टार्गेट्स आणि स्ट्रेस!

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
31 May 2017 - 10:05 am

"आजचा सेशन ऐकून एक गोष्ट तर नक्कीच कळली यार.", सतीश हातातल्या कॉफीचा घोट पीत म्हणाला

"कोणती गोष्ट रे? “, अमितने विचारलं.

"माणसाचं पोट भरलेलं असलं ना की या गोष्टी बोलायला सुचतात यांना."

"कोणत्या गोष्टी? आता तू नको पकवू यार."

"ह्याच रे...बी पॉझिटीव्ह, डोन्ट वरी बी हॅपी वगैरे वगैरे.", सतीशचा आवाज थोडा वाढला.

"नेमकं काय म्हणायचंय तुला? थोडा थोडा अंदाज येतोय मला."

"अरे हे बघ..हे स्ट्रेस रीलिव्हिंग सेशन कोणी अरेंज केलं? आपल्या एचआरवाल्यांनी...बरोबर?. आणला कोणीतरी पकडून भाषण ठोकायला. ह्यांच्या बापाचं काय जातं रे टेन्शन घेऊ नका वगैरे म्हणायला.एक दिवस आमच्या सेल्स किंवा एक्झेक्युशन टीममध्ये काम करून बघा आणि बिना स्ट्रेस राहून दाखवा म्हणावं."

"बरोबर आहे तुझं. पण ते भरल्यापोटी वगैरे काय म्हणत होता तू?"

"अरे आता बघ, तो ट्रेनर आला आपल्याला शिकवायला. पैसे तर घेतले असतीलच त्याने. आज आपल्याकडून उद्या दुसऱ्याकडून. आपल्याच मजल्यावर सहा-सात कंपन्या आहेत. आपल्यासारखे स्ट्रेसवाले बकरे भरपूर सापडतात यांना. ह्यांचं दुकान जोरात चालतंय. मग भरल्यापोटी स्ट्रेस रीलिव्हिंगचे सल्ले द्यायला लागताच काय?"
"हो..हे बघ मला तर फार बोअर झालं ते सेशन. पण एक सांगू का? तो काही चुकीचं सांगत नव्हता रे. आपण उगाच जास्त टेन्शन घेतो असं मलाही वाटतं. त्याने ते उदाहरण नाही का दिलं चहा-साखरेचं काहीतरी. ते पटलं मला.", कॉफीत थोडी अजून साखर टाकताना अमित म्हणाला.

"बस बस..हीच उदाहरणं सुचतात यांना. त्याच काय म्हणणं आहे, की चहा करताना जर घरातली साखर संपलीये असं दिसलं तर कितीही चिड्चीड केली तरी काय उपयोग? शेवटी साखर आणावीच लागणार ना. मग साखर कधीतरी संपणारच असा विचार करावा आणि सरळ दुकानात जावे. वा!! क्या बात हैं!!."

"मग बरोबरच आहे ना?"

"घंटा बरोबर आहे!!! इतकं साधंसरळ नसतं रे. घरातली साखर संपल्यावर आधी बायको चिडणार की चार दिवस सांगते आहे साखर आणा म्हणून, लक्ष कुठं असतं तुमचं?? मग साखर आणल्यावर आधीच झालेल्या भांडणामुळे चहा गोड नाही लागणार!! आणि मुळात हे चहा-साखर काय घेऊन बसलात रे तुम्ही? दोन दिवस चहा नाही पिला तर काय फरक पडतो?? नोकरीत तसं नसतं रे. आता मी सेल्समध्ये आहे. एक महिना मी ऑर्डर नाही आणल्या तर बॉस म्हणेल का डोन्ट वरी बी हॅपी!!!", सतीश आता चिडला होता.

"हे बघ तू एकदम टोकाचं बोलतोय. टेन्शन घेऊ नका म्हणजे काय रिकामे बसून राहा असा अर्थ होत नाही मित्रा. एक महिना तू ऑर्डर आणणार नाही असे कसे चालेल? त्याच म्हणणं असंय की, आपण जे टार्गेट्सचं टेन्शन घेतो ना ते घेऊ नये. टार्गेट्स कधी पूर्ण होतात कधी नाही हे मान्य करावं."

