मोनालिसा हे जगातले सर्वाधिक प्रसिद्ध चित्र. अगदी एका दिवसासाठी पॅरिसला येणारेसुद्धा ते बघण्याचा आटापिटा करतात. मोनालिसाच्या दालनात नेहमीच प्रचंड गर्दी असल्याने खरे तर कुणालाही ते चित्र धडपणे बघताही येत नाही, आणि एवढा खर्च, आटापिटा करून त्यात बघण्यासारखे एवढे खास असे काय आहे, हेही उमजत नाही.
पूर्वी मोनालिसाला एवढे प्रसिद्धीचे वलय नव्हते, हे खालील चित्रावरून दिसते :
लूव्र म्यूझियमचे हे चित्र सुप्रसिद्ध अमेरिकन संशोधक आणि चित्रकार सॅम्युएल एफ.बी. मोर्स ('मोर्स कोड'चे जनक) यांनी १८३१-३३ या काळात काढलेले आहे. यात काळ्या कोटात वाकून उभ्या असलेल्या मोर्सच्या पलीकडे अगदी खालील ओळीत मोनालिसा अन्य चित्रांच्या दाटीवाटीत बसलेली दिसते.
बर्याच जणांना या चित्राविषयी खालील प्रश्न पडतात :
१. हे चित्र एवढे प्रसिद्ध का आहे?
२. हे एवढेसे चित्र पूर्ण करायला लिओनार्दोसारख्या प्रतिभावंताला चार वर्षे का लागली असावीत? आणि
३. मोनालिसाच्या गूढ स्मिताचे रहस्य काय आहे ?
यांची समाधानकारक उत्तरे मलाही ठाऊक नव्हती, पण अलीकडेच माझ्या आयुष्यात अचानक घडून आलेल्या एका अद्भुत, अविश्वसनीय घटनाक्रमातून मला या गोष्टींचा उलगडा तर झालाच, त्याखेरीज अनेक अकल्पनीय गूढ गोष्टी नव्यानेच समजल्या (उदाहरणार्थ, जीएंच्या 'इस्किलार' कथेतील 'सेरिपी - एली - इस्किहार'चा मोनालिसाशी - आणि माझ्याशीही - जवळचा संबंध आहे... वगैरे )
मित्रहो, हा सर्व काय प्रकार आहे, हे तुम्हाला सांगायचे, तर ती एक फार मोठी हकीगत आहे. ती माझ्या स्वतः:च्या रोजनिशीतून आणि पंधराव्या/सोळाव्या शतकातील 'लॉरेंझो गेरर्दिनी' या इटालियन चित्रकाराच्या रोजनिशीतील नोंदींमधून उलगडू शकते, त्यामुळे या दोन्ही रोजनिश्या इथे देतो आहे:
भाग १. माझ्या ध्वनिमुद्रित रोजनिशीतील काही नोंदी
पॅरिस दि. १ ऑक्टोबर २०१७. रात्री ११:५५ वाजता.
मोनालिसासंबंधी प्रश्नांचा, ते चित्र पुन्हा एकदा प्रत्यक्ष बघण्यातून काही उलगडा होतो का हे बघायला आज 'लूव्र'मध्ये गेलो खरा, पण अति गर्दीमुळे चित्र नीट बघता आले नाही. मग इकडे तिकडे फिरताना अचानक एक प्राचीन कट्यार दिसली. का कुणास ठाउक, त्या कट्यारीविषयी खूपच आकर्षण वाटले, आणि जीएंच्या 'सेरीपी'ची आठवण झाली.
लूव्रमधील 'सेरिपी'
रात्री घरी आल्यावर पुन्हा एकदा 'इस्किलार ' कथा वाचली... सेरीपी - एली - इस्कीहार... अद्भुतच सगळे….
… रात्रीचे बारा वाजत आलेत, आता झोपावे... उद्या पुन्हा एकदा मोनालिसा जवळून बघण्याचा प्रयत्न करून बघावा.
------------------------------------------------------------------------
पॅरिस दि. २ ऑक्टोबर २०१७.
