स्वराज्यावर चालून आलेल्या बत्तीस दाताचा बोकड, अफजलखानाला फाडून शिवाजी महाराजांनी आदिलशाही मुलुख ताब्यात घेण्याची मोहिम आखली. नेताजी पालकरांना त्यांनी सातारा,कराड्,सांगली परिसरातील किल्ले ताब्यात घेण्यास पाठ्विले. नेताजीनी बराच मुलुख तातडीने मारला, पण मिरजेचा भुईकोट काही त्यांच्यासमोर झुकेना.
नेताजीला मोकळे करण्यासाठी स्वता महाराजांनी मिरजेला वेढा घातला. ईकडे अफजलखाना पाठोपाठ फाजलखान आणि रुस्तमेज्मान यांचाही पराभव झाल्याने आदिलशहा व बडी बेगम यांनी कर्नलचा सुभेदार "सिध्दी जोहर" याला महाराजांवर पाठ्विले. तोपर्यंत महाराजांनी आदिलशहाचा करवीर प्रांतातील बळकट पन्हाळा अर्थात शहानबीदुर्गाचा ताबा घेतला होता. २ मार्च १६६० रोजी सिध्दी जोहरने पन्हाळ्याला वेढा घातला. नेताजी पालकरांनी वेढा तोडायचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर सगळा भरोसा या भागात पडणार्या तुफान पावसावरच होता. पण चिवट सिध्दी त्यालाही पुरून उरला. त्याच वेळी स्वराज्यावर शाहिस्तेमामाचे संकट घोंगावत होत. महाराजांना वेढ्यातून सुटणे गरजेचे होते. पण सवाल होता, कसे?
अखेरीस १२ जुलै १६६० चा दिवस उगवला. हि आषाढ पौर्णिमा होती. गुरुतुल्य सह्याद्रीचाच आता विश्वास होता. सिध्दीला शरण येण्याची तयारी दर्शविल्यामुळे इतक्या दिवस डोळ्यात तेल घालून पहारा करणारे सिध्दीचे सैनिक सुस्तावले होते. रात्री नउ वाजता महाराज पन्ह्याळ्यावरील राजदिंडीच्या वाटेने निघाले.
याच भागात पुसाटी बुरुजाकडून येणार्या डोंगर धारेला मसाई पठाराची डोंगरसोंड मिळाली होती. साहजिकच या चिंचोळ्या डोंगरधारेमुळे या भागात पहारा कमी होता. ईथूनच महाराज आणि हिरडस मावळातील ( सध्याच्या भोरचा आसपासचा भाग) सहाशे मावळे निघाले. रोखल्या श्वासानेच पहारा ओलांडून मसाईचे पठार गाठले पण सिध्दीच्या सैनिकांना चाहुल लागलीच. अजुन एक पालखी लगबगीने पुढे आली आणि यात आणखी एक शिवाजी बसला. सापडल्यानंतर काय होणार याची स्पष्ट कल्पना असूनही साक्षात मृत्युच्या पालखीत बसणारा तो वीर होता, पन्हाळ्याच्याच कुशीतल्या एका गावाचा, नेवापुरचा, "शिवा काशिद".
इकडे शिवाजी पळाला हे समजल्यानंतर चिडलेल्या जोहरने स्वताच्या जावयाला, सिध्दी मसुदला पाठलागावर सोडले. शिवा काशिदची पालखी मसुदला सापडली, पण हा भलताच शिवा आहे हे कळताच मसुद्ने शिवाच्या छातीत भाला खुपसून ठार केले. अजुन एक प्राण स्वराज्य कामी खर्ची पडले. त्वेशानेच मसुद पुन्हा महाराजांच्या पाठलागावर निघाला. आणि पांढरपाणी गावापाशी त्याला लांबवर महाराजांचे सैन्य दिसू लागले.
नाजुक परिस्थिती पाहून बाजीप्रभू देशपांडेनी महाराजाना विशाळगडाकडे तीनशे सैन्य घेऊन जाण्यास सांगितले आणि केवळ तीनशे सैन्यानिशी ते, फुलाजी प्रभू व जयसिंग जाधव मसुदचा मुकाबला करण्यास सिध्द झाले. महाराज विशाळगडापाशी पोहचले तर तिथे जसवंतराव पालवणीकर व सुर्यराव सुर्वे राहु, केतु सारखे आडवे आले. त्यांचे पारिपत्य करुन महाराज सधारण दुपारी दोन वाजता गडावर पोहचले आणि ईशारतीच्या तोफा झाल्या. पण तोपर्यंत तिकडे बाजीनी शर्थीने घोडखिंड अडवून घरली होती. बरेचसे सैन्य कामी आले होते, पण अखेरीस तोफेचा आवाज एकून बाजीनी आपले प्राण सोडले आणि घोडखंड पावन झाली.
