रवेश एका भव्य प्रांगणात होतो. उजव्या बाजूच्या भिंतीत १४ हात असलेली एक देवी, मयुरारूढ कार्तिकेय आणि विजयनगरचे राजचिन्ह कोरलेल्या तीन विविध शिळा बसवलेल्या आहेत.

विजयनगरचे राजचिन्ह चालुक्यांच्या राजचिन्हात किरकोळ बदल करुन घडवलेले दिसते. वराह, चंद्र, सूर्य आणि सरळ पात्याचा खंजीर. विजयनगरचे राजे हे वैष्णव असल्याने त्यांच्या राजचिन्हावर वराह असणे साहजिकच आहे. आजही हंपीत सर्वाधिक मंदिरे ही वैष्णव देवतांची आहेत म्हणजे राम, कृष्ण, विठ्ठल, बालकृष्ण, विष्णू इत्यादी.

विजयनगरचे राजचिन्ह

a

ह्याच्या समोरील बाजूस म्हणजेच द्वारातून आल्यावर डाव्या बाजूस तीन शिरे आणि एकच धड असलेल्या नंदीची एक अनोखी मूर्ती आहे. सहसा त्रिमुखी नंदी कुठे दिसत नाही.

त्रिमुखी नंदी

a--a

आतील प्रांगणाच्या डाव्या बाजूस शंभर स्तंभ असलेला सभामंडप किंवा कल्याणमंडप आहे. बहुतांश यात्रेकरुंचा मुक्काम येथेच असतो.

कल्याणमंडप

a

प्रांगणाच्या समोरील बाजूस रायाने-कृष्णदेवरायाने बांधलेले तीनमजली गोपुर आहे. ह्या गोपुरातून आत जाताच आपला प्रवेश श्री विरुपाक्ष मंदिराच्या रंगमंडपापाशी होतो. ह्या तीमजली गोपुरावरही विविध देवतांची शिल्पे कोरलेली आहेत. ह्या गोपुरातून आत येताच दोन्ही बाजूस मंडप, समोर प्रांगण, प्रांगणाच्या शेवटी रायाने बांधलेला रंगमंडप आणि रंग मंडपाच्या उजव्या बाजूस विरुपाक्षाची पत्नी पंपा अथवा भुवनेश्वरी देवीचे मंदिर आहे. प्रांगणात दिपमाळ, बलीस्तंभ आणि नंदीमंडप आहेत.

रायगोपुर

a

(डावीकडून) रंगमंडप, पंपादेवी मंदिर, नंदीमंडप आणि बलीस्तंभ

a

दिपमाळ

a

कल्याणमंडप, रायगोपुर आणि मुख्य गोपुर

a

प्रांगणाच्या डाव्या बाजूकडील शतस्तंभी कल्याणमंडप

a

ह्यानंतर आपला प्रवेश होतो ते रंगमंडपात.

रंगमंडप
रंगमंडप हा विरुपाक्ष मंदिराच्या गर्भगृहाला जोडला गेलेला आहे. ह्याचे बांधकाम कृष्णदेवरायाने शके १५८८ मध्ये केले ( इस. १५१०) तशा अर्थाचा शिलालेख रंगमंडपाच्या बाहेर कोरून ठेवण्यात आलेला आहे. रंगमंडपाच्या प्रवेशद्वारावर शिव पार्वती आदी मूर्ती आहेत तर खालच्या बाजूस ससा, मगर, सिंह, व्याघ्र, हत्ती अश्या विविध प्राण्यांपासून निर्मित केलेल्या व्यालाकृती आहेत. हीच ती प्रसिद्ध विजयनगर शैलीतील रचना. हंपीतील इतर मंदिरांतही ह्या आगळ्या वेगळ्या शैलीतील व्यालशिल्पे दृष्टीस पडत जातात. हंपीतील जवळपास सर्वच मंदिरातील स्तंभांवर हे व्याल व त्यावर आरूढ झालेल्या स्वारांची कित्येक शिल्पे आहेत.

