मणिपूर! ईशान्य भारतातील एक अलौकिक रत्न! भारत व आग्नेय आशिया यांच्यातील सांस्कृतिक दुवा. भौगोलिक व सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय संपन्न प्रदेश. ईशान्य भारतावर लिहिण्यास सुरुवात केली, तेव्हा मागे त्रिपुरावर एक लेख प्रकाशित केला होता. त्यातील हे पुष्प दुसरे.
मणिपूर हे प्राचीन राज्यांपैकी एक, महाभारतातील अर्जुन-चित्रांगदेच्या कथेमुळे परिचित, पुढे पुराणांत व काही जुन्या ग्रंथांतही उल्लेखित प्रदेश. मध्ययुगीन काळात भारत-ब्रह्मदेश-चीन शांत व्यापारी मार्गावरील एक नागरी स्थान. 'कांगलीपाक' हे या काळातील नाव. हिंदुबहुल असूनही परिचित भारतीय किंवा हिंदू चालीरितींशी तसा या समाजाचा फारसा संबंध नाही. परंतु ही बाब अगदी नर्मदेकाठच्या किंवा गोदेकाठच्या वनवासी बांधवांच्या बाबतीतही सत्य आहे. त्यांच्याही देवदेवता किंवा रितीरिवाज अपरिचित वाटू शकतील इतके वेगळे आहेत. त्यामुळे रोजच्या दृष्टीपलीकडचे समाजजीवन जर अनुभवायचे असेल, तर अशा प्रदेशांचा प्रवास जरूर करावा आणि त्यातील अग्रणी असे हे मणिपूर!
बहुतांशी दुर्गम असलेल्या ईशान्य भारतात अधिकांश वन्य व भटक्या जातीजमातींचेच वर्चस्व असलेले लहान लहान टोळ्यांचे प्रदेश आहेत. अविश्वसनीय प्रमाणात वैविध्य हे इथले वैशिष्ट्य. असे बऱ्याचशा भागाविषयी सत्य असले, तरी मोठ्या भूभागावर एकछत्री वर्चस्वाखाली नागरी संस्कृतीचा विकास असा येथे तीन प्रदेशांत झाला - आसाम, त्रिपुरा व मणिपूर. तिन्ही प्रदेशांत स्वतःची अशी सांस्कृतिक ओळख शतकानुशतके उत्क्रांत होत अधिक प्रगत, गडद व दृढ होत गेली. मणिपूरमध्ये सतराव्या शतकात परिचित हिंदू पद्धतीशी साम्य असणारी पहिली छटा इथे उमटली ती चैतन्य-वैष्णव संप्रदायाच्या राजाश्रयामुळे. या काळात ही उपासनापद्धती लोकप्रिय झाली ती आजतागायत. आजही येथे बहुतांश लोक याच पूजापद्धतीचे उपासक आहेत आणि त्याचबरोबर प्राचीन 'सनामाही' संप्रदायातील उत्सव, विधीसुद्धा साजरे होतात. अशी बहुरंगी बहुढंगी सर्वसमावेशक समाजरचना इतर ईशान्य भारतीय लघु-राज्यांच्या तुलनेत बरीच टिकून आहे. ख्रिस्तीकरणाची कीड इथेही लागलेली आहेच, परंतु तूर्तास ते क्रमांक दोनवर आहेत. समृद्ध प्राचीन परंपरा असलेले व नंतर ख्रिस्तीकरणाच्या वरवंट्याखाली भरडले गेलेले डझनभर प्रदेश बारकाईने पालथे घातलेले आहेत. त्यामुळे ईशान्य भारताच्या वास्तवाची धग व भविष्याची जाणीव फार-फार अस्वस्थ करते, परंतु... असो...
ब्रिटिश काळातही त्रिपुरा व जैंतिया राज्यांप्रमाणे मणिपूर स्वतंत्र राज्य होते. १९४७च्या नंतरही दोन वर्षे त्यांनी स्वतंत्र राजेशाही राखण्याचा प्रयत्न केला, परंतु १९४९मध्ये भारताबरोबर करार करून 'क' वर्ग राज्य म्हणून भारतात सामील झाले. पुढे केंद्रशासित प्रदेश व १९७२पासून पूर्ण राज्य. त्या वेळी काही घटकांनी भारतात विलीनीकरणास विरोध केला होता, त्यातून पुढे प्रादेशिक अशांततेस कारणीभूत ठरणाऱ्या काही चळवळी उदयास आल्या. विलीनीकरणाच्याच सुमारास नवस्वतंत्र ब्रह्मदेशाशी बोलणी करून सीमावादही संपवण्याची चांगली संधी होती, ती आपण गमावली. अनेक सलणाऱ्या जखमांपैकी ही फारशी चर्चेत नसणारी एक. छिंदवीन नदी ही भारत व म्यानमारमधील खरी भौगोलिक सीमा. अनेक नागा व इतर जमाती आजही या नदीपर्यंतच्या प्रदेशात विखुरलेल्या आहेत. परंतु कृत्रिम आंतरराष्ट्रीय सीमा ही नदीच्या बरीच अलीकडे असल्याने अनेक परिवार दोन भिन्न देशांत राहतात. तुलनेत ही युद्धग्रस्त सीमा नसल्याने, त्याचा सुरुवातीस त्रास न व्हावा असे वाटलेही असेल; परंतु अमली पदार्थांची तस्करी व नक्षलवाद्यांची लपण्याची जागा म्हणून याचा वापर होऊ लागल्याने आता या प्रश्नाचे परिणाम दृश्य आहेत.
भौगोलिकदृष्ट्या, हिमालयाच्या पूर्वेकडील रांगा ब्रह्मपुत्रेच्या वळणाने दक्षिणेस वळत कमी उंचीच्या टेकड्यांच्या शृंखलेच्या रूपात खाली गंगासागरापर्यंत जातात, त्या रांगांमध्ये वसलेल्या नागालँड-मणिपूर-मिझोराम या त्रयीतले हे मधले राज्य. इथले भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे चौकोनी आकाराचे हे राज्य एखाद्या बशीप्रमाणे आहे. काश्मीरमध्ये श्रीनगर परिसर जसा 'व्हॅली'मध्ये आहे, तसेच येथे राजधानी इंफाळ व परिसर खोलगट भागात असून भोवती चारही बाजूंनी डोंगराळ भाग आहे. कदाचित त्यामुळेच येथील निवासी ‘मेइतेई’ किंवा 'मणिपुरी' संस्कृतीचे संरक्षण व संवर्धन झाले. सखल भागात वैष्णव मेइतेई लोक व भोवताली डोंगराळ भागात वनवासी जमातींचे (आता) ख्रिस्ती लोक अशी राज्याची कायमस्वरूपी विभागणी झालेली आहे.
पूर्वतयारी : त्रिपुरावरील लेखात लिहिल्याप्रमाणे एकंदर ईशान्य भारत प्रवासाचा प्रवास हा मुख्यतः त्रिपुरा व मणिपूर या राज्यांवर केंद्रित होता. परंतु प्रवासाची सोय व साधने, खिशाला सोपे पडतील असे पर्याय व एकट्याने सुरक्षित असेल असे मार्ग हे सर्व लक्षात घेता त्याहून थोडे अधिक या प्रवासात समाविष्ट केले. मणिपूरमध्ये रेल्वे नाही (सध्या बांधली जात आहे). हवाईमार्गासाठी इंफाळमध्ये विमानतळ. रस्त्यामार्गे आसामातून नागालँडमार्गे एक महामार्ग, तर सिल्चरमार्गे दुसरा. मूळ योजनेत मी जाताना गुवाहाटी-कोहिमा-इंफाळ व परतीसाठी इंफाळ-सिल्चर-अगरतला असे मार्ग निवडले. तुमच्या योजनेला मणिपूर काडीचीही किंमत देत नाही हा अनुभव पुढे आलाच, पण तीच तर खरी प्रवासाची मजा आणि शिकण्याची संधीही. नागालँडमार्गे जायचे म्हणजे त्यासाठी परवाना (इनरलाईन परमिट) पाहिजे, त्याविषयी अधिक माहिती त्या राज्याविषयीच्या लेखात बघू, परंतु ते एक आवश्यक. दिल्लीतल्या ब्रह्मदेशाच्या दूतावासाकडे व्हिसाविषयक माहितीसुद्धा विचारून ठेवली. परंतु ई-व्हिसा हा फक्त मंडले व रंगून येथे विमानाने जाणाऱ्यांसाच मिळतो, व भूमार्गाने जाण्यासाठी दिल्लीतल्या दूतावासाकडून रीतसर व्हिसा घेणे आवश्यक आहे, हे कळले. ते कदाचित लागणार नव्हते, परंतु माहिती असलेली बरी. जीवविविधतेसाठी हा प्रदेश फार विशेष असल्याने त्याविषयीचा थोडा अभ्यास, सीमावर्ती भागातील सद्य परिस्थितीच्या माहितीसाठी त्याविषयीचा अभ्यास व थोडा अन्नविषयक, असा प्रामुख्याने प्राथमिक पूर्वतयारीचा आवाका. या प्रवासामध्ये भाषेवर फारसा जोर दिला नाही, परंतु तरीही बंगालीची थोडी तयारी केली होती. आसाम, त्रिपुरा, दिमापूर (नागा.)मध्ये त्याचा उपयोग बराच होतो. मणिपूर व नागालँडमध्ये इतरत्र अनेक भाषा असल्याने किती शिकले तरी कमीच असे असल्याने तो सगळाच विषय ऑप्शनला टाकला. सीमावर्ती भाग असल्याने पासपोर्ट बाळगणे हितकर होते, ते पुढे फायद्याचेही ठरले. एकंदर प्रवासाचा आराखड, कोहिमाहून इंफाळकडे प्रयाण, इंफाळमध्ये वास्तव्य, पुढे एकेका दिवसाच्या लहान मोहिमा. प्रमुख गंतव्य मोइरांग, लोकताक सरोवर, ब्रह्मदेश सीमा, इंफाळ शहर इत्यादी.