सकाळी मोनालिसाच्या दालनात शिरता शिरता "लोरेंझो, लोरेंझो, लिबेरामी..." असे शब्द कानावर पडले. इटालियन भाषेत 'लिबेरामी' म्हणजे "मला सोडव"... हा काय प्रकार आहे? हा लोरेंझो कोण?
मोनालिसाकडे बघतो, तो ती माझ्याकडे आर्तपणे बघत ते शब्द उच्चारात आहे, असा भास झाला. "मला या गर्दीतून सोडव" असे मोनालिसा म्हणत आहे की काय, या कल्पनेने मला हसूच आले.
दालनातल्या प्रचंड गर्दीमुळे चित्राजवळ जाणे शक्यच नव्हते, म्हणून तिथल्या सुरक्षा-प्रमुख बाईला माझा खास आर्टिस्ट पास दाखवून चित्र जवळून बघण्याबद्दल विचारल्यावर तिने रात्री नऊला म्युझियम बंद होण्याआधी फक्त पाच मिनिटांसाठी बघू देण्याचे कबूल केले. त्याप्रमाणे नऊला पाच असताना तिथे गेलो. सगळ्या प्रेक्षकांना बाहेर काढल्यावर तिने मला कठड्याच्या आत जाऊ दिले. … पुन्हा तोच भास : "लोरेंझो, लिबेरामी... लिबेरामी..." थक्कच झालो.
सुट्टीची वेळ झाल्यानं असेल, पण आता बाईच्या चेहऱ्यावरचे कडक भाव मावळून ती जरा रिलॅक्स झाल्यासारखी वाटत होती, म्हणून तिला मोनालिसाबद्दल मला पडणारे प्रश्न आणि "लोरेंझो, लिबेरामी... लिबेरामी..."बद्दल विचारले.
माझे प्रश्न ऐकताना तिच्या चेहऱ्यारचे भाव झरझर बदलत होते. आधी ती अवाक झाली, आणि शेवटी खूप समाधानाने तिचा चेहरा फुलून आला. "छान, छान. तू जरा खाली लॉयन गेटजवळ थांबतोस का? मी येतेच तिथे, मग आपण बोलू."
दहा मिनिटात आल्या आल्या ती म्हणाली, " मी आता तुला जे सांगणार आहे, ते ऐकून तू मला वेड्यातच काढशील, पण ते खरे आहे. मी या दिवसाची कधीपासून वाट बघत होते. पॅरिस सोडून मला माझ्या वृद्ध आईवडिलांकडे गावी जायचे आहे, पण माझ्यावर असलेल्या मोठ्या जबाबदारीमुळे ते शक्य नव्हते. पण लोरेंझो, शेवटी आज तू आलास … आता मी मोकळी झाले "
मला काही कळेचना, हा सर्व काय प्रकार आहे ते.
"आता मी काय सांगते ते नीट ऐक आणि त्याप्रमाणे कर" असे म्हणत तिने एक लहानशी मखमली मंजुषा माझ्या हातात ठेवली. ती उघडताच आतल्या तेजस्वी रत्नाकडे बघून माझे डोळे दिपले.
"इस्किहार' रत्न आहे हे. अतिशय मूल्यवान. प्राचीन काळी ग्रीसमधील डेल्फीच्या मंदिरात होते हे रत्न. पुढे शार्लमेनच्या काळात ते पॅरिसला आणले गेले … पण ते जाऊ दे. आता तू हे रत्न अगदी जपून ठेव, आणि उद्याच ते घेऊन 'क्लो ल्यूस 'ला जा. तिथेच तुझ्या प्रश्नांची उत्तरे तुला मिळतील "
एवढे बोलून सेन नदीवरील पूल झरझर ओलांडून ती दिसेनाशीसुद्धा झाली.
मी आश्चर्यचकित होऊन घरी परतलो आणि 'क्लो ल्युस'चा अर्थ शोधला : लिओनार्दो दा विंची १५१६ साली राजा फ्रान्सिस-१ याने आमंत्रित केल्याने फ्रान्समध्ये येऊन १५१९मध्ये मृत्यू पावेपर्यंत ज्या जागी रहात होते, ती जागा म्हणजे 'क्लो ल्युस'.
आता उद्याच तिकडे जायचे.
