✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नाकासमोर म्हणजेच वळत वळत? हा काय चावटपणा?

स
स्वीट टॉकर यांनी
Wed, 09/21/2016 - 20:02  ·  लेख
लेख
आपण नकाशावर जेव्हां भारताहून अमेरिकेकडे जाणार्या विमानांचे मार्ग बघतो तेव्हां आपल्याला एक गोष्ट खटकते. सारे मार्ग वक्राकार दिसतात. यूरोप (ऍटलांटिक) वरून जाणारा मार्ग सारखा डावीकडे वळत वळत गेल्यासारखा दिसतो आणि जपान (पॅसिफिक) वरून गेलेला उजवीकडे. तीच गत बोटींच्या मार्गांची. आकाशात आणि पाण्यात ट्रॅफिक नसतो, तर हे शहाणे सरळसोट का जात नाहीत? हा मुद्दा वेगवेगळ्या वेळेस मिपावर उपस्थित झाला आहे. शिवाय माझ्या व्यनिमध्ये देखील ही विचारणा झाली आहे. विचारलंत ना? घ्या आता! आल्बर्ट आइनस्टाइननी म्हटलं आहे, “तुम्ही जर एखादी गोष्ट सोपी करून सांगू शकत नसाल तर त्याचा अर्थ ती तुम्हालाच नीट समजलेली नाहिये.” त्यामुळे मी तुम्हाला समजावू शकलो नाही तरी ‘कित्ती कित्ती सोप्पं करून सांगितलंत!’ असंच प्रतिसादात म्हणायचं. ओके? असा जो वक्राकार मार्ग असतो तो प्रत्यक्षात सगळ्यात छोटा असतो आणि त्याला ‘ग्रेट सर्कल रूट’ (Great Circle Route) असं म्हणतात. जर आपण जगाच्या नकाशावर मुंबई – न्यू यॉर्कला जोडणारी सरळ रेष काढली आणि त्या रेषेवरच्या दर दहा मैलानी (दहा हा आकडा पूर्णपणे रॅन्डम आहे. तो दोन, पन्नास किंवा शंभरही घेऊ शकता) असणार्या बिंदूंचे अक्षांश आणि रेखांश काढले आणि मुंबईहून निघाल्यापासून एकानंतर एक या बिंदूंवरून बोट अथवा विमान चालवत निघालात तर न्यू यॉर्कला पोहोचेपर्यंत ‘ग्रेट सर्कल रूट’ पेक्षा खूपच जास्त मैल कापावे लागतील. या मार्गाला ‘र् हम्ब लाईन (Rhumb Line Route) म्हणतात. सकृत् दर्शनी अजिबात न पटणारी ही दोन विधानं आहेत. मात्र ती खरी आहेत. दोन वेगवेगळ्या प्रकारांनी याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतो. प्रकार एकः यासाठी एक करॉलरी आपण ग्राह्य धरायला हवी. ती अशी की, ‘कोणत्याही गोलाकार पृष्ठभागाचा सपाट हुबेहूब नकाशा बनवणे सैद्धांतिक व व्यावहारिक रीत्या (theoretically and practically) अशक्य आहे.’ जगाच्या नकाशात ग्रीनलॅन्डचं क्षेत्रफळ भारताच्या जवळजवळ दुप्पट आहे असं वाटतं. वास्तविक ग्रीनलॅन्डचं क्षेत्रफळ भारताच्या ६५ टक्केच आहे. याचाच अर्थ नकाशावरचा विषुववृत्ताच्या जवळचा एक सेंटीमीटर जर प्रत्यक्षात एक किलोमीटर असला तर ध्रुवाच्या जवळचा एक सेंटीमीटर अर्धाच किलोमीटर असू शकेल. म्हणजे मुंबईहून न्यूयॉर्कचा मार्ग सपाट नकाशावर आखताना जर थोडं उत्तरेला, ध्रुवाकडे सरकलो तर रेष वक्राकार दिसेल पण प्रत्यक्षात अंतर कमी असेल. बरं, अती सरकलो तर अंतर पुन्हा वाढायला लागेल. मग बरोब्बर किती सरकायचं हे कसं ठरवणार? यासाठी सपाट नकाशे बनतात कसे याची पद्धत बघू. (प्रत्यक्षात असे बनत नाहीत, पण त्याचं मूलतत्व कळण्यापुरतं). आपण जी पद्धत साधारणपणे वापरतो त्याला ‘मर्केटर प्रोजेक्शन’ असं म्हणतात. ( हम्म्! लगेच नेटवर दुसरा टॅब उघडून ‘Mercator Projection’ गूगल केलंत? Planisphere, Conformal वगैरे वाचून डोकं गरगरलं? आता या परत!) अशी कल्पना करा की पृथ्वीच्या आकाराची (shape, not size. मराठीत दोन्हीला आकारच म्हणतात) काचेची पोकळ प्रतिकृती बनवून त्यावर सगळे देशांचे आकार, शहरांसाठी ठिपके, अक्षांश, रेखांशांच्या रेघा वगैरे काळ्या रंगात काढल्या आहेत. प्रतिकृती पृथ्वीच्या आकाराची असल्यामुळे हे आकार परफेक्ट आहेत. ‘उत्तर ध्रुव वर आणि दक्षिण ध्रुव खाली’ अशी ती प्रतिकृती उभी ठेवलेली आहे. (२३ अंशात कललेली नाही.) त्याच्या बरोब्बर मध्यभागी बल्ब लावलेला आहे. पण तो आत्ता विझलेल्या स्थितीत आहे. मुंबईचा एक ठिपका आणि न्यूयॉर्कचा एक ठिपका आहे. तुम्ही एक मुंगळा (अथवा मुंगी) आहात. तुम्हाला मुंबईच्या ठिपक्यावर ठेवलं