शेती करायचे ठरवल्या नंतर माहिती गोळा करायला सुरुवात केली.एक शेतकरी भगिनीने, "श्री.सुभाष पाळेकर" ह्यांचा उल्लेख केला.यु-ट्युब वरील त्यांचे व्हिडिओ पाहता पाहता, सहजच जीवामृत बघण्यात आले.
पुढे ज्यावेळी सी.आर.टी. तंत्रज्ञाचे जनक श्री. चंद्रशेखर भडसावळे ह्यांची गाठ त्यावेळी, त्यांनी सांगीतले की, ज्या शेतात बॅक्टेरिया जास्त त्या शेतात काहीही पिकवा.
जीवामृताचे व्हिडिओ बघतांना पण हेच जाणवले की, शेतात बॅक्टेरियांची उपज वाढवायला ह्याच उपयोग होतो आणि मग मी बघीतलेले व्हिडिओ आणि माझी संकल्पना ह्याची सांगड घालून माझे मी प्रमाण ठरवले. ते खालील प्रमाणे.
साहित्य.
१. एक ते दो मुठी वडाच्या झाडाच्या मुळाखालील माती. (सगळ्यात उत्तम बॅक्टेरिया वडाच्या झाडाच्या मुळाशी असतात, अशी ऐकिव माहिती मिळाली आणि वडाचे झाड कधीच मरत नाही, अशी पण माहिती मिळाली.) वडाचे झाड नसेल तर पिंपळ आणि पिंपळ पण नसेल तर आंबा किंवा जांभूळ. (फूकट)
२. ३-४ दिवस शिळे गोमुत्र.... साधारण १०-१२ लिटर. (दिवसाला ५ रु.)
३. गाईचे शेण १०-१२ किलो. (एक घमेले भरपुर होते.ताजे मिळाले तर फार उत्तम पण ते न मिळाल्यास २-३ दिवसांचे असेल तरी पण चालते, हा स्वानुभव.) (एका दिवसाला ५ रु.)
४. अर्धा किलो किंवा १ किलो गुळाचा खडा. दारूचा गूळ मिळाल्यास फार उत्तम. (दारूचा गूळ म्हणजे गुर्हाळातून निघालेला खराब गूळ.हा दारूची भट्टी लावणारे घेतात.मला हा गुळ मिळाला नाही.मी केमिकल विरहित गूळ वापरला.) (साधारण १०० रु.)
५. १०० ग्रॅम मध (३२ रु.)
६. गाईचे तूप ५० ग्रॅम (२० रु.)
७. चण्याच्या डाळीचे पीठ १ किलो. (हे महाग वाटले म्हणून चक्कीत खाली पडलेले पीठ वापरले. ते ६ रु. किलो ह्या दराने पडले.ते पावरून पण फायदा झाला. थोडक्यात वडाच्या झाडाखालचे बॅक्टेरिया चक्कीच्या पीठवर पण पोसल्या जातात.हा अनुभव) (१२ रु.)
८. १० ते २० लिटर पाणी. (फूकट)
९. २२० लिटरचा प्लॅस्टिकचा ड्रम. (ह्याचा खर्च पकडलेला नाही. कारण "सुरुवातीचा खर्च" ह्या लेखात ह्या खर्चाचा उल्लेख येईलच.)
१०. घरी बनवलेला दशपर्णी अर्क, १०० मिली. (हा प्रयोग मी अद्याप केलेला नाही.आणि त्यामुळे मी बनवलेल्या जीवामृतात मी ते टाकले पण नाही.)
११. आंबट ताक. (एक ते २ लिटर) (जवळ पास फूकट.)
१२. देशी दारू (१ ते २ पेग. मी हा प्रयोग केला नाही.)
कृती :
सकाळी सकाळी, ड्र्म मध्ये गोमूत्र ओता.
नंतर त्यात शेण टाका.
नंतर त्यात गूळ टाका.
नंतर त्यात पीठ टाका.
आता हे सगळे एकत्र करा.
आणि ड्रम वर झाकण ठेवा.
संध्याकाळी एका घमेल्यात, वडाखालची माती, मध आणि तूप एकत्र कालवा.