भटकंती : ईशान्य भारताचे प्रवेशद्वार, गुवाहाटी, माझ्याही प्रवासाचे प्रारंभस्थान. तेथून नागालँड एक्स्प्रेस, कामाख्या-दिमापूर, नंतर नागालँड प्रवास. पुढे कोहिमा-इंफाळ सार्वजनिक प्रवासी वाहतूक. ही लहानशी राज्ये अगदी दाटीने एकमेकांलगत असूनही थेट प्रवास सुविधा फारशा नाहीत, असे एकंदर दिसले. म्हणजे, कोहिमाहून मणिपूर सीमेपर्यंत एक वाहन, पुढे सीमेपासून पहिल्या शहरापर्यंत दुसरे, आणि मग बस वगैरे, इंफाळपर्यंत. नागालँड प्रवास थोडक्यात पण समाधानकारक झाला. तिथल्याही योजनेचे बारा वाजवणाऱ्या गोष्टी नंतरच्या भागात पाहूच. कोहिमाहून सार्वजनिक वाहतुकीची साधने सकाळी फार लवकर गाठावी लागतात. आधीच हा भाग अतिपूर्वेकडे असल्याने दिवस फार लवकर सुरू होतो. त्यात कोहिमाचे हवामान अत्यंत आल्हाददायक. या सगळ्यात हे सकाळी लवकर आवरून बाहेर पडणे अंमळ अनिच्छेनेच. पण इलाज नाही. नकाशावर प्रवास खूप लहान वाटत असला, तरी प्रत्यक्षात बराच वेळ खाणारा असणार आहे हे माहीत असल्याने सकाळीच निमूट सुरुवात. येथील रस्ते सीमावर्ती महामार्ग प्राधिकरणातर्फे बांधले व राखले जातात, त्यामुळे लहान असले तरी दर्जा उत्तम आहे. पण तरीही डोंगराळ भाग असल्याने सगळा घाटरस्ता आहे व त्यामुळे वेग फारच कमी ठेवावा लागतो. पहिला टप्पा कोहिमा ते माओ, मणिपूर सीमा. नागा वाहने येथून मणिपूरकडून येणाऱ्या लोकांना घेऊन परत जातात. माओपासून सेनापतीपर्यंत दुसरा टप्पा. हे दोन्ही टप्पे डोंगराळ भागातले. मार्गावर अनेक लहान लहान खेडी. पण लक्षणीय स्वच्छता. सगळ्या खेड्यांत मोठाली चर्च व फुटबॉल मैदान. शेती प्रामुख्याने भाताची, व उतरणीवरच्या खाचरातली. जीप व तत्सम वाहनांतून येथील मुख्य वाहतूक होते. इतरत्र ग्रामीण भागात असलेल्या प्रवासी सोयीप्रमाणेच येथेही जास्तीत जास्त लोक घेऊन ही सेवा चालते. सेनापती हे पहिले मोठे शहर व तिथपासून पुढे सखल भाग सुरू होतो. रस्तेही तसे मोठे होतात व येथपासून बस वाहतूक उपलब्ध आहे.
वाहतुकीचे साधन, स्वच्छ गाव
डोंगरउतारावर वसलेली गावे
उतरणीवरची शेती
फुटबॉल मैदान
स्वागत!
इंफाळ: इंफाळ सर्वात मोठे व राजधानीचे शहर. मध्यभागी ऐतिहासिक 'कांगला' किल्ला. शहराचे जुने नावही 'कांगली' असून मणिपूरसुद्धा 'कांगलीपाक' नावाने ओळखले जाई. इथे पर्यटन व्यवसाय तसा फारसा विकसित नसल्याने सोई बेताच्याच आहेत. मला योगायोगाने एका फोरमवर येथील यूथ हॉस्टेलचा संपर्क मिळाला व तेथेच मी पुढले काही दिवस मुक्काम ठोकला. सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे राहण्याची जागा मध्यवर्ती कांगलाच्या मागील बाजूस लगतच, त्यामुळे वाहतूक व इतर महत्त्वाच्या गोष्टी सहज उपलब्ध. शेजारीच आसाम रायफल्सचा मोठा तळ, त्यामुळे सुरक्षित (असे मानसिक समाधान).
कांगला कोट : तीन बाजूंनी खंदक व एका बाजूने इंफाळ नदी असा हा भुईकोट शहराच्या मध्यावर आहे. आकर्षक मणिपुरी शैलीतली प्रवेशद्वारे, कोटातील सनामाही पंथाची देवस्थाने व गोविंदजी मंदिर ही प्रेक्षणीय स्थळे. सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे आत फिरण्यासाठी सायकल भाड्याने मिळते, त्यामुळे सगळा भाग कमी कष्टात बघता येतो व वाहनांची कटकट नाही. सरकारने चांगली देखभाल ठेवलेली आहे.
कांगला प्रवेशद्वार
राजवाड्याचा प्रवेश, व्याळाप्रमाणे काल्पनिक प्राणी 'कांगला-शा'च्या मूर्ती. समोर ठेवलेल्या सायकलवरून भव्यतेची कल्पना येईल. मणिपूरच्या राजमुद्रेवरही हा प्राणी आहे.
गोविंदजी मंदिर, मणिपूर शैली
गोविंदजी मंदिर, अन्य अवशेष
सनामाही पंथाचे मंदिर
सनामाही देवता
ईमा मार्केट : मणिपूरचे वैशिष्ट्य, संपूर्णपणे स्त्रियांनी चालवलेली बाजारपेठ. एक बाजू भाजीपाला व खाद्यवस्तू, तर रस्त्याच्या पलीकडे दुसरी बाजू कपडे व इतर सामान. एकूणच स्त्रियांचा सहभाग दैनंदिन व्यवहारात बाकीच्या राज्यांच्या तुलनेत लक्षणीय प्रमाणात अधिक आहे.
ईमा मार्केट
ईमा मार्केटमधील सनामाही देवता
आर के सी एस आर्ट गॅलरी : शहरात फिरत असताना योगायोगाने इथे जाणे झाले, पण नक्की भेट द्यावी अशी ही जागा आहे. चित्रकलेचे हे प्रदर्शन असून चित्रातून मणिपूरच्या इतिहासाची, संस्कृतीची, लोकजीवनाची खूप उत्तम ओळख होते.
एक अनुभव : एका संध्याकाळी पायी हॉस्टेलवर जात असताना या कलादालनाचा फलक दिसला. सहज म्हणून गेलो असता एक मध्यमवयीन मनुष्य तल्लीनतेने चित्र रंगवत होता. विचारपूस झाली. मुंबईहून, फिरायला, आणि एकटा हे थोडे नेहमीचे नसलेले विवरण ऐकून कदाचित त्यांना कुतूहल वाटले. पुढे बोलता बोलता समजले की ते स्वतः मालक व कलाकार आहेत. श्री बुद्धिमंत. ते स्वतः बोलत बोलत दालनाकडे घेऊन गेले व प्रत्येक चित्राविषयी भरभरून माहिती दिली. स्वतः कलाकारांकडून त्याच्या आविष्काराविषयी ऐकण्याचे भाग्य काही वेगळेच. मुख्य म्हणजे त्यांची शैली ही मला सर्वात आवडणारी, वास्तवदर्शी आहे. म्हणजे, राजा रविवर्मांसारखी, जशी व्यक्ती तसे चित्र. भाव, अलंकार, वेषभूषा, चित्राची आपली एक कथा असे अगदी जिवंत दर्शन. मणिपुरी नृत्याचे एक सुंदर चित्र होते, त्यांनी त्याचा इतिहास सांगण्यास सुरुवात केली. "महाराज भाग्यचंद्र नावाचे एक राजे होऊन गेले..." मी म्हणालो, "हो, माहीत आहे मला त्यांच्याविषयी. त्यांनी नाट्यशास्त्राच्या अभ्यास करून मणिपुरी नृत्याच्या प्रमुख रासलीलांची रचना केली. आम्ही भारतातील श्रेष्ठ व्यक्तींची नावे असलेले एक स्तोत्र म्हणतो, त्यात त्यांचा उल्लेख आहे (एकात्मता स्तोत्र, 'कलावंतश्च विख्याताः... भागातले 'भाग्यचंद्रश्च भूपती:’ )." त्यांचा विश्वासच बसेना. एक तर 'मुंबईचे लोक' म्हणजे मॉडर्न, आगाऊ, श्रीमंत व पर्यायाने माजखोर व बेपर्वा अशी काहीशी प्रतिमा अप्रगत भागात असते. त्यात त्यांचा दोष नाही. बऱ्याच प्रमाणात ते सत्य आहे. हे प्रदेश आणि लोक आपल्यासारख्यांच्या खिजगणतीतही नाहीत, याची त्यांना कल्पना आहे. त्यातील कोणाला मणिपूरचा इतिहास... त्याही पलीकडे, मणिपुरीचा इतिहास (नृत्य) असे काही माहीत असेल ही कदाचित अपेक्षा नव्हती. (आपल्यातीलच किती लोकांना ईशान्येतील सर्व राज्यांची नावे माहीत आहेत? (काही इथेच नापास होणार.) त्यातल्या कितींना त्यांच्या राजधान्या माहीत आहेत? (अर्धे गळाले.) आणि शेवटी उरलेल्यातल्या किती जणांना त्यांचे मुख्यमंत्री किंवा एक प्रसिद्ध किंवा अगदी सामान्यसुद्धा, व्यक्ती माहीत आहेत? एक नाव... मिझोरामच्या बाबतीत मीही नापासच… असो... ) पण या संभाषणाने असा काही स्वर लागला की पुढील दोन तास मी मणिपूरच्या इतिहास-वास्तवाशी अगदी एकरूप झालो. शेवटच्या दालनात राजघराण्यातील व्यक्तींची चित्रे होती. एकेकाची ओळख करत शेवटी ते म्हणाले, "भाग्यचंद्रांसारखे श्रेष्ठ कलाकार जन्माला घालणाऱ्या राजवंशाचा मी एक सामान्य वंशज!" वाह, काय योग यावा! चौकस वृत्ती व चौफेर दृष्टी प्रवासामध्ये मोठा अनपेक्षित लाभ देते, तशातला हा अनुभव. उगीच इथे-तिथे 'जाऊन तर बघू' अशी वेळ देऊन केलेली भटकंती अशी फायद्याची.
