पधारो म्हारे देस : मुंबई – उदयपूर – जयपूर – मुंबई - 1
पधारो म्हारे देस : मुंबई – उदयपूर – जयपूर – मुंबई - 2
इथून पुढे आमचा प्रवास होणार होता तो राजस्थानच्या एका अत्यंत तेजस्वी इतिहासाच्या दिशेने. रक्त तलाई – हलदीघाटी – आणि चेतक स्मारक
आणि आम्ही आता हलदीघाटी च्या दिशेने जात होतो.
मनात खूप खळबळ , बेचैनी दाटून आली होती. कसा होता तो वीर पुत्र , वीर पिता , वीर लढवैया कसा होता एक राणा – “महाराणा”. खरंच ... शिवाजी , महाराणा यांच्यासारखी विभूतीमत्व जाणून घेणे म्हणजे खायचे काम नाही. अहो सह्याद्री आणि आरवली कवेत घेणारे हे वीर-पुरुष. यांच्या पासंगाला कोण पामर टिकणार ?
गाडी आता हलदीघाटी भागा जवळ आली होती असं ड्रायवर म्हणाला. माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. ती जमीन जिथे महाराणासारखे वीर पुरुष लढले जगले अशी पावन भूमी पाहण्याचे भाग्य माझ्या नशिबी येणार होते. मनामध्ये आता सारख्या खालील ओळी घोळत होत्या,
आरम्भ है प्रचण्ड, बोले मस्तकों के झुंड, आज ज़ंग की घड़ी की तुम गुहार दो
आन बान शान या कि जान का हो दान आज इक धनुष के बाण पे उतार दो ....
खरच ... मातृभूमीसाठी या रणवीरानी – नरवीरानी आपले आयुष्य वेचले. कायम मातृभूमी आणि आपला मान हाच जिवापेक्षा , जीवनापेक्षा मोठा मानला त्यासाठीच जगले आणि त्यासाठीच आपले प्राण सुद्धा त्यागले. आज ती भूमी मला पहायला मिळणार होती . स्पर्शायला मिळणार होती. ही होती वीर महाराणा प्रताप , महापराक्रमी चेतक , महाप्रतापी झाला मान , हकीम खां सुरी यांची भूमी. मातृभूमी साठी , शब्दासाठी , मित्रत्वासाठी जीवाला जीव ज्यांनी दिला त्या पुंजा राणा , भामाशाह यांची भूमी.
आम्ही पुढी जात असतानाच ड्रायवर-नरेश आम्हाला म्हणाला की हलदीघाटी तर पाहूच , पण त्याआधी एक जागा तुम्हाला दाखवणे महत्वाचे आहे. तसं या जागेवर कोणी फारसं येत नाही , सरकारी गाईड सुद्धा इथे कोणाला आणत नाही . पण हलदीघाटीची लढाई काय आहे हे जाणण्यासाठी ही जागा पाहणे गरजेचे आहे.
या जागेचे नांव होते “रक्त-तलाई”. नांव ऐकूनच माझ्या अंगावर काटा आला. रक्त तलाई .. रक्ताचे तळे ..!!
ही ती रणभूमी होती , जिथे हलदीघाटी लढाई चा उत्तरार्ध लढला गेला. एका बाजूला होते मोगलांचे अफाट आधुनिक सैन्य , आणि एका बाजूस होते महाराणांचे कडवे वीर. रक्त-तलाई ही जागा हलदी-घाटी च्या खालच्या भागात पठारावर वसलेली आहे. असं म्हणतात की अकबराच्या सैन्याने “आपण हरलो” असा बनाव करून मागे फिरण्याचे खोटे नाटक केले. आणि कळत नकळत विजयोन्मादात महाराणांचे सैन्य त्यांचा पाठलाग करत या जागेवर आले. महाराणांचे सैन्य हे “गुरीला” वारफेयर मध्ये निष्णात तर मुघल सैन्य हे रणभूमी वरील युद्धात निपुण. असा पाठलाग होत होत जेव्हा महाराणांचे सैन्य रक्त-तलाई(हे नांव तेव्हा नव्हते) जवळ आले तेव्हा अचानक मुघल सैन्याने पालटवार केला. प्रतापांचे सैन्य घेरले गेले. इथे दोन्ही सैन्यात घनघोर युद्ध झाले. शेकडोंनी सैनिक धारातीर्थी पडले. आणि या सर्व रणवीरांच्यारक्ताचे पाट पावसासोबत बनास नदी मध्ये वाहून जात असताना तळ्याच्या रुपात साठले. तीच ही जागा – “रक्त-तलाई”. कल्पनाच करवत नाही.
या भीषण लढाई मध्ये हकीम शाह सुरी (शेर शाह सुरी चा वंशज) , ग्वाल्हेरचे राजे रामसिंह तंवर , त्यांचे ३ सुपुत्र आणि झाला मान हे वीरगती प्राप्त झाले. झाला मान याने राणाप्रताप यांचा वेष धारण करून या लढाईमध्ये भाग घेतला आणि प्रताप यांना वाचून सुटका करून घेण्यास मदत केली. शेवटी ना कोणी राजा मेला ना बंदी झाला , त्यामुळे जवळजवळ ४०,००० आहुत्या पडून सुद्धा हे युद्ध अनिर्णीतच राहिले.
रक्त-तलाई चे काही फोटो
माहिती फलक

राजपुतो को पीछे हटना पडा - हे वाक्य कोणीतरी खोडलेल दिसलं (नको तिथे जाज्वल्य अभिमान )

आजूबाजूचा परिसर. स्वच्छता आणि नीटनेटकेपणा नक्कीच कौतुकास्पद.

तंवर यांच्या छत्री

झाला मान यांची समाधी

हकीम सुरी यांची कबर आणि अमरदीप , मुहम्मद सुरी (सद्य वंशज)
अत्यंत साधी बांधणी असलेली कबर,

या कबरीवर ४०० वर्षापासून अमरदीप लावला जातो. या लढाई चे वैशिष्ट्य असे की मुघलांचा सेनापती हिंदू तर हिंदूंचा सेनापती एक नमाजी मुसलमान(पठाण) होता. हकीम शाह सुरी खरं तर प्रतापांकडे तोफखान्याचा प्रमुख म्हणून रुजू झाला पण त्याची युद्धकला आणि कौशल्य ओळखून प्रतापांनी त्याला सेनापती घोषित केले. याची कहाणी अशी सांगितली जाते की हकिम सुरी यांच्या पूर्वजांचा अपमान आणि नंतर वध मुघलांनी केला. वास्तविकत: सुरी यांचे पूर्वज मोगलांच्या नोकरीत पिढ्यानपिढ्या होते तरी त्यांचा घाट मोघलांनी केला. याचा बदला म्हणून अफगाण-पठाण प्रांतातून भारतात येऊन हकीम शाह सुरी प्रतापांना सामील झाला.
अमरदीप

आज “एएसआय” तर्फे गाईड चे आणि स्वयंस्फूर्त रीतीने हकीम शाह सुरी यांच्या कबरीची देखभाल करणारा मुहम्मद खान सुरी हा त्याच वंशातला आजचा व्यक्ती आहे.

आम्ही मुहम्मदभाई कडून सगळी युद्ध कथा ऐकून पुढे निघालो. त्यांची कथनाची पद्धत .. त्यामागील भावना सगळंच अंगावर रोमांच उभं करेल असंच होतं. तुम्ही सुद्धा कधी तिथे गेलात तर जरूर त्यांच्याकडून ही सगळी गोष्ट ऐका.
आम्ही आता पुढे हलदीघाटी कडे रवाना झालो. पण माझ्या मनात ड्रायवर-नरेश चे शब्द अजूनही घोळत होते आणि कुठेतरी खोल आघात करत होते.... “तसं या जागेवर कोणी फारसं येत नाही , सरकारी गाईड सुद्धा इथे कोणाला आणत नाही .” – Unsung Heroes indeed. कुणाचं तरी वाक्य आठवलं – “ज्या देशात इतिहासाबद्दल गर्व नाही तो देश देश नाही .”
आणि २ दिवस जिथे जायचं-जायचं असं मनात घर करून होतो तिथे पोचलो. खूप भरून येत होतं... रोमांचाने हुंदका अनावर होत होता. आम्ही गाडी बाजूला लावून थोडं चालत गेलो. “हलदी-घाटी” ... आम्ही तिथे उभे होतो .
मनात एकीकडे पावनखिंड – आणि तिथे लढणारे .. धारातीर्थी पडणारे बाजीप्रभू .. आणि दुसरीकडे हलदी-घाटी आणि तिथे धारातीर्थी पडलेले राणा पुंजा यांचे भिल्ल वीर. खरंय वीरता , जाज्वल्य मातृभक्ती , मान सन्मान यांना देश-धर्माचं बंधन नाही. कशी लढली गेली असेल ही लढाई, कसे ठरले असतील डावपेच सगळंच अंगावर रोमांच उभं करणारं ... !!
ही घाटी अत्यंत अरुंद अशी साधारण अर्धा किलोमीटर लांबीची खिंड-सदृश्य जागा आहे (आज जरी अरुंद वाटत नसली तरी). मोघल सैन्याला गनिमीकावा माहित नव्हता. शिवाय दऱ्या-खोऱ्यात लढायची सवय अन माहिती नव्हती. जेव्हा राजपुतांशी लढायला मोगल दऱ्याडोंगरात आले तेव्हा या खिंडीच्या कड्यावर उभे राहून पुंजा-राणा यांच्या भिलविरानी भाले , गुलेल , दगड धनुष्यबाण यांच्या सहाय्याने भीषण हल्ला चढवला. अन कित्येक मोगल सैनिकांना राजपुतानाची माती चाखवली. हाच त्यांचा डाव लक्षात आल्यानंतर वर सांगितल्याप्रमाणे मानसिंग याने हरल्याचे नाटक करून नंतर राजपुतांना रक्त-तलाई इथे गाठून भीषण नुकसान केले.
ही वीरांची भूमी आहे. आजही येथील लोक हलदी-घाटी मधली माती “वीर-चंदन” म्हणून रोज कपाळाला लावतात अशी माहिती ड्रायवर ने दिली.
हलदी-घाटी.

मी सुद्धा हलदी-घाटी ची आठवण म्हणून “वीर-चंदन” बरोबर आणले. हलदी-घाटी खरंच नावाप्रमाणे पिवळ्या रंगाची आहे आणि हळदी सारखीच पिवळ्या रंगाची माती आहे.
इथून थोडे पुढे गेलो . रस्त्याच्या कडेला ड्रायवर ने गाडी थांबवली आणि आम्हाला एक जागा दाखवली. हीच होती ती गुहा जिथे महाराणा त्यांच्या हलदी-घाटी च्या युद्धादरम्यान वास्तव्यास होते. राजपुतान्याचा राणा आपल्या मातृभूमी रक्षणासाठी सगळं राज्य त्याग करून अश्या जागेत रहात होता. युद्धा दरम्यान सगळी खलबतं इथेच केली जायची असं म्हणतात. धन्य ते लोक ...
राणाप्रताप यांची गुहा

येथील गुहेत कोणीतरी एक छोटं मंदिर बांधलंय त्याचं दर्शन घेऊन आम्ही आता “वीर-चेतक” याच्या समाधी कडे निघालो.

रक्त तलाई इथून सुटून परत हल्ला करण्यासाठी माघार घेत असताना निघता निघता मानसिंगवर वार करताना मानसिंग च्या हत्तीच्या सोंडेला बांधलेल्या तलवारीने चेतक जखमी झाला. तरीही कमालीच्या स्वामीभक्तीने आणि आपल्या मालकाचा जीव धोक्यात आहे हे ओळखून चेतक रक्त तलाई इथून साधारण १५-२० किलोमीटर ३ च पायांवर महाराणांना घेऊन दौडत सुटला. शेवटी एक २२ फुट रुंद नाला जेव्हा मध्ये अडथळा बनून उभा होता तेव्हा विरचेतक याने जीवाचा सगळा जोर लाऊन तो नाला जखमी अवस्थेत पार केला आणि प्रतापाना वाचवले. शेवटी अतीश्रम , जखमा आणि रक्त-स्त्रावामुळे या वीर साथीदाराने महाराणा प्रताप यांच्या मांडीवर डोकं ठेवून शेवटचा श्वास घेतला. याच ठिकाणी “वीर-चेतक” स्मारक आजही या स्वामिभक्तीचा प्रत्यय देत दिमाखाने उभे आहे. इथेही मला हे सगळं ऐकताना कमालीची अस्वस्थता जाणवत होती.शिवबांच्या कुत्र्याची आठवण इथे आल्याशिवाय राहिली नाही. हे असे सगळे साथीदार , भक्तसेवक होते म्हणूनच महाराणा काय किंवा शिवबा काय यांचे त्या त्या काळी स्वराज्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले.
वीर चेतक स्मारकाचे काही फोटो :


इथूनच थोडं आणखी पुढे गेल्यावर श्रीमाली म्हणून एका गृहस्थाने स्वत:च्या जागेवर “राणाप्रताप म्युझियम” बनवले आहे ते सुद्धा पाहण्या सारखे आहे. या ठिकाणी महाराणा प्रताप यांच्या जीवनावर एक छोटासा चित्रपट दाखवण्यात येतो . तसेच लाईट आणि साउंड शो पण पाहण्या सारखा आहे. या नंतर आपल्याला हवं असेल त्याप्रमाणे विविध वस्तू आणि राजस्थानी कलाकारी च्या वस्तू विकत मिळण्याची ठिकाणे पण येथे मिळतील.
रक्त तलाई इथून सुटून परत हल्ला करण्यासाठी माघार घेत असताना निघता निघता मानसिंगवर वार करताना मानसिंग च्या हत्तीच्या सोंडेला बांधलेल्या तलवारीने चेतक जखमी झाला.


हलदी-घाटी ची प्रतिकृती , यावरून वर भेट दिलेल्या ठिकाणांची कल्पना येईल


म्युझियमचा नयनरम्य परिसर


माकडचेष्टा


चक्क रशियन मात्र्योश्का बाहुल्या - देसी वर्जन

इथे आम्ही थोडा वेळ घालवला आणि परत उदयपुर कडे निघालो. वाटे मध्ये काही ग्रामस्थांनी काही दुकाने उघडली आहेत ती लागली. इथे तुम्हाला गुलाबाची शेती पाहायला मिळते. येथील ग्रामस्थ अशी शेती करून विविध वस्तू बनवून विकतात. जसे गुलकंद , गुलाब सरबत इत्यादी. या व्यतिरिक्त इतरही अनेक नैसर्गिक साधनांपासून बनवलेल्या गोष्टी इथे तुम्ही विकत घेऊ शकता.
सोबत बायको असल्यामुळे , “फक्त बघू तर खरं” याचा परिपाक १०००-२००० ची सरबते,गुलाबपाणी , अंजन इत्यादी वस्तू घेण्यात झाला. नंतर दुकानदाराने “भाभीजी लकडी की कलाकारी भी है हमारे पास . देखना पसंद करेंगे ?” असं म्हंटल्यावर “न पसंद करनेको क्या होगया और २००० चीपकाय्गे तुम “ असं (मनातल्या मनात) बोलून मी ड्रायव्हरला शिफ्टला उशीर होतोय असं कारण सांगून स्वताचा बचाव करून घेतला. आणि चलाखीने दुकानदाराला “आओ आपका फोटो लेता हुं “ असं गुंगवून विक्री करण्यातून बाहेर काढले. (सीए असल्याचा असा उपेग फार होतो). पण म्हणतात न नशीब फार साथ देतंय असं वाटलं की पुढे काहीतरी कांड होतंच. मी दुकानदाराचे फोटो काढेपर्यंत ड्रायव्हर ने माझ्या बायकोला “लोकल खरेदी” ची ठिकाणं दाखवायचं प्रॉमिस केलं. अर्थात “रोज युद्धाचा प्रसंग आम्हा” याचा दांडगा अनुभव आम्हाला असल्याने आम्ही या संकटातून पण सुखरूप बाहेर पडलो.
गुलाबाची शेती आणि दुकानाचे फोटो.


इथून आम्ही आता उदयपुर कडे निघालो. रस्त्यात बोलता बोलता असं कळलं की आता गावात पोचल्यावर “सहेलीयो की बारी” आणि गणगोर घाट” अशी मुद्दाम संध्याकाळी पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. त्यामुळे आता ती पहायची ऐनवेळेवर ठरून तिकडे जायचंही ठरलं.
सहेलीयो की बारी हे म्हणजे अगदी शहराच्या मध्यभागी असलेलं एक अत्यंत सुरेख आणि आनंददायी ठिकाण आहे. या बारीचा म्हणजे उद्यानाचा एक फार गमतीदार ईतिहास आहे. त्या काळी उदयपुरच्या राणीसोबत “हुंडा म्हणून” काही दासी (किंवा मैत्रिणी) राणी सोबत पाठवल्या गेल्या होता.त्यांना (?? धन्य ते वैभव ) विरंगुळा म्हणून बांधलेली ही बाग म्हणजेच सहेलीयो की बारी. या बागेत खूप सारी कारंजी , अनेक छोटे छोटे हौदे , त्यात उमललेली कमळे. सगळंच खूप मंत्रमुग्ध करणारं वातावरण होतं. त्या काळी खरंच काय वैभव भारतात नांदत होतं हे याचा या बागेवरून आपण अंदाज बंधू शकतो. इतकंच नाही तर संध्याकाळी येथे रंगीत दिवे लाऊन खूप सुरेख सुशोभीकरण केलं जातं. आणि बागेतून बाहेर पडलं की चाट वगैरे खाण्याची पण खूप सारी दुकानं आणि गाड्या ही उभ्या असतात.
सहेलीयो की बारी :



इथून पुढे आता हॉटेल ला जायच्या आधी आम्ही गणगोर घाटला गेलो. गणगोर घाट हा उदयपुर मधील मुख्य घाटांपैकी एक आहे. राजघराण्याचे विविध उत्सव आणि सणवार येथे साजरे व्हायचे असं कळलं. इथे फारसं पाहण्यासारखं काही नसलं तरी इथे संध्याकाळचा वेळ फार छान घालवू शकता. हा घाट बगोर की हवेली जवळच आहे. “This can become one of the Finest Dates with your Spouse” हे नक्की.
इथे पोचेपर्यंत आमच्या क्यामेराने जीव टाकल्याने गणगोर घाटचे फोटो काढता आले नाही. (पण एका अर्थी हे बरं झालं. क्यामेरा मोबाईल नसताना पिचोला च्या काठावर असलेल्या घाटावर बसून गप्पा मारण्यातली मजा मस्त)
तरी मोबाईल ने जाता जाता एक फोटो हाणलाच.
गणगोर घाट :

अश्या रीतीने अत्यंत वैभवशाली आणि विरतापूर्ण इतिहासाच्या कुशीत वावरून आल्यानंतर संमिश्र भावना मनात घेऊन आजचा दिवस छानपैकी राजस्थानी जेवण करून साठा उत्तरांची पाचा उत्तरी संपूर्ण केली.
आता आज उदयपुर चा वीर इतिहास पाहून झाल्यानंतर उद्या आम्ही जाणार होतो याच शहराचा “वैभवसंपन्न” इतिहास पाहायला.
जाता जाता .... मेंटेन केलेल्या ... नव्हे सुशोभित ठेवलेल्या हायवे चा फोटो

क्रमश:
--
ज्याक ऑफ ऑल
प्रतिक्रिया
24 Oct 2016 - 11:36 pm | पद्मावति
फारच मस्तं झालाय हा भाग.
25 Oct 2016 - 12:11 am | मोदक
भारी सुरू आहे लेखमाला.. पुढील भाग लवकर येवूदे..!!
25 Oct 2016 - 1:30 am | रॉजरमूर
मस्तच ........
झालाय हा ही भाग .
25 Oct 2016 - 10:54 am | वेल्लाभट
क्लासच! निव्वळ सुरेख!
राजस्थान खरोखर प्रेमात पाडणारी जागा आहे
25 Oct 2016 - 11:51 am | अरिंजय
फार भारी सुंदर वर्णन केलंय ज्याकराव. हल्दीघाटी सुंदर.
25 Oct 2016 - 12:26 pm | केडी
हा भाग सुद्धा एक नंबर! घरबसल्या राजस्थानची हि लेखमाला अशीच सुरु ठेवा! पुढचा भाग लवकर टाका!
25 Oct 2016 - 12:48 pm | हृषीकेश पालोदकर
झक्कास सहल आणि मस्त वर्णन.
25 Oct 2016 - 12:54 pm | एस
मस्त!
25 Oct 2016 - 1:45 pm | स्मिता श्रीपाद
मस्त भाग..
चेतक हत्तीच्या मस्तकावर चढ्ताना चे शिल्प बघुन समितीमद्धे एक खेळ खेळताना शिकलेलं एक गाणं आठवलं
" गुंज उठी है हल्दीघाटी घोडो के ईन टापो से"
भिलो की वो सेना लेकर राणा लढता मुघलो से
हाथी पे सलीम है, चेतक पे राणा है, हाथोमे भाला है
देखो चेतक हाथी के मस्तक पे चढ गया "
25 Oct 2016 - 7:57 pm | ज्याक ऑफ ऑल
तेथील स्थानिक लोक सुद्धा लोककला सदर करतांना महाराणान्बद्दल खूप भरभरून आणि भरून येईल अशी कवनं सदर करतात. खरंच हा एक खूप तेजस्वी इतिहास आहे !!
25 Oct 2016 - 3:27 pm | बाबा योगिराज
छान लिहितोयस, फोटो सुद्धा भारी आलेत.
येकच नंबर.
बाबा योगिराज
25 Oct 2016 - 7:59 pm | ज्याक ऑफ ऑल
खूप खूप आभार.
असाच लोभ असो द्यावा.
- ज्याक