रंगमंडपाचे मुखदर्शन

a

रंगमंडपावरील शिवपार्वती प्रतिमा

a

सम्राट कृष्णदेवरायाचा शिलालेख

a

रंगमंडपाच्या प्रवेशद्वारावरील व्यालशिल्प

a

रंगमंडप ३८ स्तंभांवर तोललेला असून त्यावर बाळकृष्ण, कृष्ण, मर्कटे, लक्ष्मीनृसिंह, गायवासरु अशी विविध शिल्पे कोरलेली आहेत तर छताच्या बाजूच्या भिंतींवर विविध पौराणिक प्रसंग कोरलेले आहेत. रंगमंडपातील सर्वात महत्वाचे आणि आवर्जून बघण्यासारखे म्हणजे येथील छतांवर चितारलेली भित्तीचित्रे. विष्णूचे दशावतार, द्रौपदीविवाहप्रसंगी अर्जुनाने केलेला मत्स्यभेद, मदनाने केलेल्या शिवाच्या तपस्येचा भंग इत्यादी खास विजयनगर शैलीत असलेली विविध रंगीत चित्रे येथे आहेत.

स्तंभावरील भारवाहक यक्ष

a

स्तंभशिल्पे

a

लक्ष्मी नृसिंह

a

छताच्या खालील बाजूकडील अनंतशयनी विष्णू

a

दशावतार भित्तीचित्र

a

मदनाने पुष्पबाणाद्वारे केलेला शंकराचा तपोभंग. मदनाच्या रथाला जोडलेले शुक येथे स्पष्ट दिसत आहेत.

a

शिवपार्वती विवाह (डाव्या बाजूस चतुर्मुखी ब्रह्मा आणि विष्णू आहेत)

a

अर्जुनाने केलेला मत्यभेद

a

द्रौपदीस्वयंवर

a

हे बहुधा कृष्णदेवरायाचे स्वारीचे किंवा हरिहर-बुक्काचे गुरु विद्यारण्य ह्यांच्या मिरवणुकीचे चित्रण असावे.

a

रंगमंडपाच्या शेवटी असलेले पुरुषमृग आणि नागशिल्प

a

रंगमंडप ओलांडून आपला प्रवेश अंतराळात होतो. अंतराळ म्हणजे गर्भगृह आणि रंगमंडप किंवा सभामंडप ह्याच्या दरम्यानचा लहानसा भाग. येथे गर्भगृहाच्या दोन्ही बाजूस शैव द्वारपाल आहेत तसेच दोन्ही बाजूस अर्धमंडपही आहेत. अंतराळातील स्तंभांवर काही अनोख्या प्रतिमा आहेत.

ऋषी शिल्प

a

शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करणारी गाय

a

पुरुषमृग
पुरुषमृग प्रतिमा ही शुद्ध दाक्षिणात्य. अर्धा मनुष्य आणि अर्धा मृग असलेला हा काल्पनिक प्राणी शिवाचा मोठा भक्त समजला जातो.

a

कन्नप्पा नयनार

हा ६३ नयनारांपैकी एक असलेला शिवाचा प्रमुख भक्त. हा एक शिकारी असून शिवलिंगाला शिकार केलेले प्राणी अर्पण करत असे. एकदा शंकराने ह्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. कन्नपा पुजित असलेल्या शिवलिंगाच्या डोळ्यातून रक्त वाहू लागले. शिवाचा डोळा जखमी झालेला असून त्यातून वाहत असलेले रक्त थांबत नाही हे बघून कन्नप्पाने धारदार पात्याने स्वतःचा डोळा काढून शिवलिंगाच्या डोळ्याच्या जागी लावला त्यामुळे त्या डोळ्यातून वाहणारे रक्त थांबले मात्र त्याचवेळी शिवलिंगावरील दुसर्‍या डोळ्यातूनही रक्त वाहू लागले. हे पाहून कन्नप्पाने आपला दुसरा डोळाही काढण्याचे ठरवले. दोन्ही डोळे गेल्यामुळे शिवलिंगावरील रक्त वाहणार्‍या दुसर्‍या डोळ्याची जागा दिसणार नाही हे पाहून त्याने आपला एक पाय लिंगावरील डोळ्याच्या ठिकाणी ठेवला व आपला दुसरा डोळाही काढू लागला. त्याच्या ह्या अपूर्व भक्तीने शंकराने प्रकट होऊन त्याचे दोन्ही डोळे पुनर्स्थापित केले व त्याला आपल्या प्रमुख नयनारांमध्ये स्थान दिले.