पन्हाळगड ते विशाळगड मार्गाचा नकाशा
अनेकदा हा स्फुर्तीदायक ईतिहास वाचून झाला होता. पण आता महाराजांच्या पाउलखूणांचा माग घेणारा हा मार्ग प्रत्यक्ष पहाण्याची तीव्र ईच्छा होती.
"कोल्हापुर हिल रायडर्स अँड हायकर्स" हा ग्रुप दरवर्षी हा ट्रेक नेतात हे समजल्यानंतर मी १२,१३ जुलै १९९९ चे बुकींग करून टाकले. सकाळी नउ वाजता बाजीप्रभूंच्या पुतळ्याजवळ आम्ही जवळपास तीनशे जण जमलो. आधी सुप्रसिध्द मराठी अभिनेते श्री. चंद्रकांत मांडरे यांच्या हस्ते बाजींच्या पुतळ्याची पुजा झाली आणि या स्मरणयात्रेला प्रारंभ झाला. आता तब्बल ६५ कि.मी. ची पदयात्रा करुन खेळणा/विशाळगड गाठायचा होता.
मी मात्र आधी जाऊन वीर शिवा काशिदच्या नेवापुरला असणार्या समाधीचे दर्शन घेतले.
पन्हाळ्याच्या प्रवेशद्वारापाशीच असणारा हा शिवा काशीदांचा आवेशपुर्ण पुतळा.
आणि हे ह्या मोहीमेचे प्रेरणास्थान. शिल्पकार कै. रविंद्र मेस्त्री यांनी हा जोशपुर्ण पुतळा घडविलाय. त्यांच्या चेहर्यावरचा करारीपणा पुतळ्यात हुबेहुब उतरवलाय.
दोन्ही हातात समशेरी घेउन लढणारे बाजी पाहिले कि आपोआप स्फुरण चढते.
या दोन्ही पुतळ्यांचे दर्शन घेउन शिवछत्रपतींचा जयघोष करीत, राजदिंडीमार्गे आम्ही खाली उतरलो.
वरुन पावसाचा मारा चालूच होता, पण आपण एक एतिहासिक महत्व असलेली यात्रा करतो आहोत या समाधानाने बाकी अडचणींची पर्वा नव्हती.
खाली उतरल्यानंतर डांबरी सडक लागते आणि मोहिमेतले पहिले गाव लागते, तुरुकवाडी. इथे न थांबता चाल सुरुच ठेवली, एक कच्चा रस्ता चढाला लागला. अर्ध्या चढावरच अजून एक गाव आहे,"म्हाळुंगे". गाव उतारावर असल्याने रस्त्यावर पाण्याचे लोट वहात होते आणि प्रंचड चिखल होता. पुढे काय वाढून ठेवलय याची ती एक झलकच होती.
पण या संर्वाची अपेक्षा केलेलीच होती. अखेर चढ चढून मी वर आलो तर एखाद्या गोल्फच्या मैदानासारखे प्रचंड पसरलेले पठार सामोरे आले, मसाईचे पठार. ( याच मसाई पठाराच्या बाबतीत नुकतीच घडलेली घटना म्हणजे संजय लीला(?) भन्साळी या ईतिहासामधे अनेक लिला करणार्या महान (?) दिग्दर्शकाचा आगामी ( इतिहासाची वाट लावणारा आणखी एक चित्रपट) पद्मिनी या चित्रपटाचे बंद पाडलेले शुटींग. असो)
नाव जरी अफ्रिकेतल्या एखाद्या ठिकाणासारखे असले तरी, पावसामुळे हिरव्यागार गवताने मढलेले, त्यावर उगवलेली पांढरी गवतफुले आणि मधेच मोडलेली वाट, यामुळे आपण सह्याद्रीच्या कुशीत पोहचल्याची खात्री पटते. मसाईचे पठार सात-आठ कि.मी. लांब पसरले आहे तर साधारण दिड-दोन कि.मी. रुंद आहे.
काही वेळा अचानक ढग उतरतात, अशावेळी माहितगार सोबत नसेल तर या पठारावर वाट चुकून गोल गोल फिरत रहाण्याची शक्यता आहे.
लांब दुरवर पन्हाळा आपला निरोप घेत असतो. हल्ली कच्चा रस्ता मसाईदेवीच्या मंदिरापर्यंत झाल्याने ईथे पर्यंत जीपसारखे वाहन येउ शकते, अर्थात पावसाळ्यात गाडी न आणणेच चांगले.