श्री बुद्धिमंत व कलाकृती. त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवरून साभार.
प्राणिसंग्रहालय : खरे पाहता मी मौजेसाठी किंवा प्रदर्शन म्हणून प्राण्यांना असे कृत्रिम वातावरणात ठेवण्याच्या पूर्णपणे विरोधात आहे. परंतु क्वचित कुठे काही चांगली निष्पत्ती अशा संग्रहातून झाली आहे, त्याचे मणिपूरचे प्राणिसंग्रहालय एक उदाहरण आहे. येथील दुर्मीळ सांगाय हरणे नामशेष झाली असे वाटू लागले असता १९५३मध्ये त्यांच्या तीन जोड्या आढळून आल्या. त्यांचे संगोपन करून पुढे हळूहळू प्रजाविस्तार झाला, तशी ती हरणे पुन्हा त्यांच्या नैसर्गिक आवासात सोडण्यात आली. ताज्या गणनेनुसार सध्याची संख्या २६०च्या वर आहे. या प्रकल्पाची माहिती घेणे हा इथे भेट देण्याचा एक उद्देश. दुसरा, येथील पक्ष्यांच्या प्रजाती - विशेषतः 'फिझन्ट' किंवा तित्तर वर्गातील पक्षी, अतिशय अनोखे असून त्यांची भटकंतीच्या आधी किमान तोंडओळख होणे महत्त्वाचे वाटले व नंतर ते अतिशय उपयुक्तही ठरले.
नॉनगीन किंवा ह्युम्स फिजन्ट, मणिपूरचा राज्य-पक्षी
सीमावर्ती भागाची सफर : हा एक प्रवासाचा विशेष उल्लेखनीय भाग. मणिपूरच्या सीमेवरील मोरे गाव म्हणजे महत्त्वाकांक्षी (सिंगापूर)-बँकॉक-दिल्ली-(इस्तंबूल) महामार्गावरले भारताचे प्रवेशद्वार. या महाप्रकल्पाचा दिल्ली-बँकॉक हा भाग लवकरात लवकर कार्यरत होईल, अशी सध्यातरी तिन्ही देशांची इच्छा, तयारी व प्रयत्न दिसताहेत. पुढे याच मार्गावर रेल्वेसुद्धा धावेल, परंतु त्यासाठी बरेच काम म्यानमारमध्ये करावे लागणार आहे. एकंदरच पर्यटनाच्या दृष्टीने मणिपूर फारसे प्रगत नाही. त्यात सीमावर्ती भागात कोणीच फिरकत नाही, त्यामुळे या भागाविषयी फारशी माहिती उपलब्ध नव्हती. परंतु एक-दोन ठिकाणी येथील सीमा व्यापार व तस्करी दोन्हीच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचे उल्लेख वाचले होते. तसेच येथे ब्रह्मदेशात प्रवेशही करता येतो असेही वाचले होते. इथेही जाण्यास इंफाळमधून जीपसारखी वाहने मिळतात. आधी उल्लेख केल्याप्रमाणे, इंफाळ हे सखल भागात असून भोवताली डोंगररांगा आहेत. त्यामुळे हा सर्व प्रवास चढाचा व नंतर घाटाचा. वाटेत अनेक लहान-मोठी खेडी. इथल्या नक्षली कृत्यांची बातमी अध्येमध्ये झळकत असते. नंतरच्या काळात इथेच आपल्या लष्करी तुकडीचे दुर्दैवी शिरकाण झाले होते व त्यानंतर ब्रह्मदेशातील प्रथम 'सर्जिकल स्ट्राईक', त्यांच्या हद्दीत घुसून अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले. थोडक्यात, अशांत व फारसा सुरक्षित नसलेला प्रदेश. एअरटेलचे नेटवर्क या भागात चांगले असल्याने ते प्रवासी कार्ड घेऊन गेलो होतो, आणि त्याचा फार उपयोग झाला. शक्यतो एकल प्रवासात मी रोज एखादे चित्र किंवा संदेश फेसबुकवर प्रकाशित करतो, जेणेकरून प्रवासाच्या पाऊलखुणा मागे राहतील व त्याबरोबरच जरा शो ऑफ कधी-कधी. इतरांना काय वाटेल याच्याशी देणे घेणे नाही, परंतु अशा पाऊलखुणा मागे ठेवणे एकल प्रवासात महत्त्वाचे आहे. तसेच ज्यांना खरेच तुमच्याविषयी काळजी आहे, त्यांना दिलासा मिळत राहतो की सर्व ठीक आहे. या प्रवासाचा दिवस मात्र असा होता की जेव्हा कधी खेडे येईल व नेटवर्क असेल, तेव्हा मी चेक इन करत होतो. एकंदरच आसाम-नागालँड-मणिपूर अशी काही दिवसांपासून चालू असलेली ही चेक-इन मालिका आता बरीच लोकप्रिय झाली होती. या दिवशीची गावे मात्र कोणाच्याच ओळखीची नव्हती. त्यामुळे 'चर्चा तर होणारच'... "काय, भारत दर्शन का?", "अरे नोकरी सोडलीस का?", "घरातून हाकलून दिलंय का?", "तिथे कशाला गेलायस मरायला"पासून "मेरी कोमला भेटून ये"पर्यंत नुसती धमाल... असो. घाटात एका सीमा सुरक्षा दलाच्या चौकीवर गाडी रोखली. मी सवयीप्रमाणे उतरलो, दरीच्या कडेला जाऊन दृश्य टिपायला सुरुवात केली. एक संगीनधारी आला धावून, "या दिशेत फोटो घ्यायला बंदी आहे". दूरवर एक पुढली चौकी त्या दिशेस होती. माझे आधीचे फोटो तपासण्यात आले, कागदपत्रे तपासली गेली. 'पर्यटक आहे' हे फारसे पटण्यासारखे नव्हते. माझे कंपनीचेही ओळखपत्र मी जवळ ठेवले होते ती एक उत्तम गोष्ट केली. इथला इथला रहिवासी, सामान्य नोकरदार माणूस, मुंबईहून मणिपूर बघायला आलो आहे इत्यादी प्रस्तावना, गुवाहाटीचे तिकीट, इंफाळमधील पत्ता, पासपोर्ट/पॅन कार्ड, कंपनी आय कार्ड, नागालँड सरकारचे परवानापत्र हे सर्व आता प्रत्येक चौकीवर, व शेवटी 'काय काय येडे लोक असतात'पासून 'एकट्याने म्हणजे कौतुक आहे'पर्यंतचे शेरे व कटाक्ष.
उगवतीचा उजाळा
देवीचे देऊळ
नयनरम्य निसर्ग
…करता करता, सीमेपासून साधारण २० किलोमीटरवर एक मोठी चौकी 'खुडेंगथाबी'. रस्त्याच्या कडेला मस्त छोटेखानी छप्पर टाकलेली हवेशीर चौकी, मागे खुली दारी व नयनरम्य निळसर हिरव्या टेकड्या. मोठे कार्यालय बाजूलाच जरा उंचावर. इथे प्रवाशांना उतरवून त्यांची व वाहनांची वेगळी आणि कसून तपासणी केली जाते. सैनिक वाहनाचा ताबा घेतात व अगदी सीट कव्हरपासून सगळे तपासले जाते. माझी आता परिचयाची झालेली सगळी चौकशी सुरू झाली. एकंदर अवतार पाहून शेजारी बसलेल्या अधिकाऱ्याने वेगळे बोलावले. कागदपत्रे तपासली आणि खणखणीत मराठीत प्रश्न "या भागात फिरण्याचे धोके माहीत आहेत का? मजा म्हणून असो वा माज म्हणून असो, एकट्याने भटकण्याचा हा प्रदेश नव्हे." मी अवाक आणि खूशही. पाटणकर म्हणून पुण्याचे अधिकारी, आसाम रायफल्सच्या सीमा सुरक्षा सेवेतील अधिकारी. एवढ्या दूर आपल्या प्रदेशातील माणूस भेटणे हा आनंद (त्यांना अधिक) आणि त्यात रोजच्या कामात त्यांना तस्कर, पारधी अशा लोकांशी डील करावे लागत असल्याने अशा वेगळ्या कारणासाठी इथे लोक आले की त्यांचे फार कौतुक. हा एकट्यादुकट्याने फिरण्याचा प्रदेश का नाही यावर त्यांनी प्रेमळ कानउघाडणीही केली, परंतु अतिशय उपयोगाची माहिती व मदत देऊ केली. पुढे कुठे लागले तरी माझे नाव सांगून आसाम रायफल्सकडे आश्रय घे असेही सांगितले.. त्याचा जरा विपरीत परिणाम झाला, त्याचीही कथा पुढे येईलच. अतिशय स्पष्ट शब्दात त्यांनी सावध मात्र केले. "सहप्रवाशाकडेही काही वावगे सापडले तर नाहक नको त्या जाळ्यात अडकशील. त्यामुळे सावध राहा. सीमेपर्यंत आपले लोक आहेत ते काळजी घेतील, पण पहिला सल्ला तर सीमा ओलांडूच नये हा. आणि जर गेलास, तर हे ध्यानात राहू दे की पलीकडे मिलिटरी राज आहे. त्यामुळे फार सौहार्दाची वा मदतीची अपेक्षा ठेवू नये. जसे आम्ही तिकडच्या लोकांना संशयाच्या भिंगातून पाहतो - आमचे सुरक्षेचे कामच आहे ते - तसेच तेही तुला तशीच वागणूक देणार आहेत. आम्ही सीमेपलीकडे कोणत्याही प्रकारची थेट मदत करू शकणार नाही." तोपर्यंत बाजूच्या एकदोघांना पिटाळून सैन्याच्या कँटीनमधून चहा-सामोसा अशी व्यवस्था झाली. निरोप घेऊन आमची गाडी सीमेकडे. तासाभरात मोरे गाव. मुख्य चौरस्त्यावरच एक मोठी चौकी. सीमापार जाण्यासाठी पुढील कागदपत्रांची सोय करण्यासाठी एका अधिकाऱ्यांना विचारले असता ते स्वतःच सही-शिक्का देत असल्याचे समजले व काम लगेचच झाले. भारत-म्यानमार मैत्री करारानुसार दोन्ही देशातील नागरिक १० मैलांपर्यंत मुक्त ये-जा करू शकतात, असा कायदा अलीकडे झाला त्याचा उल्लेख या पत्रात असतो, व त्याबरोबर वैयक्तिक माहिती. पुढे सीमा ओलांडण्यासाठी पुलावरून वाहनाचा मार्ग व बाजारपेठेत पायी मार्ग. सीमेवरचा लहानसा पूल बघून बाजारपेठेतून सीमेपार. तिथे भारत-ब्रह्मदेश मैत्रीच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक द्वार अलीकडे उभारले आहे.