कन्नपा नयनार प्रसंग

a

गर्भगृहात शिवलिंग असून त्याचे छायाचित्र घेता येत नाही.

रंगमंडपाच्या उजव्या बाजूस पंपादेवी आणि भुवनेश्वरी देवीचे मंदिर आहे. आतील भागातील कलाकुसर ही चालुक्य शैलीतील आहे. गर्भगृहाच्या द्वारांवर पौराणिक प्रसंगांचा शिल्पपट आहे व आतमध्ये भुवनेश्वरी देवीची मूर्ती आहे. विरुपाक्ष मंदिराच्या प्रमुख गोपुरानंतर ह्या मंदिराचे शिखर सर्वात उंच आहे.

पंपादेवी मंदिराचे शिखर

a

मंदिरातील पौराणिक प्रसंग

a

ह्या मंदिराच्या बाजूला एक भुयारी मार्ग असून आतमध्ये शिवलिंग आहे. ह्याच्याच बाजूला म्हणजे विरुपाक्ष मंदिराच्या उजवीकडील कोपर्‍यात एक नवल पाहायलाच हवे असे आहे. मात्र ते दिसण्यासाठी तुम्हाला मंदिरात सकाळी दहा-अकराच्या सुमारास पोचावे लागेल. मंदिर संकुलाच्या इकडील भागात एक लहानशी खोली असून पूर्वेकडील म्हणजेच गोपुराच्या बाजूस खोलीच्या भिंतीस अस लहानसे छिद्र आहे. मंदिर पूर्वाभिमुख असल्याने सकाळच्या सुमारास सूर्यकिरण येथील छिद्राद्वारे खोलीत प्रवेश करतात आणि गोपुराची उलटी प्रतिमा छिद्राच्या विरुद्ध बाजूकडील भिंतीवर पडते.

गोपुराची उलटी प्रतिमा

a

मंदिराच्या मागील बाजूस स्वामी विद्यारण्यांचे एक लहानसे मंदिर आहे.

मंदिरातून बाहेर आलो, आता उन्ह अगदी रणरणत होतं. मंदिराच्या शेजारीच एक लहानशी टेकडी आहे. विरुपाक्ष मंदिर संकुलाचे सर्वात सुंदर दृश्य जर कुठून दिसत असेल तर ते येथूनच.

हेमकूट टेकडी

विरुपाक्ष मंदिराच्या डाव्या बाजूस ही टेकडी, पूर्णपणे खडकाळ, टेकडीवर जायला एका भल्यामोठ्या सपाट पाषाणावरुनच चढावे लागते. चढावर, टेकडी सर्व बाजूंनी तटबंद आहे. आज ह्याचा काही भाग उद्ध्वस्त झालेला आहे. टेकडीवर जाताना भव्य प्रवेशद्वारे, चौकीची संरक्षक मेटं, आणि असंख्य मंदिरे आहेत. ह्या सर्वापेक्षाही देखणे आहेत ते इथले भव्य प्रस्तर. मॅजेस्टिक..! खडकांचं हे सौंदर्य अफलातून आनंद देतं.

हेमकूट टेकडी

a

हेमकूट टेकडीवर जाण्यासाठी असलेला भव्य प्रवेशदरवाजा

a

हेमकूट टेकडीवरील काही अवशेष

a

टेकडीवरील मेट

a

टेकडीवरील मंदिरसंकुल

a

हेमकूटावरुन दिसणारे विरुपाक्ष मंदिराचे गोपुर

a

टेकडीवरील भव्य प्रस्तर

a

वरील छायाचित्राचाच एक क्लोजअप

a

प्रस्तरांच्या खोबणीत खुबीने लपलेले एक स्थापत्य. हंपीतील स्थलदर्शनात अशी आगळीवेगळी स्थापत्ये कित्येकदा नजरेस पडत जातात.