आहे. तुमची खासियत अशी आहे की एकदा तुम्ही चालायला लागलात की फक्त सरळच चालता येतं. पुढे पुढे, नाहीतर मागे मागे. अजिबात डावी उजवीकडे वळता येत नाही. चालायला लागण्या आधी (म्हणजे फक्त मुंबईलाच) तुम्ही तुमची चालण्याची दिशा ठरवू शकता. न्यूयॉर्कच्या ठिपक्यावर गुळाचा खडा ठेवलेला आहे. त्याच्या सुवासानी तुमच्या तोंडाला पाणी सुटलं आहे. मात्र तो खडा क्षितिजाच्या पलीकडे असल्यामुळे फक्त घ्राणेंद्रियानी तुम्ही अंदाज लावलात की न्यूयॉर्क आपल्या मुख्यतः पूर्वेकडे आणि थोडस्सं उत्तरेला आहे. अंदाजानी रोख योग्य दिशेला करून तुम्ही चालायला लागलात. जवळ पोहोचल्यावर असं लक्षात आलं की न्यूयॉर्क शंभर मैल उजवीकडे राहिलं. भन्नाट सुवास नाकात शिरंत होता पण इलाज नव्हता. उलटे मागे मागे चालत परत मुंबईला परतलात, अंदाजे तीन डिग्री उजवीकडे रोख वळवलात आणि पुन्हा चालायला लागलात. च्यायला! करेक्शन अती झालं होतं! पोहोचल्यावर कळलं की आता न्यूयॉर्क फक्त चार मैल डावीकडे राहिलं! घमघमाटानी वेडेपिसे झाला होतात! पण नियम म्हणजे नियम. उलटेउलटे परत मुंबईला आलात. ०.१२ डिग्री डावीकडे करेक्शन करून पुन्हा चालायला लागलात. परफेक्ट न्यू यॉर्कलाच पोहोचलात! हा मुंबई- न्यूयॉर्कला जोडणारा सगळ्यात जवळचा मार्ग. गुळाचा फन्ना उडवल्यावर तुमच्या जिवात जीव आला. खरं काम तर याच्या पुढेच होतं. आता तुमच्या बुटांच्या तळांना न वाळणारा निळा रंग लावला गेला. उलटेउलटे चालंत, जमिनीला चिकटणार्या बुटांचा ‘चर्रक् चर्रक्’ आवाज करंत तुम्ही मुंबईला परत आलात. हा मुंबई - न्यूयॉर्कमधला सगळ्यात जवळचा मार्ग, तुम्ही तो निळ्या रंगानी आपसूकच रंगवलात. आता तुम्ही पुनश्च मनुष्यरूप धारण केलंत. त्या काचेच्या पृथ्वीगोलावर कित्येक काळ्या रेघा, ठिपके वगैरे आहेतच, आता तुम्ही काढलेली एक निळी रेघदेखील आहे. हे सगळं काचेच्या गोलावर आहे. आता त्याचा सपाट नकाशा बनवायचा आहे. एक फोटोग्राफिक फिल्म घेतलीत. त्याची रुंदी या पृथ्वीगोलाच्या परिघाएवढी (circumference at the equator). उंची infinite. या फिल्मचा उभा सिलिंडर बनवून त्या पृथ्वीगोलाभोवती गुंडाळला्त. अर्धा सिलिंडर विषुववृत्ताच्या वर, अर्धा खाली. मधोमध असलेला बल्ब फक्त क्षणभरच चालू केलात. फिल्म एक्सपोज झाली. ती उलगडून सपाट टेबलावर ठेवल्यावर ‘मर्केटर प्रोजेक्शन’ ने बनवलेला नकाशा तयार झाला. बोटी, विमानं वगैरे वापरतात तो हाच नॉर्मल नकाशा. संध्याकाळी जशा सावल्या लांब होतात तसंच विषुववृत्ताहून देश जितका दूर, तितका त्याचा आकार या नकाशावर मोठा दिसू लागला. त्यातच एक वक्राकार निळी रेष मुंबईला न्यूयॉर्कशी जोडणारी. प्रत्यक्षात सगळ्यात जवळचा, वक्रतेमुळे दिसताना लांबचा दिसणारा - हा ‘ग्रेट सर्कल रूट’! चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलंच असेल की या पद्धतीत दोन्हीपैकी कोठलाच ध्रुव कधीच नकाशात दिसणार नाही. बरोबर आहे. ही पद्धत आर्क्टिक व अंटार्क्टिक सर्कल मधल्या नकाशांच्या दृष्टीने नालायक आहे. त्यासाठी तो फोटोपेपरचा सिलिंडर उभा न ठेवता तिरका ठेवावा लागतो. कॉम्प्लिकेशन भयानक वाढतं. आपल्या पाहाण्यात असे नकाशे येत नाहीत. हे जर किचकट वाटलं असेल तर आता आपण दुसर्या प्रकाराने ‘ग्रेट सर्कल रूट’ समजून घेऊया. आता तुम्ही किडामुंगी नसलात तरी मघाचचंच बंधन तुमच्यावर आहे. एकदा चालायला लागलात की तुम्हाला अजिबात वळता येत नाही. (कुरकुरू नका. हे बंधन तुमच्या चांगल्यासाठीच घातलेलं आहे. आपल्याला माहीतच आहे की सरळसोट मार्ग सगळ्यात कमी अंतराचा असतो. आपल्याला फक्त “तो नकाशावर वक्राकार का दिसतो?” याचं उत्तर हवं आहे.) तुमच्या घरून निघून तुमच्याच अंगणातल्या ध्वजदंडाकडे तुम्हाला जायचं आहे. ध्वजदंड तुम्हाला दिसतोय त्यामुळे काहीच प्रश्न नाही. तिकडे तोंड करून तुम्ही चालायला लागलात