भारत-ब्रह्मदेश मैत्रिद्वार
सीमासेतू. पिवळा भाग ब्रह्मदेश व पांढरा भाग भारत
सीमोल्लंघन : सीमेवरील ब्राह्मी अधिकारी पासपोर्ट व सरकारी पत्र ठेवून घेतो. अतिशय साधी व्यवस्था. झाडाखाली कचकड्याची एक खुर्ची आणि तुटके टेबल अशी ही आंतरराष्ट्रीय 'चेक पॉईंट' चौकी. भारताच्या बाजूला जरा बरी परिस्थिती. एक काँक्रीट शेड, त्यात सुरक्षा स्कॅनर, पंखे वगैरे. त्या तुटक्या टेबलवर एका कोपऱ्यात ब्राह्मी अधिकाऱ्याने ज्या प्रकारे माझा पासपोर्ट टाकला, त्या वेळी दहा विचार मनात येऊन गेले, पण आता काही तासांसाठी त्याच्यावर हवाला. पुढे भव्य बाजारपेठ. चिनी मालाने भरलेली. नेपाळ व भूतानमधून स्थायिक झालेले हिंदू, स्थानिक नागा व ब्राह्मी लोक आणि रोहिंग्या मुसलमान असे एकंदर लोक. स्वस्त कपडे, इलेक्ट्रॉनिक्स इत्यादींनी भरलेला बाजार. भारतीय रुपयातील व्यवहार. व एक लक्षणीय गोष्ट - प्रचंड प्रमाणात कॅश. ठिकठिकाणी १००-५००-१०००च्या गड्ड्यांचे ढिगारे घेऊन बसलेले लोक. ते नक्की काय करतात ते समजू शकले नाही. कदाचित बाहेर जाऊन पांढरा होणार काळा पैसा असावा किंवा बाहेरून येणारा खोटा पैसाही असू शकतो, परंतु नोटबंदीने या लोकांचे चांगलेच कंबरडे मोडले असणार. इथे क्षुल्लक खरेदी केली, परंतु परतीचे पैसे ब्राह्मी चॅट्समध्ये घेतले, तेवढेच तिथले चलन गाठीशी, ते पुढे ब्रह्मदेशाच्या दौऱ्यात खर्च करून टाकले. ही ब्रह्मदेशाची पहिली झलक. पुढे एक विस्तृत दौरा आखायचे डोक्यात होते, त्याचा हा तयारी/अभ्यास दौरा. संध्याकाळी सीमेवरून पासपोर्ट त्याच कोपऱ्यात थोडी 'विदेशी' धूळ लेऊन पडलेला होता, तो ताब्यात घेत परत.
तामू बाजारपेठ, ब्रह्मदेश
परतीचे वाहन हा आणखी एक किस्सा. एक पोरगा गाडी घेऊन तयार होता. त्या गाडीत एक मुसलमान जोडपे शेंगांचा प्रचंड मोठा ढिगारा घेऊन बसलेले. आख्खी गाडी हिरव्या शेंगानी भरलेली, व कोपऱ्यात ते दोघे. परतीचा प्रवास त्याच मार्गाने, पण वेगळा थरार. पहिल्या चौकीपासून जरा जास्तच तपासणी होत होती. कदाचित सीमेकडून येणारी गाडी असल्याने असेल कदाचित, असे वाटले. पण दुसऱ्या-तिसऱ्या चौकीनंतर लक्षात आले की ते कोणा 'मुंबईवाल्याची गाडी' म्हणून विशेष तपासत आहेत. झाले असे - पाटणकरांनी पुढच्या मागच्या चौक्यांना निरोप धाडला, 'एक मुंबईचा प्रवासी असलेल्या गाडीवर लक्ष ठेवा.' मूळ हेतू 'चौकशी झालेली आहे तेव्हा फार त्रास न देता गाडी बाकीच्यांच्या आधी लवकर काढा' असा होता, परंतु तो नेमका उलट अर्थाने घेतला गेला. साहेबांनी सांगितलंय मुंबईवाल्याच्या गाडीवर लक्ष ठेवा, म्हणजे काहीतरी गडबड आहे. दर चौकीवर प्रश्नांचा सुळसुळाट. शेवटी हे लक्षात आल्यावर एका चौकीवरून पाटणकरांना फोन लावला. सैनिकी खाक्यात बिचाऱ्या चौकीवाल्या शिपायांना जाम शिव्या पडल्या, पण तेव्हा कुठे हा उलगडा होऊन पुढे गाडी सुरळीत गेली. पण या सर्वात आमचे तीन एक तास गेले. गाडी चालकही हैराण. कुठे हा कार्टा बसवला गाडीत असे झाले. पण पुढल्या चौक्यांत विशेष श्रेणीत गाडी लवकरही काढण्यात आली, त्यात त्याची भरपाई झाली. निळसर हिरव्या डोंगरदऱ्यांचे सौंदर्य आणि भारताच्या एका सीमेला प्रत्यक्ष भेट याव्यतिरिक्त या प्रवासात फार असे पाहण्यासारखे नाही, परंतु अनुभव म्हणून हा प्रवास फारच वेगळा. या मार्गावर फारशी रहदारी नाही व सैन्याचा वचक आहे, त्यामुळे इथले जंगल फार सुंदर. इंफाळच्या प्राणिसंग्रहालयात पाहिलेले पक्षी येथे मुक्त वातावरणात बागडताना दिसले. एके ठिकाणी एक आळसावलेले अस्वल, हरितमयूर, रंगीबेरंगी चिमण्या व तित्तर हे विशेष.
अस्वलभाऊ
हरितमयूर Green Peafowl
हरितमयूर
सुवर्ण तित्तर Golden Pheasant Male-female
परतीच्या वाटेवर, संधिप्रकाश
इंफाळ इस्कॉन
मोइरांग : इंफाळहून दक्षिणेस साधारण दीड तासावर मोइरांग हे छोटे शहर आहे. इथेही इंफाळहून स्थानिक सहा सीटर वाहने चालतात. रोजच्याप्रमाणे सकाळी लवकर इंफाळहून प्रस्थान ठेवले. जवळच नेताजी व आझाद हिंद फौजेच्या स्वातंत्र्यलढ्याचे स्मारकही आहे, परंतु ते नूतनीकरणासाठी बंद असल्याने पाहता आले नाही. नेताजींनी अंदमान-निकोबार पाठोपाठ स्वतंत्र भारताच्या प्रयत्नातील पहिला तिरंगा फडकवला तो या गावात. १४ एप्रिल १९४४! दुसरे महायुद्ध प्रत्यक्ष भारतभूमीवर आले ते या इंफाळ व कोहिमा येथील लढायांमुळे. आझाद हिंद सेनेचे जे खरे 'स्वातंत्र्यसैनिक' होते, त्यांचे आज नावही शिल्लक नाही. त्यांच्याविरुद्ध ब्रिटिशांकडून मोर्चा सांभाळणारी तुकडी होती 'मराठा लाईट इन्फन्ट्री'. पुढे ते जिंकलेही, व आझाद हिंद सेनेस विविध कारणांनी माघार घ्यावी लागली. पण भारताच्या इतिहासातील हे एक करडे पान... खरे कोण जिंकायला हवे होते? आपण आपल्याच लोकांचे प्रयत्न ओळखण्यात कमी पडलो का? स्वातंत्र्याच्या केवळ ३ वर्षे आधीदेखील आपल्या अस्मिता जागृत झाल्या नव्हत्या काय? जे हरत असूनही प्राणपणाने लढले, ते कोणासाठी? आज आपण त्यांचे कृतज्ञ आहोत का? असे अनेक प्रश्न... काही अनुत्तरित... स्मारके जेत्यांचीच उभी राहिली. आझाद हिंद सेनानी भुकेने मेले आणि विस्मृतीत गेले. स्वातंत्र्यपर्वातील स्फूर्तिस्थाने म्हणून सेल्युलर जेल, मंडले, झाशीचा किल्ला, ऑगस्ट क्रांती मैदान, जलियाँवाला बाग, लाल किल्ला, साबरमती, लाहोर जेल अशी अनेक ठिकाणे लोकांच्या डोळ्यासमोर आपापल्या विचारसरणीनुसार येत असतील, पण मोइरांगचे अनन्यसाधारण महत्त्व असतानाही त्या यादीत त्याचे नाव फारच क्वचित मिळेल, ही सल आहे. असो...