a

प्रस्तरांतूनच बांधण्यात आलेली तटबंदी

a

हेमकूट टेकडीवरुन दिसणारे विरुपाक्ष मंदिर संकुल

a

हेमकूटावरुन दिसणारा विरुपाक्ष मंदिराच्या पुढ्यातील परिसर आणि हंपी किंवा विरुपाक्ष बाजाराचे अवशेष

a

हेमकूट टेकडीच्या पायथ्याच्या दुसर्‍या बाजूस कडलेकलू गणेश मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे कृष्ण मंदिरावरुन जो रस्ता विरुपाक्ष मंदिराकडे येतो त्या रस्त्याच्या चढावर आहे. येथून उतरत्या रस्त्याने विरुपाक्ष मंदिरात पोहोचता येते. कडलेकलू गणेश मंदिर एक लहानसे पण सुंदर मंदिर आहे. मंदिरातील सभामंडपातील असंख्य स्तंभांवर सुंदर शिल्पे आणि गाभार्‍यात सुमारे १५ फूट उंचीची एकपाषाणी भव्य गणेशमूर्ती आहे. मंदिराच्या सभामंडपातून विरुपाक्ष मंदिर, उंच मातंग टेकडी, हंपि बाजार आणि सभोवतलाच्या प्रचंड प्रस्तरखंडांचे अफलातून दृष्य दिसते.

कडलेकलू गणेश मंदिर

a

मंदिरातील स्तंभांवरील शिल्पे

a--a

गणेशमूर्तीचे छायाचित्र घेण्याचे मजकडून राहूनच गेले, कसे राहिले माहित नाही पण राहून गेले हे खरे. कदाचित मला गाभार्‍यातील प्रमुख मूर्ती टिपण्यात फारसे स्वारस्य नसल्यामुळेही असेल.

हे सर्व पाहता पाहताच दुपारचे १२ वाजून गेले होते, उन्हाचा तडाखा जबर बसत होता. सकाळी नाष्टा भरपूर झाल्याने भूक अशी फारशी लागली नव्हती तेव्हा जेवणाआधी कृष्ण मंदिर आणि हंपीतील सुप्रसिद्ध अशा उग्रनृसिंह (लक्ष्मीनृसिंह) मंदिराकडे मोर्चा वळवला. त्याविषयी पुढच्या भागात,

क्रमशः

प्रतिक्रिया

प्रसाद_१९८२'s picture

3 May 2018 - 4:31 pm | प्रसाद_१९८२

लेख व सर्व छायाचित्रे अप्रतिम आली आहेत.
---
वरिल काही फोटोतील (चित्र क्रं. २४ ते २९) शिल्पात दिसणारे रंग मुळचेच आहेत की नंतर कुणीतरी रंगविलेली आहेत ती शिल्प ?
---

कृष्ण मंदिर आणि हंपीतील सुप्रसिद्ध अशा उग्रनृसिंह (लक्ष्मीनृसिंह) मंदिराकडे मोर्चा वळवला. त्याविषयी पुढच्या भागात,

मागच्या भागानंतर हा भाग यायला, तब्बल ९ महिने वाट पहावी लागली. :)
पुढील भाग थोडा लवकर टाका. :)

प्रचेतस's picture

4 May 2018 - 4:47 pm | प्रचेतस

धन्यवाद.
मध्यंतरी ऑफिसमधील कामांमुळे आणि काही वैयक्तिक अडचणींमुळे लेखनात खंड पडला होता, पण आता परत सुरु करेनसे वाटतं.

वरिल काही फोटोतील (चित्र क्रं. २४ ते २९) शिल्पात दिसणारे रंग मुळचेच आहेत की नंतर कुणीतरी रंगविलेली आहेत ती शिल्प ?

ते रंग मूळचेच म्हणजे कृष्णदेवरायाच्या वेळचे आहेत.

चौकटराजा's picture

3 May 2018 - 4:31 pm | चौकटराजा

मी किती घाईत हम्पी पाहिले याची चुटपूट आता लागून राहिली आहे. आता पुन्हा एकदा जाणे आले. कले कडालू च्या मन्दिरातून सूर्यास्त मस्त दिसतो. बाकी जास्त वैष्णव मंदिरे आहेत हे माझ्या त्यावेळी लक्षात आले नाही . हम्पी व ओरच्छा हे भारताचे जागतिक कीर्ती मिळालेले वैभव आहेच यात शंका नाही .

प्रचेतस's picture

4 May 2018 - 4:49 pm | प्रचेतस

हंपी मी सुद्धा तसे घाईतच पाहिले. घाईत म्हणजे केवळ दोनच दिवसात. मात्र ठिकाणे मोजकीच पाहिली पण निवांतपणे प्रत्येक ठिकाणाला भरपूर वेळ देत पाहिली त्यामुळे बारकावे टिपता आले.