की सरळसोट पोहोचणारंच. मात्र जर तो क्षितिजापलिकडे असेल तर? कुठे तोंड करून चालायला सुरू करायचं हे तुम्हाला समजणार कसं? मगाचच्या (पहिल्या) पद्धतीत तुम्हीच चालायची दिशा ठरवलीत. त्यामुळे तुम्हाला तीनदा जाऊन यावं लागलं. दुसर्या पद्धतीत तुम्हाला फायदा असा आहे की चालण्याची दिशा तुम्हाला ठरवायची जरूर नाही. ती तुम्हाला सांगितली जाईल. आता दिशा म्हणजे काय हे जाणून घेऊया. दिशा ही होकायंत्रावरून ठरते. त्यासाठी आपल्याला होकायंत्राचं मूलतत्व माहीत करून घेणं जरूर आहे. होकायंत्राची जी तबकडी असते त्यावर उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम तर कोरलेले असतातच, ३६० अंश देखील कोरलेले असतात. उत्तरेला शून्य अंश लिहिलेलं असतं, पूर्वेला नव्वद, दक्षिणेला एकशेऐंशी, पश्चिमेला दोनशेसत्तर. शून्य अंशाची जी रेष आहे ती कायम उत्तर ध्रुवाकडे बोट दाखवत असते. आता असं समजूया की ध्वजदंड तुमच्या इशान्येला (North-East) ला आहे. म्हणजे ४५ डिग्री. (याला ‘बेअरिंग’ असं म्हणतात. The flagstaff is at a bearing of 45 degrees relative to you.) या ‘४५’ चा अर्थ काय? तर तुमच्यापासून उत्तर ध्रुवाकडे जाणारी रेघ (म्हणजेच तुमच्या शरीरातून उत्तरेकडे जाणारी रेखांशाची (longitude) रेघ आणि तुमच्याकडून सरळसोट ध्वजदंडाकडे जाणारी रेघ या दोनमध्ये ४५ अंशांचा कोन आहे. तुम्ही तुमच्या छातीशी होकायंत्र धरलं आहे आणि तुम्ही त्याला न्याहाळंत आहात. आपल्याला माहीतच आहे की शून्य डिग्री लिहिलेली रेघ नेहमी चुंबकीय उत्तर ध्रुवाकडे रोखलेली राहाणार. होकायंत्र कसंही फिरवलं तरी हे सत्य अबाधितच राहाणार. तुम्हाला ४५ डिग्रीज या दिशेनी चालायचं आहे. तुम्ही स्वतःभोवती फिरत होकायंत्रावरील ४५ ची रेघ अगदी नाकाखाली आल्यावर थांबलात. तुम्हाला माहीतच आहे की एकदा का तुम्ही चालायला लागलात की तुम्हाला डावी-उजवी कडे वळताच येत नाही. आता तुम्ही ४५ची दिशा पकडून चालायला लागलात. तुम्हाला असं वाटतंय का, की जोपर्यंत मी अगदी सरळ चालंत राहीन तो पर्यंत माझं नाक आणि होकायंत्रावरील ४५ ची रेघ एकाच रेषेत राहातील. बरोबर? अजिबात नाही! समजा तुम्ही मुंबईहून चालायला सुरवात केली होती. मुंबईचा/ची/चे रेखांश (रेखांश हा शब्द पुल्लिंगी आहे, स्त्रीलिंगी का नपुसकलिंगी?) साधारण ७३ डिग्री आहे. म्हणजे होकायंत्रावरील ‘उत्तर’ ही रेघ या रेखांशाला समांतर होती. ही रेखांश आणि तुमची चालण्याची दिशा यात ४५ डिग्री कोन होता. North-West कडे चालंत तुम्ही नाशिकच्या आसपास पोहोचलात. नाशिकची रेखांश आहे साधारण ७४ डिग्री. आता होकायंत्रावरील ‘उत्तर’ ही रेघ या नवीन रेखांशाला समांतर आहे. आपल्याला माहीतच आहे की रेखांश काही समांतर रेषा नाहीत. त्या दोन्ही ध्रुवांपाशी मिळतात. मुंबईच्या आणि नाशिकच्या रेखांशांमध्ये १ डिग्रीचा कोन आहे. याचाच अर्थ तुम्ही मुंबईहून नाशिकला पोहोचेपर्यंत तुमच्या होकायंत्राची तबकडी एका डिग्रीने anti-clockwise फिरली. आता तुमच्या नाकाखाली ४५ नसून ४६ हा आकडा आला आहे. (तुम्ही अजिबात न वळून देखील!) असेच पुढे चालंत राहिलात तर मालेगावपर्यंत तुमच्या नाकाखाली ४७ हा आकडा आणि जळगावच्या आसपास ४८ येईल! तुमच्या वाटचालीचा आलेख जर तुम्ही महाराष्ट्राच्या नकाशावर काढलात तर तो तीन अंशांनी उजवीकडे वळणारा थोडास्सा वक्राकार दिसेल. तसेच पुढे चालंत, उडत, पोहत सॅन फ्रॅन्सिस्कोपर्यंत गेलात तर जवळजवळ पन्नास अंशांनी वळला असेल. थोडक्यात काय, तर relative to the Earth’s pole तुमची position बदलत असल्यामुळे कोन मोजण्याचा मापदंड बदलतो. तुम्ही प्रत्यक्षात वळंत नसताच! सोप्पं आहे की नाही?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
प्रवास
भूगोल
देशांतर
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
मत
माहिती
प्रश्नोत्तरे