"फक्त मी मान्य करून चालतं का? मी तुला एक सिनॅरिओ सांगतो. अगदी आपला नेहमीचाच. त्यात हे डोन्ट वरी बी हॅपी कसं बसवायचं ते सांग बरं का!!"

"कोणता सिनॅरिओ?", अमितने विचारलं.

"महिन्याच्या एक तारखेला मी सेल्स मीटिंगमध्ये छाती ठोकून सांगतोय की मी यंदा चार कोटींचा धंदा आणणार. आपल्या बॉसने तोंड वाकडं करून त्याचं सहा कोटी केलं. वीस-बावीस तारखेपर्यंत मी तीन कोटींच्या ऑर्डर बुक केल्या. शेवटच्या आठवड्यात चार कोटींची मोठी ऑर्डर मिळणार हे मला माहिती आहे. अगदी क्लायंटच्या एमडीने मला तसं कन्फर्म केलंय. मग मी आपला टेन्शन न घेता काही छोट्या-मोठ्या ऑर्डरींच्या मागे लागलोय. एकोणतीस तारखेला ती ऑर्डर दुसऱ्याला गेल्याचं कळते. आता काय करायचं?? डोन्ट वरी बी हॅपी!!"

"अरे मग तुझं टार्गेटच चुकलं होतं ना."

"माझं नाही मॅनेजमेंटचं!! आणि त्यांचंही काय चुकलं सांग? त्यांच्यावरती कंपनीचे मालक आहेत..प्रमोटर्स आहेत. आणि या सगळ्यांचे आपापले टार्गेट्स आहेत. मी म्हणतो, या सगळ्यांना बसावा ना त्या स्ट्रेस रीलिव्हिंग सेशनमध्ये. तुला कळतंय का, स्ट्रेस निर्माण करणारे हे लोकं आहेत आणि स्ट्रेस रिलीव्ह करणारा तो ट्रेनर आहे. आणि दोघेही सुखात आहेत. पण स्ट्रेस भोगतोय कोण?? तू आणि मी"

"अरे पण कंपनी काहीतरी करते आहे ना आपल्यासाठी.", इति अमित

"काय करते आहे? हे म्हणजे दुष्काळात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्ट ऑफ लिव्हिंग शिकवण्यासारखं आहे!!"

"मग तुझ्या मते काय करायला हवं?"

"आर्ट ऑफ लिव्हिंग शिकवा रे. चांगलंच आहे ते. पण आधी लिव्हेबल वातावरण तरी तयार करा."

"चल केलं तू म्हणतोस तसं वातावरण तयार. पुढे काय?"

"मग हळूहळू परिस्थिती बदलेल. स्ट्रेस कमी होईल आपल्यावरचा.", सतीश ठामपणे म्हणाला.

"पण पुढे काय?"

"पुढे हेच आपलं..."

"हेच म्हणजे?"

"हेच रे..स्ट्रेस कमी होईल. शांतता मिळेल. समाधान मिळेल वगैरे वगैरे."

"पण तुझ्या वैयक्तिक टार्गेट्सचं काय?"

"कोणते टार्गेट्स आता?"

"तुला प्रमोशन हवंय..तुला पगारवाढ हवीये..परदेशात जायचंय ...त्याचं काय?", अमितने विचारलं.

"मग तो माझा प्रॉब्लेम असेल ना..मी करेल जास्त काम..मी वाढवेल माझे टार्गेट्स."

"म्हणजे परत तेच."

"तेच कसं? हे माझ्यापुरतं ना!"

"का? मलाही हवंय प्रमोशन..मी सुद्धा वाढवेल माझे टार्गेट्स. मग सुरु आपल्यात स्पर्धा."

"म्हणजे परत स्ट्रेस?"

"हो अर्थातच."

"मग ह्यावर इलाज काय?"

"इलाज त्या ट्रेनरने सांगितलाय. तो तुला मान्य नाही."

"कोणता इलाज?"
"थोडक्यात सांगायचं तर...ट्रेनर म्हणतोय स्वतःला बदला. आणि तू म्हणतोय की जगाला बदला. जास्त सोपं काय आहे?", अमित हसून म्हणाला.

"............................................................." सतीश बोलता बोलता थांबला.

"हे बघ तू विषय काढला म्हणून सांगतो. आपल्याला हवंय म्हणून आकाश खाली येणार नाही. आता त्यासाठी किती उंच उडी मारायची हे ज्याचे त्याने ठरवावे. आपण दुसऱ्यांच्या उड्या मोजत बसतो हा खरा प्रॉब्लेम आहे.

आपल्या भाषेत सांगायचं तर, नोकरी किंवा काम करण्याला पर्याय नाही. पण कश्यासाठी आणि कोणासाठी हे पक्कं असायला हवं."

"हे बघ ही सगळी फिलॉसॉफी झाली. नोकरी करण्याला पर्याय नाही म्हणतोस ना. तो माझा मगाचा सिनारियो घे. आणि सांग काय करायचं."

"'नाही' म्हणायला शिक!!"

"म्हणजे?"

"चार कोटींचं सहा कोटी केलं ना त्याने. त्याला सांग चार कोटी नक्की करणार. उरलेले दोन कोटींची जबाबदारी आपल्या दोघांची."

"त्याने ऐकले नाही तर?"

"किती वेळा ऐकणार नाही?"

"तो भाषण देतो रे..यू कॅन डू इट वगैरे."

"तो बोलणारच ना...तू बळी पडू नको."

"म्हणजे माझ्यात हिंमत नाही हे सिद्ध होणार."

"चार कोटींच्या ऑर्डर आणायला हिंमत लागत नाही का? हिंमत आणि महत्त्वाकांक्षा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. इथे चार कोटी ही हिंमत आहे आणि सहा कोटी ही महत्त्वाकांक्षा!"

"मग नसावी का माणसाला महत्त्वाकांक्षा?"

"असावी ना...पण ती स्वतःची!! दुसऱ्याने सांगितलेली नव्हे."

"थोडक्यात दबावापुढे झुकायचं नाही."

"हो..त्यालाच खरी हिंमत म्हणतात."

"पण अश्याने टीमवर्क होणारच नाही ना."

"एकोणतीस तारखेला जेंव्हा ऑर्डर न मिळाल्यामुळे तू एकटा शिव्या खातोस तेंव्हा टीमवर्क कुठे जातं? फार गोंडस शब्द आहे हा टीमवर्क!!", अमित हसून म्हणाला.

"गोंडस म्हणजे?"

"म्हणजे सोयीनुसार येतं हे टीमवर्क! सहा कोटी झाले की टीमवर्क... आणि नाही झाले की तू एकटा."

"मग हेच तर होते ना सगळ्या बाबतीत."

"तेच सांगतोय मी मगापासून तुला...कंपनी,टार्गेट्स हे सगळं असणारच आहे. ह्या सगळ्यात तू कुठे राहणार हे महत्वाचं. हे असले गोंडस शब्द, भाषणं,स्पर्धा ह्याला बळी पडू नये असं मला वाटते. बाकी स्वतःच्या मेहनतीने जेवढं शक्य असेल तेव्हढं करावं."

"पण एक गोष्ट विसरतो आहेस तू? माझी क्षमता,स्किल ह्याविषयी काय?"

"काय त्याविषयी?", अमितने विचारलं.

"हे बघ मार्केटिंग,सेल्स हे माझं स्किल आहे. ते जर मी थोडं स्ट्रेच करून पूर्ण वापरणार नाही तर काय उपयोग त्याचा?"

"आता मला परत थोडी फिलॉसॉफी सांगावी लागेल."

"सांग..काही प्रॉब्लेम नाही"

"गोड असणं हा उसाचा गुणधर्म आहे बरोबर?"

"हो"

"मग त्याला मशीनमध्ये जास्त वेळ पिळून त्याचा रस काढला तर तो जास्त गोड लागतो का?"

"असं काही नाही."

"मगच तेच तुझ्या-माझ्या स्किल बद्दल सुद्धा लागू नाही होत का? म्हणजे बघ सहा कोटी केलं तरच तुझं स्किल आणि चार कोटी केलं तर तो योगायोग?"

"नाही..ते सुद्धा स्किल आहेच!!"

"मग झालं तर."

"यार तू तर त्या ट्रेनरपेक्षाही चांगलं बोलतोस. तू पण ट्रेनिंग देणं सुरु कर.",सतीशने अमितला टाळी दिली.

"नको..तुझ्यासारखे दोन-चार भेटले तरी खूप झालं...चला काम करू आता!"

-- समाप्त

जीवनमानवाद

प्रतिक्रिया

अद्द्या's picture

31 May 2017 - 10:45 am | अद्द्या

लेख चांगलंय ..
पण एक प्रश्न . वरच्या माणसाला उलटून बोलण्या इतकी तरी पोजिशन अली पाहिजे ना आधी कंपनी मध्ये.. नाही तर पहिल्याच दिवशी " मला असले फालतू टार्गेट्स नको " म्हणलं तर लाथ पडेल मागे .
मग तीथे पोचण्यासाठी कैच्याकाय गोष्टी कराव्याच लागतील ना सुरुवातीची ३-४ वर्ष तरी

सहमत. हे १०० टक्के प्रॅक्टिकल नाही हे मान्य आहे. पण नुसता करियर करियर करून स्वतःची आणि कुटुंबाची वाताहत करणारे बरेच नजरेत आहे. त्यावरून लिहिलंय.

राघव's picture

31 May 2017 - 11:07 am | राघव

आवडला. छान लिहिलंय. :-)

अत्रुप्त आत्मा's picture

31 May 2017 - 2:58 pm | अत्रुप्त आत्मा

+१

अमर विश्वास's picture

31 May 2017 - 12:11 pm | अमर विश्वास

कुठे थांबायचे हे कळणे फार महत्वाचे ... शेअर्स मध्ये एक कन्सेप्ट आहे : स्टॉप लॉस पातळी ...

तशी आपली स्टॉप लॉस पातळी नीद ठरवली कि स्ट्रेस फ्री राहणे सोपे होते

टवाळ कार्टा's picture

31 May 2017 - 2:06 pm | टवाळ कार्टा

भन्नाट लेख आहे....नावासकट व्हात्सप्प वर ढकलू का?

चिनार's picture

31 May 2017 - 2:14 pm | चिनार

ढकल त्येजायला...
हि लिंक दे तेवढी खाली...
http://chinarsjoshi.blogspot.in/
बाकी इतकं मोठं कोणी वाचते का कायप्पावर?

टवाळ कार्टा's picture

31 May 2017 - 5:43 pm | टवाळ कार्टा

सगळे सगळे वाचतात ;)

कानडाऊ योगेशु's picture

4 Jun 2017 - 11:30 pm | कानडाऊ योगेशु

ढकल त्येजायला..

हे आवडले.
लेआहेवेसांनल.

सचिन काळे's picture

6 Jun 2017 - 4:33 pm | सचिन काळे

ढकल त्येजायला..

हे बाकी लई भारी!!! आपकी जिंदादिली हमें भा गई।

एस's picture

31 May 2017 - 3:32 pm | एस

गुड!

संजय क्षीरसागर's picture

31 May 2017 - 6:27 pm | संजय क्षीरसागर

स्ट्रेसचं मूळ कारण गोलनं आपल्याला ओवरटेक करणं आहे. स्वतःला स्ट्रेच करणं वगैरे या खुळचट वेस्टर्न कल्पना आहेत. कारण तसं करणं म्हणजे बॅकडोअरनं गोलला पुन्हा आपल्या वरचढ करवून घेणं आहे.

ज्या क्षणी गोल ओवरटेक करतो त्या क्षणी व्यक्तीची सृजनात्मकता लयाला जाते आणि कामातली सर्व मजा संपते . या उलट ज्या वेळी कामात मजा येते आणि व्यक्ती सृजनशील असते त्या वेळी आपोआप काम अपेक्षेपेक्षा चांगलं होण्याची शक्यता असते. त्यासाठी स्वतःला स्ट्रेच वगैरे करण्याची आवश्यकता नाही.

जर कुणी क्षमतेपेक्षा जास्त ओझं लादत असेल तर ते नाकारण्याची हिंमत एकदाच दाखवावी लागते म्हणजे तसं करणारी व्यक्ती पुढच्या वेळी तुम्हाला सांगण्यापूर्वी दोनदा विचार करते. त्यासाठी वरच्या पदाला वगैरे जाण्याची गरज नाही.

एकदा हे जमलं की कामाचा स्ट्रेस वगैरे काही येत नाही.

विनिता००२'s picture

3 Jun 2017 - 2:41 pm | विनिता००२

जर कुणी क्षमतेपेक्षा जास्त ओझं लादत असेल तर ते नाकारण्याची हिंमत एकदाच दाखवावी लागते म्हणजे तसं करणारी व्यक्ती पुढच्या वेळी तुम्हाला सांगण्यापूर्वी दोनदा विचार करते. त्यासाठी वरच्या पदाला वगैरे जाण्याची गरज नाही. >>> अगदी अगदी!!
मी मला जे जमतेय, ते करेन म्हणून सांगते. जे जमणार नाही, ते प्रयत्न करुन बघते म्हणते. पण प्रेशर येणार असे वाटले, तर सरळ हे जमणे अवघड आहे म्हणुन सांगते.
समोरच्याला पण काही दिवसात आपला अंदाज येतोच.

उपेक्षित's picture

3 Jun 2017 - 6:53 pm | उपेक्षित

क्या बात है मनापासून पटला प्रतिसाद संजयबाबू ...
तुम्हाला योग्य वेळी नाही म्हणता आले पाहिजे हेही तितकेच महत्वाचे.

सुबोध खरे's picture

3 Jun 2017 - 7:42 pm | सुबोध खरे

तुम्हाला योग्य वेळी नाही म्हणता आले पाहिजे हेही तितकेच महत्वाचे.
बऱ्याच लोकांना नाही म्हणता येत नाही हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग असू शकतो.
शिवाय खंबीर असणाऱ्या माणसाला काही विशिष्ट वेळेस परिस्थितीमुळे नाही म्हणता येत नाही.
पण तोंडाने नाही म्हणण्यापेक्षा कृतीने नाही म्हणावे.
एक उदाहरण देत आहे. मी एम डी करत होतो. तेंव्हा आमच्या एका प्राध्यापकांना वैद्यकीय परिषदेत भाषण करायचे होते ते काम त्यांनी माझ्या गळ्यात टाकले. त्यांना त्या वेळेस नाही म्हणणे शक्य नव्हते. कारण एक तर लष्करात, त्यातून ते तुमचे सरळ वरिष्ठ होते. पण मी त्यांचे भाषण अशा तर्हेने करून शेवटच्या दिवशी दिले कि त्यांना काम केले नाही असेही म्हणता येईना आणि ते भाषण त्यांना प्रत्यक्ष कार्यक्रमात करता हि येणार नव्हते. शेवटी वैतागून त्यांनी माझ्या पार्टनरला घेऊन ते सर्व भाषण दुरुस्त करून घेतले. याचा एक फायदा म्हणजे मला यानंतर कधीही विभागाच्या बाहेरचे काम दिले गेले नाही. बाहेरचे काम करायला दुसरी माणसे आणि रुग्ण तपासायचे काम मला अशी सुटसुटीत विभागणी झाली.
काम न करण्यासाठी शंभर कारणे सापडू शकतात. फक्त तुम्ही हजरजबाबी असले पाहिजे.
राजकारणी लोकाना लांब ठेवण्यासाठी मी अनेक वेळेस अशी कारणे वापरतो.
अजून काही उदाहरणे. काही वेळेस नातेवाईकांच्या लग्न किंवा तत्सम समारंभासाठी बोलावणे येते आणि काही जण पठाणी आग्रह करतात. त्यांना मला जमणार नाही असे मी कधीही सांगत नसे. गोव्यात असताना अशाच एका लग्नाचे बोलावणे आले जे औरंगाबादला होते( सौ च्या माहेरचे होते). मे महिन्यात लग्न होते . दोन लहान मुले घेऊन लळत लोम्बत मुंबई आणि तिथून औरंगाबादला जायचं. आणि एक दिवस हजर राहून तसाच लटकत परत यायचं. सौ.ने त्यांना कसं जमणार नाही हे सांगायचं प्रयत्न केला पण पठाणी आग्रह असा असतो कि ते सर्व गोष्टीना उपाय सांगतात. तेंव्हा मी सौला गप्प करून अगदी तोंड भरून सांगितलं कि नक्की यायचा प्रयत्न करणार. "म्हणजे काय? घरचं कार्य आणि आम्ही येणार नाही?"
माझ्या भावाने सांगितले कि तुझा येण्याजाण्याचा खर्च किती होईल तो हिशेब कर आणि घसघशीत आहेर पाठवून दे. तसा घसघशीत आहेर सासऱ्यांबरोबर पाठवून दिला आणि "गेलो नाही". परत भेटलो तेंव्हा अगदी वाईट तोंड करून सांगितलं कि अहो कमांडिंग ऑफिसरने रजाच दिली नाही.( तेंव्हा वार्षिक तपासणी मुळे रजा मिळणार नव्हती हे मला माहित होतंच). आहेरा चा सुपरिणाम होताच. नातेवाईक तोंड भरून म्हणाले "अहो लष्कराची नोकरी अशीच असते"
तस्मात -- तोंडाने नाही म्हणू नये. कृतीने म्हणता येते.
माणसे दुखावली जात नाहीत.

उपेक्षित's picture

3 Jun 2017 - 8:11 pm | उपेक्षित

अगदी बरोबर आहे तुमचे खरे सर पण काही वेळा तोंडाने नाही म्हणावेच लागते भले समोरचा दुखावला का जाईना (अर्थात तुमचे म्हणणे पण बरोबरच आहे)
माझे उमेदीचे दिवस होते आणि मी एके ठिकाणी नुकताच नोकरीस लागलो होतो माझ्या कामाचे स्वरूप म्हणजे आमच्या काही रिटेल एजन्त च्या ज्या काही क़्वेरि मेल वर आल्या असतील त्या फुलफील करून द्यायच्या. सुरवातीला काही दिवस नेमून दिलेले कामच करत होतो पण एकदा सायबाने एक कुपन होते ते urgent द्यायचे आहे म्हणून मला रात्री ऑफिस सुटायच्या टायमाला बाणेरला पिटाळला. त्या दिवशी urgent होते म्हणून गेलो शिवाय त्यावेळी मला कामाची खूपच गरज होती इतकी कि ती मी शब्दात नाही सांगू शकत.
नंतर २ दिवसांनी परत आपले येरे माझ्या मागल्या... त्यादिवशी जवळच पिटाळले मग मात्र डोके सटकले साला ऑफिस बॉय ची कामे मला सांगत होता हा (ती कामे पण केली आहेत शिकत असताना अगदी फारशी पुसण्यापासून सगळी कामे ) काम करून आल्यावर सायबाला गोडीत टिपिकल सदाशिव पेठी भाषेत मेल टाकला त्यादिवसा पासून मला त्याने परत कधी दुसरी कामे सांगितली नाहीत.

जाता जाता - मला माझ्या आयुष्यात भेटलेला सगळ्यात हुशार आणि मला समजून घेणारा असा हा माझा बॉस होता. मला माझी strength त्याच्यामुळेच समजली.

सुबोध खरे's picture

3 Jun 2017 - 8:24 pm | सुबोध खरे

अहो
मी ठणकावून नाही म्हणणारा माणूस आहे तरीही काही वेळेस परिस्थिती अशी होते हे लिहायचे होते.

अहो आले ध्यानात म्हणूनच तुमचे पण बरोबर आहे हे बोललो, बाकी ठणकावून सांगण्यात आमी पण तुमच्या सारखेच आहोत.

मनिमौ's picture

1 Jun 2017 - 12:18 pm | मनिमौ

रोज रोज स्ट्रेचिंग ची अजिबात गरज नाही. शांतपणे पण ठाम नकार देताच आला पाहिजे

अश्फाक's picture

2 Jun 2017 - 7:47 am | अश्फाक

Fail to respond properly to any physical or mental threat.
. म्हणजे वरील उदाहरणात xyz व्यक्ति ने टारगेट भेटल्यावर जेशक्य आहे त्याचीच हामी घेणे अन्यथा स्ट्रेस ठरलेला

what is stress? Fail to respond properly to any physical or mental threat

असं नाही . Stress is getting disconnected with Self ! स्वस्थ व्यक्तीला कधीही स्ट्रेस येत नाही कारण ती कायम स्वतः शी कनेक्टेड असते, मग परिस्थिती काहीही असो.

प्रश्न परिस्थिती काय आहे हा नाही, तिच्याकडे तुम्ही कसं पाहातायं हा आहे. स्ट्रेसफुल व्यक्तीला अडचण ही थ्रेट वाटू शकते आणि स्वस्थ व्यक्ती अडचणीचं संधीत रुपांतर करु शकते .

विनिता००२'s picture

3 Jun 2017 - 2:46 pm | विनिता००२

प्रश्न परिस्थिती काय आहे हा नाही, तिच्याकडे तुम्ही कसं पाहातायं हा आहे. >> असहमत!!

वास्तव काय आहे हे उघड दिसतेच. मी आज ५ कंपन्यांचे अकाउंट्स / अ‍ॅडमिन पहाते (ग्रुप कंपनी) . तिथला स्टाफ जर मला फाईल घ्यायला तुम्हांलाच यावे लागेल म्हटला (जे की माझे काम नाही, नियमानुसार फाईल मला माझ्या जागेवर मिळायला हवी.) तर मी माझा पॉझिटीव्ह दृष्टीकोन ठेवून फाईल आणायला जायचे का?? माझी पोझिशन मला राखायलाच लागेल अन्यथा माझा ऑफिसबॉय करुन टाकतिल.

तिथला स्टाफ जर मला फाईल घ्यायला तुम्हांलाच यावे लागेल म्हटला (जे की माझे काम नाही, नियमानुसार फाईल मला माझ्या जागेवर मिळायला हवी.) तर मी माझा पॉझिटीव्ह दृष्टीकोन ठेवून फाईल आणायला जायचे का??

फाईल आणायला जायचं का ती तुम्हाला आणून दिली पाहिजे हा ऑफिस प्रोसिज्यरचा भाग आहे. ती डायरेक्ट फिजिकल किंवा सायकॉलॉजिकल थ्रेट असू शकत नाही.

विनिता००२'s picture

5 Jun 2017 - 1:36 pm | विनिता००२

ती डायरेक्ट फिजिकल किंवा सायकॉलॉजिकल थ्रेट असू शकत नाही. >>> पांढरपेशा समाजात डायरेक्ट थ्रेट करत नाहीच, असेच त्रास देतात.

संजय क्षीरसागर's picture

5 Jun 2017 - 2:02 pm | संजय क्षीरसागर

तो ऑफिस प्रसिज्यरचा भाग आहे. गोल सेटींग आणि अचिवमंट या दरम्यानच्या स्ट्रेसचा विषय चालू आहे.

विनिता००२'s picture

5 Jun 2017 - 4:27 pm | विनिता००२

लिमिटेड गोष्टींवरच बोलायचे आहे तर मग माझे वरील सर्व प्रतिसाद सोडून द्या.
मी जनरल ऑफिस स्ट्रेस बद्दल लिहीत होते. असो.