चौकटराजा's picture

4 May 2018 - 5:50 pm | चौकटराजा

वल्ली तुझा रस जो मूर्ती मधे आहे तसे ओर्छात काही नाही . जे आहे ते व त्याचे स्केल अद्वितीय आहे . बुंदेला राजांचे गत वैभव पहायला मिळेल . लवकरात लवकर पहा !

अभ्या..'s picture

3 May 2018 - 4:35 pm | अभ्या..

जब्बारदस्त रे वल्ली,
शिवापार्वतीचा विवाहप्रसंगीचे चित्र अप्रतिम रे. मस्त कंपोझिशन आहे.
ऋषि शिल्पातली हेअरस्टाइल हटके आहे. चिनी जपानी चित्रातली हेअरस्टाइल आठवली.
येऊं दे अजून.

शाली's picture

3 May 2018 - 5:24 pm | शाली

फार सुरेख लिहिलय. फोटो काय सुंदर आलेत! मस्तच!
हेमकूट टेकडी, त्रिमुखी नंदी भारी.

डोळे भरून पहावं असं शिल्पसौंदर्य! अप्रतिम.

प्रसाद गोडबोले's picture

3 May 2018 - 7:58 pm | प्रसाद गोडबोले

अप्रतिम लेखन वल्ली सर ! फोटोही मस्त आलेत !

बाकी काही शंका अहेत : विजापुरच्या आदिलशाहीच्या तडाख्यातुन हे सारे वाचलेच कसे ? ही मंदिरे बांधायला ह्यांच्याकडे इतका पैसा कोठुन आला ? ह्यांच्याकडेही राष्ट्रकुटांप्रमाणे अफाट व्यापारौदीम चालु होता काय ?

बाकी इतकी सारी माहीती असेल तर डॉक्युमेन्टरी काढायला पाहिजेल ! ड्रोन शॉट्स तर अफाट येतील ! परत एकदा हंपीचा प्लॅन करावा लागणार तुम्हाला !

प्रचेतस's picture

4 May 2018 - 5:29 pm | प्रचेतस

विजापुरच्या आदिलशाहीच्या तडाख्यातुन हे सारे वाचलेच कसे ?