प्रतिक्रिया द्या
49033 वाचन

💬 प्रतिसाद (92)

प्रतिक्रिया

पृथ्वीच्या पाठीवर न्यूयॉर्क

पक्षी
Fri, 09/23/2016 - 18:13 नवीन
पृथ्वीच्या पाठीवर न्यूयॉर्क मुंबईच्या जवळजवळ विरुद्ध दिशेला मागे आहे.
म्हणजे, जर का मुंबईत खड्डा केला तर तो सरळ न्यूयॉर्क मध्ये निघू शकतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

जराशी चूक झाली....

गामा पैलवान
Fri, 09/23/2016 - 19:04 नवीन
पक्षी, खरंतर मुंबई आणि न्यूयॉर्क यांची रेखावृत्तं असं म्हणायचं होतं. मुंबई आणि न्यूयॉर्क यांची रेखावृत्तं १५० अंशांच्या कोनात आहेत. १८० अंशाचा कोण असता तर एकमेकांच्या बरोब्बर विरुद्ध बाजू साधली असती. तेव्हढा ३० अंशांचा फरक पडतोच. खड्डा कुठूनही कुठेही पाडता येतो. तो पृथ्वीच्या केंद्रातून जाईल का ते बघायचं असतं. मुंबईत नेमकं खाली खणंत पृथ्वीकेंद्रातून पुढे गेल्यास कुठे बाहेर निघेल ते गूगलच्या सहाय्याने पाहता येईल. मुंबईचे अक्षांश-रेखांश आहेत 19.0760° N, 72.8777° E. तर खड्ड्याचे असतील 19.0760° S, 107.1223° W. गूगलवर शोधल्यास हे स्थान सापडतं. ही जागा भर प्यासिफिकात दक्षिण अमेरिकेच्या बऱ्याच पश्चिमेला आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्षी

ठाणे जिल्ह्यातील गुंदवली

मार्मिक गोडसे
Fri, 10/21/2016 - 17:30 नवीन
ठाणे जिल्ह्यातील गुंदवली गावापासून भांडूपपर्यंत (अंतर १०० किमी.) मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी जमीनीखालुन अंदाजे १०० मीटर खोल बोगद्याचे काम चालू आहे. एवढ्या लांब अंतराच्या बोगद्याची पातळी कशी कायम केली जाते हे मी ओळखीतल्या एका BMC civil engineer ला विचारले असता त्याने ती 'लेझर' किरणाच्या सहायाने कायम केली जाते असे सांगितले. बोगद्याच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत एका सरळ रेषेत बोगदा खणल्यास बोगद्याला मधे घळ पडून पुढे चढाव होउन पाण्याला रोध होणार नाही का? जसे मोठ्या पुलाचे बांधकाम करताना पृथ्वीची वक्रता लक्षात घेउन पुलाच्या खांबांचा कोन ठरवला जातो ज्यामुळे पुलाचे जमिनीपासूनचे अंतर समान रहाते. बोगद्याच्या बाबतीत तसे वाटत नाही. तसे होत नाही असे त्या civil engineer ने सांगितले. माझी शंका चुकीची आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्षी

कित्ती कित्ती सोप्पं करून

पी. के.
Fri, 09/23/2016 - 14:12 नवीन
कित्ती कित्ती सोप्पं करून सांगितलंत. इतका सोप्पं करून सांगितलं तर रॉकेट सायन्स पण झमजेल. रॉकेट सायन्स वर पण असा एखादा लेख येउदे.
  • Log in or register to post comments

छान...

पाटीलभाऊ
Fri, 09/23/2016 - 14:44 नवीन
छान आणि सोप्प करून समजावून सांगितलंय...!
  • Log in or register to post comments

मराठी_माणूस - धन्यवाद! तुमचं

स्वीट टॉकर
Fri, 09/23/2016 - 15:55 नवीन
मराठी_माणूस - धन्यवाद! तुमचं अगदी बरोबर आहे. माझी वाईट टायपो झाली! तुम्ही ती दर्शवल्यानंतर मला असा प्रश्न पडला आहे की दुसर्या कोणाच्या लक्षात कशी आली नाही? संपादित करतो.
  • Log in or register to post comments

नाकासमोर म्हणजेच वळत वळत? हा काय चावटपणा?

ओम शतानन्द
Fri, 09/23/2016 - 19:53 नवीन
सोप्प वाटतय पण नाहीये , दोन तीन वेळा वाचल्यावर थोडे समजण्यची शक्यता आहे
  • Log in or register to post comments

सारे मार्ग वक्राकार दिसतात

ओम शतानन्द
Fri, 09/23/2016 - 20:20 नवीन
दुबई ते सान फ्रन्सिस्को विमान मार्ग प्रथम उत्तर ध्रुवाच्या दिशेने जाउन नन्तर दक्शिणेकडे कनडावरुन खाली यअसेल, असा द्राविडि प्राणायाम करन्याचे कारण असलेच काही असावे
  • Log in or register to post comments

उत्तर दक्षिण अथवा उलट प्रवासात पण असंच होतं?

