अपूर्व (सुव्रत जोशी) आणि तनू (सखी गोखले) रिलेशनशिपमध्ये आहेत. तो पीएचडी साठी अमेरिकेला निघाला आहे. तनू इथेच राहणार आहे. लाँग डिस्टन्स रिलेशनशिप वर्क होत नाहीत असा तिचा विश्वास आहे. त्यामुळे अपूर्व अमेरिकेला गेल्यावर आपली रिलेशनशिप संपुष्टात येईल अशी तिची खात्री आहे. तो अमेरिकेला जाण्यापूर्वीच आपली रिलेशनशिप संपवून टाकावी असे तिने ठरविले आहे. रिलेशनशिप संपविणे त्याला मान्य नाही. त्यामुळे दोघांमध्ये किरकोळ स्वरूपाचे खटके उडत राहतात.
अपूर्व अमेरिकेला जायचे या उद्देशाने उत्तेजित होण्याऐवजी नर्व्हस झालेला आहे. तो आता २७ वर्षांचा आहे. त्याचे वडील त्यांच्या वयाच्या २७ व्या वर्षीच बेपत्ता झाले होते. त्यापूर्वी त्यांचे वडील म्हणजे अपूर्वचे आजोबा देखील त्यांच्या वयाच्या २७ व्या वर्षीच बेपत्ता झाले होते. त्याचे पणजोबांचा देखील वयाच्या २७ व्या वर्षापासून पत्ता लागलेला नसतो. आपण आता २७ वर्षांचे आहोत आणि अमेरिकेला निघालो आहोत व घराण्याच्या इतिहासामुळे आपण देखील कायमस्वरूपी बेपत्ता होणार या भीतिने तो नर्व्हस झाला आहे. तनूच्या आईवडीलांचा देखील ती लहान असतानाचा घटस्फोट झालेला आहे. अनेक वर्षात तिने आपल्या वडीलांना पाहिलेले नाही.
तनू त्याच्या घरी येऊन त्याला व्हिसासाठी लागणारे फोटो काढण्यासाठी बरोबर घेऊन जाते. घराजवळच त्यांना 'अमर फोटो स्टुडिओ' नावाचा फोटो स्टुडिओ अचानक दिसतो. हा स्टुडिओ त्यांना यापूर्वी कधीच दिसलेला नसतो. आपल्याला हा स्टुडिओ यापूर्वी कधीच का दिसला नाही याचे आश्चर्य व्यक्त करीत ते स्टुडिओत येतात. स्टुडिओत जुन्या काळच्या कॄष्णधवल चित्रांनी भिंती चितारलेल्या आहेत. स्टुडिओ खूप जुना असावा कारण तेथील सर्वच गोष्टी जुन्यापुराण्या दिसतात. इथला फोटोग्राफर नक्की कोण असावा याचा विचार करीत असतानाच अचानक स्टुडिओचा वृद्ध मालक (अमेय वाघ) प्रकट होतो. त्याने Suspenders किंवा braces नावाने ओळखली जाणारी खांद्यावरून पट्टे असलेली पँट घातलेली आहे. विक्षिप्त दिसणारा हा वृद्ध फोटोग्राफर काहीतरी विचित्र बोलत असतो, पण तो बोलताना आजच्या तरूणाईची ब्रो, सिस, फकिंग मेस असे शब्द असणारी भाषा वापरतो. सेल्फी, पाऊट इ. गोष्टींशी सुद्धा तो चांगलाच परिचित आहे.
जेव्हा एखाद्याला गरज असतो तेव्हाच हा स्टुडिओ त्या माणसाला दिसतो, इतर वेळी कोणालाही तो दिसत नाही असे काहीतरी गूढ तो बोलतो. काळाशी विसंगत अशा बर्याच संदर्भहीन गोष्टी तो सांगतो, पण सांगताना आजच्या युवकांचे शब्द तो सातत्याने वापरतो. तो अपूर्वला फोटोसाठी पोझ देण्यास सांगतो. तनूसुद्धा आपला फोटो काढायला सांगते. फोटोग्राफरकडे अगदी जुन्या पद्धतीचा काळे कापड टाकून क्लिक करण्याचा स्टँड असलेला कॅमेरा आहे. इतका जुना कॅमेरा अपूर्व आणि तनूने कधी बघितलेलाच नसतो. त्यांना 'चीझ्' म्हणायला सांगून तो क्लिक करतो.