दुसर्या दिवशी सकाळी, घमेल्यातील हे सगळे साहित्य ड्रम मध्ये कालवा. घमेले पाण्याने धुवून ते पाणी पण ड्रममध्ये टाका.घलेल्याला अजून पण तुपाचा चिकटा असल्यास, मातीने ते साफ करून ती माती पण ड्रम मध्ये ओता. ड्रम वर झाकण ठेवा.
सुरुवातीचे २-३ दिवस, दररोज सकाळी आणि संध्याकाळी हे ड्रम मधील मिश्रण हलवा. ड्रम वर झाकण ठेवा.
४ थ्या दिवसापासून दर २ दिवसाआड ५० लिटर पाणी ड्रम मध्ये टाका.
८व्या किंवा १०व्या दिवशी ड्रम पाऊण भरेल.
आता पुढील ७ दिवस हे मिश्रण तसेच ठेवा.
पण दररोज सकाळ संध्याकाळ मिश्रण हलवणे आणि ड्रम वर झाकण ठेवणे, हे विसरू नका.
आता तुमचे जीवामृत तयार झाले.
शेतात फवारणी करतांनाचे प्रमाण...
१० लिटर जीवामृत २२० लिटर पाण्यात मिसळून. झारीने फवारणे. थोडे झाडावर आणि थोडे बुंध्याला.
फायदा : जीवामृतात असलेल्या गूळाने कीटक आकर्षित होतात.फुलांचे परागीकरण होते.जमिनीत गांडूळांची वाढ होते आणि पुढील पिकासाठी शेतात नांगर फिरवायला लागत नाही किंवा जमीन भाजायची गरज भासत नाही.अनावश्यक खर्च वाचतो. कीटकांना खायला बेडूक येतात आणि मग बेडकांना खायला साप.सापामुळे उंदीर येत नाहीत.त्यामुळे उंदीर मारायच्या औषधाचा पण खर्च वाचतो. हा स्वानुभव आहे. माझ्या शेतात पण साप फिरतात.२ वेळा मला दर्शन देवून गेले.(आपण काहीच हालचाल केली नाही, तर ते त्यांच्या मार्गाने निघून जाता. हा अनुभव घेतला. (ह्या माहिती बद्दल थँक्स टू जेडी आणि मिपा) )
इति जीवामृत्यं महात्यम समाप्तं
जास्तीत जास्त महिना ५००/- रुपये खर्च आला.
===============================
अमृत पाणी....
साहित्य आणि कृती....
पाव लिटर तूप आणि अर्धा लिटर मध एकत्र करा आणि ते भरपूर फेटा.
त्यात एक मूठ वडाच्या झाडाखालची माती टाका आणि परत फेटा.त्यात २-३ लिटर गोमुत्र आणि २-३ किलो गाईचे शेण मिसळा आणि एकजीव करा.
आता हे मिश्रण तुम्ही १० ते २० लिटर पाण्यात एकत्र करा. आणि बियांची रोपे करतांना किंवा रोपे तयार झाल्यावर किंवा रोपे जर सुकत असतील तर, वापरा.
जे जीवामृत करू शकत नाही, ते अमृतपाणी करू शकते.... हा स्वानुभव.
माझ्या रोपांना २१ दिवस पाणी मिळाले नाही तरी पण ती तग धरून होती.
एकूण खर्च महिना ५००/- रू.
==============================
जीवामृतामुळे आणि अमृतपाण्यामुळे पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता पण वाढते.हा माझा स्वानुभव.
=========================
जास्तीत जास्त १०००/- रु दमदए (दर महा दर एकरी) खर्च येतो. आपण जर हॉटेल किंवा सिनेमा वर खर्च नाही केला तर त्या पैशात एक एकरभर खत नक्कीच तयार करू शकतो. हा स्वानुभव.
प्रतिक्रिया
12 May 2017 - 3:20 pm | टवाळ कार्टा
भारी....अजून अनुभव लिहा
12 May 2017 - 3:32 pm | मुक्त विहारि
ह्या वर्षी पालेभाज्या आणि वेलवर्गीय भाज्या आणि हळद आणि आले, घरगूती प्रमाणात आणि खते-किटकनाशके न वापरता करायचा विचार आहे.
ते अनुभव जमा झाले की लिहितो.
ह्यावर्षी निदान घरचे तिखट तरी रासायनिक नाही.
एक पावूल पुढे पडले.
12 May 2017 - 3:45 pm | बापू नारू
छान माहिती दिलीत , धन्यवाद _/\_
12 May 2017 - 3:54 pm | इरसाल कार्टं
जबरदस्त
वाचन खून साठवली आहे, अजून येउद्या.
12 May 2017 - 4:08 pm | कवितानागेश
साठवली. चांगली माहिती.
12 May 2017 - 5:18 pm | अप्पा जोगळेकर
तुमच्या प्रयोगशीलते साठी नमस्कार घ्या आमचा.
आणि उद्यमशीलतेसाठी आणखीन एक.
12 May 2017 - 6:29 pm | सूड
__/\__
12 May 2017 - 6:48 pm | मनिमौ
असेच नवीन ऊपक्रम करत रहा आणी तुम्हाला त्यात यश लाभो ही सदिच्छा
12 May 2017 - 6:51 pm | एस
वाचनखूण साठवली आहे. अजून माहिती येऊ द्यात. घरी बागेसाठी इतकं जीवामृत किंवा अमृतपाणी लागणार नाही, तेव्हा हा प्रयोग मायक्रो स्केलवर करून पाहतो.
12 May 2017 - 6:51 pm | एस
वाचनखूण साठवली आहे. अजून माहिती येऊ द्यात. घरी बागेसाठी इतकं जीवामृत किंवा अमृतपाणी लागणार नाही, तेव्हा हा प्रयोग मायक्रो स्केलवर करून पाहतो.
12 May 2017 - 6:51 pm | एस
वाचनखूण साठवली आहे. अजून माहिती येऊ द्यात. घरी बागेसाठी इतकं जीवामृत किंवा अमृतपाणी लागणार नाही, तेव्हा हा प्रयोग मायक्रो स्केलवर करून पाहतो.
12 May 2017 - 6:55 pm | मदनबाण
सर्व प्रथम आपले अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक:शुभेच्छा ! :)
ह्या वर्षी पालेभाज्या आणि वेलवर्गीय भाज्या आणि हळद आणि आले, घरगूती प्रमाणात आणि खते-किटकनाशके न वापरता करायचा विचार आहे.
झकास्स्स्स... हल्ली ऑरगॅनिक फार्मिग मोठ्या प्रमाणात पसरत आहे आणि ऑरगॅनिक फूडला वाढता प्रतिसाद मिळत आहे !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Infosys defers salary hikes till July; no job cuts planned
IT cos had firing list ready 5 years back
Techie, and worried about layoffs? These 20 skills can help you stay relevant
12 May 2017 - 7:21 pm | मोदक
अवांतर आहे
उंदरांचा कितपत त्रास होतो..? घुबड पाळणे कितपत सोयीचे आहे..? (गंमतीत म्हणत नाहीये, सिरीयसली म्हणतो आहे)
तसेच उंदरांचा त्रास होत असेल तर हा एक उपाय करून बघा.
12 May 2017 - 8:20 pm | पिलीयन रायडर
तुमच्या शेतीचे फोटो पहायला नक्कीच आवडेल! तुमच्या शेतीला भरपुर शुभेच्छा!
सुरन्गीताईच्या लेखातले हेच ते अमृतपाणी ना? (हो खरं.. तिच्या त्या लेखमालेचे पुढे काय झाले?)
12 May 2017 - 9:01 pm | मुक्त विहारि
संकल्पना तीच....
मी फक्त प्रमाण आणि फवारणीची पद्धत बदलली.
12 May 2017 - 9:13 pm | मितान
चांगले प्रयोग मुवि !
आमची औरंगाबाद च्या दुष्काळी भागात थोडीशी शेती आहे. तिथे आता या वर्षी सलग ३ ऱ्या वर्षी संपूर्ण सेंद्रीय उत्पादने घेतली. गहू,डाळ, ओवा, लसूण, इतर हंगामी भाज्या आणि थोडी करडी. त्यात करडी चा प्रयोग फसला. बाकी उत्तम आले.
सेंद्रीय भाज्या खूप चांगल्या आल्या पण काहीतरी हुकले आणि लवकर कीड पडली. त्यामुळे आर्थिक गणित अपेक्षित होते तसे जुळले नाही.
बाकी लिहिते हळूहळू.
हं एक राहिलं - तुम्ही वर दिलेले दोन्ही प्रयोग गेली ६ वर्षे करत आहोत. पहिली दोन वर्षे विशेष फायदा वाटला नाही पण नंतर मातीची प्रत सुधारण्य पर्यंत चांगलं चालू आहे.
12 May 2017 - 9:20 pm | यशोधरा
अरे वा! अभिनंदन तुमचे मुवि.
बघा! इकडे लेख टाकून बेस्ट झाले की नाही? :)
13 May 2017 - 4:14 am | मुक्त विहारि
मी कुठल्याच गृप वर लिहित नाही.
असो,
व्हॉट्स अप, फेसबूक, लिंकड इन, ह्याचे फायदे वेगळे आहेत आणि मिपा, माबो, ऐअ, ह्याचे फायदे वेगळे.
12 May 2017 - 10:28 pm | डॉ सुहास म्हात्रे
जबरदस्त अनुभव ! तुमच्या उत्साहाचा आणि चिकाटीचा हेवा वाटतोय !
असेच नवनवीन उपक्रम करत रहा आणि त्याबाबतीतले आमचे ज्ञान वाढवत रहा. अभिनंदन आणि धन्यवाद !
13 May 2017 - 10:21 am | स्वीट टॉकर
आम्ही स्वतः जरी यातलं काही करीत नसलो तरी तुम्ही चिकाटीनी करता आहात याचं कौतुक वाटतं.
सर्व उपक्रमांना शुभेच्छा!
15 May 2017 - 2:40 pm | पैसा
जीवामृत आणि अमृतपाणी यांचे प्रयोग वाचते आहे. आम्ही काजूच्या झाडांना रासायनिक खते देत नाही. अजून तरी नैसर्गिक रीत्या येईल तेवढेच उत्पन्न घेत आहोत. रासायनिक खते काजूच्या कलमी झाडाला दर वर्षी दिली तर त्यांचे आयुष्य २० वर्षात संपते असे ऐकले आहे. याउलट गावठी नैसर्गिकरीत्या वाढलेली काजूची झाडे अगदी ५० एक वर्षे किंवा त्याहून जास्त सुद्धा जगतात असा अनुभव आहे.
15 May 2017 - 2:59 pm | विशुमित
काजू बद्दल रोचक माहिती..
15 May 2017 - 3:47 pm | जागु
येस. पाळेकर गुरुजींचे लेक्चर होतात. शिबीरे चालतात. खुप छान माहीती असते हे ऐकुन माहीत आहे. आमचे एक ग्रुप मेंबर त्यात अॅक्टीव्ह आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी जीवामृत तयार केले घरी. दोन वेळा टाकले. झाडे उन्हाळ्यातही टवटवीत झाली आहेत.
१० किलो शेण
२ लिटर किंवा मिळेत तेवढे गोमुत्र
१ किलो बेसन
१ किलो गुळ
भरपूर पाणि टाकून ढवळून झाकण देउन सावलीत ठेवायचे.
दुसर्यादिवशी घडयाळ्याच्या दिशेने फिरवायचे. परत झाकून ठेवायचे.
करत ठेवल्यापासून ४८ तासानंतर ते वापरायला घ्यायचे. वापरताना परत भरपूर पाणी घालायचे.
तुम्हाला शिबीराची माहीती हवी असेल तर मी सांगू शकेन.
15 May 2017 - 4:25 pm | विशुमित
<<<झाडे उन्हाळ्यातही टवटवीत झाली आहेत.>>>
==> जीवामृत ची उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी 'झाडे उन्हाळ्यातही टवटवीत झाली आहेत' फक्त एवढाच निष्कर्ष लावला का?