संदीप ताम्हनकर
Fri, 09/23/2016 - 20:52 नवीन
उत्तर दक्षिण अथवा उलट प्रवासात पण असंच होतं?
  • Log in or register to post comments

ओ श - बरोबर. तोच मार्ग

स्वीट टॉकर
Sat, 09/24/2016 - 00:31 नवीन
ओ श - बरोबर. तोच मार्ग सगळ्यात जवळचा. मात्र आपल्या नकाशावर तो द्राविडी प्रायाणाम असल्यासारखा वाटतो फक्त. सं ता - नाही होत. उत्तर दक्षिण प्रवास म्हणजे एकाच रेखांशावरून प्रवास. सपाट नकाशावर देखील रेखांश उभेच दाखवंत असल्यामुळे ती एक सरळ उभी रेष दिसतो.
  • Log in or register to post comments

ह्यात पृथ्वीचं परिवलन कसं

पिलीयन रायडर
Sat, 09/24/2016 - 08:30 नवीन
ह्यात पृथ्वीचं परिवलन कसं गृहित धरतात?
  • Log in or register to post comments

पिलियन रायडर,

स्वीट टॉकर
Sat, 09/24/2016 - 09:01 नवीन
पृथ्वीचं परिवलन तर गृहित धरावंच लागतं. नाहीतर विमान तिथे पोहोचेपर्यंत न्यूयॉर्क थोडंसं पूर्वेकडे निघून गेलेलं असेल. मात्र मी या लेखात त्याला पूर्णपणे नजरेआड केलेलं आहे. पृथ्वीच्या परिवलनामुळे एक खोटा (fictitious) फोर्स निर्माण होतो. याला 'कोरियॉलिस फोर्स' असं नाव आहे. नॉर्मल माणसाच्या शिक्षणात त्याचा ह्या फोर्सशी संबंध येत नाही. याच कोरियॉलिस मुळे उत्तर गोलार्धातील प्रत्येक चक्री वादळ अ‍ॅन्टीक्लॉकवाइज घोंघावतं आणि दक्षिण गोलार्धातलं क्लॉकवाइज. मी ह्या लेखात जर कोरियॉलिस सुद्धा जर घेतला असता तर आधीच किचकट असलेला हा मुद्दा पूर्णपणे अगम्य झाला असता. म्हणूनच चालण्याचं उदाहरण घेतलं आहे. उडण्याचं उदाहरण घेतलं की कोरियॉलिसबरोबरच 'हवेचा वेग आणि दिशा' नावाची आणखी दोन व्हेरिएबल त्यात शिरली असती. हा एक लेख न होता प्रचंड रटाळ पीएच. डी. चा थीसिस झाला असता.
  • Log in or register to post comments

कोरियॉलिस इफेक्ट

लीना कनाटा
Sun, 09/25/2016 - 07:40 नवीन
सिंक आणि टब मधले पाणी ड्रेन होताना कोरियॉलिस मुळे तयार होणाऱ्या भवऱ्या बद्दल बरीच भवती-नभवती आहे. दक्षिण गोलार्धात राहणारे मिपाकर सिंक आणि टब मधले भोवरे क्लॉकवाईज फिरतात कि नाही हे चेक करू शकतील काय? स्वीटॉकाका जर अगदी बरोब्बर उत्तर किंवा दक्षिण ध्रुवावर चक्री वादळ झाले तर ते कोणत्या दिशेने फिरेल? आणि आता नाकासमोर म्हणजेच वळत वळत हे समजले असल्याने कोरियॉलिस मुळे पडणारा फरक कसा करेक्ट करतात या बद्दल देखील लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वीट टॉकर

हो ते लक्षात आलं. की तुम्ही

पिलीयन रायडर
Sun, 09/25/2016 - 07:47 नवीन
हो ते लक्षात आलं. की तुम्ही विषय सोप्पा ठेवायला परिवलन बाजुला ठेवलं असणार. मला ह्यात फोर्सेसचा काही खेळ असेल असं वाटलंच नव्हतं. मी पहाते गुगलुन. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वीट टॉकर

याबद्दलची एक जीआएफ मी कधीची

संदीप डांगे
Sun, 09/25/2016 - 09:04 नवीन
याबद्दलची एक जीआएफ मी कधीची शोधतोय, मिळाली की देतो,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

फारच सोप्या भाषेत समजावून

मार्मिक गोडसे
Sat, 09/24/2016 - 18:20 नवीन
फारच सोप्या भाषेत समजावून सांगितले, खासकरून फोटो फिल्म वापरून नकाशा तयार करण्याची कल्पना आवडली. मुंबई-जळगाव ह्या उदाहरणात 'North-West कडे चालंत' असे म्हटले आहे, नकाशात तर जळगांव हे मुंबईच्या North- East ला दिसते आहे.
  • Log in or register to post comments

मार्मिक गोडसे

स्वीट टॉकर
Sat, 09/24/2016 - 19:41 नवीन
तुमचं बरोबर आहे. माझी पूर्व-पश्चिमची चूक झाली आहे. संपादित करतो. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