अखेरीस या पठाराची स्वामिनी मसाईदेवीचे मंदिर येते.
समोर मस्त पैकी तळे आहे त्याच्या वार्याबरोबर उसळणार्या लाटा, भर्राट वारा आणि मधेच येणारी सर, मस्त माहोल जमवून जाते.
ईथेच घटकाभर विश्रांती घ्यायची कारण आता बरीच चाल झालेली असते. पुरेशा विश्रांतीनंतर मी नव्या उत्साहाने उठलो आणि पठाराच्या कडेला आलो, तो वार्यामुळे उलटा फिरणारा धबधबा पाहलया मिळाला.स्वता अनुभवावे असेच हे दृष्य.
खाली उतरून एका लेणी समुहापाशी आलो. समजुतीप्रमाणे गावकरी याला "पांडवलेणी" म्हणत असले तरी साधारण ई.स.पुर्व २०० ते ३०० या काळातील हि लेणी असावीत.
अर्थात बौध्द लेणी असली तरी फारचे कोरीवकाम नाही. बहुधा फक्त वर्षाकालीन विश्रामासाठीच हि लेणी कोरली असावीत. इथे आठ छोट्या व दोन मोठ्या गुंफा आहेत.एका गुंफेत दागोबा आहे.
हि लेणी पाहून पुढे चालत राहिलो तो अर्ध्या पाउण तासात कुंभारवाडी आली देखील.
काही ट्रेकसाठी आलेली हौशी मंडळी विश्रांतीसाठी ईथे आडवी झाली. यांचे पुढे फार हाल होणार हे नक्की. एव्हाना पावसाने चांगलाच ईंगा दाखविलेला. अंगातल्या रेनकोटमधे पाणी शिरून सर्वकाही चिंब ओले झाले होते, भिजण्यासारखे आणखी काही शिल्लक नसल्याने गुमान रेनकोट सॅकमधे ठेवला व स्वताला पावसाच्या हवाली केले. सह्याद्रीत असाही पावसाचा आनंद घेतेलेला चांगला, नाही का?
यानंतर येती खोतवाडी, पण त्या आधी डाव्या बाजुला डोंगरावर आपल्याला असे असिताश्म स्तंभ दिसतात. हा परिसर म्हणजे "कुंवारखिंड". इथे कुंवारी देवीची मुर्ती आहे. या ठिकाणी एका काळ्या खांबात कुमारी अदॄष्य झाली असे मानतात.
गावाकरी याला डोंगरात नाहीसे झालेले वर्हाड मानतात पण ज्वालामुखीजन्य स्तंभांची पाउस आणि वार्यामुळे झीज होउन हि अनोखी रचना झालेली आहे. एकावर एक ठेवल्यासारखे दगड म्हणजे निसर्गाचे अनोखे शिल्प आहे.
शक्य झाले तर हि रचना जवळ जाऊन पहायची कारण केवळ यासाठी पुन्हा ईथे येणे होत नाही. खोतवाडी ओलांडून चापेवाडी, मांडलाईवाडी, करपेवाडी अशी वाटेतील लहान लहान गावे ओलांडत आपण आंबेवाडीत येउन पोहचतो. प्रत्येक वाडी साधारण तासा -सव्वा तासाने येते. वाटेत चिखलभरल्या रस्त्यामुळे थकवा असला तरी बसायची सोय नसते. रस्त्यात चिखलाची रबडी, बांधावर चिखल, शेतातर सगळी पिके आणि पाणी भरलेले. विश्रांतीसाठी गाव येण्याची वाट पहायची आणि निमुटपणे पाय ओढायचे.
आजुबाजुला मुख्यता भातशेती सोबत करीत असते.
वाटेत शेतात काम करीत असलेले शेतकरी हात करतात, ट्रेक तुमच्या आमच्यासाठी. ह्यांच्यासाठी जगण्याची रोजची लढाई सुरुच राहते.
महामुर पाउस पडणारा हा भाग, आज्जींचे हे रेनप्रुफ जॅकेट.
तर अशी छोटी छोटी मुले वाट अडवून गोळ्या मागतात तेव्हा गलबलते.
हा सगळा प्रवास खडतर आहे. पुर्ण चिखलाने भरलेला रस्ता.
तर कधी शेतामधून जात असते.
काही वेळा वाटेतच पाणी भरलेले असते. यामधूनच मार्ग काढायचा असल्याने ह्या सगळ्या अडचणीतून चालण्याशिवाय पर्याय नसतो. हि कसरत सर्वांनाच जमते असे नाही. एखादा नवखा तोल न सावरल्याने धडामदिशी पाण्यात पडतो किंवा पाय घसरून चिखलात लोटांगण घालतो. त्याला हसे पर्यंत दुसरा एखादा आडवा झालेला असतो.