तो मोठा इतिहास आहे. दक्षिण भारतात त्यावेळी दिल्लीच्या सुलतानांचे राज्य होते, शिवाय येथे त्यांचे मांडलिक पण होते. तुघलकाने कांपिलीच्या राजाचा पराभव करुन तिथे मुसलमानी राज्याची स्थापना केली. हरिहर व बुक्कराय हे याच कांपिलीच्या राजाचे किंवा होयसळांचे सरदार होते असे म्हणतात. स्वामी विद्यारण्यांच्या प्रेरणेने हिंदू धर्माची रक्षा करण्याच्या हेतूने हरिहर आणि बुक्काने १३३६ साली विजयनगरच्या स्वतंत्र राजवटीची स्थापना केली. बुक्काने मदुराईच्या सुलतानाचा पराबव करुन तो भागही आपल्या साम्राज्याला जोडला. ह्याच सुमारास दिल्लीच्या सुलतानांपासून फुटून हसन गंगू बहमनीने बहमनी राजवटीची स्थापना १३४७ साली केली. तुंगभद्रा आणि कृष्णेच्या मधील प्रदेशांतील वर्चस्वासाठी ह्या दोन राजवटीत सतत लढाया होत असत. ह्याच दरम्यान बुक्करायाचे वंशजांनी विजयनगरचा अंमल गोवे, मदुराई, इतर दक्षिण भारत येथे प्रस्थापित केला. पुढे तुळुव घराण्याचा विजयनगरच्या पराक्रमी सम्राट कृष्णदेवरायाच्या कारकिर्दित विजयनगरचा प्रचंड विस्तार झाला तो असा पूर्वेकडे ओरिसा, पश्चिमेकडे भटकळ-होनावर, उत्तरेकडे रायचूर आणि मुद्धल आणि दक्षिणेत थेट दक्षिण समुद्रापर्यंत. विजयनगरच्या राजांबरोबरच्या सततच्या लढायांमुळे आणि बहमनी राजवटीतील अंतर्विरोधामुळे त्या राजवटीची १४२५ मध्ये शकले होउन निजामशाही, आदिलशाही, कुत्बशाही, इमादशाही आणि बेरीदशाही ह्या पाच स्वतंत्र शाह्या दख्खनमधे निर्माण झाल्या. विजयनगरच्या तुलनेत साहजिकच त्यांचे सामर्थ्य कमीच होते. खुद्द कृष्णदेवरायाने रायचूर जिंकून विजापुरच्या वेशीवर धडक देऊन आदिलशाहा शरण आणले होते. कृष्णदेवरायाच्या मृत्युनंतर विजयनगरचे सामर्थ्य कमजोर होत गेले. घराण्याची सत्ता अच्युतरायानंतर जावई(अलिया) रामरायाकडे गेली (अराविडू घराणे). रामराया पाच शाह्यांमधल्या भांडणाचा फायदा घेत कधी इकडे तर कधी तिकडे असा मदत करुन ह्या शाह्यांना एकमेकांशी लढवत ठेवून त्यांना झुलवू लागला. विजयनगरची संपत्ती व वैभव बघून ह्या पाच शाह्या १५६५ मध्ये एकत्र आल्या आणि तालिकोटची सुप्रसिद्ध लढाई झाली. आदिलशाहाशी तह असल्याने आदिलशाहा इतरांना मदत करणार नाही ह्या विश्वासाने रामराया काहीसा गाफिल राहिला. तो युद्धात मारला गेल्याने वर्चस्व असूनही फौजेची पळापळ झाली व मुसलमान विजयनगरात घुसले, तब्बल ६ महिने शहराची लुटालुट चालूच होती. अर्थात ह्या पराभवानंतरही विजयनगरचे साम्राज्य लयाला गेलेच नाही पण विजयनगर उर्फ हंपी ही राजधानी ओसाड, उद्ध्वस्त झाली. तिरुमलदेवाने राजधानी पेनुकोंडाला हलवली. मात्र हळूहळू त्यांचे साम्राज्य क्षीण होत गेले, सामंत, नायक बळजोर झाले आणि फुटून निघत गेले. शेवटचा वंशज श्रीरंग रायल ह्याची इकडे तिकडे खूपच परवड झाली आणि त्याच्या मृत्युने १६४६ साली विजयनगरचा शेवटचा दुवाहीनिखळून पडला.

ही मंदिरे बांधायला ह्यांच्याकडे इतका पैसा कोठुन आला ? ह्यांच्याकडेही राष्ट्रकुटांप्रमाणे अफाट व्यापारौदीम चालु होता काय ?

साम्राज्य बळजोर होत गेल्यावर पैसाही आपोआप येतोच. विजयनगरच्या सम्राटांचा व्यापार चीन, श्रीलंका, अरब, इराणी लोकांशी सतत चालू असे. विजयनगरच्या वैभवाचे वर्णन दुमिंगुश पाईश, फेर्नांव नुनिझ, निकोलाय कोंन्ती अशा विविध प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी केलेले आहे ते मूळातून वाचण्यासारखे आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 May 2018 - 10:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर वर्णन !

हंपीचे शिल्पवैभव अप्रतिम आहेच, ते फोटोंमध्ये अचूक पकडले आहे... नेहमीप्रमाणेच !

असे काही पाहिले की दक्षिण भारतात निगुतीने फिरायला निघायची सुरसुरी येते.