एकदम काळ बदलतो. अपूर्व आणि तनू दोघेही भूतकाळात जातात. अपूर्व एकदम १९४२ च्या काळात जाऊन पोहोचतो. तेव्हा चलेजाव चळवळ सुरू आहे. तो थेट त्या काळातील चित्रपट स्टुडिओत जाऊन पोहोचतो. प्राथमिक स्वरूपातल्या कृष्णधवल चित्रपटांचा तो काळ आहे. आपण कोठे आहोत ते त्याला काही काळ समजतच नाही. आपल्या काळाची आणि १९४२ च्या काळाची सांगड घालायला त्याला थोडा वेळ लागतो. तो स्टुडिओ व्ही. शांताराम यांचा आहे. तिथे त्याला पांढर्या पिसांची गुलछबू टोपी घातलेले दस्तुरखुद्द व्ही. शांताराम भेटतात. त्याच्याशी बोलून ते प्रभावित होऊन त्याला आपल्याबरोबर काम करण्याची ऑफर देतात. ते सध्या 'डॉ. कोटणीस की अमर कहानी' या चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. त्याच सेटवर त्याला त्या काळातील एक जुनी नायिका चंद्रिका (पूजा ठोंबरे) भेटते. कौटुंबिक परिस्थितीमुळे तिला नाईलाजाने चित्रपटात काम करावे लागत आहे. त्यात तिची पिळवणूक देखील होत आहे. आपल्याला यातून सोडविणारा कोणीतरी नायक भेटेल या आशेवर ती आहे. अपूर्व तिच्या दु:खात सहभागी होतो व तिला मदत करण्याचा प्रयत्न करतो. पण दोन वेगवेगळ्या कालखंडात असल्यामुळे तिची आपण काय मदत करू शकणार हे त्याला समजत नाही.
दुसरीकडे तनू २०१७ मधील 'अमर फोटो स्टुडिओ'तून एकदम १९७६ मधील आणिबाणीच्या काळात प्रकट होते. त्या काळात आणिबाणीतील दडपशाहीविरूद्ध नागरिकांचे आंदोलन सुरू आहे. त्या काळात तिला अगदी अपूर्वसारखाच दिसणारा एक नवकवी भेटतो. सुरवातीला ती त्याला अपूर्वच समजते. तो पोलिसांच्या भीतिने लपायचा प्रयत्न करतोय. नंतर एका छोट्या हॉटेलात तिला त्या काळातील एक केस वाढविलेला गर्दुल्या हिप्पी भेटतो. त्याची मैत्रीण आणिबाणीविरूद्ध आंदोलन केल्यामुळे तुरूंगात आहे व आपले संबंध संपले असे तिने ठरविल्यामुळे तो दु:खाने अंमली पदार्थ्याच्या आहारी गेला आहे. आपण कोठे आहोत, हे काय सुरू आहे, आपण इथून आपल्या जगात कधी परत जाणार हे समजण्याआधीच अपूर्व व तनू हे पुन्हा एकदा 'अमर फोटो स्टुडिओ'त परत येतात. पण ते अजून वेगवेगळ्या काळात असल्याने ते एकमेकांना पाहू शकत नाहीत. तिथला वृद्ध फोटोग्राफर त्या दोघांनाही सांगतो की जोपर्यंत भूतकाळात त्यांना पाटविण्यामागचा मुख्य हेतू सफल होत नाही तोपर्यंत ते २०१७ मध्ये परत येऊ शकणार नाहीत. आपण नक्की काय केल्यानंतर परत येऊ याविषयी दोघेही विचार करीत राहतात.
नाटकाच्या शेवटी ते दोघेही २०१७ मध्ये परत येतात व नाटकाचा शेवट गोड होतो. परंतु परत येण्यापूर्वी त्यांनी त्या काळात जाऊन एक योग्य काम पूर्ण केलेले असते. ते कोणते ते नाटकातच बघण्यात मजा आहे.
हे एक अत्यंत धमाल नाटक आहे. 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतील ताजेतवाने तरूण कलाकार (अमेय वाघ, सुव्रत जोशी, सखी गोखले) व त्यांच्या बरोबरीने पूजा ठोंबरे आणि सिद्धेश पूरकर या सर्व तरूण कलाकारांमुळे नाटक अगदी ताजेतवाने वाटते. संपूर्ण नाटकात आजच्या तरूणाईची बोलीभाषा आहे. ते संवाद ऐकताना मजा येते. नाटकात २-३ धमाल गाणी व कविता आहेत. 'चार बोतल वोदका' या यो यो हनीसिंगच्या हे गाणे सुव्रत जोशी व पूजा ठोंबरने अगदी मजेशीर पद्धतीने सादर केले आहे. युवकांनी सादर केलेली ही एक धमाल फँटसी आहे. हे नाटक बघताना 'बॅक टू द फ्युचर' आणि 'फ्लॅटलायनर्स' या इंग्लीश चित्रपटांची काहीशी आठवण येते. भूतकाळात जाऊन वर्तमानकाळातील काही घटनाक्रम बदलणे ही थीम इथेही विनोदी पद्धतीने मांडलेली आहे.