15 May 2017 - 4:35 pm | जागु
मी शेतीसाठी नाही वापरलेय. त्यामुळे त्यापासून किती व कोणत्या प्रकारचा फायदा तोटा हे मी नाही सांगू शकत. ते मी माझ्या बागेतील झाडांसाठी वापरले आहे. बागेतील झाडांना आता पूर्वीपेक्षा जास्त जोम येत आहे.
15 May 2017 - 4:44 pm | केडी
अमृत पाण्याचा प्रयोग करून पाहीन नक्कीच....
14 Mar 2018 - 2:52 am | एस
एक शंका आहे. जीवामृतात अमृतपाण्यातले सर्व घटक आहेत असे दिसते. मग जे जीवामृत करू शकत नाही ते अमृतपाणी कसे करू शकते? किंवा दुसऱ्या शब्दांत, अमृतपाण्यापेक्षा जीवामृत जास्त परिणामकारक नाही कसे? की माझे काही चुकते आहे?
14 Mar 2018 - 3:49 am | मुक्त विहारि
अमृतपाण्यात पीठ आणि गूळ नाही.
14 Mar 2018 - 10:48 am | एस
बरोबर. म्हणूनच विचारतोय की मग जीवामृत का बनवायचे? फक्त अमृतपाणी बनवूनही काम होईल.
24 Mar 2018 - 2:19 am | मुक्त विहारि
अज्जुन बरेच प्रयोग करणे बाकी आहेत.
ज्या जमीनीत जीवाणूंचे प्रमाण जास्त ती जमीन सुपीक. त्यामूळे जमीन सुपीक बबवायला, मातीतल्या जीवाणुंना पिंपात वाढवले आणि मग ते पाणी पिकांना खोडापाशी दिले.ते काम जीवामृताने केले.
अमृतपाणी कीटकांना आकर्षित करण्यासाठी वापरले.त्यामुळे परागीकरण उत्तम झाले.कीटकांना खायला चिमण्या आल्या.त्यामुळे रोग अजिबात लागला नाही.अमृतपाणी पानांवर फवारले.
अर्थात, अजून तसे बरेच प्रयोग बाकी आहेत.
देशी गाईच्या शेण आणि मुत्राच्या ऐवजी, जर्सी गाईचे शेण-मूत्र वापरणे...
वडाच्या झाडाखालच्या माती ऐवजी, आवळ्याच्या किंवा बोराच्या झाडाच्या खालची माती वापरणे.
पण ह्या सगळ्यासाठी लागणारी आर्थिक मदत सध्या मुलाच्या शिक्षणाकडे वळवली असल्याने, तुर्तास प्रयोग करणे बंद केलेले आहेत.
तरीपण एक लक्षांत आले की,
कमीत-कमी पैशात घरच्या घरी खते आणि कीटकनाशके नक्कीच तयार करता येतात.
24 Mar 2018 - 12:34 pm | एस
अच्छा! आले लक्षात. म्हणजे जीवामृत हे मातीत व खोडावर टाकतात. अमृतपाणी हे पानांवर फवारतात. धन्यवाद. मी जीवामृत बनवून बागेतल्या कुंड्यांना टाकले आहे. आता अमृतपाणी आणि सेंद्रिय कीटकनाशके बनवतो.
14 Mar 2018 - 10:10 am | वीणा३
उत्तम माहिती
थोडं अवांतर आहे, पण मला एक शंका आहे, इथेच विचारून घेते . मेथी बाजारात मिळते तशी मोठी (१ फूट भर साधारण) येण्यासाठी काय करावं? मी युट्युब वरचे बरेच विडिओ बघितले, त्यातून छोटी छोटी मेथी येते, जेमतेम आमटी पुरती असते, भाजी नाही करता येत.
17 Mar 2018 - 7:13 am | सुधीर कांदळकर
पाळेकरांच्या पुस्तकात जीवामृतात दशपर्णी अर्क समाविष्ट नाही.
दशपर्णी अर्क जीवामृतात घालण्याचे तार्किक प्रयोजन कळेल का?