कुठे काय आहे आणि कसे जाता येईल एवढ्यावरच मी तो भाग पाहून निभावले होते. ते आता पाहतो आहे.
१) कन्नपा नयनार प्रसंग - आणि असेच बरेच कळण्यासाठी पुराणं लक्षपूर्वक वाचायला हवी आणि मगच इथे यायला हवे. शिव विवाहाच्यावेळी ब्रम्हाला चार मुखे होती इत्यादी.
२) कुत्रा प्राणी पुराण कालात नव्हता किंवा टाळतात?
३) शेषशायी विष्णूच्या शिल्पाच्या छतावर पाल आहे पाहा. ती आणखी एका मंदिरात (उत्क्रीडन असे काही नाव आहे, दानतुलाकमानीपाशी आहे. पुराणात पाल कुठे आहे?
४) गावातच राहिल्याने रात्रसंचार करता आला ते महाभाग्यच.
५) फोटो चांगले वाटले तरी एक उणीव म्हणजे वाईड लेन्झमध्ये करेक्शन पाहिजे. खांबवगैरे फारच तिरपे होत आहेत.
६) गणेशाला स्थान होते का प्रवेशद्वारांवर?
७) कडलेकालू या मोठ्या गणेश मंदिराच्या बाजूलाच एवढाच मोठा ससिवेकालू गणेश आहे. गणेशाला असे अगदी सुरुवातीलाच ठेवले आहे.
८) एकूण सर्वच परिसर, मंदिरे नास्तिकालाही आस्तिक करून टाकतात अशी रचना आहे हे नि:संशय.
९) एक गोष्ट खटकते ती म्हणजे देवळांचे रथ (लाकडाचे आहेत) ते फक्त उत्सवाच्या काळातच बाहेर काढतात. महाशिवरात्रीला गर्दी केवढी असेल!!. तोपर्यंत झाकून ठेवतात.सेल्फी आइटम आहे. बनशंकरी बदामीचा पाहिला.

प्रचेतस's picture

4 May 2018 - 5:37 pm | प्रचेतस

१) कन्नपा नयनार प्रसंग - आणि असेच बरेच कळण्यासाठी पुराणं लक्षपूर्वक वाचायला हवी आणि मगच इथे यायला हवे. शिव विवाहाच्यावेळी ब्रम्हाला चार मुखे होती इत्यादी.

कन्नप्पा नयनारचा प्रसंग नेमका कोणता हे मी थेट विरुपाक्ष मंदिराच्या पूजार्‍यांनाच विचारले होते, त्यांनी तो प्रसंग सविस्तर वर्णन करुन सांगितला. आपल्य पुराणांत कन्नपा नयनार मिळणार नाही, दाक्षिणात्य मूर्ती आहे.

२) कुत्रा प्राणी पुराण कालात नव्हता किंवा टाळतात?

होता की, भैरवाचे वाहन कुत्रा हे आहे तर चामुंडा काही वेळा शृगालावर आरुढ दिसते. पुराणातील शुनःशेप आणि श्वानाची कथा प्रसिद्ध आहे, महाभारतातही स्वर्गारोहणपर्वात धर्मराजाच्या कुत्र्याचा उल्लेख आहे अर्थात प्रक्षिप्त. भैरवाच्या जोडीला कुत्र्याची शिल्पे पुष्कळ आहेत.

३) शेषशायी विष्णूच्या शिल्पाच्या छतावर पाल आहे पाहा. ती आणखी एका मंदिरात (उत्क्रीडन असे काही नाव आहे, दानतुलाकमानीपाशी आहे. पुराणात पाल कुठे आहे?

तिथे एक आहे आणि तुम्ही म्हणताय ते मंदिर म्हणजे उत्किर्णित विष्णू मंदिर (inscribed Vishnu temple). तुलादानकमानीच्या समोरच आहे ते.

६) गणेशाला स्थान होते का प्रवेशद्वारांवर?

हो, काही प्रवेशद्वारांवर गणेश दिसतोच. शिवाय ससिवेकलू आणि कडलेकलू अशी गणेशाच्या भव्य मूर्ती असलेली दोन स्वतंत्र देवळे आहेतच.

९) एक गोष्ट खटकते ती म्हणजे देवळांचे रथ (लाकडाचे आहेत) ते फक्त उत्सवाच्या काळातच बाहेर काढतात. महाशिवरात्रीला गर्दी केवढी असेल!!. तोपर्यंत झाकून ठेवतात.सेल्फी आइटम आहे. बनशंकरी बदामीचा पाहिला.

लाकडी रथ दुर्दैवाने एकही दिसला नाही.

जयंत कुलकर्णी's picture

4 May 2018 - 8:14 am | जयंत कुलकर्णी

मस्तच प्रचेतस ! जुन्या आठवणी जाग्या झाल्या....

अनिंद्य's picture

4 May 2018 - 11:04 am | अनिंद्य

@ प्रचेतस,

खूप दिवसांनी आला हा भाग, माहिती आणि सुंदर चित्रांनी भरलेला - आवडला.