-----------------------------
( क्लो ल्यूस दि. ३ ऑक्टोबर २०१७. संध्याकाळी ७:३० )
क्लो ल्यूसचे बाहेरून दृश्य आणि लिओनार्दोचे दा विंचीचे शयनकक्ष.
थोड्या वेळापूर्वी क्लो ल्यूसला येऊन पोहोचलो. पोहोचायला खूपच उशीर झाल्याने घाईघाईत एक फेरी मारून सर्व बघावे लागले. या प्राचीन वास्तूत त्या प्रतिभावंताचे पावलोपावली जाणवणारे अस्तित्व अनुभवून मी अगदी भारावून गेलेलो आहे. मी चित्रकार आहे, आणि इथला सर्व भाग फिरून बारकाईने बघायचा आहे, असे सांगितल्यावर जवळच्याच एका जुनाट घरात माझी रात्री राहण्याची सोय करण्यात आली आहे.
बापरे ! या घरात एकट्याने रात्र काढायची म्हणजे कठीणच आहे.....
क्लो ल्यूस दि. ४ ऑक्टोबर २०१७.
रात्री २ :३०
घरात आलो खरा, पण भीतीने अजिबात झोप लागत नाहीये. कुठून आपण इथे आलो, असे झालेय. कशीतरी रात्र पार पडली की अगदी सकाळी पॅरिस गाठायचे, आणि ते रत्न त्या बाईला परत करायचेय ....
पहाटे ४:००
पहाटे जरा डोळा लागला, तेवढ्यात कसल्यातरी आवाजामुळे जरा जाग आली. खिशातला रेकॉर्डर सुरू करून ठेवला, तेवढ्यात अचानक "लोरेंझो, बाहेर ये" असे शब्द स्पष्टपणे कानावर पडले. खडबडून जागा झालो. उठून इकडे तिकडे बघतो, तर तिथे कुणीच नाही. मात्र बाहेरून तीच हाक पुन्हा पुन्हा ऐकू येत होती.
खोलीचं अवजड, जुनाट लाकडी दार उघडून आता बाहेर आलो आणि बघतो तर .... टिपूर चांदण्यात मोठमोठ्या वृक्षांच्या भेसूर वाटणार्या सावल्यांमधे उभी, पायघोळ अंगरखा घातलेली, छातीपर्यंत पांढरीशुभ्र दाढी रुळणारी गूढ व्यक्ती .... तीच मला साद घालत आहे : "लोरेंझो, ये. मी तुझीच वाट पाहत होतो"
... आश्चर्यच आहे.... ही दिव्य व्यक्ती कोण, आणि मला 'लोरेंझो' म्हणून का बोलावत आहे? काहीच काळात नाहीये. मी भारल्यासारखा त्या व्यक्तीजवळ जाऊन पोहोचलोय.
"अरे, मी लिओनार्दो, ओळखले नाहीस? तू माझा पट्टशिष्य, लोरेंझो गेरर्दिनी ... एली गेरर्दिनीचा भाऊ. चल, आपण स्टुडियोत जाऊ या" म्हणत ते झपाझप चालू लागल्यावर मीही भारल्यासारखा मागोमाग जाऊ लागलोय.
आता आम्ही स्टुडियोत पोहोचलोय. इथे भिंतीवर तीन चित्रे लागलेली आहेत. हीच तीन चित्रे लिओनार्दोने १५१६ साली इटलीतून फ्रान्समध्ये येताना बरोबर आणली होती, मला ठाऊक आहे. यातले एक म्हणजे सुप्रसिद्ध 'मोनालिसा’.
त्या चित्रांकडे हात दाखवत लिओनार्दो म्हणाले, "आठवते ना लोरेंझो, इटलीतून आपण ही तीन चित्रे मोठ्या कसोशीने आल्प्स पर्वत ओलांडून इथे घेऊन आलो.. तुझ्या बहिणीचे, 'एली'चे हे चित्र तर आपण प्राणपणाने जपत आणलेले आहे. राजा फ्रान्सिसने आपल्याला हा प्रासाद रहाण्यासाठी दिला.... आठवले ना आता?"