मोइरांगच्या वाटेवर
कैबुल लामजाव राष्ट्रीय अभयारण्य : मोइरांगमध्ये न्याहारीच्या वेळेपर्यंत पोहोचून पुढे कैबुल लामजाव राष्ट्रीय अभयारण्यात - म्हणजेच सांगाय हरणांच्या तरंगत्या जंगलात जायचे, असा बेत. इथले लोकताक सरोवर एका विशेष गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. येथे पाण्यावर तरंगणारी गवताची एक प्रजाती वाढते. जसजसे गवताचे रान जुने होत जाते, तसे त्यात अन्य वनस्पती, चिखल, माती इत्यादी जमा होत होत एक तरंगते बेटच तयार होते. अशा बेटाला येथे 'फुमडी' अशी संज्ञा आहे. अशा तरंगत्या वस्तुमानाला आकार देत येथे शेतीही होते. पण सरोवराचे पाणी वाढले की दिसणारे दृश्य फारच मनोहर असते. इथे आढळणारी हरणेही या तरंगत्या बेटांवर संचार करतात व अशी भू-जल स्थिती केवळ इथेच असल्याने फक्त याच भागात आढळून येतात. मागे लिहिल्याप्रमाणे त्यांच्या संवर्धनाच्या प्रयत्नास चांगलेच यश आले आहे.
मोइरांगच्या वाटेवर
मोइरांग गावात नाश्ता आटोपून स्थानिक वाहनाने लोकताक सरोवराकडे प्रस्थान केले. सरोवराच्या मधोमध एक लहानशी टेकडी आहे, तिथून सरोवराचे विहंगम दृश्य दिसते. पायथ्याच्या एका खेड्यात उतरून मिळेल त्या उनाड वाटेने टेकाडावर चढून काही चांगली चित्रे टिपली व पुढे सांगाय हरणांच्या जंगलात जाण्यासाठी उतरून दक्षिणेकडे चालू लागलो.
टेकडीवरून दिसणारे लोकताक सरोवर
दूरवर पसरलेली तरंगती गवताची बेटे - एक अनोखे दृश्य
सांगाय हरणांच्या प्रदेशात : अंतराचा अंदाज होता, परंतु गावाबाहेर काही साधन मिळणे दुरापास्तच होते, त्यामुळे पुढे एका दुचाकीवाल्याला थांबवले. एकल प्रवासातील 'हिच-हायकिंग' अथवा 'अंगठा दाखवा - गाडी थांबवा' स्वारी एक फार महत्त्वाचा घटक. पैसे वाचतातच, शिवाय स्थानिक लोकांची ओळख होते, प्रवासात गप्पा होतात. कधी कधी त्याहीपेक्षा लाभदायक योग येतात, त्यातला इथे एक. ज्या गाडीवाल्यास थांबवले, तो येथील अभयारण्यात काम करत होता. त्यामुळे तो बरोबर घेऊन गेलाच, व नंतर माझ्याबरोबर त्याची होडी घेऊन हरणे दाखविण्यासही आला त्याची दुर्बीण घेऊन! सहा सहा फूट वाढणाऱ्या इथल्या गवतामध्ये हरणे दिसावीत म्हणून गवत कापलेले चर तयार केले आहेत. त्यामुळे एका भागातून दुसऱ्या भागात जाताना हा चार आडवा आल्याने हरणे उघड्यावर येतात व पाहता येतात. पहिल्यांदा खूप दुरून काही हरणे टिपली व नंतर पावलांचा माग काढत एका ठिकाणी जरा जवळून. फार छान दुपार. पट्टेरी वाघांपेक्षा दुर्मीळ प्राणी जवळून पाहायला मिळणे हे विशेष.
गवताळ दलदलीतून मार्ग
दूरवर पहिले हरीण दिसले
खुरांचे ठसे शोधत मागावर
नर सांगाय
मादी सांगाय
हरणांची वाट पाहताना टिपलेले काही
रंगीत कोळी
मणिपूरचा निरोप : मणिपूर वास्तव्यात सर्व काही सुरळीत चालले असताना शेवटच्या दिवशी मणिपूरच्या कुप्रसिद्ध बंद पुकारण्याचा सवयींचाही अनुभव घेतला. साधारण दुपारी सिल्चरकडे निघायचे, म्हणून सकाळी फेरफटका मारायला बाहेर पडलो, तर सगळीकडे घाई गडबड दिसली. कोणत्यातरी संघटनेने बंद पुकारला म्हणे. १०पासून सगळे बंद. मणिपूरमधले असे संप अक्षरशः महिनोन्महिने सुद्धा चालतात व सगळी वाहतूकच थांबली तर कुठेच ये-जा अशक्य होऊन बसते. अशा वेळी पलायन हा उत्तम उपाय. लगेचच सामान उचलले, थोड्या विचारान्ती सरळ विमानतळ गाठला व सिल्चर कार्यक्रम रद्द करून थेट अगरतला, त्रिपुरा. पुढे हा संप ५ दिवसांनी संपला व पलायनाचा निर्णय योग्य होता हे नक्की झाले.
तर अशी ही मणिपूरची बरीचशी थ्रिलिंग भटकंती. सीमावर्ती भाग सोडला, तर बाकी सर्व सुरक्षित व सुंदर आहे. ईशान्येतले प्रत्येक राज्य म्हणजे अगदी वेगळा देशच पाहिल्यासारखे आहे.
विमानतळ
मणिपूरच्या बाकी विशेष गोष्टींची ओळखही करून घेऊ...
अन्न : मणिपूर - ईशान्य भारतातील एक अग्रणी शाकाहारी राज्य. सतराव्या शतकापासून वैष्णव संप्रदायाच्या प्रभावामुळे येथील राहणीमानावर बराच फरक पडला. केळीच्या पानाचे इथे फार महत्त्व आहे व त्याचेच विविध आकाराचे द्रोण व ताटे बनवून पारंपरिक प्रकारे अन्न वाढले जाते. दक्षिणेतही केळीच्या पानाचे महत्त्व व वापर दोन्ही आहे, परंतु कलात्मक वापरामध्ये मणिपुरी लोक फार पुढे व तरबेज आहेत. हा प्रदेश जगातील सर्वात तिखट मिरच्या पिकवणारा व खणाराही. भूत झलोकिया, नागा मोरीच अशा सर्वात तिखट मिरच्यांच्या जाती येथे सररास वापरल्या जातात. मी जिथे राहत होतो, तिथे उत्तम मणिपुरी जेवण रोज रात्री मिळत होते. त्याचाही एक मजेदार किस्सा. जेव्हा मी यूथ हॉस्टेलमध्ये रात्री चेक इन केले, तेव्हा एकतर थकवा होता आणि अंधार असल्याने मी आजूबाजूस फार लक्ष दिले नाही. पण दुसऱ्या दिवशी समजले की २०० लोक राहू शकतील एवढ्या जागेत मी एकटाच होतो. आणि एकच मॅनेजर+सिक्युरिटी+स्वयंपाकी. दुसऱ्या दिवशी जेव्हा हे लक्षात आले, तेव्हा थोडा धोका वाटला, पण पुढे सर्व सुरळीत पार पडले. हाही एक वेगळा अनुभव. वीज तर वारंवार जात येत होती, तेव्हा अधिक काळजी वाटे. आता लिहायला मजा वाटतेय... जेवण काही रोजच्या भाड्यामध्ये नव्हते, पण तो भला माणूस रोज दोघांसाठी करत असे.
वेगळी फळे, वेगळ्या भाज्या. त्यामुळे मुळातूनच येथील अन्नाची चव अतिशय वेगळी असते. आपल्याकडे परिचित असलेल्या मसाल्यांचा एकंदरच वापर फार कमी किंवा नाहीच. इथल्या मिरच्या व सुवासिक वनस्पती खाण्याला वेगळाच स्वाद आणतात. काही विशेष पाककृती :
इरोमबा : कोवळे बांबू, बटाटे, भेंडी, शिंगाडे, वालासारखे पाचपट आकाराचे एक धान्य यॉन्गचाक व इतर काही स्थानिक भाज्या, दोन चार प्रकारच्या मिरच्या हे एकत्र शिजवून पावभाजीप्रमाणे घट्ट रस्सा, व त्यात इथले एक प्रकारचे ब्याडगी मिरचीबरोबर भाजलेले मासे, अशी काहीशी ही भाजी.
चक-हाओ अमुबी : काळ्या तांदळाची खीर : काळे तांदूळ व सुकामेवा तुपावर परतून दुधात आटवले की ही सोपी खीर तयार! तांदळामुळे काळपट जांभळा रंग हे या खिरीचे वैशिष्ट्य!
मंगान उटी : चना/पिवळा वाटाणा मसाला : स्थानिक मसाले घातलेली उसळ
सिंगजू : सॅलड किंवा कोशिंबीर : कोबी, यॉन्गचाक बिया, कोवळा बांबू इत्यादी कच्चे बारीक कापून त्यात मिरच्या व स्थानिक ताजे मसाले.
येथील काही फळेसुद्धा विशेष
सो-शांग : अत्यंत आंबट, ऑलिव्हएवढे फळ.
यॉन्गचाक : या हिरव्या शेंगा सर्वत्र मिळतात. व याला इतकी मागणी आहे की मोठ्या प्रमाणात ब्रह्मदेशातूनही मागवल्या जातात. यातील हिरव्या मोठ्या बिया कच्च्या किंवा शिजवून वापरतात.
चित्रात, १. लिची स्थानिक जात, २. सो-शांग व बोरे, वर चिमणीची अंडी, ३. लाल गाजर व मसाले, ४. यॉन्गचाक शेंगा
घोस्ट पेपर, भूत जलोकिया मिरच्या. जगातली सर्वात तिखट प्रजाती
मंगान उटी
पारंपरिक मणिपुरी थाळी
भाषा व लिपी : मणिपुरी किंवा मेइतेई भाषा येथील प्रमुख. साईनो-तिबेटी मूळ असलेली भाषा काही प्रमाणात बंगाली व आसामी भाषेने प्रभावित आहे. या भाषेची स्वतंत्र लिपी वापरात होती. काही काळाने बंगाली लिपीने तिची जागा घेतली. परंतु अलीकडे पुन्हा जुन्या लिपीचे चांगले दिवस आले आहेत. शाळांतून तर त्या लिपीतच शिक्षण दिले जाते. परंतु लोकसहभागाने सार्वजनिक फलकसुद्धा त्याच लिपीत लिहिले जातात. (आपण मात्र मोडी अगदीच मोडीत काढली, याचे दुःख वाटते. व्यवहारातली लिपी नाही बनवली, तरी प्रत्येकाच्या हाताखालून किमान एक शालेय वर्ष तरी ती गिरवली जावी, असे माझे मत.)