'पुरुषमृग' काही नेपाळी लोककथांत येतो. हिमाचलमधील काही कथांमध्येही. पण शिल्प मात्र मी पाहिले नाही.

पु भा प्र,

अनिंद्य

दुर्गविहारी's picture

4 May 2018 - 1:52 pm | दुर्गविहारी

अप्रतिम आणि अतिशय उत्तम माहिती. काही गोष्टी नव्याने समजल्या. पुढचा भाग लवकर टाका. वाट बघायला लाउ नका. :-)

पद्मावति's picture

4 May 2018 - 1:57 pm | पद्मावति

अप्रतिम!!

सस्नेह's picture

4 May 2018 - 3:08 pm | सस्नेह

हंपीमध्ये शिल्पकला तर आहेच, पण स्थापत्यकला विशेषत्वाने पाहण्यालायक आहे. प्राचीनकाळचे एक संपन्न नगर म्हणून विजयनगर शिल्प पाहिल्यावर खरोखर भारावून टाकते.
बाकी, या लेखात खास वल्ली टच काही जाणवला नाही :)

का ब्रं वल्ली टच जाणवला नाही?

नेहमीसारखे सिनेमास्कोप नव्हे तर सरकारी डॉकुमेंट्री वाटली बॉ ! का कोण जाणे ;)

चौकटराजा's picture

5 May 2018 - 5:15 pm | चौकटराजा

ज्या क्वालीटीचा क्यामेरा वल्ली कडे आहे . त्याचा फील अजून त्याला आलेला दिसत नाहीये . हे फटू हे त्याच्या डी एस एल आर ने अधिक चांगले येउ शकतात . दोन भिंगे आहेत त्याकडे !!

गोपुरासमोरचा हम्पिबाजार रूंद रस्ता आहे तिथेच तो रथ दोनदा पाहिला. सर्व बाजूंनी पत्रे लावलेले. एका ठिकाणी फट होती त्यातून जेमतेम बघितला.

यशोधरा's picture

7 May 2018 - 5:14 pm | यशोधरा

लेख व फोटो आवडले.
मस्त!

अत्रुप्त आत्मा's picture

8 May 2018 - 12:15 am | अत्रुप्त आत्मा

नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण , वाचनीय!

तुमच्या सादरीकरणास अभिवादन. मलाही तुम्ही घेतलेल्या छतावरील पालीचा (शेषशयनी विष्णु छायाचित्र) उल्लेख करायचा होता तो कंजुष
यांनी उल्लेख केला आहेच तरीपण तुमच्या नजरेने ते शिल्प टिपले म्हणुन तुमचे आणि त्या शिल्पकाराचे खास कौतुक वाटले.
असेच सचित्र दर्जेदार माहितीपुर्ण लिखाण चालू ठेवा. धन्यवाद!

सुधीर कांदळकर's picture

9 May 2018 - 10:18 am | सुधीर कांदळकर

नेत्रसुखद, आनंददायी ज्ञानरंजन. कधीतरी एकदोन भाग वाचले होते. आता पुन्हा एकामागून दुसरा असे सलग १ ते ५ वाचले. मजा आली. विजयनगरबद्दल कुतूहल आहेच.

धन्यवाद.

माहितीपूर्ण लेख. तुमचा अभ्यास खरंच दिसतो बारीक सारीक तपशिलातून. तुमच्या मुळे या शिल्पांकडे बघायची नवीन दृष्टी मिळते नेहमीच. नाहीतर आधी अजिंठा ला गेलो तेव्हा बागेत गेल्यासारखं एका पाठोपाठ एक गुहा बघून आलोय. फोटो पण छान आहेत.

मला फोटोग्राफी मधलं कळत नाही, पण लांबचे फोटो जास्त छान आहेत जवळच्या फोटोपेक्षा, कदाचित फोटो काढायचा अँगल, प्रकाश योजना, यावर जाणकारांच्या टिप्स घेतल्यात तर अजून छान वाटतील.

कारण कधी कधी असं होतं कि तुम्ही लेखात दिलेले तपशील फोटो मध्ये शोधायचा प्रयत्न करते, आणि नीट दिसलंय असं वाटत नाही. कदाचित फक्त माझाच प्रॉब्लेम असू शकेल.