लीनाताई, एक प्रश्न. 'भवती

स्वीट टॉकर
Sun, 09/25/2016 - 14:37 नवीन
लीनाताई, एक प्रश्न. 'भवती-नभवती' म्हणजे वादविवाद असा मी अंदाज लावला तो बरोबर आहे का? उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर वादळं भरपूर होतात. उत्तर ध्रुवावरची anti-clockwise अन् दक्षिणेकडची उलटी! कोरियॉलिस हा weak फोर्स आहे. वॉश बेसिनमधल्या पाण्याचा mass भरपूर, उपलब्ध वेळ मात्र काही सेकंदच. तेव्हड्या वेळात तेवढ्या पाण्याला ठराविक दिशा देण्याची क्षमता कोरियॉलिसमध्ये आहे असं मला वाटंत नाही. त्या ऐवजी वॉश बेसिन चा आकार, आउटलेटमध्ये एक ट्रॅप असतो त्याची दिशा, आपण वॉशबेसिमनमध्ये पाणी भरतो त्यानंतर आपल्याला जरी डोळ्यानी दिसले नाही तरी त्यात पाणी ओतताना निर्माण झालेले करंट्स जे बराच वेळ त्यात फिरत राहातात,(विजेचे नव्हे, पाण्याचे) यांचा जास्त प्रभाव भोवर्याच्या दिशेवर पडतो असं मला वाटतं. (मात्र याला गणिती सिद्धांत माझ्याकडे नाही.) शिवाय हा इफेक्ट आपण जसजसे विषुववृत्तापासून दूर जातो तसा वाढत जातो. विषुववृत्ताच्या जवळ अगदी नगण्य असतो. मी असं ऐकलं आहे की केनियामध्ये खालील प्रयोग पर्यटकांना दाखवतात. श्री. दामले यांच्या आफ्रिकन सफारीच्या पुस्तकात याचा उल्लेख आहे. तिथे 'EQUATOR' असा बोर्ड आहे. त्याच्या काही मीटर उत्तरेकडे जाऊन वॉश बेसिनचं पाणी anti-clockwise फिरतात दाखवतात आणि काही मीटर दक्षिणेकडे जाऊन उलटं फिरताना. मला स्वतःला यात हातचलाखी असल्याची शंका आहे. संदीपभाऊ - जी आर एफ म्हणजे काय?
  • Log in or register to post comments

संदीपभाऊ - जी आर एफ म्हणजे

प्रसाद_१९८२
Sun, 09/25/2016 - 14:45 नवीन
संदीपभाऊ - जी आर एफ म्हणजे काय? त्यांना बहुतेक .GIF इमेज म्हणायचे असावे.
  • Log in or register to post comments

हो. जी आय एफ. हेच.

संदीप डांगे
Sun, 09/25/2016 - 21:35 नवीन
हो. जी आय एफ. हेच. ते कोरियालिस फोर्स आठवत नव्हतं म्हणून जिफ मिळत नव्हती. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

वा!

पैसा
Sun, 09/25/2016 - 15:33 नवीन
मस्त धागा!
  • Log in or register to post comments

उत्तम लेख !

धर्मराजमुटके
Sun, 09/25/2016 - 22:16 नवीन
उत्तम लेख ! आवडला !!
पृथ्वीच्या आकाराची (shape, not size. मराठीत दोन्हीला आकारच म्हणतात)
साईज ला मराठीत 'माप' म्हणता येते. तुमच्या वाक्यात हा अर्थ बसतो का बघा बरे ! अवांतर : हाच प्रश्न मला घाटरस्त्यांच्या बाबतीत पडतो. सरळ सरळ डोंगर कापून सरळसोट रस्ता न बनविता तो नागमोडीच असतो. त्यामागे देखील हेच शास्त्र आहे की दुसरे काही ?
  • Log in or register to post comments

डोंगर कापणे हे नागमोडी रस्ते

संदीप डांगे
Sun, 09/25/2016 - 22:24 नवीन
डोंगर कापणे हे नागमोडी रस्ते बनवण्यापेक्षा कैकपटीने कठिण काम आहे म्हणून. डोंगर चढण्यासाठी डोंगराचाच आधार घेऊन घाट बनवला जातो, बाकी सिविल इंजिनियर्स जास्त नीट सांगू शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

डोंगराच्या पायथ्याशीच बोगदा

अगम्य
Mon, 09/26/2016 - 22:13 नवीन
डोंगराच्या पायथ्याशीच बोगदा करून आरपार सरळ रास्ता करणे कठिण आणि खर्चिक असते. म्हणून आपण डोंगर चढून उतरतो. आता डोंगरावर चढायचे तर खालून वरपर्यंत सरळसोट रास्ता का करत नाही? तर असे केल्यास चढ फारच तीव्र (steep ) होईल. तो चढ चढण्यासाठी गाडीला खूपच शक्ती (power ) लागेल. उदाहरणार्थ ८०० cc च्या गाडीची शक्ती २२०० cc च्या गाडीपेक्षा कमी असते. तर असा तीव्र चढ कमी शक्तीच्या गाड्यांना चढताच येणार नाही. म्हणून सर्व गाड्यांना रस्त्यावरून जात यावे ह्यासाठी नागमोडी रस्ता बनवतात ज्याचा चढ कमी असतो. ह्याचा तोटा असा आहे की गाड्यांना एकंदर अंतर जास्त कापावे लागते. म्हणजे उभे (vertical ) अंतर तितकेच कापले जाते (डोंगराच्या उंची इतके) पण आडवे (हॉरीझॉन्टल) अंतर नागमोडी रस्त्याने जास्त कापावे लागते. पण सर्वांना जाण्यासारखा मार्ग हवा असेल तर ही तडजोड करावी लागते. सुरक्षितता हे कारण आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

उत्तम, माहितीप्रद लेख.. 'जो

प्रसाद भागवत
Mon, 09/26/2016 - 09:24 नवीन
उत्तम, माहितीप्रद लेख.. 'जो वक्राकार मार्ग असतो तो प्रत्यक्षात...' ही संकल्पना आवडली, थोडीशी हळहळ ही, की थोडी आधी कळली असती तर माझ्या दिवळी अंकालरिता लिहिलेलेया लेखांत संद्रभ देवु शकलो असतो. असो पुन्हा केंव्हातरी उल्लेख करीन. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

माहीतीपुर्ण लेख.