साहित्य : मणिपुरी साहित्य परंपरा मराठीइतकीच जुनी आहे. प्राचीन सनामाही पंथाचेही काही हस्तलिखित साहित्य होते व त्याचा वैष्णव पंथाच्या आगमनानंतर त्याग अथवा नाश झाला. येथील साहित्यात स्थानिक खंबा-थोईबीची प्रेमकथा फार प्रसिद्ध आहे. विशेष उल्लेख अशासाठी की या कथेने अनेक लोकगीते, चित्रशैली, नाट्य, नृत्य अशी अनेक कलांगे प्रभावित केलेली आहेत. मणिपूरच्या अगदी नसानसात भिनलेली ही कथा. खंबा हा नायक, गरीब व पोरका परंतु शूर व स्मार्ट. थोईबी ही थोडी वयाने मोठी राजकुमारी. दोघांचे प्रेम. एक व्हिलनसुद्धा, त्याला वाघ खाऊन टाकतो. पुढे या दोघांच्या गाठीभेटी वाढतात. विवाह होतो. पुढे काही काळ सुखी संसार. एकदा खंबा आवाज बदलून थोईबीला मजेत पुकारतो, तेव्हा बेसावध थोईबी घाबरून आवाजाच्या दिशेने भाला फेकून मारते, त्यात त्याचा मृत्यू होतो, पुढे दुःखाने थोईबीही प्राण सोडते अशी ही कथा. घरात/समाजात काही आनंदी प्रसंग असेल, तर त्यांच्या प्रेमप्रसंगाची, विवाहाची कथा सादर होते व काही दुःखद घटना घडली असेल तर त्यांच्या मृत्यूचा प्रसंग. ही कथा लोकजीवनाचा फार महत्त्वाचा भाग बनून गेली आहे.
क्रीडा :
मुकना कुस्ती : स्थानिक कुस्तीचा प्रकार. स्पर्धक कापडी कमरबंध बांधून खेळतात. यामध्ये एकमेकांचा कमरबंध पकडून चीत करण्याचा डाव असतो.
पोलो : सद्य रूढ पोलो या खेळाचे मणिपूर हे जन्मस्थान. इथे ब्रिटिशांनी पुलु खेळ सर्वप्रथम पहिला व पुढे थोड्याफार बदलाने पोलो खेळाची बांधणी करण्यात आली. भारतातील पहिले पोलो क्लब सिल्चर मणिपूर कलकत्ता भागातलेच.
प्रसिद्ध खेळाडू : सर्वश्रुत मेरी कोम, वेट लिफ्टर कुंजूरानी देवी व संजिता चानू , बॉक्सर सरिता देवी, देवेंद्र सिंग व डिंको सिंग, जुदो चॅम्प कल्पना देवी, आर्चर बोम्बयला देवी, मिस्टर वर्ल्ड सौष्ठवपटू गंग्बाम मैतेई अशी विविध क्षेत्रांतील तारांकित नावे या राज्याशी निगडित आहेत. याशिवाय आय लीग व इंडियन सुपर लीग फॉलो करणाऱ्यांना तेथील बोइथान्ग हाओकीप व इतर फुटबॉलपटू परिचयाचे असतीलच! क्रीडा क्षेत्रात महान कीर्तीचे हे लहान राज्य आहे.
कला:
वस्त्र : अत्यंत तलम सुती वस्त्रे हे मणिपूरचे वैशिष्ट्य. पारंपरिक पुरुष वेषभूषा अतिशय साधी - धोतर किंवा गोल सारोंग/लुंगी, कुर्ता/सदरा व मुंडासे; शक्यतो पांढरेच. स्त्रिया अतिशय कलात्मक व रंगीबेरंगी वस्त्रे वापरतात. गोल सारोंगसारखे 'फनेक', वर ब्लाउज व ओढणीप्रमाणे तलम इंनाफी. इंनाफीवर शक्यतो सुरेख नक्षीकाम असते व हाताने विणलेले असते. मायेक नैबी ही जरा फॉर्मल इंनाफी आडवे पट्टे असलेली व काठाला नक्षी. येथील वैष्णव नाकापासून वर टिळा लावतात व त्यांच्या एकंदर लहान डोळे, पीत वर्ण अशा रूपात ते एक विशेष शोभून दिसते.
अलंकार : सुती धाग्यापासूनच बनवलेले हार इथे फार लोकप्रिय आहेत. याशिवाय स्थानिक पद्धतीने बनविलेले दागिने- विशेषतः केशाभूषणे भारत व आग्नेय आशिया यातील मणिपूर हा सांस्कृतिक दुवा आहे याची ओळख पटवून देतात.
नृत्य : प्रसिद्ध मणिपुरी नृत्य ही येथील खासियत. प्राचीन जागोई नृत्यशैलीत भरतऋषींच्या नाट्यशास्त्राच्या आधारे भर घालून सतराव्या शतकात महाराज भाग्यचंद्रांनी या नृत्यशैलीस आज ओळखतो ते स्वरूप दिले. यात प्रामुख्याने उग्र 'तांडव' व सौम्य 'लास्य' असे दोन प्रमुख प्रकार. मणिपुरी मृदुंग, करताल व गायक यांच्या साथीने कृष्णाच्या जीवनातील प्रसंग किंवा खंबा-थोईबी आख्यानातील प्रसंग असे हळुवारपणे प्रेक्षकांसमोर उलगडले जातात. पाच प्रमुख 'रास'लीला या नृत्यप्रकाराचे मुख्य अंतरंग. गोपिकांचा गोल आकाराचा 'कुमिल' एखाद्या मोठ्या घराच्या कडक स्कर्टप्रमाणे दिसतो, त्यावर भरजरी कपडे दागिने व झिझिरीत पदर. सुती धाग्यांचे रंगीत हार व गोंडे हाही पोशाखातील प्रमुख व वेगळा भाग. अतिशय नाजूक व वाहत्या हालचाली हे या नृत्यशैलीचे वैशिष्ट्य व त्याचबरोबर थोडा मर्यादित जागेतील सादरीकरण हेही वेगळेपण. याशिवाय केवळ पुरुषांचे मृदुंगासहित केलेले नटसंकीर्तन हा आणखी एक प्रकार.
संगीत : मणिपुरी राजांनी वैष्णव संप्रदाय स्वीकारल्यानंतर त्याचा प्रभाव ललितकलांवरही झाला. संकीर्तन लोकप्रिय झाले. शास्त्रीय संगीतावर दाक्षिणात्य संगीताचा आश्चर्यकारक प्रभाव दिसून येतो, व त्याचबरोबर एक पौर्वात्य लकब सहज लक्षात येते. येथेही आग्नेय आशियाच्या संगीताशी असलेला जवळचा संबंध अधोरेखित होतो. पारंपरिक एकतारी (बेना) व बहुतारी तंतुवाद्ये, बंगाली व मणिपुरी पद्धतीचे ढोलक तालवाद्य (खोल), मंजिरा-झांजा इत्यादी वाद्ये व गायन असा संच असतो. आधुनिक व्हायोलिन, गिटार व बासरी यांचाही समावेश अलीकडे करतात.
सध्या प्रसिद्ध असलेल्या कलाकारांपैकी मंगका ही माझी विशेष आवडती. घरातच शास्त्रीय संगीताचे धडे घेत व आधुनिक संगीताशी त्याची जोड देत काही सुंदर रचना तिने केल्या आहेत. आपल्या कानांना वेगळ्या संगीताची कितपत सवय असेल कल्पना नाही, परंतु माझ्या आग्रहाखातर ही चलचित्रे जरूर पाहा व पूर्ण पाहा.
काय पाहाल : मणिपुरी वाद्ये; अलंकार काय ऐकाल: पारंपरिक शैलीतले गीत.
काय पाहाल : मणिपूर व पोलोचे नाते, मणिपूरचा निसर्ग काय ऐकाल: पारंपरिक शैलीतले गीत व पाश्चात्त्य गीत यांचा मिलाफ.
काय पाहाल : पारंपारिक मणिपुरी घर, जुन्या पिढीतील महिलेची वस्त्रे ल्यायची पद्धत, इंनाफीवरील सुबक काम, नव्या पिढीत साधे फनेक व इंनाफी ल्यायची आधुनिक पद्धत! काय ऐकाल: जुने मणिपुरी संगीत, नवे मणिपुरी संगीत व पाश्चात्त्य संगीत यांचे पृथक परंतु एकत्र गुंफलेले गीत.
मणिपुरी शास्त्रीय नृत्याची झलक, आंजावरून साभार
संकीर्ण : माझ्या एकल प्रवासादरम्यान माझ्या अनुभवाचा व अभ्यासाचा काही भाग थोडा अधिक आकर्षक बनवून फेसबुकवर पोस्ट करण्याची मला एक सवय आहे. त्यामुळे एक औत्सुक्य निर्माण होतेच, तसेच त्यानिमित्ताने त्या प्रदेशाविषयी इतरांनाही माहिती होते. मणिपूरविषयक हे पोस्ट इथेही समाविष्ट करून या लेखाची सांगता...
समाप्त
अन्य भटकंती : दक्षिण अमेरिका - पेरू, दक्षिण अमेरिका - अमेझॉन ब्राझील, मध्य अमेरिका - ग्वाटेमाला होंडुरास एल साल्वाडोर बेलीझ, ईशान्य भारत - मणिपूर, ईशान्य भारत -त्रिपुरा, ईशान्य भारत : आसाम, आग्नेय आशिया - ब्रह्मदेश थाईलँड लाओस कंबोडिया मध्य व पश्चिम आशिया - उझबेकिस्तान ताजिकिस्तान अफगाणिस्तान अझरबैजान तुर्कस्तान , पूर्व आफ्रिका - इथियोपिया
प्रतिक्रिया
19 Oct 2017 - 5:09 am | निशाचर
मस्त एकल भटकंती! मणिपूरची ओळख आवडली, फोटोही सुंदर आहेत. सप्तभगिनींवर पुन्हा अवश्य लिहा.
19 Oct 2017 - 8:51 am | प्रमोद देर्देकर
तुमची भटकंती जबरदस्त असते हो आणि एव्हढी बारीक सारिक माहिती देता.
नाहीतर आम्ही , नुसते भोज्याला हात लावुन येतो.
19 Oct 2017 - 3:01 pm | संग्राम
_/\_ ....
19 Oct 2017 - 6:42 pm | गामा पैलवान
समर्पक,
तुमचा प्रवास आणि त्याचं वर्णन नावाप्रमाणे समर्पक आणि सुरेख आहे. मणिपूरविषयी काहीच माहिती नव्हती. हे शल्य आहे याचीही जाणीव नव्हती. लेख वाचल्यावर भारताच्या फार मोठ्या भागातल्या सांस्कृतिक वारशाकडे दुर्लक्ष होत आहे हे जाणवलं.
असो.
मणिपूर हे नाव केव्हा पडलं? बहुतेक महाभारतकालीन आहे. तसं असेल तर अर्जुन व चित्रांगदा या जोडप्याच्या व त्यांच्या बभ्रुवाहन या अपत्याच्या काही कथा प्रचलित आहेत का?
आ.न.,
-गा.पै.
20 Oct 2017 - 3:49 am | समर्पक
मणिपूर हे नाव साधारण सतराव्या शतकात स्वीकारले गेले. त्यासाठी काय कयास वापरला किंवा त्यांना कोणते संदर्भ उपलब्ध होते ते आज ज्ञात नाही...
महाभारतातील मणिपूर हेच का, याविषयी मतभेद आहेत (विदर्भ सुद्धा आपण एक मानतो, पण अरुणाचल प्रदेशातील लोक तो विदर्भ मानतात व रुक्मिणिस त्यांच्या देशाची कन्या मानतात)
माझे वैयक्तिक मत असे, की अशा कथानकांचा जर स्थानिक संस्कृतीस मुख्य धारेस जोडण्यात हातभार लागत असेल तर ते समज तसेच राहू द्यावेत. उद्या कोणी म्हणाले की अर्जुनाची दुसरी बायको उलुपी ही नागकन्या असल्याने नागालँड्ची होती तर मी तथास्तु म्हणेन... (मूळ कथानकात नागांचे राज्य गंगेच्या प्रवाहाखाली पाताळात होते, ते तर नक्कीच कमी पटण्यासारखे आहे)
ऐतिहासिक पुरावे, मणिपूर व हस्तिनापूर, दोन्हीच्या अस्तित्वाचे वा भौगोलिक स्थानाचे, सारखेच आहेत... (नाहीत)
चित्रांगदा-बभ्रुवाहनाबद्दल लोकसाहित्यात फार कथा अशा नाहीत परंतु अलिकडे काही मणिपुरी नृत्य-आख्याने, चित्रे पहावयास मिळतात. रविन्द्रनाथ ठाकूरांचे मणिपूरवर विशेष प्रेम व नृत्य-आख्यानाचे श्रेय त्यांनी चित्रांगदेवर लिखाण केले त्याला आहे.
19 Oct 2017 - 7:10 pm | खटपट्या
खूप छान माहिती आणि फोटोज...
19 Oct 2017 - 8:39 pm | मार्गी
फार फार जबरदस्त!!!!!!!!!! प्रणाम स्वीकार करावा.
20 Oct 2017 - 1:02 am | जुइ
हे प्रवासवर्णन २-३ भागांमध्ये विभागून आले असते तर चांगले वाटले असते.
20 Oct 2017 - 3:50 am | समर्पक
पुढील लेख जरा लहान करीन... :-)
20 Oct 2017 - 1:15 am | वरुण मोहिते
माहिती पूर्ण लेख
20 Oct 2017 - 1:25 am | राघवेंद्र
समर्पक भाऊ, एकदम मस्त ओळख.
लेखन लिहिण्याची शैली, मुद्देसूद पणा नेहमीप्रमाणेच आवडला.
20 Oct 2017 - 2:32 am | पद्मावति
लेख अतिशय आवडला.
20 Oct 2017 - 12:48 pm | अमरेंद्र बाहुबली
मस्त लेख! कुणी बरोबर नसेल तर मीही एकटाच मोहिमेवर निघतो तुमच्या मुळे आणखी पाठबळ मिळाले.
21 Oct 2017 - 5:24 pm | उपेक्षित
दंडवत घ्या _/\_
21 Oct 2017 - 8:14 pm | डॉ सुहास म्हात्रे
लेख भयंकर आवडला असे म्हणणे फार मोठे अंडरस्टेटमेंट होईल ! प्रकाशचित्रे नेत्रसुखद आणि माहितीपूर्ण !
तुमचे इतर लेखही असेच असतात, पण हा विशेष आवडला. तेथे भटकंती करायला इतर फारशी माहिती वाचावी लागणार नाही, म्हणून या लेखाची वाचनखूण साठवून ठेवली आहे.
चौकस वृत्ती व चौफेर दृष्टी प्रवासामध्ये मोठा अनपेक्षित लाभ देते, तशातला हा अनुभव. उगीच इथे-तिथे 'जाऊन तर बघू' अशी वेळ देऊन केलेली भटकंती अशी फायद्याची.
+१,०००. हा कळीचा मुद्दा आहे.
21 Oct 2017 - 9:21 pm | अमितदादा
खरच उत्तम लेख आणि सुंदर अशी भटकंती..दृष्य आणि प्रिंट माध्यमामध्ये भारताचा हा भाग नेहमीच दुर्लक्षित राहतो असे नेहमी वाटते.
22 Oct 2017 - 1:56 pm | फ्रेनी
मस्त जमलाय लेख
22 Oct 2017 - 4:34 pm | स्वाती दिनेश
लेख खूप आवडला, खूप छान वर्णन!
स्वाती
22 Oct 2017 - 6:33 pm | एस
_/\_
22 Oct 2017 - 6:33 pm | एस
_/\_
23 Oct 2017 - 7:42 pm | arunjoshi123
मस्त लेख. काश भगवान हमे भी इतनी मेहनत की आदत डालता.
==================
मणिपूरबद्दल कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर अमंद म्हणून एक मणिपूरी लोकांची एन जी ओ (संस्था वा ग्रुप आहे.). तिचे पुणे युनिट सर्वात अॅक्टिव आहे. मणिपूरच्या देशभर विखुरलेल्या लोकांचे स्थानिक आणि भारतीय संस्कृतीशी नाते टिकवणे इ इ तिचा उद्देश आहे. मी असं पाहिलं आहे कि ज्यांना ईशान्य भारतात रस आहे त्यांना तिकडे न जाऊ शकल्याचं वैषम्य असतं. ज्यांना रस आहे त्यांना मी पुण्यातल्याच त्यांच्या कार्यक्रमांची माहिती देऊ शकतो.
==================================
२०१३ मधे "एका धर्मांतराची कथा" हे मणिपूर वर आधरित ललित मी मिसळपाववर टाकलं होतं. http://www.misalpav.com/node/25815
या (समर्पक यांच्या) लेखाचा प्रारंभ पूर्वोत्तर राज्यांची टिपिकल प्रतिमा कायम राखत झाला आहे. हे (माझं) अललित त्याला जरा ट्विस्ट देतं. (मी लिहिलेलं हे पहिलंच ललित असल्यानं सांभाळून घेण्याची विनंती.)
==================
अमंद = असोसिएशन ऑफ मनिपूरी डायस्पोरा
25 Oct 2017 - 9:51 pm | समर्पक
अमंद बद्दल महिती नव्हते... चांगला उपक्रम!
तुमचा वैयक्तिक अनुभव लिहिल्याबद्दलही धन्यवाद! धर्मांतर-अभिनन्दन! :-)
23 Oct 2017 - 9:42 pm | पैसा
फार सुरेख लेख आणि फोटो!
24 Oct 2017 - 5:16 pm | सस्नेह
एका अनवट संस्कृतीची सुरेख ओळख !
...भारतातच असूनही हे एक वेगळेच बेट आहे असे वाटण्याइतपत अनोळखी!
24 Oct 2017 - 7:43 pm | गुल्लू दादा
खूप छान प्रवासवर्णन..:)
24 Oct 2017 - 8:41 pm | दिपस्वराज
देवा समर्पका, साष्टांग दंडवत घ्या पहिला. काय तो अभ्यास....काय तो प्रवास .......काय ती लेखनशैली....काय तो फोटो ......काय ते चिंतन. कसं सांगू मला नेमकं सर्वात जास्त काय आवडलं....
एक विनंती आहे, जमल्यास ईशान्य भारत भटकंती वर एखादं छानसं पुस्तक काढा.... नव्हे हे जमवाच !
तुमच्या प्रत्येक एकल प्रवासाचा पंखा असलेला .......
26 Oct 2017 - 2:06 pm | कपिलमुनी
वर्णन आवडले !
स्थानिक लोकांशी कोणत्या भाषेत संवाद साधत होतात ?
28 Oct 2017 - 1:41 am | समर्पक
स्थानिक लोकांशी हिंदी किंवा इंग्लिश मध्येच संवाद. इंग्लिश बर्यापैकी समजते इथे शहरात. ग्रामीण भागात खाणाखूणा, जोडीला हिंदी काय नी मराठी काय, दोन्ही सारखेच... इथल्या भाषा संस्कृतोद्भव नसल्याने सामाईक शब्द बरेच कमी आहेत... वैष्णव भक्तीमार्गातून भजन व देवस्तुतीमार्गे काही शब्द रुळले आहेत.