.... ही 'एली' कोण? आणि मोनालिसाच्या चित्राला ते माझ्या बहिणीचे, 'एली'चे चित्र का म्हणत आहेत? मला खरे तर हा सर्व भास आहे, स्वप्न आहे की वास्तव, हेच कळत नाहीये... आणि हळूहळू माझे वर्तमानकाळाचे, देहाचे आणि व्यक्तिमत्त्वाचे भान हरपत चाललेले आहे.
"बरं, तू जरा फिरून ये, म्हणजे आठवेल सर्व काही, आणि हो, आणि येताना 'सेरिपी' आणायला विसरू नकोस " असे म्हणत त्यांनी चौकातील एका दाराकडे हात दाखवला. मी ओढल्यासारखा त्या दाराकडे खेचला गेलो…
त्या दरवाजातून बाहेर पडल्यावर आणखी एक लोखंडी फाटक दिसले.
फाटकातून पलीकडे गेल्यावर समोर काही पायऱ्या आणि एक इमारत दिसते आहे….
पायऱ्या चालून त्या इमारतीच्या सज्जात आल्यावर समोर दूरवर दिसणारे दृश्य थक्क करणारे आहे.. अरे, हे तर एल ग्रेकोने रंगवलेले टोलेडोचे दृश्य... हे इथे फ्रान्समध्ये कसे ?
कृष्णमेघांनी भरून आलेले, काळवंडलेले आकाश, दूरवर दिसणारे प्राचीन प्रार्थनामंदिर आणि जर्जर इमारती, डोंगरांचे चढ-उतार, पाउलवाटा आणि नदीवरील पूल... हे तर 'एल ग्रेको' च्या चित्राने अजरामर केलेले स्पेन मधील 'टोलेडो' गाव....
... माझे भान पुरतेच हरपत चालले आहे...मला भोवळ येते आहे......मी पडणार आता...
क्रमशः
संपादकीय तळटीप: चित्रगुप्त यांनी या कथामालिकेची सुरुवात मिपाच्या दिवाळी अंकात पहिले पुष्प प्रकाशित करून केली आहे.
प्रतिक्रिया
21 Oct 2017 - 10:21 am | सविता००१
किती सुरेख चाललीये कथा.... माझंही भान हरपलं होत वाचता वाचता..
पण वाचेतो ते दुष्ट क्रमशः आलं.
पण मग आता पुढचा भाग कधी???
21 Oct 2017 - 6:57 pm | चौकटराजा
मजकूर व चित्रे दोन्ही उल्लेखनीय. क्रमशः मुळे उत्सुकता वाढली आहेच
22 Oct 2017 - 2:31 am | गामा पैलवान
चित्रगुप्त, तुमच्या या कथेत एखादं गुप्तचित्र सापडणार बहुतेक. पुभालटा.
आ.न.,
-गा.पै.
22 Oct 2017 - 9:09 am | तुषार काळभोर
कल्पनातीत चित्रं आणि फोटो...
22 Oct 2017 - 1:35 pm | डॉ सुहास म्हात्रे
खास चित्रगुप्त शैलीत त्यांच्या स्वतःच्या जन्मोजन्मांची कथा आणि त्यातून उलगडणारी रहस्ये वाचायची उत्सुकता लागली आहे. पुढ्चे भाग लवकर टाका. चित्रे नेहमीप्रमाणेच अप्रतिम !
22 Oct 2017 - 5:45 pm | पद्मावति
जबरदस्त!
22 Oct 2017 - 6:30 pm | इरसाल कार्टं
पुढील भाग लवकर येउद्या.
23 Oct 2017 - 11:55 am | विनिता००२
सुरेख! गुंगुन गेले होते अगदी!
पुभाप्र
23 Oct 2017 - 12:09 pm | सस्नेह
डॅन ब्राउन च्या 'दा विंची..' ची आठवण झाली.
23 Oct 2017 - 2:03 pm | अत्रन्गि पाउस
तुमच्या बरोबर ४ ५ तास लुव्र मध्ये होतो ...तुमच्या नजरेतून आणि रसाळ वाणीतून लुव्रच्या अनेक खासियती तुम्ही सांगितलेल्या ती आठवण आजही ताजी आहे ....
23 Oct 2017 - 2:37 pm | राघव
__/\__
जबरदस्त! काय ती एकेक चित्र आहेत.. बाब्बो.. !! पु.भा.ल.ल.टा.