शिद
Mon, 09/26/2016 - 22:34 नवीन
माहीतीपुर्ण लेख. विमानात सिनेमे पाहून कंटाळा आला की माझा फेवरेट टाईमपास म्हणजे रूट पहात बसणे. जर खिडकीजवळ जागा मिळाली असेल तर नकाशात विमानाचा रुट पहात खाली पाहताना कळत जाते की आपण नक्की कुठून उडत चाललो आहोत ते.
  • Log in or register to post comments

ज्यांना कळलेलं नाही, त्यांनी

मदनबाण
Tue, 09/27/2016 - 15:52 नवीन
ज्यांना कळलेलं नाही, त्यांनी अजिबात वाईट वाटून घेऊ नका. या माहितीचा दैनंदिन जीवनात किती उपयोग आहे? तर रूबिक्स क्यूब सॉल्व्ह करता येण्याचा किती उपयोग होता? तितकाच. नगण्य! हुश्श्श्य...मला वाटलं माझ्याच टकुर्‍यात गुळाचा खडा ठेवलेला आहे आणि त्यामुळेच मुंग्या आल्या आहेत ! ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- KALI (electron accelerator)
  • Log in or register to post comments

छान माहीती मिळाली ..

वेदांत
Tue, 09/27/2016 - 16:42 नवीन
छान माहीती मिळाली ..
  • Log in or register to post comments

संदीपभाऊ - तुम्ही टाकलेली

स्वीट टॉकर
Tue, 09/27/2016 - 19:45 नवीन
संदीपभाऊ - तुम्ही टाकलेली सगळीच अ‍ॅनिमेशन संकल्पना कळण्यासाठी उपयोगी असतात. धन्यवाद! ध मु - तुमचं म्हणणं बरोबर आहे. मात्र बोली भाषेत आपण 'छोट्या मापाचा चेंडू' म्हणण्या ऐवजी 'छोट्या आकाराचा चेंडू' असं म्हणतो. प्रसाद भागवत - तो दिवाळी अंकाचा लेख तुम्ही इथे टाकलेला दिसत नाही. मदनबाण - :)
  • Log in or register to post comments

सर, लेख दिवाळी अंकासाठी आहे,

प्रसाद भागवत
Wed, 09/28/2016 - 08:58 नवीन
सर, लेख दिवाळी अंकासाठी आहे, थोडे थांबा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वीट टॉकर

खूप उपयुक्त माहिती दिलीत

सुमेरिअन
Wed, 09/28/2016 - 14:44 नवीन
खूप उपयुक्त माहिती दिलीत स्वीटो काका! आणि व्यवस्थित कळली पण. सोप्पी करून सांगितलीत तुम्ही. इतकी महत्वाची गोष्ट आम्हाला अजून माहिती नव्हती याचंच आश्चर्य वाटतंय मला. अभ्यासक्रमात असायला पाहिजे हे. पुन्हा एकदा धन्यवाद! या लिंकमूळे प्रमाण/रेशो समजण्यात अजून मदत झाली - http://thetruesize.com/#?borders=1~!MTc4NDY3NDU.NTk1OTIyNQ*MzYwMDAwMDA(MA~!CONTIGUOUS_US*NDM4MjIzOA.MTk3NTkwMjQ(MTc1)MQ~!IN*NTI2NDA1MQ.Nzg2MzQyMQ)MA~!CN*MTI0ODcwNDA.MTY0MzAwNjU(MjI1)Mg .
  • Log in or register to post comments

अत्यंत सुंदर

गतीशील
Mon, 10/17/2016 - 11:05 नवीन
वाचून खरंच मजा आली. पु लं चे वाक्य आठवले. मुलगी सरळ वळणाची आहे म्हणजे नेमकं काय हे आत्ता कळलं..!!
  • Log in or register to post comments

अजुन एक

आनंद
Wed, 10/19/2016 - 22:53 नवीन
१००० किमी जास्त अंतर असुन टेल विंडचा फायदा घेत २ १/२ तास विमान लवकर पोचले. दिल्ली ते स.फ. पोलर रुट घेतला नाही. https://blog.flightradar24.com/blog/air-india-taking-advantage-of-tailwinds/
  • Log in or register to post comments

रंजक आणि रोचक बातमी.

गामा पैलवान
गुरुवार, 10/20/2016 - 11:52 नवीन
आनंद, बातमीबद्दल धन्यवाद. :-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद

धन्यवाद!

