गोवा - भाग १: जुन्या गोव्यातील चर्चेस

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
29 Nov 2016 - 6:17 pm

गोव्याला तसा मी अगदी लहानपणी गेलो होतो, साधारण १४/१५ वर्षांचा असेन तेव्हा. अगदी पुसटश्या आठवणी आहेत तेव्हाच्या. पणजीला मुक्काम करुन तेव्हा उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा अशा एकेक दिवसाच्या गोवा पर्यटन मंडळाच्या सहली केल्या होत्या. त्यात जुन्या गोव्यातील चर्चेस, मयें तलाव, मंगेशी आणि शांतादुर्गा मंदिरे, कोळवा, कळंगुट, वागातर असे काही किनारे पाहिल्याचं फक्त आठवतंय. त्यानंतर गोवा हा कित्येक वर्षे विशलिस्टवरच राहिला होता. मुळात इतक्या दूर जायचं तर ४/५ दिवसांची सवड हवी, मित्रांच्याही सुट्ट्यांचं जमायला हवं, इतरही काही प्राधान्यक्रमावरची ठिकाणं अशा काही अडचणींमुळे गोव्याला जाणं तसं वरचेवर लांबतच होतं किंवा गोव्याची हवी तशी ओढ निर्माण झाली नाही असं म्हटलं चालेल.

सरतेशेवटी ह्याखेपी मात्र गोव्याला नक्की जायचं असं दिवाळीच्या अगोदर तीनेक महिन्यांपूर्वीच ठरवून टाकलं होतं. मित्रांच्याही सुट्ट्यांचं गणित जमलं होतं पण निव्वळ वेळकाढूपणामुळे बुकिंगच्या पातळीवर फारशी हालचाल नव्हती. पणजीच्या गजबजाटात राहायचं नाही, किनार्‍याला लागून असलेल्या बीच हाऊसेस वर राहायचं असं अगोदरच ठरलं होतं, बरीच शोधाशोध करुन शेवटी कोळव्यापासून साधारण दोनेक किमी दूरवर असलेल्या सेर्नाभाटी (sernabatim) किनार्‍यावरचं एक गेस्ट हाउस बुक केलं. हा भाग दक्षिणेत असल्याने बेळगाव खानापूर मार्गे अनमोड घाटातून गोव्यात उतरलो. दाट जंगलातून जाणारा हा रस्ता प्रशस्त, खड्डेविरहित आणि अतिशय सुंदर आहे. पुढे गोव्यात उतरताच मधे ३/४ लहानश्या टप्प्यांमध्ये रस्ता खराब आहे पण अगदी थोडासाच. वाटेत कुडचडे गावी बा. भ. बोरकर ह्यांचं घर दिसलं. अगदी मुख्य रस्त्यावरच आहे ते. मडगाववरुन सेर्नाभाटीला पोहोचलो ते संध्याकाळचे पाच साडेपाच वाजता. लगेच खोली ताब्यात घेउन समुद्रात उतरलो.

सेर्नाभाटीचा किनारा अतिशय स्वच्छ, नितळ असा. सेर्नाभाटीचं मूळचं नाव सुवर्णभाटी असावं की काय असं क्षणभर वाटून गेलं. पांढरीशुभ्र वाळू, त्यात समुद्रशिंपले, शंख अशांच्या सोनेरी कवचांचे अगणित भुस्कट विखुरल्यामुळे उतरत्या उन्हांत ती वाळू अगदी सोन्यासारखी चमचमत होती. इथल्या किनार्‍यावर समुद्री जीवांचा सुकाळ. स्टार फिश, कर्ल्या, खेकडे, चालणारे शंख, शिंपले खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. पाण्यात उतरल्यावर अगदी लगेच टोचल्यासारखा स्पर्श जाणवतो. समुद्रात डुंबून, सूर्यास्त पाहून जेवायला मडगावला गेलो.

a

मडगाव इथून जेमतेम १० किमी अंतरावर. सेर्नाभाटी- कोळवा - मडगाव रस्ता अतिशय सुंदर, शांत, अजिबात गजबजाट नाही, रस्त्यावर भल्यामोठ्या इमारती नाहीत, जवळपास सर्वच बंगलेवजा बैठी घरं, अतिशय टुमदार, विविधरंगी. घरांसमोर क्रॉस, हिंदू घरांसमोर आकाशकंदिल, दिवाळीची रोषणाई. पुढच्या काही दिवसांत मुख्य मडगावातही फिरणं झालं, ते मात्र गजबजलेलं, गर्दी असलेलं. मडगावला शाकाहारी, मांसाहारी जेवणासाठी भरपूर हॉटेलं आहेत. कुणाचीही गैरसोय होत नाही. सेर्नाभाटीला मात्र चहाबाजांची गैरसोय होते. चहा सकाळी लवकर मिळत नाही, मिळाला तरी पांचट असाच. अगदी आम्ही जिथे उतरलो होतो त्या गेस्ट हाउसवरही चहाची तशी बोंबच होती.

दुसर्‍या दिवशी आमचं लक्ष्य होतं ते जुन्या गोव्यातील चर्चेस. त्या आधी सकाळी लवकर उठून समुद्रावर बरंच अंतर अनवाणी चालून आलो. इथला वाळूचा पांढराशुभ्र पट्टा हा कित्येक किमी लांब आहे. त्यात अरोशी, माजोर्डा, वेताळभाटी, कोळवा, सेर्नाभाटी, बाणावली, वार्का, केळोशी, मोबोर, बेतुळ असे बरेच उत्तमोत्तम किनारे आहेत. समुद्रकिनार्‍यावरच्या मऊशार वाळूत अनवाणी चालण्यात एक भलतीच मौज असते.

गोव्यातील जुनी चर्चेस आहेत ती जुन्या गोव्यात, म्हणजे तशी जुनी चर्चेस गोव्यात सर्वत्र आहेतच पण जी प्रमुख म्हणता येतील ती आहेत जुन्या गोव्यात अर्थात वेल्हा गोव्यात (वॅले गोआ velha goa). पोर्तुगीज भाषेत वॅले म्हणजे जुने. गोवा राज्यात दोन वॅले आहेत, एक मांडवी नदीच्या काठावर असलेले वॅले गोवा अर्थात वॅले सीदाद द गोआ (जुने गोवा शहर) आणि गोवा वॅले म्हणजे झुआरी नदीच्या काठावर असलेले दुसरे जुने गोवे. पैकी जी सुप्रसिद्ध चर्चेस आहेत ती मांडवी नदीच्या काठावर वसलेल्या वॅले गोव्यात. पोर्तुगीजांची ही आधीची राजधानी होती. व्हॉइसरॉयचे निवासथानही इथेच होते. इथली 'व्हाईसरॉयची कमान' (Viceroy's Arch) अर्थात विजरईच्या निवासस्थानाकडे जाणार्‍या प्रवेशद्वाराची कमान आजदेखील अस्तित्वात आहे. पण इथला मांडवीचा पाणथळ भाग, दलदल आणि त्यामुळे पसरत असलेल्या रोगराईमुळे गोव्याच्या विजरईने त्याची राजधानी तिथून दहा किलोमीटर अंतर असलेल्या पणजी येथे हलवली व त्याला नवे गोवे असे नाव पडले.
हे जुने गोवे म्हणजेच गोवापुरी हे पूर्वाश्रमीच्या कदंब राजवटीतील एक महत्वाचे बंदर होते. आदिलशाही राजवटीत देखील ह्याचे महत्व कायम राहिले होते.