24 Mar 2018 - 2:55 am | मुक्त विहारि
ज्या रोपांना शेळी तोंड लावत नाही त्या रापांना रोगराई नसते, असे धनगरी लोकांचे पारंपारीक ज्ञान आहे.अशी साधारण ६०-७० रोपे असतात.
त्यातली कुठलीही १० रोपे आपल्या अजूबाजूला असतातच.
त्या १० रोपांचा अर्क म्हणजे दशपर्णी.
ह्याची फवारणी केल्यास पिकाला रोग येत नाही, असे अद्याप तरी अनुमानच आहे.ह्याबाबतीत बरेच संशोधन बाकी आहे.कारण ह्याचे नक्की प्रमाण काय? कुठल्या पिकासाठी कुठल्या रोपांपासून दशपर्णी अर्क बनवायचा?कोकणातील प्रमाण काय? आणि मराठवाड्यातील प्रमाण काय्?
असो,
शेती हा फार मनोरंजक आणि खूप काटेकोर पणे करण्याचा विषय आहे.७-८ पिढ्यांना पुरतील इतके प्रयोग आहेत.पण तोपर्यंत हवामान बदलते.कीटकांमध्ये उत्क्रांती होते.आर्थिक गणिते बदलतात.शिवाय शेती हा तसा वेळखाऊ धंदा असल्याने, ह्या मुलभूत गोष्टींकडे कुणाचेच लक्ष नाही.
"पाळेकरांच्या पुस्तकात जीवामृतात दशपर्णी अर्क समाविष्ट नाही."
ह्या जगांत कुणीही सर्वज्ञ नाही.अगदी पाळेकरच कशाला?जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर पण नाही आणि न्यूटन पण न्हवता.त्यामुळे आपले आपले प्रयोग करत रहायचे.
जाताजाता, हॅरी पॉटरच्या , हाफ ब्लड प्रिंन्स मध्ये, पुस्तकी ज्ञान आणि प्रयोगशीलता, ह्याचा बर्यापैकी उहापोह केला आहे.संमोहन काढा, इतर जण पुस्तकात बघून करतात तर हॅरी पुस्तकातल्या हस्तलिखित टिप्पणी वाचून करतो.
21 Mar 2018 - 11:45 pm | पिवळा डांबिस
पण मुवि, रहावत नाही म्हणून एक विचारतो. हे सगळं फवारतांना त्याचा वास येत नाही का?
मागे मी एकदा कुणितरी रेकमेंड केलं म्हणून फिश मॅन्युअर आणून ते बागेत फवारलं होतं. अगदी ग्लोव्ह्ज घालून वगैरे जरी काळ्जी घेतली होती तरी अंगा/हातांचा वास दहा दहा वेळा धुवून/ अंघोळ करूनही जाईना.
तिच्यायला, जवळ्जवळ बाहेर सोफ्यावर झोपायची वेळ आली होती.... :)
तसं काहिसं होत नाही ना? नाहीतर एक करता बेक व्हायचं!
24 Mar 2018 - 2:31 am | मुक्त विहारि
माझ्या सुदैवाने मला वास येत नाही.घ्राणेंद्रिय जास्त लवकर प्रतिसाद देत नाही.
शिवाय मी स्वतः काही काळ , जवळपास ८ वर्षे, रासायनिक कीटकनाशके बनवणार्या कंपनीत काम केले असल्याने, रासायनिक खते किंवा कीटकनाशके अजिबात वापरायची नाहीत असाच निश्र्चय केला आहे.
अजुन एक म्हणजे, वास येतोच.पण तुम्ही १०लिटर अमृतपाणी किंवा जीवामृत २०० लिटर पाण्यात टाकता तेंव्हा त्यापाण्याला वास येत नाही.कारण आमच्या सौ.ने पण थोडी फवारणी केली होती.ती जीवामृताच्या किंवा अमृतपाण्याच्या पिंपाजवळ पण जात न्हवती.(आमच्या सौ.ला वास फार लवकर येतो.त्यामुळे एक झाले, सिगरेट पटकन सुटली.)
"फिश मॅन्युअर" बद्दल काहीच माहीत नाही.