एकूणच या खडतर वाटेची मजा घेत हा प्रवास सुरू असतो. यावेळी अंधार्या रात्री मृत्यु मागावर असताना महाराज व त्यांचे सहाशे मावळे कसे गेले असतील हा विचार मात्र मनात येतो.
अर्थात काही वेळा मस्त हिरवळ व मधूनच रस्ता जातो.
तर एखाद्या गुलाबाच्या फुलासारखे दिसणारे हे मुंग्याचे वारूळ
या सर्व प्रवासात डाव्या हाताला सतत मसाई पठारापासून सुरू झालेली डोंगररांग सोबत करत असते. एकापाठोपाठ एक अशी हि पठारे आहेत, काही ठिकाणी गावकर्यांची देवस्थाने आहेत. मधेच पाउस उघडला तर उजव्या हाताला लांबवर दरी आणि कोल्हापुर-रत्नागिरी मार्गावर असलेली गावे, आणि आत खोर्यात वसलेली गावे दिसतात आणि आपण किती उंचावरुन चालतो आहोत हे लक्षात येते. महाराज जेव्हा या वाटेवरुन गेले असतील तेव्हा कदाचित सिध्दीचे सैन्य खालून त्यांचा पाठलाग करत असेल, पण या भौगोलीक रचनेमुळे त्यांना महाराजांच्या सैन्याचा माग लागणे शक्यच नव्हते. किती बारकाईने हि योजना आखली गेली.
या ट्रेकमधे तुम्हाला कोणत्याही गावात मुक्काम करायचा असो, गावकरी त्यांच्या घरात सोय करतात आणि खास कोल्हापुरी आग्रहात तुमचा पाहुणचार होतो. वाड्यांची नावे वेगळी असली तरी घरांची रचना सारखीच, आंबा, जांभूळ, फणस या झाडांनी वेढलेली कौलारु घरे, अर्थात आता आधुनिकतेचे वारे इथेही शिरले आहेच.
के.एच.एच. ग्रुपने आमची सोय आंबेवाडीत एका गावकर्याच्या प्रशस्त अशा घरीच केली होती. मात्र ज्यांना शक्य आहे त्यांनी ईथे मुक्काम न करता पहिल्या दिवशी किमान पाटेवाडीपर्यंत पोहचून मुक्काम पाटेवाडीत करावा असे मी सुचवेन, कारण पहिल्या दिवशीच्या उत्साहातच आपण बरेच अंतर चालून जातो. आणि दुसर्या दिवशीची वाट जंगलातून जात असल्याने, काही वेळा चुकण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत वेळ हाताशी असलेला बरा.
आंबेवाडीत पोहचल्यानंतर मी खुप दमलो होतो, आयुष्यातला तिसराच ट्रेक. सहज पडल्या पडल्या झोप केव्हा लागली ते कळलेच नाही. रोजच्या आयुष्यात आपण टि.व्ही., मोबाईल यात गुरफटल्याने झोपायला रात्रीचे अकरा- बारा केव्हा होतात ते कळतही नाही, पण ट्रेकमधे मात्र नउ वाजताच मध्यरात्र होते. कुणीतरी जेवायला उठवले आणि गरमा गरम पिठल भात खाउन पुन्हा झोपी गेलो. ट्रेकमधे याच पिठल भाताची चव अप्रतिम लागते आणि ती चव घरी कधीच येत नाही.
दुसर्या दिवशी सकाळी पुन्हा चालायला सज्ज झालो. उत्साहाच्या भरात काळकाईवाडी,मळेवाडी ओलांडून पाटेवाडी गाठली. इथून पुढे जंगल पट्टा असल्याने एक वाटाड्या सोबत घेतला. त्याच्या पाठोपाठ जंगलात शिरलो. इथे मात्र बर्याच वाटा फुटलेल्या असल्याने सावधपणे चालायला हवे अन्यथा एखाद्या गुराचा कळपाच्या मागे जाउन गवत चरायची पाळी यायची. अभिमन्युसाठी रचलेला हा चक्रव्युहच जणू.
याच वाटेत दोनदा ओढे लागतात, वर पाउस असेल तर प्रचंड फुफाटत ते वहात असतात.
शेवाळलेल्या दगडावरुन तोल सावरतच ते ओलांडायचे अन्यथा स्नान नक्की. अशी जंगल भ्रमंती करुन दिड-दोन तासात आपण सुकामाचा धनगरवाडा ईथे पोहचतो.
आत्तापर्यंतची वाटेत एका गोष्टीपासून सावध राहिले पाहिजे, त्या म्हणजे "जळवा". पावसाळ्यात सह्याद्रीच्या अनेक परिसरात या दिसतात. पण या ट्रेकमधे त्यांचा उपद्रव जास्तीच जाणवतो. मला तरी या जळवांचा त्रास झाला नाही, पण काही सोबत्यांना त्यांनी प्रसाद दिलाच.
काही खबरदारी घेऊन त्यांच्या त्रासापासून आपण वाचू शकतो, पायाला साबण फासला तर जळवा बुळबुळीत त्वचेला पकडू शकत नाहीत, एखादा गायछाप खाणारा मित्र सोबत असेल तरी तंबाखु खाउन थुंकल्यास जळवा सुटतात किंवा हळदीच्या पावडरने जळवा काढता येतात. काहीच नसेल तर आगपेटीतील काडी पेटवुन त्याने जळुला चटका दिला तरी ती निघते. अर्थात जळु निघाली तरी तीने जिथे त्वचेला पकडले असते तिथे रक्त पातळ करण्याचे रसायन सोडल्यामुळे जखमेतून रक्त वहात राहते, यासाठी प्रथमोपचाराचे साहित्य सोबत बाळगणे आवश्यक आहे. मुख्य म्हणजे जळू निघाली तरी खुप वेळ जखम ठणकत राहते.
मी याच ट्रेकमधे आयुष्यात पहिल्यांदाच जळु पाहिली.
वाटेत दगडावर असे बाण काढले असल्यामूळे वाट सापडायला मदत होते.
पाटेवाडीपासून दिड तासात आपण पोहचतो सुकामाच्या धनगरवाड्यात. यानंतर पाउण तासात म्हसवडे आणि तासाभरात माण धनगरवाड्यामार्गे चालल्यानंतर आपल्याला आंबा-पांढरपाणी मार्गाचा डांबरी रस्ता दिसतो. काल तुरुकवाडी नंतर जवळपास चोवीस तासाने डांबरी रस्त्याचे दर्शन होते. डावीकडे म्हणजे अणुस्कुरा घाटाच्या रस्त्याला लागून पंधरा -वीस मिनीटातच आपण पांढरपाणी गाव गाठतो.
पण पांढरपाणी गाव गाठण्यापुर्वी एक महत्वाचा एतिहासीक अवशेष पहायचा आहे,"फरसबंदी". पांढरपाणी गावाच्या अलीकडे सुबाभुळीचे जंगल दिसते आणि पुढे शेती आहे, इथून आत एक ओढा उजव्या हाताला दिसतो. हा ओढा फरसबंदीवरूनच वहातो. हा फरसबंदीचा मार्ग मासवड्याचा धनगरवाड्यापासून आला आहे. हा पुढे पावनखिंडीच्या दिशेने गेला आहे. कालौघात बराचसा नष्ट झाला असला तरी या परिसरात थोडाफार अजून शाबूत आहे. ३५० वर्षापुर्वी महाराजांची पालखी याचमार्गावरुन गेली होती.
फरसबंदी पाहून पांढरे पाणी गाव गाठायचे. इथली शाळा हे विश्रांती घ्यायची हक्काची जागा. इथे जेवणावर ताव मारायचा आणि पुढचा टप्पा म्हणजे आपल्याला पावनखिंड गाठायची असते. यासाठी विशाळगडाच्या रस्त्याला लागायचे.
पण त्यापुर्वी आणखी एक महत्वाचा अवशेष पाहुया, "शिवाजीची विहीर". शाळेपासून चालायला सुरवात केल्यानंतर पाचच मिनीटात उजव्या हाताला घसरतीला एक वाट जाते. समोर दिसणार्या घरापासून डाव्या बाजुला वळल्यानंतर शेतात शिवाजीची विहीर दिसते. काळ्या घडीव दगडात बाधकाम केलेल्या या विहीरीत खाली उतरण्यासाठी पायर्याही आहेत. या विहीरीमागे एक अख्यायिकाही आहे. पन्हाळ्याहून सुटका करुन महाराज सुर्योदयाच्या सुमाराला पांढरपाणी इथे पोहचले तेव्हा एका वॄध्देने त्यांना भाकरी खाउ घातली. समाधानाने महाराजांनी त्या वृध्देला काही मागण्यास सांगितले, त्यावर तीने या गावात उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असते, म्हणून एक विहीर बाम्धून देण्याची मागणी केली. पुढे राजगडाला परतल्यानंतर महाराजांनी दिला शब्द पाळून हि विहीर बांधून दिली.