वैभव पवार
गुरुवार, 10/20/2016 - 14:14 नवीन
पृथ्वीगोल आणि नकाशा यांच्यातील फरक कळाला.
  • Log in or register to post comments

सुंदर लेख, एक शंका

स्वधर्म
Fri, 10/21/2016 - 18:31 नवीन
बरेच दिवस पडलेले कोडे सुटले. धन्यवाद. समजा, पृथ्वीच्या गोलावर ‘सो कॉल्ड’ सरळ रेषेत मुंबई ते न्यूयॉर्क असा दोरा चिकटवला, जो बहुश: महासागरावरून जाईल. दुसरा एक दोरा, जो या विमानांच्या ‘सो कॉल्ड’ वक्रमार्गाने (‘ग्रेट सर्कल रूट’) जाईल, म्हणजेच जमिनीच्या लगत व बराचसा उत्तर दिशेकडून. तर या दुसर्या दोर्याची लांबी कमी भरेल का? मी करून पाहिले नाही, पण जर उत्तर होय, असे असेल, तर इतके conceptual न वाचता, हीच गोष्ट आधिक सोप्या पध्दतीने व लगेच कळेल का? ** जर दुसर्या दोर्याची प्रत्यक्षात लांबी कमी भरली नाही, तर वरचे स्पष्टीकरण समजूनही पटायला अवघड आहे.
  • Log in or register to post comments

पृथ्वीच्या गोलावर ‘सो कॉल्ड’

मार्मिक गोडसे
Fri, 10/21/2016 - 19:39 नवीन
पृथ्वीच्या गोलावर ‘सो कॉल्ड’ सरळ रेषेत मुंबई ते न्यूयॉर्क असा दोरा चिकटवला, जो बहुश: महासागरावरून जाईल. दुसरा एक दोरा, जो या विमानांच्या ‘सो कॉल्ड’ वक्रमार्गाने (‘ग्रेट सर्कल रूट’) जाईल,
पृथ्वीच्या गोलावर सरळ रेषेत मुंबई ते न्यूयॉर्क असा दोरा चिकटवला तर तो फ्रान्सवरून जातो. ‘ग्रेट सर्कल रूट’ म्हणजे ग्रीनलँड वरून गेल्यास अंतरात फारसा फरक पडत नाही,परंतू सपाट नकाशावर सरळ रेषेत मुंबई ते न्यूयॉर्क हा मार्ग सौदी अरेबिया ,इजिप्त, मोरोक्को मार्गे जातो. हे अंतर ‘ग्रेट सर्कल रूट’ पेक्षा अधिक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

एकदा वाचून काही झेपलेलं नाही.

हृषीकेश पालोदकर
Fri, 10/21/2016 - 18:52 नवीन
एकदा वाचून काही झेपलेलं नाही. जरा पहाटे उठून वाचून पाहतो. पण एक नंबर आहे.
  • Log in or register to post comments

प्रवासात असल्यामुळे दखल घेऊ

स्वीट टॉकर
Sun, 10/23/2016 - 14:29 नवीन
प्रवासात असल्यामुळे दखल घेऊ शकलो नाही. क्षमस्व! आनंद - असे जे साधारण ताशी साठ ते ऐंशी मैल वेगवेगानी २५००० ते ४०००० फूट उंचीवरून वाहाणार्या वार्याच्या करंट्सना 'जेट स्ट्रीम्स' म्हणतात. ऋतूंप्रमाणे त्यांची जागा, उंची आणि वेग बदलंत असतात. उपग्रहांकडून मिळणारी माहिती आणि historical data मधून त्यांची जनरल जागा माहित असते पण दहा तासांनंतर त्यानी त्याची उंची अथवा रस्ता थोडासा बदललेला नसेल अशी ग्वाही कोणीही देऊ शकत नाही. प्रत्येक इन्टरनॅशनल एअरलाईनचं 'डिस्पॅच डिपार्टमेंट' प्रत्येक फ्लाइटच्या आधी याची माहिती काढूनच आपापल्या विमानांचा मार्ग ठरवतात. प्रत्येक विमानाला एअर ट्रॅफिक कंट्रोलरने दिलेल्या उंचीवर आणि मार्गावरच विमान उडवावं लागतं. नाहीतर अपघात होतील. त्यामुळे जेट स्ट्रीम शोधायला 'थोडं खाली उडून बघतो, उजवीकडे वळून बघतो!' असं वैमानिकाला स्वातंत्र्य नसतं. एअर इंडियाच्या बातमीत उल्लेख केल्याप्रमाणे पूर्णपणे मार्ग बदलणं क्वचितच केलं जातं. याचं कारण असं की मार्ग इतका बदलून जर का त्या विमानाला तो जेट स्ट्रीम बरोब्बर मिळाला नसता तर ते एक तास उशीरा पोहोचलं असतं. मग आपल्याला ही न्यूज वाचायला मिळाली नसती मात्र त्या employee च्या प्रमोशनची काशी होऊ शकली असती. स्वधर्म आणि मार्मिक - दुसर्या दोर्याची लांबी कमी भरायलाच पाहिजे. आपण हा प्रयोग छोट्या पृथ्वीगोलावर करून बघंत असल्यामुळे आपली छोटीशी experimental error हा प्रयोग फसवू शकते. मात्र मुंबई न्यूयॉर्क ऐवजी दिल्ली व्हॅन्कूव्हर अशा फ्लाइटचा मार्ग पृथ्वीगोलावर दोर्याने तपासला तर ग्रेट सर्कल आणि र्हम्ब लाईनच्या अंतरात जास्त फरक पडेल आणि प्रयोग जास्त यशस्वी होईल असं वाटतं.
  • Log in or register to post comments

सुंदर विश्लेषण..

बबन ताम्बे
Sun, 10/23/2016 - 15:41 नवीन
खूपच छान माहिती .
  • Log in or register to post comments

सुन्दर

मधुका
Mon, 10/24/2016 - 10:10 नवीन
वाह! खूपच सुन्दर! गोलीय त्रिकोणमिती अजिबात न वापरता हे पटवून दिलत. मान गए! मधले कंस लेखाची रंगत वाढवतात.
  • Log in or register to post comments

उत्तम

नंदन
Mon, 10/24/2016 - 14:40 नवीन
आणि संग्राह्य लेख! प्रतिसादही माहितीपूर्ण.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा