अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह!! बंगालच्या उपसागरात असणारी भारताची पाचूची बेटं!! निळाशार समुद्र, गर्द वृक्षराजी , अफाट सागरी संपत्ती आणि निसर्ग हेच डोळ्यांसमोर येतं. याच्या जोडीने सेल्युलर जेल आणि सावरकरांमुळेही आपण या बेटांशी जोडलो गेलो असतो. मलाही सावरकर आणि इतर राजबंदी , त्यांना झालेली काळ्या पाण्याची शिक्षा या सगळ्यामुळे अंदमान ची पहिली ओळख झाली होती. आणि तेव्हापासुनच या जागेला भेट द्यायची इच्छा होती. तो योग या महिन्यात आला.
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाबद्दल जालावर अनेकांनी लिहिलय. या बेटांची भौगोलिक आणि ऐतिहासिक माहिती आपल्याला जालावर मिळेलच , मी मात्र माझ्या नजरेतुन अनुभवलेला आणि भावलेला अंदमान तुम्हाला दाखवणार आहे. आम्ही शक्यतो टुर कंपनीसोबत फिरणं टाळतो त्यामुळे कसं आपल्याला वाट्टेल तेव्हा वाट्टेल तस फिरता येतं. म्हणून या प्रवासाला लागते ती पुर्वतयारी तशी ६ महिने आधी सुरु झाली होती. डिसेंबर मधे आम्ही आमच्या सुट्ट्यांचा अंदाज घेऊन तिकिटं बुक केली आणि अंदमान बेटांचा अभ्यास सुरु केला. काय करावं, काय करु नये हे वाचलं. आणि आम्ही साधारण कसे आणि किती फिरणार हे ठरवलं.
( www.andamans.gov.in आणि अजून एक nic ची साईट आहे त्यावर अभ्यास केला. शिवाय inter island प्रवासाची माहिती घेण्यासाठी वww.and.nic.in ही साईट. खूप छान दिलय त्यांनी डिट्टेलवार. त्याशिवाय मी जेव्हा पोर्ट ब्लेअर मधल्या टुरिजम डिपार्टमेंट मधे गेले होते तेव्हाही न कंटाळता सगळी माहिती दिली आणि शंका दूर केल्या होत्या माझ्या.
पहिल्या दिवशी रात्री जेवल्यावर आम्ही एक फेरफटका मारायला गेलो होतो शहरात. तर तेव्हा तिथलं सचिवालय, वेगवेगळ्या खात्यांची offices रात्रीचीही सुरु होती. पर्यटन खात्याच्या office मधे गेले तर एका दादांनी खूप मस्त माहिती दिली. अंदमान ट्रंक रोड वर एका लिमिट पर्यंतच दुचाकी नेता येते, पुढे ट्रायबल एरियामधे compulsory चार चाकी. त्या शिवाय ट्रायबल एरियातले किंवा ट्रायबल्स चे फोटो नाही घेता येत. त्यांना खाऊ पिऊ नाही देता येत. ते काम पोलीस करतात. हे अन बरेच काही. तिथे offices ६ वाजता उघडतात. ३ साडे तीन ला बंद होतात. आणि शिफ्ट्स मधे २४ तास सुरु असतात. फक्त सह्या वगैरे office hours मधे. इतर मदत सतत सुरु असते.)
आता फक्त शरीर तिथे पोचायचं राहिलं होतं. मन तर कधीचच पोचलं होतं. शेवटी हो ना करता ९ मे उजाडला. आणि सकाळी ७.२० च्या विमानाने आम्ही चेन्नै ला निघालो. पोर्ट ब्लेअर साठी आमचं विमान १०.४० ला होतं. तेवढ्यात जे काही कस काय अन चेपु खेळुन घ्यायचय तेवढं घेतलं. कारण तिकडे फक्त बीएसेनेल , ऐर्टेल अन वोडाफोन हे तीनच सर्विस प्रोवाईडर आहेत. आणि २जी स्पीड बडी मुश्किल से मिलती है अस होटेलवाल्याकडुन कळलं होत. ठरलेल्या वेळी आमचं विमान निघालं वीर सावईकर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे निघालं. दिडेक तासाने काही पाचूची बेटं दिसु लागली. विमानातुन जमतील तसे फोटो घेतलेत.
विमानतळ जवळ आल्यावर क्यामेरे बंद केले. आमच्या गोव्यासारखाच हासुद्धा डिफेन्स एअर्पोर्ट आहे. सामान घेण्याचे सोपस्कार केल्यावर अंदमानच्या पर्यटन विभागाचा हेल्पडेस्क वर प्रिपेड टॅक्सी , बाईक रेंटल वगैरे ची चौकशी केली आणि विमानतळाबाहेर जाऊन टॅक्सी करुन गेलो. इथेच अंदमानी लोकांच्या नियमप्रियतेचा/प्रामाणिकपणाचा पहिला अंदाज आला. पठ्ठ्याने प्रिपेड टॅक्सी च्या दरापेक्षा एक रुपया अधिक घेतला नाही. तेवढ्या अंतरासाठी आमच्या गोव्यात ५०० रुपडे सहज घेतले असते इथल्या टॅक्सीवाल्यांनी.
फ्रेश होऊन सरळ सेल्युलर जेल बघायला गेलो. सगळी जेल फिरुन बघताना अंगावर शहारे येत होते. कश्या परिस्थितीत ह्या लोकांनी इथे दिवस काढले असतील आपण कल्पनाही करु शकत नाही. खूप मराठी माणसं भेटली तिथे. सावरकरांच्या कोठडीत सगळे पायताणं काढुन गेलो. देवळाइतकीच पवित्र जागा होती ती. बसलो थोडा वेळ. जयोस्तुते चं सामुहिक गायन झालं आणि मग उर्वरीत भाग बघितला.
सेल्युलर जेल
सेल्युलर जेल च मुळ स्वरुप सात आरे असलेल्या स्टार फिश सारखं होतं. त्यातले तीनच आरे उभे आहेत. एका आर्याच्या जागी सरकारी इस्पितळ उभं आहे. मधल्या मनोर्याच्या खांबांवर तिथे असलेल्या सगळ्या कैद्यांची नावं आहेत. या इमारतींची रचना अशी होती की एका इमारतीतल्या कैद्यांना समोरचे कैदी दिसू नयेत. फोटोत व्हरांड्यासमोर समोरच्या खिडक्या दिसतायेत. त्या खिडक्यांनाही उतरती छपरे. आणि खोलीत त्याही उंचावर. म्हणजे फक्त उजेड आणि हवा थोडीफार येणार. काळ्या पाण्याची शिक्षा... आणि या इमारती कैद्यांकडूनच बांधून घेतल्या होत्या. कोठडीचे दरवाजे गडगंज आडण्यांनी(कड्यांनी) बंद असत. हे तिथे अजूनही पाहता येतात. त्यातही तात्याराव जास्त डेंजर कैदी , म्हणून त्यांना सगळ्यात शेवटची, कोपर्यातली कोठडी दिली होती. जिथे एका भक्कम दरवाज्यातुन आत गेल्यावर अजून एक दरवाजा लागायचा आणि मग आत तात्याराव. कोलू आणि काथ्याचा ठराविक कोटा पूर्ण झाला नाही तर जेवण देण्यात येत नसे. हात सोलवटून जात, रक्तं येत पण काथ्या कुटलाच पाहिजे. थोड्या जुन्या आणि त्यातल्या त्यात मवाळ कैद्यांना लाकूड्तोडीसाठी नेत. या कैद्यांवर आदिवासी लोकांचे हल्ले होत, तसे ते आताही होतात जर तुम्ही आदिवाश्यांच्या भागात "शिरलात" तर . अंदमानी लाकूड अत्यंत टिकाऊ असतं. खार्या पाण्यानेसुद्धा त्याला अपाय होत नाही. तिथल्या अंगणात जिथे कैद्यांना कोलूवर चढवायचे, काथ्या कुटायला लावायचे, तेल घाण्याला जुंपायचे, लाकूड कामाला लावायचे , छळाचे इतर प्रकार प्रत्यक्ष बघितल्यासारखं वाटलं. सावरकरांचं पुस्तक आधीच वाचून गेल्याने अजून जास्त फरक पडला. बाबाराव सावरकर आणि तात्याराव सावरकर वेगवेगळ्या आर्यांमधे होते. त्यांची प्रत्यक्ष भेटही खूप सायासांनी तब्बल दोन वर्षांनी झाली.
सेल्युलर जेल मधे तेवत असलेली स्वातंत्र्य ज्योत. (फोटो tripadvisor.com वरुन साभार)
सावरकरांच्या कोठडीत मी
फाशीपूर्व अंतिम विधी करण्याचे स्थान
फाशीघर
फाशीघरात
विविध छळप्रकार
विविध प्रकारच्या बेड्या
लाईट अँड साउंड शो अक्षरशः शहारे आणतो अंगावर. प्रत्येक गोष्ट त्या त्या कोठडी किंवा जागेवर प्रकाशझोत टाकुन जिवंत करुन माहिती दिली जाते.
जेल च्या आवारात एक पिंपळाच झाड आहे. त्याला बेरीबाबा का पेड म्हणतात. तिथला त्याकाळचा जेलर बेरी ह्याच ते "निवाड्याचं" स्थान होतं. इथुनच तो "गोड शब्दात"कैद्यांचे निवाडे करत असे/ शिक्षा करत असे. सध्याच्या जेलमधे एक प्रदर्शन आहे त्यात इत्थंभूत माहिती फोटोंसकट आहे. गाईड हवा असल्यास जेलच्या ऑफिसमधे नाममात्र शुल्क भरुन मिळवता येतो. या प्रदर्शनातले काही फोटोज द्यायचा प्रयत्न करते.
अंदमानमधे तसे सहा महिने खूप जास्त पावसाचे आणि उरलेले सहा महिने कमी पावसाचे असतात, त्यामुळे तिथे डांस , चिलटं इ. त्रासदायक मंडळीही भरपूर होती/आहेत तर हासुद्धा एक खूप त्रासाचा प्रकार असे कैद्यांसाठी. एस्पेशली ज्यांना जंगलात लाकूडतोडीसाठी नेले जायचे त्यांच्यासाठी. आणि लाकूडतोड कितीही पाऊस असो ठरलेला कोटा झाल्याशिवाय परत येणए नसायचेच. अंदमान मधली जंगलं ट्रोपिकल डेसिड्युअस / एवरग्रीन फॉरेस्ट्स मधे मोडतात. ही अजस्त्र खोडं असतात. हयाचाही एक नमुना टाकेन येत्या भागांमधे.
हे सेल्युलर जेलच्या वरच्या गच्चीवरुन घेतलेली प्रचि
रॉस बेट
जेलवरची गच्ची
नॉर्थ बे बेट
अंदमान सरकारी इस्पितळ
हे सगळं बघताना एक तर आम्ही भावुक झालो होतो आणि अंधारही झाला होता. मग एक बाईक रेंटवर घेतली आणि पेटपूजा करुन सरळ होटेल गाठुन झोपलोच.
हे लक्षात ठेवा
जेल संध्याकाळी ५ वाजता बंद होते, सोमवारी सुट्टी असते, रविवारी खुली असते. ५.३० वाजता आणि अजून एक उशीरा असे २ लाईट अँड साऊंड शो होतात.
क्रमशः
प्रतिक्रिया
2 Jun 2017 - 8:25 pm | स्रुजा
वाह ! फेबु वर तुझे फोटो पाहिल्यापासून वाटच पाहत होते वृ ची. सुंदर झालाय हा भाग.
2 Jun 2017 - 8:30 pm | स्रुजा
सावरकरांचं वर्णन पुन्हा वाचुन काढलं.. कसे दिवस काढले असतील कोण जाणे. ___/\___
2 Jun 2017 - 8:43 pm | गॅरी ट्रुमन
लेखाची वाटच बघत होतो. अंदमान बघायची फार वर्षांपासूनची इच्छा आहे. बघू कधी पूर्ण होते ती.
सेल्युलर जेलचे फोटो बघूनच अंगावर शहारा आला. त्यामुळे फोटो आवडले असे म्हणवत नाही :(
2 Jun 2017 - 9:06 pm | सानझरी
सुरेख वृत्तांत!!
मी अंदमानला गेले होते तेव्हा सावरकरांच्या कोठडीत त्यांनी खिळ्याने भिंतीवर कोरलेल्या कविता होत्या. नंतर कधीतरी या महामंद लोकांनी त्या भिंतीना प्लास्टर लावून रंग दिला. एक ऐतिहासिक ठेवा नष्ट केला. :(
2 Jun 2017 - 11:14 pm | रुपी
अरेरे.. :(
5 Jun 2017 - 3:49 pm | प्रीत-मोहर
तुझ्याकडले फोटो असतील तर देना . खरच महामुर्ख लोक आहेत !!
6 Jun 2017 - 3:09 pm | श्रीगुरुजी
२००४ पर्यंत त्या कविता कोठडीत कोरलेल्या होत्या. त्यापूर्वी मे २००४ पर्यंत वाजपेयी पंतप्रधान असताना तत्कालीन पेट्रोलियम मंत्री यांनी अंदमानात हिंदुस्तान पेट्रोलियमच्या सहकार्याने एक स्वातंत्र्य स्तंभ उभारायचे ठरविले होते. त्या स्तंभावर चारही बाजून तळाला सावरकरांच्या पंक्ती कोरण्यात येणार होत्या. परंतु हे काम पूर्ण होण्यापूर्वीच सत्ताबदल झाला.
मे २००४ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पराकोटीचा द्वेष करणारे कॉंग्रेस व इतर जातीयवादी पक्षांचे सरकार सत्तेवर आले. त्या सरकारमध्ये मणीशंकर अय्यर नावाचा एक अत्यंत हरामखोर नतद्रष्ट पेट्रोलियम खात्याचा मंत्री होता. तो गांधी घराण्याचा हुजर्या असून अजूनही सावरकरांचा अतोनात तिरस्कार करतो. मंत्री झाल्यावर त्याने तातडीने सावरकरांच्या पंक्तीऐवजी गांधीजींच्या पुस्तकातील वाक्ये स्तंभावर कोरण्याचा आदेश दिला. वास्तविक पाहता गांधीजीचा व अंदमानचा काहीही संबंध नव्हता. ते कधीही अंदमानात गेले नव्हते. किंबहुना त्यांना कधीही भारताबाहेर तुरंगात ठेवले गेले नव्हते. त्यांना भारतातच राजकीय कैदी या नात्याने स्थानबद्ध केले जायचे व राजकीय कैदी हा दर्जा असल्याने त्यांना सक्तमजुरीची शिक्षा न मिळता उलट रोजची वर्तमानपत्रे, पत्रे लिहायला परवानगी, घरच्यांच्या गाठीभेटी, हिरवळीवर फेरफटका अशा अनेक सुविधा मिळत असत.
परंतु मणीशंकर अय्यर सावरकरांचा अतोनात तिरस्कार करीत असल्याने त्याने स्तंभावर सावरकरांच्या पंक्तिंऐवजी गांधीजीच्या ओळी कोरायचा आदेश दिला. त्याच नालायक मणीशंकरने नंतर, अंदमानचा तुरूंग जुना झाला आहे असे कारण पुढे करून तो पूर्णपणे पाडून टाकण्याची योजना आखली होती. त्याच हरामखोराच्या आदेशावरून, सावरकरांनी त्यांच्या कोठडीत भिंतीवर खिळ्याने कोरलेल्या काव्यपंक्ती, चुना फासून नष्ट केल्या गेल्या.
परदेशात ऐतिहासिक व्यक्तींच्या स्मृती शतकानुशतके जपल्या जात्यात. इंग्लंडमध्ये शेक्सपिअरची खोली ४०० वर्षांनंतर अजूनही त्याच अवस्थेत जपलेली आह. नेल्सन मंडेला ज्या तुरूंगात होते तो तुरूंग तशाच अवस्थेत जपलेला आहे. परंतु सावरकरांचा दुस्वास करणार्या या नालायकाने सूडबुद्धीने तो ऐतिहासिक ठेवा नष्ट करायला लावला.
2 Jun 2017 - 9:11 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर फोटो व वर्णन. ही जागा यादीत होतीच आता अधिक वर आली !
2 Jun 2017 - 10:38 pm | रातराणी
सुरेख वृत्तांत! पुभाप्र.
2 Jun 2017 - 10:40 pm | एस
वाचतोय. पुभाप्र.
2 Jun 2017 - 11:14 pm | रुपी
छान वृत्तांत.
बाकी अगदी बारीकसारीक डिटेल्स दिले आहेत त्याबद्दल धन्यवाद!
2 Jun 2017 - 11:18 pm | अप्पा जोगळेकर
रोचक.
2 Jun 2017 - 11:27 pm | उल्का
खूप छान माहिती दिली आहेस आणि भरपूर फोटोंमुळे रंगतदार झालाय हा भाग.
मस्तच!
3 Jun 2017 - 1:44 pm | निलदिप
सुंदर फोटो व वर्णन
3 Jun 2017 - 3:43 pm | मंजूताई
मस्त! फोटो व वृत्तांत! हौद भर भटकंती यादीत पैल्या नम्बर्वर आहे कधी जमतंय बघू
3 Jun 2017 - 3:47 pm | प्रीत-मोहर
लवकरच जाशील ग ताई!!!
याच्याशी सहमत!!
3 Jun 2017 - 3:47 pm | पद्मावति
खूप सुंदर लेख आणि फोटो.
हौद भर भटकंती यादीत पैल्या नम्बर्वर आहे कधी जमतंय बघू
+१3 Jun 2017 - 3:51 pm | प्रीत-मोहर
मी परत जाणारे सोबत जाऊ. i cant get enough of Andaman!!! i m in love with Andaman and people of Andaman.
3 Jun 2017 - 3:49 pm | प्रीत-मोहर
सृजा, क्लिंटन, सान, रुपी, रातराणी,म्हात्रे काका, एस दा, अप्पा जोगळेकर, उल्का , निलदिप आणि मंजुताई
प्रतिक्रियांसाठी धन्यवाद!!
__/\__
3 Jun 2017 - 5:32 pm | सपे-पुणे-३०
वृत्तांत आणि फोटो सुरेखच! अंदमानला जायचं राहिलंय.
4 Jun 2017 - 1:01 pm | कानडाऊ योगेशु
नतमस्तक !
4 Jun 2017 - 2:32 pm | निशाचर
वर्णन आवडलं. पुभाप्र
4 Jun 2017 - 9:13 pm | जुइ
वर्णन आणि फोटो आवडले. दहा एक वर्षांपूर्वी केलेली अंदमानची भटकंती आठवली.
5 Jun 2017 - 11:54 am | प्रसन्न३००१
मस्त लिहिलं आहेस... अंदमान ला जायचंय एकदा
5 Jun 2017 - 2:22 pm | निलदिप
तुम्ही कसे जाता ...कुठे रहाता.... किती खर्च आला...हे पण लिहील तर आम्हाला पण मदत होईल..
5 Jun 2017 - 3:43 pm | प्रीत-मोहर
ह्म्म ....
१. कसे जाता.. याला २ मार्ग आहेत एक म्हणजे जहाजाने जाणे आणि दुसरं विमानाने. या दोन्ही मार्गांनी चेन्नई, कोलकाता आणि विशाखापट्टनम इथुन पोर्ट ब्लेअर ला जाता येतं. आम्ही विमानप्रवास निवडला. जहाजाने जायचं असेल तर ही लिंक पाहु शकता.
२.तशी सगळीच हॉटेल्स छान असतात. पण आम्ही दिवसा सामान ठेवायची आणि रात्री रहायची खोली अस पाहतो. त्यानुसार मेकमायट्रीप वरुन बुकिंग केलं. आजपर्यंत चा मेकमायट्रीप चा अनुभव छानच आहे. इतरत्र वायफाय मिळत होटेल मधे, पण अंदमानात वायफाय मिळायला खूप पुण्यं गाट्।ईशी असावी लागतात ;)
३. खर्च तुम्ही केव्हा जाणार, किती आधी तिकिटं बुक करता आणि कुठुन जाता यावर तुमचा येण्याजाण्याचा खर्च vary होईल. आम्हाला येऊन जाऊन माणशी ८.५ हजार बसला. पोर्ट ब्लेअर मधे फिरण्यासाठी आम्ही अॅक्टीवा बुक केली. (दिवशी ५००/- आणि पेट्रोल तुमचं, कितीही फिरवा अश्या तत्वावर. आम्ही पैसा वसूल फिरलो मात्र). अंदमानमधे पेट्रोल स्वस्त आहे.
ह्या शिवाय स्कुबा डायविंग , सी वॉक, स्नोर्कलिंग वगैरे करणार असाल तर ते वेगळे चार्जेस असतात. इंटर आयलंड प्रवासाचे वेगळे असतात
5 Jun 2017 - 3:18 pm | सूड
वाचतोय, पुभाप्र.
5 Jun 2017 - 3:49 pm | श्रीगुरुजी
यावर्षी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात अंदमानला जाणार आहे.
पूर्ण लेख वाचून सविस्तर प्रतिक्रिया नंतर देतो.
6 Jun 2017 - 2:08 pm | निलदिप
धन्यवाद...... प्रीत-मोहर... खुप छान माहिती
6 Jun 2017 - 2:31 pm | प्राची अश्विनी
खूप छान!
6 Jun 2017 - 2:35 pm | प्रीत-मोहर
धन्यु प्राची :)
6 Jun 2017 - 2:34 pm | प्रीत-मोहर
सपे, कानडाऊ योगेशु,निशाचर, जुई, प्रसन्न३००१,सूड, श्रीगुरुजी लेख वाचून प्रतिक्रियांसाठी आभार :)
8 Jun 2017 - 1:45 am | समर्पक
फारच सुंदर! सखोल माहितीबद्दल धन्यवाद
पुभावफोप्र!
8 Jun 2017 - 11:26 am | जागु
वा प्रिती वर्णन छान फोटो पाहून वंदनीय वाटले. मीही सावरकरांचे पुस्तक वाचले आहे. त्यामुळे अजूनच आवडले.
8 Jun 2017 - 11:09 pm | पिशी अबोली
सुरेख!
12 Jun 2017 - 6:54 pm | प्रीत-मोहर
समर्पक , जागुताई आणि पिशी प्रतिक्रियांसाठी आभार्स :)
28 Jun 2017 - 9:17 pm | चौथा कोनाडा
धागा वाचून व प्रचि पाहून डोळ्यांचे पारणे फिटले.
सेल्युलर जेल नक्की कसा आहे हे आंजादेखील पाहण्याचा योग आला नव्हता, ते हा धागा वाचून समजले.
तपशिल सुद्धा खुप छान दिलेत. ट्रिप प्लान करायलाच लागेल.
╚╚╚ नाईस प्री-मो ! ╚╚╚
30 Jun 2017 - 8:11 am | मी कोण
फोटो खुपच सुंदर आहेत,