पांढरपाण्यापासून पावनखिंड सात कि.मी. दुर आहे. भाततळी गावाच्या अलीकडे पावनखिंडीला जाणारा फाटा येतो. या आधी जो माळ लागतो त्याला "घोडेमाळ" म्हणतात. यानंतर आपण पावनखिंडीकडे जाणार्या फाट्यापाशी येतो. आता शेवटपर्यंत डांबरी रस्ता झाला आहे.
या परिसराचे महत्व ध्यानात घेऊन शासनाने आत प्रशस्त पार्किंगची व्यवस्था केली आहे.
मी गेलो होतो तेव्हा एक पत्र्याचा गंजका बोर्ड रस्त्यावर होता. सध्या हा माहिती फलक लावलेला आहे.
पार्किंगच्या जागेपासून दगडी पायर्याच्या मार्गाने या बुरुजासारख्या ठिकाणा पर्यंत यायचे. खरेतर या चांगल्या सुविधाबध्द्ल शासनाचे कौतुक करायला हवे.
ईथून पायर्या उतरून पावनखिंडीच्या दिशेने निघायचे.
पायर्यांवरुन खाली उतरल्यानंतर ढाल आणि तलवारीच्या स्वरुपात हे स्मारक उभे केले आहे.
त्याच्यापुढ्यात एका दगडी शिळेवर कमळात पिंड कोरलेले स्मृतीचिन्ह आहे. त्याखाली "स्वराज्यासाठी प्राणार्पण करणार्या ज्ञात अज्ञात वीरांच्या स्मरणार्थ" अशी संगमरवरी पाटी आहे.
बाजुलाच एका पत्र्याच्या शेडमधे पावनखिंड संग्रामाची माहिती काचेच्या फोटोत लावली आहे. कोल्हापुरच्या "निसर्गवेध परिवार" या दुर्गप्रेमी संस्थेने २००४ साली हे स्मारक उभारले.
यानंतर पायर्या उतरुन वाट आपल्याला थेट एका ओढ्याच्या मुखापाशी आणून सोडते. साधारण तीस फुटावरून एक धबधबा स्वताला खाली लोटून देत असतो. ह्या जागेला पावनखिंड मानतात.
आपल्या पायाजवळूनच पाण्याचा प्रवाह धबधब्याकडे जात असतो, त्यासाठी छोटा पुल उभारलाय त्यावरून पुढे जायचे.
इथून खाली उतरायचे तर पुर्वी झाडाच्या मुळीला धरुन खाली उतरावे लागत होते. आता मात्र उतरताना आधार म्हणून रेलिंग केलेले आहे.
खाली उतरून आपण धबधब्याचा आनंद घेउ शकतो.
ओढ्याच्या पात्रात मोठ मोठ्या शिळांचा खच पडला आहे. हा ओढा केमरूणवाडी जवळ कासारी नदीला मिळतो.
एकूण पावनखिंड म्हणून दाखविली जाणारी हि जागा युध्दभुमी असेल असे वाटत नाही. एक तर मुख्य मार्गापासून एका बाजुला हि तथाकथित खिंड आहे. शत्रुला बाजुने जाउन महाराजांचा पाठलाग करणे शक्य आहे. शिवाय झाडाच्या मुळीवरून उतरून युध्द करीत बसण्याचे कारणच काय? मुळात हा ओढा म्हणजे कासारी नदीचे उगमस्थान आहे आणि कोणतीही माणसांसाठीची रुळवाट अशी नदीपात्रातून असणार नाही. त्यावर पावसामुळे या परिसराची भौगोलिक रचना बदलली असेही मानले जाते, पण पावसामुळे साडेतीनशे वर्षात असा कितीसा बदल होणार? खिंड हि अशा जागी पाहिजे कि तिथून जाण्यासाठी पर्यायी मार्ग असता कामा नये. सह्याद्रीमधे कावळ्या घाटावर असणारी कावल्या बावल्याची खिंड, किंवा करतलबखानाला मात दिलेली उंबरखिंड ह्या रचना हेच सांगतात. शिवाय बखरीप्रमाणे बाजींनी तोफेचा आवाज एकून प्राण सोडले. लक्षात घ्या, इथून विशाळगडाचे हवाई अंतर सात कि.मी. आहे. आषाढात कोसळणार्या पावसात ईतक्या लांब हा आवाज एकू येईल असे मला तरी वाटत नाही.
काही जण घोडेमाळ परिसरात साधारण आठ कि.मी. युध्दभुमी पसरली होती असेही मानतात, पण हा दावा खरा मानायचा तर सिध्दीच्या हजारोच्या सैन्यास उघड्या मैदानावर अवघे तीनशे बांदल कसे तोंड देतील? एकूणच हा तर्क न पटणारा आहे.
काही जण पार्किंगच्या जागेपासून जवळच असणार्या डावीकडे वळल्यानंतर खिंडीसारख्या भागाला पावनखिंड मानतात, पण वरील तर्काच्या कसोटीवर त्यातही अर्थ वाटत नाही. काही जण ती कासारी नदीवर झालेल्या धरणात खरी खिंड बुडाली असे मानतात.मुळात धरण होण्याआधी तिथे फक्त नदीपात्र असणार, अश्या उघड्या जागी कमी सैन्यानिशी कोण युध्द करणार? मुळात फक्त ९१ कलमी बखरीत या घोडखिंडीचा उल्लेख आहे. जर अशी काही खिंड असेल तर माझ्या मते गजापुरपासून जवळ कुठेतरी हवी, कि जिथे तोफेचा आवाज स्पष्ट एकू येईल. हा सर्व संशोधनाचा विषय आहे. असो.
तर बाजींच्या या बलिदानाचे स्मरण करून भाततळी हि धरणाने विस्थापित झालेली वस्ती गाठायची. स्वताची गाडी असेल तर ठिक अन्यथा इथून डांबरी रस्त्यावरची फरफट करण्यापेक्षा वाहनाने विशाळगड गाठलेला चांगला. मी थेट विशाळगडाच्या पायथ्याशी जाणारी एस.टी. पकडली.
विशेष म्हणजे पुर्ण ट्रेक संपेपर्यंत आपल्याला विशाळगड दिसतच नाही. गजापुर ओलांड्ले कि हळूच डोंगरामागून विशाळगड दर्शन देतो.
बर्याचदा धुक्याची चादर लपेटली असल्यामुळे जवळ पोहचून सुध्दा तो दिसत नाही. पण ढगांचा पडदा दुर झाला तर गडाच्या उत्तर अंगाला असणारा मुंडा दरवाजा दिसतो.
विशाळगड आणि सह्याद्रीची रांग यामधे थोडी खोलाटी आहे. पुर्वी इथे उतरून पुन्हा पायर्यांच्या मार्गाने वर चढावे लागायाचे, आता मात्र हा पुल उभारला असल्याने बरीचशी चढण वाचते.
गडाचा माथा गाठून निघायचे पाताळदरीकडे.
कारण इथेच आहेत बाजी आणि फुलाजी प्रभु या नरवीरांच्या समाध्या.
शिवाजी महाराजांनीच त्यांच्यावर येथे अंत्यसंस्कार करून या समाध्या उभारल्या. इथे डोके टेकून या स्मरणयात्रेची सांगता करायची.
(टिपः- सर्व छायाचित्रे आंतरजालावरुन साभार)
संदर्भग्रंथः-
१ ) कोल्हापुर जिल्हा गॅझेटीयर
२ ) डोगंरयात्रा- आनंद पाळंदे
३ ) कोल्हापुर जिल्ह्याचे दुर्गवैभव- भगवान चिले
४ ) करवीर रियासत- स.मा.गर्गे
५ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
६ ) सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो ट्रेकर्स
७) पन्हाळगड ते विशाळगड-श्री. मो.ग. गुळवणी
८) साद सह्याद्रीची! भटकंती किल्ल्यांची !!- प्र. के. घाणेकर
प्रतिक्रिया
7 Jul 2017 - 5:39 pm | पद्मावति
हाही भाग प्रचंड आवडलाय.
7 Jul 2017 - 7:47 pm | लोनली प्लॅनेट
खूपच छान लेखमाला हा भाग विशेष आवडला
त्या काळात जंगल अतिशय घनदाट असेल ना ?
9 Jul 2017 - 10:21 am | दुर्गविहारी
सर्वप्रथम प्रतिक्रीयेबध्दल धन्यवाद. माझ्या अंदाजानुसार शिवकाला या परिसरात कदाचित आजच्या ईतक्या वाड्या नसणार. या परिसरात जंगल असण्याची शक्यताच जास्ती. पण पन्हाळगड विशाळगड असे जा ये करण्यासाठी हा शॉर्टकट आहे आणि हे दोन्ही किल्ले भोजाने वसविले अस्ल्याने ह्या वाटेवर फरसबंदी असावी. जी नंतर वाड्या वसविल्याने आणि शेतीसाठी जमीन करताना नष्ट झाली असावी. त्याचाच थोडा अवशेष पांढरपाणी गावाजवळ दिसतो.
7 Jul 2017 - 8:16 pm | शलभ
निवांत वाचतो. आता ह्याच ट्रेकला निघालो आहे..
9 Jul 2017 - 10:24 am | दुर्गविहारी
शलभ साहेब, जमल्यास तुमच्या ट्रेकचेही अनुभव लिहा. माझ्या माहितीत काही भर घालणे शक्य असेल तर ते ही सांगा. आपल्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत.
8 Jul 2017 - 5:08 pm | तेजस आठवले
अप्रतिम! तुमच्या ह्या आणि इतर सर्व लेखांचे खरंच कौतुक वाटते. तुम्हाला खूप शुभेच्छा.
8 Jul 2017 - 7:15 pm | अभिजीत अवलिया
हा भाग खूप जास्त आवडला. मसाई पठाराचा उल्लेख केलात त्यामुळे ३ वर्षांपूर्वी असेच एकदा पावसाळ्यात मसाई पठारावर गेलो होतो ते आठवले. अतिशय सुंदर असतो हा मसाई पठाराचा परिसर पावसाळ्यात.
8 Jul 2017 - 7:28 pm | यशोधरा
फार सुरेख लिहित आहात. फोटोही आवडले.
8 Jul 2017 - 9:45 pm | दशानन
अफाट!
अतिशय देखणा लेख!
पण, विशाळगड का बरे आवरता घेतला?
त्याच्याबद्दल लिहिण्यास खूप काही आहे हो.. प्लिज लिहा.
9 Jul 2017 - 10:28 am | दुर्गविहारी
धन्यवाद सर. पन्हाळगड आणि विशाळगड यांच्याविषयी सविस्तर धागे लिहीणार असल्यामुळे या धाग्यात फार लिहीले नाही. या धाग्याचा मुख्यविषय पन्हाळगड ते विशाळगड हि स्मरणयात्रा हाच आहे.
9 Jul 2017 - 10:34 am | दुर्गविहारी
सर्वच प्रर्तिसादकांचे आणि वाचकांचे मनापासून आभार. गुरुपौर्णिमे निमीत्त ह्याच दिवशी घडलेल्या महत्वाच्या एतिहासिक घटनेवर हा धागा लिहीला. यानंतर अनवट किल्ले हि मालिका लिहीने सुरु ठेवेन व वेळ मिळाला कि पावसाळी भटकंतीची काही ठिकाणांवरही लिहीनच.
10 Jul 2017 - 8:49 am | प्रचेतस
खूप छान लिहिलंय, छायाचित्रेही पूरक.
पावनखिंडीची जागा म्हणून सध्या जी जागा दाखवतात ती युद्धभूमी नसावी हेच माझेही मत आहे. कारण ती जागा तशी अडचणीची आहे. शिवाय आजूबाजूच्या डोंगरात भरपूर जलद जाणार्या वाटा असताना विशाळगडाला जाणारी जवळची वाट म्हणून सध्याची पावनखिंड संशयास्पदच वाटते. अगदी भर उन्हाळ्यात देखील येथे कासारीच्या पात्रात मधे मधे पाण्याचे खोल डोह असतात तर ऐन आषाढात येथे पाण्याचा प्रवाह किती फुफाटत असेल ह्याची कल्पनाच करवत नाही.
10 Jul 2017 - 1:11 pm | एस
अप्रतिम! पावनखिंड सध्या जिथे दाखवली जाते तिथे ती असणे शक्यच नाही ह्या वरील सर्वांच्या मताला दुजोरा. पावनखिंडीच्या हकीकतीला सबळ पुरावा हा इतर साधनांत आढळत नाही. यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.
रच्याकने, तुम्ही छायाचित्रांचा स्रोत हा केवळ आंतरजालावरून साभार इतकाच नमूद न करता प्रत्येक छायाचित्राखाली त्या त्या साईटचे नाव दिल्यास बरे होईल असे सुचवतो.
15 Jul 2017 - 9:45 am | अनिल कपूर
अमेझिंग.... व्हॉट अ फ्लो ...... हॅट्स ऑफ..
21 Jul 2017 - 10:40 pm | ऋतु हिरवा
छान लेख आणि फोटोही सुंदर
20 Mar 2018 - 10:53 pm | चौथा कोनाडा
अप्रतिम, खुपच सुंदर !
संयतपणाने वर्णन केलेल्या शब्दांमध्ये सुद्धा थरार जाणवतो आहे.
जायलाच हवं इथं एकदा !
20 Aug 2019 - 12:59 am | शशिकांत ओक
दुर्गविहारींचा हा धागा पुन्हा वाचून पाहता नव्याने माहिती मिळाल्याचा आनंद झाला.
30 Jul 2024 - 4:35 pm | Chandrashekhar ...
ट्रेक वर्णनाची भाषा ओघवती आणि स्फुरण देणारी आहे. फोटो आणि इतिहास खूप छान