मी स्वतः रेखाटलेल्या काही आकृतींना चित्र म्हणावे की नाही इतपत विचार झालाय करून..
23 Oct 2017 - 4:38 pm | सूड
वाचतोय. पुभाप्र
23 Oct 2017 - 8:18 pm | शशिकांत ओक
चित्रगुप्त,
शब्द आणि चित्र यांच्या संगतीने सीनच्या काठाकाठाने, बोलता बोलता हास्याचे गूढ कसे कसे कोडे सुटणार आहे याची तीव्र लालसा उत्पन्न होत आहे. मिपाकरांच्या दिवाळी अंकातील ही सेरिपी कट्यार काळजात घुसली आहे...
23 Oct 2017 - 8:25 pm | स्वाती दिनेश
सुरूवात तर छानच जमली आहे, लुव्र आणि तिथली मोनालिसा डोळ्यासमोर आली.
पुढील भागाची उत्सुकता वाढली आहे.
स्वाती
23 Oct 2017 - 9:03 pm | मित्रहो
चित्रांच्या सोबतीने सरकनारी कथा आवडली. त्या क्रमशः ने मात्र विचका केला.
23 Oct 2017 - 9:50 pm | पैसा
छान सुरुवात
23 Oct 2017 - 11:34 pm | जुइ
अतिशय रंगतदार कथा. पुढील भाग वाचायला उत्सुक.
25 Oct 2017 - 5:58 pm | चित्रगुप्त
सर्व वाचक आणि प्रतिसादकर्त्यांचे आभार. पुढील भाग लिहितो आहे. लवकरच प्रकाशित करतो.
25 Oct 2017 - 8:01 pm | मारवा
चित्रगुप्तजी
अप्रतिम सुंदर आहे लेख.
नेत्रसुखद तुमचे लेख असतातच नेहमी
या सुंदर लेखासाठी तुम्हाला
मनापासुन धन्यवाद !!!
25 Oct 2017 - 9:35 pm | गुल्लू दादा
खूप छान लिहिलंय...पु.भा.ल.टा.
26 Oct 2017 - 1:50 am | निशाचर
भन्नाट सुरूवात. लोरेंझोच्या प्रतिक्षेत..
26 Oct 2017 - 3:04 am | रुपी
वा! अगदी भन्नाट सुरुवात..
पण क्रमशः फार लवकर आले असे वाटले.
16 Nov 2017 - 10:36 pm | babu b
छान
23 Jan 2018 - 1:58 pm | श्वेता व्यास
खूप विलक्षण वाटलं होतं हा भाग वाचून आणि पुढे काय होणार याची उत्सुकताही! पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहे.
25 Jan 2018 - 12:55 pm | विशाल कुलकर्णी
काय सुंदर गुंफलीयेत सगळी चित्रे ! दिल खुश हो गया ....
20 Sep 2018 - 11:11 am | ज्योति अळवणी
अफलातून. उत्कंठा वर्धक
20 Sep 2018 - 3:40 pm | खिलजि
आत्ताच पहिला भाग वाचून काढला .. खिळवून ठेवणारी सुरुवात .. चित्रगुप्तसाहेब कमाल के हो आप .. सुरुवातीला आगमन न करता वाचत होतो पण प्रतिसादण्यासाठी मला आपण आत आणलेत .. जब्बरदस्त आकर्षण आहे या सुरुवातीच्या भागामध्ये .. पुढील आताच वाचून काढेन म्हणतोय . बाजूला कॉन्फेरेंसमध्ये कर्मधर्मसंयोगाने एक विदेशी आलेला आहे . सेमिनारला . त्याचेही नाव लॉरेंझो आहे . आहे कि नाय योगायोग . बर तो जाऊन दे उडत आणि त्याच सेमिनारही, मी तर बाबा हि कथा वाचल्याशिवाय काही इथून हलणार नाही . धन्यवाद ..
21 Oct 2018 - 12:31 am | दीपक११७७
मजा आली वाचुन काहीतरी नविन वाचायला आणि पहायला मिळतयं अप्रतिम
21 Oct 2018 - 12:31 am | दीपक११७७
मजा आली वाचुन काहीतरी नविन वाचायला आणि पहायला मिळतयं अप्रतिम