26 Oct 2017 - 3:48 pm | पाटीलभाऊ
मस्त प्रवास...आणि साजेस वर्णन व फोटो.
26 Oct 2017 - 6:03 pm | अनिंद्य
सांगोपांग सुंदर ओळख मणिपुरची. तुमच्या लेखनात नेताजींचे नाव येईलच याची खात्री होती .
जलोकिया, खंबा-थोईबीची प्रेमकथा, गंग्बाम मैतेई, कुमिल स्कर्ट पासून ते तरंगत्या जंगल - त्यात आईसिंग ऑन द केक म्हणतात तसे बर्माची छोटेखानी यात्रा आणि श्री बुद्धिमंत यांची भेट-चर्चा ! तुम्ही सर्वस्पर्शी लिहिले आहे, खूप आवडले.
पु ले शु,
अनिंद्य
26 Oct 2017 - 8:48 pm | बाजीप्रभू
हा लेख मणिपुरवरील Encyclopedia म्हणायला हवा इतकी सूक्ष्म माहिती दिली आहे.. धन्यवाद.
पाटणकर सरांचा किस्सा एकदम भारी..
आणि हो "खंबा-थोईबीची प्रेमकथा" ओळखीची वाटली.. थायलंडच्या "लिके" नावाच्या सांस्कृतिक शोमध्ये पाहिल्याची आठवतेय..
तुमच्या ऍमेझॉन लेखापासून तुमचा फॅन झालोय मी... खूप छान लिहिता तुम्ही.
27 Oct 2017 - 12:34 pm | arunjoshi123
आज ईशान्य भारतातल्या लोकांना आदिवासी, फुटीर इ इ म्हटलं जातं. मात्र हे मोईरांगचं म्यूझिअम उघडं असतं तर आपण पाहिलं असतंत की स्थानिक नागा, कुकी, मैतेयी आणि अनेक प्रकारच्या लोकांनी आझाद हिंद सेनेला किती मदत केली होती. अनेक लोकांनी आपली संपत्ती दिली. अनेक लोकांनी आपले प्राण दिले. ईशान्य भारतातले लोक अख्ख्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढले ही बाब इतिहासात शिकवली देखील जात नाही. मुघलांवर २ ओळी आहेत कि ४ यावर दिवसभर चर्चा झाडणारांना या गोष्टीचा साधा (आणि हे लोक त्यांचे प्रिय मायनॉरिटी असून) उल्लेख अनावश्यक वाटतो.
हा देखील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या चहेत्यांनी केलेला अपप्रचार आहे. मणिपूरी राजे इतर राजांप्रमाणे जनतेत मुळीच अप्रिय नव्हते (भूतान सारखे) आणि राजा आणि जनता दोहोंना भारतात विलिन व्हायचं होतं. ते फक्त सन्मानपूर्वक आणि सरदार पटेलांनी कांगला किल्ल्यात येऊन स्वाक्षरी घ्यावी असे म्हणत होते. या उलट भारत सरकारने बंदुकिच्या जोरावर शिलाँग मधे आणून असन्मानपूर्वक सही घेतली याचा रोष तेव्हा तिथल्या सांस्कृतिक अस्मिता असणार्या सुशिक्षित समाजाला होता. हळूहळू सुशिक्षित समाज ही क्षुल्लक गोष्ट विसरला आणि भारत सरकारच्या सातत्याच्या दुर्लक्षामुळं तिथे नक्षलवाद पाळमुळं धरू लागला. आज त्याचा नि स्वातंत्र्याचा काही संबंध नाही. तो एक व्यवसाय म्हणून चालतो. आणि जनतेला त्याचा तिटकारा आहे.
===========================
दुसर्या महायुद्धात पूर्वेच्या बाजूला इंफाळचा पराजय हा एक मोठा टर्निंग पॉइंट होता. त्यावर अनेक पुस्तके आहेत. अलाइज नी चाखलेला तो पहिला विजय होता. लेखातल्या लोकताक तळ्यात आजही कधी मधी जपानी वायुसेनेने टाकलेले बाँब मिळतात. रसद तुटल्यावर मणिपूरची इतकी जनावरे जपानी सैन्याने मारली कि आजही शहरात ताजे दूध मिळत नाही आणि (गोहत्याबंदी नसल्याने खायला देखील) गाय मिळत नाही.
27 Oct 2017 - 4:01 pm | मंजूताई
काय सुंदर लिहीलंत हो , समर्पक! साष्टांग दंडवत!
27 Oct 2017 - 4:27 pm | मित्रहो
मणिपूर विषयी इतके विस्तृतपणे प्रथमच वाचले. मस्त फोटो आहेत. आमच्या सायकल ग्रुपवाल्यांना सांगायला हवे भारतातील या भागात टूर करायला हवा.
28 Oct 2017 - 1:57 am | समर्पक
सर्वांचे वाचन-प्रतिक्रिया-प्रोत्साहन-सुधारणा यांसाठी धन्यवाद!
5 Mar 2018 - 1:28 pm | जेम्स वांड
मुकना कुस्ती : स्थानिक कुस्तीचा प्रकार. स्पर्धक कापडी कमरबंध बांधून खेळतात. यामध्ये एकमेकांचा कमरबंध पकडून चीत करण्याचा डाव असतो.
हा प्रकार विशेष सुरस आहे, मंगोलियन बोख पद्धतीची कुस्ती अन सुमो कुस्ती (जपान) ह्यांच्यातले काही काही समानधागे असलेली ही कुस्ती प्राचीन काळातील मणिपुरी संस्कृतीवर असणाऱ्या संभाव्य प्रभावांची छान वानगी ठरावी.
XoxoxoX
हल्ली हल्ली मणीपुरात किंवा एकंदरीत ईशान्येत रासायनिक शेती झिरपली आहे, एरवी नैसर्गिक पद्धतीने तयार होणारा भाजीपाला वगैरे फारच सरस असे, हिरवीकच्च पत्ता कोबी मधल्या हाडापासून कापून फक्त एकाच्या (कोबीच्या) चार फाका करून एक लवंगी मिर्ची सोबत मिठाच्या पाण्यात चार एक शिट्या उकडली की भारी लागत असे खायला. बाटलीभार लिंबाच्या रसात एक भूत जोलोकिया फक्त एक चिर मारून (अखंड मिर्चीला फक्त एक चिर, मिर्ची बारीक चिरून नाही, जिवितास हानी पोचू शकते) शाबूत मिर्ची लिंबाच्या बाटलीभर रसात टाकून ती बाटली तीन दिवस उन्हात ठेवायची, नंतर कधी जेवणात रुची नसली तर बाटलीत चमचा बुडवून पानाच्या डाव्या बाजूस फक्त दोन थेंब परत सांगतो फक्त दोन थेंब घेणे. मजा येते जेवणात अन घामही फुटतो मोक्कार.
6 Mar 2018 - 1:12 am | समर्पक
तुम्ही म्हणता तसा कोबी लेखातील थाळीच्या चित्रात आहे... सोपे व चविष्ट!
7 Mar 2018 - 8:03 am | जेम्स वांड
नेमक्या अश्याच फाका म्हणायच्या होत्या मला, सुंदर!
6 Mar 2018 - 11:57 am | OBAMA80
माहिती पूर्ण लेख. तुमच्या साहसी वृत्तीला नमस्कार. लेख चित्रांसकट टाकल्यामुळे अजूनच भावला. लिहीत रहा.
6 Mar 2018 - 1:50 pm | राघव
खरंच या भागातली काही म्हणजे काहीच माहिती नाही.. खूप खूप धन्यवाद.
हा धागा सुटला होता.. वर काढल्या बद्दल जेम्स वांड यांचे आभार!
6 Mar 2018 - 3:46 pm | Ram ram
त्या थाळीत दहा रूपये का ठेवलेत?
6 Mar 2018 - 10:58 pm | समर्पक
नैवेद्याचे पान आहे, त्यामुळे देवासमोर काही ठेवण्याची प्रथा असावी.
7 Mar 2018 - 11:32 pm | arunjoshi123
दहा रुपयांची नोट या गोष्टीला मणिपूरच्या संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. एका कोणत्याही सामान्य समारंभात हजारो (होय - ३ ते ४ हजार) दहा रुपयांच्या नोटा वापरतात.
7 Mar 2018 - 2:27 pm | Ram ram
thanks
12 Sep 2018 - 7:26 am | सुधीर कांदळकर
संगीतकाव्यसंस्कृतीशब्दकोष आवडला.
तिघांचे गाणे फारच सुंदर. पुन्हा पुहा ऐकावेसे वाटणारे. प्रौढ महिलेचे गाणे पौर्वात्य आणि बंगाली भजनाचा संगम वाटला. तरुणीचा आवाज श्रेया घोषालसारखा वाटला तर सूटवाल्याचे गाणे ऐकतांना अधूनमधून ७०च्या दशकातल्या व्हा.....य व्हा....य डिला.....यला(गायक नीट आठवत नाही, बहुधा टॉम जोन्स) चा तर मधूनमधून इंगलबर्ड चा भास झाला.
लोकसंगीत मात्र एकसुरी वाटले.
गेल्या वर्षी आमच्या गावात महाजालसेवा अति वाईट होती. काही परिच्छेद आणि काही अर्धवट चित्रे एवढेच २जी वर उमटले होते. आता अखंड वाचायला, पहायला, ऐकायला मिळाले. तृप्त झालो. आता मला माझी ईशान्य भारत यात्रा हुकल्याचे वाईट वाटत नाही.
त्रिपुरावरील लेख सुद्धा कालच वाचला/पाहिला/ऐकला/अनुभवला. अभिप्राय वरीलप्माणेच शब्द थिटे पाडणारा.
अनेक, अनेक धन्यवाद.
12 Sep 2018 - 7:29 am | सुधीर कांदळकर
https://www.misalpav.com/node/39526
इथे आहे