सुनील बर्वे, अमेय वाघ, सुव्रत जोशी व सखी गोखले यांनी एकत्रित निर्मिलेले हे नाटक मनस्विनी लता रवींद्र यांनी लिहिले आहे. निपुण धर्माधिकारींनी उत्तम दिग्दर्शन केले आहे. युवक अभिनेत्यांनी सादर केलेली ही धमाल फँटसी एकदा नक्कीच बघण्यासारखी आहे. मी हे नाटक एक महिन्यापूर्वी पाहिले होते. काही घरगुती अडचणीमुळे मध्यंतरानंतर काही मिनिटांनी मला नाटक सोडून घरी जावे लागले होते. नाटक पूर्ण बघता आले नाही याची चुटपूट लागली होती. त्यामुळे हे नाटक पुन्हा एकदा सुरवातीपासून संपूर्ण बघितले व दुसर्यांदा सुद्धा भरपूर एंजॉय केले.
प्रतिक्रिया
26 Jan 2017 - 7:01 pm | सुमीत भातखंडे
आजच बघितलं हे नाटक. अप्रतिम काम झालंय सगळ्यांचं.
सगळ्यांनी नक्की बघावं असं नाटक.
26 Jan 2017 - 7:01 pm | यशोधरा
बघायला हवे.
धन्यवाद परीक्षणाबद्दल.
26 Jan 2017 - 7:30 pm | पद्मावति
परीक्षण आवडले.
26 Jan 2017 - 7:46 pm | पिलीयन रायडर
निपुणच्या नाटक कंपनीने आणलेले नाटक आहे ना हे?! पहायचे आहेच..!
फेसबुकवर नाटक कंपनी फॉलो करा. बर्याचदा नवीन नवीन काही तरी समजतं. त्यांचे विषयही हटके वाटतात.
26 Jan 2017 - 8:33 pm | एस
हे नाटक खरेच हटके वाटत आहे. नक्कीच पहायला हवे. उत्तम परिचय.
26 Jan 2017 - 8:42 pm | वरुण मोहिते
चांगलं नाटक आहे . आणि नंतर ते स्टेज वरून प्रेक्षकांचे फोटो काढून त्यांच्या फेसबुक पेज वर पण टाकतात दर प्रयोगाला .
26 Jan 2017 - 9:40 pm | संजय क्षीरसागर
तुमचा रिव्यू छान आहे. आता पाहीन. धन्यवाद !
27 Jan 2017 - 10:17 am | गॅरी ट्रुमन
नाटक बघितले आहे. आवडले. रिव्ह्यूपण आवडला.
नाटकातील सखी गोखलेचे कामही खूपच आवडले. विशेषतः तिची नाटकातील 'एनर्जी लेव्हल' खूपच जास्त आहे हे जाणवते.तिने अगदी जीव ओतून काम केले आहे हे समजते. या जगातून अकाली एक्झिट मारणार्या आपल्या 'मिस्टर योगी' वडिलांचे अभिनयकौशल्य तिच्यात पूर्ण उतरले आहे.
27 Jan 2017 - 5:05 pm | पैसा
संधी मिळताच नाटक पहाणार.
30 Jan 2017 - 6:21 pm | श्रीगुरुजी
प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद! नाटकप्रेमींनी संधी मिळताच हे नाटक जरूर बघावे.
31 Jan 2017 - 4:35 pm | भडकमकर मास्तर
सुव्रत चे काम फार आवडले.
आणीबाणी म्हणजे १९७५ ७६ मधल्या प्रेमिकांचे लग्न झाल्यावर आजच्या काळातले त्यांचे मूल साधारण किती वयाचे असेल बरे? यात थोडा घोळ झालेला आहे, असे वाटते. सखीच्या पात्राचे आजचे वय काय असावे?
31 Jan 2017 - 4:43 pm | वेल्लाभट
भारी नाटक. पाहिले आहे, आवडले आहे.