ह्या जुन्या गोव्याला जायचा रस्ता फार सुंदर. डावीकडे मांडवीचं विस्तीर्ण पात्र, त्यात असलेली खारफुटीची जंगले, भरती ओहोटीबरोबर मांडवीचं कमी जास्त होणारं पाणी सतत सोबत करत असतं. ते पात्र संपता संपताच अचानक तीन मोठी चर्चेस सामोरी येतात. ती आहेत
सेन्ट कॅटरीना कॅथीड्रल (Sé Catedral de Santa Catarina), बॅसिलिका ऑफ बॉम जीझस (Basilica of Bom Jesus), चर्च ऑफ सेन्ट फ्रान्सिस ऑफ असिसी (Church of St. Francis of Assisi), सेन्ट ऑगस्टीन टॉवर (ruins of St. Augustine's Tower), सेन्ट कॅथरीन चॅपेल (The Chapel of St. Catherine). याउप्परही तिथे अजूनही काही जुनी चर्चेस आहेत. मात्र वेळेअभावी फक्त बॅसिलिका ऑफ बॉम जीझस आणि चर्च ऑफ सेन्ट फ्रान्सिस ऑफ असिसी ही दोनच चर्चेस पाहता आली तर सेन्ट ऑगस्टीन टॉवरचे अवशेष गाडीतूनच पाहता आले.

बॅसिलिका ऑफ बॉम जीझस (Basilica of Bom Jesus)

बॅसिलिका म्हणजे बायझन्टाईन शैलीत बांधलेली इमारत, अर्थात क्रिस्टियन धर्माच्या प्रसाराआधी असलेल्या पूर्व रोमन शैलीत असलेली इमारत. म्हणाजे रूढार्थाने ह्याची शैली नेहमीच्या चर्चेसप्रमाणे नाही.

बॉम्/बोम जीझस म्हणजे चांगला किंवा बाल येशू. बॅसिलिकाची ऑफ बोम जीझसच्या बांधकामाला १५९४ साली सुरुवात झाली आणि ह्याची प्रतिष्ठापना (consecrate) १६०५ साली गोव्याचा आर्चबिशप अ‍ॅलिक्सो मेन्झेस(Archbishop Aleixo de Menezes) ह्याच्या हस्ते झाली. ह्या प्रतिष्ठापनेचा उल्लेख ह्याच चर्चच्या अंतर्भागातील एका शिलालेखात आहे. आणि ह्या चर्चला बॅसिलिका (Basilica minor) असा दर्जा १९४९ साली मिळाला.

स्थापनालेख आणि त्याखाली बॅसिलिका दर्जा मिळाल्याचा लेख

a

ही बॅसिलिका तीनमजली असून एक मुख्य प्रवेशद्वार व त्याच्या दोन्ही बाजूंना उपप्रवेशद्वारे अशी ह्याची रचना आहे. दर्शनी भाग हा बसाल्टचा असून इतर सर्व भाग हा जांभ्याच्या दगडांनी बांधलेला आहे त्यामुळे ही इमारत काळसर आणि बाजूने तांबडीलाल दिसते.

सर्वात वरच्या बाजूस IHS अशी अक्षरे दिसतात. ही अक्षरे म्हणजे ग्रीक भाषेतील येशूच्या नावाची सुरुवातीची तीन अक्षरे आहेत. (ΙΗΣΥΣ- ihsous - Jesus)

बॅसिलिकेचं प्रथम दर्शन
a

बॅसिलिकेची बाजूची रचना

a

मुख्य प्रवेशद्वारावरील रचनेचं जवळून दृश्य
a

a

मुख्य प्रवेशद्वारातून आत डावीकडे सेन्ट फ्रान्सिसची काष्ठमूर्ती दोन धर्मोपदेशकांसह उभी आहे तर उजव्या बाजूस सेन्ट अ‍ॅन्थनीची वेदी आहे तर तिथल्याच एका भिंतीवर ह्या चर्चचा संरक्षक डॉम जेरोनिमो मस्कारेन्हास ह्याचा समाधी लेख आहे.

सेन्ट फ्रान्सिसची काष्ठमूर्ती

a

सेन्ट अ‍ॅन्थनीची वेदी

a

चर्चच्या आतमध्ये प्रवेश करताच भिंतीच्या दोन्ही बाजूंना म्हणजे फ्रान्सिस झेवियर ह्याची काष्ठमूर्ती आणि सेन्ट अ‍ॅन्थनीच्या वेदीच्या भिंतीना लागूनच येशूच्या जीवनातील काही प्रसंगांची चित्रे फ्रेममध्ये लावलेली आहेत.

a--a

चर्चच्या मुख्य वेदीच्या दोन्ही बाजूंस अवर लेडी ऑफ होप आणि सेन्ट मायकेल ह्यांच्या उपवेदी आहेत. तर मुख्य वेदीत खालच्या बाजूस बाल येशू असून त्याच्या वरील बाजूस सेन्ट इग्नाटियस लायोला, IHS लिहिलेले सूर्याची किरणे फेकत असलेले सुवर्णमय पदक आहे. तर त्याच्याही वरच्या बाजूस पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांचे शिल्पांकन आहे (holy trinity). ह्याच वेदीवर अतिशय देखणी अशी रंगीत भित्तीचित्रे आहेत. हा सुवर्णमय भाग अतिशय झळाळता असून प्रचंड लखलखत असतो.

चर्चची वेदी आणि दोन्ही बाजूच्या उपवेदिका

a

बाल येशू, त्याच्यावर सेन्ट इग्नाटियस लायोला (सर्वात मोठी मूर्ती), IHS पदक आणि त्याच्यावरील पवित्र त्रियक (holy trinity) --खालून वर

a

IHS पदक आणि पवित्र त्रियक

a

अवर लेडी ऑफ होप
a

सेन्ट मायकेल
a

वेदीच्या बाजूस असलेली भित्तीचित्रे

a

a

ही वेदी पाहून होताच उजव्या बाजूस एक एक दालन आहे आणि त्यात इथले सर्वात मोठे आकर्षण आहे ते म्हणजे सेन्ट फ्रान्सिस झेवियरचे शव.

फ्रान्सिस झेवियर हा ३ डिसेंबर १५५२ रोजी चीनमध्ये मेला. त्याचे शरीर तीन वेगवेगळ्या देशांत तीन वेगवेगळ्या वेळी पुरले गेले, शेवटी त्याचे शव त्यानेच पूर्वी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार गोव्यात आणण्यात आले. गोव्यात ते पूर्वी दुसर्‍या चर्चमध्ये ठेवण्यात आले होते आणि अल्पकाळातच ते बॉम जीझस चर्चमध्ये आणण्यात आले.

हे शव एका चांदी आणि लाकडापासून बनवलेल्या आणि काचेचे आवरण असलेल्या एका पेटीत ठेवण्यात आलेले आहे. ज्या दालनात ही शवपेटी आहे ते दालन (mausoleum) आणि ही शवपेटी टस्कनीचा ग्रॅण्ड ड्युक कॉसिमो (तिसरा) ह्याने भेट दिलेय. हा कॉसिमा तिसरा मेडीसी राजघराण्यातला. फ्लोरेन्सचा पिट्टी राजवाडा हे त्याचे निवासस्थान. ह्या मेडीसी राजघराण्याच्या काळात फ्लोरेन्समध्ये कलेची प्रचंड भरभराट झाली. बॉटीसेल्ली, व्हेसारी हे प्रसिद्ध रचनाकार्/चित्रकार ह्याच काळातले. मेडीसी राजघराण्याने ४ पोप व्हेटीकनला दिले. मेडीसी स्थपात्यशैलीचे, चित्रकलेचे, पिट्टी राजवाडा, व्हेसारी कॉरीडॉर ह्यांचे तपशीलवार उल्लेख डॅन ब्राऊनच्य 'इन्फर्नो' ह्या कादंबरीत आहेत.

सेन्ट फ्रान्सिस झेवियरची शवपेटी असलेले दालन

a

दालनावरील नक्षीदार भाग

a

फ्रान्सिस झेवियरचे शवपेटीतले शव

a

ह्या दालनाच्या आतील बाजूतील एका दालनात फ्रान्सिस झेवियरच्या शवाची काही छायाचित्रे आणि येशूंच्या जीवनातले काही प्रसंगांची अप्रतिम अशी भित्तीचित्रे आहेत.

फ्रान्सिस झेवियरच्या शवाचे छायाचित्र

a

तिथे असलेली काही भित्तीचित्रे

a

a

a

a

a

a

ही भित्तीचित्रे बघत बघतच बाहेर आलो.
विश्वाला प्रेमाचा आणि करुणेचा संदेश देणार्‍या येशूच्या ह्या सुंदर चर्चचा इतिहास मात्र काळाकुट्ट आहे. फ्रान्सिस झेवियर हा स्वतःच क्रूर धर्मप्रसारक होता हे बहुतेकांना माहिती आहेच. इथली भव्य आणि सुंदर वास्तू पाहतांना इथल्या लोकांवर केलेल्या अनन्वित अत्याचारांचा, त्यांचा धर्मन्यायालयांचा (inquisitions) इतिहास सतत नजरेसमोर तरळत होताच.

ही वास्तू बघून बाहेर आलो. ह्याच्या समोरच आहेत ती सेन्ट कॅथरीन चॅपेल, सेन्ट कॅटरीना कॅथीड्रल, चर्च ऑफ सेन्ट फ्रान्सिस ऑफ असिसी आणि त्याला लागून असलेले गोवा पुरातत्व खात्याचे संग्रहालय.

चर्च ऑफ सेन्ट फ्रान्सिस ऑफ असिसी (डावीकडे), सेन्ट कॅटरीना कॅथीड्रल (उजवीकडे)

a

चर्च ऑफ सेन्ट फ्रान्सिस ऑफ असिसी येथील आवारातुन दिसणारी बॅसिलिका ऑफ बॉम जीझस.

a

चर्च ऑफ सेन्ट फ्रान्सिस ऑफ असिसी

हा सेन्ट फ्रान्सिस हा १३ व्या शतकात होऊन गेलेला इटालियन धर्मप्रसारक. ह्याच्या स्मरणार्थ हे चर्च येथे बांधले गेलेले आहे.
ह्या चर्चचे प्रवेशद्वार कमानदार असून अंतर्भागात काही भित्तीचित्रे आणि जमिनीवर काही शिलालेख आहेत.
चर्चच्या मुख्य वेदीवर सेन्ट फ्रान्सिस आणि येशूच्या मूर्ती असून बाजूंना सेन्ट पीटर आणि सेन्ट पॉल ह्यांच्या मूर्ती आहेत. क्रिस्टियन सेन्ट्स आणि त्यांची स्थापत्यशैली ह्यांचे वर्णन करणे मात्र माझ्या कुवतीबाहेरचेच आहे.

चर्च ऑफ सेन्ट फ्रान्सिस ऑफ असिसीचे बाह्यदर्शन

a

चर्च ऑफ सेन्ट फ्रान्सिस ऑफ असिसीचा अंतर्भाग

a

मुख्य वेदीचा भाग

a

बाजूंच्या भिंतीत असलेल्या मूर्ती
a

ह्या चर्चला अगदी लागूनच गोवा पुरातत्व खात्याचे संग्रहालय आहे. ते अगदी आवर्जून बघावे असेच.

गोवा पुरातत्व खात्याचे संग्रहालय
ह्या संग्रहालयात काही अफलातून वस्तू आहेत. दुर्दैवाने आतील वस्तूंचे फोटो काढण्यास मनाई असल्याने येथे छायाचित्रे घेता आली नाहीत. हे संग्रहालय दुमजली असून वरील मजला हा नूतनीकरणाच्या कामामुळे बंद आहे.
ह्या संग्रहालयात गोव्याच्या पूर्वपोर्तुगीजकालीन इतिहासाची झलक बघायला मिळते. तिसवाडी, बारदेश आणि साळशेत ह्या तीन तालुक्यांतील एकूण एक मंदिरे पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केली. ह्या कदंबकालीन मंदिरांचे, इथल्या अत्यंत देखण्या मूर्तींचे अवशेष येथे पाहायला मिळतात. येथे काही देखण्या विष्णूमूर्ती आहेत. काही अप्रतिम वीरगळ, सतीशिळा आहेत. ह्या वीरगळांवर नाविक युद्धाचे प्रसंग कोरलेले आहेत. सतीशिळांवर स्त्री चितेवर चढलेला प्रसंग, तिला ज्वालांनी वेढून घेतल्याचे प्रसंग चित्रित करण्यात आलेले आहेत. देवनागरी, कन्नड लिपीत लिहिलेले गधेगाळ देखील येथे आहेत. वेताळाच्या काही भग्न मूर्ती तर काही अखंड मूर्ती आहेत.

कदंबांची पहिली राजधानी मडगावपासून जवळ असलेल्या चांदोर येथे होती. तिथे अलीकडेच उत्खनन होऊन एक मंदिर सापडले आहे. चांदोरला जायला आम्हाला वेळ झाला नाही पण त्या उत्खननित झालेल्या मंदिराची सचित्र माहिती येथे पाहायला मिळाली. अजून एका मंदिरांची पुनर्बांधणी केल्याची छायाचित्रे देखील येथे आहेत.
गोव्यात कधी आलात तर हे संग्रहालय पाहाण्याचे अजिबात चुकवू नका.

ह्या संग्रहालयाला लागूनच आहे ते सेन्ट कॅथरीनाचे चॅपेल आणि त्याच्या बाहेरील बाजूस आहेत ते पोर्तुगीज राजचिन्हांच्या शिळा अर्थात कोट ऑफ आर्म्स.

सेन्ट कॅथरीनाचे चॅपेल आणि कोट ऑफ आर्म्स.

चॅपेल म्हणजे लहानसे चर्च. हे अतिशय टुमदार आहे. ह्या चॅपेलच्या दर्शनी भागाची छायाचित्रे काढायची राहून गेली.

सेन्ट कॅथरीना चॅपेल
a

कोट ऑफ आर्म्स म्हणजे पोर्तुगीजांचे राजचिन्ह. पोर्तुगीजकालीन वास्तूंवर ही चिन्हे अगदी सर्रास आढळतात. मी वसई आणि कोर्लईच्या किल्ल्यांत ह्या चिन्हशिळा पाहिलेल्या आहेत. गोवा पुरातत्व खात्याच्या संग्रहालयाच्या आवारात ह्या शिळा हारीने मांडून ठेवलेल्या आहेत.

कोट ऑफ आर्म्स शिळा

a

a-a

सेन्ट कॅथरीन चॅपेल आणि कोट ऑफ आर्म्स
a

हे बघेस्तोवर संध्याकाळ होत आली होती. येथून निघालो ते मंगेशी मंदिर पाहून रात्री ८ च्या सुमारास दोना पावला येथे आलो. रात्रीचा समुद्र पाहून परत फिरलो.

a

a

आता दुसर्‍या दिवशी मात्र जरा लांबचा पल्ला होता. गोव्याच्या अगदी दक्षिण भागात असलेल्या पैंगिण गावातले वेताळ मंदिर आणि लोलयेतील वेताळाची रानात उघड्यावर असलेली भव्य मूर्ती. त्याविषयी पुढील भागात.

क्रमशः

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

29 Nov 2016 - 6:24 pm | महासंग्राम

जबरा झालाय पहिला भाग.. येवू द्या क्रमशः ...

कैलासवासी सोन्याबापु's picture

29 Nov 2016 - 6:26 pm | कैलासवासी सोन्याबापु

वल्लींचा धागा, अहाहा मजा आली

(ऍडव्हान्स पोचपावती समाप्त)

आता वाचतो

लेख आणि फोटो, दोन्हीही सुरेख. सेन्ट कॅथरीना चॅपेलचा फोटो सुरेख जमला आहे!
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

पाटीलभाऊ's picture

29 Nov 2016 - 6:41 pm | पाटीलभाऊ

छान फोटो आणि वर्णन

गणामास्तर's picture

29 Nov 2016 - 6:46 pm | गणामास्तर

छान फटू आणि लेखन.
वीरगळ आणि गधेगाळ बघायला मिळणार नसतील तर तू कुठेचं फिरायला जात नाहीस ना ;)

प्रचेतस's picture

29 Nov 2016 - 9:39 pm | प्रचेतस

तसं नाही. जिथे जिथे मी फिरायला जातो तिथं असं काही ना काही बघायला मिळतंच. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Nov 2016 - 6:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वल्ली, लेख भारी, फोटो तर एकापेक्षा एक सरस. आणि माहितीपूर्ण.
झकास. पुढील भागाची वाट पाहतोय.

वेदी म्हणजे काय ते नीटपणे कळलं नाही ?

-दिलीप बिरुटे

चौकटराजा's picture

29 Nov 2016 - 7:09 pm | चौकटराजा

माझ्या माहितीनुसार वेदी म्हणजे alter .च्रर्च च्या मागच्या भागात क्रॉस वा येशूची मूर्त असते त्यापुढे एक टेबल. त्यावर मेणबत्या. त्त्या मागे उभे राहून फादर लोकाना संबोधित करतात हे टेबल म्हण्जे वेदी आल्टर.

@ प्रचेतुस बुवा, फोटो मस्त आलेत.

चित्रगुप्त's picture

29 Nov 2016 - 6:53 pm | चित्रगुप्त

जबरदस्त मालिका होणार ही सुद्धा. प्रतिक्षेत.

पद्मावति's picture

29 Nov 2016 - 6:59 pm | पद्मावति

वाह, क्या बात है. मस्तच.

कंजूस's picture

29 Nov 2016 - 7:17 pm | कंजूस

वेदी = alter
सुरेख फोटो. आणखी काय लिहिणार!

वरुण मोहिते's picture

29 Nov 2016 - 7:43 pm | वरुण मोहिते

काही काही ठिकाण पहिली आहेत. हे अश्या नजरेने पाहायचं असतं. पण आमच्याकडून काही जमत नाही बुवा कधी . ना जमेल कधी :)

गवि's picture

29 Nov 2016 - 7:44 pm | गवि

मस्त लेख प्रचेतस.

दारु अन मासे यांच्या खूप पुढचा गोवा दाखवतोयस. उत्तम.

पुढचा भाग लवकर येऊदे.

प्रचेतस's picture

29 Nov 2016 - 10:05 pm | प्रचेतस

धन्यवाद गविशेठ.

अजून बरंच काही आहे आणि बरंच काही पाहायचं राहिलेलं आहे. :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

29 Nov 2016 - 7:54 pm | कैलासवासी सोन्याबापु

वल्लीजी अप्रतिम धागा अन फोटो मेजवानी दिल्याबद्दल आपले आभार. खूप माहिती मिळाली. ह्या फ्रान्सीस झेवियरच्या मृतदेहाची नखं अजूनही वाढतात असे काहीसे स्थानिक लोक मानत असल्याचे ऐकून होतो, अधिक प्रकाश टाकावा.

बाकी, बसिलिका अन इतर चेपल्सची ओळख आवडली बारकावे सांगायची तुमची शैली ओघवती आहे हे वेगळे सांगणे नलगे. सेंट मायकल हा आर्कएंजल तर आहेच तसेच तो "गार्डियन ऑफ द चर्च" अन "गार्डियन ऑफ द व्हेटिकन सिटी" सुद्धा म्हणवला जातो. तसेच तो पोलीस दल आणि भूदलाचा पेट्रन संत मानला जातो. बऱ्याच कॅथोलिक देशातील फौजांत एक ठाण असत सेंट मायकलचं.

त्याच्या "गार्डियन ऑफ द चर्च" असण्यावरून मला एकदम आपल्या हिंदू सिम्बोलीझाम मधली द्वारपालद्वयी उर्फ "जय विजय"ची कन्सेप्ट आठवली. दोन्ही मध्ये साम्य असू शकेल का ? (मला जय विजयचा पौराणिक रेफरन्स आठवत नाहीये) त्यांचा उगम कधीचा होता ?? तुम्हाला काय वाटते ??

प्रचेतस's picture

29 Nov 2016 - 9:56 pm | प्रचेतस

धन्यवाद बापू.

चर्चमध्ये फ्रान्सिस झेवियरच्या शवाची काही छायाचित्रे आहेत, त्यात नखं वाढल्यासारखे तरी काही दिसत नाही. मात्र हे शव तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून उकरुन काढून शेवटी येथे ठेवले गेले आहे तरी ते बर्‍यापैकी सुस्थितीत आहे. कदाचित हे मसाल्यांच्या आवरणाखाली ठेवले गेले असावे. दर १० वर्षांनी ही शवपेटी खालच्या पातळीवर ठेवून भाविकांच्या दर्शनासाठी खुली ठेवतात. ह्या शवाची महती इतकी जुनी आहे की संभाजी महाराजांच्या गोवे स्वारीत जेव्हा पोर्तुगीजांचा पराभव व्हायला लागला तेव्हा पोर्तुगीज व्हाईसरॉय फ्रान्सिस्को द टावरो (कोंद द अल्वोर) हा ह्या चर्चमध्ये जाऊन फ्रान्सिस झेवियरची शवपेटी खाली काढून करुणा भाकू लागला. त्याने अगदी शवपेटी उघडून शवाला ध्वज, राजचिन्हे आणि त्याची मदत मागण्यासाठी केलेला अर्ज इत्यादी अर्पण केले.

सेन्ट मायकलची तुम्ही दिलेली माहिती रोचक आहे. हे अजिबातच माहित नव्हते.

जय विजय आणि आर्कएन्जलमध्ये साम्य असे मला वाटत नाही. जय विजयांचा उगम पुराणांत आहे, वेदांत नाही. भागवद, विष्णू पुराण इत्यादी. तर क्रिस्टियन परंपरांमधले देवदूत यहुदी परंपरांमधून आले असावेत. कदाचित जुना करार. नक्की माहित नाही अर्थात.

कैलासवासी सोन्याबापु's picture

29 Nov 2016 - 10:09 pm | कैलासवासी सोन्याबापु

साम्य म्हणजे अगदी टोकाला टोक साम्य नाही तर कन्सपशुअल साम्य, म्हणजे जय विजय बघा कसे बुआ गाभाऱ्याचे संरक्षक तसे चर्चचा किंवा sanctumचा संरक्षक मायकल असणे, त्या कारणामुळे ठराविक देशात /प्रांतात चर्च मध्ये 'सेफ्टी' साठी त्याचे (मायकलचे) मोटीफ/अल्टर असणे अश्यार्थाने साम्य म्हणत होतो मी. नेमके मांडता येईना शब्दात.

बाकी, जय विजय पौराणिक काळ म्हणजे पोस्ट गुप्त काळ (८व्या शतकानंतरचा काळ) मानता यावा का ?? *

*माफ करा पण तुम्हाला इतिहासावर प्रश्न विचारायचा आनंद वेगळा असतो मग मी लय लागली की प्रश्न विचारत सुटतो =))

प्रचेतस's picture

29 Nov 2016 - 10:23 pm | प्रचेतस

बिंधास्त विचारा अगदी. :)

जगातील बहुतेक संस्कृतींत काही गोष्टी समान असतात. उदा. नोहाची आणि मनूची नौका-जगबुडी, राशी, तसे हेसुद्धा समान असतील. गार्डीयन्स अथवा द्वारपाल हे बहुतेक सर्वच प्राचीन संस्कृतींत आहेत. त्यामुळे नेमका उगम कुठून कधी हे निश्चित सांगता येत नाही. मात्र येथे जय विजय नंतरचे असे मानता यावे.

पौराणिक काळ म्हणजे इस.पूर्व २ रे/३ रे शतक ते इस, ६ वे शतक असे मानता यावे. थोडक्यात अशोककाळापासून गुप्तकाळापर्यंत. पैकी गुप्त काळ (इस. ३३० ते इस. ५५०) तर सांस्कृतिक दृष्ट्या भारताचा सुवर्णकाळ मानला जातो. बहुतेक सर्वच पुराणांची रचना ह्याच कालखंडात झाली. दुर्दैवाने कर्मकाण्डाची बीजेही ह्याच कालखंडात रोवली गेली आणि वर्णाश्रमवस्थेकडून जातीव्यवस्थेकडे प्रवास सुरु होण्यास येथूनच सुरुवात झाली.

प्रीत-मोहर's picture

29 Nov 2016 - 8:03 pm | प्रीत-मोहर

मस्त धागा वल्ली. तुम्ही येण्याआधी सांगितल असत तर तुमच्या इंटरेस्टच्या अजुन काही जागा सुचवल्या असत्या.

प्रचेतस's picture

29 Nov 2016 - 9:57 pm | प्रचेतस

पुढच्या वेळी. आता बहुतेक दरवर्षीच गोव्यात येईन.

प्रीत-मोहर's picture

29 Nov 2016 - 8:04 pm | प्रीत-मोहर

लोलयेच्या धाग्याच्या प्रतीक्षेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Nov 2016 - 9:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण आणि उत्तम चित्रांनी भरलेला धागा !

गोवा म्हणजे सन, सॅड आणि दारू हे सोडून बरेच काही आहे हे पटवणारा धागा !!

नाखु's picture

30 Nov 2016 - 10:02 am | नाखु

त्याही पलिकडे गोवा आहे हे या लेखामुळे कळाले आणि रसिकांनी गर्दीच्या ठिकाणी आणखी गर्दी करण्याचे टाळले तरी गोवेकरीही खूष होतील हे नक्की.

फ्रान्सिस झेवियर हा ३ डिसेंबर १५५२ रोजी चीनमध्ये मेला. त्याचे शरीर तीन वेगवेगळ्या देशांत तीन वेगवेगळ्या वेळी पुरले गेले, शेवटी त्याचे शव त्यानेच पूर्वी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार गोव्यात आणण्यात आले. गोव्यात ते पूर्वी दुसर्‍या चर्चमध्ये ठेवण्यात आले होते आणि अल्पकाळातच ते बॉम जीझस चर्चमध्ये आणण्यात आले.

माहीती आणि चित्रे अप्रतिम पण हे वरील विधानात तीन वेगवेगळ्या देशात कसे शक्य आहे असा अडाणी प्रश्न विचारून खाली बसतो.

पुरातत्व शास्त्राच्या तासाला मागे बसलेला अडाणी नाखु.

प्रचेतस's picture

30 Nov 2016 - 10:39 am | प्रचेतस

फ्रान्सिस झेवियरचा मृत्यु चीनमधे झाला, त्याचे पार्थिव चीनमध्येच पुरण्यात आले, नंतर ते उकरुन मलाक्कातील पोर्तुगीज वसाहतीत काही काळापुरते पुरण्यात आले. पार्त तेथून ते उकरुन काढून गोव्यातील एका चर्चमध्ये आणण्यात आले व सरतेशेवटी ते बॉम जीझस चर्चमधल्या फ्लोरेन्सच्या कॉसिमोने दिलेल्या शवपेटीत ठेवण्यात आले.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Nov 2016 - 9:54 pm | अत्रुप्त आत्मा

फोटू येक नंबर हायती, धागा णिवांत वाचणेत यिल.

खटपट्या's picture

29 Nov 2016 - 11:07 pm | खटपट्या

हेच म्हणतो

आदूबाळ's picture

29 Nov 2016 - 10:19 pm | आदूबाळ

मस्तच!

बॅसिलिकाच्या शेजारी पांढरी ढब्बी इमारत उभारून जी काय माती खाल्लीये त्याला तोड नाही.

पुंबा's picture

30 Nov 2016 - 1:17 am | पुंबा

मस्त.. वाखुसा

निशाचर's picture

30 Nov 2016 - 4:39 am | निशाचर

मस्त वर्णन आणि फोटो!

बॅसिलिका म्हणजे बायझन्टाईन शैलीत बांधलेली इमारत, अर्थात क्रिस्टियन धर्माच्या प्रसाराआधी असलेल्या पूर्व रोमन शैलीत असलेली इमारत. म्हणाजे रूढार्थाने ह्याची शैली नेहमीच्या चर्चेसप्रमाणे नाही.

यात थोडी दुरुस्ती कराविशी वाटते. बायझंटाइन अर्थात पूर्व रोमन साम्राज्य हे रोमन कमी आणि ग्रीक जास्त होते आणि ओर्थॉडोक्स चर्चला (ईस्टर्न ख्रिस्चॅनिटी) मानत असे. पोर्तुगीज हे रोमन कॅथोलिक्स (वेस्टर्न ख्रिस्चॅनिटी). वेस्टर्न ख्रिस्चॅनिटीतील चर्चची रचना साधारणपणे या बॅसिलिकासारखी असते. पण फक्त महत्त्वाच्या आणि पोपने तसा विशेष दर्जा दिलेल्या रोमन कॅथोलिक चर्चला बॅसिलिका म्हटले जाते. वर फोटोत दाखविलेल्या बॅसिलिका दर्जा मिळाल्याच्या लेखात Papa Pio XII (Pope Pius XII, पोप पायस बारावा) याचा उल्लेख दिसत आहे.
याशिवाय बॅसिलिका ऑफ बॉम जीझस वर त्याकाळी प्रचलित बरोक (Baroque) शैलीचा प्रभाव आहे.
पुभाप्र!

प्रचेतस's picture

30 Nov 2016 - 8:58 am | प्रचेतस

धन्यवाद ह्या माहितीसाठी.

प्रीत-मोहर's picture

30 Nov 2016 - 6:39 am | प्रीत-मोहर

एक गोष्ट ते वेल्हा गोवा नाही, गोवा वेल्हा आहे आणि ते पिलार जवळ आहे. तिथल्या जंगलात कदंबांच्या राजवाड्याचे अवशेष आहेत.जे मी पाहिलेत.

प्रचेतस's picture

30 Nov 2016 - 9:00 am | प्रचेतस

हो.
वेल्हा गोवा आणि गोवा वेल्हा असे दोन प्रांत आहेत ते मी वर लिहिलेलेच आहे. कदंब राजवटीचे अवशेष ह्या दोन्ही प्रांती होते.