संजय क्षीरसागर's picture

5 Jun 2017 - 8:27 pm | संजय क्षीरसागर

फाईल आणण्यासारख्या साध्या गोष्टी स्ट्रेसफुल होऊ शकत नाहीत. तो अ‍ॅटिट्यूडचा फरक असावा. जर कधी फाईल आणायला जावं लागलं तर फार पुढचा विचार (आपला ऑफिसबॉय होईल वगैरे), न करता सहज फाईल आणली आणि काम संपवलं तर ते नॉन-स्ट्रेसफुल होईल असं वाटतं. यात फिजिकल अ‍ॅक्टिविटीपण होईल आणि रिलेशन्सपण तयार होतील. कधी कुणावर काय वेळ येईल ते सांगता येत नाही, अशा वेळी आऊट ऑफ द वे जाऊन कुणासाठी काही केलं असेल तर लोक्स जनरली लक्षात ठेवतात. थोडक्यात, फाईल मिळणं महत्त्वाचं, कारण कोणत्याही कारणानं का असेना, `पेंडींग काम' हा मोठा स्ट्रेस आहे.

विनिता००२'s picture

6 Jun 2017 - 10:19 am | विनिता००२

अशाच एक एक गोष्टी कशा गळ्यात पडतात याचा बहुतेक तुम्हाला अनुभव नसावा. आणि कोणी हे लक्षात ठेवेल असे पण नाही. तुम्ही सांगेल ते काम करताय हे मात्र लक्षात ठेवले जाते
असो, माझा मुद्दा तुमच्या लक्षात आलेला नाही. कारण मी लिहीलेच आहे की माझ्या पॉझिटीव्ह अ‍ॅटीट्यूडने मी ते काम करावे का??

मला असे प्रश्न येत नाहीत. फोकस कामावर असला की किरकोळ गोष्टींनी फरक पडत नाही. नोकरीला असतांना बॉसनं सांगितलेलं एकच वाक्य अजून स्मरणात आहे `मला भींत हालली पाहिजे, डोकं किती आपटलं त्याचा पाढा नको !' नंतर प्रॅक्टीस सुरु केल्यावर सुद्धा, काम जलद कसं संपेल तेच पाहात आलो. त्यामुळे कामं वेळेच्या आधीच झालेली असतात आणि सहकार्यांना पण मजा येते.

माहितगार's picture

3 Jun 2017 - 8:38 pm | माहितगार

@चिनार, लेख रोचक आहे आवडला. अर्थात एक वेगळा सिनारीओ पाहण्यात होता; टार्गेट्सच गाडं अंशतः फायनान्स डिपार्टमेंट मधून/उभारताना पासून सुरु होत का ? वित्तीय संस्था असोत, की शेअर होल्डर असोत त्यांना विश्वास वाटावा म्हणून पहिल हाईप होतं, सोज्वळ रॅशनल स्टेटमेंट्सना किती फायनान्सर फायनान्स करत असतील या बाबत साशंकता वाटते. फायनान्स डिपार्टमेंटनी हाईप केलं की दबाव फायनान्स > मॅनेजमेंट> मार्केटींग > सेल्स टिम असा खाली धावत जातो. जी गोष्ट मूळातच हाईप झालेली आहे ती साध्य झाली नाही की स्ट्रेस लेव्हल वाढू शकतात आणि मॅन पॉवर टर्नओव्हर घडतो.

उपेक्षित's picture

3 Jun 2017 - 8:52 pm | उपेक्षित

आमचा साला पेशाच स्ट्रेसवाला आहे.
एक नवीन क्लायेन्त (कंपनी) मिळाला आहे उद्या (४ जून) सकाळी ७.३० ला त्याची UK फ्लाईट आणि आज पर्यंत त्याचा UK विसा चा पत्ता नव्हता दुपारी ३/४ ला ५ हि जणांचे विसा त्यांच्या हातात आले आणि मी सुटकेचा निश्वास टाकला हुशश.
विसा नसता आला तर परत त्या कंपनीने पहिले पण नसते माझ्या फर्म कडे :( थोडक्यात बचावलो.

अनुप देशमुख's picture

19 Jul 2017 - 3:45 pm | अनुप देशमुख

जगाला बदलण्यापेक्षा स्वतःला बदलणं कधीपण सोप्प. आणि अशी उदाहरण पाहून आजूबाजूचं जग अर्थात वातावरण बदलत आपोआप. सोप्या शब्दात ठोस मुद्दा. आवडलं आपल्याला. एकदम कडक!