प्रीत-मोहर's picture

30 Nov 2016 - 9:17 am | प्रीत-मोहर

आत्ता वेळ नाहीये खूप लिहायला,पण थोरले गोवे म्हणजे ओल्ड गोवा आणि गोवा वेल्हा असे दोन गाव आहेत.
वेळ झाला की अजून लुहिते

प्रीत-मोहर's picture

30 Nov 2016 - 9:21 am | प्रीत-मोहर

पैसाक्का तुला जमले तर लिही गो.

पैसा's picture

30 Nov 2016 - 10:24 am | पैसा

वेल्हा गोवा आणि गोवा वेल्हा असे दोन प्रांत नाहीत. गोवा वेल्हा हे पिलारजवळचे गाव आहे. कदंबांची मूळ राजधानी आणि बंदर तिथे होते. तिथे बंदर नाव असलेली एक वाडी अजून आहे आणि प्राचीन बंदराच्या भिंताचे अवशेष आहेत. प्रिमो म्हणते तसे राजवाड्याचे अवशेष जंगलात आहेत. जुने गोपकपट्टण ते हेच असावे.

आताचे ओल्ड गोवा जिथे ही प्रसिद्ध चर्चेस आहेत त्याचे जुने नाव गोमंतपुरी. चर्चच्या जागी गोमंतेश्वराचे देऊळ होते ते आता हलवून जरा दूर लहानसे बांधले आहे. तिथेही सतीशिळा आणि वीरगळ आहेत. दुसर्‍या चर्चच्या जागी सप्तकोटीश्वराचे देऊळ असावे. ओल्ड गोव्यातली बहुतेक चर्चेस ही मूळची देवळे. तुळशीवृंदावनाच्या जागी ते न फोडता क्रॉस लावून ठेवले आहेत. एका ठिकाणचा क्रॉस उभा रहात नव्हता म्हणून साखळदंड बांधून उभा करावा लागतो अशी कथा जुने लोक सांगतात.

ओल्ड गोवा हा मुळात अपभ्रंश आहे 'व्हडले गोवे' याचा. चर्चबाहेर चौकात आता आतापर्यंत 'थोरले गोवे' अशी पाटी होती. सध्या आहे का ते जाऊन बघावे लागेल. व्हॉईसरॉयची कमान म्हणून सांगतात ती आदिलशहाच्या राजवाड्याचे प्रवेशद्वार होते हे नक्की. अर्थात आदिलशहानेही ते कदंबांकडून देऊळ/राजवाडा यापैकी काहीतरी उध्वस्त करून मिळवले असणार असे कुठेतरी वाचल्याचे आठवते.

बाकी लेख आणि फोटो छान.

प्रचेतस's picture

30 Nov 2016 - 10:36 am | प्रचेतस

धन्यवाद पै तै.

मी हे संदर्भ घेतलेत ते बुर्कारुच्या पोर्तुगीज रेकॉर्ड्समधून. बुर्कारुच्या कागदपत्रांचा उल्लेख गजानन मेहेंदळे ह्यांच्या श्री राजा शिवछत्रपती ह्या द्विखंडी चरित्रात आहे. तयत मांडवी जवळाचे वॅले सीदार्द द गोआ म्हणाजे हे जुने(थोरले) गोवे आणि गोआ वॅले (झुआरी नदीच्या काठावरचे) अशी दोन गावे असल्याचे उल्लेख आहेत. घरी गेल्यावर परत एकदा संदर्भ तपासून बघतो.

पैसा's picture

30 Nov 2016 - 10:53 am | पैसा

'वॅले' हे फक्त जुन्या पोर्तुगीज कागदपत्रात आहे. प्रचलित नाव नाही. आणि पोर्तुगीजांनी लिहिले आहे ते बरेचसे विपर्यस्त आहे.

भम्पक's picture

30 Nov 2016 - 5:18 pm | भम्पक

पैसा ताई ,मग पोन्ने म्हणजे जुने कि कसे ? कारण पोंड्याहून जातांना मी हे एका पथदर्शकावर वाचले.

पोन्ने म्हणजे पोर्ने (जुने) हे आता ओल्ड चे भाषांतर झालेले आहे (पुन्हा). या गावाच्या नावाचा 'व्हडले>ओल्ड>पोर्ने' असा प्रवास झाला. (*पोंडा नव्हे, फोंडा) ओल्ड गोवा या चर्च असलेल्या एरियाचे मूळ नाव "एला" तिथल्या सरकारी शेती संशोधन केंद्रावर एला संशोधन केंद्र हा बोर्ड तुम्ही बघितला असेल. तिथेच हा एला-"वेल्हा" चा घोळ सुरू झालेला दिसतो आहे.

प्रचेतस's picture

1 Dec 2016 - 9:12 am | प्रचेतस

गजानन मेहेंदळे ह्यांनी लिहिलेल्या 'श्री राजा शिवछत्रपती' ह्या पुस्तकात जुने गोव्याबद्दल पुढील संदर्भ आहेत.

कदंबांच्या राजवाड्याचे अवशेष असलेले गोवा वेल्हे वेगळे हे खालील उतार्‍यावरुन स्पष्ट होते.

वेलॅ सीदाद द गोवा आणि गोआ वेलॅ

हे गोवे पणजीच्या पूर्वेला सुमारे दहा किलोमीटरवर मांडवी नदीच्या काठी आहे. कदंबांची राजधानी जिथे होती ते गोवे वेगळे. ते जुआरी नदीच्या काठी होते. त्याला पोर्तुगीज गोआ वेलॅ (म्हणजे जुने गोवे) असे म्हणत. (दि इंपीरियल गॅझेटीयर ऑफ इंडिया खंड १२, पृ. २६६). मराठीत त्याला थोरले गोवे म्हणतात. दलदल, रोगराई इत्यादी कारणांमुळे इस. १७५९ मध्ये विजराईचे निवासस्थान गोव्याहून पणजीला नेण्यात आले तेव्हापासून व्यवहारात पणजी हीच राजधानी होती.पण राजधानी पणजीला नेल्याची अधिकृत घोषणा मात्र इस. १८४३ मध्ये करण्यात आली आणि तेव्हाच पणजीला नोव गोआ (नवे गोवे) असे नाव देण्यात आले. पूर्वी जिथे पोर्तुगीजांची राजधानी होती त्या गोव्याला मग वेलॅ सीदाद द गोआ (जुने गोवा शहर) असे म्हणू लागले (दि इंपीरियल गॅझेटीयर ऑफ इंडिया, खंड १२ पृ. २६६). पण त्यालाच वेलॅ गोआ (जुने गोवा) असेही म्हणतात. (गोवा गॅझेटीयर, पृ. ७९६). बुकार्रु या सतराव्या शतकातील पोर्तुगीज ग्रंथकाराने गोवा बेटाच्या दक्षिणेकडील खाडीला बार द गोआ वेलॅ (जुन्या गोव्याची खाडी) असे म्हटले आहे. ते नाव अर्थातच जुन्या म्हणजे कदंबांच्या गोव्यावरुन पडले असले पाहिजे. गोवा बेटाचर मुरगावच्या खाडीच्या (म्हणजे जुवारी नदीच्या) काठावर ओल्ड गोवा आहे अशी माहिती इस. १६७५ मधे तिथे समक्ष जाऊन आलेल्या जॉन फ्रायर ह्या इंग्रजाने नमूद करुन ठेविले आहे. (फ्रायर खंड २, पृ. २०-२१). गोवा बेटाच्या दक्षिणेकडील नदीच्या काठी पूर्वी गोवा शहर होते म्हणून त्या ठिकाणाला Goa Vecchia (म्हणजे जुने गोवे) असे म्हणतात अशी माहिती इस. १६२३-२४ मधे तिथे समक्ष जाउन आलेल्या प्येअत्रो देल्ला व्हॅल्ले या इटालियन गृहस्थाने दिलेली आहे. (प्येअत्रो देल्ला व्हॅल्ले, खंड २, पृ. ४०५)
प्रस्तुत शिवचरित्रात गोवे म्हणून ज्या शहराचा उल्लेख केला आहे ते गोवे म्हणजे सतराव्या शतकात जिथे पोर्तुगीजांची राजधानी होती ते, पणजीच्या पूर्वेस दहा किलोमीटर असलेले मांडवी नदीच्या काठचे गोवे.

पैसा's picture

1 Dec 2016 - 10:10 am | पैसा

म्हणजेच मी म्हटले तसे कादंबांची राजधानी असलेले गोवा वेल्हा वेगळे आहे आणि जिथे चर्च आहेत ते ओल्ड गोवा. त्याला वेल्हा गोवा हे फक्त पोर्तुगीजांच्या काही जुन्या संदर्भात म्हटलेले सापडते. लोकांमध्ये त्याचे नाव एला आहे.

प्रीत-मोहर's picture

1 Dec 2016 - 10:16 am | प्रीत-मोहर

विकीवर ही वल्ली म्हणतोय तशीच दिलीय माहिती.
लोक सहजच confuse होऊ शकतात

प्रचेतस's picture

1 Dec 2016 - 10:49 am | प्रचेतस

हो बरोबर.

पण इथे ह्या ओल्ड गोव्यात देखील पूर्वीच्या कदंबाचे काही अवशेष मिळतात का? तिथल्या एका चर्चचे नाव क्रिस्टु काला मंदिर असे आहे.

पैसा's picture

1 Dec 2016 - 11:54 am | पैसा

बाजूच्या कदंबा पठारावर उत्खनन झालेले नाही. पण गोमंतेश्वराच्या आवारात एक आटोपशीर पुष्करिणी, एक खूप जुनी विहीर, गुहा, वीरगळ आणि सतीशिळा आहेत. नेमके इथे पोचेपर्यंत माझ्या कॅमेर्‍याची बॅटरी संपली त्यामुळे फोटो नाहीत. एकदा मुद्दाम जाऊन फोटो काढून आणेन. गोमंतेश्वराचे प्रवेशद्वार भव्य पण थोडी पडझड होऊ लागलेले आहे. मात्र ते मूळ जागी नाही त्यामुळे काही गोष्टी जुन्या तर काही १६-१७ व्या शतकातल्या असणार. व्हॉईसरॉयची कमान आहे त्यावर चुन्याचे थर आहेत. ती गोमंतेश्वर किंवा सप्तकोटेश्वराच्या मूळ देवळाची आहे असे लोक सांगतात पण वरचा गिलावा काढल्याशिवाय ते कळणार नाही.

खुद्द बॅसिलिका च्या आवारात आणि अन्यत्र मोठे मोठ क्रॉस उभे केले आहेत ते मूळच्या तुळशीवृंदावनावर असेही लोक सांगतात.

सेंट ऑगस्टिन चर्चचे अवशेष तुम्ही पाहिलेत का? ते सुरुवातीच्या काळातेल चर्चपैकी आहे.

कदंबांच्या काळचे शिल्लक अवशेष म्हणजे चांदोरला देवळाचे अवशेष आणि एक मोठ्ठा नंदी आणि असेच इकडेतिकडे देवळांच्या आवारात तुरळक वाचवून ठेवलेले. दिवाडी बेटावर एक मोठी पुष्करिणी आणि काही अवशेष दुर्लक्षित आहेत. त्यांचे फोटो माझ्याकडे आहेत. भर उन्हात मोबाईलवर काढल्याने तेवढेसे चांगले नाहीत.

1

तिथल्या एका चर्चचे नाव क्रिस्टु काला मंदिर असे आहे

तो म्युझियमचा/आर्ट गॅलरीसारखा भाग आहे. स्वतंत्र चर्च नाही. ओल्ड गोव्यातल्या सगळ्या जुन्या चर्चेसचे नीट निरीक्षण करायला मिळाले तर मूळ देवळाचे अवशेष ओळखू येतील. बॅसिलिका बॉम जीझसच्या भिंतींवर कमळे वगैरे नक्षी आहे असे माझ्या एका कॅथॉलिक मैत्रिणीने सांगितले होते. मी पाहिलेले नाही.

प्रचेतस's picture

1 Dec 2016 - 12:57 pm | प्रचेतस

सेंट ऑगस्टिन चर्चचे अवशेष अगदी ओझरते आणि बाहेरुनच पाहिले. बरीच पडझड झालीय त्यांची. पोर्तुगीजांनी साळशेत, बारदेश आणि तिसवाडी तालुक्यांतले एकूण एक मंदिर नष्ट केलंय. अगदी बहमनी/आदिलशाही अमदानीतले देखील एक साफा मशीद वगळता इतर काहीच शिल्लक नाही.
गोवा संग्रहालयात काही उत्खननांची छायाचित्रे आणि कदंबकालीन मंदिराचे अवशेष इत्यादी आहेत ते आवर्जून बघावे असेच.

प्रीत-मोहर's picture

1 Dec 2016 - 2:57 pm | प्रीत-मोहर

पणजीच्या संग्रहालयात , तोडफोड झालेल्या बर्‍याच मुर्त्या परत जोडुन ठेवल्यात. नेत्रावळीचा गोपीनाथ त्यातील एक :)

एस's picture

30 Nov 2016 - 6:46 am | एस

फार छान लेख!

खेडूत's picture

30 Nov 2016 - 9:43 am | खेडूत

छान माहिती आणी फोटू!

सेंट फ्रंसिस इथे अधिक स्पष्ट दिसतो.

g

नंदन's picture

30 Nov 2016 - 10:39 am | नंदन

लेख! माहिती आणि फोटो - दोन्ही खास. वाखू साठवली आहे, पुढील भागांची वाट पाहतो.

तुषार काळभोर's picture

30 Nov 2016 - 10:41 am | तुषार काळभोर

पुभाप्र

रघुनाथ.केरकर's picture

30 Nov 2016 - 11:35 am | रघुनाथ.केरकर

दादानु फोटु दिसनत नाय.....

एकनाथ जाधव's picture

30 Nov 2016 - 11:49 am | एकनाथ जाधव

+१

असंका's picture

30 Nov 2016 - 3:27 pm | असंका

+१..

पण बाकी सगळे कौतुक करतायत फोटोंचं ...

रघुनाथ.केरकर's picture

30 Nov 2016 - 4:29 pm | रघुनाथ.केरकर

पन माका नाय दिसनत.

शेवटचे दोन मात्र दीसले.

नाखु's picture

30 Nov 2016 - 4:33 pm | नाखु

आताच काय अवकृपा झाली माहीत नाही, दिसेनात फोटो !!!

पुरेसे पुण्य गाठी नसल्याचा परिणाम तर नाही ना??????

पिंचि गा(व्)ठी असलेला नाखु

आता दिसतायत मला....मगाशी दिसत नवते.

नाखु's picture

30 Nov 2016 - 4:54 pm | नाखु

दिसू लागले..

अंबाबाई अशीच कृपा राहू दे !!!!!! उदे ग अंबे उदे..

गोंधळी नाखु

एव्हढ्या कलाकुसरीच्या सुंदर इमारतीला अगदी खेटून ती विद्रुप पांढरी इमारत बांधणारा जो कोणी असेल तो ग्रेटच!

बाकी बेसिलिका ऑफ बॉम जिझस चे 'पवित्र शिशु ईशु का मंदिर' असे हिंदी भाषांतर तिथे लिहलेले वाचून खूप हसायला आले होते - आजही आठवले कि हसायला येते.

पियुशा's picture

30 Nov 2016 - 3:23 pm | पियुशा

ह्या सर्व जागा तुझ्या नजरेतुनपुन्हा पहायला खुप आवडल्या , वल्ली दा :)

रघुनाथ.केरकर's picture

30 Nov 2016 - 4:41 pm | रघुनाथ.केरकर

मागल्या "आमचे गोयं" या मालीकेची आठवण झाली. हि मालीका सुधा छान होइल.

पिलीयन रायडर's picture

30 Nov 2016 - 10:29 pm | पिलीयन रायडर

वा! वा!! नेहमीप्रमाणेच उत्तम लेख! पुभाप्र.

हे चर्च मी सातवीत असताना पाहिलं आहे. खरंच खुप भारी आहे. तेव्हा तिथे बहुदा सर्व्हिस चालु होती. प्रसाद वाटप चालु झाल्यासारखे वाटल्याने मी आपोआप रांगेत जाऊन उभे राहिले, मी गेले म्हणुन आईपण माझ्या मागे. त्यांनी (बहुदा) खोबर्‍याचा तुकडा - वाईनमध्ये बुडवुन माझ्या तोंडात टाकला. मी खाऊन टाकला. आईने मला विचारलं तुला काही दिलं का त्यांनी? म्हणलं हो. तिला त्यांनी विचारलं की ख्रिश्चन आहात का? ती नाही म्हणली तर तिला दिला नाही.

पुढची आक्खी ट्रिप, मी आता "बाटले".. ख्रिश्चन झाले.. वगैरे वाटत होतं मला! उलटी वगैरे काढायचाही ट्राय केला. नंतर नंतर तर ते खोबरं नसुन काही तरी मांस असेल वगैरेही विचार करुन झाले. आई बाबांनी मला अजिबात पत्ता लागु दिला नाही की असं काही नसतं! =))

नीलमोहर's picture

30 Nov 2016 - 10:45 pm | नीलमोहर

गोव्याची नेहमीपेक्षा वेगळी बाजू दाखवणारा लेख आवडला,
यापुढील गोवा ट्रिपमध्ये ते संग्रहालय, सेन्ट कॅथरीना चॅपेल आणि कोट ऑफ आर्म्स बघायला हवेत.
वेताळावरील लेखाच्या प्रतीक्षेत,

रघुनाथ.केरकर's picture

1 Dec 2016 - 10:52 am | रघुनाथ.केरकर

"बर्‍याच" लोकांना गोवा म्हणजे दारु आणी समुद्रकिनारे एवढच वाटत.

गोयं ह्यापेक्षा बरचं वेगळं आहे. ह्या लेखाच्या निंमीत्ताने वेगळं गोयं पहायला मीळालं.

शकु गोवेकर's picture

1 Dec 2016 - 1:52 am | शकु गोवेकर

लेख बरा असा,आमचो गोय खुप छान असा

मालोजीराव's picture

1 Dec 2016 - 12:24 pm | मालोजीराव

मस्त झालाय रे लेख आणि फोटू पण झकास, त्या IHS अक्षरांबद्दल जरा विस्ताराने सांग कि ...शिवरायांच्या तलवारीवर IHS असं तीनवेळा कोरलेलं आहे (अर्थात शिवरायांनी कोरून घेतलेल नाही, फॅक्टरी मेड आहे ), हे येशूसंदर्भात असावं एखादा ख्रिस्तोग्राम वगैरे , पण नक्की पूर्ण माहिती नाही

प्रचेतस's picture

1 Dec 2016 - 1:01 pm | प्रचेतस

IHS म्हणजे ग्रीक भाषेतील येशूच्या नावाची सुरुवातीची तीन अक्षरे आहेत. ΙΗΣΥΣ- ihsous - Jesus. ख्रिस्तोग्रामच आहे तो.

महाराजांना ही तलवार पोर्तुगीजांकडून भेट म्हणून आली होती का कुठल्या तरी स्वारीत हस्तगत केलीय?

तीन वेळा दोन्ही चर्च झाली पण वस्तू संग्रहालय मात्र बंद मिळाल्याचं दुःख आज तुमचा लेख वाचताना झालं :(
तसंही गोवा असा बघून संपत नाहीच.परत जाऊन बघेनच हे संग्रहालय.
प्रतिसादातली पैताई आणि प्रिमोची चर्चा वाचून त्यांची लेखमाला आठवली.

प्रसाद गोडबोले's picture

2 Dec 2016 - 2:46 pm | प्रसाद गोडबोले

निव्वळ अप्रतिम लेख वल्ली सर !

हा लेख पाहुन आम्हाला ह्या गीताची आठवण झाली -

देवा घरचे ज्ञात कुणाला | विचित्र नेमानेम |
कुणी रखडती धुळीत आणिक | कुणास लाभे हेम ||

बघा ना
एकीकडे , कित्येक उछृंखल लोकं गोव्यात गेल्या गेल्या पहिल्यांदा बीयर शॉप शोधतात , रम कॉकटेल पितात , बीच वर माजलेल्या फिरंगी लोकांच्या बजबजपुरी मध्ये , एखाद्या हॉटेलच्या बाजुच्या शॅक्स वर अर्धनग्न अवस्थेत पडुन राहुन वेळ वाया घालवतात ,
तर आपल्या सारखी दुसरी कडे काहीलोकं अभिजात इतिहासाच्या शोधात , अशा जुन्या पुराण्या चर्चेसचा शोध घेतात , ५०० वर्षांपुर्वी मेलेल्या महान लोकांच्या शवांचे दर्शन घेतात !

शेवटी ज्याचा त्याचा पर्स्युट ऑफ हॅप्पीनेस ! चालायचेच !

पुढील भागासाठी शुभेच्छा :)

गामा पैलवान's picture

2 Dec 2016 - 2:53 pm | गामा पैलवान

पैसाताई,

बॅसिलिका बॉम जीझसच्या भिंतींवर कमळे वगैरे नक्षी आहे असे माझ्या एका कॅथॉलिक मैत्रिणीने सांगितले होते.

म्हणजे ब्यासिलिकाच्या जागी जुनं देऊळ असेलही कदाचित. अशी नक्षी इतरत्र आढळते का ते तपासायला पाहिजे.

आ.न.,
-गा.पै.

प्रीत-मोहर's picture

2 Dec 2016 - 3:10 pm | प्रीत-मोहर

आत्ता आठवले, ओल्ड गोव्याच्या बायपास रोड ला , रस्त्याच्या मधेच असलेला हातकात्रा खांब बघितलात का? ज्याच्यावर लोकांचे हात कापले जायचे

जाताना मांडवीच्या कडेने गेलो, येताना बायपास रोडने आलो पण हातकात्रा खांबाबद्दल काही माहित नसल्याने बघितला नाही.
हातकात्रा खांब म्हणजे इन्क्विझिशन्सच्या शिक्षा का?

प्रीत-मोहर's picture

2 Dec 2016 - 4:09 pm | प्रीत-मोहर

अनेक शिक्षांपैकी एक

hatkatro khamo

काही वर्षांपुर्वी वाहतुकीला अड्थळा होतो म्हणुन याचे स्थलांतर करणार होते. ते जातेने करु दिले नाही.

Marathi pustak premi's picture

4 Jan 2017 - 6:45 am | Marathi pustak premi

पुढील भागांची आतुरतेने वाट पाहत आहोत.